‘निपा’ विषाणूचा अतिघातक आजार

Submitted by कुमार१ on 1 October, 2023 - 22:11

संसर्गजन्य आजारांमध्ये विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा वाटा मोठा आहे. यापैकी काही आजार विविध प्राण्यांकडून माणसात संक्रमित होतात. अशा आजारांपैकी एक प्राणघातक आजार म्हणजे ‘निपा’(Nipah) विषाणूचा आजार. विसावे शतक संपण्याच्या सुमारास हा आजार मलेशियातील Sungai Nipah या खेड्यात प्रथम आढळल्याने त्या गावाचे नाव त्याला देण्यात आले आहे.

रोगाचा जागतिक इतिहास

या आजाराचा पहिला रुग्ण १९९८ मध्ये मलेशियात आढळला. तेव्हा तो तिथे डुकरांची संबंधित असलेल्या लोकांमध्ये सापडला होता. भारतातील पहिला रुग्ण 2001 मध्ये पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे सापडला होता. पुढे मे 2018 मध्ये केरळमध्ये हा आजार बऱ्यापैकी आढळला - तेव्हा 23 जणांना आजार झाला होता आणि त्यातील मृत्यू दर 91 टक्के होता. 2023मध्ये तो केरळमध्ये पुन्हा आढळला आहे. यंदा तिथली परिस्थिती नियंत्रणात राहिली हे बरे झाले (वृत्तपत्रीय बातम्यानुसार ६ बाधित, त्यातील २ मृत्युमुखी).

आतापर्यंत हा आजार प्रामुख्याने आशिया व आफ्रिका खंड आणि दक्षिण पॅसिफिक समुद्रपट्ट्यात आढळलेला दिसतो.

निपा विषाणूची वैशिष्ट्ये :
1. तो RNA प्रकारचा आहे. असे विषाणू निसर्गानुसाच चिवट, चमत्कारीक व नियंत्रणात आणायला कठीण असतात.
2. आंबा किंवा अन्य फळांमध्ये तीन दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो.
3. साबण, डिटर्जंट पावडर किंवा सोडियम हायपोक्लोराईटच्या द्रावणाने त्याचा नाश होतो.

विषाणूचा प्रसार
Fruit bats या जातीच्या वटवाघळांमध्ये त्याचा निसर्गतः मोठा साठा असतो. ज्या ठिकाणी फळांची झाडे, वटवाघळे, डुकरे आणि माणूस यांचा निकट संपर्क येतो तिथे या विषाणूचा सजीवांमध्ये प्रसार होतो. 'डेट पाम' या प्रकारची झाडे ठराविक वटवाघळांना विशेष प्रिय असतात. हे प्राणी त्या झाडांचा रस पितात. या प्रक्रियेदरम्यान त्यांच्या शरीरात असलेले विषाणू बाहेर पडून संबंधित फळे आणि शेतातील मातीत पसरतात. अशी दूषित फळे डुक्कर किंवा अन्य प्राणी खातात. डुकरांच्या शरीरात या विषाणूचे अजून वर्धन होते. अशा डुकरांना मारून त्यांच्या मांसाची ठिकठिकाणी विक्री होते. त्या दूषित मांसातून विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो. काही जमातींत अशा झाडांचा ताजा रस पिण्याची देखील पद्धत असते. त्यातूनही हा जंतूसंसर्ग होऊ शकतो. एकदा का माणसाला हा आजार झाला की त्याच्या अतिनिकट संपर्क असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार पसरू शकतो. रुग्णाच्या श्वासातून बाहेर पडणारे सूक्ष्म थेंब (droplets), त्याची लघवी किंवा रक्त यांच्या संपर्कातून हा आजार दुसऱ्या व्यक्तींना होऊ शकतो.

खालील चित्रात हे सर्व व्यवस्थित समजून येईल :

Nipah transm.jpgआजाराचे स्वरूप

जंतुसंसर्ग झाल्यानंतर थोड्याच दिवसात (3-14) संबंधित रुग्णाला लक्षणे दिसू लागतात. हा विषाणू मुख्यतः श्वसनमार्ग आणि मेंदूवर हल्ला करतो. काही महत्त्वाची लक्षणे अशी :
1. डोकेदुखी, गरगरणे व मानसिक गोंधळ
2. तीव्र ताप व उलट्या
3. खोकला व दम लागणे
4. स्नायू शिथील पडणे
5. नाडीचे ठोके आणि रक्तदाब वाढणे
6. स्नायूंची संबंधित निरनिराळ्या प्रतिक्षिप्त क्रियांमध्ये अडथळे येणे

फुफ्फुसांना इजा झाल्यामुळे न्यूमोनिया होतो. आजार गंभीर झाल्यास रुग्ण बेशुद्ध होतो. तसेच त्याला फेफरे येऊ शकतात. एकदा का शरीरात हा विषाणू फोफावला की तो बहुतेक सर्व महत्त्वाच्या इंद्रियांना इजा पोचवतो. त्या स्थितीत आजार प्राणघातक ठरतो. ज्या रुग्णांना श्वसनमार्गाचा मोठा त्रास होतो ते इतरांसाठी अधिक संसर्गजन्य ठरतात.

तपासण्या आणि रोगनिदान
1. गरजेनुसार रुग्णाच्या नाकातील स्त्राव, रक्त, लघवी आणि पाठीच्या कण्यातील द्रव (CSF) यांची तपासणी केली जाते. यापैकी योग्य तो नमुना विशेष विषाणू संशोधन केंद्राकडे पाठवला जातो. तिथे RT-PCR या चाचणीचा वापर करून विषाणू शोधला जातो.

2. रक्ततपासणी मधून या विषाणू-विरोधी antibodies सापडू शकतात.

उपचार
सध्या तरी या आजारावरील विशिष्ट विषाणूविरोधी रामबाण औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णावर लक्षणानुसार ठराविक उपचार केले जातात आणि शरीरातील जलस्थितीची काळजी घेतली जाते.
Ribavirin या औषधाचा पूर्वी वापर केलेला आहे परंतु अद्याप त्याची उपयुक्तता प्रस्थापित झालेली नाही. ठराविक प्रकारच्या monoclonal antibodyचे उपचार देखील प्रयोगाधीन आहेत.

रोगप्रतिबंध
रोगाचे गंभीर स्वरूप बघता प्रतिबंध खूप महत्त्वाचा ठरतो. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे :
1. बाधित वटवाघळे किंवा डुकरांची संपर्क टाळणे
2. ज्या झाडांवर वटवाघळे विश्रांती घेत थांबतात त्या भागात वावर टाळणे
3. वटवाघळानी दूषित केलेली फळे किंवा झाडाचा रस, कच्ची फळे आणि जमिनीवर पडलेली फळे खाऊ नयेत
4. या आजाराने बाधित असलेल्या रुग्णाशी संपर्क टाळावा
5. ज्या भागात आजाराचा उद्रेक झाला आहे तेथील नागरिकांनी संसर्गजन्य रोगांच्या संदर्भातली नेहमीची त्रिसूत्री पाळणे महत्त्वाचे ठरते.

* रोगप्रतिबंधक लस अद्याप दृष्टिक्षेपात नाही.
….
वटवाघुळ हा उडू शकणारा एकमेव सस्तन प्राणी आहे. त्याच्या विविध जाती असून त्यांना सुमारे ६० प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग होतो. त्यापैकी अनेक विषाणू मानवी संसर्गजन्य आजार घडवताना दिसतात. प्रस्तुत लेखातील विषाणू बरोबरच करोना आणि रेबीज ही त्यातली काही ठळक उदाहरणे. या दृष्टिकोनातून वटवाघळांचा सखोल जैविक अभ्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर चालू आहे यथावकाश या संशोधनातून मानवी संसर्गजन्य आजारांच्या अभ्यासाला योग्य ती दिशा मिळावी अशी अपेक्षा आहे.
***********************************************************************************************************************************
संदर्भ :
१. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6830995/#:~:text=Nipah%20vi...(NiV)%20is%20a,and%20deadly%20encephalitis%20in%20humans.
२. https://www.cdc.gov/vhf/nipah/prevention/index.html
३. (https://www.nature.com/articles/s41586-022-05506-2).

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहितीपूर्ण लेख. आवडला.
या वेळी या आजाराबद्दल लिहिलेली बहुतांश माहिती मी अगोदर वाचली होती. कारण Nipah outbreak वर आलेला एक मल्याळम चित्रपट - ' Virus '. अतिशय सुंदर चित्रपट होता. Subtitles सहित पहावा लागला, पण तरीही अतिशय आवडलेला medical thriller. हा चित्रपट पाहिल्यावर उत्सुकतेपोटी बरेच लेख वाचले होते.

केरळमध्ये 14 वर्षाच्या मुलाचा निपाह संसर्गाने मृत्यू झाला आहे. त्या संसर्गाचे कारण कसून शोधले जात आहे.
आरोग्य अधिकार्‍यांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की त्या मुलाने आणि त्याच्या काही मित्रांनी wild hog plum या जातीचे विषाणूदूषित जंगली फळ खाल्लेले असावे :

https://www.onmanorama.com/news/kerala/2024/07/22/nipah-virus-kerala-boy...

खरं म्हणजे भारतातील नऊ राज्यांतील त्या विशिष्ट वटवाघळांमध्ये निपा-antibodies सापडल्यात. केरळच्या बाबतीत निपा उद्रेकाच्या खालील शक्यता राहतात :
. घनदाट जंगलातल्या वटवाघळांमध्ये तो विषाणू बहुधा ठाण मांडून बसला आहे (endemic)
. वातावरणातील टोकाचे बदल

. ताजी ताडी पिण्याची परंपरा. त्यातून बहुधा विषाणू संक्रमण होत असावे.
. तिथली जागरूकता वाढलेली असल्यामुळे संशयित रुग्णांच्या चाचण्या अधिक प्रमाणात केल्या जातात. >>> अधिक रुग्णनोंदी

केरळच्या बाबतीत निपा उद्रेकाच्या खालील शक्यता राहतात :
. घनदाट जंगलातल्या वटवाघळांमध्ये तो विषाणू बहुधा ठाण मांडून बसला आहे (endemic)>>>>

अनिर्बंध जंगल तोडीमुळे जंगलातले प्राणी व पक्षी बाहेर पडताहेत त्याचा हा परिणाम आहे.

वटवाघळांपासुन मानवी समाज कायम दुर राहिलाय त्याचे एक कारण वाघळांवर असलेले विषाणू असावे.

बरोबर. मानवी हस्तक्षेपामुळे वटवाघळांचे अन्नशोधासाठी मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते.

साथरोगांच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून वटवाघळांवर एक मोठे आंतरराष्ट्रीय संशोधन चालू आहे :
https://www.nature.com/articles/s41586-022-05506-2
https://onlinelibrary.wiley.com/doi/abs/10.1111/ele.14007

केरळमधील मल्लपुरम येथील येथे नुकताच 24 वर्षीय तरुणाचा निपामुळे मृत्यू झालेला आहे. त्यामुळे त्याच्या घराच्या तीन किलोमीटर परिसरात टाळेबंदी लागू झालेली आहे.
त्या परिसरातील शाळा कॉलेजेसही बंद ठेवण्यात आलेली आहेत आणि नेहमीचे त्रिसूत्रीचे नियम लागू केलेत.

https://www.indiatvnews.com/news/india/nipah-virus-in-kerala-containment...

Pages