‘निपा’ विषाणूचा अतिघातक आजार

Submitted by कुमार१ on 1 October, 2023 - 22:11

संसर्गजन्य आजारांमध्ये विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा वाटा मोठा आहे. यापैकी काही आजार विविध प्राण्यांकडून माणसात संक्रमित होतात. अशा आजारांपैकी एक प्राणघातक आजार म्हणजे ‘निपा’(Nipah) विषाणूचा आजार. विसावे शतक संपण्याच्या सुमारास हा आजार मलेशियातील Sungai Nipah या खेड्यात प्रथम आढळल्याने त्या गावाचे नाव त्याला देण्यात आले आहे.

रोगाचा जागतिक इतिहास

या आजाराचा पहिला रुग्ण १९९८ मध्ये मलेशियात आढळला. तेव्हा तो तिथे डुकरांची संबंधित असलेल्या लोकांमध्ये सापडला होता. भारतातील पहिला रुग्ण 2001 मध्ये पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे सापडला होता. पुढे मे 2018 मध्ये केरळमध्ये हा आजार बऱ्यापैकी आढळला - तेव्हा 23 जणांना आजार झाला होता आणि त्यातील मृत्यू दर 91 टक्के होता. 2023मध्ये तो केरळमध्ये पुन्हा आढळला आहे. यंदा तिथली परिस्थिती नियंत्रणात राहिली हे बरे झाले (वृत्तपत्रीय बातम्यानुसार ६ बाधित, त्यातील २ मृत्युमुखी).

आतापर्यंत हा आजार प्रामुख्याने आशिया व आफ्रिका खंड आणि दक्षिण पॅसिफिक समुद्रपट्ट्यात आढळलेला दिसतो.

निपा विषाणूची वैशिष्ट्ये :
1. तो RNA प्रकारचा आहे. असे विषाणू निसर्गानुसाच चिवट, चमत्कारीक व नियंत्रणात आणायला कठीण असतात.
2. आंबा किंवा अन्य फळांमध्ये तीन दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो.
3. साबण, डिटर्जंट पावडर किंवा सोडियम हायपोक्लोराईटच्या द्रावणाने त्याचा नाश होतो.

विषाणूचा प्रसार
Fruit bats या जातीच्या वटवाघळांमध्ये त्याचा निसर्गतः मोठा साठा असतो. ज्या ठिकाणी फळांची झाडे, वटवाघळे, डुकरे आणि माणूस यांचा निकट संपर्क येतो तिथे या विषाणूचा सजीवांमध्ये प्रसार होतो. 'डेट पाम' या प्रकारची झाडे ठराविक वटवाघळांना विशेष प्रिय असतात. हे प्राणी त्या झाडांचा रस पितात. या प्रक्रियेदरम्यान त्यांच्या शरीरात असलेले विषाणू बाहेर पडून संबंधित फळे आणि शेतातील मातीत पसरतात. अशी दूषित फळे डुक्कर किंवा अन्य प्राणी खातात. डुकरांच्या शरीरात या विषाणूचे अजून वर्धन होते. अशा डुकरांना मारून त्यांच्या मांसाची ठिकठिकाणी विक्री होते. त्या दूषित मांसातून विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो. काही जमातींत अशा झाडांचा ताजा रस पिण्याची देखील पद्धत असते. त्यातूनही हा जंतूसंसर्ग होऊ शकतो. एकदा का माणसाला हा आजार झाला की त्याच्या अतिनिकट संपर्क असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार पसरू शकतो. रुग्णाच्या श्वासातून बाहेर पडणारे सूक्ष्म थेंब (droplets), त्याची लघवी किंवा रक्त यांच्या संपर्कातून हा आजार दुसऱ्या व्यक्तींना होऊ शकतो.

खालील चित्रात हे सर्व व्यवस्थित समजून येईल :

Nipah transm.jpgआजाराचे स्वरूप

जंतुसंसर्ग झाल्यानंतर थोड्याच दिवसात (3-14) संबंधित रुग्णाला लक्षणे दिसू लागतात. हा विषाणू मुख्यतः श्वसनमार्ग आणि मेंदूवर हल्ला करतो. काही महत्त्वाची लक्षणे अशी :
1. डोकेदुखी, गरगरणे व मानसिक गोंधळ
2. तीव्र ताप व उलट्या
3. खोकला व दम लागणे
4. स्नायू शिथील पडणे
5. नाडीचे ठोके आणि रक्तदाब वाढणे
6. स्नायूंची संबंधित निरनिराळ्या प्रतिक्षिप्त क्रियांमध्ये अडथळे येणे

फुफ्फुसांना इजा झाल्यामुळे न्यूमोनिया होतो. आजार गंभीर झाल्यास रुग्ण बेशुद्ध होतो. तसेच त्याला फेफरे येऊ शकतात. एकदा का शरीरात हा विषाणू फोफावला की तो बहुतेक सर्व महत्त्वाच्या इंद्रियांना इजा पोचवतो. त्या स्थितीत आजार प्राणघातक ठरतो. ज्या रुग्णांना श्वसनमार्गाचा मोठा त्रास होतो ते इतरांसाठी अधिक संसर्गजन्य ठरतात.

तपासण्या आणि रोगनिदान
1. गरजेनुसार रुग्णाच्या नाकातील स्त्राव, रक्त, लघवी आणि पाठीच्या कण्यातील द्रव (CSF) यांची तपासणी केली जाते. यापैकी योग्य तो नमुना विशेष विषाणू संशोधन केंद्राकडे पाठवला जातो. तिथे RT-PCR या चाचणीचा वापर करून विषाणू शोधला जातो.

2. रक्ततपासणी मधून या विषाणू-विरोधी antibodies सापडू शकतात.

उपचार
सध्या तरी या आजारावरील विशिष्ट विषाणूविरोधी रामबाण औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णावर लक्षणानुसार ठराविक उपचार केले जातात आणि शरीरातील जलस्थितीची काळजी घेतली जाते.
Ribavirin या औषधाचा पूर्वी वापर केलेला आहे परंतु अद्याप त्याची उपयुक्तता प्रस्थापित झालेली नाही. ठराविक प्रकारच्या monoclonal antibodyचे उपचार देखील प्रयोगाधीन आहेत.

रोगप्रतिबंध
रोगाचे गंभीर स्वरूप बघता प्रतिबंध खूप महत्त्वाचा ठरतो. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे :
1. बाधित वटवाघळे किंवा डुकरांची संपर्क टाळणे
2. ज्या झाडांवर वटवाघळे विश्रांती घेत थांबतात त्या भागात वावर टाळणे
3. वटवाघळानी दूषित केलेली फळे किंवा झाडाचा रस, कच्ची फळे आणि जमिनीवर पडलेली फळे खाऊ नयेत
4. या आजाराने बाधित असलेल्या रुग्णाशी संपर्क टाळावा
5. ज्या भागात आजाराचा उद्रेक झाला आहे तेथील नागरिकांनी संसर्गजन्य रोगांच्या संदर्भातली नेहमीची त्रिसूत्री पाळणे महत्त्वाचे ठरते.

* रोगप्रतिबंधक लस अद्याप दृष्टिक्षेपात नाही.
….
वटवाघुळ हा उडू शकणारा एकमेव सस्तन प्राणी आहे. त्याच्या विविध जाती असून त्यांना सुमारे ६० प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग होतो. त्यापैकी अनेक विषाणू मानवी संसर्गजन्य आजार घडवताना दिसतात. प्रस्तुत लेखातील विषाणू बरोबरच करोना आणि रेबीज ही त्यातली काही ठळक उदाहरणे. या दृष्टिकोनातून वटवाघळांचा सखोल जैविक अभ्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर चालू आहे यथावकाश या संशोधनातून मानवी संसर्गजन्य आजारांच्या अभ्यासाला योग्य ती दिशा मिळावी अशी अपेक्षा आहे.
***********************************************************************************************************************************
संदर्भ :
१. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6830995/#:~:text=Nipah%20vi...(NiV)%20is%20a,and%20deadly%20encephalitis%20in%20humans.
२. https://www.cdc.gov/vhf/nipah/prevention/index.html
३. (https://www.nature.com/articles/s41586-022-05506-2).

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

होय,
लेखात दिलय :
रुग्णाच्या श्वासातून बाहेर पडणारे सूक्ष्म थेंब (droplets),
.... अतिनिकट संपर्क असलेल्या व्यक्तींमध्ये.......

त्या दूषित मांसातून विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो. >>> म्हणजे मांस भाजून/शिजवून खाल्ले तरी ते धोकादायक असते का?

उष्णतेचा या विषाणूवर होणारा परिणाम असा आहे :
१. 70 C तापमानात हा विषाणू एक तासापर्यंत जिवंत राहू शकतो.
२. परंतु 100 C तापमानात 15 मिनिटाहून जास्त काळ राहिल्यास तो मरतो.

निष्कर्ष : मांस शिजवण्याच्या पद्धतीनुसार त्याची संसर्गक्षमता ठरेल.

डॉ कुमार, बरं झालं याबाबत लिहिलंत.
डेथ रेट सध्यातरी जास्त आहे.यावर एखादे औषध किंवा लस लवकर निघायला हवी.

डॉ कुमार, एक शंका: घरी दुकानातून आणलेली सफरचंद किंवा इतर फळं वापरताना ती वटवाघूळाने दूषित केली आहेत का कसं ओळखणार?ऑबव्हियस स्पष्ट दंतव्रण दिसणारी फळं फळवालाच काढून टाकतो. त्यातल्या त्यात नीट बघून पाण्याखाली घासून धुणे,साल काढणे इतकंच जमतं.आज घाबरून सफरचंदावर सुवासिक डेटॉल सॅनि स्प्रे मारला(संजीव कपूर वाला भाज्या वॉशर घरात नव्हता) आणि परत पाण्याने घासून पुसून सोलून वापरले.(थोडं पॅरानॉईड आहे हे, पण आजार गंभीर आणि सर्व्हायव्हल रेट कमी आहे त्यामुळं ओव्हरभीती रास्त मानून घ्यावी.)

फळं वापरताना ती वटवाघूळाने दूषित केली आहेत का कसं ओळखणार? >>

प्रश्न चांगला आहे पण याचे उत्तर डॉक्टरपेक्षा शेतकरीच देऊ शकेल Happy
मला दोन शास्त्रीय पर्याय दिसतात :
लेखात दिल्यानुसार असे आहे :
विषाणू :
* आंबा किंवा अन्य फळांमध्ये तीन दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो.
* साबण, डिटर्जंट पावडर किंवा सोडियम हायपोक्लोराईटच्या द्रावणाने त्याचा नाश होतो.

मग आपल्यापुढे दोन पर्याय आहेत :
१. हलक्याशा साबणाच्या पाण्याचा हात लावून धुणे किंवा
२. सरळ तीन दिवसांनी खायला घेणे !

आणि सरसकट सर्वांनीच त्याची भीती बाळगण्यापेक्षा थोडा भौगोलिक अंदाज घेता येईल :

१. विशिष्ट प्रकारची खजुराची झाडे आपल्या परिसरात किंवा जिथून शेतमाल येतो तिथे असतात का ?
२. खजुराच्या झाडांचा ताजा रस पिण्याची प्रथा जिथे असेल तिथे अधिक दक्षता हवी ( उदा. केरळ )
३. अशी झाडे, वटवाघळे आणि पाळलेली डुक्करे असे सर्व एकत्र नांदते ते भाग अधिक धोकादायक ठरतात.

आपण खात असलेली आपली फळे- भाज्या कुठून येतात हे काही आपल्याला कळू शकत नाही!
त्यामुळे आणल्या नंतर तीन दिवसानी खाणे हेच अधिक योग्य ठरेल.
कारण, हलक्याशा साबणाच्या पाण्याचा हात लावून धुणे .. ह्या उपायाने आत ऑलरेडी शिरलेला व्हायरस कसा नष्ट होणार?

फार कठीण होत चाललेय............!!

काळजी घेवून घेवून किती घेणार .
एक विषाणू थोडे आहे लाखो आहेत.
कोणकोण पासून वाचणार.
आज पर्यंत माणसं जगलीच ना आणि अगदी बिंदास्त.
विषाणू,जिवाणू निर्मिती ची निसर्गाची स्वतःची यंत्रणा आहे ती योग्य समतोल काम करते.
मानव त्या मध्ये हस्तक्षेप करून स्वतः पण विषाणू जिवाणू निर्माण करतो ते अती धोकादायक.

वटवाघूळ हा पक्षी सर्रास दिसणारा पक्षी नाही.
महाराष्ट्र मध्ये तरी अती दुर्मिळ आहे.
मानवी उत्क्रांती मध्ये ह्या विषाणू ,जिवाणू न चेच सर्वात मोठे योगदान आहे.
त्यांच्या मुळेच मानव आज बुध्दीमान आहे.
नाही तर आज पण जंगलात च राहत असता.
ज्या प्रण्यान मधून विषाणू ,जिवाणू जंप करून माणसात येतात .
ते प्राणी नष्ट झाले तर मानवी उत्क्रांती पण थांबेल.
अशी मला शंका आहे

आपण काळजी घेवु शकतो पण कोणत्या च आजार पासून,रोगापासून वाचू शकत नाही.
Nipa होवू नये म्हणून सर्व माहीत असलेली काळजी घेतली तरी तुम्हाला निपा व्हायरस इन्फेक्शन होणार नाही.
ह्याची खात्री कोणीच देवू शकत नाही.
कोणताही एक रोग आपल्याला झालाच नाही पाहिजे असे ठरवा.
उदा कॅन्सर आणि क्षय.
आणि सर्व काळजी घ्या अगदी काटेकोर पने हे रोग होवूच नयेत अशी जीवनशैली ठेवा.

तरी 100% तुम्ही त्या रोग पासून वाचू शकतं नाही.
मला कसा क्षय झाला ,मला कसा कॅन्सर झाला .
असे गहण प्रश्न पडतील च .
आणि त्या प्रश्नाचे उत्तर जगात कोणाकडेच नसेल

खरे आहे, फार काळजी करत बसू नये. असंख्य आजार आत्तापर्यंत झालेले आहेत आणि नवीन येत राहतील. जागरूकता पुरे.

वटवाघूळ महाराष्ट्र मध्ये तरी अती दुर्मिळ आहे.
>>>
याबाबतीत मात्र सहमत नाही. फ्रूट बॅट या वटवाघळांची वसाहत ठाण्यामध्ये आहे : http://ajesjournal.com/PDFs/2014-2/6_a_colony_of_fruit_bat_pteropus_giga...

एकंदरीत वटवाघळे पश्चिम घाटावरील पाणी मुबलक असलेल्या प्रदेशांमध्ये भरपूर आहेत : https://faunaofindia.nic.in/PDFVolumes/records/104/03-04/0091-0097.pdf

लेख छान नेहमीप्रमाणे.
विषाणू कसा पसरतो ही माहिती उपयुक्त तसे रोचक.
डेथ रेट जास्त असला तरी प्रसार जास्त नाही असे वाटते.
मी बातम्या बघत नाही सध्या. पण अनु यांची खालील पोस्ट वाचून शंका आली.
<<< आज घाबरून सफरचंदावर सुवासिक डेटॉल सॅनि स्प्रे मारला
>>>>
इतका पसरला आहे का हा?

इतका पसरला आहे का हा?
नाही, अजिबात नाही !

काही दिवसांपूर्वीच तो केरळमध्ये मर्यादित स्वरूपात आला आणि परिस्थिती चांगल्यापैकी नियंत्रणात आहे. गणेशोत्सवा दरम्यान दक्षिणेकडील वृत्तमाध्यमांमध्ये त्या बातम्या सतत झळकत होत्या. हा आजार केरळमध्येच अधूनमधून का येतो यावर पत्रकारांचा थोडाफार काथ्याकूटही झाला होता. तिथल्या एका जिल्ह्यातील शाळा आठवडाभर बंद ठेवल्या होत्या.

आपल्याकडे उत्सवी वातावरण असल्याने त्या काळात मी संयम ठेवून या विषयावर लिहिणे टाळले.

आताचे लेखन फक्त एका संसर्गजन्य रोगाची नोंद / माहिती इतक्याच हेतूने केलेले आहे

अतिशय जीवघेणे विषणू, जिवाणू वेगात पसरत नाहीत .
हा निसर्ग नियम असावा.
क्षय रोग हा अतिशय गंभीर आणि जीवघेणा रोग आहे .
उपचार ल. पण दाद न देण्याची त्याची कुवत आहे.
पण सर्रास सर्वांना क्षय रोग होत नाही.
एड्स पण तसाच होता तो पण अमर्याद पसरला नाही.
Covid मात्र जगभर अमर्याद पसरला त्याची जीव घेण्याची क्षमता क्षय किंवा एड्स पेक्षा खूप कमी होती

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्वांना धन्यवाद !
रच्याकने....... थोडी करमणूक :
हे मराठी भाषांतर पाहून हहपुवा होईलच :

Fruit bat = फळ फलंदाजी Happy
https://www.english-marathi.net/english-to-marathi-meaning-fruit-bat

याबाबतीत मात्र सहमत नाही. फ्रूट बॅट या वटवाघळांची वसाहत ठाण्यामध्ये आहे :>> होय. मुलुंड, ठाणे येथे बरेच वेळा वटवाघळे उंबर, बदाम अशा झाडांवर आढळतात. आता आपल्या सोसायटी तील झाडावर येतात तेव्हा काय काळजी घ्यावी?

तेव्हा काय काळजी घ्यावी? >>

"2. ज्या झाडांवर वटवाघळे विश्रांती घेत थांबतात त्या भागात वावर टाळणे"
ती असताना निदान त्या झाडाच्या निकट न जाणे एवढे करता येईल ! Happy

( इतके घाबरायला नको. तुमच्या संकुलातील वटवाघळे भिन्न जातीची आणि निरोगी सुद्धा असतील ).

इतका पसरला आहे का हा?>>>सेम हाच प्रश्न डोक्यात आला,लोकं इतकी काळजी घेताहेत नि मला काहीच कशी कल्पना नाही असं वाटलं एकदम
छान लेख डॉक्टर

बाप रे सटपटायला होतं. काल जरा खोकला झाला तर हा लेख आठवला.
पण लेख आवडला आणि हो अशी माहीती असणं हे महत्वाचे आहे निदान आरोग्य-सुरक्षेची आगाऊ काळजी घेता येते.

Pages