वेणा

Submitted by पॅडी on 15 July, 2024 - 23:17

* वेणा *

चिंतातूर बळीराजा
दिली पावसाने दडी
यातनांची चंद्रभागा
वाहे भरून दुथडी

गेल्या कधीच्या आटून
नद्या- नाले नि विहिरी
नको वाटे गळाभेट
दिंड्या पताका ना वारी

थेंब थेंब पाण्यासाठी
माती माय आसुसली
वेदनेचा जयघोष
कशी खेळू बा पावली

टाळ मृदंगाचा भार
झाले पालखीचे ओझे
उद्या तुझी एकादशी
आज ठेवलेले रोजे

रान भासे वाळवंट
गेले करपून पीक
रडे तुका नामा जनी
अगतिक पुंडलिक

जाण सावळ्या विठ्ठला
आम्हा वैष्णवांच्या वेणा
असा कसा मुका बाप्पा
आज पंढरीचा राणा..?

***

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुरेख कसं म्हणू व्यथेला....
वैष्णव वेणा...माणसाचीच कर्तुत आहे. त्यानं अर्जुनाला ही बजावलं न धरी शस्त्र करी.. Happy

द सा - खूप खूप आभारी आहे प्रतिसादासाठी...शत शत नमन
सा मो - धन्यवाद..!
rmd - मन:पूर्वक आभार आपले...