वय की आकडा - एक प्रौढ चिंतन

Submitted by चिमण on 20 July, 2024 - 10:49

काही लोक 'वय काय? नुसता एक आकडा तर आहे' असं एखाद्या तत्वज्ञान्याचा आव आणून म्हणतात.. किंबहुना, असं म्हणायची एक फॅशनच झाली आहे. याच लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्या की त्यांचा आकडा वाढल्याची जाणीव अस्वस्थ करून जाते. लग्न जमवायच्या वेळेला तर या आकड्याला अअसामान्य महत्व येतं. वयाला एक आकडा म्हणणं म्हणजे सजीवाला एक हाडाचा सापळा किंवा अणुंचा ढिगारा म्हणण्याइतकं अरसिकपणाचं आहे. वय एक आकडा असला तरी तो आपल्याला लावता येत नाही. खरं म्हटलं तर वयाला एका आकड्यापेक्षा इतरही काही वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहेत.

वय एक प्रवाही आकडा आहे. एकदा जन्म घेण्याचा नळ सुटला की वयाचा प्रवाह सुरू होतो. हा प्रवाह डायोड मधून जाणार्‍या विद्युतप्रवाहा प्रमाणे फक्त एकाच दिशेने जाऊ शकतो.. त्याला मागे जाणं माहिती नाही आणि निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने पुढे पण जाता येत नाही. प्रवाहाला अनेक अडथळे येतात पण त्याचा वेग कधीही कमी होत नाही. कुठेही विचार करीत थांबायला त्याला वेळ नसतो. कुठल्याही भोवर्‍यात सापडून गोल गोल फिरणं त्याच्या नशिबात नसतं. इतर प्रवाह याला येऊन मिळत नाहीत किंवा हा दुसर्‍या प्रवाहाला मिळत नाही. एखाद्या उंच कड्यावरून कधीही धबधब्यासारखा कोसळत नाही. साठीशांत किंवा सहस्रचंद्रदर्शन शांत असल्या कुठल्याही शांतिवनात न रमणारा हा प्रवाह फक्त भगवंतरावांनी मृत्युचा कंट्रोल ऑल्टर डिलीट मारला की खंडतो. असा प्रवाह जो हातमागाच्या धोट्यासारखा काळाच्या कपड्यातून मार्ग काढत काढत त्यावर अनुभव आणि आठवणी याचं सुंदर भरतकाम करून जातो, तो नुसता आकडा कसा असेल?

वय ही काहीही न करता वाढणार्‍या काही मोजक्या गोष्टीतील एक गोष्ट आहे.. काँग्रेस गवत, केस व नखं या आणखी काही! वयाचे चेंडुसारखे टप्पे देखील असतात. प्रत्येक टप्प्याचं किंवा वयोगटाचं वागणं व बोलणं ढोबळमानाने सारखं असतं. लहान मुलं निरागस असतात, त्यांना संभाळणं हा जितका आनंददायी व मजेशीर अनुभव असतो तितकाच तो सहनशीलतेचा अंत बघणारा व कष्टप्रद असतो. त्यांना सदोदित आपलं लक्ष वेधून घ्यायचं असतं. मुलं स्वकेंद्री, अहंकारी, हट्टी, उत्साही, चंचल, अस्वस्थ व सतत प्रश्नांची सरबत्ती करणारी असतात. आहेत ते नियम मोडून मर्यादा ओलांडायचा बंडखोरपणा करणे, चिडचिड करणे, मित्रमैत्रिणींशी तासनतास बोलणे पण घरी तुटक वागणे असं तरुण वर्गाचं सर्वसाधारण वागणं असतं. लवकर काहीही न आठवणे, वेगवेगळे अवयव दुखणे, सतत कुठली न कुठली औषधं घेणे, विसरभोळेपणा, ऐकायला कमी येणे व चिडचिड करणे ही म्हातार्‍यांची वैशिष्ट्ये! त्यामुळेच बहुतेक आयुष्यात 'वय होण्याला' फार महत्व दिलं जातं! प्रत्येक गोष्ट करण्यासाठी 'वय व्हावं' लागतं, जरी क्षणोक्षणी 'वय होत'च असलं तरीही!

बहुतेक वेळा इतर लोक आपल्याला वयाची जाणीव करून देतात. "शेंबुड पुसायची अक्कल नाही आणि म्हणे माझं लग्न करा!, "एव्हढा मोठ्ठा घोडा झालाय तरी काही मदत करेल तर शप्पथ!", "अर्धी लाकडं गेली मसणात तरी हे असं वागणं?" किंवा "म्हातारचळ लागलाय मेल्याला" असल्या शेलक्या टोमण्यांनी वेळोवेळी वयाची जाणीव जाणीवपूर्वक करून दिली जाते. आपली चालू आहे ती नोकरी वा काम नको असतं तसं वयाचं पण आहे.. सध्या चालू आहे ते वय बहुतेकांना नकोच असतं. त्यासाठी काही लोकं वय लपविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.. या लोकांमुळे एज डिफाइंग क्रिम, कलपं व बोटॉक्स सारख्या वय झाकण्याच्या गोष्टी विकणारे मोठे उद्योग अस्तित्वात आले आहेत. पण कधी कधी पांढरे केस कलपातून डोकं बाहेर काढून एखाद्याचं उखळ पांढरं करू शकतात.

"Age is an issue of mind over matter. If you don't mind, it doesn't matter" असं मार्क ट्वेन म्हणून गेला आहे. पण हे शहाणपण वय वाढल्याशिवाय येत नाही.
आणि एकदा ते आलं की हे समजतं की आपलं आयुष्य चालतं एखाद्या ड्रायव्हरलेस कारसारखं ! कुठे जायचं ते माहिती असतंच, कसं जायचं ते निघायच्या वेळेला भगवंतरावांनी प्रोग्रॅम केलेलं असतं. आपल्या हातात काहीच नसतं.
तेव्हा सिट बॅक, रिलॅक्स अँड एन्जॉय द राईड!!!

== समाप्त ==

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख छान.
मी ३० नंतर वयाचं increment बंद केलंय Proud
हेच राहील आता नेहमीसाठी

मी ३० नंतर वयाचं increment बंद केलंय Proud
>>>>
छान आयड्या दिलीस.. मी सुद्धा तीस वर्षाचा झालो की आता असेच करेन Happy

@ धागा,
शारीरीक, मानसिक, बौद्धिक वय एकमेकांपेक्षा फार वेगळी झाली की फार गडबड गोंधळ उडतो.. जगताना आपलाही आणि आपल्याशी वागताना लोकांचाही. यात शारीरीक वयातही दोन कॅटेगरी येतात. एक म्हणजे तुमचे बाह्य रुप कुठच्या वयाचे आहे आणि दुसरा तुमचा शारीरीक फिटनेस काय वयाचा आहे. ज्या ओळखीच्या लोकांना आपल्या वयाचा आकडा माहीत असतो ते त्यानुसारच आपण वागावे अशी अपेक्षा धरतात. म्हणून मला अनोळखी लोकांमध्ये बागडायला जास्त कम्फर्टेबल वाटते. जसे मायबोलीवर डु आय डी घेऊन वावरता येते तशी सोय प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा असायला हवी होती Happy

झकास लेख, मौलिक चिंतन.

काय करायची ती वयाची कौतुकं / खंत.

वर मग म्हणे ज़िंदगी ना मिलेगी दोबारा ! मला नकोच है दोबारा Lol

माझ्या वयस्करापणाला उद्देशून मला जर कुणी कौतुकाने किंवा सांत्वनपर ' वय हा तर नुसता आकडा आहे ' म्हटलंच, तर मी लगेच म्हणतो, " खरंय, बघा ना, " लिटल चॅम्प छोट्या वयात कसे तपस्वी गायकासारखे गायचे, फक्त 14-१५ वयाचा सचिन खतरनाक गोलंदाजी खूप अनुभवी फलंदाजापेक्षाही किती लीलया खेळायचा , जिजाऊचा शिवा किती कोवळ्या वयात लढाईचे व मुत्सद्देगिरीचे गहन डांवपेच लढवायचा .... " ! Wink

छान Happy

मी ३० नंतर वयाचं increment बंद केलंय >>> आमच्या घरी गमतीने याच्यासाठी एक टर्म वापरतात - ३५ वा वाढदिवस म्हणजे ३० व्या वर्षाचा सहावा वाढदिवस Proud (यातल्या ३० च्या जागी १६ ते २५ पैकी कोणताही आकडा टाकून गणित करायचं)

मस्त लेख. लग्नाच्या वेळीच मी बायकोला, ‘तुम्हें और क्याँ दूँ मैं दिल कें सिवाए, तुमकों हमारी उमर लग जाएँ’ असं म्हटल्यामुळे, माझं वय, लग्नाच्या वेळी जितकं होतं तितकंच (विशीत) राहिलंय. Wink Happy

छान चिंतन. माझ्या मते आपली २ वये असतात, एक शारीरिक आणि दुसरे मानसिक. यापैकी मानसिक वयाने आपण कितीही तरुण असू शकतो.

<< लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्या की त्यांचा आकडा वाढल्याची जाणीव अस्वस्थ करून जाते. >>
प्रत्येक वाढदिवस म्हणजे मला अजून एक वर्ष मिळाले असेच मी समजतो. शारीरिक वय वाढले तरी मला दुःख होत नाही.
Don’t regret growing older. It’s a privilege denied to many.

छान लेख आहे.
वय वाढते आहे तसे एक अ‍ॅडव्हेन्चरवर जाणार असे वाटू लागले आहे. मृ-त्यु नावाचे अ‍ॅडवेन्चर.
खरच खूप कुतुहल वाटते. त्या अगोदर सारी कर्तव्ये मात्र पार पडावीत.

<<< ‘तुम्हें और क्याँ दूँ मैं दिल कें सिवाए, तुमकों हमारी उमर लग जाएँ. माझं वय, लग्नाच्या वेळी जितकं होतं तितकंच (विशीत) राहिलंय. >>>
अगदी मस्त!

बाकी अलिकडे विस्मरण होतय. मलैका अरोरा टिव्हीवर दिसली की नवर्‍यालाच विचारावं लागतय - त्या सलमानच्या भावाच्या बायकोचं नाव काय रे?
निकी मिनाज, रसेल पीटर्स - सगळ्यांची नावे विसरायला होतायत.
तरुण तुर्क मधल्या त्या प्रोफेसरांसारखे - अरे ती ही .... तिचं नाव काय? तो रे ..... भारतियांची टवाळी करतो .... त्याचं नाव काय?
हे असच चाललय. अल्झाइमर्स नसावा म्हणजे मिळवली ब्वॉ Sad

Don’t regret growing older. It’s a privilege denied to many. + 100

सध्या चालू आहे ते वय बहुतेकांना नकोच असतं. >>> Lol

एकदम खुसखुशीत लेखन! मस्त!

सगळ्यांना धन्यवाद!

>> वर मग म्हणे ज़िंदगी ना मिलेगी दोबारा ! मला नकोच है दोबारा
मला तर बिलकुलच नकोय जिंदगी दोबारा! परत जिंदगी म्हणजे परत त्या रहाटगाडग्यातून जायचं.. बालपण, शाळा, कॉलेज, नोकरी लग्न .. बापरे नकोच ते.

>> बाकी अलिकडे विस्मरण होतय. मलैका अरोरा टिव्हीवर दिसली की नवर्‍यालाच विचारावं लागतय - त्या सलमानच्या भावाच्या बायकोचं नाव काय रे?
हे तर माझं आणि बायकोचं कायम चालू असतं कारण दोघांचही विस्मरण वाढत चाल्लंय. चुकून कधी तरी पहिल्या फटक्यात नाव आठवलं तर प्रचंड आश्चर्य पण वाटतं आता.

>> Don’t regret growing older. It’s a privilege denied to many.
खरंय! माझ्या मते मी आत्ता पूर्वी पेक्षा जास्त आनंदी आहे.. घरकर्ज नाही, मुलं शिकून बाहेर पडून नोकरीला लागली आहेत, जबाबदार्‍या फारशा नाहीत, प्रकृती ठीक आहे म्हणजे अजून हिंडतो फिरतो आहे. अजून काय पाहिजे?

>>>>>>>मला तर बिलकुलच नकोय जिंदगी दोबारा!
मला मुलीचं बालपण अनुभवण्याकरता मात्र परत जन्म हवाय. हां काटे नकोत फक्त फुले हवीत त्या जन्मात Happy

मृ-त्यु नावाचे अ‍ॅडवेन्चर.
खरच खूप कुतुहल वाटते. त्या अगोदर सारी कर्तव्ये मात्र पार पडावीत.>> स्तुत्य विचार. इलेक्र्ट्रिक क्रिमेटोरिएम इको फ्रेंडली पर्याय आहे असे वाटते का? ऑर्गन डोनेशन चा विचार करुन ठेवा. पेपर वर्क आधी बनवता येते. बेस्ट विशेस.

माझा तर साठीत पोरकट पणाच जास्त चालू असतो. चांदोबात एक कथा होती एक बाई चायना च्या वाळवंटात इतकी चालत काहीतरी शोधत पुढे पुढे जाते की ती पाने खाउन राहु लागते व पिसासारखी हलकी होते. तसे झाले आहे. मजाच नुसती . आज नवीन काय होते ते बघत असते.

धन्यवाद!
>> माझा तर साठीत पोरकट पणाच जास्त चालू असतो.
मामी, यालाच बहुतेक प्रौढत्वी निज शैशवास जपणे म्हणतात! Happy

विचारप्रवर्तक लेख!

ड्रायव्हरलेस कार या उल्लेखावरून मला तो रिलेटिव्ह टाईमचा प्रयोग आठवला. आठवतंय स्टेशनवरचं घड्याळ अन्, स्टेशनातून जाणाऱ्या आगगाडीतलं घड्याळ? तो लंबकाचा प्रवास?

त्यावरून झालेली ही ॲनॉलॉजी -
एका व्यक्तीसाठीचं वय ते त्या समुदायासाठी (एकत्रितपणे) काळ.
काळाची अप्रतिहत धावणारी एक आगगाडी.
आपण अवतरतो - शेवटच्या डब्यात चढतो. आपलं वय (कालगणना) चालू होतं.
आणि काळावर स्वार होऊन चालत चालत पहिल्या डब्यात पोचल्यावर आपला प्रवास थांबतो, संपतो.
कुणाकुणाचा, त्याआधीच.
काळानुरूप बसणारे धक्के अन गचके खायचेच, बदल भोगायचे, सोसायचे.
प्रत्येक डबा जणु वयाच्या एका वर्षाचा.
वयाचा प्रवास करताना प्रत्येक डब्याचा, प्रत्येक टप्प्याचा अनुभव वेगळा, चॅलेंज वेगळा! त्या एका डब्यातही अनुभवांचं अनंत वैविध्य.. अर्थातच प्रत्येक व्यक्तिची गती वेगळी, अन् चाल निराळी, मार्गही वेगवेगळे.

जाऊ द्या, ही ॲनॉलॉजी जास्त ताणण्यात अर्थ नाही.

Don’t regret growing older. It’s a privilege denied to many.

>> डोळ्यात पाणी आणणारं वाक्य. आपण खूप गोष्टी गृहीत धरतो आयुष्यात.. त्यात आयुष्य हिही एक !!