अमेरिकेमध्ये कामासाठी जाण्याची संधी स्वीकारावी का?

Submitted by माबो वाचक on 5 July, 2024 - 03:51

माझ्या निकटच्या नातेवाईकांना (ते IT मध्ये काम करतात) अमेरिकेमध्ये कामासाठी जाण्याची संधी मिळाली आहे. ती स्वीकारावी का नको याचा निर्णय घ्यायचा आहे. त्यांनी व मी चर्चा करून पुढील मुद्दे मांडले आहेत.
https://docs.google.com/document/d/e/2PACX-1vQlq6PhlKxGfYsWgdmnZpvCM6qdd...

यावर मायबोलीकरांचे मत जाणून घ्यायला आवडेल. विशेषतः ज्यानी याच परिस्थितीत अमेरिकेला जाण्याचा किंवा न जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये न आलेले मुद्देसुद्धा मांडावेत हि विनंती. आभार.
अजून काही माहिती -
अमेरिकेत जाण्याचे ठिकाण : Overland Park, Kansas
एक मूल, वय १.३ वर्षे
तर दोन मोठी माणसे आणि एक बेबी यांचा वरील ठिकाणी राहण्याचा खर्च काय येऊ शकेल?
UPDATE ---
या धाग्यातील चर्चेतून Pros आणि Cons यांची यादी पुनर्लेखित केली आहे. इतरांना उपयोगी पडेल अशी आशा करतो.
Pros (फायदे) :
१) पैसा - एकटे गेलात तर जास्त बचत होईल आणि कुटुंबासोबत कमी. पण कुटुंबासोबत जास्त समृद्ध आयुष्य जगता येईल.
२) नवीन अनुभव - नवीन लोक, ठिकाणे, अन्न, संस्कृती ई. चा अनुभव मिळेल.
३) करिअर - नवीन जबाबदारी, नवीन कामाची संस्कृती, नवीन लोकांबरोबर कामाचा अनुभव करिअर मध्ये उपयोगी पडेल. व्यक्तिमत्व विकासाला मदत होईल. नवीन टेक किंवा बिझनेस शिकायला मिळणे.
४) इंग्रजी - इंग्रजीत बोलायचा सराव होईल.
५) आयुष्याचा दर्जा - मोठी घरे, शुद्ध हवा, कमी गर्दीची व शिस्तबद्द वाहतूक, मुबलक resources, शिस्त आणि ह्या सगळ्यामुळे रोजच्या जीवनातल्या (९० टक्के ) कमी झालेल्या कटकटी.
६) शाळा - शिक्षणाचा दर्जा चांगला, पण शिक्षण महाग असू शकते, विशेषतः उच्च शिक्षण
७) अमेरिकेत भारतीय बऱ्याच संख्येने आहेत. त्यामुळे काही ठिकाणी मिनी-भारता मध्ये राहिल्यासारखे आहे. सर्व भारतीय खाद्यपदार्थ, स्वयंपाकाचे जिन्नस, वस्तू विकत मिळतात.

Cons (तोटे) :
१) मोलकरीण किंवा नातेवाईक यांची स्वयंपाकात-घरकामात आणि मुलांना वाढविण्यात मदत मिळणार नाही. भारतासारखा साग्रसंगीत स्वयंपाक करायला मिळेल याची खात्री नाही. व्यायामाला वेळ मिळेल याची खात्री नाही. शनिवार व रविवार किराणा माल भरणे व घराची साफसफाई करणे यात निघून जातात.
२) बायकोला नोकरी सोडावी लागेल. त्यामुळे पैसे, अनुभव यांचे नुकसान. अमेरिकेत बायकोला वर्क-परमिट मिळायला बराच उशीर लागतो.
३) हवामान - उत्तर व मध्य अमेरिकेत हिवाळा कडक असतो. शून्य अंशाखाली तापमान जाऊ शकते. बर्फवृष्टी होऊ शकते. घरात हिटर असतो. उबदार कपडे घालून बाहेर जाता येते. मोठी बर्फवृष्टी झाल्यास बाहेर जाण्यावर मर्यादा येऊ शकतात. ढगाळ हवामान व हिवाळा यामुळे काही लोकांस उदास वाटू शकते.
४) वाहतूक - बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्यात जमा आहे. स्वतःची कार घ्यावी लागते. स्टिअरिंग व्हील हे दुसऱ्या बाजूला असते, पण त्याची काही अडचण येत नाही. सरावाने जमून जाते.
५) दवाखाना - चांगले डॉक्टर्स आहेत पण अपॉइंटमेंट लवकर मिळत नाही. वैद्यकीय खर्च बराच येतो. ऑफिस कडून आरोग्यविमा असावा.
६) शाळेत जाणारे मूल असेल आणि त्याला इंग्रजी पुरेसे येत नसेल, तर जुळवून घेण्यास कदाचित अडचण येऊ शकेल.
७) अमेरिकेत मित्र कष्ट करून मिळवावे लागतात, (भारतात बालपणापासूनचे मित्र आपण मिळवलेले असतात)
८) अमेरिकेत सुद्धा महागाई वाढत आहे असे काही लोकांचे मत पडले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुद्दे वाचले.चांगले मांडले आहेत.सध्या अमेरिका किंवा बाहेरदेशी असलेले मायबोलीकर काही मुद्दे मांडतीलच,माझे काही: (या मुद्द्यावर आमची घरी बरीच उलटसुलट चर्चा होत असते.)
1. कामाची संधी: अमेरिकेत जाताना मिळणारे प्रोफाईल तुमच्या cv मध्ये चांगली उपयुक्त भर टाकेल का?2-3 वर्षात परत आल्यास या प्रोफाईल वर किमान 2 पद वरच्या डेसिग्नेशन ची नोकरी भारतात मिळेल का?
2. भारतातला चालू पगार: भारतातला चालू पगार 30/35 LPA च्या वर असेल तर अमेरिकेत कुटुंबासह जाऊन पैश्यांचा काही फायदा जमेत धरता येणार नाही.(मन मारून, कुटुंबाला कुठेही न फिरवता पैसे वाचवणारे आपण कोणीच नसू.)
3. मुले असल्यास शाळा/बदल: मुलं किती मोठी आहेत आणि शाळा, देश बदलायला मानसिक दृष्ट्या किती तयार आहेत?ज्या स्टेट /शहरात जाताय तिकडे चांगल्या शाळा, इंडियन/क्रॉस कॉन्टिनेन्ट लोक आहेत का?शाळा आणि शिक्षक अश्या लोकांशी नॉन-रेसिस्ट प्रकारे वागायला सराईत आहेत का?
5. पत्नी किंवा पार्टनर च्या नोकरी सोडण्याचा मुद्दा: जर भारतात होम लोन असेल तर शक्यतो सबाटीकल किंवा लिव्ह विदाऊट पे घेऊन जाणे बरे.सुरुवातीला मुख्य अमेरिका अर्नर चा जम बसेपर्यंत भारत अमेरिका करता आले तर उत्तम
6. तुमच्या कॉन्स मधले बरेच मुद्दे आता अमेरिकेत सॉर्ट झालेले आहेत.भारतीय/इतर खंडी खाणं मिळतं.डोमेस्टिक हेल्प आठवड्यात एकदा वगैरे घेता येऊ शकते.शिवाय एका ठिकाणी जास्त राहिल्यास सर्व देशी, सर्व खंडी पदार्थांची चव डेव्हलप होत जाते.चारिठाव भाजीपोळीवरणभातपचडी चटणी मिस न होण्याच्या स्टेज ला नक्की याल 6 महिन्यात.
7. ज्या नोकरीवर जाणार तो कंपनी चांगल्या नाव लौकिकाची आहे का(कोणी मोठ्या अमेरिकेत असणाऱ्या प्रसिद्ध कंपनीला कॉन्ट्रॅक्टर पुरवणारी आणि अमेरिकेत एका खोलीत ऑफिस असलेली चिमुकली कंपनी नको.), जॉब प्रोफाईल भारतात सहजी न मिळणारे/भारतातच राहिल्यास सहज स्विच होता न येणारे आहे का यावर मुख्य निर्णय अवलंबून असावा असं वाटतं.
8. आता परत वाचलं मोठ्या स्क्रीन वर, त्यावरून बाळ लहान आहे.लहान बाळ असताना जवळ सहज उपलब्ध मदत, नवऱ्याचे ऑफिस घरापासून फार लांब नसणे हे मुद्दे महत्वाचे.घर त्यानुसार घेता येईल.मूल लहान असेल तर मुद्दा क्र.3 मी वर लिहिलेला आपोआप सॉर्ट होतो.
9. एकटेपणाचा मुद्दा: हल्ली अव्हेलेबल असलेले भारंभार युट्युब चॅनल, ओटीटी, जवळ असलेले मॉल्स, लहान बाळ यातून कंटाळायला फार जास्त वेळ मिळणार नाहीच. इंटरनेट कनेक्शन घरी मात्र हवेच हवे.नवऱ्याच्या कामाची जागा अजूनही काही दिवस घरून कामाला परवानगी देत असेल तर जास्त उत्तम.बाकी पब्लिक रिलेशन चे काय सांगावे?जवळ भारतीय कम्युनिटी मोठी असल्यास कदाचित भारतात होतं त्यापेक्षा जास्त वारंवारतेने सोशलायझिंग आणि पाव्हणेरावळे, खाणं पिणं, उठबस अमेरिकेत होईल.

मी अमेरिकेत विद्यार्थिदशेत असताना आलो होतो. आलो तेव्हा तुमच्या प्रोज-कॉनच्या स्प्रेडशिटमधल्या एकाही म्हणजे एकाही मुद्द्याचा विचार मी केला नव्हता. चंबु गबाळे आवरुन सोबत घेतले व अमेरिकेत युनिव्हर्सिटीमधे येउन धडकलो! त्यामुळे माझ्याकडे मार्गदर्शनाला काहीच पॉइंट्स नाहीत.

पण तुमचा तक्ता वाखाणण्यासारखा व एकदम डिटेल्ड अभ्यास करुन केलेला आहे हे सांगावेसे वाटले म्हणुन प्रतिसाद!( फक्त त्या फोडणीच्या मुद्द्याबद्दल वाचुन फसकन हसु आले Happy ) .

योग्य निर्णयाला पोहोचण्यासाठी शुभेच्छा!

तुम्ही लिहिलेले प्रो ज पॅसिव अ‍ॅग्रेसिव वाटले मला Happy - जसे - "Boasting and Bragging as America returned.", " Career advantage - वर आणि (I personally don’t think there is any advantage in career.)" हे प्रो ज आहेत ? Happy
आणि बरेच कॉन्स चुकीच्या माहितीवर आधारलेले.
-Can’t do Fodani to Bhaji as it causes smoke. ( एक तर फोडणी केली तर धूर होतो? हा वेगळाच मुद्दा आहे पण ते असो) There are smoke detectors. Also neighbours can complain. - हे कुणी सांगितलं तुम्हाला? चूक आहे, त्यामुळे या पुढच्या मुद्द्याला अर्थ नाही - "This might affect taste, which will affect mood, which will cause fights. This will cause fast-food cravings. You will end up ordering more fast-food which will affect health."
-For baby’s food - options in vegetables, millets, lentils, dals will limit. - हेही चुकिचे आहे.
-Compromise with Indian food - हाहा माबो गटग चे फोटो पहात नाही का तुम्ही Happy
Compromise with Diet and exercise - हे का ते कळले नाही.
बाकीचे मुद्दे पण उगीच लिस्ट लांब करायला टाकल्यासारखे वाटले. "Change in baby’s paediatrician."?? हा काय मुद्दा आहे ! Happy

कॉन्स मधला मुद्दा क्र. २- हाच एक वॅलिड आणि अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो डिसायडिंग फॅक्टर ठरू शकतो / ठरावा.
आणि मुळात तिथे जायचे आहे ते का आहे? हा स्टार्टिंग पॉइन्ट असायला पाहिजे ना डिस्कशन चा. बरेच प्रो आणि कॉन त्यावर ठरतील. "अमेरिकेत म्हणजे नक्की कुठे?" यानेही बराच फरक पडेल.
ओके आता रिवाइज्ड पोस्ट वाचले. लोकेशन कॅन्सस आहे. मग अगदी न्यू जर्सीइतके मुबलक देशी पदार्थ मिळणार नाहीत कदाचित पण तरी त्या गावात / जवळपास इंडियन स्टोअर कुठे आहे, तिथली देशी कम्युनिटी ही माहिती आधी ऑनलाइन शोधता येईल. सहज गुगल केले तर बरीच नावे दिसली देशी ग्रोसरी स्टोअर्स ची. तिथे जवळपास राहणारे माबोकर जास्त अ‍ॅक्युरेट माहिती देऊ शकतील.

mi_anu आणि मुकुंद प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार
मुकुंद, एकट्या पुरुषाने जाणे आणि कुटुंबासोबत जाणे (त्यात लहान बेबी) यात फरक. म्हणून जास्त माहिती मिळवत आहे. निर्णय चुकायला नको.

अजून काही माहिती -
अमेरिकेत जाण्याचे ठिकाण : Overland Park, Kansas
एक मूल, वय १.३ वर्षे
तर दोन मोठी माणसे आणि एक बेबी यांचा वरील ठिकाणी राहण्याचा खर्च काय येऊ शकेल?

रेव्यु, तुमचा मुद्दा पटला. कॉन्स मध्ये टाकतो. धन्यवाद.
maitreyee , प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार.
माझ्या मते (जे कि चुकीचे सुद्धा असू शकेल), बऱ्याच जणांना अव्यक्त (Subconcious) स्तरावर Boasting and Bragging करावे असे वाटत असेल; आणि त्याचा या निर्णयावर परिणाम होऊ शकत असेल असे वाटले म्हणून मी तो मुद्दा तेथे मांडला. तो मुद्दा लिखित करून, त्यावर विचार करून त्याचा निर्णय-प्रक्रियेवरचा परिणाम रद्द करणे हा माझा हेतू होता.
Career advantage वर आमच्यात मतभिन्नता आहे म्हणून तसे लिहिले. म्हणजे मला वाटते कि Career च्या दृष्टीने काही फायदा होणार नाही, पण जाणाऱ्याला वाटते कि होईल.
आणि बरेच कॉन्स चुकीच्या माहितीवर आधारलेले. >>>> हो, खरे आहे. त्यातच दुरुस्ती व्हावी हि येथे येण्याचा हेतू. तुमच्या प्रतिसादामुळे फूड बद्दलचे गैरसमज दूर झाले.
जाण्याचा काही विशिष्ट हेतू नाही, पण pros मध्ये मांडलेले मुद्धे हेच हेतू आहेत.
Compromise with Diet and exercise - हे का ते कळले नाही. >>>> एकच व्यक्ती स्वयंपाक करणार असल्याने साग्रसंगीत भारतीय जेवण तीन वेळा तयार करणे कठीण जाईल. कामातून व्यायामासाठी वेळ काढणे कठीण.
बाकीचे मुद्दे पण उगीच लिस्ट लांब करायला टाकल्यासारखे वाटले. >>>> कोणताही मुद्दा सुटू नये म्हणून जे सुचेल ते टाकले. नंतर विचाराअंती काही मुद्दे बाद करता येतील.
प्रतिसादाबद्दल आभार. काही नवीन माहिती मी वर दिली आहे.

mi_anu,

भारतातला चालू पगार 30/35 LPA च्या वर असेल तर अमेरिकेत कुटुंबासह जाऊन पैश्यांचा काही फायदा जमेत धरता येणार नाह>>
हा मुद्दा समाजाला नाही. संत्र सोलणार का?
अजून नुकतंच कोणी तिथे गेले आहेत आणि त्यांचा हाच अनुभव आहे का?

मी जितके पाहिलेत(माझे सहकारी) ते सर्व अमेरिकेत अमेरिकन्स पेक्षा कमी पगारावर काम करणार म्हणून गेले होते.शिवाय 2 मुलं असल्यास तितक्या खोल्या असलेल्या घराचं रेंट, कार घेणे(कुटुंब असल्यास), इतर खर्च या मानाने भारतात सिनियर माणूस/2 कमावते कुटुंब सदस्य/यात जास्त चांगले स्टॅंडर्ड ऑफ लिव्हिंग मिळू शकेल.
अर्थात नुकते गेलेल्यांचे अनुभव वेगळे असतील तर मत बदलायला काहीही प्रॉब्लेम नाहीये मला.

तुमचा तक्ता बघितला. त्यात तुमच्या दृष्टीने सकारात्मक गोष्टी कमी आणि नकारात्मक गोष्टी खूप आहेत.
माझ्या दृष्टीने पत्नीला जॉब सोडावा लागणे आणि परत गेल्यावर शोधावा लागणे हा महत्वाचा मुद्दा. त्या बद्दल विचार करावाच.
बाकीचे मुद्दे बघता नातेवाईक आणि मदतनीस यांच्या शिवाय घर चालवणे आणि बाळ वाढवणे, कुटंबीयांपासून दूर बाळाला घेवून दोघांनीच रहाणे, सततच्या भेटीगाठी नसणे हे तुम्हा उभयतांना कितपत जमेल याचा प्रामाणिकपणे विचार करावा असे मी सुचवेन. 'अ' ला जमले म्हणून 'ब' ला जमायलाच हवे असे नाही. ताण येणार असेल, मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने झेपणार नसेलच तर मग कठीण जाईल. आजकाल विडिओ कॉल करुन संपर्कात रहाणे सोपे आहे. वेळाही सहज अ‍ॅडजस्ट होतात. मात्र तेवढे पुरेसे नाही असे एखाद्याला वाटू शकतेच.
याच नोटवर हवामानाशी जमवून घेणे हे देखील येणार. मिडवेस्ट मधे येणार तर थंडी असणार, आणि तसाच उन्हाळाही. मात्र सदनिकेत हिटिंग-कुलिंग असते आणि कुठलीही यंत्रणा बिघडली तर तत्परतेने दुरुस्ती होते. ऐन ख्रिसमस इव/रात्री हिटर बंद अनुभवले आहे. रात्री १च्या सुमारास हिटर बंद पडला पहाटे ४ वाजता मेंटेनन्सचा माणूस दारात होता. कसलीही कुरकुर न करता साडेपाचला सर्व ठीकठाक केले. शुभेच्छांची देवाणघेवाण होवून आमाच्याकडच्या खाऊची भेट स्विकारुन तो पुढल्या कॉलसाठी गेला. थोडक्यात ऑन कॉल लोकं असतात. थंडीत हेवी जाकिट वापरावे लागत असले तरी त्याचे वजन बाऊ करावे असे नसते. इथे हिवाळ्यात कामं थांबत नाहीत. सर्व प्रकारची कष्टाची कामे आउटडोअर करता यावीत अशा प्रकारे ही जाकिटं बनवलेली असतात.
पब्लिक ट्रान्सपोर्ट नसल्याने गाडी चालवणे मस्ट असणार पण देशात गाडी चालवत असाल तर इथे सहज चालवा, कारण नियम पाळले जातात. ते डाव्या-उजव्याचा गोंधळ वगैरे होत नाही.
आहाराबाबत तुमचे बरेच गैरसमज आहेत असे वाटले. स्वयंपाकाची सवय आणि आवड असेल तर ज्वारी-बाजरी-नाचणीच्या भाकरीपासून मोदक-पुरणपोळीपर्यंत सर्व प्रकारचा मराठी स्वयंपाक सदनिकेत सहज करता येतो. तुम्ही येणार आहात ते चांगले मोठे शहर आहे, तिथल्या देशी ग्रोसरी स्टोअर्स सर्व प्रकारचा किराणा माल मिळेल. अगदी केप्र ची भाजाणी सुद्धा. सगळ्याच भाज्या नेहमीच मिळतील असे नाही पण पोषक आहाराची गरज व्यवस्थित पूर्ण होईल.
बाळ लहान आहे तर त्याचे नेहमीचे डॉक्टर सोडून नवे डॉक्टर यामुळे साशंक वाटणे साहाजिक आहे पण तुमच्या कोवर्कर्सच्या सल्ल्याने बाळासाठी चांगले डॉक्टर मिळून जातील.

मी गेली ३० वर्षे भारतीय बहूल नसलेल्या मिडवेस्ट मधील गावात रहात आहे. या गावात कायम वास्तव्यवाले आम्ही एकटेच देशी. लग्न करुन परदेशात जायचे आहे, तिथे जे काही असेल त्याच्याशी जुळवून घ्यायचे आहे, आता तेच आपले घर असणार असा विचार करुन आले आणि इथे वर्षभरात हळू हळू रुळले. त्या आधी स्टुडंट म्हणून अमेरीकेत आलेला नवरा तोवर नोकरीत स्थिरावून इथलाच झाला होता. रेव्ह्यू यांनी सेकंड ग्रेड सिटीझनचा मुद्दा मांडला आहे तर आमच्या बाजूने आम्ही रुजायची तयारी दाखवली आणि इथल्या गावकर्‍यांनीही सामावून घेतले. पाहूण्यासारखे न वागता आपलं गाव म्हणून काम करायची तयारी असेल तर अगदी स्टुडंट/ नोकरी अशा तात्पुरत्या विसावर असलात तरीही छान सामावून घेतात.

सेकंड क्लास सिटिझन बद्दल स्वाती२ शी सहमत. जसे कॉन्स मधे लिहिलेल्या "फोडणी करत येणार नाही" वगैरे गोष्टी होत्या तसेच हेही एक फक्त अ‍ॅजंप्शन आहे. त्याला काही बेसिस आहे का? अमेरिकन्स पेक्षा कमी पगार वगैरे देखिल रिलेटिव आहे. तुमचा स्किल, अनुभव , त्याची इथे असलेली गरज, निगोसिएशन स्किल्स याप्रमाणे सगळे बदलेल.
बाय द वे, अमेरिकेत सर्वात जास्त हाउसहोल्ड इन्कम कोणत्या एथनिक गटाचे आहे हे माहित आहे का?
चुकीच्या गृहितकांवर घेतलेला निर्णय बरोबर ठरणार नाही. फॅक्ट्स च्या बेसिस वर तुमचा तक्ता रिवाइज केला तर जास्त वस्तुनिष्ठ चित्र मिळेल.
एक सेफेस्ट ऑप्शन म्हणजे नवर्‍याने इथे येणे, किमान ६ महिने राहून सर्व फर्स्ट हँड अनुभव घेऊन मग फॅमिलीला आणायचे की नाही हे ठरवणे. आणायचे ठरलेच तर एक व्यक्ती आधीच नीट सेटल झाल्यामुळे कुटूंबाला इथे आल्यावर सर्व बरेच सोपे होईल.

स्वाती२ , maitreyee - आपल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार. आपण माझ्या कॉन्स लिस्ट मधील बऱ्याच मुद्द्यांवर स्पष्टीकर दिले आहे.
एक सेफेस्ट ऑप्शन म्हणजे नवर्‍याने इथे येणे, किमान ६ महिने राहून सर्व फर्स्ट हँड अनुभव घेऊन मग फॅमिलीला आणायचे की नाही हे ठरवणे. आणायचे ठरलेच तर एक व्यक्ती आधीच नीट सेटल झाल्यामुळे कुटूंबाला इथे आल्यावर सर्व बरेच सोपे होईल. >>>> हा खूपच चांगला मुद्दा आपण मांडला. मागाहून बायकोला २ वर्षे मुलाला सोबत घेऊन एकटीने प्रवास करणे जमेल का हा उपमुद्दा तयार झाला. मला वाटते सहज जमेल कारण, बायको शिक्षित असून इंग्रजी समजते व बोलता येते. फक्त लहान बाळ सोबत असल्यामुळे कोणत्या मुद्द्यांचा विचार करावा? जसे कि flight मध्ये बाळाचे खाणे नेऊ देतात का? flight मध्ये त्याची सोय असते का? डायपर बदलायची सोय असते का? लांब प्रवास असल्यामुळे बाळ जास्त रडेल का? बाळाला एकाच जागी इतके तास बसायला जमेल का? flight मध्ये बाळाच्या बाबतीत इतर काही समस्या उध्दभवू शकतात का? इत्यादी. (खरेतर हे प्रश्न नवरा-बायको एकत्र जाताना सुद्धा येणार आहेत. पण एकाला दोघे असले कि निभावता येते.) बाळासहित एकटीने प्रवासाचे दडपण आल्यामुळे हा चांगला पर्याय बाद होऊ नये म्हणून या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. धन्यवाद.

नवे अनुभव मोकळ्या मनाने कवेत घ्यायची इच्छा/आवड/ सवय नसेल तर येऊ नका. बाकी वर स्वाती, मै ने लिहिलं आहे त्याला +१.
इथे येऊन गेल्या १२ वर्षांत दोन देश आणि चार शहरे... जागा किमान दहा बदलल्या. भाड्याच्या, स्वतःच्या, परत भाड्याच्या, परत स्वतःच्या घरात राहिलो. कायम मजाच आली.
पैशांचीच तुलना करायची असेल तर भारताच्या आणि इथल्या इतरांच्या तुलनेत कमी श्रमात पैसे रग्गड जास्तच मिळतात. पण ते भारतातही कमावलेच असते. अनुभव घेतल्याशिवाय नुसते रकाने भरून निर्णय घेऊ नये. चुकलं वाटलं तर परत यावं. एकट्याने यावं असं तर बिलकुल करू नये, जी मजा करायची, शून्यातून चालू करायचं ते जोडीने करायला आणखी मजा येते. आम्ही चार महिन्यांच्या बाळाला घेऊन देश बदललेला. अर्थात प्रत्येकाची परिस्थिती भिन्न ही असणारच.
फार काथ्याकूट न करता उडी घ्यावी.

फोडणी आणि विमान प्रवासात डायपर बदलणे इतक्या बारीक सारीक गोष्टींचा कीस काढण्यापेक्षा १०-२० वर्षांनी अमेरिकेतील अनुभवाचा करीयर वर काय प्रभाव असेल हा विचार महत्वाचा नाही का ?
अगदी सुरुवातीच्या दिवसात नवीन घर / संसार सेटल करताना बजेटची तंगी जाणवू शकेल पण ती सिचुएशन काही पर्मनंट नाही.

कामाची वाढीव जबाबदारी / नवीन टेक किंवा बिझ्नेस शिकायला मिळणे , वेगळ्या देशातला अनुभव हे मोठे प्रो आहेत.

बाकी एकट्या व्यक्तीने बाळाला घेऊन विमान प्रवास करण्याबद्दल २०२४ साली इतक्या बेसिक शंका वाचून करमणूक झाली

* अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या आणि अनपेक्षित असलेल्या लिंक वर क्लिक करु नये या नियमानुसार तुमचे गूगल डॉक्स वाचलेले नाही. पण इथे तुम्ही लिहिलेले मुद्दे पाहता तुम्ही बर्‍याच बारीक सारीक गोष्टींना अवाजवी प्राधान्य देत आहात असे वाटते आहे

फार काथ्याकूट न करता उडी घ्यावी. >> योग्य वेळी योग्य तो निर्णय घेण्यात चूक झाली कि झाली.
मला फारसा खेद नसला तरीही असाच टू बी ऑर नॉट टू बी करत बसल्याने माझीही इंग्लंडची बस चुकली ते चुकलीच. खेद यासाठीच नाही कि प्रत्येकाचा पिंडही वेगळा असतो. त्या वेळी मुंबईत रहायचं कसं म्हणून एअर इंडीया सुद्धा सोडली. नशीब चांगलं कि पश्चात्तापाची वेळ आली नाही.

आपल्याला या जॉब मधे इंटरेस्ट आहे हे एकदा नक्की झाले कि कौन देस है गौणच.

Unlike India, the traffic rules are strictly enforced.>>>हे कॉन्स आहे???
तुमचा बेसिक मधे बराच गोन्धळ आहे, स्प्रेडशिट बरच आउटडेटेड आणि गैरसमजानी युक्त आहे.
डेली कामाच्या यादित बाळाचा ब्रेकफास्ट बनवणे -भरवणे,मोठ्याचा ब्रेक्फास्ट बनवणे-भरवणे(आपल खाणे), हे सगळ करायला सुद्धा तुमच्याकडे नोकरचाकर असतिल तर तुम्हाला आर्थिक द्रुश्ट्या तरी अमेरिकेत यायचि गरज नाहि....तुम्हाला म्हणजे तुमच्या नातेवाइकाना

तुमच्या प्रोच्या यादित अमेरिकेत येवुनही आर्थिकद्रुश्ट्या किवा करियर वाइज काही गेन होणार नाही आणी पत्नीच्या करियर मधे मिळू शकणारा ब्रेक हे गभिर मुद्दे आहेत.. तेव्हा खरच येवु नका,मस्त भारतातच रहा! केसरी थ्रु येवुन मस्त अमेरिका बघा...बाकी फोमो बिमो सब झुट आहे वो!

मैत्रेयी आणि स्वाती यांनी बरच सांगितलय..
माझे दोन आणे..

आम्ही ९ वर्षांपूर्वी इथे आलो तेव्हा आमची मुलं तुमच्या पेक्षा थोडी मोठी होती, तुमच्यासारखेच प्रश्न आम्हालाही होते, पैसे पुरतील का?? नीट होईल का? आणि Additional मुलं ऍडजस्ट होतील का वगैरे

पण एक calculated risk घ्यायची ठरवली...
तुम्ही तस करू शकता... १-२ वर्षांचा प्लॅन करायचा.. आवडलं तर इकडे राहील नाहीतर परत... यात तुम्हाला स्वतः अजमावाता येईल... आणि पुढे जाऊन गेलो असतो तर तेव्हा... वगैरे गील्ट राहणार नाही.

माझ्या अनुभवावरून..

Pro s list मध्ये
१. शुद्ध हवा, कमी गर्दी, मुबलक resources, शिस्त आणि ह्या सगळ्यामुळे रोजच्या जीवनातल्या (९० टक्के ) कमी झालेल्या कटकटी..
२. आम्ही कॅलिफॉर्नियाला आल्यामुळे इकडचं हवामान हा अजून एक महत्त्वाचा प्रो होता.
३. वरती पागराच मुद्दा आला आहे. तुम्ही को ण त्या कंपनी मध्ये काम करता यावरही अवलंबून आहे.. कन्सल्टंट / भारतीय कंपण्यातून इकडे आलात तर थोडे पैसे कमी मिळतात... पण भारतीय म्हणून कमी पैशावर काम करावे लागते वगैरे मिथ आहे.

४. सेकंड ग्रेड सिटिझन - खर तर ग्रीन कार्ड आणि नंतर citizenship मिळेपर्यंत आपण नागरिक नसतो. त्यामुळे नागरिकांचे हक्क आपल्याला नाही मिळाले म्हणून आपण सेकंड ग्रेड होत नाही.
ह्यात छुपा मुद्दा वांशिक/ रंग भेदाचा असेल, तर मला ठळकपणे ह्याचा अनुभव आलेला नाही . कदाचीत स्थाना प्रमाणे ते बदलत ही असतील.
पण जरी असे झाले तरी तो दोष त्या करणाऱ्या व्यक्तीकडे जातो अँड नोट ओन यू.. असे लोक तुम्हाला कुठेही भेटत राहणार तो इतका बाहेरचा मुद्दा आहे.. थोड demography बघून राहण्याची जागा/ शाळा बघाव्यात..

काम खूप पडतात ज्याची सुरुवातीला अजिबात सवय नसते.. पण आपलं शरीर आणि घरातील सगळेच हळू हळू ऍडजस्ट होतात. एक चॅलेंज म्हणून स्विकरायच आणि आपलाच stamina वाढतो.

छोट्या मुलांचा खर्च मात्र जास्त असतो... घाब्रवत नाही .. पण तुम्ही व्यवस्थित नियोजन केलत तर जमून जाईल

तुम्ही बनवली तेव्हढी डिटेल मध्ये लिस्ट आम्ही बनवली नव्हती .. त्यावरून वाटतं तुम्ही अजून जास्त चांगलं नियोजन कराल.

शेवटचं..
आहे तिकडे राहिलो तर निश्चित सोपं असतं, कारण तुमचा कंफर्ट झोन तयार झालेला असतो. त्याच्या बाहेर पडलात तर तुम्हाला आव्हान येतात पण वेगळे आधी कल्पना न केलेले अनुभवही येतात, तुम्हाला घडवत जातात...
प्रत्येकाला जे सुट होईल त्याने ते करावे.
फायदे तोटे दोन्हीकडे असतात.

प्रोज आणि कॉन्सची लिस्ट वाचून मजाच वाटली. प्रोज फक्त ५ आहेत आणि कॉन्स ८. खरंच यायला हवं का हा विचार नक्कीच करा. बायकोची अमेरिकेत येऊन डिपेंडंट व्हिसावर घरी बसायची तयारी आहे का हा विचारही सगळ्यात आधी करा.

भारतात राहून भारतीयांची सेवा करण्यात जी मज्जा येते की ज्याचे नाव ते. मी तंबाकू, दारू, बीडी पिणाऱ्या म्हाताऱ्यांची सेवा करतो. माझ्यासाठी मस्त मटण भाकरीचा बेत करतात. एका म्हाताऱ्याने जेवता जेवता शिकारीची गोष्ट सांगितली. रानात गेला असताना अचानक वाघाने त्याच्यावर झडप टाकून त्याच्या गळ्यात आपले पंजे रुतवले पण म्हातारा पण धाडसी होता त्याने पायाच्या नखाने वाघाची बेंबी फाडून त्याचा खात्मा केला. अशी वेगवेगळी मज्जा असते. ते खूश होऊन थरथरत्या हातानी आशीर्वाद देतात आणि डबडबत्या डोळ्यांनी मला निरोप देतात.

५ आणि ८ असतील तर इथेच लिहा की ते. गूगल लिंक उघडली नाही.

मेडिकल इन्शुरन्स कसा आहे ते नीट चेक करा. बाळाचे वय सव्वा-दीड वर्षे म्हणजे अजूनही रूटिन डॉ विजिट्स होत राहतील. सहसा सॉफ्टवेअर कंपन्यांन्चे कव्हरेज चांगले असते पण चेक करा. दुसरे म्हणजे भारतात जर मोठी सपोर्ट सिस्टीम (विशेषतः बाळाकरता) असेल तर इथे ते पहिल्यांदा जाणवेल. त्याची तयारी ठेवा.

बायकोचे तिकडे करीयर असेल व इथे काम करता येणार नसेल, तर तो ही एक मोठा मुद्दा आहे. तुम्ही एच-१ वर येत असाल तर बायकोला ३ ते १० वर्षपर्यंत कितीही काळ लागू शकतो काम करायला एलिजिबल व्हायला.

बाकी "एकट्या व्यक्तीनेच स्वयंपाक" करण्याचा, सेकंड ग्रेड सिटिझन चा आणि फोडणी चा पॉइण्ट कळाला नाही. रेसिजमचे अनुभव कोणाला कधी येतील हे आपल्या हातात नाही. पण सहसा भारतीयांना इथे दुय्यम वगैरे समजले जात नाही. सॉफ्टवेअर कंपन्यांत तर भारतीय भरलेले असतात त्यामुळे त्याचे काही नावीन्य नाही. कॅन्सास मधे इतर भारतीय सेण्टर्स पेक्षा संख्या कमी असेल पण सहज गूगल सर्च केला तर ७-८ भारतीय ग्रोसरी स्टोअर्स, ७-८ भारतीय रेस्टॉ दिसत आहेत. कॅन्सास महाराष्ट्र मंडळ आहे त्यातूनही माहिती मिळेल. म्हणजे भारतीय इकोसिस्टीम तयार होत आहे असे दिसते. त्यात तुम्ही एखाद्या मोठ्या कन्सलटन्सी कंपनीतर्फे येत असाल तर तुमच्या आधी तेथे बरेच देशी लोक आलेले असतील तुमच्याच कंपनीतून. ते तुम्हाला अपार्टमेण्ट्स पासून ते इतर माहिती देतील.

बाळ लहान असल्याने सुरूवातीला एकट्याने इथे येऊन सगळे सेट करून मग त्या दोघांनी येणे हे सोयीचे होईल. तोपर्यंत तुम्ही इथे अपार्टमेण्ट व कार घेतली असेल, ग्रोसरी पासून ते डॉ पर्यंत सगळे शोधून ठेवले असेल, ,कामाच्या ठिकाणी व बाहेरही थोड्याफार ओळखी झालेल्या असतील. तिघांनी एकदम येण्यातही तसा फार प्रॉब्लेम नाही. पण इथे आल्यावर दोन दिवसांत तुम्हाला जर फुल टाइम कामावर जावे लागले व बायको व बाळ हॉटेल वा गेस्ट हाउस अपार्टमेन्ट मधे असतील व इतर काही मदत नसेल (एक दोन कलीग्ज्स व त्यांच्या फॅमिलीज जवळपास असणे वगैरे) तर सुरूवातीला बायकोला सगळे मॅनेज करावे लागेल. एकूण पहिले २-३ आठवडे जरा अडचण होईल. नंतर काही प्रॉब्लेम नाही. त्यातही ऑफिसच्या अगदी "वॉकेबल" जवळ अपार्टमेण्ट असेल तर ते सोपे होते.

तुमचे काही चांगले संबंध असलेले कलीग्ज फॅमिलीसकट ऑलरेडी जवळपास राहात असतील किंवा ज्याला बे एरियात "ओकवाडी" म्हणत अशा एखाद्या अपार्टमेण्ट कॉम्प्लेक्स मधे तुम्ही राहणार असाल तर तेथे जनरली मदत मिळेल. ओकवाडी = नावात "ओक्स" असते व भरपूर देशीच नव्हे, तर मराठी कुटुंबेही असतात.

बायकोने नंतर बाळाला एकटीने घेऊन येणे सोपे नाही हे खरे. पण ते डायपर बदलणे वगैरे मुळे नाही. इतका लांबचा प्रवास पहिल्यांदाच करणार असेल तर त्याची धाकधूक, झोप व त्यात बाळाकडेही बघणे हे सगळे करावे लागेल. पण एखादे कुटुंब सोबतीला मिळाले तर बरे पडते.

बाकी तुमच्या बर्‍याच शंकांची उत्तरे "इथे बरेच भारतीय आहेत आणि त्यांनी यावर काहीतरी मार्ग काढला असेल" या गृहीतकांत आपोआप मिळतील.

संधी सोडू नका. फक्त पैशाकरता नाही तर क्षितिजं रुंदावतात्/विस्तारतात. अर्थात व्यत्यास खरा नाही म्हणजे इथे आले नाही तर क्षितीजे विस्तारत नाहीत असे मला म्हणायचे नाही. आणि जर ही संधी टाळलीत तर फोमो येणारच येणार - हे माझे मत.
पत्नीला कामाचा त्याग काही काळाकरता करावा लागेल. त्यांची व तुमची मानसिक तयारी आहे का? हा मोठा मुद्दा आहे. एकदा निर्णय घेतल्यावरती मग तो कोणताही असो, पुनःपुन्हा मागे वळुन पाहू नका. मुव्ह ऑन.

इथे चिकटवतो. (स्पेलिंग्सच्या व व्याकरणाच्या चूका माझ्या नाहित.)

Pros

Money (Some savings if went alone, but almost no savings if went with family)
Fun and Exposure (Seeing different places, meeting different people, eating different food)
Improvement in Spoken English (Slight improvement due to listening and speaking practise, but only if engaged with other people)
Career advantage (I personally don’t think there is any advantage in career. The Indian corporate world has become equivalent to its American counterpart.)
Boasting and Bragging as America returned. (Feel good factor. Will not feel sad when seeing other people going to foreign countries. FOMO - Fear of Missing Out will go away.)

Cons

No help of maids and relatives in daily work and child rearing.

No relative can fly there if one or more members fall sick.
No instant telephone advice due to timezone-difference.
Given your ages (You’re not young anymore) and health issues (Thyroid for wife and knee-leg injury for husband) doing all the work will be very stressful. The stress will cause fights.

The wife will have to quit her job. (Loss of money, experience, self-esteem. Will have to look for a new job when returned.)
Compromise with Indian food and Diet and exercise

Even though most Indian food ingredients are available in the USA, some items such as millets, local fruits, vegetables might not be available.
Also, you will not be preparing as many items for a single meal (chapati, rice, Bhaji, Amti, Papad, Koshimbir, etc.). Limited item variety as it's very difficult to prepare for one person.
For baby’s food - options in vegetables, millets, lentils, dals will limit.
Can’t do Fodani to Bhaji as it causes smoke. There are smoke detectors. Also neighbours can complain.
This might affect taste, which will affect mood, which will cause fights. This will cause fast-food cravings. You will end up ordering more fast-food which will affect health.

No meeting relatives. (daily for wife and baby, monthly for husband. Will cause loneliness. Limited talking over phone due to the timezone difference.)
Different Climate -

Most northern American places are cold and can get colder in winter. Some even get snow in winter, limiting outdoor mobility. Rain and cloudy sky can cause depression.
Houses do have heaters and boilers but if they break, it can cause temporary problems.
People including children use thick woollen overcoats. They are heavy to carry which you are not used to.
Different climate can cause health issues in baby.

Transport - Public transport is very bad. One has to buy a car and get a licence. One has to learn to drive again due to the opposite side drive. Unlike India, the traffic rules are strictly enforced.
Change in baby’s paediatrician.
Babysitting all day by a single person is stressful.

बायकोचा जॉब जाईल ह्यापलीकडे बाकीच्या कॉन्सना फारसे मह्त्व देऊ नका. ह्यातल्या प्रत्येक गोष्टीला काही ना काही नि कधी अधिक चांगले पर्याय मिळतात. ह्यातले काही कॉन्स तुम्ही तुमच्या जन्मगावापासून दूर - समजा बंगलोरमधे असता तरी आले असते. ते तिथे कसे निभावून नेले असते ह्याबद्दल विचार केलात तर आपण त्यांना किती वेटेज द्यायचे हे ठरवू शकता.

वरची pros/cons ची यादी मस्त आहे, अगदी सखोल विचार केलेला दिसतोय. काही काही cons गहाळ आहेत, ते लिहितो.
१. भारताप्रमाणे पान/गुटखा सहज मिळत नाही, त्यामुळे गुटखा/पान खाऊन कुठेही पचकन थुंकता येत नाही.
२. ट्रॅफिक पोलिसाला चिरीमिरी देऊन सुटता येत नाही.
३. मुलांवर धार्मिक संस्कार कमी होतात.
४. मुलांना फाडफाड मराठी बोलता येत नाही आणि कोकाटेंचे क्लासेस पण नाहीत तिथे.
५. कार चालवायला ड्रायव्हर मिळत नाही, भाजीपाला आणण्यासाठी स्वत: दुकानात जावे लागते.
६. कार चालवताना हॉर्न क्वचितच ऐकू येतात, त्यामुळे कान शार्प रहात नाहीत.
७. कामाच्या ठिकाणी सुट्ट्या खूपच कमी असतात.
८. बॉस रात्री अपरात्री किंवा वीकेंडला फोन करून स्टेटस विचारत नाही, त्यामुळे कंपनीप्रती/बॉसप्रती आपलेपणा वाटत नाही, त्यामुळे डिप्रेशनचा धोका संभवतो.

कॉन्स वर जास्त विचार केलेला दिसतोय, न जाण्यासाठी करणं शोधली आहेत असे वाटते. त्यमुळेच प्रोस लिहुन ते कसे बरोबर नाहीत हे ही लिहिले आहे. मनापासुन वाटत नसेल तर न आलेलं बरं. केसरी विणा सारखा उपाय बरा...

सर्वानी खूप छान पॉईंट्स लिहिलेत. माझी पण छोटीसी भर.
मी साधारण १५ वर्षांपूर्वी अमेरिकेत कॅलिफोर्नियात आले तेव्हा माझे वय मिड फॉर्टीच्या जवळ होते. म्हणजे खरतर खूपच उशीर झाला होता. तुमच्या प्रोझ कॉन्सच्या लीस्ट मधल्या मुद्द्यांचा खूप कमी विचार केला होता. पण उत्साह खूप होता. कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायची तयारी होती, कारण आयुष्यात 'सफर खूबसूरत हैं मंझिल से भी' ह्यावर विश्वास तेव्हाही होता आणि आताही आहे. विदयार्थी दशेत असताना अमेरिकेत काही वर्ष आले होते त्यामुळे मला अमेरिका नवी नव्हती पण नवरा व मुले यांची पहिलीच वेळ होती. एक नवीन देश, नवीन लोक, नवीन अनुभव याबद्दल सर्वानाच उत्सुकता होती. माझी मुले जरी मोठी होती तरी हायस्कुल मध्ये गेली आणि नीट ऍडजस्ट झाली. आणि आता इथे पूर्ण रुळली आहेत. त्यांचे मित्र मैत्रीण भिन्न भिन्न देशातली आहेत.
कुठल्याही नवीन ठिकाणी साधारण ६ महिने ते एक वर्ष लागते सेन्स ऑफ belonging वाटायला, त्या जागेचे प्रेम वाटायला आणि सर्व गोष्टीची सवय व्हायला. मला स्वतःला प्रत्येक नवीन अनुभव अगदी डोळे उघडवणारा होता.
शुद्ध हवा, शिस्तबद्ध वाहतूक, आणि सुंदर, खड्डे नसलेले, पेव्हमेंट न उखडलेल्या रस्त्यांवर चालल्यावर किती बेसिक गोष्टी आयुष्यात सुख देतात हे कळते. अगदी साधे रस्त्यावर फिरताना हसऱ्या चेहऱ्याने हायहॅलो करणारे अनोळखी लोकसुद्धा छान वाटतात.
ट्रॅफिक रूल्स enforced आहेत म्हणून इथे कार ड्राइविंगचा खरंखुरं आनंद मिळतो. रेसिझमचा अनुभव जॉबमध्ये (टिचिंग) किंवा बाहेरही कुठे आला नाही.
कॅलिफोर्नियात असल्यामुळे हवेचा फारसा त्रास झाला माही पण तरीही रोजच घरातून निघताना weather update बघून निघायची सवय लागली.
बाकी भारतीय फूड बद्दल माझा पास. कारण इथे मिनी इंडिया असल्याने भारतीय, मराठी कुठल्याच पदार्थाची उणीव भासली नाही आणि खरं सांगू का तुम्हाला.. हळू हळू ते इंडियन फूड craving पण कमी होऊ लागते. कारण इतर इतके कुझिन्स ऑपशन्स ओपन होतात. आठवड्याचे प्लांनिंग करून पूर्व तयारी रविवारी करून ठेवणे हे कमी कटकटीचे वाटते आणि जॉब करत असताना रोज दोन वेळा स्वयंपाक करणे गैरसोयींचेही वाटते आणि जरूरही वाटत नाही.

बाकी मेडची मला भारतातही कटकट वाटे कारण तिची वेळ सांभाळणे, तिच्याकडून कामे करून घेणे किंवा देखरेख ठेवणे हे मला आवडत नसे.. त्यामुळे इथे आल्यावर ते एकदम फ्रीडम आणि स्ट्रेस फ्री वाटले. आपल्याला हवे तेव्हा काम करणे आणि खरंच इतके काही अवघड नसते ते. छंदीफंदी नी सांगितल्याप्रमाणे आपण सर्व अड्जस्ट होत जातो. मी इथे भाड्याची ४ घरे बदलली आणि शेवटी स्वतःच्या घरात आले. हा अनुभव भारतात आलाच नसता कारण भारतात आयते वडिलोपार्जित घर होतेच.

मला वाटते हल्ली देशी युटूबर्स, रील स्टार्सनी अमेरिकेत राहणे म्हणजे फार मोठे दिव्य आहे आणि इथे किती काम पडते, भारतात कसे लोक सुखी आहेत याचा एक हव्वा केला आहे. अमेरिका सर्वांसाठी नाही पण तुमचे क्षितिज नक्की उंचावेल. परत गेलात तरी ह्या आठवणी मोलाच्या असतील.

नक्की या इथे. पण ओपन माईंड ठेवून या. खूप खूप शुभेच्छा.

बाकी सर्वानी खुपच छान लिहले आहे
मेडिकल खुप किचकट आहे त्याबद्दल मनात तयारी ठेवा. कधी कधी लगेच appointment मिळत नाही. मेडिकल खुप महाग आहे.
नातेवाईकाबरोबर खुपच सोशल असेल तर अमेरिकेत त्रास होईल . तीन वर्षानी भारतात जाण्यासाठी H1 stamping हा मोठा issue होईल . ह्या दोन कारणासाठी (+ आम्ही जिथे राहात होतो तिथली थंडी /बर्फ ) मी अमेरिका कायमची सोडली.

कॅनसास मध्यावर असल्याने फार थंडी नसते. ह्या भागात न्युयार्क/ कॅलिफोर्निया सारखे भारतिय फार दिसत नाहीत. आणि जे आहेत ते शक्यतो एकाच परिसरात राहातात. Overland Park हा Kansas City मधला देशी बहुल लोकाचा भाग आहे आणी ह्या भागात देशी लोकाची संख्या खुप वाढत आहे. खुप देशी लोक असल्याने हा महाग रेंटल एरिया आहे. ह्या भागात भारातिय ग्रोसरी आणि रेस्टॉरंट आहेत. ह्या भागात शाळा चांगली आहे. जर कमी रेंट मधे राहायचे असेल तर मुलगा लहान आहे तोपर्यन्त काही वर्ष थोडे लांब राहुन ग्रोसरी घेण्यासाठी /कामासाठीOverland Park जाउ शकता. ह्या भागात राहायचे असल्यास गाडी चालवायला येणे अनिवार्य आहे.
Overland Park पासुन लांब चांगल्या अपार्टमेंट मध्ये अंदाजे भाडे 1BHK $१३०० , 2BHK $1६00. अपार्टमेंट मधिल सोयी, लोकेशन , किती नवीन आहे त्यानुसार कमी जास्त होऊ शकतात. Overland Park च्या परिसरात दर ह्यापेक्षा जास्त आहेत.

अमेरिकेतील school system हा सगळ्यात मोठा प्लस पॉईट आहे. तिकडच्या चांगल्या शाळा ह्या एकाच मुद्यावर आम्ही अमेरिकेत स्थलांतर केले होते.

सर्वांच्या पोस्ट छान आहेत.
माझेही चार आणे. मी लग्न करुन इथे आले होते. नंतर आम्ही भारतात परत गेलो (चुकीचा निर्णय) आणि चाळीशीत मी एकटी स्टुडंट विसावर परत इथे आले (कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली होती आणि निर्णय उत्तम ठरला), जॉब मिळवला, आता फॅमिलीसुद्धा पुन्हा इथे मला जॉईन झाली आहे व आम्ही सर्व एकत्र आहोत.
नक्की या. आधी एकट्यानेच येऊन सर्व अनुभव घेऊन मग बायको-मुलाचा निर्णय घ्यावात असे वाटते, पण ही संधी सोडू नका. अशी संधी परत मिळत नाही.
माझ्या लिमिटेड सर्कलमध्ये- नात्यात-मित्रमंडळीत भारतात परत गेलेले कुणीही नाहीत. यात स्टुंडट म्हणून आलेले व एचवन एलवन वरील लोक आहेत. बाकी काही लोक रिसेशन/लेऑफमुळे परत गेले पण ते जावं लागल्यामुळे. स्वेच्छेने नाही. ग्रीनकार्ड्/नागरीकत्व घेतलेलीही काही मंडळी परत गेली (मुलांसाठी) पण तेही परत आले.
ऑफकोर्स हे व्यक्तिसापेक्ष आहे पण परतणारी पावले अद्यापही कमी दिसतात हे माझं वैयक्तिक मत.
बाकी तुमचे बहुतेक कॉन्स वाले मुद्दे योग्य असले तरी किरकोळ स्वरुपाचे आहेत आणि त्यावर भरपूर उपाय आहेत.

>>>>सेकंड ग्रेड सिटिझन - खर तर ग्रीन कार्ड आणि नंतर citizenship मिळेपर्यंत आपण नागरिक नसतो. त्यामुळे नागरिकांचे हक्क आपल्याला नाही मिळाले म्हणून आपण सेकंड ग्रेड होत नाही.>>>>
मी अंडरकरंट बद्दल बोलत आहे.... माझे एक निरिक्षण आहे की बहुधा मित्रमंडळी भारतीयच असतात, तेथिल अमेरिकन मंडळी कार्यालयाव्यतिरिक्त सामाजिक जीवनात सामावून घेत नाहीत, दे आर नाइस बट दॅट इज बिकॉज ऑफ कर्टसी
माझे निरिक्षण आहे की घरी येणारे सोशल फोन कॉल्स देखील भारतीय मंडळींचेच असतात.... थोडक्यात तिथे आ पण मिनी भारतात जगतो
हे माझे वैयक्तिक मत आहे.

सर्व प्रतिसाद्कर्त्यांचे मनापासून आभार. प्रतिसाद वाचत आहे व घरात चर्चा करत आहे.
@वर्षा , तुम्ही परत यायचा निर्णय तेंव्हा का घेतला हे कळू शकेल का?

हो रेव्यू हे तुमचं म्हणणं बरोबर आहे.. सुरुवातीला मलाही असा जाणवलं.. विशेषत शाळेमध्ये.. पण फक्त भारतीयच नाही, अशियन , रशियन, मेक्सिकन, असे आपापले गट असतात. सरसकट नाही..

पण नंतर जाणवत गेले, की साधारण ब्राऊन लोकांची विचारपद्धती/ आचार एका पद्धतीचे असतात, ह्यात बांगलादेशी, पाकिस्तानी .. सगळे आले..
असेच थोडे इतर गटांचे पण होते..
त्यामुळे नैसर्गिक रित्या ते एकत्र येतात.

मिक्स ग्रुप ही अगदीच नसतात असे नाही .. .

वरती कोणीतरी भारतीयांना कमी पगार किंवा दुय्यम असा म्हटलं आहे...
पण खरी परिस्थिती कदाचित खूप वेगळी असू शकते..

म्हणजे भारतीय किंवा आशियायी वसाहती आता बऱ्याच चांगल्या/ महाग झिपकोड मध्ये प्रब्ल्याने आढलून येतात..
अशा ठिकाणचे भारतीय / आशियाई लोक कधी कधी हाय handedly वागताना दिसून येतात..
आमच्याकडे पैसा आहे, आम्ही हुशार आहोत, वगैरे attitude देण्यात आपली मंडळी ही कधी कधी मागे राहत नाहीत...

>>@वर्षा , तुम्ही परत यायचा निर्णय तेंव्हा का घेतला हे कळू शकेल का?
कारण सर्वस्वी कौटुंबिक होते. अमेरिकेतली अमुक एक गोष्ट किंवा गोष्टी आवडल्या नाहीत म्हणून आम्ही परत आलो किंवा विसा/नोकरी इश्यू वगैरे काहीही नव्हते. वास्तविक सर्व गुणदोषांसकट आम्हाला दोघांनाही अमेरिकेतले जीवन आवडत होते आणि अजूनही आवडते.

माझा मुलगा शिक्षणासाठी तिकडे गेला, आता तिथेच असतो. सहा वर्ष होऊन गेली. त्याचा रेसिंगचा छंद आहे. स्वाभाविकच देशी लोकांपेक्षा अमेरीकन, कोरियन, चिनी मित्रमंडळी जास्त. अन अतिशय छान जेल झालाय तो तिकडे. तो रहातो तिथे महाराष्ट्र मंडळ वगैरे आहे, बरीच देशी जनता आहे पण त्याला कधी गरजच लागली नाही.
अमेरिकन दोस्त मंडळी थँक्स गिव्हिंग, ख्रिसमस, चार जुलै, लग्न समारंभ अशा सगळ्यासाठी त्याला आवर्जून बोलावतात. त्याला अजिबात लेफ्ट अलोन हे फिलिंग नाही.
तिथे अगदी उसापासून पालका पर्यंत सगळं मिळतं. इंडियन ग्रोसरीत तर असतच पण वॉलमार्ट वगैरे मधेही अनेक भाज्या मिळतात.
वर्क कल्चरही अतिशय उत्तम आहे. रेसिझमचा अजिबातच अनुभव नाही. इस्ट कोस्ट टू वेस्ट कोस्ट फिरत असतो. प्रवासात बी अँड बी मधे रहातो. कधी अमेरिकन कुटुंबीय असतं तर कधी दुसऱ्या महायुद्धात भाग घेतलेले ब्रिटिश आजोबा, जे आता अमेरिकन नागरिक आहेत त्यांच्या घरी रहातो.
कधीही वाकुडा अनुभव आला नाही अन कधी कशासाठी अडलं नाही.
तुम्ही स्वत: ला त्या त्या परिस्थितीत किती सामावून जायला तयार आहात यावर सगळं आहे.
सो कुठलाही निर्णय घ्या, मनापासून पार पाडा. ऑल द बेस्ट

अर्थात तिथे कोणी ओळखीचे असेल तर भारतातल्या नातेवाईकांना जरा मानसिक आधार वाटेल. जसा मला स्वाती 2 चा वाटलेला Happy
तसं कोणी तिथे ओळखीचं आहे का जरूर पहा.

सगळ्यांनी लिहिलेल्या चार आठ आण्यामध्ये माझीही ही भर. कृपया मी लिहिलेलं कुठलीही गोष्ट मी judgemental होऊन, उपरोधाने लिहिली आहे असं वाटून घेऊ नका. मी घेतलेल्या आणि पाहिलेल्या अनुभवा वरून हे लिहीत आहे. सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचे म्हणजे तुमच्या नातेवाईक आहेंत त्यांच्या बायकोची भारतातला जॉब सोडून यायची तयारी आहे का. कारण वर कुणीतरी मेंशन केल्या प्रमाणे दोघे earning असाल आणि भारतात अ पासून क्ष पर्यंत सगळ्या कामाला बाई असेल (including बेबी सीटिंग )किंवा घरच्यांची मदत असेल तर त्या बाईंना अमेरिकेत सगळं एकट्याने करायला आवडणार आहे का हे विचारात घ्या. कारण h4 वर काम करता येणार नाही आणि l2 वर पण सहज भक्कम पगाराची नोकरी सहज मिळणे अवघड असतें. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तो विचार करा. कारण त्या बाईंना नवरा ऑफिस ला गेल्यावर सगळं एकट्याने करावं लागेल संध्याकाळ पर्यंत. भारतात डबल इनकम असेल तर मोठ्या मोठ्या खरेदी, आऊटडोअर ट्रिप, बाहेर जाऊन खाणे हे सतत होतं असेल तर तसें इथे सुरुवातीला होणार नाही कारण सुरुवातीला पैश्यांची थोडी management tight असतें कारण रेंटल डेपोसिट, कार घेणे असे मोठे खर्च असतात. त्यामुळे या सगळ्याची मानसिक तयारी ठेवा. फर्स्ट time parent असाल आणि उठ सूट सगळ्या गोष्टींना घाबरून डॉक्टर ची हेल्प घेत असाल तर तसें अमेरिकेत होणार नाही कारण अपॉइंटमेंट मिळत नाहीत लगेच. त्यामुळे बाळाला काय झालं की काय करायचं, काय केल की छोटी मोठी दुखणी बरी होतात याची तयारी आणि अभ्यास करून या म्हणजे टेन्शन येणार नाही. कार घ्यावी, यावी आणि चालवावीच लागेल याची मानसिक तयारी करून या.तुम्हाला रिक्षा, उबर ने फिरायला आवडत असेल तर हा देश तुमच्यासाठी योग्य नाही. शकयातो जिथं तुमचे कलिग असतील किंवा इंडियन असतील अशा ठिकाणी रहा. अगदी मराठी नसतील तरी देसी लोक सगळे एकमेकांना धरून राहतात, अडीनडीला मदत करतात. वर कुणीतरी म्हणलं आहे त्याप्रमाणे आधी एकट्याने येऊन राहा, ओळखी वाढवा, आवडतंय का बघा, मग बायकोला जॉब सोडून बोलवा. बाकी तुम्ही लिहिलेले मुद्दे फारच गौण असतात कारण इकडं आल्यावर इतक्या नवीन प्रकारचे फूड आपल्याला आवडू लागते, मिळते की, घरात बनवता येते. कारण इकडं वेळ मिळतो. ऑफिस hours मध्येच काम असत, रात्री अपरात्री मीटिंग, काम नसतं. दोघांनी मिळून मुलाला वाढवण्याचा आनंद ही घेता येईल इथे, नवीन ठिकाण फ़िरता येतील काही महिन्यांनी. आणि अगदीच आवडल नाही तर दोन तीन वर्षात परत जाता येईल.
सगळ्याचा सारासार विचार करा कारण प्रत्येकाची प्रवृत्ती /पिंड वेगळा असतो. कुणाला इकडं चा सोफा तिकडं हलवला तरी अस्वस्थ व्हायला होतं बदल झाला म्हणून आणि कुणाला रोज वेगळ्या गावाला पाठवलं तरी उस्साह असतो जायचा. तुम्हाला काय झेपतय तसा निर्णय घ्या. कुठल्या ही निर्णया साठी शुभेच्छा

माझ्या दृ ष्टीने अमेरिकेत जाण्याचे व राहण्याचे प्लस पॉइण्ट.

१) जगातील सर्वात प्रगत व भारी कॅन्सर केअर. क्लिनिकल ट्रायल्स मध्ये भाग घेण्याची जास्त बरी संधी. आमच्या गृप मध्ये बघि तले तर सेम केअर इथे सुद्धा मला मिळत आहे सध्यातरी पन क्लिनिकल ट्रायलस इतक्या समजून येत नाहीत. बिग फार्माच्या औ श्धांच्या किंमती जास्त आहेत पण स्कीम्स ही आहेत.
२) हे इतर रोगांबद्दलही लागू असेल मला माहीत नाही.
३) अमर्याद विचार स्वातंत्र्य व वागण्याची मुभा.( कायद्याच्या चौक टीतील नियम पाळून अर्थात) भारतातील रुढी धर्म जात ह्यांची बंधने तुम्ही मागे टाकून हवे तसे जगू शक ता.
४) जगातील सर्वात बेस्ट युनिवर्सिटी शिक्ष ण व अमर्याद विचार स्वातंत्र्याचे चॉइ सेस शिक्षणाच्या बाबतीत. नो कलोनिअल अ हँग ओव र.
५) वैश्विक संस्कृतीची ओळख व माहिती होणे. इमिग्रंट नेशन असल्याने प्रत्येक कल्चरचे सण समारंभ, अन्न पदार्थ अनुभवता येतात.
६) पोस्ट ग्राजुएट व डॉक्ट रेट व पुढील शिक्षणाच्या उत्तम संधी.
७) अन्नपदार्थांच्या किंमती , पेट्रोल चे दर सरकार कमी ठेवते यु कॅन सर्वाइव ऑन लेस अ‍ॅक्चुअली इफ यु कॅन मॅनेज युअर फायनासेस
व डू मील प्रेप्स. टार्गेट व कॉस्टको मधील रेंज बघूनच मन आनंदी होते.
८) गु ड कंट्री म्युझिक सीन. जॅझ संगीत व इतर प्रकारचे संगीत , नाट्य कला प्रकार कॉमेडी उपलब्ध. प्लान करुन तिकीटे काढायची.
९) भली मोठी घरे. ( मी मुंबईत राहते) चोवीस तास पाणी व स्व स्त इंट र नेट.
१०) टेक्नॉलो जी मधील सर्वात अ‍ॅडव्हान्स्ड बाबी तिथेच तयार होतात व इंप्लिमेंट सुद्धा.
११) स्ट्रॉन्ग इकॉनोमी.
१२) वर्ल्ड्स बेस्ट मिलिटरी हार्ड्वेअर व सॉफ्ट वेअर.
१३) बारक्या मुलांच्या साठी शिक्षणाच्या उत्तम संधी.

भारतात शेफ वेंक टेश भट च्या वेब साइट वर झाकण असलेला तडका पॅन मिळतो. मी काय पंधरा वीस दिवसात फोडणी करत नाही पण रोजचेच असेल तर तो तडका पॅन नक्की घेउन जा. छान वाटलेला मला.

येथील अनुभवी महिलांनी दिलेले सल्ले जरुर वाचा.

अमांनी फारच गुलाबी चित्र काढलंय... Lol
म्हणून एक काळा टीका. कसलं डोंबालाच आलंय विचार स्वतंत्र! अर्ध्या अमेरिकेत महिलांचा त्यांच्या शरीरावर हक्क नाही. गर्भपात करायचा झाला तर मैलोनमैल दूर आणि जीवावर उदार होऊन रिस्क घ्यायला लागते. परत सगळी लाईफ लिबर्टी नी काय काय ते बंदुकीच्या गोळीबारातून वाचलात तर. Wink

अमा, तुमच्या पोस्टमधल्या सगळ्याच गोष्टी खर्‍या नाहीत. तुम्ही अमेरिकेत कधी आला होतात कल्पना नाही पण खाण्यापिण्याच्या आणि पेट्रोलचे दर आता कोविडनंतर खूप वाढले आहेत आणि वर टिप कल्चर. तसंच भारतातल्या लोकांना लाजवतील इतक्या जास्त प्रमाणात इथे सण साजरे केले जातात. देव बिव प्रकरणही भरपूर चालतं निदान मी रहाते तिथे तरी. नातेवाईक वगैरे नसल्यामुळे वाटल्यास वेगळं रहाता येतं ह्यापासून हेच एक काय ते.

>>.. थोडक्यात तिथे आ पण मिनी भारतात जगतो<<
तुमचं निरिक्षण बरोबर आहे, पण यावरुन तुम्हि काढलेला "सेकंड क्लास सिटिझन" हा निष्कर्श चूकिचा आहे. खूप कमी (< १%) साउथ एशियन इमिग्रंट्स अमेरिकन लाइफस्टाइल मधे ब्लेंड-इन्/इंटिग्रेट होतात, बाकिचे घेटोमधे राहणंच पसंद करतात. अर्थात तो ज्याचा-त्याचा चॉइस आहे, अमेरिकन कल्चर त्यावर कुठलेच बंधन घालत नाहि किंवा दुय्यम वागणुक देत नाहि..

आता मूळ प्रश्नाकडे - मला वाटतं तुमचा शॉर्ट्/लाँग टर्म गोल काय आहे ते आधी ठरवा, कारण त्यावर पुढची सगळी समीकरणं अवलंबुन आहेत. खूप पैसा कमावणं हा प्रायमरी गोल नसावा कारण हल्ली भारतात सुद्धा बक्कळ पैसा मिळतो असं ऐकुन आहे. परंतु, ओवरॉल लाइफस्टाइल, पीस ऑफ माइंड, मुलांचा सर्वांगिण विकास या दृष्टिकोनातुन विचार केलात तर अमेरिकेचं पारडं जड आहे..

मिड-वेस्ट मधली थंडि गुलाबी असते हि माहिती चूकिची आहे. व्यवस्थित तयारीने या, पहिला विंटर त्रासदायक वाटेल, नंतर त्याची सवय होईल...

बऱ्याच लोकांनी बरेच मुद्दे कव्हर केलेले आहेत. पण एका मुद्द्याबद्दल आवर्जून सांगावेसे वाटते ते म्हणजे Tornadoes. Kansas मध्ये एप्रिल ते जून हा वादळी सीझन असतो. बराच पाऊस, वादळे आणि tornadoes पण असू शकतात याची मानसिक तयारी ठेवा.

A Ship in Harbor Is Safe, But that Is Not What Ships Are Built For. >>>>> I agree. However, not all vessels are ships; some are small fishing boats. These boats might not withstand rough seas and should therefore stick to fishing near the coast or, even better, in a lake. Happy

कॉन्स वर जास्त विचार केलेला दिसतोय, >>>>> होय खरे आहे. जर एखादे प्रो लिहायचे राहिले आणि ते समोर आले, तर तो "pleasant surprise" असेल, पण जर एखाद्या कॉन ला विचारात घ्यायचे राहून गेले आणि ते समोर आले तर बराच त्रास होऊ शकतो. अजून एक - प्रो हे general लिहिले तर चालतात, पण कॉन्स मात्र सविस्तर लिहून त्यावर विचार व साधकबाधक चर्चा गरजेची असते. म्हणून कॉन्स मध्ये सविस्तर उपमुद्दे लिहिले आहेत. त्यातील काही अनाठाई आहेत व त्यावर उपाय आहेत हे आता या चर्चेतून कळत आहे. ते न्यायव्यवस्थे मध्ये म्हणतात ना कि - हजारो गुन्हेगार सुटले तरी चालतील पण कोणत्याही निरपराधाला शिक्षा होऊ नये. त्याच धर्तीवर - या सर्व छुल्लक कॉन्स साठी हजारो मायबोलीकरांनी टोकले तरी चालेल, पण कोणताही कॉन सुटायला नको. धन्यवाद. Happy

प्रोज फक्त ५ आहेत आणि कॉन्स ८. >>>>>>
प्रो आणि कॉन्स ची संख्या जरी व्यस्त असली तरी सर्व मुद्दे समान वजनाचे नाहीत. प्रत्येक मुद्द्याला वजन देऊन त्या वजनांची बेरीज करून कोणाचे पारडे जड होते ते पाहता येईल. पण ते सोपे नाही याची जाणीव आहे. धन्यवाद.

न जाण्यासाठी करणं शोधली आहेत असे वाटते. त्यमुळेच प्रोस लिहुन ते कसे बरोबर नाहीत हे ही लिहिले आहे. >>>>>> जाणूनबुजून नाही, पण अजाणतेपणे तसे घडले असण्याची शक्यता आहे. पण तेही फक्त एक कि दोन मुद्द्यांबद्दल. "Boasting and Bragging" हा हास्यास्पद वाटणारा पण मनात अजाणते पाणी सुप्त स्तरावर काम करणारा, स्वतःशी सुद्धा बहुदा मान्य न केला जाणारा आणि निर्णयावर प्रभाव टाकणारा मुद्दा सुद्दा विचारात घेतला आहे कि. धन्यवाद. Happy

बाकी एकट्या व्यक्तीने बाळाला घेऊन विमान प्रवास करण्याबद्दल २०२४ साली इतक्या बेसिक शंका >>>>> विमानप्रवास कधीच केला नाही त्यामुळे या गोष्टी माहित नाहीत. धन्यवाद.

तुम्ही बर्‍याच बारीक सारीक गोष्टींना अवाजवी प्राधान्य देत आहात असे वाटते आहे >>>>> प्राधान्य नाही, पण मनात आलेल्या सर्व गोष्टी लिहिल्या आहेत. एकदा त्यावर चर्चा होऊन, त्या बाजूला केल्या कि मन शांत होते. काही राहिले असे वाटत नाही आणि जो काय निर्णय होईल त्यावर आत्मविश्वास येतो. धन्यवाद.

प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार.

H4 चा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असताना, काम करत असताना , h 4 अचानक dependent Visa वर जणे , सतत घरकाम करणे, गाडी चालवता येत नसेल तर घरातच अडकून राहाणे या गोष्टी अवघड जातात.. पण तुम्ही इथे का आलात, किंवा तुम्हाला काय अपेक्षित आहे हे विचार स्पश्ट असतील तर यातूनही पुढे जाता येते.

अन्नपदार्थांच्या किंमती , पेट्रोल चे दर सरकार कमी ठेवते यु कॅन सर्वाइव ऑन लेस अ‍ॅक्चुअली इफ यु कॅन मॅनेज युअर फायनासेस>>> अजिबात नाही प्रचन्ड महागाई वाढलेली आहे, २ युद्धानी अमेरिकेच कबरड मोडलय..पेट्रोलचे दर भयकर आहेत.
भली मोठी घरे. ( मी मुंबईत राहते) चोवीस तास पाणी व स्व स्त इंट र नेट.>> ती भली मोठी घरे मिलियन्स च्या दरात आहेत ओ! पाण्याचे दर २४ तास असल तरी सध्या तोन्डच पाणी पळवतायत, इन्टरनेट स्वस्त नाही...भारतात स्वस्त असाव.
उच्च शिक्षण उत्तम असल तरी भयकर महाग आहे येस! डॉलर्स मधे सुद्धा महागच आहे...एका मुलाला स्टेट स्कुल मधुन नुसत अडरग्रॅड करायचा खर्च जवळपास $१६०००० आहे..प्रायव्हेट असेल तर$ ४००००० च्या आसपास ..इट्स टू मच..असो या धाग्याचा विषय नाही.
बाकी गोस्टिचा रोजच्या जिवनावर डाय्रेक्ट इम्पॅक्ट नाही त्यामुळे त्यावर काय बोलणार?

माबो वाचक! (माझ्यासह))इथे सुर थोडा थट्टेचा लागलेला असला तरी येणार असलात तर बिनधास्त या...एकदा सिस्टिम् माहिती झाली की मस्त एन्जोय कराल, धिस विल बी युवर मोस्ट मेमोरेबल एक्सपिरियन्स बाकी मदतिला माबोकर आहेतच.
निर्णय प्रकियेला शुभेच्छा!

>>>>>>>>>Kansas मध्ये एप्रिल ते जून हा वादळी सीझन असतो. बराच पाऊस, वादळे आणि tornadoes पण असू शकतात याची मानसिक तयारी ठेवा. अगदी अगदी.
विझर्ड ऑफ ओझ आठवा.
--------------
जो काही लढा द्याल, तो तीघांनी म्हणजे तुम्ही, तुमच्या सौ व बाळ यांनी द्या. सर्वजणं या. इथे कार घ्या व नसेल येत तर भारतातच चालवायला शिका. बाळ असल्यावर पब्लिक ट्रान्स्पोर्टवरती अवलंबून रहाता येणार नाही. तसा तो उपलब्धही असेल/नसेल काय माहीत.

तुम्ही कंपनीतर्फे येणार आहात की इथल्या कंपनीत नोकरी मिळालेली आहे? विचारायचे कारण हे की बाळ मोठं झाल्यावरती परत गेलात तर त्या वेळी शाळकरी असल्यास, तुमच्या अपत्यास खूप अ‍ॅडजस्ट करावं लागेल.

इथे या आणि पूर्ण जीवानिशी इथलेच होउन रहा. मग ग्रीन कार्ड वगैरे सोपस्कार ..... तुमच्या आयुष्याला फार मोठी कलाटणी मिळणार आहे. खूप मोठा बदल आहे पण ९९% सकारात्मकच आहे.

आला नाहीत तर मात्र टोचणी / फोमो लावुन घेउ नका.

प्राजक्ता काय बोललायत... १०० % सहमत.
महागाईने जेरीस आणले आहे.. कॅलिोर्नियात आणि विशेष करून बे एरियात तर जास्त..

हा धागा आणि त्यावरील साधक बाधक चर्चा एक्सेल डॉक्युमेंट न उघडताच वाचली. लेखकाने स्वतःच्या परिप्रेक्षातून मांडलेले मुद्दे आणि वाचकांनी स्वतःच्या माहिती, प्रत्यक्ष अनुभवानुसार त्याला दिलेला प्रतिसाद वाचनीय आहे. मायबोलीसारख्या फोरमचा हा मोठा फायदा. Collective Intelligence की काय म्हणतात तो हाच, असे वाटते.

पुढील निर्णयासाठी येथील चर्चेचा चांगला उपयोग होईल ह्याची खात्री वाटते. अर्थात इतके करूनही काही अनपेक्षित गोष्टींना कदाचित सामोरे जावे लागेलही परंतु थोडीफार अनिश्चितता असल्याशिवाय जीवनाची गम्मत ती काय, नाही का ?

पुढील निर्णय आणि आयुष्यासाठी शुभेच्छा फक्त too much analysis can create xxxxxxxxx हे लक्षात असू द्या.

प्रिय आमुची अमेरिका देश हा,
विश्वात स्वतंत्रतेचा आकाश खुला.
जगातल्या विविधतेत चमकतं,
येथे सपने साकार होतं.

नगरांच्या रात्रींच्या प्रकाशात,
सपनं येतात साकार या वाटात.
विश्वाच्या समाचारांतील आवाज,
या देशात लुकलुकतं सर्वांचं आनंद.

विजयाचं शिरोमणी, विचारांची पराकाष्ठा,
या भूमीतली आम्ही आपलं जीवन बसवतो.
मेलोढं या विश्वाचं, भावना अनेक,
अमेरिकेतलं भविष्य स्वप्नांचं संगम.

Pages