पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझं पेट पिव्ह चुकीचं व्याकरण वापरणारी माणसं नाही आहेत कारण ठीक आहे सगळ्यांना जगात सगळं येतं असं नाही पण तेच व्याकरण कसं बरोबर आहे हे ठामपणे सांगणारी एक जमात अस्तित्वात आहे आणि ती अशी डोक्यात जाते की बास रे बास!

आपण जसे मोठ्या नंबरच्या हिंजवडी फेजेस ला जात जातो तसे रस्ते निमुळते होत जातात.कारण road to the top is always narrow. Happy फेज 1 ला चांगला, 1 ते 2 ला थोडा कमी, 2 ते 3 ला अजून कमी.
या न्यायाने फेज 8 झाल्यास बहुतेक 1 रिक्षा जाईल इतकाच रस्ता असेल बहुतेक.

एखाद्या ठिकाणी आपण सॅड्विच किंवा तत्सम पदार्थ घ्यायला रांगेत आहोत. आपल्या पुढे असलेले बरेच जण सॅड्विचवाल्याला कसे बनव हे सांगत वेळ काढतात त्याचा राग येतो. ते मिठ एवढे, टोमॅटो इतकेच वगैरे फार डिटेल्स मध्ये सांगतात. असे वाटते की यांनाच सांगावे की बाबा तुच आत जाऊन स्वतः साठी बनवून घे आणि खा...!!

ही सँडविच वाली मी आहे ऑफिस कँटीन ला(भैय्या उसमे कच्चा कांदा मत डालो, कप्सिकम मत डालो,चीज मत डालो,टोमॅटो बटाटा डालो और ग्रील मत करो और ब्रेड का कडा मत काटो, और 5 रुपया कम करो)
पण मग शेवटी बरोबरचे लोक 'आत जाऊन बनवून घे ना स्वतःच' म्हणू लागल्यावर ही सवय कमी केली.
कँटीन वाल्याच्या आचरट सवयी.पोह्यांवर मणभर सांबार टाकून द्यायचे.किंवा सँडविच मध्ये घमेलंभर चीज आणि व्हेज मेयो.उप्पीट बरोबर कोणी इडलीची नारळ चटणी खाल्लेली पाहिलिय का?ती मिळते उप्पीट बरोबर.आपण तोंड उघडून चार सूचना दिल्या नाहीत तर उद्या डोश्यावर सिरप पण टाकून देतील, सांगता येत नाही.

कागदावर लिहून ठेवायच्या सूचना, लॅमिनेट करून घ्यायचा कागद आणि पर्स मध्ये ठेवायचा. ऑर्डर देताना त्याला सूचना कार्ड देऊन असे सँडविच बनव सांगायचे. सँडविच घेताना कार्ड परत घ्यायला विसरू नये.
विसरभोळ्या लोकांनी व्हिजिटिंग कार्ड्स सारखे सूचना कार्ड्स छापुन घ्यायचे.
---
अजून एक करता येईल. नागपूरच्या पानवाल्यांना सँडविच कूक ट्रेनिंग देऊन त्यांना सँडविच कूक नेमायचे.
मग एकदा गिऱ्हाईकाने कसं सँडविच हवं हे सांगितलं की त्यांचा लक्षात राहील.
पुढल्या वेळेस गेलं आणि समोर उभे राहिले की ते मग बरोबर त्या त्या गिऱ्हाईकाचे सँडविच बनवतील. "कसं बनवू सँडविच?" असे एकदा येऊन गेलेल्या गिऱ्हाईकाला विचारणे हे त्या गिऱ्हाईकाचा अपमान समजण्यात येईल.

आपल्या पुढे असलेले बरेच जण सॅड्विचवाल्याला कसे बनव हे सांगत वेळ काढतात त्याचा राग येतो. ते मिठ एवढे, टोमॅटो इतकेच वगैरे फार डिटेल्स मध्ये सांगतात>>हो पण काहिवेळेस अ‍ॅलर्जी असते,आवड असते...ते कस्ट्म बनवुन मिळतय आणि त्याचे पैसे मोजलेत म्हणजे हव तसच मिळाल पाहिजे ना?त्यात पेट पिव्ह्ज काय?
एकदा चिपोटले मधे बाउल बनवण्याराने हॉट सॉसला हो म्हटल्यावर काहि विचार न करता डावभर टाकला होता...तरी मी व्हेरी लाइट अस म्हटल होत...सागुन ही तर्हा न सान्गता काय देतील?

कोणत्याही गोष्टीत अ ती चिकित्सा /नखरे करणारे लोकं

१. स्टार्बबक्स मधे एक बाई पुढे होती. काहीतरी लंबीचौडी ऑर्डर देत होती. प्रत्येकात अमकं ढमकं तमकं असंच तसंच. एक ऑर्डर फेकायला लावली. कॉफी कप आला तर म्हणे याला लहान झाकणच लावा आणि स्ट्रॉ द्या. काऊंटरपलिकडचा म्हटला सुद्धा हे बरोबर बसणार नाही त्यात स्ट्रॉ जाणार नाही वगैरे वगैरे. पण बाईचं पालुपद चालूच आणि वर म्हणते आय अ‍ॅम नॉट अ बिग फॅन ऑफ स्टारबक्स मग कशाला आली बये झक मारायला इथे की भडास काढायला. गोळीच घालावीशी वाटली होती तिला. भयंकर अ‍ॅटीट्युड! किती तो दुसर्‍या कस्टमराचा पण वेळ घालवायचा.
२. पार्लर मधे आयब्रो करून घेताना हा एक केस इथे राहिला. मायक्रो मिनी इथे उपटायचा राहिला. निरखून निरखून आरशात बघतच बसायचं ५-१० मिनिटं. इथे एक तिथे एक करत बसतात.

मान्य पैसे दिले की मनासारखं हवं पण काही लोकं मुद्दाम असे वागतात ते डोक्यात जातं. एवढं भान नसतं का की दुसरे पण रांगेत आहेत.

३. हॉटेलात वेटर कॅटेगरी लोकांना आपल्या घरचा नोकर समजणारे... त्यांना डिसरिस्पेक्टफुली वागवणारे
४. सतत उपदेशाचे डोस देणारे (समोरच्याला हवा असो नसो) सतत आम्ही कसे बरोबर आणि तुम्ही माती खाणारे

उप्पीट बरोबर कोणी इडलीची नारळ चटणी खाल्लेली पाहिलिय का?ती मिळते उप्पीट बरोबर >> पुण्यातल्या बऱ्याच हॉटेल मध्ये मिळते..वैशाली,रुपाली, अक्षय सगळीकडे मिळते. मस्तच लागते हे कॉम्बो.

>>>>>>>>सतत उपदेशाचे डोस देणारे
ब्रह्मकुमारीज च्या बी के शिवानींचे व्हिडिओज फार पाहील्याने असा डोक्यावरती परिणाम होतो. उठसूठ जगाचं भलं (फक्त उपदेशातून बरं का) करावसं वाटू लागतं. मग कुणाला तो हवा असो नसो. इथे एक मैत्रिण आहे. ती म्हणाली तो समोरचा फुंकाड्या (४० वर्षा चा घोडा आहे तो) त्याला म्हणे मी एकदा सांगणारे - जिंदगी बर्बाद मत कर.
अरे तुला का नसत्या उचापत्या. त्याला त्याचं नीट कळतय.
मलाही इतका उपदेश करत असते.

पुण्यात निरंजन मध्ये उप्पीट आणि गोडसर चटणी मिळते. लय म्हणजे लय भारी लागते. पोह्याबरोबर तिकडे डिफॉलट सँपल मिळते, पण चटणी मागून घेतली तर देतात आणि ते आणखी जास्त अशक्य भारी लागतं.

आणि डोसा आणि चॉकलेट सिरप बेकरीत सर्रास मिळते. अगदी सर्वाणा भवन मध्येही मिळते. Lol त्याची सवय झाल्याने आमचा बारक्या इडली डोश्याबरोबर सिरप किंवा सर्वगुणसंपन्न केचप घेऊन खातो.

उप्पीट बरोबर कोणी इडलीची नारळ चटणी खाल्लेली पाहिलिय का? >> पहातो आणि मी सुद्धा खातो.
इथे देतात उपम्या सोबत. छान तर लागते.
पण शेंगदाण्याची इडली चटणी मात्र नाही चांगली लागत उपम्या सोबत.

----
डोसा/आप्पे केचप आमच्या कडे पण दोन तीन मेम्बरं खातात.
तिकडे ठीक आहे,पण भारतात राहून ते ही दक्षिण भारतात राहून केचप सोबत खाणं म्हणजे...

अय्यो.मला खूप वैताग येतो पोह्याबरोबर सांबार चटणी किंवा उप्पीट बरोबर चटणी पहिली की.मानसिक संस्कार या गोष्टी डोश्याबरोबर खाण्याचे आहेत लहानपणी पासून.शिवाय हे आवडत असेलच असं मानून दिलं की जास्त वैताग येतो.आज त्याला पोहा प्लेटच्या खणा मधून चमच्याने काढायला लावलं सांबार चटणी.नंतर ते कुठे फेकावं प्रश्न पडतो.
पण बाकी सर्वाना आवडतंय असं दिसतं.
बाकी डोसा चॉकलेट सिरप ला लांबून साष्टांग नमस्कार.

पोह्यावर मस्त ओलं खोबरं, कोथिंबीर, लिंबू हवं. मुळात पोहेच जरा चटकदार आणि थोडे(से) तिखट असले तर मजा येते. असं असतं तेव्हा दाणे-शेव सुद्धा ऐच्छिक.

पोह्यावर मस्त ओलं खोबरं, कोथिंबीर, लिंबू हवं.>>>>> अगदी अगदी.
गेल्या वर्षी इंदूरला गेलो होतो, प्रसिद्ध इंदोरी पोहे खाल्ले. अगदी रोज वेगवेगळ्या ठिकाणी खाल्ले. पण मला अजिबात आवडले नाही.
आपले कांदेपोहे+ओलं खोबरं+कोथिंबीर+लिंबू अगदी एक नंबर.
डोसा चॉकलेट सिरप - कल्पना सुद्धा कर्वत नाही.
बाकी आजकाल उठसूठ मायो/ मियोनिज सॉस, नटेला बटर कशातही वापरतात, ते तर मुळीच आवडत नाही. पूर्ण चव बिघडते.
त्या सँडविच वाल्याला सूचना देणाऱ्या रांगेत मी पण.... कोन्सा भी सॉस मत डालो, खाली हरी चटनी ऑर बटर लगाव.

मला उप्पीटसोबत चटणी आवडते, पोहे मात्र प्रज्ञाने लिहिलेत तसे. लेक लहान होता तेव्हा इडली, डोसा, पोहे सगळ्यासोबत सॉस घ्यायचा. उप्पीट मात्र नुसते कारण त्यात ऑलरेडी टोमॅटो घातलेत.
डोसा- चॉकलेट सिरप इमॅजिन केले. क्रेप्स-चॉकलेट सिरपचा देशी अवतार ट्राय केला पाहीजे.

मी पोह्यांवर लिंबु, खोबरं, कोथिंबीरी व्यतिरिक्त चिया सिड्स घालुन खातो. त्या कुणी एक पोहे किती पौष्टिक सांगणाऱ्या डॉक्टर आहेत. त्यांनी अशा पौष्टिक पोह्यांवर चिया सिड्स घालुन खाताना पाहिले तर भडभडून येईल त्यांना.

पुण्यात शास्त्री रस्त्यावर साधारण काका हलवाईंच्या विरुद्ध बाजूला एक हॉटेल होतं. तिथे कांदेपोहे आणि सोबत खोबऱ्याची पातळ चटणी काय छान मिळायची! आहाहा! तशी परत कुठे खाल्ली नाही.

> आपल्या पुढे असलेले बरेच जण सॅड्विचवाल्याला कसे बनव हे सांगत वेळ काढतात त्याचा राग येतो

Lol खरं आहे. म्हणजे थोडक्यात असेल तरी एकवेळ ठीक आहे. पण अतिचिकित्सा शिवाय मागे लोक वाट पहात असतील त्यांची फिकीर न करता असं करणं हे मलातरी कदापि जमणे नाही. निवांत असेल तर मात्र गोष्ट वेगळी. मागे लोक वाट पहात असतील तर कधी एकदा तिथून हलतो असे मला झालेले असते मग ती कोणतीही रांग का असेना.

टोल बूथ वर कुठलेतरी Exempted लिस्ट मधले कार्ड घेऊन दहा दहा मिनिटे हुज्जत घालत बसलेले सुद्धा डोक्यात जातात. मागच्या लोकांची शून्य फिकीर असते अशांना. मला तर वाटते कुणालाही exempt करू नये. चारचाकी घेऊन येणाऱ्या कुणालाही सत्तर ऐंशी रुपये जड नसतात. कुणाला हवे असेल तर त्यांना नंतर reimbursement ची सोय ठेवावी फार तर.

लंबीचौडी ऑर्डर वाल्यांना स्टारबक्सने फार सोपे केले आहे. त्यांच्या अ‍ॅप मधे जाउन लोकेशन निवडून ऑर्डर देता येते. तुमचे काही स्पेसिफिक quirks असतील - फॅट फ्री दूध, एक्स्ट्रॉ हॉट टी वगैरे वगैरे, तर ते ही निवडता येते. मुख्य म्हणजे आधीच्या ऑर्डर्स तेथेच असतात, पुन्हा निवडायला. कोणत्याही अ‍ॅप मधे आजकाल हे कॉमन आहे पण विशेषतः प्रवास करताना याचा प्रचंड फायदा होतो. एकतर अनेक ठिकाणी स्टारबक्समधे प्रचंड मोठी रांग असते. अ‍ॅप मधून आधीच ऑर्डर केले की अनेकदा आपण तेथे जाईपर्यंत मोबाईल ऑर्डर तयार असते.

त्यांचे अ‍ॅप वापरून प्रत्येक वेळेस १५-२० मिनिटे सहज वाचतात असा माझा अनुभव आहे. आणि मुख्य म्हणजे अशा बाफवर आपण "फीचर" व्हायची शक्यता कमी होते Happy

यात सर्वात मजा म्हणजे वेस्टसाईड किंवा शॉपर्स स्टॉप मध्ये आपल्या पुढचा माणूस सर्व कुटुंब कबिल्याला घेऊन, घमेलंभर शॉपिंग करून, 2 व्हाउचर, 4 कुपन आणि क्रेडिट कार्ड्स घेऊन गोंधळ घालत असतो.मग सेल्समन त्याच्या जुन्या जाणत्याला बोलावतो, तो अजून तिसऱ्याला.

मला खूप वैताग येतो पोह्याबरोबर सांबार चटणी किंवा उप्पीट बरोबर चटणी पहिली की >>> मलाही. पोहे-उप्पीटाची मूळ चव मारली जाते त्याने. अर्थात कँटीनमधले पोहे किंवा उप्पीट 'जाणिजे यज्ञकर्म 'म्हणून खायचे असतात. त्याला जर मूळची चांगली चव असेल तर तुम्ही लॉटरीचं तिकीट घ्या त्या दिवशी.

पोह्यावर मस्त ओलं खोबरं, कोथिंबीर, लिंबू हवं >> १०००%.

सॅन्डविचच्या बाबतीत भारतात सबवेमध्ये माझा उलट अनुभव आहे. कुठलेतरी एकच सॉस सांगितले कि समोरचा विचारतोच बस्स एक? कन्फर्म केले की ते सॉस भसाभस घालणार. अरे मला आमटीएवढे सॉस नकोय. ते झाले रे झाले की चपळाईने त्याचा हात सॉल्ट-पेपरच्या बाटल्यांकडे वळतो. तेही नको सांगितले की काय बाई आहे टाईप्स लुक मिळण्याची हमखास गॅरण्टी. ट्राय करून बघा हवं तर...

टोल बूथ वर कुठलेतरी Exempted लिस्ट मधले कार्ड घेऊन दहा दहा मिनिटे हुज्जत घालत बसलेले सुद्धा डोक्यात जातात.
>>>> किंवा मग तो टॅग ब्लॅकलिस्टेड असतो, स्क्रॅच पडून रीड होत नसतो. अशा वेळी 'मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक' असं घोकत राहायचं.

घमेलंभर शॉपिंग करून, 2 व्हाउचर, 4 कुपन आणि क्रेडिट कार्ड्स घेऊन गोंधळ घालत असतो
>>>
त्यात त्यांच्या कुठल्यातरी एक्सचेंजचे पॉईंट्स ऍड करा. आणि घेतलेल्या शर्टबरोबरच मॅचिंग इनर मिळतोय की तो वेगळा घेणे अपेक्षित आहे, इतर कुठलातरी टॉप इनरसहित मिळतो याबद्दलची गहन चर्चा ऍड करा. बिलिंग चालू असताना मैत्रिणीला/नवऱ्याला पाठवून विवक्षित टॉप धुंडाळून आणणे यातली मज्जा तुम क्या जानो रमेशबाबू?

अतिचिकित्सा शिवाय मागे लोक वाट पहात असतील त्यांची फिकीर न करता असं करणं हे मलातरी कदापि जमणे नाही. निवांत असेल तर मात्र गोष्ट वेगळी. मागे लोक वाट पहात असतील तर कधी एकदा तिथून हलतो असे मला झालेले असते मग ती कोणतीही रांग का असेना.>>>>>>>>. +++१११ एक्झॅक्टली

फारएण्ड.. हो ते स्टारबक्स अ‍ॅप चांगलं फिचर आहे . इंट्रोवर्ट लोकांसाठी परफेक्ट Lol

मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक >>>>:हाहा: दर वेळी मला वाटतं माझ्यापुढेच अशी जनता का असते. माझे ब्रेक टेस्ट करायला Lol

मला जशी कॉफी हवी तशी मागायला लाज वाटणे ही वोकनेसची पुढची लेव्हल आहे!
स्पेसिफिकली मी क्रीम आणि घेतली तर शुगर शिवाय काही घेत नाही, पण ज्याला कोणाला आमंड मिल्क, शॉट ऑफ धिस, आणि पंप ऑफ दॅट, इझी ऑन आईस, माकीऑंखों असं डीटेलात ऑर्डर करायचं आहे त्यांनी केवळ मागे गिर्‍हाईकं आहेत म्हणून नको असलेलं ड्रिंक ऑर्डर करायचं! जजमेंटल होण्याची कमाल आहे!
मी लाईन मध्ये आहे ते माझं काम करायला. मला जसं हवं तसं ते होत नसेल आणि रांग वाढत गेली तर चूक त्या एस्टॅब्लिशमेंटची आहे की पुरेश्या कस्टमर सपोर्टला खिडक्या उघडलेल्या नाहीत. ना की ते काम करायला आलेल्या व्यक्तीची.
अनरिझनेबल प्रकार करू नये पण कॉफी ऑर्डर करताना हवी तशी करायची नाही कारण किरकिरे रडतराऊ माबोकर रांगेत जजमेंटल होताहेत!

मला खरे तर ते ॲप वरून ऑर्डर करणारे आवडत नाहीत. त्यांच्या सगळ्या ऑर्डरीमुळे मी तिकडे गेलो तर साधी कॉफी मिळायला पण १० मिनीटे थांबावे लागते कारण बाकीच्या ऑनलाईन ऑर्डर आहेत. त्या आधी भरल्या जातील.

बरेचदा मग स्टारबक्स ऐवजी लोकल कॉफीशॉपला भेट दिली जाते.

Pages