भूतं, त्यांच्या करामती, मंतरलेले खिळे, पुनर्जन्म वगैरे मसाल्याने खचाखच भरलेला 'बीस साल बाद' हा एक प्रचंड मनोरंजक पिक्चर आहे. डायरेक्टर तेच आपले 'राजतिलक' वाले (राजकुमार कोहलीचा 'औलाद के दुष्मन' त्याच्या स्वतःबद्दलचा असेल का? नाहीतर त्याने 'जानी दुष्मन : एक अनोखी कहानी' का काढला असता? ). कोहली काकांना 'आजा आजा' अशी सुरूवात असलेली गाणी खूप आवडत असावीत. सिनेमाची टायटल्स याच शब्दांनी सुरू होतात आणि पुढे गाणं चालू होतं - 'बीऽऽस साऽल बाऽऽऽद'.
पिक्चरच्या सुरूवातीला एका हवेलीत डिंपल धावत धावत येते. म्हणते धनंजय माने इथेच राहतात का? हवेलीचे मालक आले का? इथे तिने एकदम डिझाइनर बंजारा कॉश्च्यूम घातला आहे. तर एक एजंट हवेली विकायला आलेला असतो. आता डिंपल आत्ताच हवेलीत आली आहे हे माहिती असूनही एजंट तिच्याकडे हातोडी मागतो खिळा ठोकायला. ती काय मास्क मधला जिम कॅरी आहे? पण ती हात लांबचलांब करून दूर कपाटावर ठेवलेला हातोडा आणते. एजंटला अटॅक खळ्ळ्खट्याक! तेवढ्यात हवेलीचा मालक एका नवराबायकोला हवेली दाखवायला घेऊन येतो. तर डिंपल एकदम भूतांच्या गणवेषात येते. नवराबायकोला हाकलते. ती हवेली उसके यादोंका मंदिर असते म्हणे. पण मालक असतो येडा. तो तिला म्हणतो थांब मी हवेली पाडतो. डिंपल त्याला सगळ्या खांबांवर आपटून खाली पाडते आणि ठार करते. वरिष्ठ अधिकारी पिंचू म्हणतो या हवेलीत इतकी लोकं का मरतायत? मग इन्स्पेक्टर विनोद मेहरा त्यांना सांगतो स्टोरी.
बीस साल पहले मिथून उर्फ सूरज आणि डिंपल उर्फ निशा (फॅशनेबल) बंजारे असतात. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं. कशावरून? तर तसं गाणं ते म्हणत असतात - हम तुम्हे इतना प्यार करेंगे, के लोग हमें याद करेंगे . स्ट्रॅटेजिक नावं असल्यामुळे यांची ताटातूट होणं नक्की आहे. तसं ते एकमेकांना बोलून पण दाखवतात की सूरज और निशा का कभी मिलन नही होता. निशाचं लग्न सरदार च्या मुलाशी म्हणजे बादलशी ठरलेलं असल्याने त्यांच्या प्रेमावर बादल येतात. पात्रपरिचयातच स्टोरी कळते. हे असं पाहिजे. मग 'यारा दिलदारा' मधे दाखवलेल्या त्याच अकॉपा साइजच्या बागेत (तीच बाग आहे ही खरंच) सरदारचे लोक सूरजला हाणतात आणि निशाला घेऊन जातात. रात्री निशा सूरज पळून जातात आणि किलोभर बडबड करून झाल्यावर कड्यावरून सागरमें उडी मारतात. ते नेमकं विनोद मेहरा पाहतो आणि त्यांना वाचवतो. कबिल्यातल्या सरदार आणि मंडळींना मेहराने प्रचंड उपदेशामृत पाजल्यावर सरदार 'उसूल नको, भाषण आवर' अश्या विचाराने निशा सूरजचं लग्न मान्य करतो. हे ऐकताच आत्तापर्यंत बेशुद्ध पडलेले निशा सूरज टुणकन उडी मारून उठतात. मग लग्न. ते थँकफुली नाही दाखवलेलं. पण कबिल्याचा रिवाज की म्हणे हवेलीच्या ठाकूरचा आशिर्वाद घेयाला पायजेन! त्याच्या हवेलीच्या मागेच यांची बस्ती असते म्हणे. तर ठाकूर कोण? अनुपम खेर! त्याला खोटाखोटा अॅटॅक येतो. सूरज डॉक्टर आणायला जातो. त्याला काही घोडेस्वार गुंड मारून टाकतात. ठाकूर आणि निशा मधुमतीवरून इन्स्पायर्ड असल्याने ते डिट्टो तोच सीन करून दाखवतात. निशा टेरेसवरून खाली दरीत पडते आणि तिला जंगली जानवर घेऊन जातात. आता तिचं झालंय भूत. आणि ती त्या हवेलीलाच स्वतःचं घर समजून सूरजके इंतजारमें तिथे राहते. काय आयरनी आहे! पण मग ठाकूरचं काय झालं?
बहिरा जगदीप आणि तोतरी अरूणा इराणी जिथे काम करतात अश्या वेगळ्याच हवेलीत आता ठाकूर असतो. त्याची मुलगी मीनाक्षी उर्फ किरण (स्ट्रॅटेजिक नावं यू सी!) लंडनहून येते. तिने फाफा साठी टोफा ( पापा साठी तोहफा ) आणलेला असतो - सूरज (जन्मजन्मांतरीचं नाव दिसतंय हे). म्हणजे नवीन मिथून. पापाला शॉक बसतो. पण तो त्याला स्वीकारतो. सगळे एयरपोर्टवरून घरी येत असताना रस्त्यात हात पसरून निशा उभी! निशा फक्त सूरजला दिसते. जीप निशाच्या आरपार जाते. रात्री सूरजला निशाचं स्वप्न पडतं. त्यात दिसते ती ठाकूरची जुनी हवेली. तर तो सुरूवातीला आपटबार होऊन मेलेला माणूस सूरजचा भाऊ असतो आणि त्याला कोणी मारलं हे शोधायला सूरज इथे आलेला असतो. घ्या! आणि मला वाटलं लग्न केलं म्हणून ठाकूरला भेटायला आले दोघं. असो. ठाकूर म्हणतो हवेलीत जायचं नाही. निशा 'आजा आऽऽजाऽऽ' गाणं म्हणत सूरजला घेऊन हवेलीत जाते. उडता येत असूनही चालत जाणारं भूत आहे हे. बहुतेक जुन्या हवेलीतच काहीतरी खंडहर सदृश आहे. त्याच्या आठवणी जाग्या व्हायला ती तिथे एक डान्सिकल रिच्युअल करते (यात मधेच हडळीसारखं हसणं कंपल्सरी असतं). डान्सचा प्रोग्रेस बार असावा असा एक हळुहळू लाल होत जाणारा खिळा स्क्रीनवर दिसत राहतो. डान्स संपतो. रिच्युअल मधे घातलेले झुमके खिळा टोचायला जाताना निशाच्या कानात नसतात. लाल खिळा निशा सूरजच्या पायात टोचते. सूरजला आठवणींच्या ( म्हणजे सुरूवातीच्या गाण्याच्या ) निगेटिव्हज दिसायला लागतात. गाण्याचं म्युझिक मात्र त्याला नीट ऐकू येत असतं. तो बेहोश होतो.
बेहोश सूरजला काय झालं पहायला तांत्रिकबाबाला म्हणजे शक्ती कपूरला बोलावतात. त्याचा एक डोळा उगाचच पांढरा आहे. हा इतका शक्तीमान असतो की तो निशाला बाटलीत बंद करतो. त्याचं म्हणणं असं की दोन अमावास्या निशा असे खिळे टोचणार. मग त्यानंतर करवा चौथ आहे तेव्हा लास्ट अँड फायनल खिळा की सूरज निशाच्या कॅटेगरीत जाईल. सूरज काय मुहूर्त पाहून आला की काय भारतात? तर म्हणे पुढच्या अमावास्येला निशाला आपण तिच्या खिळ्याचा असर अनडू करायला सांगू आणि मग तिला मारून टाकू. म्हणजे काय? तो प्रोग्रेस बार उलटा जाणार का? का खिळा अनइन्स्टॉल होणार? असो. किरणला लगेच उलट्या व्हायला लागतात ( निशा बाटलीत जाण्याचा याच्याशी संबंध नाही. शिवाय त्यांना येऊन एक महिनाही झाला नाही अजून वगैरे गणितं करू नयेत. त्याचा काही उपयोग नाही. )
मग दुसरी अमावस ( पिक्चरच्या या कॉपीत मधले काही सीन्स कापले असावेत असा मला संशय आहे. लगेच दुसरी अमावस कशी येईल? ). ठाकूरचं रूप घेऊन निशा जगदीपला फसवते आणि बाटली उघडायला लावते. बाहेर पडून ती आधी शक्तीबाबाला मारून टाकते. आणि त्याच्या दारात आलेल्या ठाकूर आणि किरणला शक्तीच्या बायकोचं रूप घेऊन हाकलून देते - म्हणते माझा नवरा तुम्हाला काही मदत करणार नाही. ठाकूर म्हणतो की जाऊदे मी दुसरा एखादा बाबा शोधायला जातो. ठाकूर सगळी आसपासची दारं ठोठावत 'अहो, इथे एखादे भुताला पळवून लावणारे बाबा राहतात का?' असं विचारणार की काय आता?
किरण घरी येऊन मंगलसूत्र की शक्ती वगैरे डायलॉग मारते. निशा सूरजच्या शरीरात प्रवेश करते आणि ते मंगळसूत्र हिसकावून फेकते. मग पुन्हा खंडहर -डान्स - प्रोग्रेस बार - खिळा टुच. आता सूरजला आठवणींच्या पॉझिटिव्हज पण दिसायला लागतात मधूनमधून.
ठाकूर आणि किरण म्हणतात चला सगळे लंडनला पळून जाऊ. निशा त्यांची गाडी वळवून हवेलीत नेते. पण सूरज म्हणतो मी फक्त किरणचा आहे. निशाला कळतं की हे सगळं सूरजच्या गळ्यात जगदीपने घातलेल्या लॉकेटमुळे होतंय. पण फ्लाईट चुकतेच. याची शिक्षा म्हणून निशा ठाकूरच्या आरपार जाऊन त्याला महारोगी बनवते. ( सुरूवातीला जीपच्या थ्रू गेली होती तेव्हा जीपला नाही झाला महारोग! )
आता येतात अमजद बाबा. ते ठाकूरला तावीज घालून महारोग रिवाइंड करतात - म्हणजे बरं करतात. सूरज किरणलाही तावीज देतात. निशा शक्तीबाबाचं रूप घेऊन येते आणि म्हणते अमजद म्हणजेच निशा आहे. तावीज काढा. हे काढतात. ठाकूर मात्र नाही काढत. मग नाईलाजाने झाडांच्या मुळ्या-फांद्यांमधे गुरफटवून आणि फांदी भोसकून निशा ठाकूरला मारून टाकते.
किरण म्हणते आता अमजद बाबा पण नाहीत तर वैष्णोदेवीला जाऊ म्हणजे माझा सुहाग वाचेल. लगेच सूरज किरण गाडीत. करवा चौथ पण ताबडतोब येते. ताटातल्या पाण्यात नुसता सूरज दिसण्याऐवजी किरणला निशा सूरज दिसतात. निशा सूरज उडतउडत पुन्हा उसी खंडहरमें. आता मात्र निशा एकदम संथपणे चालायला लागते. कशाला घाई करायची उगाच? बीस साल लागलेत तिथे अजून काही वेळ! इकडे किरण तात्काळ वैष्णोदेवीच्या देवळात गाणं म्हणायला जाते. हे सगळं होईपर्यंत निशा काय करत असते? असो. रिच्युअल संपते. ती संथपणे खिळा सूरजकडे घेऊन जात असताना इकडे पुजारी किरणला सिंदूर देतात. लगेच निशा पॉज होते. सूरज भारणीखालून बाहेर येतो. आता सूरजवर विविध हल्ले होतात. म्हणजे कधी उकळत्या लाव्ह्यावर असलेल्या कड्यावर तो लटकतो, कधी त्याच्या अंगावर दगडी माणूस किंवा भूतं चाल करून येतात. ऑल धिस फॉर टोचिंग खिळा इन हिज पाऊल. पण दर वेळी तो वाचतो. बॅग्राऊंडला जोरात 'जय मातादी' वाजत असतं. किरण धावत (अगं बाई प्रेग्नंट आहेस ना तू? ) असते. मधेच पडते पण. पडल्यावर देवीला नमस्कार करून सिंदूर हवेत उडवते. सिंदूराचं स्पायरल होतं आणि वांव वांव करत सूरजकडे जायला लागतं. हे इतकं सोपं होतं तर देवळातच का नाही केलंस हे? इकडे दोन भुतांनी सूरजला धरून ठेवलंय. आता बाई पट्कन खिळा टोचून काम उरकेल की नाही? पण नाही! निशा एका दारातून मंदपणे पावलं टाकत खिळा घेऊन येते! तेवढ्यात स्पायरल येऊन निशाभोवती वांव वांव करायला लागतं. खिळा पडतो. भूतं गायब. निशा इन पेन. तेवढ्यात तिथे धावत किरण येते. कसं शक्य आहे? यांची लोकेशन्स जाम गंडलेली आहेत. ठाकूरची नवी हवेली जुन्या हवेलीच्या जवळ असते. कारण लोकं इकडून तिकडे सहज ये-जा करताना दिसतात. आणि जुन्या हवेलीपासून वैष्णोदेवी वॉकिंग डिस्टन्स वर आहे? मग मगाशी गाडीतून कशाला गेले होते सूरज आणि किरण? किरणला निशाकडे पाहून वाईट वाटतं. मग येतो अमजद बाबा. किरण म्हणते बाबा, निशाला या दु:खातून सोडवा. सूरज म्हणतो, बघ माझी बायको कसली ग्रेट आहे आणि तिचं प्रेमच खरं प्रेम आहे. निशा म्हणते ह्यॅट्ट! माझंच प्रेम महान. बघ मी याहून मोठा त्याग करते - मी तुझ्या सुखासाठी तुझाच त्याग करते. पण आधी म्हण मी महान आहे. निशा गायब / मुक्त होते. सूरज म्हणतो, निशाचं प्रेम महान. ठरव बाबा एकदा. अमजदच्या सांगण्यावरून सूरज निशाची हाडं शोधून अंत्यसंस्कार करतो.
अजून काही वर्षं जातात. सूरज खिळा-फोटो-हार झालेला असतो. त्याच्या मुलाचं कॉलेज फंक्शन असतं. मुलगा परत मिथूनच ( कपाळाला हात लावलेल्या इमोजीची सोय करा कोणीतरी प्लीज ). तेच सुरूवातीचं गाणं सेम तोच बंजारा शर्ट घालून स्टेज वर म्हणत असतो. सोबत वेगळीच मुलगी. तर प्रेक्षकांतून गाण्याची दुसरी ओळ म्हणत येते तरूण डिंपल. तिच्यासोबत म्हातारा विनोद मेहरा. तरूण डिंपल याची मुलगी की नात या कन्फ्युजन मधे आपण असतानाच पिक्चर संपतो.
उल्लेखनीय बाबींमधे शक्ती कपूरच्या बायकोच्या डोळ्यांत दिसणारे अॅक्चुअल बल्ब्ज, भुवया उडवत आणि हातवारे करत नाच केल्यासारखी बोलणारी मिनाक्षी, जबरदस्त उपमांनी भरलेले संवाद ( सूरजके बिना किरण कहाँ, सूरज बुझ जायेगा, सूरजके प्यार पे बादल छायेगा वगैरे ), प्रोग्रेस बार वाला खिळा, एयरपोर्ट वर आंग्लाळलेल्या किरणच्या हिंदीचं ती 'सुहागन नारी' मोडला आल्यावर शुद्ध हिंदीत कन्व्हर्जन, बंजार्यांचे ड्रेस, डिंपलचे निळे दिवे वाले डोळे अश्या गोष्टी आहेत. अॅडीशनली - निशाला सूरज परत आल्याचं कळतं तर सुरूवातीला हवेलीतून पळून गेलेला ठाकूर कुठाय हे का कळत नाही? पहिल्या सीन मधे बंजार्याचा रंगीत ड्रेस घातलेली निशा नंतर लगेच पांढर्या झुळझुळीत कपड्यात का येते? सुरूवातीला हवेलीतल्या खुनांचा तपास करणारे पोलिस विनोद मेहराची स्टोरी ऐकून झाल्यावर 'बरं बाबा, भूत असेल तिथे. आपल्याला काय करायचंय.' असं म्हणून केस बंद करतात का? असल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत.
दुसरा मिथुन येतो तो पहिलाच
दुसरा मिथुन येतो तो पहिलाच मिथुन असतो काय? नसेल तर त्याला पहिल्या मिथुनचं जुनं कसं काय आठवतं?
नसेल तर त्याला पहिल्या
नसेल तर त्याला पहिल्या मिथुनचं जुनं कसं काय आठवतं? >>> कारण ही वॉज कील्ड बाय डिंपल
टेक्नॉलॉजी>> लायडार वापरत
टेक्नॉलॉजी>> लायडार वापरत असेल तर नाही थांबणार
डिंपलच्या डोळ्यांमधले दिवे ती एक गाडी आहे असे भासवेल का?
अवांतर: परवा आम्ही कधी नव्हे
अवांतर: परवा आम्ही कधी नव्हे ते हायवेवरून 3 किलोमीटर चालून घरी गेलो.पण अगदी थोडा पाऊस पडला होता.आणि समस्त स्कुटर आणि बाईक फुटपाथवरून आम्हाला हॉर्न वाजवत हुसकत जात होत्या. एक पंजाबन सायकल ट्रॅक वरून चुकीच्या बाजूने स्कुटर वरून जाताना आम्ही सरकलो नाही(तिला बाजूने जायला 3 फूट रुंद जागा होती) म्हणून कडाकडा भांडली.'ये देखो ये ट्रॅक पे व्हील वाली गाडी बनी है.ये टू व्हीलर का ही रस्ता है.आप हट जावो'म्हणून.
त्यावेळी आमची चर्चा चालू होती की फुटपाथवर कडेला ट्रॅफिक पोलीसांचे होलोग्राम उभे करायचे.
फुटपाथवर कडेला ट्रॅफिक
फुटपाथवर कडेला ट्रॅफिक पोलीसांचे होलोग्राम उभे करायचे >>> बेस्ट आयडिया आहे!
पोलिसांच्या ऐवजी या पिक्चरमधल्या डिंपलचा होलोग्राम जास्त चांगला वर्क होईल.
याचा अभ्यास करून झालेला आहे.
याचा अभ्यास करून झालेला आहे. तिकडे लग्नाचे वय १८ आहे. त्यामुळे हे २० साल शक्य आहे. आता तो दिसतो थोराड यात त्याचा दोष नाही. >>
पॉईंट आहे हा धनि. त्यात त्याकाळी ते वय १६ होतं म्हणजे हे दोघे सोळाचेही असतील.
कारण ही वॉज कील्ड बाय डिंपल >>

डिंपलच्या डोळ्यांमधले दिवे ती एक गाडी आहे असे भासवेल का? >>
डिम्पल आणि मिथून चे एकूण किती
डिम्पल आणि मिथून चे एकूण किती रोल्स आहेत? मिथूनचे तीन असावेत असे वाटले. मधुमतीमधे दोन्ही जन्मांत दिलीप व वैजयंतीमालाच असतात ना? इथे मधेच मीनाक्षी कोठून आली?
<<<<<<<<<<
मीनाक्षी आली कारण हिरोला भूत कोण, मनुष्य कोण हे काही कळत नाही, अशी उदाहरणे आहेत. नव्या 'जानी दुश्मन'मध्ये तुरुंगातल्या सनी देओलला भेटायला भूत मनीषा कोइराला येते, ती इतकी चमकदार दिसत असते की कुणालाही लगेच कळेल, पण सनीला अजिबात कळत नाही ती थेट गजांतून आत येईपर्यंत. तसेच इथे झाले असते मिथुनबाबत. दोन्ही डिंपल असत्या तर मनुष्य डिंपलला सोडून बरोब्बर भूत डिंपलकडे गेला असता तो खिळा ठोकून घ्यायला.
Btw, पहिल्या पॅराग्राफमधला 'औलाद के दुश्मन'वाला पंच कहर आहे.
हे दोघे सोळाचेही असतील.>> मग
हे दोघे सोळाचेही असतील.>> मग मागे गाणे पण लावता आले असते - मै सोला बरस की तू कितने बरस का
Btw, पहिल्या पॅराग्राफमधला
Btw, पहिल्या पॅराग्राफमधला 'औलाद के दुश्मन'वाला पंच कहर आहे. >> > टोटली
तलावासारखा दिसणारा लाटाविरहित समुद्र! >>>
ते सगळे हवेलीच्या आसपासचे लोकेशनचे वर्णन सुद्धा धमाल आहे
फारच धमाल लिहिलंय. मास्क मधला
फारच धमाल लिहिलंय. मास्क मधला जिम कॅरी, आठवणींच्या निगेटिव्हज .. ह ह पु वा
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/C8tZGHbPS1r/?igsh=bmJ3bGF1d2RyMWdt
मीनाक्षी आली कारण हिरोला भूत
मीनाक्षी आली कारण हिरोला भूत कोण, मनुष्य कोण हे काही कळत नाही, अशी उदाहरणे >>>
मै सोला बरस की तू कितने बरस का >>>
धमाल अॅडीशन्स सगळ्यांच्या! धन्यवाद सर्वांना
Pages