भूतं, त्यांच्या करामती, मंतरलेले खिळे, पुनर्जन्म वगैरे मसाल्याने खचाखच भरलेला 'बीस साल बाद' हा एक प्रचंड मनोरंजक पिक्चर आहे. डायरेक्टर तेच आपले 'राजतिलक' वाले (राजकुमार कोहलीचा 'औलाद के दुष्मन' त्याच्या स्वतःबद्दलचा असेल का? नाहीतर त्याने 'जानी दुष्मन : एक अनोखी कहानी' का काढला असता? ). कोहली काकांना 'आजा आजा' अशी सुरूवात असलेली गाणी खूप आवडत असावीत. सिनेमाची टायटल्स याच शब्दांनी सुरू होतात आणि पुढे गाणं चालू होतं - 'बीऽऽस साऽल बाऽऽऽद'.
पिक्चरच्या सुरूवातीला एका हवेलीत डिंपल धावत धावत येते. म्हणते धनंजय माने इथेच राहतात का? हवेलीचे मालक आले का? इथे तिने एकदम डिझाइनर बंजारा कॉश्च्यूम घातला आहे. तर एक एजंट हवेली विकायला आलेला असतो. आता डिंपल आत्ताच हवेलीत आली आहे हे माहिती असूनही एजंट तिच्याकडे हातोडी मागतो खिळा ठोकायला. ती काय मास्क मधला जिम कॅरी आहे? पण ती हात लांबचलांब करून दूर कपाटावर ठेवलेला हातोडा आणते. एजंटला अटॅक खळ्ळ्खट्याक! तेवढ्यात हवेलीचा मालक एका नवराबायकोला हवेली दाखवायला घेऊन येतो. तर डिंपल एकदम भूतांच्या गणवेषात येते. नवराबायकोला हाकलते. ती हवेली उसके यादोंका मंदिर असते म्हणे. पण मालक असतो येडा. तो तिला म्हणतो थांब मी हवेली पाडतो. डिंपल त्याला सगळ्या खांबांवर आपटून खाली पाडते आणि ठार करते. वरिष्ठ अधिकारी पिंचू म्हणतो या हवेलीत इतकी लोकं का मरतायत? मग इन्स्पेक्टर विनोद मेहरा त्यांना सांगतो स्टोरी.
बीस साल पहले मिथून उर्फ सूरज आणि डिंपल उर्फ निशा (फॅशनेबल) बंजारे असतात. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम असतं. कशावरून? तर तसं गाणं ते म्हणत असतात - हम तुम्हे इतना प्यार करेंगे, के लोग हमें याद करेंगे . स्ट्रॅटेजिक नावं असल्यामुळे यांची ताटातूट होणं नक्की आहे. तसं ते एकमेकांना बोलून पण दाखवतात की सूरज और निशा का कभी मिलन नही होता. निशाचं लग्न सरदार च्या मुलाशी म्हणजे बादलशी ठरलेलं असल्याने त्यांच्या प्रेमावर बादल येतात. पात्रपरिचयातच स्टोरी कळते. हे असं पाहिजे. मग 'यारा दिलदारा' मधे दाखवलेल्या त्याच अकॉपा साइजच्या बागेत (तीच बाग आहे ही खरंच) सरदारचे लोक सूरजला हाणतात आणि निशाला घेऊन जातात. रात्री निशा सूरज पळून जातात आणि किलोभर बडबड करून झाल्यावर कड्यावरून सागरमें उडी मारतात. ते नेमकं विनोद मेहरा पाहतो आणि त्यांना वाचवतो. कबिल्यातल्या सरदार आणि मंडळींना मेहराने प्रचंड उपदेशामृत पाजल्यावर सरदार 'उसूल नको, भाषण आवर' अश्या विचाराने निशा सूरजचं लग्न मान्य करतो. हे ऐकताच आत्तापर्यंत बेशुद्ध पडलेले निशा सूरज टुणकन उडी मारून उठतात. मग लग्न. ते थँकफुली नाही दाखवलेलं. पण कबिल्याचा रिवाज की म्हणे हवेलीच्या ठाकूरचा आशिर्वाद घेयाला पायजेन! त्याच्या हवेलीच्या मागेच यांची बस्ती असते म्हणे. तर ठाकूर कोण? अनुपम खेर! त्याला खोटाखोटा अॅटॅक येतो. सूरज डॉक्टर आणायला जातो. त्याला काही घोडेस्वार गुंड मारून टाकतात. ठाकूर आणि निशा मधुमतीवरून इन्स्पायर्ड असल्याने ते डिट्टो तोच सीन करून दाखवतात. निशा टेरेसवरून खाली दरीत पडते आणि तिला जंगली जानवर घेऊन जातात. आता तिचं झालंय भूत. आणि ती त्या हवेलीलाच स्वतःचं घर समजून सूरजके इंतजारमें तिथे राहते. काय आयरनी आहे! पण मग ठाकूरचं काय झालं?
बहिरा जगदीप आणि तोतरी अरूणा इराणी जिथे काम करतात अश्या वेगळ्याच हवेलीत आता ठाकूर असतो. त्याची मुलगी मीनाक्षी उर्फ किरण (स्ट्रॅटेजिक नावं यू सी!) लंडनहून येते. तिने फाफा साठी टोफा ( पापा साठी तोहफा ) आणलेला असतो - सूरज (जन्मजन्मांतरीचं नाव दिसतंय हे). म्हणजे नवीन मिथून. पापाला शॉक बसतो. पण तो त्याला स्वीकारतो. सगळे एयरपोर्टवरून घरी येत असताना रस्त्यात हात पसरून निशा उभी! निशा फक्त सूरजला दिसते. जीप निशाच्या आरपार जाते. रात्री सूरजला निशाचं स्वप्न पडतं. त्यात दिसते ती ठाकूरची जुनी हवेली. तर तो सुरूवातीला आपटबार होऊन मेलेला माणूस सूरजचा भाऊ असतो आणि त्याला कोणी मारलं हे शोधायला सूरज इथे आलेला असतो. घ्या! आणि मला वाटलं लग्न केलं म्हणून ठाकूरला भेटायला आले दोघं. असो. ठाकूर म्हणतो हवेलीत जायचं नाही. निशा 'आजा आऽऽजाऽऽ' गाणं म्हणत सूरजला घेऊन हवेलीत जाते. उडता येत असूनही चालत जाणारं भूत आहे हे. बहुतेक जुन्या हवेलीतच काहीतरी खंडहर सदृश आहे. त्याच्या आठवणी जाग्या व्हायला ती तिथे एक डान्सिकल रिच्युअल करते (यात मधेच हडळीसारखं हसणं कंपल्सरी असतं). डान्सचा प्रोग्रेस बार असावा असा एक हळुहळू लाल होत जाणारा खिळा स्क्रीनवर दिसत राहतो. डान्स संपतो. रिच्युअल मधे घातलेले झुमके खिळा टोचायला जाताना निशाच्या कानात नसतात. लाल खिळा निशा सूरजच्या पायात टोचते. सूरजला आठवणींच्या ( म्हणजे सुरूवातीच्या गाण्याच्या ) निगेटिव्हज दिसायला लागतात. गाण्याचं म्युझिक मात्र त्याला नीट ऐकू येत असतं. तो बेहोश होतो.
बेहोश सूरजला काय झालं पहायला तांत्रिकबाबाला म्हणजे शक्ती कपूरला बोलावतात. त्याचा एक डोळा उगाचच पांढरा आहे. हा इतका शक्तीमान असतो की तो निशाला बाटलीत बंद करतो. त्याचं म्हणणं असं की दोन अमावास्या निशा असे खिळे टोचणार. मग त्यानंतर करवा चौथ आहे तेव्हा लास्ट अँड फायनल खिळा की सूरज निशाच्या कॅटेगरीत जाईल. सूरज काय मुहूर्त पाहून आला की काय भारतात? तर म्हणे पुढच्या अमावास्येला निशाला आपण तिच्या खिळ्याचा असर अनडू करायला सांगू आणि मग तिला मारून टाकू. म्हणजे काय? तो प्रोग्रेस बार उलटा जाणार का? का खिळा अनइन्स्टॉल होणार? असो. किरणला लगेच उलट्या व्हायला लागतात ( निशा बाटलीत जाण्याचा याच्याशी संबंध नाही. शिवाय त्यांना येऊन एक महिनाही झाला नाही अजून वगैरे गणितं करू नयेत. त्याचा काही उपयोग नाही. )
मग दुसरी अमावस ( पिक्चरच्या या कॉपीत मधले काही सीन्स कापले असावेत असा मला संशय आहे. लगेच दुसरी अमावस कशी येईल? ). ठाकूरचं रूप घेऊन निशा जगदीपला फसवते आणि बाटली उघडायला लावते. बाहेर पडून ती आधी शक्तीबाबाला मारून टाकते. आणि त्याच्या दारात आलेल्या ठाकूर आणि किरणला शक्तीच्या बायकोचं रूप घेऊन हाकलून देते - म्हणते माझा नवरा तुम्हाला काही मदत करणार नाही. ठाकूर म्हणतो की जाऊदे मी दुसरा एखादा बाबा शोधायला जातो. ठाकूर सगळी आसपासची दारं ठोठावत 'अहो, इथे एखादे भुताला पळवून लावणारे बाबा राहतात का?' असं विचारणार की काय आता?
किरण घरी येऊन मंगलसूत्र की शक्ती वगैरे डायलॉग मारते. निशा सूरजच्या शरीरात प्रवेश करते आणि ते मंगळसूत्र हिसकावून फेकते. मग पुन्हा खंडहर -डान्स - प्रोग्रेस बार - खिळा टुच. आता सूरजला आठवणींच्या पॉझिटिव्हज पण दिसायला लागतात मधूनमधून.
ठाकूर आणि किरण म्हणतात चला सगळे लंडनला पळून जाऊ. निशा त्यांची गाडी वळवून हवेलीत नेते. पण सूरज म्हणतो मी फक्त किरणचा आहे. निशाला कळतं की हे सगळं सूरजच्या गळ्यात जगदीपने घातलेल्या लॉकेटमुळे होतंय. पण फ्लाईट चुकतेच. याची शिक्षा म्हणून निशा ठाकूरच्या आरपार जाऊन त्याला महारोगी बनवते. ( सुरूवातीला जीपच्या थ्रू गेली होती तेव्हा जीपला नाही झाला महारोग! )
आता येतात अमजद बाबा. ते ठाकूरला तावीज घालून महारोग रिवाइंड करतात - म्हणजे बरं करतात. सूरज किरणलाही तावीज देतात. निशा शक्तीबाबाचं रूप घेऊन येते आणि म्हणते अमजद म्हणजेच निशा आहे. तावीज काढा. हे काढतात. ठाकूर मात्र नाही काढत. मग नाईलाजाने झाडांच्या मुळ्या-फांद्यांमधे गुरफटवून आणि फांदी भोसकून निशा ठाकूरला मारून टाकते.
किरण म्हणते आता अमजद बाबा पण नाहीत तर वैष्णोदेवीला जाऊ म्हणजे माझा सुहाग वाचेल. लगेच सूरज किरण गाडीत. करवा चौथ पण ताबडतोब येते. ताटातल्या पाण्यात नुसता सूरज दिसण्याऐवजी किरणला निशा सूरज दिसतात. निशा सूरज उडतउडत पुन्हा उसी खंडहरमें. आता मात्र निशा एकदम संथपणे चालायला लागते. कशाला घाई करायची उगाच? बीस साल लागलेत तिथे अजून काही वेळ! इकडे किरण तात्काळ वैष्णोदेवीच्या देवळात गाणं म्हणायला जाते. हे सगळं होईपर्यंत निशा काय करत असते? असो. रिच्युअल संपते. ती संथपणे खिळा सूरजकडे घेऊन जात असताना इकडे पुजारी किरणला सिंदूर देतात. लगेच निशा पॉज होते. सूरज भारणीखालून बाहेर येतो. आता सूरजवर विविध हल्ले होतात. म्हणजे कधी उकळत्या लाव्ह्यावर असलेल्या कड्यावर तो लटकतो, कधी त्याच्या अंगावर दगडी माणूस किंवा भूतं चाल करून येतात. ऑल धिस फॉर टोचिंग खिळा इन हिज पाऊल. पण दर वेळी तो वाचतो. बॅग्राऊंडला जोरात 'जय मातादी' वाजत असतं. किरण धावत (अगं बाई प्रेग्नंट आहेस ना तू? ) असते. मधेच पडते पण. पडल्यावर देवीला नमस्कार करून सिंदूर हवेत उडवते. सिंदूराचं स्पायरल होतं आणि वांव वांव करत सूरजकडे जायला लागतं. हे इतकं सोपं होतं तर देवळातच का नाही केलंस हे? इकडे दोन भुतांनी सूरजला धरून ठेवलंय. आता बाई पट्कन खिळा टोचून काम उरकेल की नाही? पण नाही! निशा एका दारातून मंदपणे पावलं टाकत खिळा घेऊन येते! तेवढ्यात स्पायरल येऊन निशाभोवती वांव वांव करायला लागतं. खिळा पडतो. भूतं गायब. निशा इन पेन. तेवढ्यात तिथे धावत किरण येते. कसं शक्य आहे? यांची लोकेशन्स जाम गंडलेली आहेत. ठाकूरची नवी हवेली जुन्या हवेलीच्या जवळ असते. कारण लोकं इकडून तिकडे सहज ये-जा करताना दिसतात. आणि जुन्या हवेलीपासून वैष्णोदेवी वॉकिंग डिस्टन्स वर आहे? मग मगाशी गाडीतून कशाला गेले होते सूरज आणि किरण? किरणला निशाकडे पाहून वाईट वाटतं. मग येतो अमजद बाबा. किरण म्हणते बाबा, निशाला या दु:खातून सोडवा. सूरज म्हणतो, बघ माझी बायको कसली ग्रेट आहे आणि तिचं प्रेमच खरं प्रेम आहे. निशा म्हणते ह्यॅट्ट! माझंच प्रेम महान. बघ मी याहून मोठा त्याग करते - मी तुझ्या सुखासाठी तुझाच त्याग करते. पण आधी म्हण मी महान आहे. निशा गायब / मुक्त होते. सूरज म्हणतो, निशाचं प्रेम महान. ठरव बाबा एकदा. अमजदच्या सांगण्यावरून सूरज निशाची हाडं शोधून अंत्यसंस्कार करतो.
अजून काही वर्षं जातात. सूरज खिळा-फोटो-हार झालेला असतो. त्याच्या मुलाचं कॉलेज फंक्शन असतं. मुलगा परत मिथूनच ( कपाळाला हात लावलेल्या इमोजीची सोय करा कोणीतरी प्लीज ). तेच सुरूवातीचं गाणं सेम तोच बंजारा शर्ट घालून स्टेज वर म्हणत असतो. सोबत वेगळीच मुलगी. तर प्रेक्षकांतून गाण्याची दुसरी ओळ म्हणत येते तरूण डिंपल. तिच्यासोबत म्हातारा विनोद मेहरा. तरूण डिंपल याची मुलगी की नात या कन्फ्युजन मधे आपण असतानाच पिक्चर संपतो.
उल्लेखनीय बाबींमधे शक्ती कपूरच्या बायकोच्या डोळ्यांत दिसणारे अॅक्चुअल बल्ब्ज, भुवया उडवत आणि हातवारे करत नाच केल्यासारखी बोलणारी मिनाक्षी, जबरदस्त उपमांनी भरलेले संवाद ( सूरजके बिना किरण कहाँ, सूरज बुझ जायेगा, सूरजके प्यार पे बादल छायेगा वगैरे ), प्रोग्रेस बार वाला खिळा, एयरपोर्ट वर आंग्लाळलेल्या किरणच्या हिंदीचं ती 'सुहागन नारी' मोडला आल्यावर शुद्ध हिंदीत कन्व्हर्जन, बंजार्यांचे ड्रेस, डिंपलचे निळे दिवे वाले डोळे अश्या गोष्टी आहेत. अॅडीशनली - निशाला सूरज परत आल्याचं कळतं तर सुरूवातीला हवेलीतून पळून गेलेला ठाकूर कुठाय हे का कळत नाही? पहिल्या सीन मधे बंजार्याचा रंगीत ड्रेस घातलेली निशा नंतर लगेच पांढर्या झुळझुळीत कपड्यात का येते? सुरूवातीला हवेलीतल्या खुनांचा तपास करणारे पोलिस विनोद मेहराची स्टोरी ऐकून झाल्यावर 'बरं बाबा, भूत असेल तिथे. आपल्याला काय करायचंय.' असं म्हणून केस बंद करतात का? असल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत.
फारच धमाल रिव्ह्यू आहे.
फारच धमाल रिव्ह्यू आहे.

उडता येत असूनही चालत जाणारं भूत आहे हे. >>> भूत असली म्हणून काय, ती डिंपल आहे वजन वाढू देणार नाही.
एकापाठोपाठ एक वाचूनही टोटल करमणूक झाली.
लाल खिळा निशा सूरजच्या पायात टोचते. सूरजला आठवणींच्या ( म्हणजे सुरूवातीच्या गाण्याच्या ) निगेटिव्हज दिसायला लागतात. >> > आठवणी टोचतात याचे मूर्त स्वरूपच की हे.
हम तुम्हे इतना प्यार करेंगे, के लोग हमें याद करेंगे >>> या गाण्या मुळे आख्खी पॉर्न इण्डस्ट्री जन्माला आली असावी.
केवळ धमाल
केवळ धमाल
खूप भारी.. आता सिनेमा पाहावाच लागणार!!
हॉररची कॉमेडी करून टाकलीत राव आता कुणाला घाबरायचं मी?
धमाल रिव्ह्यू आहे!! हा पिक्चर
धमाल रिव्ह्यू आहे!! हा पिक्चर लहानपणी केबल वर पाहिला होता.डिंपल सर्वात सुंदर आणि फिट भूत आहे त्या काळातले इतर भूतपट पाहिल्यास.
खिळा टोचायची कल्पना पण अभिनव. म्हणजे अगदी भुताचा प्लॅन गंडला तरी किमान माणूस धनुर्वाताने तरी मरेल आणि भुताला मिळेल.प्लॅन बी.
धनंजय माने.... आपटबार..
धनंजय माने....
आपटबार..
छान विनोदी लेख. अजून लिहीत
छान विनोदी लेख. अजून लिहीत चला.
<<सिंदूराचं स्पायरल होतं आणि
<<सिंदूराचं स्पायरल होतं आणि वांव वांव करत सूरजकडे जायला लागतं.<<< तुफान लेख.

इमेजिन करुन हसत बसले होते.
सिंदूराचं स्पायरल होतं आणि
सिंदूराचं स्पायरल होतं आणि वांव वांव करत सूरजकडे जायला लागतं. <<<<<
'...... जस्ट लुकिंग लाईक अ वांव!!!!'
हा मी पण पाहिलाय. खिळा ठोकून भूतलोकात नेणे नाविन्यपूर्ण होते. May be because she just wanted to कील the guy!!
धमाल लेख आहे. ह्य पिक्चर चं
धमाल लेख आहे. ह्य पिक्चर चं काय कोण जाणे फार आकर्षण होतं त्या काळात. ईंटरेस्टींग वाटायचे असे पिक्चर.
र्म्द तू नियमित लिहायला हवेस
डोळ्यातल्या निळ्या दिव्यांसकट एखादा फोटो हवा होता..
May be because she just
May be because she just wanted to कील the guy>>>
मस्त! हे वाचून पिक्चर बघावासा
मस्त! हे वाचून पिक्चर बघावासा वाटतोय.

धनंजय माने
श्रद्धा, कील
May be because she just
May be because she just wanted to कील the guy!!
>>
ढोंडू, जस्ट चील...
महान आहे
महान आहे
मस्त जमलाय हा पण रिव्यू .
मस्त जमलाय हा पण रिव्यू . असेच पिक्चर्स पाहा आणि रिव्यूज लिही. ८०-९० च्या दशकात अशा पिक्चर्स ची लाट आली होती.
चांगले सिनेमे हुडकून पहायचे
चांगले सिनेमे हुडकून पहायचे आणि निराशा झाली कि चीडचीड करायची त्यापेक्षा असे सिनेमे मस्त असतात. अजिबात अपेक्षा नसल्याने ते का बघायचे हे एकदम क्लिअर असतं.
माबोवर रिव्ह्यू लिहीला कि आणखी धमाल.
हा सिनेमा मी पाहिलेला आहे
हा सिनेमा मी पाहिलेला आहे
मीनाक्षीच्या एकदम आंग्लाळलेली ते अचानक एक्सपर्ट हिंदू (आणि हिंदी) सुहागन नारी मधे कन्वर्जन फार मनोरंजक होतं! 
हा सिनेमा मी पाहिलेला आहे
डबल!
थँक्यू सगळ्यांना!
थँक्यू सगळ्यांना!
कील the guy!! >>> और ये लगा सिक्सर! श्र, फिर चँपियन!

भूत झाल्यामुळे तिला 'लायसेन्स टू कील' पण मिळालं असेल
आठवणी टोचतात याचे मूर्त स्वरूपच >>> आचार्य
किमान माणूस धनुर्वाताने तरी मरेल आणि भुताला मिळेल.प्लॅन बी. >>>
हे भारी आहे!
(No subject)
हे घ्या डोळ्यातले निळे दिवे -
हे घ्या डोळ्यातले निळे दिवे -
(No subject)
भुत आया.

टोटल प्रतिसाद १५
न वाचलेले प्रतिसाद १६
मुलगा परत मिथूनच ( कपाळाला
मुलगा परत मिथूनच ( कपाळाला हात लावलेल्या इमोजीची सोय करा कोणीतरी प्लीज >> अग नसेल परवडले कोहली ला अजून कोणाला घ्यायला
May be because she just wanted to कील the guy!! >>
हाहा, मस्त लिहील आहे. आता हा
हाहा, मस्त लिहील आहे. आता हा मुव्ही बघावा लागेल....
निळे डोळे << हे कोणते फिल्टर?
धमाल लिहीले आहे डिम्पल आणि
धमाल लिहीले आहे
डिम्पल आणि मिथून चे एकूण किती रोल्स आहेत? मिथूनचे तीन असावेत असे वाटले. मधुमतीमधे दोन्ही जन्मांत दिलीप व वैजयंतीमालाच असतात ना? इथे मधेच मीनाक्षी कोठून आली? की आलटून पालटून पिके घेतात तसे काही आहे?
पात्रपरिचयातच स्टोरी कळते >>>
याला स्वतंत्र लोल. सूरज, निशा, बादल. मिथूनने तोपर्यंत बहुधा "घटा मे छुपके, सितारे फना नही होते" ऐकलेले नसावे. नाहीतर बादलची फिकीर करायचे त्याला कारण नव्हते.
त्या नव्या जुन्या हवेलीच्या लोकेशनमधे तेथेच जवळपास समुद्रही अॅड कर
बाय द वे, लेट ८०ज मधलं गाणं वीस वर्षांनंतर कॉलेजमधे स्टेजवर म्हणतील हा कॉन्फिडन्स महान आहे
म्हातारा विनोद मेहरा कॉलेज मधे काय करत असतो?
ती काय मास्क मधला जिम कॅरी आहे? >>>
फाफा साठी टोफा >>>
सुरूवातीला हवेलीतल्या खुनांचा तपास करणारे पोलिस विनोद मेहराची स्टोरी ऐकून झाल्यावर 'बरं बाबा, भूत असेल तिथे. आपल्याला काय करायचंय.' असं म्हणून केस बंद करतात का? >>>
May be because she just wanted to कील the guy!! >>>
एकूणच १९८८-८९ हा सुवर्णकाळ होता असल्या पिक्चर्सचा.
तेथेच जवळपास समुद्रही अॅड कर
तेथेच जवळपास समुद्रही अॅड कर >>> हो हो, तो तलावासारखा दिसणारा लाटाविरहित समुद्र!
आलटून पालटून पिके >>
नाही रे, मधुमतीचा संबंध फक्त ठाकूर आणि निशाच्या त्या सीन पुरताच आहे. मग सिनेमा भलतीकडे जातो.
लेट ८०ज मधलं गाणं वीस वर्षांनंतर कॉलेजमधे स्टेजवर >>> ६०ज मधलं खरंतर. अजून २० वर्षं आधी गाऊन राहिलेत ते
“ आलटून पालटून पिके घेतात तसे
“ आलटून पालटून पिके घेतात तसे काही आहे?” -
धमाल रिव्ह्यू
आलटून पालटून पिके >> हे
आलटून पालटून पिके >> हे महान आहे
मधुमतीमधे वैजयंतीमालाचा ट्रिपल रोल आहे आणि भूत हाही स्वतंत्र रोल धरला तर चार आहेत!
धमाल!
धमाल!
धनंजय माने इथेच राहतात का >>
स्ट्रॅटेजिक नावे >>
शक्ती कपूरच्या बायकोच्या डोळ्यांत दिसणारे अॅक्चुअल बल्ब्ज >>
हे खास आवडलेले पंचेस. शक्ती कपूरची बायको - जयश्री टीच्या डोळ्यातले बल्ब बघून मी फुटलोच!
आता पुढचा रिव्ह्यू कोणता?
May be because she just wanted to कील the guy!! >> श्रद्धा


आलटून पालटून पिके >>
तलावासारखा दिसणारा लाटाविरहित समुद्र! >>
ते डिंपलचं डान्सिकल रिचुअल अवर्णनीय प्रकरण आहे. तुनळीवरच्या आवृत्तीत काटलंय तरी डेलीमोशन व्हर्जनचा इच्छुकांनी लाभ घ्यावा - https://www.dailymotion.com/video/xhxxnq?start=40
शक्ती कपूरच्या तोंडी "किरण के मांग के सूरज को निशा के अंधेरों में डूबने नही दूंगा" डायलॉग ऐकायला मिळण्याची टडोपा मोमेंटही चित्रपटात आहे.
पण सर्वात मोठे कन्फ्युजन हे की मीनाक्षी-मिथुन जर रीतसर लंडनला लग्न करून आले आहेत तर याचा अर्थ मिथुन कमीत कमी एकवीस वर्षांचा आहे आणि तोंडवळ्याने तो तिशीतला दिसतो. म्हणजे वीस वर्षांपूर्वी डिंपल आणि बंजारा मिथुन मेले तेव्हा तो ऑलरेडी दहा वर्षांचा तरी असावा. मग तो बंजारा मिथुनचा पुनर्जन्म कसा असू शकतो?
मस्त लिहिलयं..!
मस्त लिहिलयं..!
हा चित्रपट लहानपणी पाहिलेला आठवतो थोडासा... एक प्रसंग डोळ्यासमोर येतो त्यातला..
मिथून रात्री वेगाने गाडी चालवत असतो.. रस्त्याच्या मधोमध डिंपलचं भूत उभं असते. ..तो ओरडतो .. रस्त्यातून बाजूला हो... ( त्याला ती भूत आहे ते माहित नसतं..) भूत हटवादी असते.. ते रस्त्यातच उभं राहते. बिचारा मिथून घाबरून डोळ्यांवर हात घेतो.. त्याला वाटते गाडी डिंपलला उडवणार.. गाडी पुढे येते.. तो मागे वळून पाहतो तर भूत रस्त्यातच उभं असते.. गाडी भूताला पार करून पुढे येते..
तेव्हा हा चित्रपट आवडला होता..
रीतसर लंडनला लग्न करून आले
रीतसर लंडनला लग्न करून आले आहेत >> याचा अभ्यास करून झालेला आहे. तिकडे लग्नाचे वय १८ आहे. त्यामुळे हे २० साल शक्य आहे.
आता तो दिसतो थोराड यात त्याचा दोष नाही
(इथे जर गाडी आताची अडास
(इथे जर गाडी आताची अडास टेक्नॉलॉजी वाली असती तर भुताची इमेज स्कॅन जरून इमर्जन्सी ब्रेक लागले असते की नसते?)
Pages