पुन्हा एकदा हिमालय - देवरियाताल चंद्रशीला - सुरुवात (१)

Submitted by साक्षी on 10 June, 2024 - 00:49

असं म्हणतात की एकदा हिमालय बघितला की त्याची ओढ लागते. मी पिंढारी ट्रेक केला, त्यानंतर दर वर्षी एक ट्रेक करु असं मी आणि नवर्‍याने ठरवलं खरं पण व्यायामादरम्यान पुन्हा एकदा पाय ट्विस्ट झाला आणि आधीची दुखावलेली लिगामेंट आणखी दुखावली. मग थोडे दिवसांत निर्णय घेऊन मे २०२३ मधे सर्जरी केली. ४-५ महिन्यांत पूर्ण रिकवर झाले. पुढच्या ३-४ महिन्यांत विचार करुन 'देवरियाताल चंद्रशीला' हा निसर्गरम्म, मॉडरेट लेवलचा ट्रेक ठरला. खरं तर चंद्रशीला हा हिमालयन ट्रेक्स मधला इतका कॉमन ट्रेक आहे, की मी त्यावर लिहिलेलं एकही वाक्य नविन नसेल. पण तरिही everyone has their unique path and experiences that shape their journey. म्हणून मीही लिहायचं ठरवलं.
लिखाण माझं असलं तरी अगदी एखादाच फोटो मी किंवा नवर्‍याने काढलेला आहे. बरेचसे फोटो मित्र परेश जोशीने टिपलेले आहेत.

२४ मे ला पुण्यातून निघून दिल्ली डेहेराडून करून २५ ला दुपारी ऋशिकेषला पोचलो. पुण्याचा कोरडा उन्हाळा बरा की ऋशिकेषचा दमट हे ज्याचं त्यानेच अनुभवावं. या गावाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. आम्ही लक्ष्मण झुला रस्त्यावर एका हॉटेल/ हॉस्टेलवर मुक्कामाला होतो. तिथुनच पुढे राम झुला, जानकी झुला असल्याने एकंदरच गावात सगळीकडे गर्दी दिसली. संध्याकाळी जरा गावात फिरलो आणि गंगा आरतीचा अनुभव घेतला. गर्दी बघून मांडवात आत न जाता बाहेरच थांबलो. हा आमचा निर्णय योग्य होता, हे आरती चालु होताक्षणी लक्षात आले. आधी सगळे बसलेले सगळे प्रत्यक्ष आरतीला उभे रहातात. त्यानंतर पुढचं काही दिसत नाही. तरी आधी घेतलेला एक त्यातल्या त्यात चांगला फोटो बघा

GangaAarati.jpg

दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजता इंडिया हाइक्स च्या गाड्या येणार होत्या. दोन मुली सोडून सगळे बर्‍यापैकी वेळेत पोचले. या दोन मुली इतक्या सकाळीही राम झुला रस्त्यावर ट्रॅफिक मधे अडकल्या होत्या. आम्हाला बेस कँपला पोचायला ६-७ तास लागणार होते. शेवटी त्यांच्यासाठी एका गाडीत जागा ठेऊन दुसर्‍या दोन गाड्यांत आम्ही पुढे निघालो. अक्षरशः घाम गाळत आमचा प्रवास चालु झाला. भर उन्हात एक टायर पंक्चरही झाले. हे सगळं व्हावंच लागतं! शास्त्र असतं ते! जाताना अलकनंदा आणि भागिरथी यांचा संगम बघितला. दोन वेगवेगळे प्रवाह अगदी सहज काळून येतात. वरून येणारी अलकनंदा आणि डावाकडून येतेय ती भागिरथी! दोघी पुढे एकत्र होऊन गंगा म्हाणून वहातात.
AlaknandaBhagirathi.jpeg

तर मजल दरमजल करत साडे चार वाजता आमचा बेस कँप 'सारी' ला पोचलो. छोटंसं पण छान गाव आहे हे! याला beautiful village चं award मिळालं आहे. इथे गारवा नसला तरी ऋशिकेष इतका उकाडा तरी नव्हता, त्यामुळे किंचीत बरं वाटलं

saari.jpeg

आल्यानंतर थोड्या वेळात ग्रुप लिडर, लोकल गाइडशी ओळख झाली. आमची ओळख परेड झाली. आमच्यांत आयटी वाल्यांची मेजॉरिटी, एक UPSC झालेला, एक विदेशी डॉक्टर, नुकतेच बारावी झालेले दोघे-तिघे, सीए गुज्जु आणि त्याचा लहान भाऊ, मुंबईचे एक मध्यमवयीन जोडपे, दोन psychiatrist होऊ घातलेल्या मैत्रिणी असे वैविध्य होते. आम्ही २० जण, एक ट्रेक लिडर आणि २ लोकल गाइड असे २३ जण आम्ही पुढचे ४-५ दिवस एकत्र असणार होतो. पूर्ण ट्रेकचा मॅप, लक्षात ठेवायच्या गोष्टी, dos and don'ts असं सगळं सांगण्यात आलं. सहा वाजता ब्लॅक टी, सात वाजता ब्रेकफास्ट आणि आठ वाजता प्रारंभ असं रुटीन ३ दिवस असणार होतं. चोथ्या समिटच्या दिवशीचं रुटीन तिसर्‍या दिवशीच सांगणार होते.

घेऊन जायचे सामान एकत्र करणे, रेंट वर घ्यायच्या गोष्टी घेणे वगैरे बारिक सारिक कामे करुन आज लवकरच झोपायला गेलो. नाही म्हंटले तरी प्रवासाचा शीण होताच, त्यामुळे लगेच झोप लागली. मी साडेपाचचा गजर लावला होता पण सव्वा पाचला दुसर्‍या कुणाच्या तरी गजराने जाग आली आणि Whistling Thrush चा कॉल अगदी जवळून ऐकू आला. बघायला टेंट मधून बाहेर आले तर हा समोरच गात होता. त्याचा चांगला फोटो नाही माझ्याकडे.

प्रचंड थंडी असणार ह्या गृहितकाला सुरुंग लागल्याने व्यवस्थित दात वगैरे घासता आले. इडलीचा नाष्ता करून ठरल्याप्रमाणे आठ वाजता आम्ही ट्रेकला प्रारंभ केला.

भाग २

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त सुरवात ! फोटो सुंदरच ! पुढचे भाग मोठे लिहा आणखी .. अर्थात हा पहिल्या दिवशीचा आहे त्यात फार काहीच घडत नाही मुक्कामावर पोचण्याव्यतिरिक्त..

जबरदस्त ट्र्रेक Happy

आम्ही नुसते वर्णन आणि फोटोवर समाधानी मंडळी सध्या Lol