गुलाबी

Submitted by पॅडी on 11 June, 2024 - 02:48

गुलाबी*

सुर निखळले नाद गुलाबी
नकोस घालू साद गुलाबी...

शपथा वचने गुंतत जाणे
कुरतडतो उन्माद गुलाबी...

घाव रेशमी जपले; फसलो
छळती जखमा…वाद गुलाबी...

फुलोर गळला उन्मळलो मी-
कसला मग संवाद गुलाबी...

क्षतविक्षत मी भिंगुळवाणा
पांघरतो तुझी याद गुलाबी...

द्वाड आठवाची वसंत बाधा
मानगुटीवर ब्याद गुलाबी...

मैफलीत बहु रडलो आणिक-
पडल्या टाळ्या दाद गुलाबी..!
***

(* गझल सदृश्य कविता)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कसली सुंदर...
द्वाड आठवाची वसंत बाधा
मानगुटीवर ब्याद गुलाबी...

विशेष सुंदर....

द सा, कुमार सर - प्रतिसादासाठी मन:पूर्वक आभार आपले.

खूप सुंदर कविता. सर्वच शेर आवडले.

'द्वाड आठवाची वसंत बाधा' >> यात एक मात्रा जास्त वाटली. पण वाक्य छान आहे. वसंतबाधा एक शब्द हवा. (हा शब्द विशेष आवडला. नवीन आहे.)

याच चालीत खालील शेर सुचले. कृपया मजेत घेणे.

आळवला मी राग अचानक
लावित उंच निषाद गुलाबी

भेंडीचा जरि कंद शिजवला
तरी येतसे स्वाद गुलाबी

तालमीत जो नियमित गेला
तो झाला वस्ताद गुलाबी

भट्टी-सम तापून निघाला
उरला परि पोलाद गुलाबी

ह पा - खूप खूप आभार प्रतिसादासाठी!
माझ्या रचनेला मी " गझल सदृश्य " म्हटले होते कारण गझल मला लिहिता येत नाही किंवा गजलेची बाराखडी जमत नाही म्हटलात तरी चालेल..!

बाकी आपली addition क्या बात है!!! एकदम झकास.. Happy