जनादेश

Submitted by संप्रति१ on 6 June, 2024 - 02:00

कॉंग्रेसच्या बाजूनं कुणी व्होकल होत नव्हतं. कॉंग्रेसच्या काळात हगल्या पादल्याला चुरूचुरू बोलणारे आणि आता नंतर बिळात लपून बसलेले हे आमचे सेलिब्रिटी, कलावंत, क्रिकेटर्स..! अजून फार काय बिघडलं नाही, म्हणत वाळूत तोंड खुपसून बसलेले हे आमचे विचारवंत, लेखक..! भरपूर आणि प्रचंड स्वरूपाचे पराभव बघितले या काळात. खिल्ली उडवायचे लोक. ऐकून घेतलं. पण आता तशी काही गरज राहिली नाही, असं वाटतं. या जनादेशानं एक राक्षसी पकड ढिली केली आहे. विरोधी आवाजाला एक मुक्तिदायी अवकाश मोकळा करून दिला आहे. कॉंग्रेसमुक्त भारताच्या आरोळ्या ठोकणाऱ्यांना द्यायचं ते उत्तर दिलं आहे.

२०१९ ला स्मृती इराणींना अमेठीच्या लोकांनी निवडून दिलं. तिथून पुढची पाच वर्षे त्यांनी राहुल गांधींना शिव्या देण्यात घालवली. गांधींना शिव्या दिल्या की गोदी मिडियावर फुटेज मिळत होतं. अमेठीच्या लोकांनी यावेळी ते फुटेज काढून घेतलं. गोदी ॲंकर्स अमेठीच्या सीटवरून धिंगाणा घालत होते की राहुल इराणींना घाबरून रायबरेलीला गेले. गांधींच्या एका कार्यकर्त्यानं स्मृती इराणींना दीड लाखांच्या लीडनं पाडलं. गांधी रायबरेली आणि वायनाडमधून चार लाखांच्या लीडनं जिंकले. वाराणसीत एका ईश्वरी अवताराचं लीड साडेचार लाखावरून दीड लाखांवर आलेलं दिसतंय. पुढच्या टर्मला उभे राहणार असतील तर वाराणसीत उभं राहू नये. सीट धोक्यात आहे. उगाच म्हातारपणात पराभवाची नामुष्की चांगली नाही.

आख्ख्या जानेवारी महिनाभर ज्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून देशात एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्या अयोध्येच्या सीटवर भाजपचा उमेदवार हरलाय, ही झणझणीत अंजन घालणारी वस्तुस्थिती आहे.

दहा बारा वर्षे सलग राहुल गांधींचं भयानक ट्रोलिंग केलं गेलं. टारगेट केलं. सगळ्या मर्यादा सोडून बदनामी केली गेली. गोदी मिडियानं सुपारी घेतल्यासारखी मोहिम राबवली त्यांच्याविरूद्ध. चौकशा लावल्या. कोर्ट केसेस लावल्या. खासदारकी रद्द केली. घर काढून घेतलं. दुसरा कुणी असता तर खचून संपून गेला असता आजवर.
आता तेच राहुल गांधी स्वतःचे १०० खासदार घेऊन लोकसभेत येत आहेत. त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. लोकांनी त्यांना मतं दिली आहेत. स्वतःच्या मेहनतीतून लोकांचा विश्वास कमावला आहे. आता दाबून दाखवा त्यांचा आवाज. आता निलंबित करून दाखवा दीडशे दीडशे खासदार. आता पास करून दाखवा संसदेत मनमर्जी बिलं. ऑलिंपिकपटूंना फरपटून दाखवा दिल्लीच्या रस्त्यांवर. आता खिळे ठोकून दाखवा शेतकऱ्यांना रोखायला. धाडी घालून दाखवा पत्रकारांवर. लावा त्यांच्यामागं ससेमिरा. सडवा बिनाकारणाचं पाच पाच वर्षं जेलात.
फुल मेजॉरिटी कशासाठी दिली होती तुम्हाला? कामासाठी दिली होती की फालतू वातावरण खराब करण्यासाठी?
ह्याला धर टाक तुरूंगात. त्याला उचल घाल तुरूंगात. साला काय चाललंय काय हे ?
आणि काय हे सारखंसारखं खलिस्तानी राष्ट्रद्रोही देशद्रोही पाकिस्तानी? काय मोगलाई आहे ही? ही उन्मादी टोळकी रस्त्यारस्त्यांवर होहल्ला करत लोकांना घाबरवत फिरायला लागली, ती कुणाची देण आहे.?
सुधरायला पाहिजे वेळीच. तुम्ही बेबंद उधळायला लागलेले दिसला म्हणून लोकांनी हा कासरा खेचलेला आहे. हे असेच गुण उधळत राहिला तर तथाकथित लोकप्रिय कारकीर्द फार वाईट पद्धतीने संपेल. पदावरनं उतरला की कुणी विचारणार नाही की जवळपास फिरकणार नाही.

कॉंग्रेसची अकाउंट्स इलेक्शनच्या तोंडावर सील केली. पैसा नाही. साधनं नाहीत. पैसेवाले कॉंग्रेसचे नेते स्वतःचं झाकायला भाजपकडं पळालेले. सगळ्या प्रचारयंत्रणा मिडियातंत्र पूर्ण सरकारच्या पायावर लोटांगण घालून बसलेला. लोकांपर्यंत स्वतःचं म्हणणं पोचवायचं म्हटलं तर कसं पोचवायचं? फारच दारूण परिस्थितीत ही निवडणूक लढली. दहा वर्षं या भाजपवाल्यांचे फ्लेक्स आणि चकाचक इव्हेंटबाजी बघतोय चौकाचौकात. दीड दीड लाखांचे फ्लेक्स. हगल्या मुतल्या गोष्टींसाठी फ्लेक्स लावतेत. कुठून येतोय हा पैसा?
कॉंग्रेसकडं ऐतिहासिक दुष्काळ. डांबाला पंजाएवढे बारकुले पोस्टर्स चिकटवतेत. सगळे झरे आटलेले. दहशतीखाली असलेले उद्योगपती कॉंग्रेसच्या खजिनदारांना भेटायलासुद्धा तयार नाहीत. नोटीसा यायची भीती.
महाशक्तीच्या प्रचंड ताकदीपुढं कॉंग्रेसवाले एकदमच रोडावलेले. कार्यालयं धूळ खात पडलेली. अकाउंट सील केले तेव्हा लोकांकडून फंडींग मागायला सुरुवात केली. म्हटलं आता अवघड आहे. हे कसे लढणार एवढी अवाढव्य निवडणूक?
ईडी सीबीआय इन्कम टॅक्स वगैरेंचा हैदोस अनिर्बंध चाललेला.
एक नोटीस आली की नेते ढुंगणाला पाय लावून भाजपच्या बाजूला पळतात. काय कमी केलं कॉंग्रेसनं अशोक चव्हाणांचं?
काय कमी केलं विखेंचं? मिलिंद देवरांचं? गेले उठून सगळे तिकडं.
चव्हाणांच्या देवरांच्या पक्षांतरावरून गोदी मिडियानं देशभर हुडदूस घातला. पक्षाचं मनोधैर्य खच्ची केलं.
एवढं करूनही नांदेडची सीट कॉंग्रेसनं आणली. आणि मुंबईत वर्षा गायकवाडांनी उज्ज्वल निकमना पाडलं. या निकमना कॉंग्रेसनंच मोठा केलेला. बसा आता निवांत. टीव्हीवर कोर्ट केसेसचे अर्थ वगैरे लावत.

शरद पवार तर किती वेळा पुन्हा पुन्हा पक्ष उभा करतात कळत नाही. माझ्याच डोळ्यादेखत मी तीन वेळा हे घडलेलं बघितलंय.
आताही पक्ष नेला, चिन्ह नेलं, आमदार नेले. पण हे काय झुकत नाहीत. वस्ताद आहेत. मास लीडर आहेत. आपल्या मागं लोक आहेत हे त्यांना माहीत आहे. ते काय असेच आभाळातनं टपकलेले, फ्लेक्स लावून बनलेले नेते नाहीत. ते इथले आहेत. स्वकर्तृत्वानं मोठे झाले आहेत. कायम लोकांमध्ये वावरलेले आहेत. पत्रकारांना धमक्या देऊन मोठे झालेले नाहीत ते.
पन्नास वर्षं झाली लोक त्यांचं राजकारण बघत आले आहेत. आणि आता कुणीतरी उठून गुजरातवरून येतात आणि त्यांना भटकती आत्मा म्हणतात. उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणतात.
असं कसं चालेल? आणि तुमचा संबंध काय? पवार ठाकरेंचं काय आहे-काय नाही ते आमचं आम्ही बघून घेऊ. बाहेरनं येऊन कुणी सांगायचं कारण नाही. आणि पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं विचारता अमित शहा. तुमचं तर नाव पण माहित नव्हतं कुणाला २०१४ च्या आधी.
आणि आता इथलं सगळं उचलून गुजरातमध्ये नेऊन ओतायला लागलाय, हे काय कळत नाही की काय लोकांना.

दोन महिन्यांपूर्वी बारामती सोडली तर इतर ठिकाणी कुणी उमेदवार पण मिळत नव्हते पवारांना.
पण थोड्याच दिवसांत त्यांनी दहाच्या दहा जागा रेसमध्ये आणल्या. आठ निवडून आणल्या.
लोकं बघत होते. या वयात त्यांच्यावर ही वेळ कुणी आणलीय, हे दिसत होतं. हाताला धरून माईकपर्यंत न्यायचे त्यांना. बारामतीतल्या सांगता सभेच्या आधी दिवसभर कुठं कुठं सभा घेऊन आलेले तर घसा सुजून बोलता येत नव्हतं. पाच मिनिटं बोलले.‌ आवाजपण फुटत नव्हता. लढले. फिरले सगळीकडे. जी काय नियोजनं करायची ती केली. दिले लोकांनी आठ खासदार..!
विखेंना पाडून एक फार जुना हिशेबपण सेटल केला.
बारामतीची सीटपण मिडियानं हायपर करून ठेवलेली. लीड बघितलं तर निवांत निघालेली दिसतेय ती सीट.
एवढं आयोगानं चिन्ह काढून दुसऱ्याला दिलं काय घंटा फरक पडला नाही. माढ्यात तर राष्ट्रवादी कुणी म्हणतच नव्हतं. लोक तुतारी तुतारी च म्हणत होते. माढ्यात अभिजित पाटील तुतारीचा प्रचार करत होते तर त्यांच्या कारखान्यावर कारवाई केली. ते उठले आणि फडणवीसांबरोबर पुष्पगुच्छ देऊन फोटो काढून आले. ऐन इलेक्शनमध्ये, आचारसंहितेच्या काळात हे घडलं. हे डेअरिंग कुठून येतं अधिकाऱ्यांमध्ये ?

आणि एक नोटीस आली, जरा लॉलीपॉप दाखवला की पळतात कसे काय हे नेते? अरे जरा पाय रोवून उभं तरी रहा. थोडा भरोसा ठेवा स्वतःवर, पक्षावर, विचारसरणीवर. थोडी झळ सोसायची तयारी ठेवा. राजकारणात आल्यावर कधी ना कधी संघर्षाची वेळ येणारच. तयारी ठेवली पाहिजे. आयुष्यभर सत्ताच कशी मिळेल? आणि कशाला जायचंय सतत वळचणीला? लोकशाही आहे. कधीकधी विरोधात बसावंच लागणार. की विरोधकांची काय गरजच नसते लोकशाहीत?
लोक शहाणे असतात‌‌. ते देतात मतं. पण तुम्ही उभं तरी रहा एका जागेवर..! किती वेळ पळणार? तुम्ही भुई धरून घट्ट उभाच नाही राहिला तर कुणाच्या जीवावर लढायचं ?
तिकडं सोलापूरात सुशीलकुमार सलग दोनदा पडले. ते नाहीत पळाले कॉंग्रेस सोडून. दिलं यंदा लोकांनी प्रणिती शिंदेंना निवडून.

दलाल मिडियानं दीड महिने ईश्वरी अवताराच्या सभा लाईव्ह दाखवल्या. मुलाखतींच्या नावाखाली या अवताराच्या आरत्या ओवाळणं दिवसरात्र चाललेलंच.
राहुल प्रियंकाच्या सभांना फूटेज नाही. तशी अपेक्षाही करण्यात अर्थ नव्हता. प्रियंका गांधींच्या उदगीर आणि नंदुरबारमधल्या सभा अति उत्कृष्ट कॅटॅगरीतल्या होत्या. आस्ते आस्ते रंगत जाणाऱ्या मैफिलींसारख्या सभा. टिकेची तिखट धार, पण भाषा एकदम सुसंस्कृत ऋजू, अधूनमधून नर्मविनोदाची पखरण आणि श्रोत्यांना विशेषतः महिलांना थेट भिडणारं संवादी आवाहन. कसलीही धमकावणी नाही, जुमलेबाजी नाही, उन्माद नाही, अहंकार नाही, शिवीगाळ नाही. मॅनिफेस्टोला घट्ट धरून सगळी मांडणी. रणरणत्या उन्हात लोक शांतपणे ऐकत बसलेले. त्या दोन्ही सीट्स लोकांनी कॉंग्रेसच्या पारड्यात टाकल्या.
राहुल गांधींनी अमरावतीची सभा अक्षरशः गाजवली. त्यांचा तो आवेश आणि लोकांचा रिस्पॉन्स बघूनच विदर्भात वारं फिरल्याचा अंदाज आलेला.
याउलट ईश्वरी अवताराच्या सभा चुकून कानावर पडली तरी भाषा बघूनच काटा येतो अंगावर. माझ्या देशाचा पंतप्रधान अशा खालच्या स्तराची भाषा वापरतो, तेव्हा लाज वाटते. शिक्षण खरंच कमीय की काय अशी शंका येते. आणि खोटं किती बोलता.! तुम्ही तुमच्या कामाच्या आधारावर बोला ना. त्यावर मतं मागा. तुमचा स्वतःचा जाहिरनामा ठेवला बाजूला आणि कॉंग्रेसच्या जाहिरनाम्यात जे नाही ते घुसडायला लागलाय.
आणि हे भैंस, मुजरा, मंगळसूत्र, ज्यादा बच्चे पैदा करनेवाले, घुसपेठी, टेंपो, कितना माल उठाया, शहजादे, भटकती आत्मा हे कुठं अंदाधुंद भरकटत चाललाय सायेब? ऊन वगैरे बाधलं की काय?

बाकी, एकनाथ शिंदेना फोडलं. ठीक. अजित पवारांना काहीही गरज नसताना फोडलं. मास्टरस्ट्रोक मास्टरस्ट्रोक म्हणून नाचला, ठीक. मी दोन पक्ष फोडून परत आलो म्हणताय, तेही पचवलं. पण नंतर राज ठाकरे, देवरा, अशोक चव्हाणांना पण उरावर घ्यायची गरज पडली, तेव्हाच कुणकुण लागली की या ह्यांची जमीन सरकतेय की काय?

आयोगानं सपशेल नांगी टाकलेली. महाराष्ट्रात पाच फेऱ्यांपर्यंत निवडणूक लांबवली. ईश्वरी अवताराला वीस वीस सभा रोड शो घेता याव्यात म्हणून ही सोय. तरीही इथं भाजपच्या सीट्स दोन आकड्यापर्यंत गेल्या नाहीत. तिकडे मुनगंटीवार राहुल-प्रियंकाबद्दल अतिशय हिणकस पातळीचं बोलले. ते चंद्रपूरात तीन लाख मतांनी पडलेले बघून मनापासून आनंद झाला.

एक्झिट पोल डिप्रेसिंग होते. त्या पोल्सवरून गोदी मिडियानं दोन दिवस धिंगाणा घातला. इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदारांमध्ये निराशा पसरवली. एक्झिट पोलच्या नावाखाली हा फ्रॉड करण्याचा अधिकार कुणी दिला या भामट्यांना?
उचल घेऊन एक्झिट पोल केले होते काय? हा शब्द वापरणं योग्य नाही, पण याला सरळसरळ भडवेगिरी म्हणतात. हे नटूनथटून टाय कोट घालून बसणारे, दिवसरात्र सापांसारखे फुत्कारणारे ॲंकर्स आणि पापाच्या पऱ्या, देशाच्या मुळावर उठलेले लोक हे.

एक्झिट पोलचे आकडे एवढे गंडल्यामुळे निकालादिवशी अंधभक्त मानवांना सुतक पडलं. अन्न गोड लागेना झालंय दोन दिवसांपासून. हा निकाल त्यांनी आता कसा पचवायचा? कसं सांत्वन करायचं स्वतःचं ? वाईट वाटतंय. दुःखाला पारावर उरला नाही. लोक 'चारसौ पार' चं काय झालं विचारून खिजवतात. लोक विचारतात की आंध्रात मुस्लिम आरक्षण देणाऱ्या चंद्राबाबूंना मोदी कसे काय सोबत घेतायत? मोदी सरकारचं अचानक एनडीए सरकार कसं काय झालं? लोक विचारतात. आघाडी सरकार चालवण्याचं दुर्दैव मोदींवर असं कसं हो कोसळलं, विचारतात.
आणि नितीशकुमार भविष्यात पलटणारच नाहीत, ही मोदी गॅरंटी आहे किंवा कसे? आणि मुजऱ्याची भाषा करणाऱ्यांना आता नीतीश नायडूंपुढे मुजरा तर नाही ना करावा लागणार ?
आता धाडकन नोटबंदीसारखे बिनडोक मास्टरस्ट्रोक मारण्याआधी नीतीश नायडूंना विचारावं लागेल का?
देशाचे सगळे रिसोर्सेस यापुढे फक्त दोनच उद्योगपतींच्या नावानं आंदण देता येणार का?
आणि सायबांना कॅबिनेटमध्ये कुणाचं काही ऐकून घ्यायची सवय आहे का? प्रश्नांना उत्तरं द्यायची सवय राहिली आहे का त्यांना ? एखादी खुली प्रेस कॉन्फरन्स घेणारायत का यापुढे तरी? की नेहमीसारखी एकतर्फी भाषणं ठोकून पसार?
आणि मुळात पाच वर्षं साहेबच असणारायत का ? की गडकरी किंवा शिवराज येणारेत.

तर माणसाला भीती असली पाहिजे. असा अंकुश चांगला असतो. आग के लिये पानी डर बना रहना चाहिए. नायतर मग माणसं नागडी नाचायला लागतात.

बाकी, तोरसेकर म्हणून एक माजी पत्रकार आहेत. सध्या यूट्यूबर म्हणून कार्यरत असतात. चाललेलं असतं त्यांचं त्यांचं मस्त. इलेक्शनच्या तोंडावर पुस्तकं बिस्तकं छापून टाकलेलीयत. 'पुन्हा मोदीच का?' 'अश्वमेध २०२४' वगैरे.
ती पुस्तकं, त्यातले गगनभेदी दावे यांचं आता काय करायचं?
हसायचं की रडायचं? ज्यांनी ती पुस्तकं विकत घेतली त्यांना आता रिफंड मिळणार का, असंही विचारतात लोक.

अभेद्य कुणीच नसतंय‌. इथं काय अमरपट्टा घेऊन आलेलं नाही कुणी. अधूनमधून दणक्यांची सवय असली पाहिजे माणसाला. जमिनीवर राहतो माणूस.

दहा वर्षं कॉंग्रेसवाल्यांनी पराभवच सोसलेत. आता थोडं तुम्हीही सोसा. सोसण्यामुळं डेप्थ येते. मन विशाल होतं. सहिष्णुता येते. विरोधी मताचा आदर करण्याची वृत्ती येते. सर्वसमावेशकता हा या देशाचा गाभा आहे. तो काही आज नाही. हजारो वर्षांपासून तो तसा असत आला आहे. या गाभ्याशी छेडछाड करणं लोकांना आवडत नाही, हा ही या निकालाचा मेसेज आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परिक्षण आहे.

NDA कडे एक्स्ट्रॉ 2ab होता ( ED, CBI, IT आणि मोक्याच्या वेळी EC वर आपली माणसे, जोडीला धाकाने सुरत सारखी जागा खिशात ) तरी विरोधकांनी लढा चांगलाच दिला आहे.

सुरतच्या लोकांचा मतदानाचा हक्क हिरावला गेला आहे. आयोग झोपा काढत आहे किंवा घाबरत आहे. चौकशी करता येत नाही असे का झाले?
मोकळ्या, मुक्त वातावरणांत निवडणूका झाल्या असत्या , निवडणूक आयोग निष्पक्ष असते तर ७०-१०० जागांचा फरक पडला असता.

बहुत खूब पोस्ट. केक खानेके लिये हम कहीभी जा सकते है. असे एक फेमस वाक्य आहे. हे लोक त्याचीच आवृत्ती आहेत.

छान लिहिले आहे. नेहमी राजकारणावर न लिहिणार्‍या कोणी लिहिलंय, त्यामुळे तरी लोक कदाचित खुल्या मनाने वाचतील.

मोदी पंतप्रधान झाल्यावर आल्यावर देशातला पहिला मॉब लिंचिंगचा बळी पुण्यात पडला. मोहसीन शेख. ती केस लढवायला बिर्याणी फेम निकमांनी नकार दिला .

लेखकासारखे निष्ठावान कार्यकर्ते-पाठिराखे आहेत म्हणुनच रागांना दणदणित पराभवालाही नैतिक विजय मानुन पुन्हा पुन्हा विरोधिपक्षात बसण्यासाठि मनोधैर्य मिळते! छान Happy

छान लिहिले आहे. नेहमी राजकारणावर न लिहिणार्‍या कोणी लिहिलंय, त्यामुळे तरी लोक कदाचित खुल्या मनाने वाचतील.
+१

फार मस्त लिहीले आहे!

देशभर विखुरलेल्या मतदारांनी जणू काही एक मोठा ग्रूप एकत्रित विचार करत असल्यासारखा कौल दिला आहे. म्हंटले तर भाजपला एक चान्स अजून दिला आहे पण आधीसारखे अमर्याद अधिकार मिळू नयेत इतपतच जागा दिल्या आहेत. तर दुसरीकडे रागाला तुम्ही अजून पूर्ण तयार नाहीत पण तुमचा अ‍ॅप्रोच आवडला आहे असा पाठिंबाही दिलेला आहे.

सर्वसमावेशकता हा या देशाचा गाभा आहे. तो काही आज नाही. हजारो वर्षांपासून तो तसा असत आला आहे. या गाभ्याशी छेडछाड करणं लोकांना आवडत नाही, हा ही या निकालाचा मेसेज आहे. >> +१

उत्तम आणि समयोचीत. भीती एवढीच आहे की ही दुक्कल आता चिडून आणि सैरभैर होऊन अजून नासवायला तयार व्हायला नको हीच ईच्छा. हे दोघे काय करतील ते सांगता येत नाही. त्यात तो राज्यातला दोन दिवस राजीनाम्याचे नाटक करत आहे तो चाणक्य आहेच. पूर्ण चिखल केला आहे ह्या ठराविक लोकांनी.

खूपच आवडला लेख. विचार आधीपासूनच आवडतात अभ्यासोनी प्रकटता, या विषयातही तुमचा चांगला अभ्यास आहे हे पाहुन आदर वाढला.

राज्यातल्या चाणक्याचं नाटक दुसऱ्या राज्यातल्या पराभवाची जबाबदारी फिक्स करून तिथल्या इन चार्जला सत्तेवरून दूर करण्यासाठी तर नाही?

इतका नौटंकी, कॅमेरा-भिमुख , प्रसिद्धी/सत्ता-लोलुप राजकारणी नेता जो आपल्याच काल्पनिक विश्वात मग्न असतो, अख्ख्या जगात दुसरा नसेल !!

छान लेख.
पुढे यातून फार काही वृत्तीत बदल होईल असं वाटतं नाही .आणि काय काय प्रकार करतील सांगता येत नाही.

एकदम परफेक्ट लिहिलय. " माझ्या देशाचा पंतप्रधान अशा खालच्या स्तराची भाषा वापरतो, तेव्हा लाज वाटते. " ह्याला तर एकदमच अनुमोदन.

सर्वसमावेशकता हा या देशाचा गाभा आहे. तो काही आज नाही. हजारो वर्षांपासून तो तसा असत आला आहे. या गाभ्याशी छेडछाड करणं लोकांना आवडत नाही, हा ही या निकालाचा मेसेज आहे. >> +१००

देशभर विखुरलेल्या मतदारांनी जणू काही एक मोठा ग्रूप एकत्रित विचार करत असल्यासारखा कौल दिला आहे. म्हंटले तर भाजपला एक चान्स अजून दिला आहे पण आधीसारखे अमर्याद अधिकार मिळू नयेत इतपतच जागा दिल्या आहेत. >> हे पण योग्य आहे. यु पी मधे जे झाले त्यापेक्षा कडक मेसेज नसावा.

<< यु पी मधे जे झाले त्यापेक्षा कडक मेसेज नसावा. >>

----- मेसेज कुणासाठी ?

तिथे खासदार पडल्यावर तिथल्या लोकांना ( मतदारांना !) शिक्षा देण्यासाठी रामाच्या दर्शनाला जा पण तिथे काही खरेदी करु नका असे मेसेजेस पसरत आहेत. एक व्हिडिओ येथे पण बघितला होता. एव्हढी जबरदस्ती ? तिथल्या लोकांना कुणाला निवडायचे याचा पण हक्क नाही?

सुरतवासीयांना त्यांच्या मनासारखा खासदार निवडण्याचा हक्क नव्हता हे जगाने पाहिले आहे.

Pages