A tale of two Indians (कल्पनाकथा) - भाग १

Submitted by रायगड on 31 May, 2024 - 16:35

माबोकरांनो, कथा चालू करण्याआधी थोडं लिहीते.
कथा वाचायला लागल्यावर तुम्हाला कळेलंच की शिवाजी महाराजांच्या जीवनावर बेतलेली ही एक काल्पनिक कथा आहे. माझ्या मनातल्या एका केवळ कल्पनेचा केलेला हा विस्तार आहे. त्यामुळे यात खूप तर्क शोधायला जाण्यात फार अर्थ नाही. कदाचित ही कल्पना वेडगळ वाटू शकेल...नव्हे आहेच. पण माझ्या मनात ही कल्पना आल्यावर ती उतरवणे भाग होते...त्याचे फलित ही कथा आहे. एक कल्पनाविलास यापेक्षा जास्त याचे महत्व नाही!
तीन भागांची ही छोटेखानी कथा मी पुढल्या काही दिवसांत क्रमशः प्रसिद्ध करेन.
****************************************************************************************************************************************

जून १६७४! रायगडावर राजांचा राज्याभिषेक मोठ्या थाटामाटाने पार पडला. अनेक प्रदेशांचे राजे, सरदार जातीने या सोहळ्यात उपस्थित होते. त्यातच होते - ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी - हेन्री ऑक्झेंडेन आणि त्याचा सहकारी व उजवा हात - जिम नेविन्सन. हेन्री व जिम यांची आणि राजांची ओळख आणि भेट या आधी देखील झाली होतीच. आणि आता तर राज्याभिषेकानिमित्त रायगडावर त्यांनी आठवडाभर मुक्काम ठोकला होता.

coronationceremony2-modified.jpg
(चित्रं इंटरनेटवरून साभार!)

राणी एलिझाबेथ (पहिली) हिच्याकडून शाही सनद मिळालेल्या ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने एव्हाना भारतभूमीत व्यापारानिमित्त चांगलेच पाय रोवले होते. शाही सनदीने कंपनीला भारतीय भूमीवर व्यापार करण्याचा एकाधिकार बहाल केला होता. आणि अर्थातच राजघराण्याचे अधिकृत नेतृत्व करण्याचा मान कंपनीला मिळाला होता.

राज्याभिषेकाला आलेल्या सर्वच राजे, उमराव, सरदार मंडळींकडून अनेको भेटी, नजराणे राजांना मिळाले पण हेन्री ऑक्झेंडेन कडून ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीतर्फे राजांना एक विलक्षण भेट बहाल झाली.. राजांना आश्चर्यचकीत करून सोडणारी ही भेट होती - ते म्हणजे इंग्लंडचे राजे चार्ल्स यांच्या दरबारात यायचे निमंत्रण!!

व्यापाराकरीता स्थापन झालेल्या इ. इंडिया कंपनीला भारतातील राज्यकारभार, राजकारण यात रस होताच. व्यापारात आपली सद्दी बसवण्याकरीता येथील राजे- रजवाड्यांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे, त्यांना भेटी देऊन खूश करणे - असे अनेक मार्ग कंपनी अवलंबित होती. त्यातूनच मग इथल्या राजे-रजवाड्यांना इंग्लंडच्या दरबारी आमंत्रित करणे, मान देऊन त्यांच्याशी पुढे संबंध सखोल करणे असे प्रकार कंपनी करत असे. राज्याभिषेकानंतर राजेपण प्रस्थापित झालेल्या या शूर मराठा राजाला भेटायला राजे चार्ल्स उत्सुक आहेत असा त्यांचा निरोप ऑक्झेंडेन त्यांनी शिवाजीराजांना कळवला. आश्चर्याचा सुखद धक्का राजांना बसला तरी या गोर्‍या व्यापार्‍यांच्या कावेबाज धोरणाची कल्पनाही राजांना आलीच होती. आमंत्रणाकरीता आपले धन्यवाद कळवणारा खलिता राजे चार्ल्स यांच्याकरीता लिहून हेन्रीकडे सुपूर्द केला.

राज्याभिषेकाचे उत्सवी वातावरण फार दिवस टिकले नाही. राज्याभिषेकानंतर अवघ्या काही दिवसांत जिजाबाईंचा मृत्यू झाला. आणि रायगडावर शोककळा पसरली. जिजाबाईं च्या मृत्यूने खचलेल्या राजांची तब्येतही या काळात ढासळू लागली. पण स्वतःच्या दु:खाकडे, तब्येतीकडे लक्ष द्यायला राजांना उसंत कुठली! अनेक स्वप्नं आणि त्याकरीता अनेक स्वार्‍या हे सत्र अखंड चालूच होतं. तब्येतीच्या तक्रारींवर जुजबी उपचार करून घेऊन पुढच्या स्वारीच्या योजना आखून राजे त्या पार पाडत होते. नुकतीच खानदेशची स्वारी आटपून राजे रायगडावर परतले. त्यांच्या ज्वराने परत मान वर काढली होती. पण त्या अवस्थेतही सदरेवरची, दरबाराची कामं महाराज बघत होते.

राज्याभिषेक आणि पाठोपाठ झालेला मातोश्री जिजाबाईंचा मृत्यू यातून रायगड आणि सगळी मावळपेठ अजून सावरत, बाहेर येत होती. आज दरबारी हेन्री ऑक्झेंडेनचा सहकारी, जिम नेविन्सन हा महाराजांना व्यापारासंबंधी बोलणी करण्यास भेटावयास आला होता. जिजाबाईंच्या निधनानंतर राजांच्या भेटीला आणि सांत्वनाला देखील हेन्रीने जिमला आपला प्रतिनिधी म्हणून पाठवलं होतं. या भेटीत देखील जिजामातेच्या दु:खात बुडालेले राजे आणि जिम यांच्यात फार संवाद झाला नाही तरी अश्या काही भेटींमधून, जिम या गृहस्था बद्दल राजांचं मत एकंदरीत चांगलं झालं होतं. यावेळी देखील राजांनी जिमला आपला पाहुणचार घेण्याकरीता काही दिवस रायगडावर रहाण्याचे आमंत्रण दिले होते. आणि राजांवरील स्नेहामुळे त्यानेही ते स्विकारले होते.

तसा राजांच्या चाणाक्ष बुद्धीला या टोपीकर इंग्रजांचा बेत फक्त व्यापार करण्याचा नसून, इथल्या राजकारणात ढवळा-ढवळ करणे, जमेल तर राज्यच मिळवणे - हा आहे, हे लक्षात आलं होतं. आज मोगलांच्या साम्राज्याखाली असलेला आपला देश उद्या या व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या गोर्‍या लोकांच्या हातात जाईल अशी राजांची भीती-वजा अटकळ होती. एकंदरीतच या टोपीकर-पोर्तुगीज लोकांच्या धूर्त वागणूकीचं आश्चर्यजनक कौतुकही राजांना वाटत असे. कुठल्या हजारो कोसो दूर देशी व्यापाराकरीता जाऊन तिथे स्वतःची वसाहत स्थापणे - हे सोपे नव्हे.
माणसांमधील चांगुलपणा ओळखणं, चांगल्या गुणांची कदर करणं - ही तर राजांची खासियत.... जिम नेविन्सन आणि राजांचा स्नेह या १-२ गाठीभेटीत छान स्नेह जुळून आलेला. राजे अनेक प्रश्न जिमला विचारत. त्यांचा मुलुख, तिथल्या घडामोडी, त्यांच्या शैक्षणिक आणि वैद्यकिय प्रगती..अनेक विषयांवर राजांच्या चर्चा होत. त्यातून आपल्याला, आपल्या राज्याकरीता काय शिकता येईल का, हा विचार राजांच्या मनात असे. या लांबच्या प्रदेशाबद्दल निराळेच कुतुहल राजांच्या मनात निर्माण झाले होते.

जिमच्याही मनात राजांविषयी अतीव आदर आणि स्नेह होता. राजांच्या वारंवार आजारी पडणे यावर उपाय म्हणून त्याने राजांच्या मागे लागून इंग्रज डॉक्टरकडून तपासून घेण्याची गळ घातली. इंग्रज डॉक्टर हॅरी स्मिथ याला रायगडावर बोलावून त्यांच्याकरवी जातीने राजांची तपासणी करून घेतली. स्मिथच्या औषधोपचाराने राजांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली तरी तरी स्मिथने जाणले की हा आजार अधिक गंभीर स्वरूपाचा आहे. त्याने राजांना वेगळीच गळ घातली की राजांच्या तब्येतीचे चांगले निदान आणि उपचार करण्याकरीता राजांनी इंग्लंड मुलुखात जावे!! तिथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली रहायची सोय असलेले औषधोपचार केंद्र असते. तिथे चांगली औषधयोजना होऊ शकते. असे डॉ. स्मिथने राजांना समजावले. हा अजब सल्ला ऐकून राजांना हसावं की रडावं कळेना. मात्र जिमने हे हसण्यावारी न घालवता, इंग्लंडचे राजे चार्ल्स यांच्या आमंत्रणाची परत एकवार आठवण करून दिली. इंग्लंडात जाऊन राजे चार्ल्स यांचीही भेट घेता येईल आणि तब्येतीचीही तपासणी करून घेता येईल - असा दुहेरी बेत साधता येईल अशी त्याने राजांस गळ घातली.

अर्थातच ही भलती योजना डावलून, प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यावर राजांनी तत्काळ फोंड्याची स्वारी आखली. फोंड्याचा किल्ला मिळवणे हे राजांचं कित्येक वर्षांचं स्वप्न होतं. राजापूरमार्गे राजे फोंड्याच्या रोखाने निघाले. राजापूरला राजांचे नौदळ होते. वाढत्या स्वराज्याच्या रक्षणाकरीता घोडदळ आणि पायदळाबरोबर नौदलाची गरज जाणून राजांनी इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या मदतीने बांधून घेतलेली ५० गलबतं राजापूर बंदरात होती. त्यातील चाळीस गलबतांतून राजांनी फोंड्याच्या स्वारीत भाग घेण्याकरीता शेकडो मजूर वेंगुर्ल्याकडे पाठवले. स्वतः घोडदळाबरोबर राजे फोंड्याच्या दिशेने रवाना झाले. प्रयत्नांची पराकाष्टा करून राजांनी फोंडा सर केला. फोंड्यापाठोपाठ राजापूरची लढाई, लगेच कारवार प्रांताची मोहिम - राजांनी कारवार प्रांत मराठी राज्यात सामिल करून घेतला. कारवारस्वारीने बहुतेक कोकणकिनारा राजांच्या हाती आला होता. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी या सर्वांच्या हालचालींना त्यामुळे पायबंद बसला होता.

ही कारवारची मोहिम उरकून रायगडावर राजे परतले ते एका मोठ्या धक्क्याला सामोरे जाण्याकरीता! संभाजीराजांवर आलेला गोदावरी या विवाहित महिलेला जबरदस्ती लिंगाण्यावर ठेवल्याचा आळ, त्याचा न्यायनिवाडा. आईवेगळ्या लेकाविरूद्ध घरचेच लोक करत असलेल्या कारवाया - यात त्यांच्या प्रकृतीने खूपच हाय खाल्ली. तश्यातच राजे - सातारा, कोल्हापूर, पन्हाळा, परळी - या जागा सुरक्षित करून घेण्याकरीता सातार्‍यास रवाना झाले. पण तिथेही दुर्देवाने राजांची साथ सोडली नाही. सातार्‍यास जाऊन राजांवर जीवावरचं दुखणं बेतलं. आठेक दिवस ज्वर उतरेना, पोटात काही टिकेना, मस्तकशूळ थांबेना. वैद्योपचारांबरोबर अंगारे-धुपारे सारे उपाय चालू होते. एकीकडे अफवांचं पीक उठलं - राजांवर विषप्रयोग झाला - अगदी जवळच्या व्यक्तीकडून - इथपर्यंत अफवा पोहोचल्या.

ही वार्ता जिमच्या कानी गेली. तत्काळ डॉ. स्मिथना घेऊन तो सातारी रवाना झाला. शिवराम वैद्यांच्या उपचाराबरोबर डॉ. स्मिथचे उपचार देखील चालू झाले. एकंदरीत औषधोपचार आणि आरामाने हळूहळू राजांच्या प्रकृतीत सुधारणा झाली पण मनाने या काळात राजे फार खचले. शारीरीक अशक्तपणाबरोबरच हा उठलेल्या वावड्या, घरातले गृहकलह - प्रत्यक्ष राज्याची राणी आणि युवराज यांतील बेबनाव याने राजे खचून गेले. मोगल - आदिलशाही यासारख्या बाह्यशत्रूचा बंदोबस्त करायला आता लोकं, सैन्य तयार झाले होते पण हे गृहकलह निस्तरायचे - राज्याची दीर्घकालीन सोय लावायची तर - स्वतःला शारीरीक आणि मानसिक तंदुरूस्त ठेवणं क्रमप्राप्त आहे, हे राजांनी या काळात जाणलं.

याकाळात जिम आणि डॉ. स्मिथ यांनी राजांची बरीच मनधरणी केली. प्रकृतीकरीता वेगळे वैद्यकिय उपचार, नविन मुलुख बघण्याची, तिथल्या लोकांना जाणून घेण्याची राजांची इच्छापूर्ती, इंग्लंडचे राजे चार्ल्स यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून त्यांची भेट, राजां च्या स्वत:च्या, इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या मदतीने बांधून घेतलेल्या गलबतांतून प्रवास - अश्या अनेकविध बाजूंनी ते राजांचे मन वळवित असताना राजे पण विचार करत होते - सैन्य - हंबीररावांच्या हाताखाली मोहिमा काबिज करण्यात पटाईत आहेच - हीच संधी आहे - युवराजांना स्वतंत्रपणे राज्य करून देण्याची, त्यांची शक्ती ओळखण्याची. राजांनी निर्णय घेतला - जिम आणि डॉ. स्मिथ यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करण्याचा!!!

अर्थात ही बातमी फार बाहेर जाऊ देणे योग्य नाही, हे राजे जाणून होते. प्रधानमंडळाच्या सल्ल्याने या बातमीचा फार गाजावाजा न करता - महाराज पुढील ६-८ महिने नसतील याची तजवीज करण्याच्या मागे लागले. अर्थात यात सर्वांत पहिली चिंता होती ती - समुद्रोलंघनाचे पातक लागण्याचा. पण त्याकरीता राजांनी परत एकदा गागाभट्टांना पाचारण केले. त्यांच्या सल्ल्यानुसार, त्यांच्याच हाताने पातविनाशक गंगोदकाभिषेक विधी पार पडला.

राजांची ही अनोखी मोहिम व्यवस्थित पार पडावी म्हणून जिमने ७-८ इंग्रज व्यापारी, माहितगार , मार्गदर्शक, दिशादर्शक जमवले - जे राजांना या मोहिमेकरीता मदत करणार होते. राजे अर्थातच गुंतून गेले - ते राज्याची सगळी व्यवस्था लावण्यात, पुढील वर्षभराच्या मोहिमांची आखणी करण्यात आणि आपली गलबतं पक्की करून ती या मोठ्या सफरीकरता तयार करण्याकरीता. सोबत नेण्याकरीता लोकांची निवड करून त्यांना या साता- समुद्रापारच्या मोहिमेकरीता शारीरीक, मानसिकरित्या तयार करण्याकरीता. प्रत्येक माणूस पारखून घेऊन - आचार्‍यांपासून ते पुजार्‍यांपर्यंत , लढवय्ये ते चलाख दूत, इंग्रजी बोलू शकणारे भाषांतरकार शेणवी अश्या विविध लोकांची राजांनी भरती करून घेतली. इंग्रजांच्या मदतीने तेथील थंड हवामानाची माहिती करून घेत, त्यानुसार कपडेलत्ते, सामान मागवून घेतले. बरोबर जिम, डॉ. स्मिथ असणार होतेच.

त्याचबरोबर एकीकडे राजांनी डावपेच आखून, या काळात मोगलांकडून फारसा त्रास होऊ नये म्हणून मोगलांशी तह करण्याचे ठरवून, निराजीपंतांना मोगलांच्या बहदूरखानाकडे पाठवलं. गोवळकोंड्याच्या मादण्णांच्या मध्यस्तीने आदिलशाहीशी देखील राजांचा तह झाला. हे तह टिकणार नाही हे माहिती असून देखील केवळ काही मुदत मिळवायला ही चाल राजांनी आखली.

राजे कैक महिने राज्यापासून दूर असणार होते. एकंदरीत अंतस्थ चाललेल्या राजकारणाची त्यांना कल्पना होती. प्रधानमंडळ आणि राज्याचे युवराज यांच्यातील बेबनाव राजे जाणून होते. राज्याच्या हिताचा सर्वतोपरी विचार करता - युवराजांनी रायगडावर न रहाता महाराजांनी त्यांना प्रभावळीचा सुभा चालवण्यास दिला. रायगडावर प्रधानमंडळ राज्यकारभार चालवणार आणि सरनौबत हंबीरराव, आनंदराव, जेधे, सुर्याजी मालुसरे ही मंडळी दक्षिणेला कर्नाटकच्या आणि पुढे तंजावूर भाग स्वराज्याला जोडून घेण्याच्या महिमेस निघाली.

राजांच्या या प्रवासाकरीता, सैन्याच्या मोहिमांकरीता, आपल्या अनुपस्थितीत राज्यकारभार नीट चालावा म्हणून, आणि संभाजीला दिलेली सुभ्याची त्यांनी नीट व्यवस्था बघावी - अश्या सर्व कामांकरीता - यशाकरीता गडावरील सार्‍या देवतांना अभिषेक झाला. संभाजीराजे शृंगारपूरच्या दिशेने रवाना झाले. आणि मुहूर्त बघून राजांच्या गलबतांनी मुंबई बंदरातून शीडे उभारली - सातासमुद्रापलिकडील नवी पश्चिम-क्षितीजं राजांना खुणावू लागली.
navy-modified.jpg
(चित्रं इंटरनेटवरून साभार!)
क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल, नाही गं.. चित्रं इंटरनेटवरून घेतलेयंत..तसं लिहीलं लेखात.

प्रतिसादाकरीता धन्यवाद, अवल आणि मी_अनु.

राजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांनी गोदावरी या विवाहित महिलेला जबरदस्ती लिंगाण्यावर नेऊन ठेवल्याचं मोठं प्रकरण, त्याचा न्यायनिवाडा करणं राजांच्या नशिबी आलं.>> माफ करा पण काल्पनिक कथा लिहिताना आपण काय लिहितो याचे जरा भान ठेवावे.