विश्वास संपादन करून विणलेली फसवणुकीची जाळी (कॉन स्किम्स)

Submitted by अमितव on 19 March, 2018 - 18:04

पाँझी स्किम, बॅजर गेम, स्पॅनिश प्रिझनर, नायजेरिअन स्कॅम ते चेन मार्केटिंग आणि भविष्यकथन अशी अनेकविध नावं विविध ठिकाणी आपल्या कानावर पडत असतात. हॉलिवुडने तर कॉन आर्टिस्टना (कॉन्फिडन्स आर्टिस्ट) टोटल रोमॅंटिसाईझ केलंय. या वेगवेगळ्या क्लुप्त्या नक्की आहेत काय आणि त्यात आपण कसे फसवले जातो याची लिस्ट करायचा प्रयत्न करतोय.

ही सगळी माहिती पब्लिक डोमेन मधूनच शोधून लिहिली आहे. ही फसवणूक करण्यासाठी लिहिलेली कृती नसून मला याविषयावर माहिती एकत्र करावीशी वाटली म्हणून लिहिलेली वेब एन्ट्री आहे. कुणाला घोटाळ्यात अडकण्यापासून किंवा 'घोटाळा आहे' हे समजायला या माहितीचा उपयोग झाला तर उत्तमच.
अशा प्रकारची फसवणूक "भारताच्या" राजकारणात घडली असेल तरी हा धागा भारताच्या राजकारणावर नाही याची नोंद घ्या आणि शक्यतो कृपया इथे त्याचा रेफरन्स देणे टाळा.

कॉन्फिडन्स गेम किंवा विश्वास जिंकून फसवणूक करताना फसवणूक करणारी व्यक्ती मानवी मनाच्या सहज आणि पुरेशा पुराव्याशिवाय विश्वास ठेवणे, अती-निरागसता (नाईव्ह), सहवेदना आणि त्यातून पटकन मदत करणे, स्वतःच्या कर्तृत्वावर/ गुणांवर/ क्षमतेवर असलेला फाजील विश्वास, कधीतरी फायद्यासाठी अनैतिक वागणूक करणे पण ती नैतिक नाही याचे पुरेपुर भान असणे, अप्रामाणिकपणा, लोभ, संधीसाधूपणा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हाव इ. सहज प्रेरणांच्या वापर आपल्या फायद्या साठी करतात.

अशी विश्वास जिंकून फसवणूक करताना साधारण या सहा पायऱ्या वापरल्या जातात.
१. तयारी: आधी फसवणुक कशी करायची याची जय्यत तयारी केली जाते. कोणी मदत करणारा लागणार असेल मदतनिसाची नेमणूक होते.
२. सावज (व्हिक्टिम) हेरणे आणि त्याच्याशी संपर्क करणे
३. बिल्ट अप: या अन्यायग्रस्त व्यक्तीला फायदा मिळण्याची संधी उपलब्ध करणे. जेणेकरून त्याच्या मनात हाव निर्माण होईल आणि ती हाव सारासारविचार क्षमतेवर हावी होईल.
४. फायदा होणे: यात त्या व्यक्तीला थोडाफार आर्थिक फायदा होईल, आणि व्यक्तीचा एकुणात स्कीमवरचा विश्वास दुणावेल.
५. गोंधळाची परिस्थिती निर्माण करून अन्यायग्रस्त व्यक्तीला चटकन निर्णय घेण्यास भाग पाडणे
६. त्याच वेळी आजूबाजूच्या व्यक्ती (ज्या फसवणुकीत सामील आहेत) त्याच स्कीम मध्ये गुंतवणूक करत आहेत असा भास निर्माण करणे जेणे करून जे चालू आहे ते योग्य आहे हा भास कायम राहील.

काही प्रसिध्द फसवणुकीची जाळी

१. स्पॅनिश प्रिझनर: किंवा अ‍ॅडव्हान्स फी, नायजेरिअन पत्र इ. : यात फसवणूक करणारी व्यक्ती आपण एका श्रीमंत माणसाच्या संपर्कात आहोत जो/ जी स्पेन मध्ये जेल मध्ये आहे असं सांगते. त्याची श्रीमंत व्यक्तीची ओळख जाहीर केली तर त्या व्यक्तीला भयानक परिणामांना सामोरे जायला लागेल हे ही सांगते. यात कधीकधी ती व्यक्ती लांबची नातेवाईक आहे, परिचित आहे असंही भासवले जाते. त्या व्यक्तीच्या तुरुंगातून सुटकेस पैसे उभे करण्यासाठी जर तुम्ही मदत केलीत तर नंतर तिच्या संपत्तीतला वाटा आणि संपतीशिवाय काही फायदा जसे... तिच्या सुंदर मुलीशी विवाह इ. आमिष दाखवले जाते. तुम्ही एकदा मदत केलीत की थोडे दिवसांनी, त्याच्या सुटकेत आणखी काही विघ्ने येतात आणि आणखी जास्त पैशांची गरज भासू लागते.
ही फसवणूक तुमच्याकडचे पैसे संपे पर्यंत किंवा तुम्ही पैसे देणे बंद करे पर्यंत चालू रहाते.
यात कुठेतरी ठेवलेली मौल्यवान वस्तू वेअरहाउस मधून सोडवून घेणे, हरवलेल्या सामानात काही मौल्यवान आहे ते एअरपोर्ट वरून सोडवून घ्यायचे आहे, कोणा आफ्रिकन माणसाला कोट्यावधी हवाला करायचे आहेत त्यासाठी इनिशिअल रक्कम भरा, फेसबुक अकौंट हायजॅक करुन सगळ्या फ्रेंडलिस्टला ही व्यक्ती परदेशी अडचणीत आहे पैसे पाठवा मेसेज पाठवणे अशी अनेक व्हेरीएशन आज काल करण्यात येतात.

२. सोन्याची फवारणी करुन खाण आहे भासवणे (सॉल्टिंग/ सॉल्टिंग द माईन): : सोन्याच्या खाणीवर शॉटगन मधून चक्क सोने फवारणे आणि भावी खरेदीदाराला प्रचंड मौल्यवान साठा सापडला आहे असं भासवून पैसे उकळणे. डायमंड होक्स, ब्रेक्स इ. ठिकाणी याचा वापरा केला गेलेला.

३. झाकली मूठ (पिग इन अ पोक/ कॅट इन अ बॅग) : पिशवीत डुक्कर (काही तरी मौल्यवान) आहे सांगून ती विकायची, आणि न उघडताच खरेदी करणारा जेव्हा उघडून बघेल तेव्हा कवडीमोल मांजर (मीटच्या दृष्टीने कवडीमोल, मांजरप्रेमींनी स्वतःला दुखापत करून घेऊ नये) बाहेर पडेल.
letting the cat out of the bag ह्या वाक्पाराचाराचा उगम ह्या हातचलाखीत आहे म्हणतात.
ह्याचा बळी आपण कधी कधी झालोय असं वाटत रहातं.

४. बॅजर गेम: : ही अशी फसवणूक लग्न झालेल्या संसारिक माणसाची केली जाते. समजा 'क्ष' या पुरुषाचे 'य' ह्या स्त्रीशी लग्न झाले आहे. तर त्याला 'ज्ञ' ही स्त्री आपल्या प्रेमात अडकवून विवाहबाह्य संबंधात अडकवते आणि हे 'फ' बघतो, जो 'ज्ञ' चा नवरा/ भाऊ असतो. तो 'क्ष' कडून हे गुप्त ठेवण्यासाठी पैसे मागतो.
यात ज्ञ ही हा संबध जबरदस्ती तून होता सांगून बलात्कार/ विनयभंग इ. आरोप करू शकते. यात समलिंगी संबंध, लहानमुलांबरोबर संबंध,
पॉर्नोग्राफी, समाज 'अ'मान्य पद्धतीने लैंगिक भावनाचा निचरा इ. बदल असू शकतात.
आणखी एक प्रकार म्हणजे आजारी असण्याच्या बहाण्याने डॉक्टरकडे जाऊन फिजिकल चेकप मध्ये डॉक्टरने अतिप्रसंग केला असा बहाणा करणे. लैंगिक भावनाचा वापर न करता, समाजात टॅबू असणाऱ्या गोष्टी जसे दारू पिणे, मांस भक्षण इ. केल्या तर त्या झाकायला ही हा प्रकार वापरला जातो.

५. बोगस लाँड्री बिल पाठवणे: गावातल्या एखाद्या खऱ्या लाँड्रीच्या बिलाच्या अनेक प्रती सगळ्या महागड्या उपहारगृहांना पाठवून तुमच्या वेटरने अंगावर अन्न/ पेयं/ वाईन सांडली त्यामुळे आलेलं हे कपडे धुवायचं बिल भरा असं पत्र पाठवणे. 'थोडक्यात निभावलं' म्हणून अनेक उपहारगृहे हे बिल भरून मोकळे होतात. पत्ता अर्थात मेल बॉक्सचा असतो.

६. आजी/ आजोबांची फसवणूक: आजोबांना नातवाचा/ नातीचा फोन किंवा मेल येतो की तिला दुसऱ्या देशात अटक केली आहे आणि जामिनासाठी पैसे हवे आहेत. आणि तिला हे आई वडिलांपासून लपवून ठेवायचं आहे. मग काय दुधावरची साय विरघळते.

७. भविष्यकथन: अस्पष्ट दावे ऐकले की माणूस ते आपापल्या बकुवा प्रमाणे आपल्याला चिकटवून घेतो. शारीर हालचाली इ. वरून चुकीच्या माहिती वरून पटकन दूर जायचे आणि बरोबर माहिती ठसवत रहायची... की विजय असत्याचाच होतो. भविष्यकथन काही आपल्याला नवीन नाही.

८. थाई मोती (आपण श्रीलंकन मोती, केरळची वेलची, म्हैसूरचे चंदन, आणि कुठली साडी/ रेशीम इ. म्हणू): परदेशी प्रवाश्यांना ड्युटी फ्री मौल्यवान रत्ने दाखवत अनेक दुकानातून हिंडवणे आणि शेवटी आपल्याच दुकानातून साध्यासुध्या गोष्टी भरमसाठ भावात विकणे. यात अनेक स्तरांत अख्खीच्या अख्खी इंडस्ट्रीही सामील असते.

९. मेरे पिया रहे रंगून (रोमान्स स्कॅम) : ऑनलाईन डेटिंग इ. च्या माध्यमातून रोमँटिक संबंध प्रस्थापित करून मग भेटायचं आहे पण तिकिटाला पैसे मागणे. अर्थात पैसे मागण्यासाठी अनेकविध कारणे सांगता येतात. किंवा पैसे न मागता एनकॅश न होणारे चेक्स पाठवणे आणि पैसे रेमिट करायला सांगणे.

१०. वैयक्तिक माहिती जमा करणे: पे-डे लोन, किंवा इतर लोन देतो म्हणून ग्राहकांकडून माहिती मागवणे आणि नाव, पत्ता, वाहन चालक परवाना इ. माहिती मिळाली की टी विकणे ज्यातून आयडेंटिटीची चोरी करुन त्याच्या नावावर लोन घेणे, खोटी कर भरल्याची पत्रे सरकारला देऊन सोशल सिक्युरिटी इ. चे पैसे घेणे इ.

११.विमा घोटाळा : मुद्दाम वाहनाचा अपघात घडवून आणणे. जसे हा बदमाश सावजापुढे वाहत्या रस्त्यात आपली गाडी आणतो आणि त्याचा दुसरा साथीदार त्या बदमाशाच्यापुढे गाडी आणतो. आता अपघात वाचवण्यासाठी ती बदमाश व्यक्ती अचानक ब्रेक दाबतो. साथीदार वेगात पुढे जातो पण मागून सावज त्या बदमाशाच्या गाडीवर आपटतो. मग इंश्युरंस कंपनीला अवतीर्ण व्हावेच लागते आणि केस आणि खर्च वाचवण्यासाठी कितीही खोटी केस वाटली तरी ती कॉनला पैसे देऊन मोकळी होते.

१२. फिडल गेम : याच्यात दोन व्यक्ती सामील असतात. एक गबाळ्या कपड्यात भारी उपहारगृहात खायला जातो. खाऊन झाल्यावर पैशाचं पाकीट तपासतो तर ते घरी राहिलेलं असतं. मग त्याच्या जवळची कुठली तरी मौल्यवान वस्तू जसं व्हायोलीन इ. तारण ठेऊन घरी पैसे आणायला जातो. तो गेल्यावर दुसरा तिकडे येतो आणि काही अचाट रक्कम देऊन ते फिडल खरेदी करू इच्छितो. पण मग तेवढ्यात त्याला एक फोन येतो आणि तो आपलं कार्ड आणि नंबर देऊन जातो.
थोड्यावेळाने पहिला फाटका माणूस पैसे घेऊन आपलं व्हायोलीन परत न्यायला येतो. पण रेस्टॉरंट ओनर त्या दुसऱ्या व्यक्तीची ऑफर आहे समजून ते जास्त पैशात विकत घ्यायला त्याला पटवतो. नाखुशीनेच फाटका माणूस ते विकायला तयार होतो. रेस्टॉरंट ओनरला आता फायदा होणार वाटते, पण तो दुसरा कधी उगवतच नाही.

इंटरनेट वापरून अजून अनेक प्रकारे फसवणुकीचे सापळे लावलेले सापडतील. वेळ मिळाला की त्यावर लिहितो. तुम्हाला आणखी माहिती असतील तर लिहा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Submitted by mi_anu on 24 February, 2024 - 14:51>>>

https://marathi.indiatimes.com/gadget-news/science-technology/smartphone...

आता 15 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत USSD-आधारित कॉल फॉरवर्ड इनॅक्टिव्ह करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सलग दोन महिन्यात असे दोन कॉल आले.
पहिल्या कॉलवर एक बाई बोलत होती. आधीच्या प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे अगदी लेडी इन्स्पेक्टर किंवा शाळेतल्या कडक बाई बोलतात तेवढ्याच कडक आवाजात. तुमच्या कोटक महिंद्राच्या पॉलिसीचा हफ्ता भरला नाहीये. ही पॉलिसी तुम्ही २०१४ साली घेतली होती. आता माझ्याकडे cancellation साठी आली आहे असं सांगायला लागली. मी कोटक महिंद्राची पॉलिसी घेतलीच नाही सांगून फोन कट केला.
दुसरा प्रसंग. आजचाच. फोनवर एकदम उत्तर भारतीय accent मध्ये प्रश्न - ये प्रतिज्ञा सावंत का नंबर हैं क्या?. मुझे आनंद सावंत (माझे बाबा) ने आपके अकाउंट पे १२००० रुपैया ट्रान्स्फर करने बोला हैं. ये नंबर फोनपे का हैं क्या?
त्याला विचारलं. कोण आनंद सावंत? हा नंबर पोलीस ठाण्यात रिपोर्ट करतेय. त्यावर त्या माणसाने मला अतिशय गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली. लगेच फोन कट केला. त्या एकदोन शिव्यांनी पण मला एवढी धडकी भरली की काहीही न बोलता फोन कट करायला हवा होता असं वाटून गेलं.

त्या एकदोन शिव्यांनी पण मला एवढी धडकी भरली >> पापभीरू माणसाचे असेच होते, स्वत:ची काही चूक नसताना विनाकारण मनस्ताप Sad

आपले बोलून झालं (काहीही नकोय ते सांगून झालं) की फोन कट करण्यापेक्षा गंमत म्हणून hold वरती ठेवायचा. नवीन टाऊनशिप कडून फ्लॅटसाठी नको तेव्हा फोन येतात तेव्हा हेच करतो.

<< आपले बोलून झालं (काहीही नकोय ते सांगून झालं) की फोन कट करण्यापेक्षा गंमत म्हणून hold वरती ठेवायचा. >>

------- होल्डवर ठेवण्यातही आपलेच नुकसान आहे. (अ) आपल्या फोनवर दुसरा कुठला महत्वाचा फोन येत असेल तर त्यांना बिझी टोन मिळेल ? (ब) घरातल्या इतरांचे घरगुती संभाषण सुरु असेल तर त्यांनाही ते थांबवावे लागते. तसे नाही केल्यास, परक्या व्यक्ती समोर हे संभाषण सुरु रहाण्यात धोका आहे.

एक शब्दही न बोलता फोन कट करणे हेच जास्त सुरक्षित आहे.

https://www.facebook.com/share/r/n8vz5fokbvbKQgHV/?mibextid=oFDknk

यांनी व्हिडीओ एडिट करून AI नी आवाज काढुन हे बनवल असेल. मध्ये नोटांच्या गड्डी दाखवल्या म्हणुन लोकं फेक म्हणुन सावध तरी होतील. पण असे व्हिडीओ बेमालूम बनवले तर बरेच लोक फसतील.

हा नंबर पोलीस ठाण्यात रिपोर्ट करतेय...... नंतर खरोखर केलात का? नसेल केला तर नक्की करा, त्यासाठी पोलीस स्टेशन गाठायचीसुद्धा गरज नाही. घरच्याघरून 'चक्षु पोर्टल' वर report करा. https://sancharsaathi.gov.in/sfc/

आपले बोलून झालं (काहीही नकोय ते सांगून झालं) की फोन कट करण्यापेक्षा गंमत म्हणून hold वरती ठेवायचा..... फोन कट करायचा की hold वर ठेवायचा ही तुमची निवड! मात्र त्यानंतर तो नंबर आठवणीने report करा. अगदी suspecious नसेल, marketing call असेल तरीही. कारण नियमानुसार १० आकडी मोबाईल क्रमांक हे वैयक्तिक (private) वापरासाठी असतात, त्यावरून मार्केटिंग कॉल्स करता येत नाहीत. मार्केटिंग कॉल्स करायचेच असतील तर 140 ने सुरु होणारा क्रमांक वापरावा लागतो. त्यामुळे असे मार्केटिंग कॉल्स आले तरी कॉल्स आल्यापासून ३ दिवसांत हे कॉल्स report करा. 'मी एकट्याने तक्रार करून काय होणार' असा विचार करू नका. अनेक छोट्या घावांनी मोठा खडक फुटतो, हे लक्षात असू द्या!!!

असे स्कॅम कॉल येतात त्यांना तुम्ही बळी पडणार नाही ह्याची खात्री असल्यास त्यांचा जास्तीत जास्त वेळ खाऊन अशा लोकांना अन्य लोकांना सापळ्यात फसवायला कमी वेळ मिळेल असे काहीतरी करणे ही एक समाजसेवा आहे असे मला वाटते. जर अशा स्कॅमर्सची पाच मिनिटे खाल्लीत तर त्यांना त्यांच्या गुन्हेगारीसाठी त्या दिवशी पाच मिनिटे कमी मिळतील एवढे समाधान!
काहीतरी प्रश्न विचारा, बँक अकाऊंट नम्बर शोधतो आहे असे काही कारण द्या. किंवा बाकी काही करा. दोन घटका करमणूक म्हणून त्याकडे बघा.

>> जर अशा स्कॅमर्सची पाच मिनिटे खाल्लीत तर त्यांना त्यांच्या गुन्हेगारीसाठी त्या दिवशी पाच मिनिटे कमी मिळतील एवढे समाधान!

त्यामुळे तुम्ही तुमचा आवाज क्लोन करण्याचा धोका वाढवून घेत आहात. तुमच्या क्लोन केलेल्या आवाजाने तुमच्या नातेवाईकान्ना फोन करून पैसे उकळण्याचे चान्सेस वाढत जातात.

>>
त्यामुळे तुम्ही तुमचा आवाज क्लोन करण्याचा धोका वाढवून घेत आहात. तुमच्या क्लोन केलेल्या आवाजाने तुमच्या नातेवाईकान्ना फोन करून पैसे उकळण्याचे चान्सेस वाढत जातात.
<<
आमचे नातेवाईक आमचा क्लोन आवाज ऐकून पैसे देण्याची शक्यता फार कमी आहे!
आवाज क्लोनिंग वगैरे खरोखर घडले आहे का? की निव्वळ कल्पनेच्या भरार्या? समस्त स्कॅमर हे जेम्स बाँडच्या खलनायकासारखे अद्ययावत तंत्रज्ञान, उपकरणे बाळगून असतात ह्यावर माझा विश्वास नाही. इतकी प्रचंड गुंतवणूक करून इतका जोखमीचा, कायद्याच्या कक्षा ओलांडणारा धंदा करणे अवघड आहे.
जर आवाज क्लोंनिग इतके स्वस्त असेल तर ते क्लोनिंग आहे हे कळणेही स्वस्त होत जाईल.
असो. भित्यापाठी ब्रह्मराक्षस.

आमचे नातेवाईक आमचा क्लोन आवाज ऐकून पैसे देण्याची शक्यता फार कमी आहे!
Lol
खरे आहे.
कारण,
आमचे नातेवाईक आमचा खरा आवाज ऐकून(ही) पैसे देण्याची शक्यता फारच कमी आहे !!

आवाज क्लोनिंग वगैरे खरोखर घडले आहे का? की निव्वळ कल्पनेच्या भरार्या?>>> होय १ मैत्रिणीच्या नवर्याला जिवा ला जीव देणारा टाईप मित्र आहे त्याने व्हॉईस कॉल वर पैसे मागितले... सर्व बोलणे झाले फक्त ट्रांसफर वेगळ्या व्यक्ती च्या अकांउंट वर करायला सांगितल्याने त्याने त्या मित्राच्या बायको ला कॉल करून विचारले तेंव्हा उलगडा झाला.

तर बरं का, टिपिकल 'मला तुम्हाला पैसे पाठवायचेत, qr स्कॅन करा' वाला फोन 8233515829 नंबर वरून मलाही आला.फोनवर माणूस एकदम सलगीने ओळखीचा असल्या सारखा बोलत होता.<नवऱ्याचं नाव> जी ने बोला है की मुझे जो उनको 12000 वापस देने है वो आपके जीपे अकाउंट पर दे दू.' याला माझं आणि नवऱ्याचं पूर्ण नाव माहीत होतं(अर्थातच, किमान 10 सुतार, 50 कुरियर वाले, 20 ओला उबर वाले यांच्याकडे नंबर्स आणि नेमप्लेट वर दोघांची नावं असतील.शिवाय डाटा चोरणाऱ्या लोकांना नावं माहीत करायला नेमप्लेट बघाव्या लागत नाहीत.)
मग त्याला म्हटलं भाईसाब थांबा गॅस बंद करून येते, आणि म्युट टाकून लॅपटॉप वर नवऱ्याला स्काईप कॉल लावला मग आमचे बरेच प्रेमळ संवाद झाले की मागच्या विमा घोटाळ्यात नंबर मिळालेला हा अजून एक आहे का.तोवर त्याने कॉल बंद करून अजून 2 वेळा फोन केला होता. मग तिसऱ्या वेळा आला तर कॉल रेकॉर्ड करू ठरवलं.पण आता नाही आला परत.आता ब्लॉक रिपोर्ट करून शांत बसावे.तसेही सायबर खाते गुन्हा न होता तक्रारी हाताळायला फ्री नाहीये.

Once you invite them in, you do not have control over how many vampires will visit you to suck blood.

मला असा कॉल आला होता. मी सायबर सेल ला तक्रार दिली.
त्याला माहिती पडले कि काय माहिती नाही, पण नंबर बंद येत आहे आता.
या नंबरवरून आलेला कॉल. एकीकडे कॉल केला, दुसरीकडे एस एम ए एस पाठवला. चूकून तुम्हाला दोन वेळा पैसे गेलेत ते आम्हाला परत पाठवा म्हणत होता.
Screenshot_20240802_114148_Messages.jpg

अनू, क्युआर कुठे होता? आय मीन व्हॉईस कॉल वर तू स्कॅन कशी करणार होतीस (करणार नव्हतीस च पण भामट्या च्या दृष्टीने म्हणत आहे.

नाही, संभाषण तितक्या पुढे नेले नाही.त्यानेच होल्ड वर ठेवल्यावर कट केला फोन.नेले असते तर पुढची स्टेप तीच असली असती त्याची.

१) मला परवाच व्हाट्सएप वर एक विडिओ आला होता त्यात iphone गिफ्ट मिळाल्याचे सांगितले होते व दुसऱ्या एका फोन वर कॉल करायला सांगितला होता. मी अर्थात केला नाही आणि cyber-crime वेबसाईट वर रिपोर्ट केला.
२) गाडी विकायला OLX वर जाहिरात दिल्यादिल्या काही मिनिटात १०-१२ संदेश आले. सर्व जण फोन नंबर मागत होते. दिला नाही. ग्राहक सेवा ला कॉल केला. त्यांनी सर्व अकाउंट नंतर बंद केले.

फोनवर माणूस एकदम सलगीने ओळखीचा असल्या सारखा बोलत होता.<नवऱ्याचं नाव> जी ने बोला है की मुझे जो उनको 12000 वापस देने है वो आपके जीपे अकाउंट पर दे दू.'>>>>

मला हा प्रश्न विचारणारे तिन फोन आलेत. दर वेळेस मी ‘बिन्दास पैसे पाठव’ म्हणुन सांगते आणि लगेच फोन कट करते. जास्त वेळ बोलले तर मेला फोन हॅक करेल ही भिती वाटते. Happy Happy

तो ऑनलाईन अरेस्ट/ hostage स्कॅम सुरू आहे तसा एक कॉल मला आला होता.
ऑनलाईन arrest / hostage म्हणजे व्हिडिओ कॉल सुरू ठेवून enquiry चालू आहे असं दाखवत लोकांमधून पैसे उकळतात. काही जणांचे लाखो रुपये गेलेत. नुकतेच एकीचे करोड मध्ये रू गेलेत. फोन सुरू असताना इतर कोणाशीही संपर्क करायला देत नाहीत. हे सगळं कसं करतात ते देव जाणे.

मला पाहिला ब्लू dart कडून फोन आला की मी इराणला पाठवलेलं एक पार्सल भारतीय कस्टम मध्ये अडकल आहे. ( काहीही काय.. )
मी: हो का. बरं असू देत. मी काही पाठवलं नाहीये.
फोन: त्यात objectionable items आहेत.
मी: बरं, मग तुम्हाला ठेवून घ्या.
फोन कट केला मी.

पुन्हा दोन तीन दिवसांनी ब्लू dart कडून फोन. म्हणे तुमचं आधार कार्ड, फोन नंबर पण आहे त्यावर. यावेळी मला एक क्षण असं वाटून गेलं की खरंच कोणी माझ्या नावाने पाठवलं असेल तर.
तरी मी म्हणाले की असं होणार नाही कारण मी पार्सल पाठवलं नाहीये.
फोन: अरे हो का मग हे स्कॅम असेल. असं आमचं नाव सांगून खूप स्कॅम होतात. तुम्ही सायबर crime ला रिपोर्ट करायला हवा.
मी: हो करेन मी.
फोन: अच्छा असं करा तुम्ही अताच अंधेरी ऑफिसला या, इथून आपण एकत्र रिपोर्ट करू.
मी: नाही मला आता तिथे येता येणार नाही.
फोन : अच्छा हा ठीके. एक काम करतो, तुमचा फोन मीच अंधेरी पोलीस स्टेशनला ट्रान्स्फर करतो. आम्ही तिथे असं बोलून ठेवलेलं असतं. लगेच रिपोर्ट होईल. ते हेल्प करतील.

ही ringing bell होती.
मी सांगितलं की रिपोर्ट करायचं तर मी कॉल करेन किंवा स्वतः जवळच्या पो स्टेशन मध्ये जाईन आणि फोन कट केला.

नंतर काही दिवसात बातम्या वाचताना काही जणांना अगदी सेम टू सेम कॉल्स करून फसवल गेलं आहे.
मी त्याच वेळी ऑनलाईन रिपोर्ट करायचा प्रयत्न केला होता पण तिथे fraud झाला त्याचे स्क्रीन shot attach करायला सांगत होते त्यामुळे काही करता आलं नाही.

हे भारी आहे Happy पोलीस स्टेशन ला जोडून देतो म्हणून स्कॅम.

नुकतेच एका नातेवाईकांबरोबर झालेले संभाषण:
"तो अमुक अमुक sms आलाय mseb कडून.बिल भरायची लिंक पाठवलीय."
"अहो तो फ्रॉड आहे."
"हो कळलंच मला ते फ्रॉड आहे हे.लिंक वर क्लिक करून उघडून पहिली तर कोरी होती.तेव्हाच शंका आली"
(मनातल्या मनात कपाळावर हात मारून) ": अहो, कोणत्याही मेसेज, sms, इमेल, व्हॉटसप मधून आलेली लिंक क्लिक करायची नाही हे ब्रीदवाक्य आहे ना हल्ली सावध राहायला?आणि तुम्ही 'फ्रॉड आहे' हा निष्कर्ष काढायला प्रत्येक लिंक क्लिक करुन बघता?"
(पुढे त्यांना लिंक क्लिक केल्याने काही अपाय झाला का हे अजून कळलेलं नाही, मी विचारलं नाही, त्यांनी सांगितलं नाही.)

एकंदर लाजाळूचं झुडूप दिसलं की बोट लावून प्रत्येक पान मिटलंच पाहिजे हा मोह असतो त्याप्रमाणे 'लिंक चं निळं दिसलं की क्लिक करायलाच पाहिजे' हा मानवी स्वभाव असावा.

एम एन जी एल चा स्कॅम चालू आहे. मलाही फोन आलेला.
आमच्या इथेच जवळपास एकीला एम एस ई बी चं कनेक्शन कट करू . ताबडतोब दिलेल्या लिंकवर पैसे भरा असा कॉल आला होता.
तिचे नेमके किती पैसे गेलेत समजत नाही. कुणी म्हणतंय कि लाखो रूपये आहेत, कुणी सांगतंय कोट्यवधी गेलेत.

बँकेत ताबडतोब रिपोर्ट केला तर पैसे पुन्हा मिळवता येतात ना ?

पंधरा वीस दिवसांपूर्वी लेकीला पण सायबर फ्रॉड चा अनुभव आला. ती पिक्चर बघत होती. मध्येच मैत्रीणीचा फोन आला एकदम रडक्या आवाजात.
ह्या मैत्रीणीची एक हिस्टरी आहे. तिचे वडील अब्युसिव आहेत व आईला घर सोडता येत नाही कारण आर्थिक सक्षमता नाही. तर हे दोघे आता भुवनेश्वरला शिफ्ट झालेले आहेत.

मैत्रीण रडत रडत सांगत होती की आई ला काहीतरी करुन भुवनेश्वरच्या होस्पिटल मध्ये टाकून वडील नॉट रीचेब ल झालेले आहेत. दीड लाखाची गरज आहे. आता आई आजारी व पैशाची गरज हे लेकीसाठी मेजर ट्रिगर आहेत हे ह्या मुलीला माहीत आहे/ असावे. लेक लगेच घाबरली व एकदम घायकुतीला येउन मला फोन केला असे असे आहे. मी लगेच कर म्हणून ओके केले.

तिने एफडी तोडून प्रथम भुवनेश्वरला हॉस्पि टल च्या सांगितलेल्या नंबर वर पैसे ट्रान्स फर करायचा प्रयत्न केला. त्यांनी दोन तीन वेगळे नंबर दिले पन ट्रा न्स फर होइनात पैसे. एक ला ख मैत्रीणीला जी पे करायचा प्रयत्न केला पण त्रांझॅक्षन अडकले. ते ही काही पुढे गेले नाही. क्यान्सलच झाले. त्या मुलीचा अधून मधून फोन येत होता. मी मुंबई एअर्पोर्ट वर आहे पण फ्लाइट मिळत नाही आहे. भावाला जर्मनीत सांगितले आहे तो ही निघाला आहे वगैरे.

माझा अजून टँजंट लेक अगदी बापावर गेलेली आहे तो म्हणजे कोणालाही मदतीला अर्ध्या रात्रीत तयार. पैसे लगेच देणार व परत मागणार नाही.
( बीपी माझे हाय का होत असेल ते समजलेच असेल. ) होउ दे खर्च वगैरे. मग जरा लॉजिकली विचार केला तर जी मुलगी सकाळी नव्या घराचे भाडे १००० की दोन हजार ने जास्त होते आहे ते सेव्ह करु म्हणत होती ती अचानक दीड लाखाला चुना कसा लागु देइल.

बाहेर पाउस मी म्हणत होता त्यामुळे त्या मुलीला फ्लाइट काही मिळाली नसावी ती घरी गेली. लेक कॅब करुन तश्यात घरी आली. आमचा रडारडीचा एक कार्यक्रम झाला कारण दोघींचे ट्रिगर पॉइन्ट. मग भावना भर ओसरल्यावर जरा लॉजिक लावले व तिच्या फोन ची वाट बघु म्हणून गप्प बसलो.

ओटीपी मनी ट्रान्सफर करयला लागत नाही कोणी फोन वरुन मागि तला तरी देउ नको सांगुन खाउ पि उ झोपलो. सकाळी एक लाखाचे गुगल ट्रान्सफर कॅन्सल झाल्याचे कळले. झिंदाबाद.

पण मग त्या मुलीला कोणी डीप् फेक ऑडिओ कॉल केला व ते पुढे आमच्यावर आले का त्या मुलीनेच काही केले असावे कळले नाही. पैसे वाचले ते महत्वाचे. असे पण होउ शकते टिपिकल कॉन्फिडन्स ट्रिक.

अश्विनीमामी, बाल बाल बचावलात !
मीही एका लयी भारी स्कॅम ला बळी पडलो होतो, ते बहुदा वर मी लिहिले असावे.

दोन तिन आठवड्यांपुर्वी मला व लेकीला दिल्लीच्या पोलिस सायबर खात्यातुन इ मेल आली की तुमच्या आय पी एड्रेसवरुन पोर्नोग्राफी मटेरिअल शेअर होतेय की अक्सेस होतेय असे काहीतरी. सही कोण्या श्रीदेवी नामक अधिकार्‍याची होती, खाली पुर्ण पत्ता व हुद्दा होता. मी काय काय करायला हवे ते मुद्दे नंबर देऊन लिहिले होते.

मी सरळ मेल डिलीट केली आणि मुलीलाही डिलिट करायला सांगितले. मुलीला म्हटले इथे आपल्या घराशेजारीच पोलिस आउटपोस्ट आहे. मी जर काही गुन्हा केला असेन तर पोलिसांना येऊदे माझ्या दारात. तोपर्यंत मी काही ढिम्म हलणार नाही. Happy

Pages