विश्वास संपादन करून विणलेली फसवणुकीची जाळी (कॉन स्किम्स)

Submitted by अमितव on 19 March, 2018 - 18:04

पाँझी स्किम, बॅजर गेम, स्पॅनिश प्रिझनर, नायजेरिअन स्कॅम ते चेन मार्केटिंग आणि भविष्यकथन अशी अनेकविध नावं विविध ठिकाणी आपल्या कानावर पडत असतात. हॉलिवुडने तर कॉन आर्टिस्टना (कॉन्फिडन्स आर्टिस्ट) टोटल रोमॅंटिसाईझ केलंय. या वेगवेगळ्या क्लुप्त्या नक्की आहेत काय आणि त्यात आपण कसे फसवले जातो याची लिस्ट करायचा प्रयत्न करतोय.

ही सगळी माहिती पब्लिक डोमेन मधूनच शोधून लिहिली आहे. ही फसवणूक करण्यासाठी लिहिलेली कृती नसून मला याविषयावर माहिती एकत्र करावीशी वाटली म्हणून लिहिलेली वेब एन्ट्री आहे. कुणाला घोटाळ्यात अडकण्यापासून किंवा 'घोटाळा आहे' हे समजायला या माहितीचा उपयोग झाला तर उत्तमच.
अशा प्रकारची फसवणूक "भारताच्या" राजकारणात घडली असेल तरी हा धागा भारताच्या राजकारणावर नाही याची नोंद घ्या आणि शक्यतो कृपया इथे त्याचा रेफरन्स देणे टाळा.

कॉन्फिडन्स गेम किंवा विश्वास जिंकून फसवणूक करताना फसवणूक करणारी व्यक्ती मानवी मनाच्या सहज आणि पुरेशा पुराव्याशिवाय विश्वास ठेवणे, अती-निरागसता (नाईव्ह), सहवेदना आणि त्यातून पटकन मदत करणे, स्वतःच्या कर्तृत्वावर/ गुणांवर/ क्षमतेवर असलेला फाजील विश्वास, कधीतरी फायद्यासाठी अनैतिक वागणूक करणे पण ती नैतिक नाही याचे पुरेपुर भान असणे, अप्रामाणिकपणा, लोभ, संधीसाधूपणा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हाव इ. सहज प्रेरणांच्या वापर आपल्या फायद्या साठी करतात.

अशी विश्वास जिंकून फसवणूक करताना साधारण या सहा पायऱ्या वापरल्या जातात.
१. तयारी: आधी फसवणुक कशी करायची याची जय्यत तयारी केली जाते. कोणी मदत करणारा लागणार असेल मदतनिसाची नेमणूक होते.
२. सावज (व्हिक्टिम) हेरणे आणि त्याच्याशी संपर्क करणे
३. बिल्ट अप: या अन्यायग्रस्त व्यक्तीला फायदा मिळण्याची संधी उपलब्ध करणे. जेणेकरून त्याच्या मनात हाव निर्माण होईल आणि ती हाव सारासारविचार क्षमतेवर हावी होईल.
४. फायदा होणे: यात त्या व्यक्तीला थोडाफार आर्थिक फायदा होईल, आणि व्यक्तीचा एकुणात स्कीमवरचा विश्वास दुणावेल.
५. गोंधळाची परिस्थिती निर्माण करून अन्यायग्रस्त व्यक्तीला चटकन निर्णय घेण्यास भाग पाडणे
६. त्याच वेळी आजूबाजूच्या व्यक्ती (ज्या फसवणुकीत सामील आहेत) त्याच स्कीम मध्ये गुंतवणूक करत आहेत असा भास निर्माण करणे जेणे करून जे चालू आहे ते योग्य आहे हा भास कायम राहील.

काही प्रसिध्द फसवणुकीची जाळी

१. स्पॅनिश प्रिझनर: किंवा अ‍ॅडव्हान्स फी, नायजेरिअन पत्र इ. : यात फसवणूक करणारी व्यक्ती आपण एका श्रीमंत माणसाच्या संपर्कात आहोत जो/ जी स्पेन मध्ये जेल मध्ये आहे असं सांगते. त्याची श्रीमंत व्यक्तीची ओळख जाहीर केली तर त्या व्यक्तीला भयानक परिणामांना सामोरे जायला लागेल हे ही सांगते. यात कधीकधी ती व्यक्ती लांबची नातेवाईक आहे, परिचित आहे असंही भासवले जाते. त्या व्यक्तीच्या तुरुंगातून सुटकेस पैसे उभे करण्यासाठी जर तुम्ही मदत केलीत तर नंतर तिच्या संपत्तीतला वाटा आणि संपतीशिवाय काही फायदा जसे... तिच्या सुंदर मुलीशी विवाह इ. आमिष दाखवले जाते. तुम्ही एकदा मदत केलीत की थोडे दिवसांनी, त्याच्या सुटकेत आणखी काही विघ्ने येतात आणि आणखी जास्त पैशांची गरज भासू लागते.
ही फसवणूक तुमच्याकडचे पैसे संपे पर्यंत किंवा तुम्ही पैसे देणे बंद करे पर्यंत चालू रहाते.
यात कुठेतरी ठेवलेली मौल्यवान वस्तू वेअरहाउस मधून सोडवून घेणे, हरवलेल्या सामानात काही मौल्यवान आहे ते एअरपोर्ट वरून सोडवून घ्यायचे आहे, कोणा आफ्रिकन माणसाला कोट्यावधी हवाला करायचे आहेत त्यासाठी इनिशिअल रक्कम भरा, फेसबुक अकौंट हायजॅक करुन सगळ्या फ्रेंडलिस्टला ही व्यक्ती परदेशी अडचणीत आहे पैसे पाठवा मेसेज पाठवणे अशी अनेक व्हेरीएशन आज काल करण्यात येतात.

२. सोन्याची फवारणी करुन खाण आहे भासवणे (सॉल्टिंग/ सॉल्टिंग द माईन): : सोन्याच्या खाणीवर शॉटगन मधून चक्क सोने फवारणे आणि भावी खरेदीदाराला प्रचंड मौल्यवान साठा सापडला आहे असं भासवून पैसे उकळणे. डायमंड होक्स, ब्रेक्स इ. ठिकाणी याचा वापरा केला गेलेला.

३. झाकली मूठ (पिग इन अ पोक/ कॅट इन अ बॅग) : पिशवीत डुक्कर (काही तरी मौल्यवान) आहे सांगून ती विकायची, आणि न उघडताच खरेदी करणारा जेव्हा उघडून बघेल तेव्हा कवडीमोल मांजर (मीटच्या दृष्टीने कवडीमोल, मांजरप्रेमींनी स्वतःला दुखापत करून घेऊ नये) बाहेर पडेल.
letting the cat out of the bag ह्या वाक्पाराचाराचा उगम ह्या हातचलाखीत आहे म्हणतात.
ह्याचा बळी आपण कधी कधी झालोय असं वाटत रहातं.

४. बॅजर गेम: : ही अशी फसवणूक लग्न झालेल्या संसारिक माणसाची केली जाते. समजा 'क्ष' या पुरुषाचे 'य' ह्या स्त्रीशी लग्न झाले आहे. तर त्याला 'ज्ञ' ही स्त्री आपल्या प्रेमात अडकवून विवाहबाह्य संबंधात अडकवते आणि हे 'फ' बघतो, जो 'ज्ञ' चा नवरा/ भाऊ असतो. तो 'क्ष' कडून हे गुप्त ठेवण्यासाठी पैसे मागतो.
यात ज्ञ ही हा संबध जबरदस्ती तून होता सांगून बलात्कार/ विनयभंग इ. आरोप करू शकते. यात समलिंगी संबंध, लहानमुलांबरोबर संबंध,
पॉर्नोग्राफी, समाज 'अ'मान्य पद्धतीने लैंगिक भावनाचा निचरा इ. बदल असू शकतात.
आणखी एक प्रकार म्हणजे आजारी असण्याच्या बहाण्याने डॉक्टरकडे जाऊन फिजिकल चेकप मध्ये डॉक्टरने अतिप्रसंग केला असा बहाणा करणे. लैंगिक भावनाचा वापर न करता, समाजात टॅबू असणाऱ्या गोष्टी जसे दारू पिणे, मांस भक्षण इ. केल्या तर त्या झाकायला ही हा प्रकार वापरला जातो.

५. बोगस लाँड्री बिल पाठवणे: गावातल्या एखाद्या खऱ्या लाँड्रीच्या बिलाच्या अनेक प्रती सगळ्या महागड्या उपहारगृहांना पाठवून तुमच्या वेटरने अंगावर अन्न/ पेयं/ वाईन सांडली त्यामुळे आलेलं हे कपडे धुवायचं बिल भरा असं पत्र पाठवणे. 'थोडक्यात निभावलं' म्हणून अनेक उपहारगृहे हे बिल भरून मोकळे होतात. पत्ता अर्थात मेल बॉक्सचा असतो.

६. आजी/ आजोबांची फसवणूक: आजोबांना नातवाचा/ नातीचा फोन किंवा मेल येतो की तिला दुसऱ्या देशात अटक केली आहे आणि जामिनासाठी पैसे हवे आहेत. आणि तिला हे आई वडिलांपासून लपवून ठेवायचं आहे. मग काय दुधावरची साय विरघळते.

७. भविष्यकथन: अस्पष्ट दावे ऐकले की माणूस ते आपापल्या बकुवा प्रमाणे आपल्याला चिकटवून घेतो. शारीर हालचाली इ. वरून चुकीच्या माहिती वरून पटकन दूर जायचे आणि बरोबर माहिती ठसवत रहायची... की विजय असत्याचाच होतो. भविष्यकथन काही आपल्याला नवीन नाही.

८. थाई मोती (आपण श्रीलंकन मोती, केरळची वेलची, म्हैसूरचे चंदन, आणि कुठली साडी/ रेशीम इ. म्हणू): परदेशी प्रवाश्यांना ड्युटी फ्री मौल्यवान रत्ने दाखवत अनेक दुकानातून हिंडवणे आणि शेवटी आपल्याच दुकानातून साध्यासुध्या गोष्टी भरमसाठ भावात विकणे. यात अनेक स्तरांत अख्खीच्या अख्खी इंडस्ट्रीही सामील असते.

९. मेरे पिया रहे रंगून (रोमान्स स्कॅम) : ऑनलाईन डेटिंग इ. च्या माध्यमातून रोमँटिक संबंध प्रस्थापित करून मग भेटायचं आहे पण तिकिटाला पैसे मागणे. अर्थात पैसे मागण्यासाठी अनेकविध कारणे सांगता येतात. किंवा पैसे न मागता एनकॅश न होणारे चेक्स पाठवणे आणि पैसे रेमिट करायला सांगणे.

१०. वैयक्तिक माहिती जमा करणे: पे-डे लोन, किंवा इतर लोन देतो म्हणून ग्राहकांकडून माहिती मागवणे आणि नाव, पत्ता, वाहन चालक परवाना इ. माहिती मिळाली की टी विकणे ज्यातून आयडेंटिटीची चोरी करुन त्याच्या नावावर लोन घेणे, खोटी कर भरल्याची पत्रे सरकारला देऊन सोशल सिक्युरिटी इ. चे पैसे घेणे इ.

११.विमा घोटाळा : मुद्दाम वाहनाचा अपघात घडवून आणणे. जसे हा बदमाश सावजापुढे वाहत्या रस्त्यात आपली गाडी आणतो आणि त्याचा दुसरा साथीदार त्या बदमाशाच्यापुढे गाडी आणतो. आता अपघात वाचवण्यासाठी ती बदमाश व्यक्ती अचानक ब्रेक दाबतो. साथीदार वेगात पुढे जातो पण मागून सावज त्या बदमाशाच्या गाडीवर आपटतो. मग इंश्युरंस कंपनीला अवतीर्ण व्हावेच लागते आणि केस आणि खर्च वाचवण्यासाठी कितीही खोटी केस वाटली तरी ती कॉनला पैसे देऊन मोकळी होते.

१२. फिडल गेम : याच्यात दोन व्यक्ती सामील असतात. एक गबाळ्या कपड्यात भारी उपहारगृहात खायला जातो. खाऊन झाल्यावर पैशाचं पाकीट तपासतो तर ते घरी राहिलेलं असतं. मग त्याच्या जवळची कुठली तरी मौल्यवान वस्तू जसं व्हायोलीन इ. तारण ठेऊन घरी पैसे आणायला जातो. तो गेल्यावर दुसरा तिकडे येतो आणि काही अचाट रक्कम देऊन ते फिडल खरेदी करू इच्छितो. पण मग तेवढ्यात त्याला एक फोन येतो आणि तो आपलं कार्ड आणि नंबर देऊन जातो.
थोड्यावेळाने पहिला फाटका माणूस पैसे घेऊन आपलं व्हायोलीन परत न्यायला येतो. पण रेस्टॉरंट ओनर त्या दुसऱ्या व्यक्तीची ऑफर आहे समजून ते जास्त पैशात विकत घ्यायला त्याला पटवतो. नाखुशीनेच फाटका माणूस ते विकायला तयार होतो. रेस्टॉरंट ओनरला आता फायदा होणार वाटते, पण तो दुसरा कधी उगवतच नाही.

इंटरनेट वापरून अजून अनेक प्रकारे फसवणुकीचे सापळे लावलेले सापडतील. वेळ मिळाला की त्यावर लिहितो. तुम्हाला आणखी माहिती असतील तर लिहा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुकेश शर्मा चा काल दुसऱ्या नंबरवरून परत फोन आला.मग त्याला म्हटलं थेट नवऱ्याशी बोल, तो बाहेर गेलाय(समोरच होता.)मग म्हणाला त्यानेच सांगितलंय तुम्हाला जिपे करायला.मग त्याला म्हटलं कर बाबा.बघू काय करतोस पुढे.मग 10000 रु आल्याचा खोटा खोटा sms आला आणि फोन कट झाला.(आता यांच्या पुढचा गेम जनरली'अरे, 12000 करायचे होते, मी चुकून 21000 केले(किंवा उरलेले 2000 करायचे होते, चुकून एक शून्य जास्त टाकून 21000 केले, मला उरलेले परत ट्रान्स्फर करा' हा असतो.तेथवर आम्ही गेलो नाही आणि दोन्ही नंबर ब्लॉक आणि रिपोर्ट करून टाकले)
Sms खोटा आणि बँक च्या नसलेल्या नंबर वरून असतो.त्यात हुबेहूब बँक कडून आलेल्या क्रेडिट sms सारखा मजकूर असतो पण बँक मध्ये पैसे आलेले नसतात.
या स्कॅम चे 2 वेगळे फ्लेवर आहेत:
1. मी चुकून आकडे अदलाबदल होऊन जास्त पैसे पाठवले, मला उरलेले ताबडतोब परत पाठवा, पैश्यांची गरज आहे
2. (जर समोरचा बकरा थोडा जीपे किंवा upi ला कमी सरावलेला किंवा ज्येष्ठ नागरिक असेल तर) मी तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत, qr पाठवतो तो स्कॅन करा.आता हल्ली या स्कॅम पासू। संरक्षण म्हणून qr स्कॅन केल्यावर प्रत्येक upi चा मेसेज येतो की qr स्कॅन केल्यावर तुमच्या खात्यातून पैसे जाणार आहेत, are you sure? त्यावर हो म्हटल्याशिवाय पैसे जात नाहीत.

अमा, नीटसं कळलं नाही. ट्रान्स्फर तांत्रिक कारणाने कँसल झाली पण ते तुमचं नशीब. नंतर, तुमच्या मुलीने मैत्रिणी ला कॉल करून विचारले का नक्की काय झाले ते? मुलीने मैत्रिणी ला जीपे केला तो का प्रोसेस नाही झाला?
कळवा काय झाले ते.

अनू, तू & तुझा नवरा एक्पर्ट होत चालला आहात Happy भाग ५ वा येऊ द्यात. नसती रिस्क आता घेत नाही ही बेस्ट गोष्ट आहे.

रिस्क चं काही सांगता येत नाही.नुसतं जास्त वेळ बोलून ai ला आवाजाचा पॅटर्न देणे ही पण रिस्क असेल.पण त्यातल्या त्यात सावधगिरी बाळगतो.
काल मुलींना(मुलगी+पुतणी) पण या सर्व केसेस सांगून बरंच बौद्धिक दिलं.

Hi aashu29 we got busy with London trip and ghosted the girl for a while

नुसतं जास्त वेळ बोलून ai ला आवाजाचा पॅटर्न देणे ही पण रिस्क असेल.>> हो गं Sad बरोबर आहे. मधेच हिंदी, मराठी मिक्स करत बोलावे का? Lol
१ फेक व्हिडीओ कॉल पण ऐकले होते Uhoh

अमा चांगले केलेत बी व्हिजीलंट!

ब्लू डार्ट किंवा तत्सम कुरिअर कंपनीकडून फोन आणि नंतर पोलिसांना कॉल जोडणे हा मोठा आणि भयानक फ्रॉड आहे. लोक तीन-तीन, सात-सात दिवस डिजिटली अरेस्ट होऊन राहतात (स्काईपवर कॉल सुरू राहतो आणि तुम्हाला ते इतर कुणाशी संपर्क साधू देत नाहीत.) आणि लाखो रुपये गमावतात. पेपरमध्ये बातम्या आल्याच आहेत. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सapp वर एका मुंबईच्या बाईंचा ऑडिओ मेसेज फॉरवर्ड आला होता. त्यांचेही लाखो रुपये बुडाले. नवरा-बायको दोघेही फसले.

हो.एका माणसाने 20 लाख गमावल्याचे काल ऐकले आहे.
फेडेक्स चे पण कॉल येत असतात.कट करते.

ते आधी कुरियर ऑफिस म्हणून ऑडिओ कॉल करतात, तुमच्या नावाचं पार्सल कस्टम मध्ये आलंय आणि त्यात ड्रग सापडलंय.मग 'पोलीस स्टेशनमध्ये' व्हिडीओ कॉल जोडून देतात.बहुतेक हे सर्व अतिशय खरं वाटेल असं करत असावेत.आधार कार्ड नंबर डिटेल्स त्यांच्याकडे असतात.2-3 तास व्हिडिओ कॉल वर कसून चौकशी, दमदाटी,कोणाशी संपर्क करू न देणे वगैरे करतात.आणि पैसे मागतात.ब्लॅकमेल सारखा प्रकार.आणि सोयीस्कररित्या बाकी कोणालाही फोन करता येणार नाही असं बघतात.अजून काही युक्ती असाव्यात.माहीत नाही.

<< ते आधी कुरियर ऑफिस म्हणून ऑडिओ कॉल करतात, तुमच्या नावाचं पार्सल कस्टम मध्ये आलंय आणि त्यात ड्रग सापडलंय.मग 'पोलीस स्टेशनमध्ये' व्हिडीओ कॉल जोडून देतात.बहुतेक हे सर्व अतिशय खरं वाटेल असं करत असावेत.आधार कार्ड नंबर डिटेल्स त्यांच्याकडे असतात.2-3 तास व्हिडिओ कॉल वर कसून चौकशी, दमदाटी,कोणाशी संपर्क करू न देणे वगैरे करतात.आणि पैसे मागतात.ब्लॅकमेल सारखा प्रकार.आणि सोयीस्कररित्या बाकी कोणालाही फोन करता येणार नाही असं बघतात.अजून काही युक्ती असाव्यात.माहीत नाही. >>

------ " तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तुमचा बहुमोल वेळ वाचवितो . मी स्वत: जवळ असलेल्या CBI (कस्टम्स, नार्कोटिक्स ज्यांचा फोन आला आहे ते खाते) कार्यालयांत जातो आणि आतापर्यंत केलेल्या सर्व गुन्ह्यांची कबुली देतो. "

हो.हा उत्तम मार्ग आहे.पण ते इतकं घाबरवत असतील की सुचत नसेल.खूप शहाणी, हुशार, भोळी नसलेली माणसं पण या स्कॅम ना फसली आहेत.एकदा बातम्यांत वाचलं की बाकीचे शहाणे होतात.पण ज्याच्यासोबत पहिल्यांदा होत असेल तो भीतीच्या आहारी जात असेल.(त्यात 40ज मधला असेल तर त्याने लहानपणी केबल वर श्रीदेवी संजय दत्त चा गुमराह पाहिलेला असतो Happy )

प्रत्येकाची फसण्याची एक वेळ ,एक व्हलनरेबल बनवणारं कारण असतं.आणि त्यावेळी नेमके सर्व विवेकी सल्लागार किंवा आपलं स्वतःचं डोकं संपर्कात नसतं.

प्रत्येकाची फसण्याची एक वेळ ,एक व्हलनरेबल बनवणारं कारण असतं.आणि त्यावेळी नेमके सर्व विवेकी सल्लागार किंवा आपलं स्वतःचं डोकं संपर्कात नसतं>> अब्सोल्युटली खरय. म्हणुन मला कधी किती बिंडोक आहेत हे विक्टिम.. किंवा श्या असे कसे फसले अस बोलावसं वाटत नाही. सुपातले जात्यात कधितरी येतातच.. टेक्नॉलॉजी ज्या वेगाने धावतेय एआय सोबतीने त्यात कोणी स्मार्ट पण लीलया फसू शकतचं.

आय टी कंपनीत काम करणारी महिला होती असे बातमीत म्हटले आहे हे जास्त धक्कादायक वाटते. दोन लाख रुपये मागितल्यावरही संशय येत नाही? असे गेलेले पैसे सहजासहजी परत मिळत नाही Sad , त्या खात्यातून ताबडतोब काढले जातात, इतरत्र वळविले जातात.

Pages