वणव्यात पेटला दिवा

Submitted by Saalam Akhtar Dalwai on 19 May, 2024 - 07:05

“आत खूप उकडत आहे कुलसुम, ये आपण व्हरांड्यात बसू या”, असे म्हणत लुंगीवर फॉर्मल शर्ट घातलेले रहिमन काका येऊन खुर्चीवर बसले. एका हातात धरलेली वही फिरवत दुसऱ्या हाताने कपाळावरचा घाम पुसत होते. कुलसुम काकू ही बाहेर येऊन बसल्या. मांडीवर असलेल्या सुपात ठेवलेले लसूण निस्ता त्यांचा संताप व्यक्त केला, “काय ओ ह्या लाईट वाल्यांना बोलायचे, एवढ्या गरम्यागदीत लाईट घालवतात."
“चालायचंच गं."

एवढ्यात अब्दुल घरी येताच त्याच्या वडिलांवर डाफरला, “तुम्ही अजान बंद करण्यासाठी अध्यक्ष झालात का जमातीचे? पुढे आम्हाला म्हणाल नमाज ही पडू नका इथे. हे तुम्ही चुकीचं केलंय अब्बू.”
“अरे बावा थोडा समजुदारपणा दाखवायला लागतो."
“पण नेहमी आपणंच का? ती लोकं का नाही समजून घेत? सगळ्यांची नाच गाणी असतात रस्त्यावर तेव्हा त्रास नाही होत का कोणाला? त्यांच्या सणांना असतो ना लाउडस्पीकर मग दोन मिनिटांची अजान का खुपते एवढी कानात?”
“तसं नसतं रे. आपल्या हिंदूंची कुठे तक्रार आहे. आपण भावंडंच आहोत.”
“मग का बंद केलीत तुम्ही अजान? कोणाला घाबरलात? आपला धर्म सोडून द्यायचा का आपण?”
“अशा वेळी सय्यम बाळगायचा असतो. थोडं सहकार्य करायचं मग सगळं नीट होतं काही दिवसांनी. पण अशा वेळेला रागात काही चुकीचं पाऊल उचललं तर परिस्थिती चिगळून जाते. गावात एकोपा राहिला पाहिजे. नको त्या शुल्लक कारणाने आपले संबंध बिघडता कामा नाही.”
कुलसुम काकूंनी ही अब्दुल ला समजवायचा प्रयत्न केला, “हे बघ राजा आपली संस्कृती फार ससुंदर आहे. चांगल्या वाईटात अख्खा गाव एकत्र येतो तेव्हा कोणी बघत नाही हिंदू कोण आणि मुल्सिम कोण.”
“अगं आता चांगल्याचा जमाना राहिलेला नाही आता सगळे मुसलमान एकत्र येऊन हक्का साठी लढलो नाही तर असच सगळं सहन करत राहू."
हे ऐकताच रहिमान काका खुर्ची वरून उठून उभे राहिले आणि अब्दुलवर चिडले, “अरे काय मूर्खांसारखा बोलतोस तू. कसलं आलाय हिंदू मुस्लिम? त्या फालतू लोकांचे विडिओ वगैरे बघत जाऊ नकोस तुझ्या डोक्यावर परिणाम होतोय. आपण सगळ्यांबरोबर मिळून मिसळून आनंदात राहायचं हीच आपली संस्कृती आहे.”
“अब्बू पण तुम्ही आपली अजान का बंद केलीत?”
पुढे होऊन अब्दुलच्या गालाजवळ हाथ न्हेत ते ओरडले, “कानाखाली आवाज काढेन मला शिकवायला जायचे नाही.”
अब्दुल घाबरून मागे सरकला. डोळे मिचकावत आपला हाथ मागे वाळवलेल्या चेहऱ्यावर आणला. कुलसुम काकू उठून उभ्या राहिल्या, अहो करताय काय. कॉलेज ला जातो आता तो. काय लहान राहिलेला नाही तुम्ही मारायला.”
समोरून राजियाभाना आपल्या साडीचा पदर सांभाळत वेगाने चालत अली. “अरं ऱ्हयमान किती ओरडतास पोराला, अख्खा गाव ऐकतंय."
अब्दुल आत खोलीत निघून गेला आणि ह्या दोघींनी रहिमान काका ला शांत करून गप्पा मारायला लागल्या.

रहिमान काका हे बरीच वर्ष मिरजोळी गावाच्या मुस्लिम जमातीचे अध्यक्ष होते. मशिदीचे काम सांभाळात ती मंडळी काही समाजकार्य ही करायची. कोणा गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणात मदत करणे तर कोणाची आगोट भरायला पैसे देणे अशी बरीचशी समाजकार्य ते जमातीच्या मार्फत करत असे. फारशी काही संपत्ती वगैरे त्यांच्याकडे नव्हती. एक लहानसे कसललेतरी दुकान त्यांचे होते. घर सांभाळण्या एवढे पैसे त्यांच्याकडे होते पण श्रीमंत म्हणण्या एवढा पैसा मुळीच नव्हता. ते जास्त समाजकार्यातच रमत असे. गावात कोणाकडे काही कार्य असेल कुठला सण असेल तर सगळीकडे हे उत्साहाने पुढे असायचे. त्यांचे दांडगे वाचन असून त्यांना अनेक क्षेत्रांचे सखोल ज्ञान होते. लोकांमधील कोणताही वाद ते सोडवत असे आणि सर्व परिस्थिती शांतपणे हाताळत असे. त्यांचे अतिशय हुशार आणि सौम्य व्यक्तिमत्व होते. त्यामुळे गावभर त्यांचा मान होता. प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांना ते आपलेसे वाटायचे.

निवडणुका जवळ आल्या होत्या. प्रत्येक पक्ष नेतेमंडळी आपापल्या पद्धतीने मतदारांना त्यांच्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत होते. काही राजकारण्यांनी अजानवर आक्षेप घेतला आणि लाऊडस्पीकरवरील अजानवर बंदी घालण्याची मागणी केली. काही ठिकाणी वातावरण चिघळ्ळ्याच्या घटनांची नोंद झाली. आपल्या गावाची एकात्मताची संस्कृती जपण्यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रहिमान काका आणि जमातीच्या इतर सदस्यांनी लाऊडस्पीकरवरील अजान तात्पुरती बंद केली. स्वाभाविकंच काहींनी या निर्णयाचा विरोध दर्शवला. कधीतरी आठवड्यातून एक दोन वेळा मशिदीची पायरी चडणाऱ्यांनाही लाउडस्पीकरवर अजान न होण्यामुळे वेदना होताना दिसल्याचे आश्चर्यच वाटले. पण बहुतेक लोकांनी या निर्णयाचे समर्थन केले. काही दिवस परिस्थिती सुधारून वातावरण नेहमी सारखे सुरळीत होई पर्यंत संयम बाळगू असे जमातीचे मत अनेकांना पटलेले होते.
कॉलेज वरून आल्यावर कोणीतरी अब्दुलला भडकावले. तुझ्या वडिलांनी दबावाला बळी पढून अजान बंद केली वगैरे असे कान भरले.

सूर्योदय होऊन थोडा वेळ झाला होता. मंद वाऱ्याच्या सुरात डोलणाऱ्या झाडांच्या मैफिलीमागे सूर्याचे दृश्य रोखले गेले. झाडांच्या फांद्या-पानांतून आपली वाट काढत पुढे सरकणारी सूर्याची कोवळी किरणे डोळ्यांवर पडत होती. पक्षी किलबिलाट करू लागले होते. रहिमान काका त्यांच्या आंगणातल्या आंब्याच्या झाडांभोवती होते. डावा हात कंबरेवर ठेवून ते वर पाहत होते. झाडांवरच्या कैऱ्या आणि मोर पाहून या वर्षी किती आंबे लागणार याचा अंदाज घेण्याचा ते प्रयत्न करीत होते. त्यांच्या बरोबर शेजारचे सलीम काका ही होते.

एवढ्यातच दिलावर दादा समोरून चालत येत असतानाच म्हणाले, “काय ऱ्हयमान भाई, रोज मोजल्यावर काय वाडत नसतात आंबे.”
त्यांच्या बरोबर आलेली त्यांची बायको नाझिया भाभी आपल्या छातीवर ओढणी नीट आहे याची खात्री करून हळू आवाजात बोलली, “गप बसा ओ. तुमच्या पेक्षा मोठे हाइत ते.”
पाठमोरे असलेले रहिमान काका मागे वळले. ते दोघे समोर येताच सलीम काका म्हणाले, “अरे आंबं गेलं चालतील पण तुझ्या माथ्यार केस उरले नाय त्याचं काय करायचं,” हे ऐकताच सगळे हसले.
“ओ आत्ताच व्हराड झालाय त्याचा तुम्ही दोघं त्याच्या बायको समोर काय बोलता त्याला?” रजियाभाना आपल्या दरवाजात उभ्या राहून बोलल्या बोलल्या. यांच्या गप्पा ऐकताच कुलसुम काकू ही बाहेर आल्या. “काय बोलतास नाझिया? दिलावर नी त्रास देला तर सांग हा आम्ही त्याचे कान पिलवटू बेस."
राजियाभान दासवाजातून बाहेर येताच बोलल्या, “आणि बिंदास वागायचा हा, आपल्याकडं बायका बाप्यांच्या खांद्याला खांदा लावून असतात. घाबरायचं नाय नवऱ्याला.”
“हो ते तुझ्याकडून शिकेलंच.” सलीम काका च्या विनोदावर अर्थातच राजियाभाना सोडून सगळे हासले.
“काल अब्दुल आणि साकिब घरी आले होते.” आता नाझिया भाभींनी थोडे मोकळे होण्याचा प्रयत्न करीत सगळ्यांशी बोलण्याची संधी साधली.
राजियाभाना बोलल्या, “अच्छा आमचो साकीब पण आलो काय?”
“काय काम काढले दोघांनी तुमच्याकडे?” रहिमान काकांनी संशयाच्या स्वरात विचारले.
“ते अजान बद्दल कायतरी बोलायला आले होते.” नाझियाभाभींनी माहिती पुरवली.
“वाटलंच!” रहिमान काकांच्या आवाजात संतापाची भावना जाणवली.

काल वडिलांचा ओरडा खाल्ल्यानंतर आपले मत पटवून द्यायला अब्दुल साकिब बरोबर गावातील काही लोकांकडे गेला. त्या दोघांचे असे म्हणणे होते की जर आपला धर्म आपल्याला पाळता येत नसेल तर ते अत्यंत चुकीचे आहे. त्यांचे इतर समाजाचे मित्र मैत्रिणी होते आणि त्यांना कुठल्या धर्माविषयी किंवा लोकांविषयी द्वेष नव्हता. त्यांना सगळ्यांचा आदर होताच पण त्यांना वाटत होते की आत्ता अजान च्या विषयात गप्पा राहिलो आपला निषेध दर्शवला नाही याचे परिणाम पुढे सुद्धा भोगावे लागतील. कदाचित पुढे कोणी आपल्यावर आणखी निर्बंध लादेल आणि आत्ता काही पाऊल उचलले नाही तर तेव्हा मुकाट्याने सगळे सहन करावे लागेल अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली होती. त्यांच्या बरोबर गावातील आणखी काही मुस्लिम मुले होती. थोड्याफार बोटांवर मोजण्या एवढ्या प्रौढांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला.

मिरजोळी हा कोकणातील एक सर्व धर्म समभाव या सिंधान्तावर दृढ विश्वास ठेऊन चालणारा सुसंस्कृत गाव होता. हिंदू मुस्लिम बौद्ध अश्या विविध जाती धर्माचे लोक मिळून मिसळून आपुलकीच्या भावनेने राहायचे. बाहेर कधी काही करणानुसार वातावरण तापले गेले तरी इथे कधीच धर्माच्या नावाखाली काही वाद विवाद झालेले आढळणार नाही. शिमग्याचे दिवस सुरु होते. मिरजोळी गावामध्ये देवी महालक्ष्मी आणि देवी साळूबाई यांचं निसर्गरम्य परिसरात एक मंदिर आहे. तेथे गावातील सगळ्या जाती धर्मातले लोक दर्शन घेत असत. ते हिंदूंचे मंदिर आहे असे कधी कोणी म्हणतांना आढळणार नाही. ते आमच्या गावातले मंदिर आहे असेच सगळ्यांच्या ओठांतून ऐकायला मिळत असे.

शिमगोत्सवामध्ये पालखी सगळ्यांच्या घरी यायची. दर दिवशी वेगवेगळ्या वाडीमध्ये लोक पालखी घेऊन जायचे. तसेच ज्या वाडीत गावातले मुसलमान रहात तिथे सुद्धा पालखी जायची आणि ते लोक अतिशय उत्साहात शिमगोत्सवात सामील होत असत. पालखीला नवस बोलला की तो पूर्ण होणारंच अशी श्रद्धा लोकांच्या मनात होती. मुसलमान वाडीत सुद्धा अनेक मुले पालखीकडे नवस बोलल्याने जन्माला आलेली होती. बरेच मुसलमान जसे आपल्या नोकरी धंद्या साठी अल्लाह कडे दुआ मागत तसेच गावाच्या देवीकडे नवस ही बोलत आणि मग पुढच्या वर्षी पालखी दारात आल्यावर तो नवस फेडत. त्यांच्या वाडीत पालखी आल्यानंतर वाडीच्या मध्यभागी असलेल्या खालिद काकांच्या घरी सगळी मंडळी अल्पोपाहार आणि थंड पेयासाठी थांबायचे. तिथेच चौकात पालखीला नाचवत असत. ते बघण्यासाठी मग आधीच देवींना उल्फा देऊन झालेली मंडळीही तिते जमायची. अश्या प्रकारे शिमगोत्सव हे गावातील मिश्र संस्कृतीच्या गोडव्याच्या अनेक उधारणांपैकी एक.

पण या वर्षी शिमग्याच्या वेळी गावातील एकोप्याच्या चंद्रावर पडलेले काळे डाग दिसू लागले. अब्दुल आणि त्याच्या मित्रांचा असा आग्रह होता की गावातील मुसलमानांनी शिमगोत्सवामध्ये सामील होयचे नाही. जर आपल्याला आपला धर्म पाळता येत नसेल तर इतर धर्म पाळण्यात काय अर्थ आहे हा त्यांचा युक्तिवाद होता. आणि म्हणूनच तो दिलावर दादाच्या आणि इतरांच्या घरी गेला होता. आपल्या वडिलांनी घेतलेला निर्णय त्याला मुळीच मान्य नव्हता.

“हा सगळा प्रकार तुमच्या कानावर घालण्यासाठीच आज आम्ही तुमच्याकडे आलो आहे,” दिलावर दादाने अब्दुलचे कारस्थान सर्वांसमोर उघड केले.
दोन्ही मुलांचे पालक आता चिंतीत होते. त्यांची समजूत काढण्यासाठी सगळे आता रहिमान काकांच्या घरी जाऊन बसले. तिथे अब्दुल आणि साकिबला बोलावून घेतले. आपला मुलगा अभ्यास करून स्वतःचे आयुष्य घडवण्याच्या वयात अश्या नको त्या धंद्यात पडला आहे म्हणून ते निराश झाले होते. आपल्या सारखे समंजस आणि नम्र होऊन सगळ्यांशी प्रेमाने वागून त्याला सर्वांकडून आदर मिळावा अशी त्यांची इच्छा होती. सगळ्या धर्मांविषयी आदरभाव बाळगायला सगळ्या वडिलधाऱ्यांचा आदर करायला त्याला लहानपणा पासून शिकवले होते. त्याच्या विचारसरणीत बदल हे सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून झाले आहे असे त्यांचे मत बनले होते. गावभर लोकांना समजावण्यात अनेक वर्षे वाहून घातलेल्या रहिमान काकांना आता स्वतःच्या मुलाचे मतपरिवर्तन कसे करायचे त्याला सौम्यपणे परिस्थिती हाताळायला कशी शिकवायची हा प्रश्न पडला होता.

ते दोघे हाताची घडी घालून रहिमान काकांसमोर उभे राहिले. आपले वडील आता जाब विचारणार आपल्याला ओरडणार या कल्पनेने अब्दुल घाबरला होता. पण आता यावेळेला आपण आपले मत त्यांच्यासमोर मांडायचेच अशी त्याची जिद्ध असून त्याने या संभाषणाची तयारी केली होती. रहिमान काका अब्दुलकडे डोळे वटारून पाहत त्याची चांगली खरडपट्टी काढणार एवढ्यात काही लोकांनी त्यांच्या घरात प्रवेश केला.

“काय रे भूषण पालखीकडे राहायचे सोडून तुम्ही आत्ता इथे कसे? काय काम काढलंत?” आपल्या मुलाचे उद्योग यांच्या कानावर पडले की काय याची जणू त्यांना भीतीच वाटली. एवढी वर्षे त्यांनी आपली प्रतिमा स्वच्छ आणि सर्वांना सामावून घेणारी ठेवली होती.
“थोडे बोलायचे होते आम्हाला,” सुनील काका हळू आवाजात म्हणाले.
भूषण काका शेजारी उभ्या असलेल्या अमितकडे इशारा करत म्हणाले, “ह्या अमितने कानावर घातले की आता अजान होत नाही म्हणे. काही अडचण आहे का भाई?“
“तुम्हाला माहित आहे ना सध्याची परिस्थिती. कशाला वाद उगाच.”
राजियाभाना बोलल्या, “ओ काय सांगायचा आता, बातम्यात दाखवला कुठं कुठं मारामाऱ्या पण झाल्या."
“पण आपल्याकडे तसा फालतूपणा होतो का कधी? आपण हिंदू मुल्सिम करणाऱ्यांपैकी आहोत का? अहो आम्ही तर रोज पहाटे अजान ऐकून उठतो. दुपारी अजान ऐकून जेवतो. संध्याकाळी शेतावर जाणारी मंडळी आजान ऐकून घरी परतते.”
रहिमान काका बोलले, “बरोबर आहे रे भूषण. पण आपल्याकडे नेहमी सारखे सगळे सुरळीत चालायला पाहिजे उगाच आटा शिका असताना काही नको तो वाद नको म्हणून मीच जमातीला सुचवले की काही दिवस अजान लॉउडस्पिकरवर द्यायची नाही. उगाच कोणाला त्रास मको."
“ओ कसला त्रास आलाय त्यात? असं बोलून आम्हाला अपराध्याची भावना देऊ नका."
“नाही रे तसे नाही."
सलीम काका मधेच बोलले, “भूषणराव आपण चांगले असतो ओ. पण बाहेरचे येऊन कोणी काही दंगा करायला नको. बातम्यात बघताय ना जास्त नाही पण २-३ प्रकार घडले असे.”
“कोणाची हिम्मत एवढी आपल्या गावात येऊन आपल्या लोकांमध्ये बोलायला. कोणीही बाहेरचं आलं तर बघून घेऊ.”
भूषण काका बोलत असतानाच शेखर काका बोलले, “हो रहिमान भाई आम्ही घेतो जबाबदारी. आपल्या मिरजोळीची संस्कृती जपली पाहिजे आपण बाहेर काहीही होउदे. आपला एकोपा टिकला पाहिजे."
“आणि आम्ही या गोष्टींचं समर्थन करत नाही. आपल्या मशिदीत अजान झालीच पाहिजे,” सुनील काका म्हणाले.
भूषण काकांनी बजावून सांगितले, “रहिमान भाई मला काही माहित नाही तुम्ही अजान पुन्हा सुरु करा. कोणाला त्रास असेल तर थेट माजाशी भिडायचं. आपल्या पुढच्या पिढींनाही आपला एकोपा कळला पाहिजे.”
“बरोबर म्हणताय तुम्ही. असा समंजसपणा आणि एकमेकांविषयी चे प्रेम आणि आदर हेच बघत आपली मुले वाढली पाहिजेत आणि त्यांनी ही पुढे तसेच वागले पाहिजे.” रहिमान काका समाधानी होऊन बोलले.
“चला मग निघतो आम्ही गडबड आहे. उद्या संध्याकाळच्या अजान नंतर येतो मग अर्ध्य एक तासात, पालखी घेऊन.”
“हो हो नक्की.”

ते निघताच त्यांच्या मागोमाग अब्दुलही बाहेरच्या दिशेने जात होता.
रहिमान काका चिडले, “काय रे तू कुठे निघालास आता?”
“नारळ आणायला बाजारात चाललोय अब्बू. संध्याकाळी पालकी येईल ना, घरी नारळ नाहीये.”
साकिब म्हणाला, “थांब. मी पण येतो तुझ्या बरोबर."

सालम दलवाई
मिरजोळी, चिपळूण

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा आवडली.
मधे मधे टंकलेखनाच्या चुका दिसत होत्या किंवा बोलीभाषेत तसेच शब्द वापरत असावेत. नक्की कळले नाही. असो.

छान कथा आहे,
लेखन शैली सुद्धा चांगली आहे, काल्पनिक असली तरी वास्तव वाटणारी गोष्ट वाटते.
अशा सकारात्मक कथा अजून याव्यात
पुढील लिखाणासाठी शुभेच्छा