गोष्ट असेल दहा बारा वर्षांपूर्वीची. मी नवी गाडी घेतली त्यावेळची. आधीच्या हॉंडा अकॉर्ड वर दीडशे हजार मैल झालेलेच होते. आता रोजच्या शंभर मैल ऑफिसच्या जा ये साठी ती वापरणं मला थोडं रिस्की वाटायला लागलं होतं. तशा अकॉर्ड अगदी भरवशाच्या गाड्या; दोनशे हजारांपर्यंत सहज जातात. माझ्या मनातली रिस्कची भावना कशामुळे बळावली सांगितलं, तर हसाल तुम्ही! नसतो खरा बऱ्याच जणांचा विश्वास असल्या गोष्टींवर. माझाही नव्हता.
झालं काय, एकदा ऑफिसातून परत येत असतांना रस्त्यात एक कावळा बसलेला होता. क्षणार्धात उडून जाऊ शकणाऱ्या एका पक्षासाठी, माझ्या गाडीचा वेग कमी करण्याचा विचारही मला शिवला नसता. दुर्दैवाने तो कावळा फारच मूर्ख (सॉरी, कावळ्या!) निघाला. अगदी उशिरापर्यंत तो रस्त्यातल्या त्या कशावर टोची मारत घट्ट बसून राहिला. गाडीखाली नक्की काय आलं मला दिसलं सुद्धा नाही; पण तो एक खूट्ट आवाज बरेच दिवस कानांत राहिला माझ्या! कदाचित कावळा शेवटच्या क्षणी उडून गेलाही असेल; पण त्या आवाजाने मी बेचैन झालो. आणि बस, आता ही गाडी काढूनच टाकायची असं मनाने घेतलं. थोडा रिसर्च केला, आणि एका नव्या गाडीचे खूप चांगले रिव्ह्यूज पाहिले. ह्या वर्षीचं टॉप सेलींग मॉडेल, खूप सारी नवीन गॅजेट्स, मस्त लूक आणि मुख्य म्हणजे माझ्या बजेटात बसणारी. डन! अकॉर्ड त्या डीलरकडेच ट्रेड-इन करून ही नवी कोरी गाडी घेतली.
डिलीव्हरी घेण्यापूर्वी चालवून बघितली, आणि मी पारच हुरळून गेलो. काय पिकअप, काय हँडलिंग, आणि एकेक भन्नाट फीचर्स! सेल्समॅनने माझी एक्साइटमेन्ट ओळखली; आणि पाल्हाळ घाईघाईने उरकत म्हणाला, 'हे आता शेवटचंच; अगदी लेटेस्ट फीचर आहे! दोन्ही साईड व्ह्यू मिरर्स मध्ये ब्लाईंड स्पॉट इंडिकेटर्स आहेत. म्हणजे, एखादी गाडी किंवा काही वस्तू अगदी चिकटून तुमच्या थोडीशीच मागे असेल ना, तरी ते माना वळवळून बघत बसायची गरज नाही. रिअर व्ह्यूमध्ये काही दिसत नसलं, तरी बाजूच्या आरशात एक छोटंसं गाडीचं आयकॉन चमकायला लागेल'. वाह! झक्कासच सोय!
नव्या गाडीच्या पहिल्या महिन्याभरात एवढा खुश होतो गाडीवर, एकदम ऑल फाईव्ह स्टार रेटींग द्यायचं रिव्ह्यूमध्ये हे पक्कं होतं. विशेषतः त्या ब्लाईंड स्पॉट इंडिकेशनची एवढ्या वेळा मदत झाली होती, की आतापर्यंत मी ह्याच्याशिवाय ड्राईव्हिंग कसं काय करत होतो प्रश्न पडायला लागला. आता ह्या नव्या गाडीतून रोड ट्रीप करायलाच हवी; म्हणून पहिल्याच वीकेंडला थोड्या दूरच्या एका बर्ड सँक्च्युअरी मध्ये पिकनिकला गेलो.
मनुष्यवस्तीच्या आणि गाड्यांच्या गजबजाटापासून दूर, घनदाट जंगल! निवांत. चहूकडे चाललेल्या पक्षांच्या किलबिलाटामधून, कुठेतरी एखादा अस्पष्ट वाहत्या पाण्याचा आवाज कानावर येई तेवढाच! बर्ड वॉचिंगच्या निमित्ताने दिवसभर बरीच पायपीट करून, संध्याकाळी उशिरा पार्किंग लॉटमध्ये परतलो. आता सबंध लॉटमध्ये तुरळक दोनचारच गाड्या दिसत होत्या. दिवसभराच्या पायपिटीमध्ये जाणवलं नव्हतं, पण आता मात्र एवढी सडकून भूक लागली होती, की ज्याचं नांव ते! निघतांना माझ्या अतिउत्साहामध्ये काही स्नॅक, किंवा एखादा एनर्जी बार काहीसुद्धा बरोबर घ्यायचं विसरलो होतो. आता हायवेला लागेपर्यंत खायला काही मिळण्याची शक्यताच नाही! गाडी सुरु करायला बटन दाबलं, आणि कपाळावर हात मारला; बॅटरी डेड! मला वाटतं, आतले दिवे चालू राहिले असावे दिवसभर. जम्प स्टार्ट ची केबल तर नाहीच जवळ; स्टार्ट द्यायला दुसरी गाडीही नाही कुठे. इन्शुरन्सला फोन करावा, म्हणून फोन बाहेर काढणार तेवढ्यात तो लाल पिकअप ट्रक येताना दिसला.
रस्त्यात उभा राहून, हातवारे करून त्या ट्रकला थांबवलं. एका धिप्पाड नेटिव्ह इंडियन ड्रायव्हरने खिडकी खाली करून, डोळे बारीक करून विचारलं 'वॉस्सप'? ओह, ह्याला मी पार्कमध्ये बघितलं होतं. त्याच्या त्या हॅट वरून मला तर वाटलं, रेंजर असावा. अगदी देवासारखा आत्ता पुन्हा भेटला. मी परिस्थिती समजावून सांगितली. भला होता; त्याच्याकडे जम्प केबल ही होती. फक्त गाडी चार्ज होत असतांना सारखा इकडेतिकडे संशयाने बघत माना हलवत होता. 'असतातच हे लोक जरा विक्षिप्त' म्हणून मी दुर्लक्ष केलं. यथासांग स्टार्ट देऊन माझी गाडी सुरु झाली. मी देऊ करत असलेले पैसे घेणं तर सोडाच; माझ्या दहादहा थँक्यू कडेही फार लक्ष न देता काहीतरी पुटपुटून तो स्वतःच्या ट्रक कडे जायला निघाला. चालतांना, पठ्ठा पुन्हा बारीक डोळे करून इकडे तिकडे आणि आकाशाकडे बघत होता. मागे वळून माझ्याकडेही त्याने साशंक नजरेने एकदोनदा बघितलं. मी गोंधळून विचारलं 'समथिंग रॉंग?'; तर नाही अशा अर्थाची मान झटकून तो ट्रकमध्ये बसला.
'जाऊ दे, मदत तरी केलीन ना, छान' असं मनाशी म्हणून मीही गाडीत बसलो. गाडी सुरूच ठेवलेली होती. रिव्हर्स घातल्याबरोबर चमकलो. दोन्ही साईड व्ह्यू मिरर्स मध्ये गाडीची आयकॉन्स दिसत होती. इथे कुठल्या आल्या गाड्या ब्लाईंड स्पॉटमध्ये? तो ट्रक तर माझ्यापासून काही अंतरावर स्पष्ट दिसत होता. रिअर व्ह्यू कॅमेऱ्यातही दुसरी गाडी किंवा काहीच दिसत नव्हतं. मला गाडीच्या इंडीकेटर्सची थोडी शंका आली. पण 'हुं:! कधीकधी हे स्मार्ट इलेक्ट्रॉनिकस सुद्धा गंडतं!' असं म्हणून रिव्ह्यूमध्ये ही फॉल्स पॉझिटिव्ह ची तक्रार नोंदवायची ह्याची मनाशी नोंद केली. खांदे उडवून, पण जरा जपूनच मी गाडी थोडीशी मागे घेतली, आणि निघालो. मागे काढतांना, व्हिज्युअल सिग्नलच्या पुढची पायरी म्हणून साईड व्ह्यू ऑडिओ सुद्धा बीपबीप करायला लागला.
पार्कबाहेर एक लांबलचक, नागमोडी रस्ता; हा ओलांडला की मग हायवे, आणि रेस्टोरंटची शक्यता! ह्या रस्त्यावर ह्या वेळी एखादी गाडी दिसणं सुद्धा कठीणच. त्या मिट्ट काळोखात सुद्धा, बाजूला कोणी नसूनही पुन्हा इंडिकेशन्स येतजात होतीच. रिअर व्ह्यूमध्ये तो ट्रकही दिसत होता, पुरेसं अंतर ठेऊन मागे येत असलेला. पूर्ण आसमंत गर्द झाडीचा, वळणांचा आणि काळोखी होता; त्यामुळे मी हाय बीम मारून रस्ता शक्य तेवढा उजळून टाकत जात होतो. तसं चिटपाखरूही नव्हतं कुठे; पण न जाणो, अशा भागात कधीकधी हरणं वेड्यासारखी उडी मारून नेमकी गाडीच्या समोर येतात!
एका जास्तच शार्प वळणावर ते ब्लाईंड स्पॉट इंडीकेटर्स पुन्हा चमकायला लागले. सावधानी म्हणून मी प्रथम गाडीचा वेग कमी केला. पण जसजशी गाडी वळू लागली, तसतसं दोन्ही साईड व्ह्यू मिरर्सचं बीपिंग वाढायला लागलं. 'काय पीडा आहे' असं म्हणत मी चक्क गाडी बाजूला घेऊन थांबवली. खाली उतरलो आणि गाडीभोवती फिरून पाहू लागलो. काहीही नव्हतं. वैतागून पुन्हा गाडीत बसायला जाणार, तेव्हा जाणवलं तो ट्रकही माझ्या मागे येऊन थांबला होता. ड्राईव्हर उतरून बाहेर येत होता.
जवळ येऊन मला म्हणाला, 'सो यू हिअरींग इट टू नाऊ?' मी गोंधळलो; 'हिअरींग व्हॉट, द बीपिंग?' तो इकडेतिकडे बघत हलकेच म्हणाला 'दे आर मॅड!' म्हटलं, 'हू इज मॅड?'. 'द बर्ड्स!'. मग त्याच्या ऍक्सेंटेड इंग्लिशमध्ये, कुजबुजत त्याने जे सांगितलं ते ऐकून त्या अंधारात मी हादरलो. त्याला म्हणे पक्ष्यांच्या भाषा कळत होत्या. आमच्या भोवताली पक्ष्यांचे थवेच्या थवे घुटमळत असलेले त्याला जाणवत होते; जे मलाच काय, त्याला स्वतःला सुद्धा दिसत नव्हते. दिसत नसले तरी त्याला त्यांचा आक्रोश मात्र ऐकू येत होता. मी हादरून जाणं साहजिकच होतं ना! अशा जंगलात, एकाकी रस्त्यात, काळोख्या रात्री असलं कोणीतरी चक्रम भेटल्यावर, ह्याला कटवायचं कसं ही चिंता हो! त्यातून मला भूक अनावर होती, त्यामुळे लवकर बाहेर पडून रेस्टोरंट शोधणं ही प्रायॉरिटी होती.
तो म्हणाला 'त्या बर्ड सँक्चुअरी मध्ये नुसते जिवंत पक्षीच नाही रहात. त्या परिसरात बऱ्याच पक्षांचे अतृप्त आत्मेही वावरत असतात'. मनात किंचित हसलो; थोडं टवाळखोरपणे विचारलं, 'आज काय ह्या अतृप्त आत्म्यांची री-युनिअन आहे का? बरेच गोळा झालेले दिसताहेत'! त्यावर किंचितही न हसता, माझ्यावर डोळे रोखून तो म्हणाला 'ते चिडले आहेत; कारण तू त्यातल्या एकाच्या डिनरमध्ये व्यत्यय आणला होतास.' मी एकदा त्याच्या डोळ्यात वेडाची झाक दिसत असेल म्हणून निरखून बघितलं. पण उलट आणखी स्थिर नजरेने रोखून बघत तो म्हणाला 'दिवसभर भुकेला होता बिचारा. जेवण पूर्ण करू न देताच तू त्याला मारून टाकलंस! म्हणून तो आणि त्याचे मित्र कल्लोळ करत तुझ्या गाडीला घेरत येताहेत. तुझ्यासारखेच मलाही ते दिसत नाहीत, पण त्यांचा टाहो स्पष्ट ऐकू येतो मला'. 'हो का? मीही आत्ता जेवायलाच निघालो आहे, पाठलाग करतच असला तर त्याचीही ऑर्डर देईन'. माझा थिल्लरपणा त्याला अजिबात आवडला नाहीय हे स्पष्ट करत तो म्हणाला 'काहीतरी जनावर होतं, रस्त्यात मरून पडलेलं. देणारेस तू?'.
प्रकरण जरा गंभीर होतंय हे बघून मी समझोत्याच्या सुरात म्हटलं 'हे बघ, तू त्या कावळ्याबद्दल बोलत असशील (पण खरंच, ह्याला काय माहिती त्याबद्दल?) तर तो एक अपघात होता. तो वेळेत उडून जाईल अशी खात्रीच होती माझी. आणि मुद्दाम केलं नसलं तरीही मला खूप वाईट वाटलं होतं त्याचं'. ह्यावर तो बोलला काहीच नाही; पण स्वतःशीच मान हलवत मागे ट्रकमध्ये जाऊन बसला.
मी गोंधळून ह्या सगळ्यावर विश्वास ठेवायचा का; आणि ठेवला, तरी हा त्रास आता कधीपर्यंत चालणार असल्या विचारात होतो. गाडी सुरु करून निघायला वेळ लागला मला, तेव्हढ्यात तो ट्रक भरधाव माझ्या बाजूने पुढे निघून गेलाही. त्याला हा रस्ता सरावाचा असावा; सगळ्या वळणांवरून काळोखात तो एवढा पुढे गेला, की मला त्याचे बारीकसे टेल लाईट्स थोडा वेळ दिसत राहिले, नंतर तेही दिसेनासे झाले. हायवे अजून पाचसहा मैल दूर होता. मी जपून डोळे तारवटून चालवू लागलो. साईड व्ह्यू मिरर्स मधूनमधून चमकत होते; पण आता मी पूर्ण दुर्लक्ष करणार होतो.
दहा मिनिटातच दूरवर कोणाचे तरी ब्लिंकर्स लागलेले दिसले, म्हणून स्पीड कमी केला. हजारेक फूटांवर दिसला, पुन्हा तो लाल ट्रक! त्याचेच ब्लिंकर्स, आणि आणि रस्त्याच्या उलट बाजूला ट्रक मध्येच थांबवून, रस्त्यातच उभा असलेला तो नेटिव्ह इंडियन! थांबून त्याला मदत ऑफर करणं भागच होतं. मी गाडी थांबवली, तेवढ्यात तोच जवळ येऊन हातवारे करून मला जा जा सांगत राहिला. थम्ब्स अप करून सगळं आलबेल असल्याचंही खुणावलं. त्या बाजूला, त्याच्या पुढ्यातच काहीतरी जनावरासारखं पडलेलं दिसलं. बहुधा हरीण असावं; ह्या भागात ती रस्त्यात धावत येऊन एखाद्या गाडीशी टकरावणं खूप कॉमन! पण त्याच्या ट्रकला टक्कर झाल्याचं काहीच चिन्ह नव्हतं; कदाचित हरीण आधीच पडलेलं असेल. पण हा कशाला थांबलाय इथे? माझ्या मागून एक गाडी येताना दिसली, म्हणून मीही पुढे निघालो. त्या गाडीला पुढे जायला देऊन हळूहळू जात राहिलो. त्याच्या ट्रकच्या ब्लिंकर्सच्या प्रकाशात, तो आकाशाकडे बघत, जोरजोराने हातवारे करत असल्याचं दिसलं मला. सगळा प्रकारच विक्षिप्त! असं म्हणून मी जात राहिलो.
गाडी धावायला लागल्यावर मला जाणवलं, एवढा वेळ सवयीचे झालेले ब्लाईंड स्पॉट इंडीकेटर्स आता दिसत नव्हते. आश्चर्य म्हणजे, माझी भूकही आता नष्ट झाली होती. काही इच्छाच नव्हती खायची. थेट घरी पोचेपर्यंत मी चाळा लागल्यासारखा पुन्हापुन्हा बाजूला कटाक्ष टाके; पण नाही, ते इंडीकेटर्स उगाचच ऑन नव्हते होत आता. पुढचे काही दिवस ऑफिसला जातायेता, रात्री उशीरा येताना वगैरे तपासून पाहिलं. आता ते व्यवस्थित चालत होते. उगाचच, त्या नेटीव्ह इंडियनला कळवायला हवं असं वाटलं, म्हणून पार्कच्या ऑफिसला फोन केला.
'सॉरी, पण आमच्याकडे अशा वर्णनाचा कोणीच रेंजर काम करत नाही' हे ऐकलं. थोडं आणखी खोदून, मॅनेजरला फोनवर बोलावलं. तो म्हणाला 'तुम्ही म्हणता तसा एकजण होता काही वर्षांपूर्वी इथे; चेरोकी इंडियन होता. एका कार ऍक्सिडेंटमध्ये ह्या पार्कच्या रस्त्यावरच तो दोन वर्षांपूर्वी गेला; रॉन्ग साईडने गाडी चालवत होता वाटतं. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ, आम्ही पार्कमध्ये वटवाघळांच्या गुहा आहेत त्या भागाला त्याचं नांव दिलंय - त्सामेहा वॉकर; त्सामेहा म्हणजे त्यांच्या भाषेत वटवाघूळ! अगदी तीक्ष्ण कान असतात ना त्यांचे! त्सामेहाचा फोटो सुद्धा आहे त्या भागात, बघितला असेल तुम्ही'.
मूकपणे मी फोन तसाच धरून बसलो होतो; त्या मॅनेजरनेच हॅलो हॅलो करत फोन ठेऊन दिला.
मॅन्युफॅक्चरर सर्व्हेमध्ये मी गाडीला फाईव्ह स्टार रेटींग तर दिलंच. विशेष कॉमेंट्स मध्ये 'ब्लाईंड स्पॉट इंडीकेटर्स आर आउट ऑफ धिस वर्ल्ड' असं लिहिलंय. हे रिव्ह्यूज कोणी वाचत असलंच, तरी त्यांना कदाचित नाही समजणार मला काय म्हणायचं आहे.
छान आहे पण खर आहे का केवळ
छान आहे पण खर आहे का केवळ काल्पनिक कथा आहे सर?
आवडली कथा
आवडली कथा
आवडली. काल्पनिकच असणार.
आवडली.
काल्पनिकच असणार.
वाह कमाल
वाह
कमाल
मस्त जमलीये कथा
मस्त जमलीये कथा
छान आहे कथा
छान आहे कथा
मजा आली वाचताना
एक काम करा, त्या कावळ्याच श्राद्ध घाला, पिंडाला शिवायला कावळाच येईल ना ... मग झाल काम
बाकी तुमच्या ह्या कार ची resale value भारी येईल
मस्त जमलीय कथा..शेवटाचा
मस्त जमलीय कथा..शेवटाचा अंदाज आला नाही.
Thik
Thik
भारी आहे कथा.
भारी आहे कथा.
बापरे कसली भारी कथा आहे.
बापरे कसली भारी कथा आहे. जबरदस्त.
सर्वांना अनेक धन्यवाद! ही
सर्वांना अनेक धन्यवाद! ही अर्थातच काल्पनिक कथा आहे, जरी थोडी आत्मवृत्ताच्या ढंगाने लिहिली असली तरी
जबरी!
जबरी!
मस्त जमलीय कथा! डोळ्यासमोर
मस्त जमलीय कथा! डोळ्यासमोर आलं एकदम सगळं.
मस्त जमलीय कथा! डोळ्यासमोर
मस्त जमलीय कथा! डोळ्यासमोर आलं एकदम सगळं.
Mast jamali aahe, avadli.
Mast jamali aahe, avadli.
लई भारी
लई भारी
छान. Birds!
छान.
Birds!
सही जमलिये
सही जमलिये
सर्वांना अनेक धन्यवाद!
सर्वांना अनेक धन्यवाद!
मस्त जमलेय!
मस्त जमलेय!
छान जमलीये! शेवट अनपेक्षित
छान जमलीये! शेवट अनपेक्षित आहे. आत्मवृत्ताच्या ढंगाने लिहिल्यामुळे सत्य घडलेली असावी असे वाटत राहिले.
छान कथा
छान कथा
वाचताना गुंगून गेलो, पुढे काय ट्विस्ट येणार म्हणून.
मस्त. आवडली कथा.
मस्त. आवडली कथा.
छान, वेगळीच कथा! आवडली.
छान, वेगळीच कथा! आवडली.
अजून लिहीत रहा.
अनेक धन्यवाद!
अनेक धन्यवाद!
भारी, आवडलीच. खूप दिवसांनी
भारी, आवडलीच. खूप दिवसांनी छान, भय + रहस्य कथा वाचली
लिहित रहा
चांगलीच जमली आहे.
चांगलीच जमली आहे.
मस्त जमली आहे कथा! आवडली एकदम
मस्त जमली आहे कथा! आवडली एकदम!