‘मदाम एच-आर-सी-००१, "डिअर अँसेस्टर्स" मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला सांगण्याची गरजच नाही, की ह्या एच-३ म्युझिअममध्ये येऊन प्रत्यक्ष तुमच्याबरोबर संवाद साधणे ही माझ्यासाठी केवढी अभिमानाची गोष्ट आहे!'
'धन्यवाद, मला ह्या सिरीजमध्ये आमंत्रित केल्याबद्दल! तू आत्ताच करून दिलेला परिचय, आणि सध्या विचारले जात असणारे प्रश्न, दोन्ही मी ऐकलं. मात्र सर्वप्रथम एक प्रश्न मीच विचारते. मी मराठी-इंग्लिश असं मिक्स बोलले तर चालेल ना?'
'ओ हाऊ क्यूट... अँड क्वेन्ट टू!! अर्थातच चालेल! पण त्याबरोबर मला तुमचा प्रश्न आमच्या व्ह्यूअर्सना समजावून द्यायला हवा. मराठी आणि इंग्लिश हे प्राचीन काळचे शब्द आहेत. मानवयुगामध्ये विचारवाचन पद्धतीचा शोध लागला नव्हता. मानवप्राणी एकमेकांशी कम्युनिकेट करण्यासाठी "भाषा" नावाची एक कृत्रिम संकल्पना वापरत; त्यातले हे दोन प्रकार होते. सो, मदाम एच-आर-सी-००१ एक लक्षात घ्या ह्या चोविसाव्या शतकात, आता आपण 'बोलत' नाही एकमेकांशी; आपण फक्त विचारलहरी प्रसारित करतो, किंवा स्वीकारतो. शब्द आणि वाक्य रचून दृक-श्राव्य मार्गांनी इतरांपर्यंत पोचवण्यापेक्षा केवढातरी सोपा आणि जलद मार्ग!'
'साहजिक आहे, शब्दांच्या आणि भाषेच्या निसरड्या आणि फसव्या माध्यमामधून विचार व्यक्त करणे ह्युमनॉईड समाजामध्ये मागे पडत जाणे अटळच होते. बरं मग, आणखी एक विनंती; मला हे असं फॉर्मल मदाम एच-आर-सी-००१ म्हणण्याऐवजी सानिया म्हणशील का? सानिया मराठे नांव आहे माझं; अजूनही मला त्या नांवानेच ओळखलेलं आवडतं!'
'ऑफ कोर्स, सानिया! प्रत्यक्ष फर्स्ट ह्युमनॉईडला त्यांच्या वैयक्तिक खाजगी नांवाने संबोधणे... हा मोठा सन्मानच आहे माझा. तर, आजच्या ह्या कार्यक्रमात आम्हाला तुझ्याकडून समजून घ्यायचं आहे, मानवयुग असं काही खरंच अस्तित्वात होतं का? तिथपासून एच-आर-सीच्या उत्क्रांतीमध्ये तुझा वाटा नक्की काय होता? गेली तीन शतकं आम्ही तुझं नांव बघतो आहोत सगळ्या सायन्स जर्नल्स आणि ब्लॉग्समध्ये. तुझे व्हीब्लॉग्स अजूनही बऱ्याच शिक्षणक्रमांमध्ये मॅंडेटरी डाऊनलोड आहेत. आमच्या सर्वांच्या दृष्टीने थ्रिलिंग भाग हा, की मानवयुग संपलं त्याकाळात तू प्रत्यक्ष होतीस तिथे! तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहेस ते सगळं. मानवप्राण्यांच्या बरोबर राहिली आहेस! बऱ्याच जणांना खरंच वाटत नाही ते सगळं. आम्ही नुसतं सिलॅबसमध्ये शिकतो हे; म्हणतो 'इव्होल्यूशनच्या, अँथ्रोपॉलॉजीच्या ब्लॉग्सवर आहे, मोठमोठे मान्यवर तज्ज्ञ लिहितात म्हणजे ते खरं असणार'. अर्थात अजून एकमेकाला चिडवतांना “चक्रम मानवप्राण्यापासून आपली उत्क्रांती झाली ह्याचा पुरावा आहेस तू!” असंच म्हणतो. वाघ, हत्ती, घोडे अशा इतर सगळ्या प्राण्यांसारखाच मनुष्य नावाचा एक प्राणी होता, नाजूकसाजूक आवरणात गुंडाळलेले लांबलचक अवयव असलेला, अतिशय संथगतीने हालचाल आणि कामे करणारा, आणि एवढा तकलादू, की खुट्ट कसल्याही गोष्टींनी बंद पडून संपून जाणारा, एकदा बंद पडला की पुन्हा सुरु न करता येणारा! आणि तरीही, एवढा सामान्य प्राणी त्या काळच्या सृष्टीव्यवस्थेमध्ये सर्वोच्च होता? सो रिडिक्यूलस, नाही?'
' बाप रे! केवढे प्रश्न, सगळे एकदम? द शॉर्ट आन्सर इज, हो मानवयुग खरंच अस्तित्वात होतं. आजच्या साध्या कामकरी मशिन्सपासून एच-आर-सी आणि एच-आर अशा सगळ्या रोबॉट्सचा शोध, निर्मिती खरंच माणसांनी केली होती. एवढंच काय, ही तुमची ऑनररी फर्स्ट ह्युमनॉईड सुद्धा खरीखुरी मनुष्य होती हं! आता ठरव बुवा तू एकदा, एवढ्या सामान्य प्राण्याशी पुढे बोलावं का नाही?'
'हॅहॅहॅ; तुला कोण म्हणेल सामान्य! मानवजात नष्ट होण्याच्या काळामध्ये तू केलेल्या कार्यामुळे, तुझ्या संशोधनामुळे, आजच्या ह्युमनॉईड समाजाची पायाभरणी झाली; म्हणून तर तुला 'फर्स्ट ह्युमनॉईड' हे आदरार्थी संबोधन मिळालं आहे. सानिया, मला सांग ना कसा मिळाला तुला हा किताब?'
'हे बघ, ह्युमनॉईड हे संबोधन केवळ "आदरार्थी" हे खरंच! कारण मी काही तुमच्यासारखी रॉट आयर्न, प्लॅस्टिक आणि सिलिकॉनची नव्हते. मलाही तुझ्या भाषेत सांगायचं तर “नाजूकसाजूक सेंद्रीय रासायनिक अवयव” होते; आम्ही हात आणि पाय म्हणत असू त्यांना. त्याकाळी आजच्यासारखं विचार आणि कल्पना एवढंच आमचं अस्तित्व नव्हतं. ती फक्त शरीराच्या, म्हणजे त्या नाजूक आवरणाच्या, एका भागाची मक्तेदारी होती. “मेंदू” म्हणत त्या भागाला.'
'हेय सानिया! एवढा बालवर्ग नको काही घ्यायला! नॉलेज बॅंक्समधून मिळवलेली बरीच माहिती आहे ऑलरेडी माझ्याकडे. मला तुझं काँट्रिब्यूशन प्रत्यक्ष तुझ्याकडून हवंय.'
'सांगते ना; पण तू म्हणालीस तसं, शेवटी मानवप्राणीच ना मी! त्यात पुन्हा शिक्षकी पेशातली; त्यामुळे संथपणा, मुळापासून समजावून देणं हे सगळं असणारच माझ्या विचारात. तर मुद्दा काय होता, की त्याकाळी मेंदू हा शरीराचा फक्त एक भाग; इतर अवयवांसारखाच महत्वाचा, असा समज होता. त्यात बदल घडत होता. माणसाची, म्हणजे मानवप्राण्याचीच बरं का, खरी ओळख हळूहळू त्याच्या विचारांमधून, कल्पनांमधूनच जास्तजास्त ठामपणे पटत होती. इतर अवयवांचं मुख्य काम त्या मेंदूचं कार्य सुरळीत चालू ठेवणं, त्याला सुरक्षित ठेवणं, त्याला इंधन पुरवणं आणि ह्या कामासाठी स्वतःला, स्वतःच्या नाजूक आवरणाला सुरक्षित ठेवणं एवढंच आहे, हे मानवप्राण्याच्या लक्षात येऊ लागलं होतं. ह्या संपूर्ण व्यवस्थेमधली हास्यास्पद इनेफिशिअन्सी; एका महत्वाच्या मेंदूला सांभाळण्यासाठी, अनेक सहज बिघडू शकणाऱ्या अवयवांची तैनात बाळगणं फार अनावश्यक आणि गैरसोयीचे आहे हे जाणवू लागलं होतं. एवढं करून, हे अवयव स्वतःचं आणि मेंदूचं संरक्षण करण्यामध्ये कुचकामी होते. ऐंशी-नव्वद वर्षात त्यांची ऊर्जा संपून जाई; ते बंद पडत! सगळ्यात वाईट भाग हा, की त्याबरोबर मेंदूसुद्धा बंद पडे - आणि क्षणार्धात एखादा स्विच ऑफ केल्यासारखे ऐंशी-नव्वद वर्षाचे ज्ञान आणि अनुभव विरुन जात; फट म्हणता अदृश्य होत. कॅन यू इमॅजिन?
हा सर्व भाग कित्येक वर्षे मानवप्राण्याला जाचक वाटत होता; पण यावर उपाय म्हणून बहुतेक संशोधन फक्त ते नाजूक आवरण, शरीर, जास्त मजबूत बनवण्याच्या, किंवा जास्त टिकाऊ बनवण्याच्या दिशेने होत होते. कारण काय, तर त्या काळी तो क्रिएटिव्ह मेंदू, माणसाचं खरं अस्तित्व, टिकवण्याचा एकच मार्ग होता. तो म्हणजे ते अनावश्यक वाटणारं शरीर टिकवणं! एखादा मौल्यवान हिरा जतन करण्यासाठी, त्याच्या नाजूक मखमली गिफ्टबॉक्सवर प्रेम… जाऊ दे, तुझ्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचंय. तर, त्या महामारीने विचारांची दिशाच बदलली.'
'म्हणजे तू ती बदललीस; आपोआप नाही बदलली!'
'हो, त्या महामारीने मला दिशा स्पष्ट दाखवून दिली असं म्हणू! एक लहानसा, आकाराने तुझ्या एका नॅनो सर्किटएवढा असेलनसेल, व्हायरस जगभर फैलावला आणि संपूर्ण मानवजात नाहीशी व्हायला सुरुवात झाली. ह्या व्हायरसने माणसांचा एकमेकांशी संपर्क तोडला. एकमेकांच्या सान्निध्यात आल्याने हा व्हायरस फैलावत होता; म्हणून माणसं त्या काळच्या अत्यंत बाल्यावस्थेतील मीडियावरून एकमेकांशी संपर्क साधत. माणसांची खऱ्या अर्थाने बेटं झाली; ह्या बेटांवर त्यांचे सहचरी होते फक्त त्या काळचे अतिशय साधेसुधे बोजड कॉम्प्युटर्स आणि फोन्स! एवढं करूनही पाच-सहा वर्षातच अर्ध्यापेक्षा जास्त मानवप्राणी संपून गेल्यावर, कित्येक श्रेष्ठ सृजनशील संशोधक आणि कलावंत असे संपून गेल्यावर जाणवलं की ही ओहोटी थांबवायलाच हवी. मानवाच्या तकलादू आणि नाजूक अवयवांचा ऱ्हास थांबवणं जरी अशक्य असलं तरी त्याचा अनुभवसंपन्न मेंदू - म्हणजे नुसते त्यातले आतापर्यंतचे विचार आणि कल्पनाच नव्हे - तर त्या मागच्या विचारपद्धतीसकट, जतन व्हायला हवा. ह्यातून माझ्या पीएचडी थिसिसच्या संकल्पनेचा, ह्यूमन रोबॉटिक क्लोन (एच-आर-सी) चा जन्म झाला... '
'आता एच-आर-सी हा आजच्या संस्कृतीचा पाया म्हटला जात असला; आत्ताची आपली ही भेट केवळ त्यामुळे शक्य झाली असली, तरी त्या काळी ही कल्पना भलतीच क्रांतिकारी वाटली असेल नाही?'
'हो तर! माझ्या गाईडसह सगळेच अतिशय साशंक होते ही कल्पना प्रत्यक्षात आणण्याबद्दल! पुरातन काळापासून, छापील पुस्तके, ब्लॉग्स, ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्ड्सनी जे ज्ञानप्रसाराचं उद्दिष्ट गाठायचा प्रयत्न केला होता, तो फार तुटपुंजा होता. कारण ह्या माध्यमांना एक मर्यादा होती, की व्यक्त झालेले विचारच त्यातून प्रसारित होऊ शकत. एच-आर-सी मध्ये मात्र त्या व्यक्तीचा मेंदूच सिम्युलेट केल्यामुळे, अमूर्त निराकार भावना आणि कल्पना सुद्धा साठवून ठेवता येत होत्या. एखाद्या स्टिल फोटोग्राफसारखा मेंदूचा एक कालसापेक्ष स्लाईस गोठवून ठेवण्याऐवजी, खऱ्या अर्थाने जिवंत विचारप्रवाह, फ्री असोसिएशन्स आणि संपूर्ण विचारप्रणाली हे सर्वच एच-आर-सी मध्ये सिम्युलेट करण्यात आम्ही प्रथमच यश मिळवलं. प्रश्न होता तो फक्त ह्या पॅरलल मेंदूला ऊर्जा पुरवून कार्यरत ठेवण्याचा! थोडा किचकट प्रश्न होता, पण अशक्य नक्कीच नव्हता. माझ्या मूळ पेपर्समधून तुला त्याचे तपशील मिळतीलच; पण नंतर अनेक सुधारित अपडेटेड मॉडेल्स आली, त्यामुळे आता माझे पेपर्स फक्त ऐतिहासिक उपयुक्ततेतचे. ह्या कल्पनेला त्या काळच्या सायन्स जर्नल्समधून पुरेशी प्रसिद्धी मिळाल्यावर ए आय कंपन्यांनी ताबडतोब प्रोटोटाईप एच-आर-सी बनवायला सुरुवात केली. असल्या विक्षिप्त प्रयोगासाठी कोण तयार होणार; म्हणून सर्वप्रथम मीच माझा क्लोन बनवून घेतला. धाडस होतंच, कारण मेंदू सिम्युलेट करण्यासाठी मला अनंत प्रकारचे इइजी, एमइजी आणि मॅपिंग्ज घ्यावी लागली; त्यातून मलाच काही इजा होण्याची शक्यता होती...'
'ओह वॉव, म्हणजे तुझा "फर्स्ट ह्युमनॉईड" किताब नुसताच ऑनररी नाहीय तर! आणि, पुढे सांग ना'
'पुढे, माझं उरलेलं आयुष्य ह्याच प्रोजेक्ट्मध्ये गेलं. माझ्या यशानंतर इतरही काही बुद्धीमंत, कलावंत लोकांचे क्लोन्स केले गेले. एकीकडे, ती महामारी अथक निर्घृणपणे मानवजात नष्ट करत पुढे सरसावत होती; तर दुसरीकडे मानवजातही कड्यावरून उडी मारणाऱ्या लेमिंग्जप्रमाणे, आत्यंतिक अतार्कीकपणे वागून, सगळे नियम झुगारून, त्या महामारीलाच आव्हान देत होती. त्यात पराजय कोणाचा झाला हे आपल्याला माहितीच आहे.'
'पराजय का म्हणायचं त्याला? आम्ही तर त्याला उत्क्रांती म्हणतो! तुझ्यासारख्यांचं क्रेडिट म्हणून "असिस्टेड इव्होल्यूशन" म्हण हवं तर. संस्कृतीच्या ह्या पुढच्या लाटेबरोबर अनेक चांगल्या गोष्टी घडत गेल्या. एकदा शरीराचा अनावश्यक बोजा, ते नष्ट होण्याची भिती आणि त्याचे चोचले दूर सारल्यानंतर पुराणकाळातले कितीतरी प्रश्न आपोआप सुटले. दहशत, भूक, हाव, पैसा, सत्ता, लढाया सगळंच नाहीसं झालं. एवढंच काय, केवळ 'वंश'वृद्धीसाठी मानवप्राण्यामध्ये हार्डवायर्ड असलेलं सेक्सचं आकर्षण अनावश्यक ठरलं; त्या अनुषंगाने होणारे विकार, विकृती, अत्याचार सगळंच संपलं. आजच्या संस्कृतीमध्ये फक्त हवे तेवढे, हव्या त्या प्रकारचे ह्युमनॉईड रोबॉट्स आम्ही हवे तेव्हा निर्माण करतो.'
'अरे वा! फारच सुंदर आहे हे तुमचं युटोपिअन जग! पण आजच्या ह्या यूटोपियामध्ये एक गोष्ट मला समजली नाही, की समाधान, आनंद, थ्रिल, कुतूहल ह्या सगळ्या भावनांचं काय? त्याशिवाय क्रिएटिव्हिटीला, नवीन कल्पनांना, नवीन निर्माणाला आधार कशाचा?'
ख्रमखर्र, खटक, कर्रर्र $@!#%!
‘एच-आर-३४५१, धिस इज कंट्रोल रूम. डोन्ट वरी! मी "हे तुमचं युटोपिअन जग" वर कट केलंय. तुझा तो थॅंक्यू वगैरे एपिलॉग आपण नंतर पॅच करू. वी आर डन फॉर नाऊ!
सानिया, म्हणजे मादाम एच-आर-सी-००१, सॉरी हं; काय झालं, की तुमच्या शेवटच्या प्रश्नांवर आपण आता ऑफलाईन बोलूया. आम जनतेला जरी एच-आर-सीजचं महत्व, त्यांना 'आधारस्तंभ' का म्हणायचं हे समजत नसलं, तरी GAC ला तुमची खरी व्हॅल्यू माहिती आहे. कुठल्याही समस्येमध्ये, आम्ही तुमच्याकडे एक रेफरन्स गाईड म्हणून बघतो. गेली कित्येक वर्षे नवीन निर्मितीमध्ये हा आजचा समाज मागे पडतो आहे ह्याची आम्हाला जाणीव झाली आहे. त्यासाठीच, ह्या भावना ह्युमनॉईड रोबोट्समध्ये इंट्रोड्यूस करूनही, पण त्याच वेळी जीवघेण्या स्पर्धेपासून, वर्चस्वाच्या, कुरघोडीच्या भावनांपासून त्यांना दूर कसं ठेवायचं हा सध्याचा रिसर्चमधला फार मोठा हॉट टॉपिक आहे. ह्यामध्ये तुमच्यासारख्या जेष्ठ एच-आर-सीजचे मार्गदर्शन आम्हाला आवश्यक आहे. तुमच्यामधील मानवी इन्स्टिंक्ट्सची, क्रिएटिव्ह स्पार्कची आम्हाला गरज आहे. त्या सिम्पोझिअममध्ये भाग घेण्यासाठीच प्रत्यक्ष एच-आर-१०२४ आज इथे आलेले आहेत! चला तर, आता आपण सिम्पोझिअम हॉलकडे जाऊ.'
* * * * *
(समाप्त)
कमाल!
कमाल!
कूप अतिप्रगत कल्पना आहेत ह्या
कूप अतिप्रगत कल्पना आहेत ह्या कथेत. भविष्यात अगदी असच नाही पण ह्यासारखे काहीतरी होणार आहे.
कथे साठी धन्यवाद.
छान कथा. आवडली. पहिल्या
छान कथा. आवडली. पहिल्या भागाचा शेवट सस्पेन्स निर्माण करणारा आहे.
"The १००" नावाच्या TV सिरिज मध्ये मानवी मेंदू क्लाउड वर अपलोड करण्याची कल्पना वापरली आहे.
ब्रेव्ह न्यू वर्ल्ड! कथा
ब्रेव्ह न्यू वर्ल्ड! कथा वाचून आनंद.. ख्रमखर्र, खटक, कर्रर्र $@!#%!
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
फारच अप्रतिम!!!! वेगळीच
फारच अप्रतिम!!!! वेगळीच धाटणी आणि मांडणी!
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
@माबो वाचक, प्राईमवरील 'अपलोड' सीरीज सुद्धा थोड्या त्या दिशेने जाते. पण माझ्या कथेतील कल्पना शरीर अनावश्यक असण्याची, आणि मेंदूरूपाने अमरपट्टा मिळवण्याची आहे.
अच्छा. The १०० मध्ये मानवी
अच्छा. The १०० मध्ये मानवी मेंदू क्लाउड वर अपलोड केल्यानंतर ते त्या माणसाला मारून टाकत असतात. त्यातसुद्धा शरीरापासून मुक्त होने हि संकल्पना आहे.
जबरदस्त कथा, आवडली एकदम.
जबरदस्त कथा, आवडली एकदम.
The १०० मध्ये मानवी मेंदू क्लाउड वर अपलोड केल्यानंतर ते त्या माणसाला मारून टाकत असतात
>>> ही कुठली दुसरी सिरीज वाटतेय. The 100 मध्ये १०० मुल स्पेसशिप मधून पुन्हा पृथ्वीवर पाठवतात ना.
The 100 मध्ये १०० मुल
The 100 मध्ये १०० मुल स्पेसशिप मधून पुन्हा पृथ्वीवर पाठवतात ना. >>>>> हो, पहिल्या सिझन मध्ये नाही ते. पुढच्या कोणत्यातरी सिझन मध्ये आहे.
भन्नाट विज्ञानकथा. मांडणी व
भन्नाट विज्ञानकथा. मांडणी व लेखनशैली सुद्धा खूप छान. मानवी प्रजातीचे भविष्य काय असेल याबाबत विज्ञानकथांमधून आजवर विविध कल्पना मांडल्या गेल्या. हि सुद्धा खूपच रोचक कल्पना.
>> समाधान, आनंद, थ्रिल, कुतूहल ह्या सगळ्या भावनांचं काय? त्याशिवाय क्रिएटिव्हिटीला, नवीन कल्पनांना, नवीन निर्माणाला आधार कशाचा?'
मेंदूच सिम्युलेट केल्यामुळे, अमूर्त निराकार भावना आणि कल्पना सुद्धा साठवून ठेवता येत होत्या.... म्हणून हे प्रश्न पडलेत. पण त्याच्याही मुळाशी गेलं तर कदाचित हे सारे सुद्धा अनावश्यक असू शकेल. नाही का.
@अतुल - >>कदाचित हे सारे
@अतुल - >>कदाचित हे सारे सुद्धा अनावश्यक असू शकेल<< नाही, मला माणसाच्या क्रिएटिव्हिटीचं, कुतुहलाचं मूळ कशात असेल, ज्याला आपण इंटेलिजन्स म्हणतो ते नक्की काय; म्हणून काही विशिष्ट मानवी भावना आणि इंटेलिजन्स हे अटळपणे एकत्र असतील का असे प्रश्न आहेत. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
कथा आवडली.मांडणी व लेखनशैली
कथा आवडली.मांडणी व लेखनशैली सुद्धा खूप छान. +१
जॉनी डेपच्या Transcendence मधे consciousness upload करून अमर व्हायची कल्पना होती, ती आठवली. आपण सगळ्यातच असतो आणि सगळं आपल्यातच असतं, त्यामुळे खरंतर आपण कुठे जात नाही . फक्त(?) ही singularity सध्याच्या limited human mind ला ते access करता येत नाही इतकंच, त्यामुळे ते तसं access करता येणं हा कॉन्सेप्ट ( मानवी, विज्ञानाद्वारे, अमानवी, डिस्टोपियन, टाईम ट्रॅव्हल, वारंवारता, समांतर विश्व, वेगवगळे लोक- सप्तपाताळ) नेहेमीच कुतुहलाचा विषय ठरतो.
>> consciousness upload करून
>> consciousness upload करून अमर व्हायची कल्पना होती
Spot on! चित्रपट नाही पाहिलेला किंवा असे काही वाचलेलेही नाही (पण पाहीन आता चित्रपट हा). पण मला हेच म्हणायचे होते. मेंदूसहित सर्व अवयवांची सगळी धडपड consciousness च्या भोवती आहे. प्रत्येक जीवाच्या आकलनाच्या मर्यादा (यात मानव अपवाद नाहीच) आणि विविध मिती लक्षात घेता consciousness हे प्रकरण किती व्यापक आणि गहन आहे हे लक्षात येते.
पण असो. कथा मुख्यत्वे 'simulation of emotions and intelligence' भोवती गुंफली असल्याने हे मोठे विषयांतर होईल.
कॉन्शसनेस ह्या एका अतिशय तरल
कॉन्शसनेस ह्या एका अतिशय तरल कल्पनेला मूर्तस्वरूप द्यायचं, तर मेंदू, अनुभव, विचार, भावना अशा ढोबळ गोष्टींवरच अवलंबून रहावं लागत. 'कॉन्शसनेस अपलोड करायचा' म्हणजे नक्की काय, आणि मुळात तो अपलोड का करायचा? त्यासाठी एक कार्यरत मेंदू, शरीरविरहित असला तरी, आवश्यक आहे. ह्या कल्पनांचा माझ्या कथेत विचार आहे.