हिमालयातून सुरू झालेली माझी गोष्ट. . .

Submitted by मार्गी on 3 May, 2024 - 04:45

माझा जन्म झाला हिमालयाच्या पर्वतीय परिसरामध्ये. उत्तराखंडच्या पिथौरागढ़ जिल्ह्यात सद्गड नावाच्या अतिशय सुंदर गावाजवळ. हिमालयाच्या पर्वत रांगांच्या मधोमध! सगळीकडे डोंगर, झाडं, पशु- पक्षी अशा वातावरणात मी जन्मलो. अतिशय थंड वातावरण होतं ते. मी आणि माझे भाऊ- बहीण डोंगरात खेळायचो. खूप सुंदर परिसर आणि हीss शांतता होती तिथे. सगळीकडे हिरवंगार वातावरण, माती, शेतं आणि भरपूर थंडी. शिवाय आम्ही जिथे राहायचो तिथे खूप बकर्‍या सोबत असायच्या. मी बकर्‍या आणि गायी- बैलांसोबत खेळायचो. माझे दिवस खूप मजेत जात होते. आजूबाजूला असलेले डोंगर- झाडं मला ओळखीचे वाटायला लागले होते. माझ्या आईसोबत आणि भावा बहिणींसोबत आनंदात राहात होतो. मला कोणतीच चिंता नव्हती. पण एक दिवस अचानक...

अचानक एक दादा मला भेटला. तो माझ्याशी खूप खेळला. आम्ही खूप मस्ती केली. मी त्याला इतका आवडलो की, त्याने माझा फोटोही काढला. मी आनंदात होतो. पुढे मला काय काय भोगावं लागणार आहे हे मला माहितीच नव्हतं. दोन- तीन दिवसांनीच तो दादा परत आला. त्याच्यासोबत अजून एक छोटा दादाही होता. आणि मग एक थोडे भितीदायक दिसणारे काकाही आले. आणि त्यांनी मला उचलून घेतलं! काय होतंय मला काहीच कळालं नाही. माझी शक्ती त्यांच्या शक्तीपुढे अगदी थोडी होती. मला ते कुठे नेत आहेत हे मला काहीच कळालं नाही. बघता बघता त्यांनी मला माझ्या आईपासून आणि भावा- बहिणींपासून लांब नेलं. एका छोट्या बास्केटमध्ये मला बसवलं आणि खूप आवाज करणार्‍या गाडीतून नेलं. मी खूप खूप रडलो. मला खूप त्रास होत होता. ते दोन दादा, ते काका आणि एक काकू मला पाणी द्यायचे व खाऊ भरवायचे. मी सारखा ओरडत होतो. पूर्ण दिवसभराचा तो प्रवास होता. नंतर एका वेगळ्याच जागी मी आलो जिथे सतत मोठमोठे आवाज आणि माणसांची गर्दी होती. मग मी खूप मोठ्याने ओरडणार्‍या एका लांबलचक गाडीमध्ये आलो. मला सारखा त्रास होत होता. आणि आता तर खूप उकडायला सुरूवात झाली होती. परत मी मोठा प्रवास ओरडत आणि रडत पूर्ण केला... मला सारखी माझी आई आणि भाऊ- बहीण आठवत होते.

शेवटी एकदाचा मी एका घराजवळ आलो. माझ्यासाठी एक छोटी ताई वाट बघत उभी होती! तिने मला बघितलं आणि तिला इतका इतका मोठा आनंद झाला!‌ तिने अगदी आरामात मला आडवं उचलून धरलं! तिच्या हातांना मी हळुच चाटलं. खूप नवीन लोक मला भेटत होते. एक मोठ्या आजी मला भेटल्या, त्या ताईची आई मला भेटली. त्या ताईचे मामा- मामीही भेटले. दोन दिवसांनी मला त्या ताईचा बाबाही भेटला. दोन- तीन दिवसांनी मला नवीन घराची थोडी सवय झाली. इथे मला खूप वेगवेगळे आवाज ऐकू यायचे. सारखी भिती वाटायची. पण हळु हळु मी रुळलो. मला ते दोन्ही दादा व त्या आजी आंघोळ घालायच्या. मी घरात शू- शी केली की ओरडायच्या. मलाही कळत गेलं. सगळे माझ्याशी खेळायचे आणि मस्ती करायचे. मलाही छान वाटायचं.

ती ताई तर माझ्याशी खूप खेळायला लागली. मी इकडून तिकडे पळायला लागलो. हळु हळु पायर्‍या चढायला शिकलो. खेळता खेळता मी सगळ्यांना दात लावायचो. मी बाळ असलो तरी माझे दात तीक्ष्ण होते. त्यामुळे त्यांचं रक्तही यायचं. मग मला सगळे ओरडायचे. मला माझ्या आईची व बहीण- भावांचीही खूप आठवण यायची. पण काही महिन्यांनी मी माझ्या नवीन घरी खूप रुळलो. माझी ताईच माझी आई झाली. तिचं नाव अदू हेही मला कळालं. आणि ती मला ॲलेक्स- आलू बुबू म्हणून हाक मारते हेही कळालं. अदू ताईची नानी माझी खूप काळजी घेते हे कळालं.

माझी मस्ती आणि खेळणं बघून सगळ्यांना आनंद व्हायचा. मला खायला हाडांचे बिस्कीट व गोल्डीज मिळायला लागले. ताईच्या बाबाने आणलेला बेल्ट मी तोडला. मला आवडतच नव्हता बेल्ट. दुसरा आणला, तोही तोडला. पण सगळे माझे लाड करायचे. हळु हळु मला कळायला लागलं की, ताई सकाळी शाळेत जाते. मला कळायला लागलं. आणि कोणी बाहेर जाताना दिसलं की मला फार वाईट वाटायचं. आणि जिन्यावर किंवा लिफ्टमध्ये कोणी येण्याचा आवाज आला की मी खूप कान टवकारायचो. दुपारी ताई आली की शेपूट हलवत तिचे लाड करायचो. तीपण मला मिठी मारायची. हळु हळु सगळ्यांना माझी सवय झाली आणि मला सगळ्यांची. मग मीसुद्धा मस्ती करून त्यांना हसवायचो. कधी खूप ओरडाही खायचो.

मला इकडे ऊन्हाचा खूप त्रास होतो. मी हिमालयातला आहे त्यामुळे कायम दोन स्वेटर- मफलर- हातमोजे घातल्यासारखा असतो. पण मला आता सवय झाली. माझी सगळे काळजी घेतात. जेव्हा जेव्हा घरी कोणी येतं तेव्हा मला खूप आनंद होतो. मला त्या प्रत्येकाला भेटायचं असतं. म्हणून मी त्यांना भेटायला जवळ जातो. त्यांच्या अंगावर जाऊन माझे पाय त्यांना लावतो. आनंदामुळे चित्कार करतो. पण माझी भाषाच त्यांना कळत नाही. ते खूपच घाबरतात आणि ओरडतात. काही जण मात्र माझे खूप लाड करतात. ताईची एक काकू माझ्याशी इतकी छान खेळली होती. ज्यांना सवय असायची ते माझे खूप लाड करतात. मलाही छान वाटतं.

माझी मस्ती वाढत गेली. मी बाजूच्या कुत्र्यांशीही बोलायला शिकलो. इथलं वातावरण कठीण असूनही मी इथे आनंदात राहतो. सोबत आई नसली तरी अदू ताई आहे, ताईची नानी आहे. आता तर ताईपेक्षा माझेच जास्त लाड होतात. तिच्या जुन्या खेळण्यांसोबत तर आता मीच खेळतो! आणि नंतर मला कळलं की, त्या दादाने माझा फोटो घेतला होता तो बघून अदू ताई एकदम रडायलाच लागली. मी हवा म्हणून तिने हट्ट केला. आणि खूप खूप ती रडली. तिच्या रडण्यामुळेच थेट हिमालयातून मला त्या दोन दादांनी व काका- काकूंनी अदू ताईकडे आणलं! ह्या वर्षात मी खूप गमती जमती शिकलो. खूप धमाल करायला शिकलो आणि पुढेही तोच माझा विचार आहे. आणि हो, आता मला नारळही सोलून देता येतो. मी आता खूप मोठा दिसतो. आणि अदू ताईपेक्षा मी लहान असलो तरी जास्त शक्तीवान झालो आहे.

- पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने चि. ॲलेक्सचे मनोगत

(अदूच्या तीव्र इच्छेमुळे आलेल्या आणि तिचा लहान भाऊ झालेल्या ॲलेक्सची कहाणी. श्वानप्रेमी असाल तर वाढदिवसाला नक्की यायचं हं!)

- निरंजन वेलणकर 09422108376

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार गोड लिहिले आहे. फोटोही अगदी गोड गोड. Happy
ॲलेक्सला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
ॲलेक्स आणि अदूचे नाते असेच बहरत जावो...!
श्वानप्रेमी आहे, आमच्याकडे पण एक भुभू बाळ आहे, कोकोनट त्याचं नाव. कोकोनटतर्फेही ॲलेक्सला शुभेच्छा. Happy

IMG-20240503-WA0000_2.jpg

काय मस्त पिल्लू आहे. खूप छान लिहीलंय.
मुलीला वाचायला दिलं तर अजून एक पिल्लू पाहीजे म्हणून गोंधळ घालेल.
पाच वर्षांपूर्वी हत्तीच्या पिलाचा व्हिडीओ पाहिल्या पासून तेच पिलू आणून बाल्कनीत ठेवायचं म्हणून हट्ट धरला होता.

पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने चि. ॲलेक्सचे मनोगत..... खूप आवडले. चिरंजीवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.आदूताई छान आनंदी दिसतेय.इतका छान हट्ट पुरवणारे आई बाबा तिला लाभल्याबद्दल त्यांचे कौतुक!

छान लिहिलंय. ॲलेक्स बाळ किती गोंडस आहे!
पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
अदू ताई सोबतचा फोटो क्यूट!
आणि कोकोनट काय गोड दिसतो!!

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! Happy

सर्व श्वानप्रेमींना चि. ॲलेक्सकडून आभार अर्थात् भॉ भॉ!

@ अस्मिता जी, कोकोनट किती क्युट आहे! अदूला दाखवला. @ रघू आचार्य जी! हत्ती!!

@ Srd जी, हिमालयन मेंढपाळ कुत्रा आहे. किंवा त्या परिसरातला गावठी.

आणि हट्ट पुरवला म्हणजे तिच्या इच्छाशक्तीनेच ते झालं. ते नातेवाईक असं पिलू घेऊन येतील असं आम्हांला वाटलंही नव्हतं! मी श्वानप्रेमी असलो तरी घरात कुत्रा पाळण्याचे माझ्यासह सर्व विरोधक होते! पण चि. ॲलेक्सने सर्व विरोधकांना एकत्र आणलं! आणि सगळे जण मग त्याच्या सेवेत गुंतले!