नैसर्गिक विषमुक्त शेती @ आंबोली - एक प्रवास भाग १

Submitted by साधना on 9 April, 2024 - 08:45

डिस्क्लेमर :

१. ही लेखमाला माझ्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित आहे. माझे शेतीविषयक ज्ञान अतिशय मर्यादीत आहे. मला जे पटतेय, परवडतेय व करता येतेय ते मी करत आहे. मी करतेय तेच बरोबर हा माझा आग्रह नाही.
२. मी कुठल्याही एका नैसर्गिक शेती पद्धतीचा प्रचार करतेय असा समज करुन घेऊ नये. जी पद्धत बरोबर आहे असे मला वाटते ती पद्धत मी अनुसरतेय, इतर अनेक पद्धती पाहतेय, माझ्या वातावरणात काय योग्य आहे त्याचा विचार करुन वेळोवेळी शेतीत बदल करतेय, नव्या गोष्टी स्विकारतेय. मी अजुनही शिकण्याच्या मोडमध्ये आहे. अधिकारवाणीने दुसर्‍याला सल्ला द्यायच्या मोडमध्ये मी अजुन नाहीय.
३. मी मुख्यत्वे देशी गायीवर आधारित शेती करतेय. ज्यांना देशी गाय, पाळेकर गुरुजी ह्या विषयाची अ‍ॅलर्जी आहे त्यांनी यापुढचे वाचले नाही तरी चालेल. न वाचल्याने त्यांचे काहीही नुकसान होणार नाही. तरीही वाचायचे असल्यास खुशाल वाचा. वाचुन माझ्याशी वाद मात्र घालु नका. वादात भाग घेण्याइतकी हुशारी व वेळ माझ्याकडे नाही.
४. लिखाण थोडे विस्कळीत वाटण्याचा संभव आहे कारण बर्‍याच गोष्टी आहेत व त्यामुळे एकत्रित नीट मांडणी जमत नाहीय. तरी सांभाळून घ्या.

*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&*&

जुन २०२० ला मी आंबोलीला सहकुटूंब राहायला आले तरी प्रत्यक्ष शेती सुरू करायला डिसेंबर २०२० उजाडले. मला शेतीचे ज्ञान शुन्य! शेतीत रस निर्माण होऊन सुभाष पाळेकर नैसर्गिक शेतीची ओळख झाल्यावर काही शेतांना भेट दिली होती. शेतीनिगडीत वाचन सुरू होते. पाळेकर गुरूजींची तिन, दोन दिवसीय शिबीरे करुन झाली होती, त्यांच्यासोबत एक शिवारफेरी झाली होती. त्यांचे व इतरांचे शेतीविषयक यु ट्युब चॅनेल्स पाहात होते. तरीही गच्चीत केलेल्या कुंडीतल्या शेतीचा अनुभव सोडता प्रत्यक्ष अनुभव मात्र शुन्य होता. अनुभव मिळणार तरी कसा? हाती जमिन नाही तर शेती करणार कशी?? त्यामुळे जेव्हा जमिन हाती लागली तेव्हा आता शेंडी तुटो वा पारंबी, शेती करायचीच हे ठरवुन शेतीत ऊतरले. (जमिन कसायला मिळण्यापर्यंतचा प्रवास इथे वाचा - https://www.maayboli.com/node/80005 )

पर्यावरणाला हानीकारक कृत्रिम रसायने न वापरता नैसर्गिकरित्याच शेती करायची हे डोक्यात पक्के होते, पण प्रॅक्टिकल्स शुन्य! शेती करण्यामध्ये वातावरण हा एक खुप मोठा भाग आहे. तोवर जी शेती मी पाहिलेली तिथले वातावरण शेती साठी योग्य होते. पण आंबोलीतली परिस्थिती वेगळी आहे. अतिवृष्टी हा आंबोलीत मोठा त्रास आहे. पावसाळ्याचे चार-पाच महिने सुर्यदर्शन होत नाही हे लहानपणापासुन ऐकले होते. जुन २०२० पासुन आंबोलीत राहायला लागल्यानंतर ते खरेच आहे याचा प्रत्यय घेतला होता. या वातावरणात शेती कशी करतात याचे कुठलेही मार्गदर्शन कुठल्याही यु ट्युब चॅनेलवर नव्हते.

आंबोलीत शेती म्हणजे पावसाळ्यात नाचणी व भात. ऊन्हाळ्यात वायंगणी भातशेती व ऊस. ज्यांच्याकडे घराच्या आजुबाजुला १-२ गुंठे जागा आहे ते पाऊस गेल्यावर म्हणजे नोव्हेंबरानंतर लाल भाजी, मका, घरापुरते कांदे, सांडगी मिरची करण्यापुरत्या मिरच्या इत्यादी करतात. बाजारात जाऊन भाजी विकण्याइतपत भाजी कोणी करत नाही.

बारा वाड्यांचे आंबोली तसे मोठे गाव आहे, १० ते १५ किमी रुंद व १०-१२ किमी लांब. कर्नाटकातल्या घटप्रभा नदीची उपनदी हिरण्यकेशी नदी आंबोलीत उगम पावते आणि आजरा-चंदगड मार्गे कर्नाटकात पोचते. ह्या नदीला बारा महिने पाणी आहे, आटत नाही. पावसाळ्यात नदीत पाणी खुप वाढते आणि ऊगमापासुन चार पाच किमी खालपर्यंत तिच्या नेहमीच्या मार्गाच्या दोन्ही बाजुने फुटून ती वाहते. ह्या जागी लोकांच्या शेतजमिनी आहेत ज्या पावसाळ्यात पाण्याखाली जातात. नोव्हेंबरांत पाणी ओसरायला लागते तसे लोक आपापल्या जमिनीच्या चारी बाजुला फुटभर ऊंच बांध (मेर) घालुन पाणी शेतात धरुन ठेवतात व डिसेंबरात तिथे भात लागवड करतात. ह्याला वायंगणे म्हणतात व त्यात करतात ती वायंगणशेती.

सावंतवाडीहुन घाट चढुन वर आल्यावर पहिली लागते ती बाजारवाडी. पुढे जकातवाडी, गावठाणवाडी, कामतवाडी वगैरे १२ वाड्या येतात. कामतवाडीपर्यंत सह्याद्री घाटमाथ्याचा अतीवृष्टीचा प्रदेश विस्तारलेला आहे. इथे पावसाळ्यात कायम दाट धुके असते, पावसाची संततधार सुरू असते, हवेत प्रचंड आर्द्रता असते. अर्थात माझ्या बालपणी जितका होता तितका पाऊस आता उरलेला नाहीय पण आंबोलीतील इतर वाड्यांच्या तुलनेत ह्या तिनचार वाड्यांवर खुप पाऊस पडतो, हवा कायम कुंद असते. इथे पावसाळ्यात फक्त स्थानिक झाडे झुडपे कशीबशी तग धरतात; विकतची शोभेची रोपे, गुलाबाची कलमे, झाडे इत्यादी सगळे कुजुन जाते. स्वानुभव Happy

या वातावरणात कोणी शेती करत नाहीत. इथे मैलोनमैल एकर शेती कोणाचीही नाही. १०-१५ गुंठ्यांचे तुकडे असतात, दहा जागी विखुरलेले. या तुकड्यांना इथे वाफल्या म्हणतात. या वाफल्यांवर फक्त भातशेती होते - पावसाळी किंवा वायंगणी. बाकी काही करता येत नाही कारण पावसाळा सोडून इतर वेळी पाणी नसते. वर लिहिलेय तसे शेतात पाणी धरुन ठेवले तर त्यात फक्त भातशेती करता येते, भाज्या करता येत नाहीत.

गावठाणवाडी वगैरे ऊगमापासुन जवळ असल्याने पावसाळ्यात भातशेती होत नाही. कामतवाडीपर्यंत लोक फक्त वायंगणशेती करतात. पावसामुळे ऊस व पावसाळी भात करत नाहीत.

कामतवाडीच्या पुढे वातावरण जरा बरे आहे. त्यामुळे तिथुन पार गडदुवाडीपर्यंत भात व नाचणी व्यतिरिक्त नदीच्या दोन्ही तिरी ऊस करतात. ऊसशेती हे तुलनेत सोपे काम आहे असे लोक म्हणतात. ऊस लावायचा, एक दोनदा भरपुर रासायनिक खत द्यायचे, भरती करायची म्हणजे ऊसाच्या बाळरोपाला दोन्ही बाजुने माती चढवायची. ऊस मनाजोगा वाढत नसेल तर टॅानिक द्यायचे, एक दोनदा तणनाशक फवारायचे आणि निंदणी करुन तणाचा सफाचाट करायचा. दोनचारदा गवे येऊन ऊस चरुन जातात पण तरी तो बिचारा वाढतो. गव्यांना हाकलायला रात्रीचे भर थंडीत शेतात जागत बसावे लागते. डिसेंबरात ऊस लावला की मे पर्यंत हे काम अधुनमधुन करायचे. पाऊस सुरू झाला की मग काहीही बघायची गरज नाही. सगळी ऊसशेती नदीकिनारी असल्याने पावसाळ्यात कित्येकदा शेतात पाणी भरते पण ऊस उभा राहतो. डिसेंबरांत ऊस तोडणीच्या वेळी शेतात परतायचे. ऊस तोडुन कारखान्यात पाठवला की महिनाभरात पैसे खात्यात येतात. म्हणजे शेतमाल कुठे विकावा, किंमत काय मिळणार ह्याचेही टेंशन नाही. त्यामुळे आंबोलीत प्रत्येकजण ऊस लावायला ऊत्सुक असतो.

मी शेती करायचा निर्णय घेतला तेव्हा काय पिक घेऊ हा प्रश्न ऊभा राहिला. करायचे भरपुर काही होते पण शेतात काय होणार हे माहित नव्हते. त्यात सल्ले देणाऱ्यांनी वात आणला. आंबोलीत सर्व काही होते यावर सगळेजण ठाम होते पण प्रत्यक्ष केल्याचा अनुभव सांगणारे कोणीही नव्हते.

मी ठरवलेल्या नैसर्गिक शेतीचे बीजामृत, जीवामृत, आच्छादन आणि वाफसा हे चार स्तंभ आहेत. बीजामृताचा संस्कार करुन बीज लावायचे, जमीन आच्छादित ठेवायची आणि जीवामृत देत राहायचे. आच्छादन कुजत राहते, त्याचा ह्युमस बनत राहतो त्यामुळे वाफसा टिकुन राहतो. सर्व प्रकारच्या नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचे हेच तंत्र आहे. फरक तुम्ही जीवामृत वापरता, गोकृपा वापरता, गांडुळखत वापरता की अजुन काही अठरापगड जातीची सैंद्रिय खते वापरता यातच. बाकी आच्छादन हवेच, ह्युमस वाढायला हवाच व वाफसा टिकवायला हवाच. अर्थात हे किती सोपे किंवा अवघड आहे हे कळायला शेतकर्‍याच्या वंशालाच जावे लागते.

माझे शेत साधारण चार एकराचे असले तरी एका बाजुची दिडेक एकर जमिन म्हणजे निव्वळ खडक. याला इकडे तळाप म्हणतात. कधीकाळी तिथे खोल खड्डा मारुन त्यातुन चिरे काढले होते. तो खड्डा तसाच सोडलाय जो आता विहीर म्हणुन मी फेब्रुवारी पर्यंत वापरते. असेच अजुन अर्धवट मारलेले चारपाच खड्डे शेतात होते. खड्ड्यातुन बाहेर काढलेली दगड माती तशीच कडेवर मोठे ढिग बनुन पडलेली होती. त्याच्या आजुबाजूस झाडेझुडपे वाढलेली. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्र अजूनच आकुंचले होते. शेती करणार हा २०१९ मध्ये निर्णय झाल्यावर जेसीबी घालुन सगळी माती मी खड्ड्यांत परत लोटली, सोबत झुडपांनाही लोटले. तेवढीच थोडी जमिन मोकळी झाली. असे करुन साधारण तिनेक एकर जमिन मी लागवडीसाठी तयार केली.

इतक्या क्षेत्रावर आच्छादन घालायचे म्हणजे टनावारी पालापाचोळा लागेल. तो आणायचा कुठून ?? ऊस पाणी भरपुर पितो आणि जमिनीचा कस कमी करतो असे भरपुर वाचले असल्यामुळे ऊस लावायचा नाही असे मी ठरवले होते. मी घातलेल्या लोखंडी कुंपणावर व तिथल्या मांगरावर सहा-सात लाख खर्च झाले होते. जंगली प्राणी वावरण्याचे प्रमाण आंबोलीत भरपुर आहे त्यामुळे कुंपण गरजेचे. तर हा खर्च भरुन काढण्यासाठी ऊस लावायचा आणि पैसे वसुल करायचे हा सल्ला प्रत्येकजण देत होता. माझ्या शेताला भक्कम कु़ंपण असल्यामुळे प्राण्यांचा त्रास न होता ऊसशेती सहज करता येईल असे लोकमत होते. पण मला ऊसशेतीत रस नव्हता.

माझ्यासाठी व माझ्या सगळ्या कुटूंबियांसाठी लागेल इतका तांदुळ, गहु, भाज्या, कडधान्ये कुठलीही हानीकारक खते, किटकनाशके, तणनाशके न वापरता पिकवायची हे माझ्या डोक्यात होते. मला नैसर्गिक शेती करायची होती आणि ती आंबोलीत अजिबात होणार नाही असे लोकांचे मत होते. आणि हे फारसे खोटे नव्हते. आज रसायनांचा अपरिमित वापर आंबोलीत होतोय, युरिया टाकला नाही तर साधी लाल भाजीही ऊगवुन येत नाही ही स्थिती आहे. गावात कॅंसर पेशंटची संख्या लक्षणीय आहे. पण रासायनीक निविष्ठा वापरल्यामुळे होणार्‍या दुष्परिणामांकडे लोकांनी डोळेझाक केलेली आहे. भरपुर खते देऊन ऊस करायचा आणि पैसे कमवायचे हेच ध्येय आहे. खतांमुळे व एकसुरी पिकांमुळे जमिनीवर होणारे परिणाम, तणनाशकांमुळे पाण्याचे होणारे प्रदुषण इत्यादी बाबी त्यांच्या गावीही नाहीत.

अर्थात याला कारणेही तशीच आहेत.

ईथे गंमत अशी आहे की ईथल्या बहुतांश शेतजमिनमालकांना शेतीत रस नाही आणि जे शेती करतात ते त्या शेतीचे जमिनमालक नाहीत. नोकरी मिळण्याची शैक्षणिक पात्रता नसलेला मोठा तरुण वर्ग इथे आहे जो शेतीकडे पैसे कमावण्यासाठीचा एक जोडधंदा म्हणुन पाहतो. जगण्यासाठी अनेक खटपटी इथले लोक करतात, त्यात ऊसशेती अग्रभागी येते कारण ऊसाचे एकरकमी पैसे हातात येतात. जमिन भाड्याने म्हणजे खंडाने घेऊन ऊस लावायचा. ऊस पाच वर्षे टिकतो, जमिनही पाच वर्षांसाठी मिळते. मग या पाच वर्षात पैसे कमवायचे की प्रयोग करायचे? त्यामुळे न करताच आंबोलीत नैसर्गिक किंवा युरीयामुक्त शेती होणार नाही हा ठप्पा मारला गेलेला आहे. स्वतः शेती करणारे जमिनमालक हाताच्या बोटावर मोजले जातील इतकेच आणि त्यात प्रयोगशील कुणीच नाही. प्रयोग करायला जावे तर निसर्गाची साथ नाही. पावसाळा जवळजवळ सहा महिने रेंगाळतो. इतर प्रदेशाच्या तुलनेत आंबोलीत पिकवाढीचा वेग कमी आहे, ज्या पिकाला गवश्यात किंवा आजर्‍यात तिन महिने लागतात त्याला आंबोलीत सहज साडेचार महिने तरी लागतात. त्यामुळे मार्केटसाठी झटपट भाजीपाला शेतीही फारशी करता येत नाही.

सर्व साधक बाधक विचार करुन मी शेवटी ऊस लावायचा बेत पक्का केला. माझ्यासाठी यामुळे दोन गोष्टी होणार होत्या. एक म्हणजे ऊसाच्या पाल्याचे आच्छादन मिळणार होते व वर्ष अखेरीस थोडे पैसेही मिळाले असते. पुर्ण तिन एकर भाजी वगैरे लावली तर ती विकण्याचा प्रश्न ऊभा राहिला असता. तीन एकरभर भाजी लावायचे ज्ञान व अनुभव तेव्हा नव्हता आणि आजही तितकासा नाही.

ऊसाव्यतिरीक्त अजुन काहीतरी करायची खुमखुमी होती त्यासाठी अर्धा एकर जमिन ठेवायची व ऊरलेल्या अडिज एकरात ऊस लावायचा असे ठरवले. नेहमीसारखा यालाही थोडा विरोध झाला. पण मी दुर्लक्ष केले. पाळेकर गुरूजी एक किस्सा सर्व शिबिरात सांगतात. त्यांना भेटणारे काही शेतकरी त्यांचा किती एकर ऊस आहे हे अभिमानाने सांगतात. घरचे तांदुळ, डाळ, ज्वारी, शेंगदाणा कुठुन आणता विचारले तर बाजारातुन आणतो हे ऊत्तर मिळते. गुरूजी म्हणतात काय हे कर्मदारिद्र्य!! जो आपण खात नाही तो ऊस लावायचा आणि जे आपण खातो ते पैसे देऊन विकत आणायचे, तेही विषयुक्त. मला अर्थात हे करायचे नव्हते. आपल्याला लागणारे धान्य जमेल तितके आपण पिकवायचे हे मी ठरवले होते. त्यासाठी सद्ध्या अर्धा एकर जमिन पुरेशी होती.

क्रमशः

पुढचा भाग : https://www.maayboli.com/node/84965

( चार वर्षांचा लेखाजोखा इथे मांडण्याचा प्रयत्न आहे, थोडे लिहिलेय, बरेचसे लिहायचे आहे, त्यामुळे पुढचा भाग काढण्यास वेळ लागु शकतो.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो जिज्ञासा, मलाही वेगळे करायचे आहे. वेगळे करुन ते बिकण्यासाठी एक प्लॅट्फॉर्म हवा. मला हे जमणार नाही असे वाटत होते. २०२२ मध्ये मी इन्द्रायणी तांदुळ केला, १००-१५० किलोच झाला कारण जागा मर्यादित व लक्ष कमी. पण तो इतका भरकन विकला गेला की मला धक्काच बसला.. मागणी भरपुर पण हातात स्टॉक नाही अशी अवस्था झाली Happy ह्या घटनेने मला खुप कॉन्फिडन्स आला. उत्पादन चांगले असेल तर आरामात विकले जाते हे कळले. मधमाशा लिस्टीत आहेत. जवळच पाडगाव आहे, ते आता मधाचे गाव म्हणुन उदयास आलेय. आंबोलीच्या मधाला पण मागणी असते.

छान लेख साधना
पुढील भाग वाचण्यास उत्सुक
शेती करणार हा विचार रोमँटिक आहे, प्रत्यक्ष करताना बराच पेशन्स हवा. पुढे अनुभव येतीलच तुमचे.
तुम्ही अगदी मनापासून करताय आणि तडीस नेताय हे फारच छान.

आणि अजून एक प्रश्न म्हणजे कामाला गाडी माणसे सहज मिळतात(? की भेटतात? ) का?
शेती काय एकट्याने किंवा फक्त कुटुंबातील ४ व्यक्ती मिळून करण्याची गोष्ट नाही. कारण हा प्रॉब्लेम काही ऐकायला मिळतो (जो खरा सुद्धा आहे ) की माणसेच येत नाहीत/भेटत नाहीत कामाला

छान लिहिले आहे. काहीही अनुभव नसताना शेतीचा प्रयोग करण्याचा निर्णय धाडसाचाच आहे. अजून अनुभव वाचायला आवडतील

साधना.... धाडसाला हॅट्स आॅफ....

मनिम्याउ ..... तुमच्याही पिताश्रींना दंडवत... एक वेगळा धागा काढून सविस्तर लिहिलेत तर बरे होईल....

साधना ताई, मस्त लेख. अजिबात विस्कळित वगैरे वाटला नाही. आधीचे तुमचे लेख, दिनेश दा, जागु बरोबर भटकंती वाचली आहे. त्यामुळे आश्चर्य वाटले नाही Happy तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

साधना ग्रेट, छान सुरुवात. चिकाटी आणि तळमळ जाणवली. खूप खूप शुभेच्छा आणि कौतुक.

मनिम्याउ तुमच्या आई बाबांची कौतुकास्पद कामगिरी, त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा.

खूप कौतुकास्पद आणि प्रेरणादायी प्रवास आहे तुमचा..!
तुम्ही जिथे शेती करताहेत तिथल्या पिकांचा, जमिनीचा, हवामानाचा संपूर्ण अभ्यास केलेला तुमच्या लेखावरून दिसून येतंय..
तुमची जिद्द आणि मेहनत करण्याची वृत्ती भविष्यात तुम्हांला नक्कीच भरघोस यश मिळवून देईल ..!
खूप शुभेच्छा..!

साधना छान लिहिलं आहे. चिकाटी, मेहनत सगळ्याचेच कौतुक. शेतात भरघोस पीक नक्की येणार.

इन्द्रायणी तांदुळ आमचा पण आवडता Happy

मनिम्याऊच्याआईवडीलांचे पण कौतुक वाटते. डिटेलमध्ये वाचायला आवडेल.

साधना, काय छान लिहिलयस. आणि दंडवत तुला __/\__ जबरी मानसिक, शारिरीक तयारी आहे तुझी. किती मोठा निर्णय अन किती कष्ट. खरच खूप खूप कौतुक!
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! ती वाटचाल वाचण्याची उत्सुकता आहे. वेळ मिळेल तसं नक्की लिही.

मस्त लिहिलं आहेस, प्रत्यक्ष शेती करणे किती अवघड आहे हे बघते आहे म्हणून तुझ खुप कौतुक वाटत.
सगळे प्रतिसाद ही छान आहेत.
मनिम्याऊच्या आईवडीलांचे ही खुप कौतुक वाटते.
झालेला खर्च आणि मिळालेले उत्पन्न. याचा ताळमेळ बसतो का? >> जमिनीची किंमत cost मध्ये धरली तर शेतीतून नफा होईल असं वाटत नाही, तुझा काय अनुभव ?

झालेला खर्च आणि मिळालेले उत्पन्न. याचा ताळमेळ बसतो का?>>

माझ्या बाबतीत तरी अजुन बसलेला नाही. उसाचे तिन वर्षांचे एकरकमी पैसे साधारण साडे तिन लाख आले. रनिंग खर्च पण साधारण तेवढाच किंवा थोडा जास्त आहे. यात मी कुंपण/मांगर खर्च व अवजारे विकत घेतली तो खर्च धरलेला नाही.

पण निट नियोजन करुन शेती केली आणि ग्राहक मि़ळवले तर काही वर्षात हा ताळमेळ बसेल. सध्या शेती माझी टॉप प्रॉयरिटी नाही, माझा पुर्ण वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे वेळेवर जिवामृत देणे, अजुन काही खते लागतील का ह्याची चाचपणी करणे, लावलेल्या पिकांची योग्य काळजी घेणे म्हणजे निंदणी वगैरे वेळीच करुन त्यांना वाढीचा स्कोप देणे, वेळच्या वेळी भाज्या/पिके लावुन त्यांना वाढायला वेळ मिळेल असे पाहणे इत्यादी गोष्टी घडत नाहीत. शेती हा फुल टाईम जॉब आहे. तितका वेळ दिला तरच रिझल्ट मिळणार.

आणि शेतीत वेळच्या वेळी कामे होणे फार फार महत्वाचे आहे. गहु लावायचा तर तो नोवेंबर अखेरपर्यन्त शेतात पडलाच पाहिजे, उशीरात उशीरा डिसेम्बर १५. त्याला रुजुन यायच्या आणि लोंब्या लागायच्या वेळेला थंडी लागते. तुम्ही डिसेंबराचा तिसरा आठवडा गाठाल गहु पेरायला तर तो रुजुन येईल पण लोंब्या फुटताना थंडी कुठून आणणार???? मग लोंब्या हव्या तशा फुटणार कशा?

शेंगदाणा उशिरात उशिरा जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत शेतात पडलाच पाहिजे. तरच तो एप्रिल पर्यंत तयार होणार. पेरायला उशीर केला तर तो मे मध्ये तयार होईल. तोपर्यंत पावसाच्या सरी यायला लागतात आणि शेतातच शेंगदाण्याला परत नवे कोंब फुटतात.

माझे हे सगळे करुन झालेय Happy येईलच पुढे मी काय काय दिवे लावलेत ते... Happy Happy

<<<मनिम्याऊच्या आईवडीलांचे ही खुप कौतुक वाटते.>>>
धन्यवाद सगळ्यांना..

झालेला खर्च आणि मिळालेले उत्पन्न. याचा ताळमेळ बसतो का?>>>
वेळेचे योग्य नियोजन हा सर्वात मोठा घटक आहे. तसेच आपल्या शेतजमिनीचा प्रकार, soil quality, पाण्याची उपलब्धता आणि हवामानाचा अभ्यास करून योग्य त्या पिकाची निवड करणे. त्यानंतर उपलब्ध मनुष्यबळ, त्यासाठी होणारा खर्च, तयार मालाला योग्य भाव मिळेल अशी बाजारपेठ बघणे व तेथपर्यंत माल वेळेत पोचणे असे अनेक घटक असतात.
कधी कधी हंगामात भरपूर उत्पन्न झाले असल्यास कमी भाव मिळतो अश्या वेळी भाव वाढेपर्यंत अनाशवंत माल साठवून ठेवण्यासाठी पक्की सोय असणे,
आणि सरतशेवटी निसर्गाची कृपा फार महत्त्वाची असते.
म्हणूनच शेतीला सर्वात बेभरोश्याच काम म्हणतात.
तरी एकंदर जमाखर्च बघता वरील सर्व घटक अनुकूल असतील तर नक्कीच फायदा झालेला आहे

झालेला खर्च आणि मिळालेले उत्पन्न. याचा ताळमेळ बसतो का?>> इंटिग्रेटेड फार्मिंगद्वारे हा ताळमेळ बसवणे शक्य आहे / असते

सर्व घटक अनुकूल असतील तर नक्कीच फायदा झालेला आहे. >> शेतीत सबसिडीचा फार मोठा हातभार असतो, ते पण विसरू नका. अन्यथा Agriculture is a poor business.

https://www.theguardian.com/environment/2021/sep/14/global-farm-subsidie...

साधनाताईंचे सर्व प्रयोग, मेहनत, चिकाटी, निश्चय आणि हे सर्व लेखनाद्वारे उत्तम प्रकारे मांडणं हे सर्व खुप कौतुकास्पद आहे.
त्याच बरोबर अनेक प्रतिसाद ही माहितीपूर्ण आहेत.
सर्वांचे आभार !
साधनाताई, पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहोत .
प्रिया

इंटिग्रेटेड फार्मिंगद्वारे हा ताळमेळ बसवणे शक्य आहे / असते

यावर माहिती पर एक लेख लिहा ना..


शेतीत सबसिडीचा फार मोठा हातभार असतो, ते पण विसरू नका. अन्यथा Agriculture is a poor business.

हो, मी सिडर घेतलाय ज्यावर जवळपास ५०% सबसिडी आहे. माझे नाव लॉटरीत आलेय व योग्य कागदपत्रे अपलोड केलीत. आता बघु पुढची स्टेप काय ते. आता ह्या महिन्यात स्प्रिंकलरसाठी अर्ज केलाय, लॉटरीची वाट पाहतेय. लॉटरीत नाव आले की एस्टीमेट अपलोड करायचे व तिकडुन मंजुरी आली की अवजारे विकत घेऊन ती परत अधिकार्‍याला दाखवुन त्याची मंजुरी घेऊन मग रिफंड क्लेम करायचा अशी प्रोसेस आहे. आधी आपल्या खिशातले पैसे भरावे लागतात त्यामुळे कित्येक शेतकरी ह्या वाटेला जात नाहीत. शेताच्या सातबार्‍यावर आपले नाव असावे लागते. त्यामुळे जमिन खंडाने घेऊन कसणारे बाद होतात. लॉटरी लागुन मंजुरी येईतो अवजार विकत घ्यायचे नाही असा नियम आहे, लॉटरीत नाव किती महिन्यात येणार ह्याबद्दल काही नियम नाही. त्यामुळे लोक अवजार विकत घेऊन वापरतात. नंतर मंजुरीच्या वेळी अधिकारी अवजार तपासायला आले की रंगरंगोटी वगैरे करुन नव्यासारखे अव्वजार करुन त्यांना दाखवतात. म्हणजेच इथे अधिकार्‍याला पैसे खायची सोय सरकारने करुन ठेवलेली आहे. त्याने नामंजुर केले तर पैसे गेले. Happy

महाडिबीटी ही सरकारी वेबसाईट म्हणजे महा डोकेदुखी आहे. स्प्रिंकलरसाठी अर्ज करताना, त्या स्क्रिनमध्ये जी माहिती ती विचारतात ती प्रोफाईलमध्ये कशी भरायची ह्याचा शोध लागायला मला २ महिने लागले. मी कृषी सहाय्यकाला मला येणारा एरर मेसेज दाखवल्यावर तो म्हणाला साईटमध्येच बग आहे. सिडर चा अर्ज जिने भरुन दिलेला त्या विक्रेत्या बाईला विचारले तर ती म्हणाली साईटवर बग आहे, मी स्प्रिंकलरचे अर्ज भरायचे घेतच नाही लोकांकडून. बग बिग काही नव्हता, मला प्रोफाईलवर शोधता शोधता कळले कुठली माहिती मी भरली नव्हती ते. Happy

सबसिडी असलेली अवजारे त्याच प्रकारच्या नॉन सबसिडी अवजारांपेक्षा खुप महाग, जवळजवळ दुप्पट किंमतीची असतात. सबसिडीचे प्रमाणपत्र ५-१० वर्षांसाठी निर्मात्याला मिळते, त्याला त्या अवधी पर्यंत क्वालिटी मेंटेन करावी लागते. सबसिडीसाठी वेगवेगळ्या टेस्ट्स असतात त्याचाही खर्च आहे. त्यामुळे अवजारांची किंमत वाढते. सबसिडी ५० % पासुन ९०% पर्यंत असते, त्यामुळे ती जर मिळाली तर शेतकर्‍याला फायद्याचा सौदा पडतो.

Pages