असेल माझा हरी.. (१)
https://www.maayboli.com/node/84928
असेल माझा हरी.. (२)
https://www.maayboli.com/node/84934
असेल माझा हरी..(३)
https://www.maayboli.com/node/84937
असेल माझा हरी..(४)
https://www.maayboli.com/node/84941
असेल माझा हरी..(५)
मुलं मोठी झाली, की आया बहुतेक मनातल्या मनातच जास्त बोलतात..
तरीही नं हरता, वसुधाने प्रयत्न केलाच, जरा माहिती मिळवण्याचा. आधी घराची, मुख्य म्हणजे हरीची माहिती मिळवण महत्वाचं.. त्याच्याशी जमवून घ्यायचं आहे आपल्याला.. परिसर काय.. नंतर समजून घेऊ..,
“तुझ्यापेक्षा काही नं ऐकवणारा हरीच बरा.. कुठून मिळवलास रे त्याला..? त्याचं घरदार कुठे आहे..?” वसुधाने विचारलंच.
“तुझ्या नं, चौकशाच फार.. आज दिवसभर जरा नीट ऑब्सर्व कर त्याला.. कळेल..” आईला सरळ उत्तर देईल तो श्रेयस कसला..?
'प्रिया आता इथे असती, तर लगेच झापलं असतं तिने श्रेयसला.. ऐसी बाते करता है कोई मम्मी से..? असं म्हणून..’
‘आता हरीला ऑब्सर्व करून, काय त्याची कुंडली कळणार आहे का..? काहीही.. पण सगळी इंद्रिय वापरावीत माणसानं.. ही तिनेच श्रेयसला दिलेली शिकवण तिला आठवली..’
ती दोघं घरी आली तेव्हा श्रेयस ने आपल्या किल्लीनेच दार उघडलं. हॉल मध्येच प्रिया केस मोकळे सोडून खाली बसली होती, आणी हरी खुर्चीवर बसून तिला हेड मसाज करत होता.
‘ओ.. हा हे पण करतो..? इंडियात हे घडतं, तर जरा विचित्र वाटलं असतं.. पण इथे काही विचित्र वाटून घ्यायचं नाही.. श्रेयसला पण काही वाटलं नाही, म्हणजे हे ठीकच असणार.. ’
“अरे! इतनी जल्दी आ गये आप लोग? पसंद आ गयी आपको ये जगह.. आईजी?” प्रियाने विचारलं.
“आईजी नाही गं.. बाईजी.., फक्त आई म्हण..” श्रेयस हसायलाच लागला.
“मी लावू का तुला तेल केसांना? आधी बोलली असतीस तर मगाशीच लावलं असतं..” वसुधाने प्रियाला विचारलं.
“अरे! नही नही .. आँट.. आई.. आप आराम करो. हरी बहोत अच्छा हेड मसाज करता है.. आपको करना है..? अच्छा लगेगा.. कल आप इतना लंबा सफर करके आई हो .. ” प्रियाने विचारलं.
“मला नको आत्ता.. नंतर बघू.. ” वसुधा तिच्या रूम कडे वळली.
तिचं सगळं सामान कपाटात नीट लावून ठेवलं होतं. खाण्याचं सामान किचन मध्ये नेलेलं दिसत होतं.. प्रिया करता आणलेल्या सामानाचे पॅकेटस टेबल वर छान मांडून ठेवले होते. ते तिच्या समोरच उघडायला प्रिया थांबली असणार.. ‘थोड्या वेळात केवढं काम केलं हरीने.. ‘
‘हा हरी करतो तरी काय काय? आणी ह्यांना सापडला कुठे हा?’ तिच्या डोक्यात परत विचार आलेच. ‘ प्रियाला विचारायला हवं.. असा फूल टाइम नोकर किती महाग असेल? सतत उत्साही दिसतो.. दमत नाही .. की उगाच वटवट नाही.. काम तरी किती नेटकं.. ’
“हरी, खानेमे क्या बनाया आज?” आंघोळ करून आल्यावर, हॉल मध्ये सफाई करत असलेल्या हरीशी त्याला ‘ऑब्सर्व’ करता करता वसुधाने संवाद साधायचा प्रयत्न केला. तो एकटाच होता तिथे.
हरीने तिच्याकडे लक्षच दिलं नाही. ‘हिंदी पण नाही कळत ह्याला..? पण निदान आवाज तर कळतो नं..?’
“हरी.. हरी.. हॅलो हरी.. लिसेन.. ” हरीने लक्षच दिलं नाही तिच्याकडे. वसुधाला रागच आला.
‘काय हे..? अगदीच भाव देत नाही आपल्याला.. ह्याचं काय असं वागणंच ऑब्सर्व करायचं का..? सांगावं का श्रेयसला..? की नको..? हा काम सोडून बिडून गेला तर त्यांची पंचाईत. बाकी स्वयंपाक छान करतो.. घर चांगलं आवरतो.. हेड मसाज छान करतो म्हणे..’
हेड मसाज..! वसुधाला प्रियाची काळजी वाटली.. पोरगी एकटी असते घरी कधी तरी.. सेफ आहे नं असं एकटं ह्या मुला बरोबर रहाणं..? तसा दिसायला तर सज्जन वाटतो.. निमुटपणे आपलं आपलं काम करत असतो.. तरी पण अगदीच बधिर वाटतो.. पण श्रेयस प्रियाचं कसं ऐकतो मग..? एकदा बोलायला हवं श्रेयस प्रियाशी.. मामला नाजुक आहे.. श्रेयसला काही विचारलं तर तो त्याचा नेहमीचा डायलॉग मारणार.., तू जरा थंड घे गं.. ! ’
दुपारी जेवणं झाल्यावर प्रिया वसुधाच्या रूम मध्ये आली, तिच्या करता आणलेलं सगळं सामान बघायला. श्रेयस पण येऊंन बसला मग तिथेच. एकेक पुडकं सोडून बघातांना ती जास्तच जास्त खुश होत होती. आणलेल्या कुरतीज लगेच ट्राय केल्या तिने.. काही जरा सैलच आणल्या होत्या वसुधाने मुद्दामहून .. नंतर लागतील म्हणून.. सगळं बघता बघता अन् गप्पा मारता मारता दुपार तशीच सरली.
टेबलवर चहा तयार होता.. ‘केव्हा बरं सांगितला होता ह्याला चहा करायला..?’ हरी तिथेच उभा होता.
“हरी.. प्लीज गेट मी वॉटर..” वसुधाने सांगितलं.
हरी हललाच नाही. त्याला कुणीच रागावलं नाही.
“हरी.. प्लीज गेट ग्लास ऑफ वॉटर..” श्रेयसने शांतपणे सांगितलं.
हरीने पटकन पाणी आणलं. वसुधा काहीच बोलली नाही. ‘बरं झालं, निदान हे ह्या दोघांसमोर घडलं.. त्याने माझं ऐकलं नाही हे तरी कळलं त्यांना.. पण दोघांपैकी कुणीच काही बोललं कसं नाही त्याला..”. वसुधाला थोडा रागच आला..
.....…………………………………..
(क्रमश:)
असेल माझा हरी.. (६)
https://www.maayboli.com/node/84949
छान सुरुये. रोचक
छान सुरुये.
रोचक
कालच तेरी बातों मे ऐसा उलझा
कालच तेरी बातों मे ऐसा उलझा जिया पाहिला तो आठवतोय