(भाग २ - https://www.maayboli.com/node/84900)
आणि खरंच तशी परिस्थिती आली. देवाचं नुसतं नाव घेऊन पुरणार नव्हतं, तर देवाचा धावाच करायची वेळ आली होती.
झालं असं, की परवा रात्री फायनल डेटाबेस अपडेट पुण्याहून आला होता. उदयननं तो टेस्ट करून या सर्व्हरवर डाऊनलोड करून ठेवला होता. आज काम सुरू व्हायच्या पूर्वी तो अपडेट करायचा होता. अर्जुननं आल्या आल्या सर्व्हर सुरू केला. तो डेटाबेस अपलोड सुरू केला, आणि उलुपीला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं. तो गेला डेमोचं किओस्क सेटअप करायला. तिथे जाऊन त्यानं एक पॉवर केबल अडकली होती ती खेचायला झटका दिला, अन्... मेन पॉवरच बंद झाली. बूथमधले लाईट बंद पडले. उलुपी तिकडून ओरडली, "अर्जुन, सर्व्हर बंद झालाय”.
अर्जुन तिकडे धावला. सर्व्हर बंद. दोघंही एकमेकांकडे बघत होते. एकच भिती दोघांच्याही मनात - आता डेटाबेस अप झाला नाही तर...?
अर्जुन पॉवरचं काय झालंय ते बघायला गेला. काही जास्त नव्हतं, मेन्सचा प्लग निघाला होता. तो बसवला, लाईट परत चालू झाले! आता प्रश्न डेटाबेसचा होता. धावत अर्जुन आत आला. तोपर्यंत उलुपीनं सर्व्हर चालू केला होता. सुरुवातीचा डिस्कचेक व्यवस्थित झाला. त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टिम व्यवस्थित लोड झाली. सो फार सो गुड. आता?
"तू डायरेक्ट ॲप्लिकेशन चालू करून बघ", अर्जुन उलुपीला म्हणाला.
तो कमांड लाईनवर डेटाबेस ॲक्सेस करुन बघत होता. नाही, डेटाबेसच सापडत नव्हता. त्याला दिवसा तारे दिसायला लागले!
तेवढ्यात उलुपी म्हणाली "नाही, ॲप्लिकेशन अप नाहीये, मी...”
"थांब, आपल्याकडे कालचा बॅकअप आहे तो रिस्टोर करतोय"
अर्जुननं रिस्टोरची कमांड दिली. रन टाईम एरर! बोंबला...
"मी उदयनला फोन करू का?", उलुपी म्हणाली. तिनं फोन लावला.
अर्जुन डेटाबेस सर्व्हिस पुन्हा चालू करून बघत होता.
उदयननं फोन वर तेच सांगितलं. पण काही उपयोग झाला नाही.
तेवढ्यात बॉस आला. घडलेलं ऐकून त्याचा चेहेरा पडला पण क्षणभरच. त्यानं सांगितलं, "तुम डटे रहो. बाकी डेमो वगैरे मी सांभाळून घेईन. पण लीव्ह नो स्टोन अनटर्न्ड टू गेट इट वर्किंग.” त्याच्या आवाजात किंचित निराशेची छटा होती.
उलुपी म्हणाली, "सर, माझ्या लॅपटॉपवर लोकल ॲप आहे. ते किक ऑफला वापरता येईल. पण तुम्हाला हवा असलेला डेटा सेटअप करावा लागेल.”
बॉसचा चेहेरा उजळला. दोघा मार्केटिंगवाल्यांना त्यानं उलुपीबरोबर कामाला लावलं.
उदयन, मी पुन्हा डीबी सर्व्हिस इन्स्टॉल करतोय.
येस, कर.
पण सर्व्हर वर त्याचं इन्स्टॉलेबल नव्हतं. बोंबला.
अर्जुनला आठवलं, चित्रांगदेचा लॅपटॉप आपण नुकताच सेटअप केला आहे. तिच्या मशीनवर इन्स्टॉलेबल मिळेल.
मग अर्जुनानं चित्रांगदेला फोन लावला. ती ब्रेकफास्टला जातच होती. अर्जुनानं सांगितलं, "ते सोड, कॅब घे आणि तातडीनं इथे ये.” ती तशीच हॉटेल बाहेर धावली.
आता वेळ होता तर अर्जुन उरलेले डेमो किओस्क सेट करायला धावला. बाकी मार्केटिंगवाले त्याच्या मदतीला धावले.
बॉसला कॉन्फरन्सच्या ओपनिंगला जाणं आवश्यक होतं. तो तिकडे धावला.
उदयननं तो पर्यंत स्टॅन्डर्ड कॉन्फिग तयार करून अर्जुनला इमेलवर पाठवली.
चित्रांगदा धावतच धापा टाकत बूथमध्ये आली. तिनं अर्जुनाच्या हवाली तिचा लॅपटॉप केला.
तो नेटवर्कमधे घेऊन त्यानं पॅकेज ट्रान्स्फर सुरू केलं.
घड्याळ टिकटिकत होतं.
कॉन्फरन्सचं ओपनिंग संपलं होतं. आता सगळे गेस्ट बूथ व्हिजिट सुरू करणार... बॉस निघालाय बूथवर यायला.
पॅकेज ट्रान्स्फर संपलं.
अर्जुननं इन्स्टॉलेशन चालू केलं.
बॉस पोचला. परिस्थिती गंभीर.
इन्स्टॉलेशन सांडलं.
अर्जुननं विचार केला. लेट्स गो बॅक टू बेसिक्स – अनइंस्टॉल अन्ड क्लीनअप.
उदयन हो म्हणाला.
ती केली. आता किकऑफला दहा मिनिटे राहिली आहेत.
पुन्हा इन्स्टॉलेशन चालू.
पहिले गेस्ट आले.
इन्स्टॉलेशन झालं! पहिला टप्पा सर! आता कॉन्फिग... उदयननं स्क्रिप्टस पाठवल्या होत्या.
डाऊनलोड फ्रॉम मेल. रन. कॉन्फिग झालं! दुसरा टप्पा सर!
लगेच अर्जुनने डेटाबेस रिस्टोर करायला लावला.
बॉस आता पोडीयमवर. त्याच्याबरोबर उलुपीचा लॅपटॉप.
उलुपीकडे चित्रांगदेचा लॅपटॉप. ती सर्व्हर शेजारी.
चित्रांगदेजवळ बॉसचा लॅपटॉप. ती पोडियम शेजारी.
ती उलुपीच्या गो-अहेडची वाट पहाते आहे.
झालं. लॉग रिस्टोर...
बॉसनं हातात माईक घेतला, प्रेझेंटेशन लोड केलं. चित्रांगदेनं इकडे तेच प्रेझेंटेशन लोड केलंय.
झालं रिस्टोर...
ॲप्लिकेशन रिस्टार्ट...
बॉसनं सगळ्यांचं स्वागत केलं. उगाच एक-दोन विनोद केले.
ॲप्लिकेशन रिस्टार्ट कंप्लीट! उलुपी तयारच होती.
बॉसनं एका जुन्या कस्टमरशी काही आठवणी काढल्या.. वेळ काढायला!
उलुपीनं ॲप चालू केलं, एक नजर टाकली आणि डेमो स्क्रीन लोड केलं. ऑल वेल!
तिनं चित्रांगदेला खूण केली सक्सेसफुल, स्टार्टेड!
चित्रांगदानं चपळाईने केव्हिएम स्विचवर टर्मिनल बदलून बॉसच्या हातात त्याचा लॅपटॉप दिला. बॉसनं आश्चर्यचकित झाल्याचा झकास अभिनय करून जणू काही झालंच नाही अशा थाटात प्रेझेंटेशन चालू केलं.
अर्जुन, उलुपी, चित्रांगदा, मार्केटिंग टीम आणि तिकडे फोनवर उदयन यांचा मिळून एक मोठ्ठा निःश्वास कदाचित आख्ख्या कॉन्फरन्सला ऐकू गेला असेल!
पण उदयनच्या नशिबात सुटका नव्हती! ॲज इट हॅपन्स, अर्जुनला उदयनच्या फोनवर ओरडाआरडी ऐकू आली. अवंतिकेची वेळ झाली होती!
जय हो!
---
एक महत्त्वाचा संभाव्य कस्टमर होता. त्यांची टीम भलं मोठं क्वेश्चनायर घेऊन आली होती. एक किओस्क दिवसभर त्यांनीच अडवलं होतं. नंतर ही सगळी मंडळी त्या बंद खोलीत गेली. जर या कॉन्फरन्समध्ये हा मिलीयन डॉलर कस्टमर विन जाहीर करता आला असता तर मार्केटमध्ये हवा झाली असती. आज ते लोकं आपल्याकडे होते तर ते उद्या कॉम्पीटिटरकडे दिवसभर असणार होते. तो मामला संगीन था! दिवसभर बॉस, मार्केटिंग हेड, एक सेल्स रेप आणि चित्रांगदा त्यांना भिडले होते. संध्याकाळ झाली. कॉन्फरन्सची वेळ संपली, तरीही त्यांचं गुर्हाळ संपलंच नव्हतं. मग बॉसनं झटकन एक मीटिंग रूम त्यांच्याच हॉटेलात बुक केली, आणि त्या टीमला डिनरला इनव्हाईटलं. झालं, चित्रांगदा अडकली! वैतागली होती, पण म्हणाली, "जा, तुम्ही तरी रात्री टाईम्स स्क्वेअर ला जाऊन मजा करून या!"
---
दिवसभर उभं राहून पायाचे तुकडे पडले होतै. आणि सारखं सारखं हसून तोंड दुखायला लागलं होतं. पुणेरी माणसं, त्यांना तोंड वेंगाडून हसायची सवय असणार कशी?!
उन्ह उन्ह पाण्याच्या शॉवर खाली तीन चार मिंटं उभंं राहिल्यावर अर्जुनला शुद्ध आली! तयार होऊन बाहेर पडला तर उलुपी खुर्चीत बसल्या जागीच झोपली होती! त्यानं कडक कॉफी बनवली आणि तिच्या नाकाशी कॉफीचा मग धरला. त्या वासानंच उलुपीला जाग आली. झोपाळलेल्या उलुपीनं त्याला एक स्वीट स्माईल दिलं. पहिला सिप घेतल्यावर ती म्हणाली, "चित्रांगदेचे काय हाल झाले असतील नै?"
"हो ना, आज कल्पना येतेय की आपण बनवलेलं सॉफ्टवेअर कस्टमरला विकण्यासाठी केवढे मरणाचे कष्ट लागतात! किती मगजमारी ती! हजार लोकांना भेटा, त्यांची हांजी हांजी करा, त्यांची बडदास्त ठेवा. वर त्यांच्या फायद्याच्या गोष्टी त्यांनाच पटवा! केवढी झिगझिग आहे..."
थोड्या वेळानं उलुपी तयार झाली. चित्रांगदेला एक एसएमएस टाकला आणि दोघं निघाले.
---
शेलाट्या बांध्याची उलुपी ब्लॅक स्नॅक्स, निळे स्नीकर्स, वरती डार्क कोट, गळ्यात ग्रे स्कार्फ, आणि डोक्यावर व्हाईट वूलन कॅप अशा साजिऱ्या वेशात बाहेर पडली होती. तिच्या बरोबर जीन्सवर टॅन जॅकेट आणि काळी वूलन कॅप घातलेला गोरापान, उंच अर्जुन! जोडी काय शोभत होती, वा! पाच डिग्री (सें) च्या खाली टेंपरेचर होतं. वारं सुटलं होतं त्यामुळे थंडी जास्तच भासत होती. लगटून चालायला आमंत्रण देणारी हवा होती! उंच इमारतींमधून वाहणारा अवखळ वारा उलुपीचे कॅप खालून बाहेर आलेले केस भुरभुरवत होता. हा काही टिपिकल टूरिस्ट सीझन नव्हता. या सुमारास बर्फवृष्टी चा संभव जास्त. त्यामुळे तशी गर्दी नव्हती. रस्त्यावर खेळ मांडणारे नेहमीचे जादूगार आणि इतर नजरबंद जवळपास नव्हतेच. गर्दी होती ती अशाच हौशा-गवश्यांची. पण म्हणून टाईम्स स्क्वेअरचा मूळ दिमाख लोपतोय काय?
ब्रॉडवेच्या थिएटरांमध्ये नेहमीप्रमाणेच नाटकांचे खेळ चालले होते. माऊसट्रॅप, लायन किंग वगैरे जगप्रसिद्ध, ओळखीची नावे थेटरांवर झळकत होती. नाटक सुरू व्हायची वेळ झाली होती. मोठ्या मोठ्या काळ्या लिमोझिनसदृश गाड्या तिथे येऊन थांबत होत्या. एखादी गाडी थांबली की गणवेशातला दारवान पुढे होऊन गाडीचं दार उघडे. त्यातून उंची कपडे ल्यालेलं एखादं देखणं जोडपं उतरे, कधी तरूण तर कधी वयस्क. दृष्ट लागेल असं देखणेपण, आरोग्य, श्रीमंती, आणि उत्तम अभिरुची यांचा समन्वय असावा तर असा! कोपऱ्यावर उभे राहून हे दृष्य पहाणारे अर्जुन -उलुपी त्यात हरवून गेले होते, हरखून गेले होते, आपण कधी हातात हात घेतला आणि आलिंगून उभे राहिलो हे त्यांच्या गावीही नव्हतं. मंत्रमुग्ध झालेला अर्जुन रोमांचित झाला होता. तो मनात मांडे खाऊ लागला. ती युवती उलुपी आणि तो तरुण मी! त्याच्या मनाच्या तारा झंकारू लागल्या. जणू त्या झंकारानंच स्वप्नसमाधीतून जाग येऊन उलुपीनं वळून त्याच्याकडे मान वर करून पाहिलं. या मनीचे त्या मनी झालेच जणू! शेजारच्या बिलबोर्डवर अचानक झळकलेल्या निऑन रंगांत निथळणाऱ्या जाहिरातीतून रस्त्यावर सांडलेल्या भीषण प्रकाशधारांनी त्यांची तंद्री मोडली. उलुपीला खळखळून हसू फुटलं! आणि कानात वारं भरलेल्या वासरासारखी अर्जुनचा हात पकडून त्या गर्दीत बागडू लागली. तिच्या चालीत मोरपिसांचा हलकेपणा होता, निर्झराचा अवखळपणा होता, अन् प्रणयिनीची ओढ होती!
आजूबाजूला स्वररंगगंधांचा खजिना खुला झाला होता. वाहाणाऱ्या गर्दीत जणु तो खजिना लुटणारे हा यक्ष आणि ती यक्षिणी! रस्त्याकडेला जीवघेण्या थंडीतही कोणी अनामिक अर्धअनावृत काऊबॉय त्याच्याच तंद्रीत गिटार वाजवत होता. एक चुकार जादुगार लोकांना वेडं करत होता. चमकत्या गोळ्यात बघून कुणी भविष्यवेत्ती लोकांना आकर्षित करत होती. तिला बघून उलुपीचे पाय थबकले! ती थांबताच अर्जुन चकित झाला. त्याच्या चेहेऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघून उलुपीच्या चेहेऱ्यावर मिष्कील स्मित उमटले. "विचारू का तिला आपल्याला मुलगा होणार की मुलगी?" अर्जुनच्या चेहेऱ्यावरचे भाव कॅलिडोस्कोप सारखे झरझर बदलले. त्याच्या चेहेऱ्यावर पुरुषसुलभ लज्जेची लाली उमटली. झटकन टाचा उंचावून तिनं त्याच्या गालाचा आवेगानं मुका घेतला. पुन्हा ती वळून त्याचा हात पकडून ती गर्दीत मिसळली. आता तर तिचे पांव जमीं पर नही पड रहे थे!
---
कॉन्फरन्स संपली. पुन्हा सामानाची बांधाबांध झाली. माल चढवून व्हॅन्स मार्गस्थ झाल्या. ही व्हॅन चालवत असलेला बॉस थकलेला पण समाधानी होता. कस्टमर तर गाठीला लागलेच होते, पण एक भारी टीम हाताशी आल्याचं समाधान होतं. चित्रांगदा त्याच्यासाठी स्टार परफॉर्मर होती -
ती भविष्यात एक चांगली प्रॉडक्ट मॅनेजर निश्चित बनेल. तो प्रॉब्लेम आला तेंव्हा अर्जुन डगमगला नाही. आणि उलुपीनं तर एक वर्किंग अल्टरनेटिव्ह दिला. हे चांगले टेक्निकल रिसोर्सेस घडताहेत, नाही? या तिघांच्या खांद्यावर या प्रॉडक्टची जबाबदारी टाकली तर नव्या प्रॉडक्टसाठी मला बॅन्डविड्थ मिळेल?
विचार करता करता त्यानं वळून मागच्या सीटवर पाहिलं. त्याची नव्या दमाची टीम एकमेकांच्या आधारानं, कुणी कुणाच्या खांद्यावर मान टाकून थकून-भागून झोपी गेलेली होती! त्याच्या चेहेऱ्यावर आपसूकच स्मित उमटलं. गाडी न्यूयॉर्कमधून बाहेर पडून इंटरस्टेटला लागत होती. पूर्व क्षितिजावर भला मोठा वुल्फ मून (जानेवारीतली पौर्णिमा) उगवला होता. शीतल, आश्वासक, आनंददायी.
(समाप्त)
मस्त झाली ही पण कथा! एकूणच
मस्त झाली ही पण कथा! एकूणच वातावरणनिर्मिती भारी जमलीये!
खूप छान.. पुन्हा पुन्हा
खूप छान.. पुन्हा पुन्हा वाचावी अशी..
खूप मस्त जमलेय.
खूप मस्त जमलेय. ही सिरीज छान आहे.
मस्तच.... आवडली कथा.
मस्तच.... आवडली कथा.
लई भारी! आवडली कथा.
लई भारी! आवडली कथा.
लई भारी! आवडली कथा.
डबल पोस्ट
किती सुंदर वर्णन! किती
किती सुंदर वर्णन! किती प्रभावी वातावरणनिर्मिती!
मनाची उत्फुल्ल अवस्था शब्दांत पकडण्याची कला तुम्हाला साधली आहे...!!!
फार आवडले सगळे!
छान झाली कथा! आवडली.
छान झाली कथा! आवडली.
काही वर्षांपूर्वी मायबोलीवर एक अशीच आयटी कंपनीची पार्श्वभूमी असणारी प्रेमकथा आली होती. त्यातल्या नायिकेचं खरं नावच चित्रांगदा होतं बाकी अर्जुन-उलूपी वगैरे नव्हते मात्र. मस्त होती तीही कथा. 'क्षणातून मुक्त होण्यासाठी' असं काही तरी नाव होतं. सहज आठवलं.
खुप आवडली.
खुप आवडली.
अरे भारीच जमली आहे कथा.
अरे भारीच जमली आहे कथा.