'तो'आणि 'ती'चे मैत्र

Submitted by ब्लू कोलंबसे on 28 March, 2024 - 07:01

१.

बराचसा काटकोनी दिसणारा आणि आटोपशीरसा असणारा तो फ्लॅट रंग देऊन तयार झाला होता. " आता आणखी एक वल्ली येणार इथे राहायला! मागच्या त्या कर्कश्श पोरापेक्षा, एखादी शांत मुलगी आली तर कसलं भारी!!" आपली पाने सळसळवत त्या गरम दिवसाच्या शेवटी विचार करीत 'तो' उभारला होता, घट्टपणे!

गोऱ्या लोकांचा प्रदेश तो!!(इ.स.१८२२) जुन्या काळी, अगदी गावाबाहेर, पारशी, ब्रिटीशांच्या बंगल्यांनी तयार झालेला! सोबत त्या वस्तीची सोय म्हणून एक 'हळ्ळी' सुद्धा येऊन चिकटलेली!! पुढं स्वातंत्र्य आलं तेव्हा 'तो' ४ फुटांचासुद्धा नसेल! एका गोठ्याशेजारी ताडमाड वाढू लागला. मुळे पार खोलात गेली. विस्तारली. कधी एखाद्या मुळाशी पाण्यातून वाहणारी मासोळी त्याला गुदगुल्या करून जायची. वर्षं सरली. बदल झपाट्याने होत गेले. मग आला तो सध्याचा, तंत्रज्ञान उदयाचा काळ!

तेव्हा हा भाग झपाट्याने कात टाकताना त्याने पहिला. त्याची एक एक झावळी जशी रुंद होत होती, तशीच आजूबाजूच्या रस्त्यांचीही रुंदी वाढू लागली. त्याच्या खोडाची उंची/लांबी थिटी पडावी, अशी उंचच उंच इमारत-बिल्डींगांची दाटी त्याच्या आजूबाजूस झाली. त्यास खेटू लागली. 'तो'ही नव-नवे लोक, अनेकविध पदार्थांचे गंध, चित्रविचित्र गाणी, यंत्रांचे, आधुनिक गाड्यांचे आवाज ऐकत एकेक ऋतू कंठत होता. आता त्याला या आधुनिकतेची सवय झालेली. पूर्वीचा संस्थांनी/ब्रिटीशकालीन शांतपणा आता फक्त रात्री १२ नंतर अनुभवता यायचा. तेवढाच काळ 'तो' त्या जुन्या आठवणीत रमायचा व एरवी समोरच्या बिल्डींगमधील असलेल्या त्या नव्या, काटकोनी फ्लॅटच्या बाल्कनीतून तिथे राहणाऱ्या नव-नव्या माणसांकडे कुतूहलाने पाहत बसायचा. आपल्या सुंदर झावळ्यांची सळसळ त्याने/तिने/त्यांनी ऐकावी, म्हणून प्रत्येक संध्याकाळी आपली संथ, मंद लकेर त्या फ्लॅटधारकांसाठी पेश करायचा.

आणि मग एक दिवस आला, जेव्हा संध्याकाळी, ती, इवलुशा डोळ्यांची, काळ्या शर्टातली पोर आली. प्रेमाने तिने बाल्कनीतून 'त्या'च्या झावळ्यांना स्पर्श केला.

२.

नव्या शहरात आल्यावर पहिल्या पंधरा दिवसांची सोय कंपनीने एका अलिशान फाईव स्टार हॉटेलमध्ये केलेली. तिथून कधी एकदा स्वतःच्या, स्वतंत्र, छोट्या पण आटोपशीर फ्लॅटमध्ये जातो, त्याला आपलं मायेचं, ऑफिसमधून आपल्यावर थकून, अंग टाकून देणारं 'घर' बनवतोय, या विचारात 'ती' हॉटेलच्या खिडकीत बसली होती. बसल्या बसल्या, तिथेच तिने हॉटेलच्या बाल्कनीतून आपल्या खिडकीबाहेर सोडलेल्या relaxed पायांचं चित्र रेखाटलं.

अनेक फ्लॅट बघून झाले.आता फक्त तो कोपऱ्यावरच्या हळ्ळी नुक्कडवरचा फ्लॅट बघायचा राहिलेला. एका संध्याकाळी, रटाळवाणा, पायात पाय येणाऱ्या कामाचा गुंतवळा laptopच्या संदुकीत फट्कन बंद करत ती त्या शेवटच्या स्पॉटकडे वळली. तिला हवा असणारा, बाल्कनीपलीकडचा निळा, स्वच्छ प्रकाशाचा अवकाश असलेला असा फ्लॅट अजून तरी तिला भेटला नव्हता.

ती त्या काटकोनी फ्लॅटवर आली. बाल्कनी आणि पलीकडचा 'तो' रुबाबदार, हिरवा माड आणि त्याची सळसळ ऐकताच तिने हाच फ्लॅट नक्की करण्याचे ठरवले. तिने ब्रोकरला फोन लावला. तिचा 'घरा'चा शोध संपला होता.

३.

तिसऱ्या मजल्यावरची लिफ्ट हळूहळू वर येऊन स्थिरावली. तिने डावीकडे कोपऱ्यात एकूटवाण्या असणाऱ्या फ्लॅटचे दार हलकेच उघडले.

संध्याकाळची वेळ. चंद्र आपली ड्युटी थोडी लेटच सुरु करणार होता. सांजरंगाने आकाशभर फेर धरलेला. 'त्या'च्या झावळ्या मंद वाऱ्याच्या लयीने नुकत्याच थरथरू लागलेल्या. वारा नकळत त्याचा वेग वाढवून त्या मूक फांद्यांची तारांबळ उडवत होता. अशा अवचित क्षणी 'ति'ने दरवाजा उघडला.

छोट्याशाच, सुरु होताच डाव्या काटकोनात किचनपाशी संपणाऱ्या फ्लॅटची पाहणी क्षणातच झाली आणि मग तिची नजर बाल्कनीपलीकडच्या निळ्या आकाशात फडफडणाऱ्या हिरव्या झावळ्यांवर स्थिरावली.

'तो' शहारला. त्याने अंग किंचित आकसून धरले. थोडासा बाक काढत ' आपण या गावचेच नाहीत जणू' असे भासवत तो सळसळत राहिला. त्याच्या सोनसळी रंगाच्या मोहोरातून 'त्या'ने 'ति'चे चिमुकले, काळेशार डोळे न्याहाळले होतेच. 'ति'लाही अर्ध्यामुर्ध्या लवेंडर आकाशाच्या कृष्णरंगाच्या पार्श्वभूमीवर संथपणे, आपल्याच लयीत सळसळणारा 'तो' लाजवाब आवडला होता. त्याला ही मुलगी 'त्याच्या असण्याचा' खऱ्या अर्थाने आनंद घेणारेय, तिचा थकवा आपल्याच शेजारात विरून जाणारेय, असे मनोमन वाटू लागले. तिला आत्तापर्यंत पाहिलेल्या फ्लॅटमधील Amenities एकीकडे आणि हा एका गर्दीच्या, कॉर्नरवाल्या बिल्डींगजवळ असणारा तो माड, शेजारची ती बाल्कनी असलेला तो फ्लॅट भयंकरच आवडून गेला.

'तो' आता अजून प्रेमाने, मायेने 'ति'च्या ऑफिस नंतरच्या थकल्या संध्याकाळी तिला सळसळीने ओथंबलेली हिरवी अंगाई हक्काने गाऊन दाखवणार होता. तीही त्याच्या उपस्थितीत तिच्या जॉबचा, या unknown,भल्यामोठ्या मेट्रोतला काळ उबदार बनवणार होती, तिच्या loved Ones बरोबर, त्याच्या उंच खोडाशी, हिरव्या पोपटी झावळ्यांशी उभारत, आलं घातलेला चहा पिणार होती.

समाप्त.

Group content visibility: 
Public - accessible to all site users