श्रद्धा

Submitted by एम.जे. on 27 March, 2024 - 16:36
होलिका आणि भक्त प्रह्लाद

‘भक्त बाळ प्रह्लादाला छळीले पित्याने, नारसिंहरूपे त्याला रक्षिलें प्रभुने…’

होळी आली की हिरण्यकश्यपू, होलिका आणि भक्त प्रह्लादाच्या कथेची आठवण होते. आजच्या युगात आजूबाजूला जेव्हा अधर्म थैमान घालत असतो तेव्हा सामान्य माणसाला प्रश्न पडतो कारण प्रत्येकासाठी प्रह्लादासारखा चमत्कार घडताना दिसत नाही. आपल्याच कर्माला दोष द्यायचा म्हटलं तरीही कुठेतरी श्रद्धा डळमळीत व्हायला लागते. मग ती खरंच श्रद्धा असते की भाबडी समजुत?

आदि शंकराचार्यांच्या शिष्याची एक कथा आपण वाचली ऐकली असेल. सिद्धांतिक मतभेदाखातर म्हणे कोणा राजाकडून या शिष्याला पार कडेलोटाची शिक्षा फर्मावली गेली. राजाचीच आज्ञा ती… मोडणार कोण? अंमलबजावणी झाली, त्या शिष्याला कड्यावरून खाली फेकण्यात आले. शिष्याने मनोभावे प्रार्थना केली आणि म्हणाला “वेद खरे असतील तर ते माझे रक्षण करतील…” आणि चमत्कार झाला. वेदांनी त्या शिष्याला अलगद झेलून सुखरूप उतरवलं, मात्र त्या शिष्याच्या डोळ्यांत खडा गेल्याने त्याला असह्य वेदना झाल्या. शंकराचार्य म्हणाले, “तुझ्या ‘तर’मध्ये किंतु होता, जर तू ‘वेद खरे आहेत आणि ते नक्कीच माझे रक्षण करतील’ असं म्हणाला असतास तर तुला कुठलीही इजा झाली नसती.” हाच प्रसंग सर्वसामान्यांच्या बाबतीत घडला तर ‘वेद’ करतील का खरंच रक्षण?

आध्यात्मिक गुरु गुरुजेफ नृत्याचा फार उत्तम प्रयोग करायचे ध्यानात्मक परिणाम साधण्यासाठी. गुरुजेफ यांनी इशारा केला की नृत्य चालू व्हायचं आणि थांबण्याचा इशारा केला की तत्क्षणी पुतळावत शांतता. त्यांनी सुमारे १०० एक लोकांचा समूह तयार केला. सर्वप्रथम न्यूयॉर्कमध्ये मोठ्या प्रेक्षकगृहात हा समूह जेव्हा तालबद्ध गिरकी नृत्य सादर करायला लागले तेव्हा सादरकर्तेच काय तर सर्व प्रेक्षकही तनामनाने तल्लीन डोलू लागले. थांबण्याचा इशारा आला की प्रेक्षकांना विचारहीन अवस्थेचा अनुभव यायचा. नृत्यकारांना मात्र शरीर थांबलं तरी मनात नृत्य चालू राहायचं आणि हळूहळू करत ते शेवटी स्वतःशी केंद्रित होऊन जायचे. एकदा असं झालं की रंगमंचावर नृत्य चालू होतं. एक क्षण असा आला जेव्हा की हे नृत्य सादरकर्ते संगीताच्या धुंदीत तालासुरांवर गिरकी घेत घेत स्टेजच्या अगदी टोकाशी आले, एवढे की आणखी एक पाऊल पुढे टाकलं गेलं तर थेट खाली… प्रेक्षकांना क्षणभर वाटलं आता गुरुजेफ ‘थांबा’ सांगतील पण घडलं नेमकं उलटं! गुरुजेफनी रंगमंचाकडे सपशेल पाठ फिरवली आणि इकडे नृत्य करणारे खरोखर धडाधडा खालच्या दगडी पृष्ठभागावर कोसळले. संपूर्ण प्रेक्षकगृहांत हलकल्लोळ माजला. आरडाओरडा आणि गोंधळ… सर्वांची खात्री झालेली होती की आता प्रत्येकाची किमान २-५ हाडे तरी नक्की मोडली असणार. आश्चर्याची गोष्ट अशी होती की पडलेल्या एकालाही साधं खरचटलंसुद्धा नव्हतं! याला आधुनिक जगात चमत्कार म्हणायचं की आणखी काही? ओशोंनी त्याचं विवेचन केलेलं आहे. नाचता नाचता तो समूह इतका तल्लिन होऊन गेला होता की त्यांना देहभानच उरलेले नव्हते. गुरुजेफ यांचा हे लक्षात आलेले होते म्हणूनच त्यांनी थांबायचा इशारा दिला नाही. जेव्हा देहभान उरत नाही तेव्हा कुठलाच प्रतिकार राहत नाही. गुरुत्वाकर्षणाला विरोध न करता तुम्ही पडलात तर अजिबात इजा होत नाही हे या गोष्टीमागचं रहस्य!

सत्य अनुभूतीतून ज्ञात होतं. भौतिक जगातल्या तर्ककुतर्काशी जुळवायला गेलात तर गफलत होऊ शकते. म्हणूनच जाणते, ज्ञानी लोक सत्याचं सार कथारूपातून सांगतात ज्याने की सामान्य माणसाला ते समजायला सोपे व्हावे, हळूहळू उलगडत जावे. शंकराचार्यांच्या शिष्याची कथा आपल्याला हेच सांगून जाते. जेव्हा विश्वास दृढ असतो तेव्हा प्रतिकार अथवा विरोध उरत नाही. सत्याची प्रचिती यायला लागते तसा हा विश्वास श्रद्धेत परिवर्तित होतो. विश्वास एकवेळ तुटू शकेल पण श्रद्धा त्यापलीकडे असते. अशावेळी मग तुम्ही वेद वाचलेले असोत किंवा नसोत. फरक पुस्तकी पांडित्याने पडणार नाही तर तुमची साधना किती भक्कम आहे त्यावर ते ठरेल. बाळ प्रह्लादाला प्रत्यक्ष त्याच्याच जन्मदात्याने कडेलोटाची शिक्षा फर्मावलेली. इथे नुसता वैचारिक बुद्धिविलास असता तर निभावणं कठीण होतं. अगदी गाढ विश्वासही कसोटीच्या क्षणी गर्भगळीत होतो. प्रह्लादाला नारायणभक्तीची प्रचिती होती त्यामुळे कुठलाही किंतु त्याच्या मनांत नव्हता. किंबहुना त्याने पूर्णपणे स्वतःला भगवंताच्या स्वाधीन केलेले होते म्हणजे एकार्थी देहभानाचा विसर पडला होता त्यामुळे कोणतीही इजा न होता तो कडेलोटच काय तर अग्निदिव्यातूनही पार पडला.

जे प्रह्लादाच्या बाबतीत घडलं तेच सर्वांच्या बाबतीत घडेल असं नाही कारण श्रद्धा व्यक्तीसापेक्ष असते. सर्व ‘किंतु’, ‘परंतु’ दहन करून तुम्ही ज्ञातापलीकडच्या अज्ञाताला सामोरे जायला तयार असणं म्हणजे श्रद्धा. यासाठीच अध्यात्मात गुरूवर नितांत श्रद्धा हवी. सर्व प्रतिकूल परिस्थितीतून तारून नेणारी श्रद्धा ही सच्च्या साधकाच्या अंतर्यामीची शक्ती आहे जी सहसा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवते. या चराचर सृष्टीची रहस्य उलगडून दाखवायला ती कामी येते.

या होळीच्या निमित्ताने प्रह्लाद आणि इतरही गोष्टीतून मिळणारा बोध आपण विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोनातून समजावून घेतला पाहिजे, इतकंच!
~
सायली मोकाटे-जोग
होळीपौर्णिमा
https://sayalimokatejog.wordpress.com/2024/03/24/shraddha/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान
श्रद्धा सर्व बाजूनी श्रेष्ठ आहे - श्री गजानन विजय ग्रंथ, दासगणू महाराज

गुरुत्वाकर्षणाला विरोध न करता तुम्ही पडलात तर अजिबात इजा होत नाही हे या गोष्टीमागचं रहस्य!

>> हे पहिल्यांदाच ऐकते आहे.

>>विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोनातून समजावून घेतला पाहिजे>> हे काढून टाका. मग छान लेख आहे.

श्रद्धा आणि विश्वास एकच झालं पण मध्ये विज्ञान घुसवले तर श्रध्दा + विश्वास + पुरावा अशी त्रांगड होऊन बसते आणि मग दोन्हीकडचे फड गाजू लागतात. एक गोष्ट लक्षात घेतली की बरेचसे गणित सोपे होऊ शकते हे मा वै म.
जी पुराणातील किंवा इतर संत चरित्रातील उदाहरणे दिली जातात ती त्या काळातीलच इतरांकडून सर्व कसोटीवर विज्ञान की चमत्कार ते ठरेल. काळ आणि उदाहरण जुना व नियम आणि परीक्षक आजचे असे केले की मात्र सर्व फसगत होते. सत्य हे त्रिकालाबाधित असेल तरच सत्य ह्या उक्तीनुसार आता खोट्या वाटणाऱ्या गोष्टी पुढे काही काळानंतर कदाचित सर्व कसोट्यांवर तपासून खऱ्या ठरूही शकतात. फक्त त्या आताच आणि ह्याच वाचक वर्गासमोर घडावे ही अपेक्षा नसावी / बाळगू नये.

पियू >> गुरुत्वाकर्षणाला विरोध न करता तुम्ही पडलात तर अजिबात इजा होत नाही हे >> प्रह्लादाच्याच कथेत आहे की कडेलोटातूनही तो सुरक्षित बचावला.

अज्ञानी >> घासून घासून शब्द गुळगुळीत झाले की मूळ अर्थ हरवतो... अन्यथा सनातन धर्मातले सर्व काही विज्ञानाधिष्ठितच आहे

कडेलोटातूनही तो सुरक्षित बचावला >>
विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान... >>
अन्यथा सनातन धर्मातले सर्व काही विज्ञानाधिष्ठितच आहे >> अगदी पटलं. पुलेशु! लिहीत रहा! मजा येते वाचायला.

<< गुरुत्वाकर्षणाला विरोध न करता तुम्ही पडलात तर अजिबात इजा होत नाही हे या गोष्टीमागचं रहस्य! >>

हे सत्य आहे आणि रजनीकांतच्या अनेक चित्रपटात हे दिसून येते.

लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया खूप छान. जय हो.

श्रद्धा म्हणजे इनर कंपास. होकायंत्र जे सदैव मार्गदर्शक ठरते. आता त्याच्याशी अ‍ॅट्युन कसे व्हायचे, त्याकरता काही सराव करावा लागतो का, काही टुल्स असतात का - वगैरे आपले आपण शोधायचे.