प्रकाश प्रदूषण - ज्योतिर्मा तमसो गमय।

Submitted by चामुंडराय on 3 March, 2024 - 20:51

ह्या इंद्रियगोचर, भौतिक जगात वावरताना आपले शरीर पंचेंद्रियांद्वारे विविध प्रकारची माहिती गोळा करून ती संदेशाच्या स्वरूपात सर्व बाजूंनी बंद अशा अंधार कोठडीत असलेल्या त्याच्या कडे पाठवते. तो (पहिला) ह्या गोळा झालेल्या सर्व माहितीचे विश्लेषण करतो आणि निष्कर्ष काढतो. ह्या निष्कर्षांद्वारे तो (दुसरा) ह्या जगाची अनुभूती (first person, internal and subjective experience - Qualia) घेत असतो. ह्यातील पहिला म्हणजे आपला मेंदू आणि दुसरा म्हणजे आपण स्वतः (म्हणजे नक्की कोण?). ह्या भौतिक संदेशांची अनुभूती मात्र अभौतिक असते आणि हा बदल नक्की कसा होतो ह्याचे आकलन झालेले नाही. जिज्ञासूंनी Hard problem of Consciousness हा विषय गुगलोत्खनन करून पहावा.

ह्या संदेश गोळा करण्याच्या प्रक्रियेमध्ये डोळ्याचा म्हणजेच प्रकाशाचा महत्वाचा, सिंहाचा वाटा आहे. प्रकाश हा तरंग (wave) आणि पुंज (photon - particle) अशा दुहेरी स्वरूपातील (wavicle) इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन आहे. आपण आपल्या डोळ्याद्वारे ह्या स्पेक्ट्रम मधला अतिशय थोडा म्हणजे साधारणतः ४०० ते ७०० nanometer तरंग लांबीचा भाग (ता ना पि हि नि पा जां) पाहू शकतो. खालील चित्र पहा. तुमच्या लक्षात येईल की आपण 'प्रॅक्टिकली ब्लाइंड' आहोत. डोळ्यांच्या व्यतिरिक्त इन्फ्रा रेड - उष्णता, धग आणि अल्ट्रा व्हायोलेट - सन बर्न (डिलेड सेन्सरी रिस्पॉन्स) ह्या स्वरूपात त्वचेद्वारे प्रकाश जाणून घेता येतो.

Prakash-1.png
आंतरजालावरून साभार.

पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या बरोबरीने स्वतःभोवती देखील फिरण्याच्या गतीमुळे दिवस रात्रीचे म्हणजेच अंधार आणि प्रकाशाचे चक्र कोट्यावधी वर्षें अव्याहत चालू आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टी उत्क्रांत होताना साहजिकच ह्या अंधार प्रकाशाच्या चक्राशी बांधली गेली आहे. अलीकडील काळातील वैज्ञानिक प्रगतीमुळे वीज आणि विजेच्या दिव्यांचा शोध लागून रात्रीच्या अंधारावर प्रकाशाचे सावट पडले आहे.

आपल्या शरीरामध्ये जैविक घड्याळ असून त्या घड्याळाप्रमाणे आपण दररोज शारीरिक, मानसिक आणि वर्तनाच्या स्थित्यंतरचक्रातून जात असतो त्याला सरकेडीयन ह्रिदम् / सायकल असे म्हणतात. रात्रीच्या अंधारावर मात करण्यासाठी कृत्रिम प्रकाशाची आवश्यकता असली तरी अतिरिक्त प्रकाशामुळे जैविक घड्याळावर अनिष्ट परिणाम होतो असे आता लक्षात आले आहे. डोळ्यांची जळजळ, रक्तदाब, निद्रानाशापासून ते अगदी स्थूलता, कॅन्सर आणि नैराश्यापर्यंतचा त्रास रात्रीच्या अतिरिक्त प्रकाशामुळे होऊ शकतो असे आता सांगण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय कॅन्सर रिसर्च संस्थेने रात्रपाळीचे काम हे probable human carcinogen आहे असे म्हटले आहे. तुलनेने अलीकडच्या काळात शोध लागलेले, सध्या डॉक्टर्स, न्यूट्रिशनिस्ट आणि डायट इंडस्ट्रीसाठी "इन थिंग" असलेले आपल्या पोटातील सूक्ष्म जीव (मायक्रोबायोटा) देखील सरकेडीयन चक्राशी बांधलेले असतात. प्रकाश प्रदूषणामुळे हे चक्र बिघडले तर मायक्रोबायोटावर अनिष्ट परिणाम होऊन विविध व्याधी जडतात असा दावा करण्यात येतो. रात्री स्क्रीन लाईट आणि अति तीव्र अशा प्रकाशामुळे मेंदूला अजूनही दिवस चालू आहे असा संदेश जाऊन झोप येण्यासाठी आवश्यक असणारे मेलोटॉनिन संप्रेरकाचे स्रवन थांबते त्यामुळे झोपेचे चक्र बिघडते.

रात्रीच्या अनावश्यक प्रकाशामुळे जीवसृष्टीचे चक्र देखील बिघडते असे आढळून आले आहे. मानव हा पृथ्वीवरच्या समस्त जीवसृष्टीचा एक भाग आहे परंतु मानवाने बुद्धिमत्तेच्या जोरावर इतर जीवसृष्टीवर आक्रमण केले आहे. प्रकाश प्रदूषणामुळे निशाचर जीवांच्या जीवनात अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यावरील तीव्र प्रकाशाच्या दिव्याभोवती असंख्य कीटक घोंघावताना दिसत आहे, स्थलांतर करणारे पक्षी मार्ग चुकत आहेत इतकेच नव्हे तर समुद्रकिनारी वाळूत अंडे फोडून बाहेर येणारी कासवाची नवजात पिल्ले समुद्राकडे जाण्याऐवजी किनाऱ्यावरील विजेच्या दिव्यांच्या प्रकाशाकडे आकर्षित होऊन समुद्राच्या अगदी विरुद्ध दिशेने प्रवास करत आहेत ही तर मोठी चिंतेची बाब आहे. अशा प्रकारच्या प्रकाशाच्या अनियंत्रित आकर्षणाला positive phototaxis असे नाव आहे. ह्याचे कारण अजून पुरते ज्ञात नाही. ज्योतिवर झेप घेऊन प्राणाहूती देणाऱ्या पतंगाचे उदाहरण प्रसिद्ध आहे.
"जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी ।
झड घालून प्राण देतो दिपकाचे वरी ।।"
- होनाजी बाळा
रात्रीच्या प्रकाशामुळे positive phototaxis सारखा परिणाम negative phototaxis मुळे सुद्धा होतो
आणि जीव प्रकाशापासून लांब पळतात. जगभरात सर्वत्र घरोघरी आढळणारा गलिच्छ आणि किळसवाणा मिशाळ जीव (ओळखा पाहू) हा negative phototaxis चे उदाहरण आहे.

रात्रीच्या कृत्रिम प्रकाशाच्या झगमगाटामुळे 'अर्बन ग्लो' तयार होऊन रात्रीचे आकाश झाकोळून जाते आणि चमचमते तारे दिसेनासे होतात. आजकाल सर्वत्र कमी वीज वापरणारे आणि स्वस्त असणारे LED दिवे वापरतात. हे दिवे अति तीव्र पांढरा प्रकाश (high lumen) बाहेर फेकतात आणि आसमंत उजळून निघतो त्यामुळे कित्येक शहरवासीयांनी तर चमचमते आकाश कधी बघिलेलेच नसते. ह्या संदर्भात एक मजेशीर घटना घडलेली आहे. जानेवारी १९९४ मध्ये लॉसअँजेलिस् शहराला ६.७ रिष्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला तेव्हा संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित होऊन दिवे गेले आणि शहर पूर्णपणे अंधारात बुडाले. त्यामुळे प्रकाश प्रदूषण नाहीसे होऊन एलएचे आकाश असंख्य चमचमत्या ताऱ्यांनी उजळून निघाले आणि विशेष म्हणजे आपली मिल्कीवे आकाशगंगा स्पष्ट दिसू लागली. ते दृश्य पाहून आकाशातून एलियन्सनी हल्ला केला आहे (आणि त्यामुळे भूकंप झाला) असे समजून आणि घाबरून जाऊन एलएवासीयांनी तेथील आपत्कालीन सेवेला असंख्य फोन केले. अर्थात अमेरिकन् लोकांकडे बघता हे आश्चर्यजनक नाही ... म्हणजे, दोन त्रितीयांश अमेरिकन्सनी प्रकाश प्रदूषणामुळे एव्हढे स्वच्छ आकाश कधी बघितलेलेच नसते. आपल्याकडील शहरांची स्थिती अर्थातच काही फारशी वेगळी नाही.

'अर्बन ग्लो' मुळे आकाश निरीक्षकांना शहरातून आकाश दिसत नसल्याने, कृत्रिम उजेडापासून म्हणजे शहरापासून दूर जाऊन आकाश निरीक्षण करावे लागते. त्या बरोबरीने ज्यांना रात्रीच्या आकाशीय प्रकाश चित्रणाची आवड आहे असे हौशी प्रकाशचित्रकार ह्या समस्येने ग्रस्त आहेत. वेगवेगळे फिल्टर्स लावून देखील त्यांना चांगले प्रकाशचित्र मिळणे दुरापास्त झाले आहे. रात्रीच्या वेळी तुम्ही खिडकीतून आकाशाकडे पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल आणि या आधी पिठूर चांदणे पडलेले चांदणचुर आकाश कधी बघितले होते असा तुम्हाला प्रश्न पडेल.

एखाद्या ठिकाणावरून दिसणाऱ्या रात्रीच्या आकाशाची दृश्यमानता (brightness) मोजण्यासाठी Bortle Scale तयार करण्यात आले आहे. हे स्केल एकूण नऊ पातळ्यांचे आहे. पहिली पातळी स्वच्छ, दृश्यमान आकाशाची आहे (म्हणजे निम्न प्रकाश प्रदूषण) ते नववी पातळी ही अत्युच्य प्रकाश प्रदूषणाची (अर्बन ग्लो) असून त्या ठिकाणावरून आकाशातील ताऱ्यांचे दर्शन होत नाही. तुम्ही जेथे राहता तेथील ठिकाणाचे Bortle रेटिंग काय आहे हे शोधून आकाश निरीक्षण करावे म्हणजे ह्या समस्येची तीव्रता लक्षात येईल.

सुदैवाने आता प्रकाश प्रदूषणाबाबत जागरूकता वाढत असून प्रदूषण कमी करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. इतर सर्व प्रदूषणांपेक्षा प्रकाश प्रदूषण कमी करण्यास तुलनेने सोपे आणि सहजसाध्य आहे. रस्त्यांवरील दिव्यांचे डिझाइन बदलून, दिवे बदलून आणि शहरातील विविध भागांतील प्रकाशमानता ठरवून (झोनिंग) हे करता येईल. International Dark-Sky Association ने ह्या संदर्भात काही मानके ठरवून दिली आहेत. लॅम्प शेड द्वारे प्रकाश फक्त रस्त्यांच्या दिशेला वळवणे, दिव्यांची luminosity कमी करणे, घराबाहेरील, दुकानांचे आणि ऑफिस बिल्डिंग्जचे दिवे रात्री १ ते सकाळी ७ वाजे पर्यंत बंद ठेवणे इत्यादी. वैयक्तिक पातळीवर घरातील दिवे गरज नसेल तर बंद ठेवणे, प्रकाशाची तीव्रता कमी करणे किंवा तीव्रता प्रसंगानुरूप बदलता येईल असे दिवे (dimmable) वापरणे असे उपाय करून प्रकाश प्रदूषण कमी करण्यास हातभार लावता येईल. त्यामुळे ऊर्जेची बचत आणि अर्थिक फायदा होऊन पर्यावरणाची वृद्धी होईल.

"तमसो मा ज्योतिर्गमय" अशी प्रार्थना करणाऱ्या आपल्या पूर्वजांनी प्रगत मानवाला रात्रीच्या वेळी प्रकाशमानता कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील अशी कल्पना देखील केली नसेल. वैज्ञानिक प्रगती करताना तारतम्य राखून पर्यावरणाची देखील काळजी घेतली तर पृथ्वी वरची सगळी मानवेतर जीव सृष्टी मानव जातीला दुवा देईल ह्यात शंका नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख आवडला.कोकणात वाढल्यामुळे अंधार एन्जॉय करता येतो अजुनी व मुंबईत राहत असल्याने प्रकाश प्रदूषण आवडत नाहीच.
उपायही आवडले. मुंबईसारख्या कधी न झोपणाऱ्या शहरात ते कितपत लागू पडतील ही शंका आहे पण प्रयास तरी केलाच पाहिजे.

छान लेख.
सुरुवातीला मेंदू काळकोठडीत आहे आणि पंचेंद्रिये त्याला प्रकाशाची/ जगाची जाणीव देतात भागाचे पुढील लेखाच्या अनुषंगाने प्रयोजन समजले नाही.

उत्तम माहितीपूर्ण लेख. पक्ष्यांच्या स्थलांतरावरती शहरी झगमगाटाचा दुष्परिणाम फार होतो. बरेच पक्षी रात्री अंतर कापू पहातात व ते इमारतीं ना
धडकुन खाली कोसळतात.

कुमार१ - धन्यवाद, खरंतर हा लेख अर्धवट लिहून पडून होता. तुमचा "लेघक" धागा वाचून तो पूर्ण केला आणि अपलोड केला.

उदय, दत्तात्रय साळुंके, मी बिल्वा, साद आणि mi_anu - प्रसंशात्मक प्रतिक्रियेबद्दल आभार.

MazeMan - अगदी खरे आहे. मोठ्या शहरांमध्ये प्रकाश प्रदूषणाची तीव्रता खूप जास्त आहे.

अमितव - जग जाणून घेण्याचा प्रक्रियेमध्ये प्रकाशाचा मोठा वाटा आहे. अंधार कोठडीतील मेंदूवर देखील अतिरिक्त प्रकाशाचा परिणाम होतो आहे.

सामो - हो, स्थलांतरित पक्षी रात्रीच्या उजेडात मोठ्या झगमगीत इमारतींना धडकून खाली कोसळण्याची कित्येक उदाहरणे आहेत.

झिरपणारा प्रकाश (light trespass)

वरील लेखात एक मुद्दा लक्षात घ्यायचा राहिला तो म्हणजे झिरपणारा प्रकाश (light trespass). रात्रीच्या वेळी जेव्हा अनावश्यक प्रकाश घरात येतो त्यास लाईट ट्रेसपासिंग असे म्हणतात. नगरपालिकेने रस्त्यांवर लावलेला दिवा, आजूबाजूच्या परिसरातील एखादी दुकाने, ऑफिसेस् असणारी प्रकाशाने उजळून निघालेली झगमगीत इमारत किंवा तुमच्या शेजाऱ्याने घराबाहेर लावलेला प्रखर दिवा ही प्रकाश झिरपण्याची कारणे आहेत. ह्यांवर सर्व प्रथम अतिरीक्त प्रकाश निर्माण करणारी कारणे कमी करण्याचा प्रयत्न करावा आणि ते शक्य नसेल तर घराच्या खिडक्यांना प्रकाशाला प्रतिबंध करणारे पडदे लावावेत ज्यामुळे प्रकाश झिरपण्याचे प्रमाण कमी होईल.

कित्येकदा झोपताना पूर्ण अंधार करणे शक्य नसते उदाहरणार्थ विमान अथवा रेल्वे प्रवास किंवा घरातील इतर सदस्यांना काही कामे असताना तुम्हाला मात्र झोपायचे आहे अशावेळी दोन्ही डोळे झाकणारा ब्लॅकआऊट स्लीपिंग आय मास्क वापरावा. मास्कमुळे व्यक्तिगत पातळीवर लख्ख काळोख (pitch dark) होऊन तसा संदेश मेंदूला जातो आणि मेलोटॉनिनचे स्रवन चालू होते. मास्क आरामदायी, बाहेरील प्रकाशाला प्रतिबंध करून दोन्ही डोळे व्यवस्थित झाकणारा आणि योग्य प्रमाणात घट्ट बसेल (adjustable strap) असा असावा. व्यक्तिगत पातळीवर अंधार तयार करायला अतिशय उपयुक्त असून power nap किंवा मेडिटेशन करतानाही वापरता येतो. त्याच्या स्वच्छतेची मात्र योग्य ती काळजी घ्यावी.

त्वचेद्वारे प्रकाश जाणून घेता येतो…..

प्रचंड सहमत. आजवर हे मत जेव्हां जेव्हां मांडले, कुणालाही पटले नाही - सर्वांनी हे तुमच्या मनाचे खेळ आहेत ते सुपरपावर असेल तुमच्याकडे अशी खिल्ली उडवली.

तसेच white noise सारखाच अत्यंत त्रासदायक white light असतो हे समजणारे पण कमीच.

उत्तम लेखविषय, माहिती आणि विवेचन. शीर्षक विशेष आवडले

छान लिहिले आहे, शीर्षक आवडले.
प्रकाशाचा त्रास होतो, सेन्सरी ओव्हरलोड होतोच. कासवांच्या गोष्टी बघितल्या आहेत. ते प्रकाश प्रदुषणामुळे अंड्यातून बाहेर निघून समुद्राकडे जाण्याऐवजी शहराकडे जातात. त्यांची दिशाभूल होते आणि बरेचदा जन्मले की मरून जातात. फारच दुर्दैवी आहे.

माहितीपूर्ण लेख. शहरी भागातून रात्री आकाशदर्शन नीट होणे, पक्ष्यांवर होणार परिणाम या व्यक्तिरिक्त प्रदूषणाची माहिती नव्हती.
आणि स्वतःपुरते म्हणायचे तर रात्री झोपताना मला पूर्ण अंधार लागतो, कुठल्या चार्जरवरचा छोटा LED सुरू असेल तरी ते प्रकाश प्रदूषण वाटते. त्यामुळे रात्री बाहेरून प्रकाश येणार नाही असे डबल पडदे लावले आहेत.
दोन वर्षांपूर्वीच घरात सगळी कडे वार्म लाईट बसवून घेतले, व्हाईट लाईटच्या जोडीला, मी सहसा तेच वापरतो.
आय मास्कचा प्रवासात चांगलाच उपयोग होतो.
बस, चेअर कार ट्रेन मध्ये झोप नाही लागली तरी आय मास्क लावून मन शांत करणारे संगीत हेडफोनवर लावून ऐकले की छान वाटते.

लेखामधील सर्व मुद्दे पटले.
झोपताना मला light trespassचा खूप त्रास होतो. हवा खेळती रहावी म्हणून पडदे पूर्ण बंद करता येत नाहीत. मग क्लिप वापरून जुगाड करून फक्त थेट डोळ्यात प्रकाशाची तिरीप जाणार नाही इतपतच पडदे लावतो.
इतर वेळी देखील led दिव्यांचा प्रकाश नकोसा वाटतो. जुन्या पद्धतीचे बल्ब, ट्युबलाईट डोळ्यांना बरे वाटतात.

<< आजकाल सर्वत्र कमी वीज वापरणारे आणि स्वस्त असणारे LED दिवे वापरतात. >>

------ आनंदोत्सव साजरा करण्यासाठी प्रकाश हवा, झगमगाट हवा .... RGB DJ लेसर मुळे रेटिनावर दुष्परिणाम झाल्याची उदाहरणे आहेत.

माहितीपूर्ण लेख
प्रकाश प्रदूषण आता खेड्यातही दिसू लागले आहे.
लेखाचे शीर्षक आवडले.
Photoperiodism वर देखील प्रकाश प्रदूषणाचा परिणाम होत असावा.

सामो - आय मास्कचा झोप लवकर येण्यासाठी चांगला फायदा होतो असा अनुभव आहे.

अनिंद्य - थंडी पडल्यावर शेकोटी पेटवतात आणि भोवती बसतात. शेकोटीच्या आजूबाजूची हवा गरम झाल्याने वर निघून जाते आणि तिचा फारसा उपयोग होत नाही. परंतु शेकोटीची धग जाणवते ती इन्फ्रा रेड प्रकाशामुळे. हा प्रकाश डोळ्यांना दिसत नाही मात्र तो त्वचेला उष्णतेच्या स्वरूपात जाणवतो.
भगभगित पांढऱ्या प्रकाशाबद्दल सहमत.

अस्मिता - ५० मार्कांच्या तीन वर्षांच्या शिदोरीवर शीर्षक लिहिण्याचे धाडस केले. असे लिहायचे ठरवल्यावर बरेच शोधले परंतु सापडले नाही मग स्वतःच तयार केले. अजून कोणी चूक दाखवली नाही म्हणजे बरोबर असावे असे वाटते.

मानव पृथ्वीकर - आय मास्कचा प्रवासात विशेष फायदा होतो हे खरे.
परंतु घरात खिडक्या बंद करून पडदे लावले तर हवा खेळती राहात नाही असे वाटते.

एस - light trespass साठी आय मास्क चा वापर करून बघा, फायदा होईल.

उदय - RGB DJ लेसर म्हणजे काय आणि त्यामुळे रेटिनावर काय दुष्परिणाम होतो ह्या बद्दल काही कल्पना नाही. तुमच्या कडून अजून जाणून घ्यायला आवडेल.

ऋतुराज. - हो, प्रप्र ची व्याप्ती आता सर्वत्र आहे असे दिसते.
शिर्षकाचे म्हणाल तर वर लिहिल्या प्रमाणे धाडस करून लिहिले. Happy
Photoperiodism बद्दल माहिती नव्हते. प्रप्र चा दुष्परिणाम वनस्पतींवर देखील होत असेल हे नक्की. त्या बद्दल वाचन चालू आहे.

<< उदय - RGB DJ लेसर म्हणजे काय >>

----- Red Green Blue
https://lasershowprojector.com/blogs/laser-light-applications/lasers-for...

२०२२ ची बातमी, ६५ लोकांच्या डोळ्यांना त्रास झाला.
https://indianexpress.com/article/cities/mumbai/retinal-injuries-rise-ex...

ताजी २०२३ बाताजी, येथे मायबोलीवर ( पण अगदी वेगळ्या संदर्भात ) चर्चा झाली होती.
https://indianexpress.com/article/cities/mumbai/retinal-injuries-rise-ex...

WL visible असली तरी बिम intense coherent आहे.... कुठे कशावर किती नियंत्रण नाही आणि समोर बि च्चारा रेटिना. उत्सवाचे वातावरण असले तरी प्रकाश एका प्रमाणा पेक्षा घातक आहे.

अत्यंत उत्तम विषय आणि सुंदर लेख. शीर्षकही आवडलं. तुम्ही म्हणता तसं प्रकाश प्रदूषणाविषयी जागरुकता वाढायला लागली असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण मला तरी एकूण लोकसंख्येच्या 'जागरुकांच्या' टक्केवारीत फार बदल झाला असेल असं वाटत नाही, उलट ती कमीच झाली असण्याची शक्यता सध्याचा आणखीनच फोफावत जाणारा मानवनिर्मित प्रकाश पाहून वाटतं.

शेकोटीच्या आजूबाजूची हवा गरम झाल्याने वर निघून जाते आणि तिचा फारसा उपयोग होत नाही. परंतु शेकोटीची धग जाणवते ती इन्फ्रा रेड प्रकाशामुळे >> हे उष्णतेचं कन्व्हेक्शन (अभिसरण?) आणि रेडिएशन (किरणोत्सार/प्रारण?) यांच्याबद्दलच आहे ना? गरम हवा ही उष्णता कन्व्हेक्ट (=अभिसृत?) करते तर धग ही रेडिएशनमुळे जाणवते. त्यालाही प्रकाशच म्हणावा का?

<< त्यालाही प्रकाशच म्हणावा का? >>

------ इन्फ्रा रेड IR radiation (वर लेखातल्या चित्रातला visible च्या उजवीकडचा बँड ) मानवी शरीरावर आदळल्यावर त्यांचे शरीरांत शोषण (absorption) होते, आणि आपल्याला उष्णता मिळते. IR ला प्रकाश म्हणता येणार नाही... रेडिएशन म्हणू शकतो.
प्रकाश म्हणजे EM चा एक छोटा भाग . लेखात लिहील " आपण आपल्या डोळ्याद्वारे ह्या स्पेक्ट्रम मधला अतिशय थोडा म्हणजे साधारणतः ४०० ते ७०० nanometer तरंग लांबीचा भाग (ता ना पि हि नि पा जां) पाहू शकतो. "

खूप अभ्यासपूर्ण लेख! खूप सुंदर पैलू आले आहेत लेखात.

आकाश दर्शनासंदर्भात प्रकाश प्रदूषणाचा खूप वेळा सामना करावाच लागतो! Sad

हरचंद पालव - हो, बरोबर आहे. उष्णतेचे वहन मुख्यत्वे तीन प्रकारे होते.
कंडक्शन - सळईचे एक टोक आगीत तापवले तर हळूहळू दुसरे टोक गरम होते.
कन्व्हेक्शन - शेकोटी भोवतील हवेने वरच्या दिशेने वाहून नेलेली उष्णता
रेडिएशन - शेकोटीची धग जाणवते ती अवरक्त किरणांमुळे (infra red radiation). ही किरणे डोळयांनी दिसत नाहीत मात्र त्वचेला जाणवतात.

उदय - >>> IR ला प्रकाश म्हणता येणार नाही... रेडिएशन म्हणू शकतो. >>>
बरोबर, डोळ्यांना जो दिसतो त्याला प्रकाश म्हणू आणि स्पेक्ट्रम मधल्या बाकीच्या सर्व प्रारणांना रेडिएशन म्हणू म्हणजे गोंधळ होणार नाही.

पृथ्वीवर जीव सृष्टी उत्क्रांत होताना निसर्गाने प्रत्येक जीवाला जीवन सातत्यासाठी (continuity of life - survival, growth, reproduction) जे काही आवश्यक आहे तेव्हढे आणि तेव्हढेच दिले आहे. त्यामुळे गॅमा रे पासून ते रेडिओ वेव्ह ह्या स्पेक्ट्रममधला खूप छोटा भाग आपल्याला दिसतो परंतु दैनंदिन जीवनासाठी तो पुरेसा आहे.

रघू आचार्य - धन्यवाद

एस - आय मास्क वापरून त्याचा रिव्ह्यू द्या म्हणजे इतरांना देखील फायदा होईल.

मार्गी - आकाश दर्शनासंदर्भात प्रकाश प्रदूषणाची समस्या तुम्हाला तर नक्कीच जाणवत असणार, शंकाच नाही.
तुम्ही ह्याच्यावर कशी मात करता? पूर्वीच्या पेक्षा अलीकडे तुम्हाला जास्त प्र प्र जाणवते का?

सुंदर लेख आणि कल्पक शीर्षक !
आणि खूप आतून जाणवणारा विषय.
रात्री गाढ झोपेत असताना, शेजारी नवऱ्याने मोबाईल उघडला की जो पांढरा त्रासदायक प्रकाश डोळ्यांवर पडतो, तो आठवून ( परत एकदा!) चिडचिड झाली. Happy
खरेच विचारपूर्वक आपण प्र प्र ला आळा घातला पाहिजे.
ते instantaneouly कमी होतं ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट वाटते मला..
म्हणजे दिवा बंद केला की लगेच रिझल्ट दिसणार...
इतर प्रदूषण कमी करणे अधिक वेळखाऊ आणि कष्टाचे काम आहे.

Pages