ह्या इंद्रियगोचर, भौतिक जगात वावरताना आपले शरीर पंचेंद्रियांद्वारे विविध प्रकारची माहिती गोळा करून ती संदेशाच्या स्वरूपात सर्व बाजूंनी बंद अशा अंधार कोठडीत असलेल्या त्याच्या कडे पाठवते. तो (पहिला) ह्या गोळा झालेल्या सर्व माहितीचे विश्लेषण करतो आणि निष्कर्ष काढतो. ह्या निष्कर्षांद्वारे तो (दुसरा) ह्या जगाची अनुभूती (first person, internal and subjective experience - Qualia) घेत असतो. ह्यातील पहिला म्हणजे आपला मेंदू आणि दुसरा म्हणजे आपण स्वतः (म्हणजे नक्की कोण?). ह्या भौतिक संदेशांची अनुभूती मात्र अभौतिक असते आणि हा बदल नक्की कसा होतो ह्याचे आकलन झालेले नाही. जिज्ञासूंनी Hard problem of Consciousness हा विषय गुगलोत्खनन करून पहावा.
ह्या संदेश गोळा करण्याच्या प्रक्रियेमध्ये डोळ्याचा म्हणजेच प्रकाशाचा महत्वाचा, सिंहाचा वाटा आहे. प्रकाश हा तरंग (wave) आणि पुंज (photon - particle) अशा दुहेरी स्वरूपातील (wavicle) इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन आहे. आपण आपल्या डोळ्याद्वारे ह्या स्पेक्ट्रम मधला अतिशय थोडा म्हणजे साधारणतः ४०० ते ७०० nanometer तरंग लांबीचा भाग (ता ना पि हि नि पा जां) पाहू शकतो. खालील चित्र पहा. तुमच्या लक्षात येईल की आपण 'प्रॅक्टिकली ब्लाइंड' आहोत. डोळ्यांच्या व्यतिरिक्त इन्फ्रा रेड - उष्णता, धग आणि अल्ट्रा व्हायोलेट - सन बर्न (डिलेड सेन्सरी रिस्पॉन्स) ह्या स्वरूपात त्वचेद्वारे प्रकाश जाणून घेता येतो.
आंतरजालावरून साभार.
पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या बरोबरीने स्वतःभोवती देखील फिरण्याच्या गतीमुळे दिवस रात्रीचे म्हणजेच अंधार आणि प्रकाशाचे चक्र कोट्यावधी वर्षें अव्याहत चालू आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टी उत्क्रांत होताना साहजिकच ह्या अंधार प्रकाशाच्या चक्राशी बांधली गेली आहे. अलीकडील काळातील वैज्ञानिक प्रगतीमुळे वीज आणि विजेच्या दिव्यांचा शोध लागून रात्रीच्या अंधारावर प्रकाशाचे सावट पडले आहे.
आपल्या शरीरामध्ये जैविक घड्याळ असून त्या घड्याळाप्रमाणे आपण दररोज शारीरिक, मानसिक आणि वर्तनाच्या स्थित्यंतरचक्रातून जात असतो त्याला सरकेडीयन ह्रिदम् / सायकल असे म्हणतात. रात्रीच्या अंधारावर मात करण्यासाठी कृत्रिम प्रकाशाची आवश्यकता असली तरी अतिरिक्त प्रकाशामुळे जैविक घड्याळावर अनिष्ट परिणाम होतो असे आता लक्षात आले आहे. डोळ्यांची जळजळ, रक्तदाब, निद्रानाशापासून ते अगदी स्थूलता, कॅन्सर आणि नैराश्यापर्यंतचा त्रास रात्रीच्या अतिरिक्त प्रकाशामुळे होऊ शकतो असे आता सांगण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय कॅन्सर रिसर्च संस्थेने रात्रपाळीचे काम हे probable human carcinogen आहे असे म्हटले आहे. तुलनेने अलीकडच्या काळात शोध लागलेले, सध्या डॉक्टर्स, न्यूट्रिशनिस्ट आणि डायट इंडस्ट्रीसाठी "इन थिंग" असलेले आपल्या पोटातील सूक्ष्म जीव (मायक्रोबायोटा) देखील सरकेडीयन चक्राशी बांधलेले असतात. प्रकाश प्रदूषणामुळे हे चक्र बिघडले तर मायक्रोबायोटावर अनिष्ट परिणाम होऊन विविध व्याधी जडतात असा दावा करण्यात येतो. रात्री स्क्रीन लाईट आणि अति तीव्र अशा प्रकाशामुळे मेंदूला अजूनही दिवस चालू आहे असा संदेश जाऊन झोप येण्यासाठी आवश्यक असणारे मेलोटॉनिन संप्रेरकाचे स्रवन थांबते त्यामुळे झोपेचे चक्र बिघडते.
रात्रीच्या अनावश्यक प्रकाशामुळे जीवसृष्टीचे चक्र देखील बिघडते असे आढळून आले आहे. मानव हा पृथ्वीवरच्या समस्त जीवसृष्टीचा एक भाग आहे परंतु मानवाने बुद्धिमत्तेच्या जोरावर इतर जीवसृष्टीवर आक्रमण केले आहे. प्रकाश प्रदूषणामुळे निशाचर जीवांच्या जीवनात अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यावरील तीव्र प्रकाशाच्या दिव्याभोवती असंख्य कीटक घोंघावताना दिसत आहे, स्थलांतर करणारे पक्षी मार्ग चुकत आहेत इतकेच नव्हे तर समुद्रकिनारी वाळूत अंडे फोडून बाहेर येणारी कासवाची नवजात पिल्ले समुद्राकडे जाण्याऐवजी किनाऱ्यावरील विजेच्या दिव्यांच्या प्रकाशाकडे आकर्षित होऊन समुद्राच्या अगदी विरुद्ध दिशेने प्रवास करत आहेत ही तर मोठी चिंतेची बाब आहे. अशा प्रकारच्या प्रकाशाच्या अनियंत्रित आकर्षणाला positive phototaxis असे नाव आहे. ह्याचे कारण अजून पुरते ज्ञात नाही. ज्योतिवर झेप घेऊन प्राणाहूती देणाऱ्या पतंगाचे उदाहरण प्रसिद्ध आहे.
"जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी ।
झड घालून प्राण देतो दिपकाचे वरी ।।"
- होनाजी बाळा
रात्रीच्या प्रकाशामुळे positive phototaxis सारखा परिणाम negative phototaxis मुळे सुद्धा होतो
आणि जीव प्रकाशापासून लांब पळतात. जगभरात सर्वत्र घरोघरी आढळणारा गलिच्छ आणि किळसवाणा मिशाळ जीव (ओळखा पाहू) हा negative phototaxis चे उदाहरण आहे.
रात्रीच्या कृत्रिम प्रकाशाच्या झगमगाटामुळे 'अर्बन ग्लो' तयार होऊन रात्रीचे आकाश झाकोळून जाते आणि चमचमते तारे दिसेनासे होतात. आजकाल सर्वत्र कमी वीज वापरणारे आणि स्वस्त असणारे LED दिवे वापरतात. हे दिवे अति तीव्र पांढरा प्रकाश (high lumen) बाहेर फेकतात आणि आसमंत उजळून निघतो त्यामुळे कित्येक शहरवासीयांनी तर चमचमते आकाश कधी बघिलेलेच नसते. ह्या संदर्भात एक मजेशीर घटना घडलेली आहे. जानेवारी १९९४ मध्ये लॉसअँजेलिस् शहराला ६.७ रिष्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला तेव्हा संपूर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित होऊन दिवे गेले आणि शहर पूर्णपणे अंधारात बुडाले. त्यामुळे प्रकाश प्रदूषण नाहीसे होऊन एलएचे आकाश असंख्य चमचमत्या ताऱ्यांनी उजळून निघाले आणि विशेष म्हणजे आपली मिल्कीवे आकाशगंगा स्पष्ट दिसू लागली. ते दृश्य पाहून आकाशातून एलियन्सनी हल्ला केला आहे (आणि त्यामुळे भूकंप झाला) असे समजून आणि घाबरून जाऊन एलएवासीयांनी तेथील आपत्कालीन सेवेला असंख्य फोन केले. अर्थात अमेरिकन् लोकांकडे बघता हे आश्चर्यजनक नाही ... म्हणजे, दोन त्रितीयांश अमेरिकन्सनी प्रकाश प्रदूषणामुळे एव्हढे स्वच्छ आकाश कधी बघितलेलेच नसते. आपल्याकडील शहरांची स्थिती अर्थातच काही फारशी वेगळी नाही.
'अर्बन ग्लो' मुळे आकाश निरीक्षकांना शहरातून आकाश दिसत नसल्याने, कृत्रिम उजेडापासून म्हणजे शहरापासून दूर जाऊन आकाश निरीक्षण करावे लागते. त्या बरोबरीने ज्यांना रात्रीच्या आकाशीय प्रकाश चित्रणाची आवड आहे असे हौशी प्रकाशचित्रकार ह्या समस्येने ग्रस्त आहेत. वेगवेगळे फिल्टर्स लावून देखील त्यांना चांगले प्रकाशचित्र मिळणे दुरापास्त झाले आहे. रात्रीच्या वेळी तुम्ही खिडकीतून आकाशाकडे पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल आणि या आधी पिठूर चांदणे पडलेले चांदणचुर आकाश कधी बघितले होते असा तुम्हाला प्रश्न पडेल.
एखाद्या ठिकाणावरून दिसणाऱ्या रात्रीच्या आकाशाची दृश्यमानता (brightness) मोजण्यासाठी Bortle Scale तयार करण्यात आले आहे. हे स्केल एकूण नऊ पातळ्यांचे आहे. पहिली पातळी स्वच्छ, दृश्यमान आकाशाची आहे (म्हणजे निम्न प्रकाश प्रदूषण) ते नववी पातळी ही अत्युच्य प्रकाश प्रदूषणाची (अर्बन ग्लो) असून त्या ठिकाणावरून आकाशातील ताऱ्यांचे दर्शन होत नाही. तुम्ही जेथे राहता तेथील ठिकाणाचे Bortle रेटिंग काय आहे हे शोधून आकाश निरीक्षण करावे म्हणजे ह्या समस्येची तीव्रता लक्षात येईल.
सुदैवाने आता प्रकाश प्रदूषणाबाबत जागरूकता वाढत असून प्रदूषण कमी करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. इतर सर्व प्रदूषणांपेक्षा प्रकाश प्रदूषण कमी करण्यास तुलनेने सोपे आणि सहजसाध्य आहे. रस्त्यांवरील दिव्यांचे डिझाइन बदलून, दिवे बदलून आणि शहरातील विविध भागांतील प्रकाशमानता ठरवून (झोनिंग) हे करता येईल. International Dark-Sky Association ने ह्या संदर्भात काही मानके ठरवून दिली आहेत. लॅम्प शेड द्वारे प्रकाश फक्त रस्त्यांच्या दिशेला वळवणे, दिव्यांची luminosity कमी करणे, घराबाहेरील, दुकानांचे आणि ऑफिस बिल्डिंग्जचे दिवे रात्री १ ते सकाळी ७ वाजे पर्यंत बंद ठेवणे इत्यादी. वैयक्तिक पातळीवर घरातील दिवे गरज नसेल तर बंद ठेवणे, प्रकाशाची तीव्रता कमी करणे किंवा तीव्रता प्रसंगानुरूप बदलता येईल असे दिवे (dimmable) वापरणे असे उपाय करून प्रकाश प्रदूषण कमी करण्यास हातभार लावता येईल. त्यामुळे ऊर्जेची बचत आणि अर्थिक फायदा होऊन पर्यावरणाची वृद्धी होईल.
"तमसो मा ज्योतिर्गमय" अशी प्रार्थना करणाऱ्या आपल्या पूर्वजांनी प्रगत मानवाला रात्रीच्या वेळी प्रकाशमानता कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील अशी कल्पना देखील केली नसेल. वैज्ञानिक प्रगती करताना तारतम्य राखून पर्यावरणाची देखील काळजी घेतली तर पृथ्वी वरची सगळी मानवेतर जीव सृष्टी मानव जातीला दुवा देईल ह्यात शंका नाही.
रात्रीच्या वेळेचे प्रकाश
रात्रीच्या वेळेचे प्रकाश प्रदूषण आणि उच्च रक्तदाबाचा वाढता धोका या विषयावर बऱ्यापैकी संशोधन होत आहे
https://onlinelibrary.wiley.com/doi/pdfdirect/10.1111/jch.14760
Pages