संमीलन (भाग १)

Submitted by Abuva on 27 March, 2024 - 03:07
Google Gemini generated image

त्या जागतिक धक्क्यानंतर जीवन हळूहळू मूळपदावर येऊ लागलं होतं. पण व्हिसाचा एवढा प्रॉब्लेम झाला होता, की या कॉन्फरन्सला कोणी पुण्याहून येऊ शकेल असं वाटत नव्हतं. नव्हे, येणार नव्हतंच. इतर वेळी यूएस आणि ऑनसाइटचा जप करत फुरफुरणारे सगळे घोडे शर्यतीतून बाहेर पडले होते! ती दहशतच इतकी बसली होती म्हणा ना! म्हणजे कामाचं मेन लोड आता यूएसमधल्या टीमवर येणार होतं. खरं तर ही न्यूयॉर्कमधली कॉन्फरन्स होणार की नाही इथपासून शंका होती. पण टाईम्स स्क्वेअर मधली नववर्षाची पूर्वसंध्या नेहमीच्या उत्साहात पार पडणार अशी चिन्हं दिसू लागली होती. म्हणजे परिस्थिती निवळते आहे असं चित्र होतं. आणि कॉन्फरन्स ऑर्गनायझर्सकडून कन्फर्मेशन आलं होतं. या सगळ्यां घटनांमुळे आता इथल्या डेव्हलपमेंट टीमवर प्रेशर वाढलं होतं. उदयनच्या हाताखाली अर्जुन, उलुपी, चित्रांगदा सगळेच झडझडून कामाला लागले होते. अर्ध्या रात्री परत जाणं, लवकर येऊन पुणे टीमशी बोलणं, दिवसभर मीटिंगांच्या फैरी हे सगळं रोजचं रूटीन झालं होतं. वीस जानेवारीपूर्वी नवा रिलीज तयार असणं आवश्यक होतं. एक तर इंटरनेट बबलनंतरची जागतिक मंदी आणि आता 9/11! त्यामुळे नवा रिलीज कधी नव्हे एवढा महत्त्वाचा होणार होता. जुने कस्टमर सांभाळून विक्रमी नवे कस्टमर मिळवले तरच धडगत होती. नाही तर... नाही तर काय, याचा विचार करण्याची ही वेळ नव्हती. केल्याने होत आहे रे हाच मंत्र जपणं योग्य होतं. ही कॉन्फरन्स त्या दृष्टीनं मैलाचा दगड ठरणार होती.

---

अर्जुन आणि उलुपी दरवाजा उघडून आत आले. रात्रीचा दीड वाजला होता.
"चित्रांगदा झोपली वाटतं", लिव्हिंग रूमचा दिवा लावत अर्जुन म्हणाला.
"खायला काही केलंय का हिनं?" त्यानं उलुपीला प्रश्न विचारला.
"केलं असणार नं", उलुपी म्हणाली. पाठीवरची बॅग टाकून तिनं किचनकडे मोहोरा वळवला.
"पिझ्झा आहे, बहुतेक येताना तिनं बर्टुचीझ मधनं आणलेला दिसतोय. पण तिनं खाल्लाच नाहीये. तशीच झोपली काय ही बया? ए चित्रांगदा,..."

---

आज तिघंही उशीरा आले.
"कावळ्या, आज तुझा टर्न आहे डिनर बनवायचा", चित्रांगदा बॅग फेकून टीव्हीसमोर पसरत म्हणाली.
किरकिरत अर्जुन किचनकडे वळला.
फ्रेश होउन उलुपी त्याच्या मदतीला आली, तोवर त्यानं राईसकुकरमध्ये भात लावला होता. उलुपी त्याला म्हणाली, "मी भाजी चिरते, तू बाकी तयारी कर." भाजी चिरेपर्यंत दोघांच्या कामाविषयीच गप्पा चालल्या होत्या. मधेच चित्रांगदा आत येऊन उचकापाचक करून काहीतरी स्नॅक्स घेऊन परत बाहेर जाऊन बसली.
"उल्पे, तू यावेळी ग्रॉसरीला जाशील तेव्हा इंडियन स्टोअरमधून मुरुक्कू नक्की घेऊन ये", चित्रांगदेनं फर्मान सोडलं.
"का? तू नाही येणारेस का?"
"माझी रविवारी फुल डे मार्केटिंग टीम बरोबर मीटिंग आहे."
"मग आपण शनिवारी जाऊ"
"ए कसली बोर आहेस ग तू... या ना, फ्रेंड्स चालूये..." उलुपीनं अर्जुनकडे बघून ऐका याअर्थी मान हलवली.

---

रविवारी अर्जुननं त्याचा झोपेचा कोटा पूर्ण केला. मग संध्याकाळी उलुपीबरोबर जाऊन त्यानं आठवड्याचा मालमसाला भरला. रात्री चित्रांगदा आली तेव्हा ती जरा विचारात पडलेली दिसत होती.
उलुपीनं झकास डिनर बनवला होता. तिघंही एकत्र बसले. मग चित्रांगदानं विषय काढला.
आजची मीटिंग वादळी झाली होती. कस्टमर फीडबॅक वाईट होता. आणि हे देत असलेली फिचर्स कॉम्पिटिटर आधीच इम्प्लिमेंट करत असल्याची न्यूज मार्केटिंगवाल्यांनी आणली होती. व्हिच वॉज अ रिअली बॅड न्यूज. मग डेव्ह प्लॅनमध्ये काही मेजर चेंजेस करणं आवश्यक होतं. तिचा सिरिअस टोन बघून हे दोघंही कॉन्शस झाले. मग त्यांच्या लेव्हलला काय करता येईल याचा खल झाला. पुण्याला काय जबाबदारी देता येईल, ती कशी मॉनिटर करता येईल याचे प्लॅन झाले. या सगळ्यात चित्रांगदा आघाडीवर होती. नेहमीचा थिल्लरपणा जाऊन तिनं एकदम मॅच्युअर ॲप्रोच घेतला होता.
याचं एक कारण असं होतं की मीटिंगमधून उदयनला अवंतिकेची तब्येत बिघडल्यानं अचानक घरी जावं लागलं होतं. त्यात अवंतिकेला तारीख कॉन्फरन्सच्या सुमारासच दिली होती. त्यामुळे सगळ्यांनी असं ठरवलं की उदयनचा यावेळी भरवसा नाही. म्हणून चित्रांगदेला मार्केटिंगसाठी डेव्हचा एसपीओसी बनवला होता. तिच्यासाठी ही मोठी जबाबदारी होती! त्यामुळे पुण्याचं डेव्ह कोऑर्डिनेशन आता उलुपीला बघावं लागणार होतं. आणि अर्जुनला नव्या वर्कलोडमुळे रात्रीची झोप मिळेलच याची आता खात्री नव्हती!

---

जसा जसा कॉन्फरन्सचा ज्वर चढायला लागला तशी चित्रांगदेवर मार्केटिंग टीमकडनं प्रेशर्स वाढायला लागली. उदयनची उपस्थिती अनियमित होती. काय झालं होतं, की अवंतिकेला लास्ट ट्रायमेस्टरला बेड रेस्ट सांगितली होती. पण अजून तिची आई येऊन पोहोचली नव्हती. व्हिसाची लफडी चालूच होती. ती येईल की नाही हे ही निश्चित नव्हतं. त्याचा लोड या तिघांवरही पडत होता. डॉक्युमेंटेशन, प्लॅनिंग, सीईओ पासून सगळ्यांशी बोलायचं, त्यांना समजवायचं, ही कामं आता उदयन नसताना, आणि कैक वेळा उदयन असतानाही, पुढे होऊन चित्रांगदेला करावी लागत होती. इट वॉज अ ट्रायल बाय फायर. आणि मग अनेकदा शब्दांतून शब्द वाढून या तिघांची वादावादी होऊ लागली, तू तू मै मै होऊ लागलं.

---

अर्जुन स्वयंपाक करायला म्हणून लवकर घरी आला होता. दिवसभर उलुपी आणि चित्रांगदा भांडत होत्या. चित्रांगदेनं मार्केटिंगला दिलेली एक कमिटमेंट उलुपीच्या पुणे टीमनं केलेल्या उशीरामुळे झोपली होती. उलुपी म्हणत होती की पुण्यात अचानक टीमनं इयर-एंड पार्टी घातली. त्यामुळे दीड दिवस खंड पडला. त्यात झाला डिले, काय करणार? पण सगळेच काट्यावर आलं होतं. मार्केटिंगला नव्या फिचरचा अर्ली प्रीव्ह्यू एका इन्फ्लुएन्शिअल कन्सल्टंटला द्यायचा होता. त्याला खीळ बसल्याने त्यांनी चित्रांगदेला वाजवलं. चित्रांगदा उलुपीवर उखडली. त्यामुळे दोघीही अर्जुनाचे कान चावत होत्या. त्यामुळेच अर्जुन वैतागला होता. त्यानं घरी जाऊन डिनर बनवायचा बहाणा केला अन् लवकर सटकला.
सगळं आटपून तो टिव्हीसमोर बसून कालचा किंग्स - सन गेम बघत होता. डोकं बाजूला काढून समोरचा हायपर-ॲक्टिव्ह गेम एन्जॉय करायचा! किंग्ज बेदम हाणत होते सनला.
तोच दरवाजा वाजला. उलुपी घुश्श्यात अन् चित्रांगदा पेटून घरी आल्या होत्या. चित्रांगदानं आत आल्या आल्या अर्जुनाला आवाज दिला. "अर्जुन, आज मी तुझ्या बेडरूममध्ये झोपणार आहे. तू बाहेर कोचावर झोप." अर्जुनचा आ वासला गेला.
तो काही बोलणार एवढ्यात उलुपी चिडून म्हणाली, "काही गरज नाहीये. मीच झोपते बाहेर."
अर्जुन या सरबत्तीनं गारद झाला. तो गुळूमुळू म्हणाला, "पण उद्या ख्रिसमस आहे, म्हणून मी जरा जास्त वेळ झोपणार होतो". तो एकदा हिच्याकडे आणि एकदा तिच्याकडे पहात होता.
त्याच्या त्या बावरलेल्या पवित्र्यानं चित्रांगदा हतबुद्ध होऊन हसायलाच लागली, "अरे कावळ्या, कसा रे तू बैल...!".
आणि हसत हसतच तिनं उलुपीच्या गळ्यात हात घातला. "कसं होणार याचं? आपण नसतो तर काय केलं असतं गं यानं?” उलुपीलाही हसू फुटलं! दोघींचा ताण उतरला.
आता तो आणखीच बावचळला. च्यायला या पोरी... आत्ता कडाकडा भांडत होत्या, आता गळ्यात गळा घालून हसतायत. नुसती कटकट च्यामारी... आणि कपाळाला हात लावत तोही कसानुसा हसत त्यांच्यात सामील झाला.

जेवणाच्या टेबलवर त्यांचं ठरलं. ऑफिसच्या कटकटी घरी आणायच्या नाहीत.

---

आज ३१ डिसेंबर होता. न्यू इअर्स इव्ह. बॉसनं फतवा काढला होता. नो मॅटर व्हॉट, दुपारी तीनला काम संपवायचं, घरी जायचं आणि पाच वाजता त्याच्या घरी जमायचं. ठीक आहे.
अर्जुननं गाडी बॉसच्या घरासमोर थांबवली. आता दीड दिवस कामाचा विचार करायचा नाही असा सज्जड दमच बॉसनं भरला होता. सुमारे दीड‌ महिन्यानंतर ही सुट्टी मिळत होती. पुढची सुट्टी महिन्याभरानं म्हणजे कॉन्फरन्सनंतरच मिळेल हेही माहिती होतं. त्यामुळे एक सुखासीन तवंग मनावर दाटला होता. हीटेड कार मधून बाहेर पडल्यावर जाणवणाऱ्या त्या थंडीची आता आपल्या कथा नायक-नायिकांना सवय झाली होती. खरं तर बरेचदा ते इथे येऊन गेले होते. पण आजचा हा नूर काही वेगळाच होता.
या वर्षी‌ इथे व्हाईट ख्रिसमस घडला होता. म्हणजे ख्रिसमस पूर्वी बर्फ पडला होता. तो अजूनही टिकून होता. बॉसचं घर एका एकराच्या लॉटवर उभं होतं. तो कल-द्-साक होता. समोरची बाजू सोडता बॉसच्या घराच्या इतर तीन बाजूंनी निष्पर्ण सूचिपर्णी वृक्ष उभे होते. घरासमोरच्या लॉनवर ख्रिसमस-न्यू इअरची डेकोरेशन्स होती. आजूबाजूची सगळी घरं सजली होती. लालहिरव्या रंगाच्या फिती, कलाबतूंनी दारं-खिडक्या मढवली होती. अंगणात दिव्याच्या माळांनी सजवलेले रेनडिअर्स चमकत होते, कुठे ख्रिसमस ट्रीज नटल्या होत्या. त्या घरांच्या बे विंडोंमधून पसरणारा आश्वासक, उबदार, पिवळा‌ प्रकाश दाटून येणाऱ्या अंधारात प्रकाशपुंज फुलवत होता. घराच्या छतांवरल्या चिमण्यांतून धुराचे, बाष्पाचे चुकार पिसारे उलगडत होते. एखाद्या हॉलमार्क ग्रीटिंग कार्डवरच्या चित्रात असावा असा तो नजारा होता. देअर इज स्केर्सली अ मोअर प्लीझिंग व्ह्यू दॅन अ डेक्ड आऊट सबर्बन स्ट्रीट ऑन अ व्हाईट ख्रिसमस इव्ह.. तसं ओळखीचं झालेलं, पण तरीही मोहक ते दृष्य बघण्यासाठी उलुपी मागे रेंगाळली. थंडीत गारठलेला, संधिप्रकाशात लपेटलेला, तो रंगांचा, प्रकाशाचा देखणा सोहळा, दिलाला सुकून देणारा तो देखावा, ती मनात साठवून ठेवत होती.

तोच मागून उदयनचा ट्रक आला, थांबला. अवंतिकेला पाहताच तिला मदत करायला उलुपी सरसावली. दिवस भरत आलेली अवंतिका शिणलेली पण आनंदी होती. जराशा निसरड्या ड्राईव्ह वे वरून उलुपीनं अवंतिकेचा हात धरून तिला निगुतीनं घरात नेलं.

घरात शिरताच माहौल बदलला. बाहेरची थंडी आणि घरातली गर्मी यांचा मेळच नव्हता! अवंतिकेला बघताच बॉस आला, त्याची बायको धावली, एव्हरीवन मेड शुअर दॅट शी वॉज कम्फर्टेबल!

बॉसच्या हॉलमध्ये फायरप्लेस धडधडून पेटली होती. मसाल्याचे अन् पदार्थांचे खमंग वास दरवळत होते. मोठ्या आवाजात हिंदी गाणी लागली होती. चारसहा लोकरीत गुंडाळलेले बछडे इकडून तिकडे कोकलत धावत होते. जागोजागी मंडळी हातात पेय घेऊन संवाद करत उभी होती, बसली होती, पसरली होती. हास्यविनोदाचे फवारे उडत होते. घरच्या दिवाळीची आठवण प्रकर्षानं यायला हे दृष्य पुरेसं होतं!

खिडकीबाहेरचा अनोळखी पण हवाहवासा अवकाश
खिडकीआतला ओळखीचा आणि हवाहवासा सहवास
याच साठी केला होता ना हा अट्टहास?

(क्रमशः)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults