होळी-धुळवडीचे रंग!

Submitted by छन्दिफन्दि on 5 March, 2023 - 21:46

घराघरांतून येणारे पुरणपोळी चे खमंग वास, छोट्या छोट्या मुलांचे पाण्याबरोबर मनसोक्त खेळणे, झालच तर पिचकाऱ्या, पाण्याच्या फुग्यांची तळी, साग्रसंगीत बांधलेली होळी, भोवतालची रांगोळी, पताका, त्या पवित्र होळीची पुजा, नंतर ठोकलेल्या बोंबा, होळीत भाजलेल्या नारळाची झटापट, लोकगीतां वर धरलेला ठेका.

हा तर होळीचा धवल / पवित्र, निरागस रंग!!

***

कॉलेजचे पहिलच वर्ष. दोन तीन दिवसांपासून सगळ्या seniors मुलींची एकच चर्चा, "आता दोनतीन दिवस कॉलेजात येण्यात काही अर्थ नाही.,ही वाया गेलेली, उडाणटप्पू मुलं रंग, अंडी टाकून हैराण करतात."

" कोणी काही बोलत नाही?"

" ती कशी आहेत माहीत आहे ना? सगळे ह्यांच्या खिशात..management seats आहेत. काय करणार?"

" होळीच्या दिवशी ठीक आहे . पण आधीपासून का? काय दादागिरी आहे?"

गेल्या कॉलेजला. कॉलेज मध्ये तर सगळं नॉर्मल होतं. चार साडेचारला कॉलेज सुटल्यावर, हसत खेळत बाहेर पडल्या. एक कॉर्नर वळतायत तोच चाहूल लागली म्हणून मागे बघितल तर हे उडाणटप्पू येत होते.

अंदाज आल्या आल्या धूम ठोकली, पण तेही मागावर, एकीला पकडलच. पकडलं आणि डोक्यावर अंड फोडलं.

अपमानाने, रागाने धुमसत तशाच निघाल्या परत कॉलेजकडे.

हे टोळकं तिकडेच होत, पण त्यांचा अवतार बघून चेष्टा मस्करी सुरू.

तडक HOD na गाठलं, झाला प्रकार सांगितला.त्या

धनदांडग्यांना काय झालं माहीत नाही पण त्यानंतर असा प्रकार परत कधी कॉलेज मध्ये झाला नाही.

हा तर होळीचा क्रांतीरंग!!

***

गल्लीतल्या (१४-१५ वर्षांच्या) मुलीमुलींची होळी. अगदी नैसर्गिक म्हणावी तशी, साधेसे रंग. पिचकाऱ्या. बादल्या भरून पाणी. पाणी संपलं म्हणून आणायला दोघी गेल्या. आणि अचानक बाजूच्या गल्लीत टोळकं आलं.

कधी बोलणं चालणं नाही, ती गुपचूप बाजूला झाली. तर हे तिच्या रोखानेच येऊ लागले. काही कळायच्या आत त्यांनी तिला घेरलं, ती नको नको म्हणत असताना तिच्या अंगाला रंग लावला..

अपमानाच्या धुमसात डोळ्यांना कधी धारा लागल्या तिलाही कळलं नाही. ती तिची खेळलेली शेवटची होळी.

हा झाला होळीचा रसभंग/ भयरंग!

***

एका उच्चभ्रू वस्तीमधील होळी. सकाळपासून स्पीकर ढणाणतोय. २-४ टँकर उभे आहेत. मधल्या लॉन वर प्लास्टिक टाकून चक्क टँकसारखा हौद बनवलाय.

लहान मोठे रंगाने इतके माखलेत की ओळखू येऊ नये.

बाजूला स्टॉलवर थंडाई, बिअर, अनेक विविध खाद्यपदार्थ, सगळी चंगळ चालू आहे.

पुरुष बायका सगळेच बेभान नाचतायत, एकमेकांना रंग लावतायत, त्यानिमित्ताने अंगचटीला जातायत .

अतितलम कपडे, साडी (तिचं नेहेमीचं शालीन) रूप सोडून आज भलत्याच अंदाजात, मधे मधे बरसणाऱ्या मोठ्या मोठ्या टँकरच्या फवार्यानी सगळे अजूनच चेकळतायत, वर "बुरा न मानो, होली है !" चा गजर.

हा झाला होळीचा (बिभत्स) गडद रंग!

ह्या आणि अशा विविध रंगांमधून आपल्या होळीचा रंग आपणच निवडायचा!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही अमेरिकेत कशी होळी खेळता? महाराष्टृ मंडळाचे गृप इवेंट असतात का? इथे सोसायटीचे इवेंट असतात. पोरेटोरे आजही खेळत आहेत. आज रात्री सोसायटीचे तर्फे होलिका दहन आहे व उद्या लॉबी मध्ये रंगांचा खेळ आहे. व नंतर पी टु सावलीतील लेव्हल वर लंच आहे. ह्याची टोकन मागील आठवड्यातच वितरीत झालेलीत. हॅपी होली. ह्या वर्शी पाणी टंचाईच्या हाकाट्या आलेल्या नाहीत व कोव्हिड नाही म्हणून मुले उत्साहात आहेत.

पुरण पोळी सर्वत्र उपलब्ध आहेत. महिलांना रोजगार मिळतो. तनवी किशोर च्या चॅनेल वर काल बघितले कि एक बाई माहीम येथे पुरण पोळीच्या ऑर्डरस घेतात २५ किलो रोज पुरण घालत आहेत व पहाटे उठून सुरू करतात. त्यांच्या होळी ऑर्‍डर फुल आहेत. दीपिका पदुको न
- भारतातील एक प्रसिद्ध नटी - हिच्या घरी पण ह्या बाईंच्या पोळ्या गेलेल्या आहेत. व्हेरी इंप्रेसिव्ह. फार मेहनत आहे हो त्या बाईंची. मुलगा पण बारावी असूनही सायकल वर डिलिव्हर्‍या करतो.

मी कटाची आमटी तरी करणार आहे. मास्टर रेसीपी वर कांदा लसूण घातलेली रेसीपी दाखवली आहे पण माझी आई खडा मसाला, विदाउट कांदा लसूण करायची. तशीच करीन.

आम्च्या लोकल मिठाई दुकानात थंडाई गुजिआ पण उपलब्ध आहेत. फॅमिली थंडाईची एक लिटर बाटली आहे.

आमच्या लहान पणी पुण्यात रंगपंचमी खेळायचो. आता सर्वत्र होळी प्लस धुळवड खेळली जाते.

भारतात नैसर्गिक रंग - विदाउट हार्म फुल केमिकल्स- मिळतात तेच घेउन होळी खेळावी. बाहेर पडताना केसात तेल लावुन जावे.
उन्हाळा सुरू झालाच.

हॅपी होली.

ह्या वर्शी पाणी टंचाईच्या हाकाट्या आलेल्या नाहीत व कोव्हिड नाही म्हणून मुले उत्साहात आहेत.
>>>>>

होली नियम नही नियत देख के खेली जाती है Happy
(ओळखा कुठल्या पिक्चरचा डायलॉग)

आमच्याकडे दरबर्षी तितक्याच उत्साहात खेळली जाते. कोविड वगैरे अंधश्रद्धा होती. काय कोणी फारसे आजारी पडले नाही कोविडकाळात होळी खेळून. स्टेटसवरचे फोटो पाहून मात्र लोकांनी त्रास दिला की कश्याला पोरांना खेळायला पाठवले. पण जे लॉजिक फटाक्यांबाबत तेच ईथे. आजूबाजूला उत्साहाचा माहौल आहे तर आपण आपल्या पोरांना दमदाटी करून घरात बसवणे अवघड. यावर्षी तर आठवडाभर आधीच पोरं भिजवाभिजवीचे खेळ खेळू लागलेत. त्यांना बघून लहानपणीचे चाळीतले दिवस आठवतात. आठवडाभर आधीच रोज संध्याकाळी हाच खेळ चालायचा. पाण्याचे पिंप भरून असायचे. घेतला, उचलला, बुचकळला बाहेर काढला. पाण्याची नासाडी कमीत कमी.

पण पाणी मात्र नेहमीच जपून वापरावे. मग होळीच असे नाही तर वर्षभर. याबाबत आधी मोठ्यांनी अक्कल दाखवावी. मग लहानांनी अनुकरण करावे ही अपेक्षा ठेवावी.

ह्या वर्शी पाणी टंचाईच्या हाकाट्या आलेल्या नाहीत व कोव्हिड नाही म्हणून मुले उत्साहात आहेत.
>>>>>

होली नियम नही नियत देख के खेली जाती है Happy
(ओळखा कुठल्या पिक्चरचा डायलॉग)

आमच्याकडे दरबर्षी तितक्याच उत्साहात खेळली जाते. कोविड वगैरे अंधश्रद्धा होती. काय कोणी फारसे आजारी पडले नाही कोविडकाळात होळी खेळून. स्टेटसवरचे फोटो पाहून मात्र लोकांनी त्रास दिला की कश्याला पोरांना खेळायला पाठवले. पण जे लॉजिक फटाक्यांबाबत तेच ईथे. आजूबाजूला उत्साहाचा माहौल आहे तर आपण आपल्या पोरांना दमदाटी करून घरात बसवणे अवघड. यावर्षी तर आठवडाभर आधीच पोरं भिजवाभिजवीचे खेळ खेळू लागलेत. त्यांना बघून लहानपणीचे चाळीतले दिवस आठवतात. आठवडाभर आधीच रोज संध्याकाळी हाच खेळ चालायचा. पाण्याचे पिंप भरून असायचे. घेतला, उचलला, बुचकळला बाहेर काढला. पाण्याची नासाडी कमीत कमी.

पण पाणी मात्र नेहमीच जपून वापरावे. मग होळीच असे नाही तर वर्षभर. याबाबत आधी मोठ्यांनी अक्कल दाखवावी. मग लहानांनी अनुकरण करावे ही अपेक्षा ठेवावी.

बाहेर पडताना केसात तेल लावुन जावे.
>>>>

केसच काय चेहऱ्याला आणि हातापायाला पाठीला पोटाला सर्वांगाला तेल लाऊन जावे. रण्ग टिकत नाही.
पण आमच्याईथे ईतकी नालायक पोरे होती. आधी साबण चोळून आंघोळ घालायचे. मग रंग लावायचे.

एक हिरवा बारीक दाणे असलेला रंग येतो जो पाण्या त टाकला की डार्क मॅजेंटा गुलाबी होतो. हा फार पक्का बसतो. सध्या पिचकार्‍यां मध्ये नवीन काय आले आहेत डिझाइन्स? बारके फुगे पाणी भरुन वरुन फेकायचे ते आहेत का? फोटो फोटो.

मी सर्वांगाला तेल लावायचे लिहिणार होते पण भ्या वाटले.

इथे पोरेटोरे व तरुण गच्चीत पण खेळतात बिलिडिन्ग च्या. मी आधी २९ व्या मजल्यावर राहायचे तेव्हा खालील सर्व छोट्या इमारतीतील खेळ वरुन दिसायचे.

हो ळीची गाणी : प्लेलिस्ट इथेच देते.
१) होली खेलत रघुविरा बिरज में
२) रंग बरसे भीगी चुनर बाली रंग बरसे
३) आज गोकुळात रंग खेळ तो हरी.
४) सैराट मध्ये एक गाणे आहे त्यात रंग खेळतात
५) आज न छोडें गे बस हमजोली
६) होली के दिन दिल मिल जाते है: हेमा काय दिसते.
७) होली आईरे आईरे
८) अरे जारे हट नटखट.
९) बलम पिचकारी
१०) होली रे रसिया

काही उपयोग नाही.तेल, क्लिंजिंग मिल्क, सगळं थापलं तरी मुरलेले लोक बदाबदा हिरवा रंग लावतात.गुलाबी लावला आणि तो नाही निघाला तर चेहरा किमान बरा दिसतो.हिरवा नीट निघाला नाही तर तो कार्टून मासिकात उलट्या होणारी पात्रं हिरवी दाखवतात तसा दिसतो.
मी सात्विक चे पूर्ण नैसर्गिक रंग विकत घेऊन लोकांना देत होते Happy पण 'हा घ्या सात्त्विक रंग आणि मला फक्त हाच लावा' म्हणेपर्यंत 4 हात येऊन भसाभस हिरवा, जांभळा आणि गुलाबी भडक रंग लावून टाकतात.

आमच्या चाळीत सर्वांचे लाल गुलाबी रंग राहायचे. पण ते सिल्व्हर काळे रंगाचे ऑईलपेंट म्हटले जाणारे रंग वापरले जायचे नाही. वा शेजारच्या पाजारच्या वाडीतून कोणी टोळी आली आमच्यातल्या कोणा त्यांच्या ओळखीतल्या पोराल तसला रंग लावायला तर आमची सर्व पोरे मिळून त्यांना चोप देऊन हाकलवून लावायची. ऐकली नाहीतर पकडून पकडून चिखलात लोळवायची. पक्के रंग आणि अंडी आमच्याकडे बॅन होती. एकदा कोणाच्यातरी देवघरात जाऊन अंडे फुटलेले तेव्हा राडा झालेला त्यापासून...

कालच कँडिन्स्की नावाच्या चित्रकाराबद्दल एक रोचक लेख वाचनात आला. या चित्रकाराच्या मते - रंग मानवाच्या सुप्त मनातील दालन उघडण्याचे काम करतात. रंग प्रचंड ध्यात्मिक आणि भावना उत्तेजित करणारे असतात. उदा - पिवळा रंग हा फार आक्रमक, अंगावर येणारा, विस्तार पावणारा , टेरेस्ट्रिअल आहे. याउलट निळा हा खूप अध्यात्मिक आणि शांतवणारा जवळ जवळ काळ्यातच विलीन होउ पहाणारा रंग आहे. तो म्हणतो गोलाकार ज्याला फारसे व्यक्तीमत्व नसतेत्या आकाराला निळा रंग शोभतो किंवा म्हणजे त्या आकाराच तो रंग आहे. याउलट ३० अंश जो कोन असतो तो इतका शार्प आणि अ‍ॅक्युट आहे की त्याला पिवळाच रंग देता येइल.
हा चित्रकार म्हणतो - रंग हे जर वाद्याच्या keys समजले तर डोळे म्हणजे जणू hammer. यांच्या मीलनातून संगीतनिर्मिती होते व रसिकांची भावस्पंदने कंप पावतात. थोडक्यात रंग हे संगीतनिर्मिती करतात. याचित्रकाराला स्वतःला गाणे ऐकताना मनःचक्षूंसमोर रंग दिसत.
कँडिन्स्कीची एकाहून एक सुंदर पेंटिग्ज, नेटवरती आढळतील. काहीतरी चित्तवेधक जादू आहे खरी त्यांच्यात.

मल सर्वात आवडलेले - Several Circles, 1926, Solomon R. Guggenheim Museum, New York City न्यु यॉर्कच्या प्रदर्शनात आहे. हे एकदा पहायला हवे.
- By Wassily Kandinsky - http://www.fertomniavirtus.com/vassily-kandinsky/, Public Domain, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=37610966

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/0e/Vassily_Kandinsky%2C_1926_-_Several_Circles%2C_Gugg_0910_25.jpg/800px-Vassily_Kandinsky%2C_1926_-_Several_Circles%2C_Gugg_0910_25.jpg

अश्विनीमामी, ऋन्मेऽऽष
लहानपणची आमची होळीही अशीच जायची साग्रसंगीत पुरणपोळ्या, पिचकाऱ्या , पाण्याचे फुगे , बदल्या भरभरून पाणी खाली किंवा वर गच्चीत घेऊन जाणे, केसांना, अंगाला तेल चोपडूनही दुसऱ्या दिवशी शाळेत इकडे तिकडे राहिलेला गुलाबी/ हिरवा रंग लपवत जाणे, आणि मुख्य म्हणजे टाकून द्यायच्या कपडे घालून होळी खेळणे (पांढरे कपडे वगैरे चैन नव्हती ).

अश्विनीमामी, इकडे पेटवायची होळी नाहो पण रंगांची मजा जरूर असते. वेगवेगळ्या संस्था वीकेंडना होळी साजरी करतात. तिकीट काढून असतात कार्यक्रम, पण इकडे सगळंच तिकीट काढून असतं. आता पुढच्या आठवड्यापासून एखाद महिनातंरी वीकएंड ना होळी कार्यक्रम आहेत.
आमच्या ओळखीतले इकडचे लोकल लोकं (स्पॅनिश, अमेरिकन गोरे ) वगैरे पण आनंदानी खेळतात होळी, त्यांना मजा येते.

पुरणपोळ्या तर आपल्या घरच्याच असतात, खमंग वेलची -जायफळ घातलेल्या.

मी सात्विक चे पूर्ण नैसर्गिक रंग विकत घेऊन लोकांना देत होते Happy पण 'हा घ्या सात्त्विक रंग आणि मला फक्त हाच लावा' म्हणेपर्यंत 4 हात येऊन भसाभस हिरवा, जांभळा आणि गुलाबी भडक रंग लावून टाकतात. >>> Happy Happy

गरबा सुद्धा ॲड करा
आमच्याकडे गुजराती बायका गरब्याची गाणी लाऊन स्विमिंग पूलमध्ये गरबा खेळत होत्या...

तुम्ही लेखात मांडलेले मुद्दे दुर्लक्षित राहिले.
गुडी गुडी प्रतिसाद आल्यावर त्यावर लिहिता लिहिता थांबलो.
पण गेले दोनतीन दिवस ट्विटरवर दिसणारे अनेक व्हिडियो पाहून तुमचा लेख किती समयोचित आहे ते प्रकर्षाने जाणवले.

फॉरेन टुरिस्ट स्त्रीला आलेला गलिच्छ अनुभव, एका जपानी मुलीला धरून तिच्या डोक्यावर अंडी फोडणं , स्विगी की झोमॅटोने धुळवड म्हणून डोक्यावर अंडी फोडू नका असा संदेश दिल्याने त्यांच्यावर बहिष्काराची टुम (याआधीही बहिष्कार घालून अनेकांनी अ‍ॅप अन इन्स्टॉल केलं होतं, आता पुन्हा केलं) , पायी जाणार्‍या बुरख्यातल्या दोन स्त्रियांवर टोळक्याने जवळून धबाधब मारलेले फुगे , अर्ध्या उघड्या पुरुषाच्या मांडीवर अल्पवयीन मेहुणीला जबरदस्तीने धरून तिला चिखल फासणं आणि हा व्हिडियो तिच्या थोरल्या बहिणीनेच शूट करणं, घुंघट ओढून हातात दांडके घेऊन उभ्या असलेल्या स्त्रिया आणि त्यांच्यासमोर समूह स्वरात अश्लीलतेची परिसीमा अशी गाणी म्हणणारे मोहल्ल्यातले, कदाचित त्यांच्या नात्यातले पुरुषगण आणि ही तिथली परंपरा आहे असं सांगणारे लोक...
कशासाठी?

ओह भरत.हे सर्व खरंच माहीत नव्हतं.बहुतेक सध्या बातम्याभ्यास कमी पडत असावा.
ही गलिच्छ प्रवृत्ती आहे, जी संधी शोधत असावी.आज होळी, उद्या गणपती, परवा न्यू इयर, ख्रिसमस पार्टी.
योग्य उपाय, पर्याय नाही कायदेशीर कारवाई किंवा बलवान होऊन प्रतिकार याशिवाय सध्या तरी.

गुडी गुडी प्रतिसाद आल्यावर त्यावर लिहिता लिहिता थांबलो.>> नवे सभासद एकदम हर्ट होतात म्हणून सद्यस्थितीवर भाष्य केले नाही. काही व्हिडीओ बघितलेत ट्विटर वर.

भयानक. मुंबईतली एक बातमी पाहिली. एका माणसावर कुणीतरी अचानक पाण्याचा फुगा मारला आणि त्या माणसाचा मृत्यू झाला!

लोकल ट्रेन वर फुगे मारणं खूप आधीपासूनच आहे. त्यात एका मुलीचा डोळा गेलेला, अशी बातमी प्रामख्याने इतक्या वर्षांनंतरही आठवत्ये.
मग त्यात गटाराचे, किंवा इतर केमिकॅल युक्त पाणी मिक्स करून भरलेल्या फुग्यांमुळे स्किन जळली वगैरे बातम्याही बऱ्याच जुन्या.
काही वर्षांपासून फुग्यांवर बंदी आणली. आता त्या पातळ प्लॅस्टिकच्या पिशव्या भरून फुग्यांसारख्या वापरतात.

हा तर होळीचा धवल / पवित्र, निरागस रंग!!<<< हा रंग अगदी परिचयाचा, कित्येक वर्ष खेळलेला. वयात येईपर्यंतच्या काळातील. जेव्हा आपण एका सुरक्षित कवचात असतो. अजूनही वर बऱ्याच जणांनी सांगितल्याप्रमाणे खूप ठिकाणी हाच असतो आणि असावा.

पण हळू हळू मोठी होत जाताना, जगात बाहेर पडल्यावर दुनियेत खेळले जाणारे इतर रंगही नाईलाजाने बघायला मिळाले. त्याच एक छोटंसं स्फुट, व्यक्त होणं . येव्हढच !!

.

छान लेख..!

किती वर्ष झाली होळी खेळून तेचं आठवत नाही आता..
शाळेत असताना खेळली असेल तेवढेच .. लहानपणी आठ दिवस आधीच पळसांच्या फुलांचा, भेंडीच्या ( एक झाड आहे) फळांचा रस काढून बाटलीत भरून ठेवायचे .. तो रंग धुळवडीला खेळायला वापरायचे.. दुपारी रंग खेळून झाला की, आम्ही सगळ्या मुली सगळ्यांचा दारात होळीची गाणी म्हणत नाचायचो आणि त्यांच्याकडून ' पोस्त' (पैसे) वसूल करायचो...

खूप वर्ष झाली होळी खेळलीच नाहीये आता मैत्रिणी आल्या बोलवायला तर कपाळावर, गालावर गुलाल लावून घेते .. फक्त ..! आता रंग खेळायची इच्छा नसतेच.. मुलं खेळतात होळी.. खेळू दे बापडे... हेच तर वय आहे त्यांचं आनंद मिळवण्याचं.. लहानपणीच्या सुंदर आठवणी आयुष्यभर पुरतात.

चार वर्षापूर्वी सासूबाई अचानक भर धुलीवंदनाच्या दिवशी हार्ट ॲटेकने गेल्या. दुःखाचा पदर सोडायला हवा खरा पण प्रत्येक होळीत त्या दुःखी दिवसाची आठवण ताजी होतेच.

लहानपणी आठ दिवस आधीच पळसांच्या फुलांचा, भेंडीच्या ( एक झाड आहे) फळांचा रस काढून बाटलीत भरून ठेवायचे .. तो रंग धुळवडीला खेळायला वापरायचे.. दुपारी रंग खेळून झाला की, आम्ही सगळ्या मुली सगळ्यांचा दारात होळीची गाणी म्हणत नाचायचो आणि त्यांच्याकडून ' पोस्त' (पैसे) वसूल करायचो...>>> ही माहिती एकदम नवीन आहे. रंग तयार करून बाटलीत साठवण्याची कल्पना ही मस्त..

रा पण प्रत्येक होळीत त्या दुःखी दिवसाची आठवण ताजी होतेच>>> समजू शकते.

इकडे ह्या weekend ला शाळेतील काही पालकांनी मिळून होळी पार्टी योजिले होती.. पण पाऊस असल्याचे वर्तवल्यामुके आता पुढे ढकलावी की अजून काही तो पर्याय शोधत आहेत..

त्यांचे २-३ reminders आले पांढरे कपडे घालून या... आता ह्या होळी/ रंगदिनाला जावे तरी पंचाईत, न जावे तरी पंचाईत..

लोक खरंच ( टीव्ही किंवा सिनेमा सोडून) पांढऱ्या रंगाचे कपडे घालून रंग खेळतात का???

पांढऱ्या कपड्यात फोटो चांगले येतात हा एकच फायदा.बाकी अशी बॉलिवूड फॅशन ममव घरात होत नाही.सर्वात मळखाऊ, सर्वात जुना, पोछा बनवण्या च्या एक स्टेज आधीचा कपडा वापरला जातो.
त्यातल्या त्यात अतिशय स्वस्त(टुकार) दर्जाचा एखादा टीशर्ट मिळाला तर घालता येईल.
('कोरडेच रंग आहेत, पुसून टाका नंतर' या उष्ण हवामान किंवा समशितोष्ण हवेत कविकल्पना आहेत.घाम किंवा थोडे जरी पाणी सांडले तरी रंग चिकटतात)

आम्ही मुलं सोंगं काढून कॉलनीत पोस्त मागायचो, मुली भाग घेत नसत. आजूबाजूच्या पाड्यातील आदिवासी मुलं,मुली, तरुण, वयस्कर पुरुष ,स्त्रिया रंगपंचमी पर्यंत सोंगं काढून आमच्या कॉलनीत नाच गाणी करून पोस्त मागत असत. वाघ आणि मारुतीचे सोंग हमखास असायचे. लमानी बायका पारंपरिक गीत आणि नृत्य करत पोस्त मागायच्या. पाच दिवस खूप मनोरंजन होत असे.
भारत पाक युद्धानंतर कॉलनीतल्या मुलांनी याह्या खान आणि टिक्का खान ह्यांचे सोंगं कॉलनीत काढून रग्गड पोस्त मिळवली होती. तेव्हा संध्याकाळच्या अंगत पंगतमध्ये पहिल्यांदा हॉटेलातून ऑर्डर देऊन बटाटावडा वाटण्यात आला. एरवी भेळ किंवा घराघरांतून पोहे ,कांदे बटाटे गोळा करून कांदे पोहे दिले जायचे. दिवाळीपेक्षा होळी सणाला मजा यायची. अंगातील सगळ्या मस्तीचा निचरा व्ह्यायचा.

पांढऱ्या कपड्यात फोटो चांगले येतात हा एकच फायदा>>>सोमी साथीच्या फोटो साठी काही विशेष (खर्च, मेहनत, विचार, वेळ ) करायला आवडत नाही...

त्यातल्या त्यात अतिशय स्वस्त(टुकार) दर्जाचा एखादा टीशर्ट मिळाला
तर घालता येईल.>>> खर आहे..

पण पांढऱ्या वर डाग पडवेसे कधी च वाटतं नाही .. हॉकी असली तरी .. त्यामुळे या नियमा/ सुचने पासून फारकत घ्यायचे ठरविले आहे.

आग्या तुमच्या आठवणी रम्य आहेत.
होळी सोंग आणायचं आता ह्या पोस्टान मधूनच कळलं.. म्हणजे हे कोकणातल्या शिमग्यशी संबंधित आहे का?? किंवा अजून कसे?

ठाणे जिल्ह्यातील खेड्यापाड्यात ,खासकरून आदिवासी पाड्यात होळीचे सोंगं काढले जायचे. औद्योगिक, सरकारी कॉलनी अशा भागात असल्या की हे लोक पोस्त मागायला येत. तेव्हा त्यांना कॉलनीत प्रवेश दिला जात असे. त्यांचे बघून आम्हीही सोंगं काढायचो.
कॉलनीत सर्व जाती धर्माचे रहिवासी असायचे , हा अमुक धर्माचा आहे म्हणून त्याला रंग लावू नका असे काही होत नसे. उलट सगळेजण प्रत्येक सार्वजनिक सणात भाग घ्यायचे. आजूबाजूच्या गावात जशा सणांच्या प्रथा असायच्या त्याच पद्धतीने आमच्या कॉलनीत सण साजरे व्हायचे. जसे गणपती , मग तो सार्वजनिक असो वा घरघुती पाच दिवसांचाच असे. दहा दिवस कुठेच नसे. वातावरण बरेच मोकळेढाकळे असे , कटूता नावालाही नव्हती.

अमुक धर्माचा आहे म्हणून त्याला रंग लावू नका असे काही होत नसे. उलट सगळेजण प्रत्येक सार्वजनिक सणात भाग घ्यायचे.
बरेच मोकळेढाकळे असे , कटूता नावालाही नव्हती>>> खूप छान..
माझ्या आठवणीत पण अस काहीसं आहे. होळी, दिवाळी सगळ्यात ते ( ख्रिश्चन कुटुंबातील मुलं ) सहभागी व्हायची.

Pages