दोन धृवावरच्या दोन मुली

Submitted by पॅडी on 25 March, 2024 - 23:54

एक कोवळी पोर
वारसा हक्काने अंथरलेल्या
मखमली पायघड्यांवर
नाजूक पावले टाकत;
गोंदवून घेते अंगभर
कोडकौतुकाचा गंध वर्षाव,
दुसरी फाटक्या बापाच्या
रापल्या हातांनी वाजवलेल्या
जीर्णविदीर्ण ढोलाच्या तालावर
सांभाळते दोरावर तोल; घेते-
श्वास रोखून धरलेल्या
बघ्यांच्या काळजाचा ठाव

एक स्वाक्षरी संदेशासाठी
सरसावलेल्या वह्यांवर
लफ़्फ़ेदार सराईतपणे
वडीलांचे नाव लावते; दुसरी-
चिरमटल्या देहाची कमान करून
मातीत रोवलेली सुई
डोळ्यांच्या पापणीने अल्लाद उचलते

वैभवशाली परंपरा पुढे चालवण्याच्या
सरंजामशाही दिशेने सुरू
एकीची दमदार वाटचाल,
पोटाची खळगी भरण्यासाठी
दुसरी चिणून घेते बालपण
रुपया-दोन रुपयासाठी-
चौका चौकात होत जाते हलाल

दोघींच्याही चिमण्या ऊरात
विधात्याने निर्माण केलेले
निरामय हृदय टिकटिकतेय ,
एकीची कसदार काळी माती
पिकवतेय सोने;
दुसरीचे मुरमाड माळरान
जगण्याच्या भ्रांतीपोटी
इथे तिथे लवते-झुकतेय

...शेकडो ऽऽ योजने दूर
दोन धृवावर उभ्या दोन मुलींची आयुष्यं
परस्परांना छेद न देता
चालत आहेत समांतर,
आकाशाला गवसणी घालण्याचा एकीचा अट्टाहास;
दुसरी पोचत नाही कुठल्याच मुक्कामाला
फक्तच कापत राहते-
ओठा-पोटामधले आशाळभूत अंतर...!
***

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वारसा हक्काने अंथरलेल्या
मखमली पायघड्यांवर
कुणी कुठे जन्म घ्यावा हे ठरवू शकत नाही... पराधीन आहे जगती....
एरवी कविता सुंदर आहे... दोघींच्या जगण्यातलं दोन ध्रुवातलं अंतर अगदी योग्य मांडलय.
सरंजामशाही दिशेने सुरू‌‌.....
धिरुभाई पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत... मनात आलं पेट्रोल कंपनी आपली असावी..
हा सुरुवातीचा स्फुल्लिंग वाईट कसा...
मी खूप गरीबी पाहिली मला नाही पाहायची आता . माझ्या मुलांना तर मुळीच नको...पुढे गेल्यावर परत फिरणे नाही. . जीवघेणी स्पर्धा पाहिल्यावर भलेबुरे कळेनासे होते आणि सरंजामशाही जन्म घेते असे माझे मत...

दसा - गंमत पहा...आपण प्रश्न करताहात आणि उत्तर ही देताहात...! म्हणजे माझे काम सोपेच करता आहात..

>>> मी फक्त दोन धृवावरच्या दोन जीवनाकडे तटस्थपणे अंगुलीनिर्देश करतोय. संयतपणे.

बाकी आपली समज अन् माझ्या कवितेची उकल स्वागतार्ह आहेच... खूप खूप आभार ...लोभ आहेच.. असाच असू द्यावा...

धनवन्ती जी, खूप खूप आभार प्रतिसादासाठी...

रुपाली जी, मन:पूर्वक धन्यवाद आपले..!

विदारक वास्तव आहे हे.
>>>>मी खूप गरीबी पाहिली मला नाही पाहायची आता .
Sad तथास्तु!! दसां फार वाईट वाटले. गरीबीसारखा शाप नाही.