द्वेष : एक भय गूढकथा भाग ११

Submitted by प्रथमेश काटे on 21 March, 2024 - 10:36

द्वेष : एक भय गूढकथा
भाग ११

प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सोनालीला समोरच्या दृश्याचा अर्थच लागेना. ही बाई... बाई कसली ? तरुणीच. साधारण प्रियाच्याच वयाची असेल ती. तर, ही तरुणी कोण ? हा प्रकार तरी काय होता ? हे तिला समजत नव्हते. पूरती गोंधळून गेली होती ती.
राजाभाऊ चकित होऊन एकटक तिच्याकडे पाहत होते. एखाद्या कादंबरीतील नायिकेच्या सौंदर्याच्या रसाळ वर्णनाला साजेसं असंच तिचं रूप होतं. एक मात्र होतं. त्या सौंदर्यात काळजावर हलकेच मोरपीस फिरवून चित्तवृत्ती सुखावणारी, फुलवणारी निरागसता, मार्दव नव्हतं. उलट काळजाचा भेद घेऊन मनात खळबळ उडवणारी तीक्ष्णता, तिखटपणा होता. तिचा जरासा भरीव ; पण आकर्षक बांधा, गोरीपान, रसरशीत कांती, काळेभोर, लांबसडक केस, गोलाकार चेहरा, धनुष्याकृती भुवया, पिंगट डोळे, चाफेकळी नासिका, नितळ, गुलाबी ओठ या रूपाच्या एक एक दागिन्यांवरून नजर हटत नव्हती. राजाभाऊंच्या आजवरच्या पाहण्यात आलेली सर्वात सुंदर स्त्री म्हणजे सोनाली. असे ते मानत होते ; पण काही क्षणांसाठी ते खरोखर सोनालीलाही विसरून गेले होते.

श्रीच्या चेहऱ्यावरून त्याला फार आश्चर्य वाटल्यासारखं मुळीच दिसत नव्हतं. तो नेहमीसारखाच शांतपणे, आणि स्थिर, एकटक नजरेने त्या तरूण स्त्रीकडे पाहत होता. जणू काही तो तिला ओळखत होता ; पण त्याची शांत नजर सावध झाली होती. हाताच्या मुठी त्याने किंचित आवळून धरल्या होत्या.

आणि प्रिया... ती जागेवर स्तब्ध होऊन उभी होती. ही अर्थात तिच्यासाठी प्रचंड अनपेक्षित गोष्ट होती. तिला तिच्या वडिलांना भेटायचं होतं. तेच ( माहीत नाही किती दिवस ) या त्यांच्या घरात अदृश्यपणे वावरत असणार, अशीच तिची समजूत होती. पण जे समोर येत होते त्याने तिची मतीच कुंठित होऊन गेली होती. काय विचार करावा, कसं रिअॅक्ट करावं हेच तिला काही क्षण समजेना ; पण त्याही अवस्थेत दोन गोष्टी तिला जाणवल्या. त्या तरूणीचं लावण्य खरंच असामान्य होतं यात शंकाच नव्हती ; पण त्या स्त्रीमध्ये काहीतरी वेगळं होतं. जे तिच्या फार जवळ उभ्या असलेल्या प्रियाला लक्षात आलं. तिचं संपूर्ण शरीर काहीसं विरळ, धूसर पारदर्शक होतं. पाठीमागील अंधारात बुडालेले वस्तूंचे आकार तिच्यातून आरपार दिसत होते. आणि तिचे ते डोळे ! त्यांची किंचितशीही उघडझाप वा हालचाल ही होत नव्हती. प्रियावर एकटक रोखलेले होते ते. एखाद्या दगडी पुतळ्या सारखे. त्यात कुठलाच भाव तर मुळीच नव्हता ; पण, प्रियाला तर क्षणभर वाटून गेलं की... की त्या डोळ्यांत प्राणही नाही. त्या विचारानेच तिच्या शरीरावर सरसरता शहारा उठला. तिचं काळीज थरारलं.

घाबरून प्रियाने नजरही फिरवली ; पण... तेवढ्याच आवेगाने पुन्हा ती समोरच्या तरूणीवर येऊन स्थिरावली. त्या नजरेत शंका होती. आश्चर्य होतं. अंतर्मनाच्या खोल गर्तेतून काहीतरी वर येऊ पाहत होतं. ही समोर उभी असलेली तरूणी अनोळखी मुळीच नव्हती. कधीकाळी तिच्याशी प्रियाचा संबंध आला होता. चांगलाच निकटचा ; पण फार पूर्वी. आणि मेंदूला अजून थोडा ताण दिल्यावर तिला सगळं बऱ्यापैकी स्पष्ट आठवलं. त्या आठवणीने प्रियाला प्रचंड धक्का बसला. तिचे डोळे विस्फारले. ओठ विलग झाले. मानेने नाही... नाही... करत तिने पाऊल जरासं मागे घेतलं. त्याचवेळी दोन गोष्टी एकदम घडल्या.

" प्रिया..." मागून श्रीचा आवाज आला. त्याच्या आवाजात आज पहिल्यांदाच जराशी भीती होती. ती त्याच्याकडे मागे वळू लागली. त्याचवेळी नजरेच्या कडेतून ती समोर ची स्त्री गायब होताना दिसत आहे, हे तिच्या लक्षात आले नाही. आणि एकदम तिच्या शरीराला एक झटका बसला. शेवटी तिला एवढच दिसलं, की तिच्याचकडे पाहत असलेल्या श्रीच्या नजरेत एकाचवेळी काहीशी भीती, चिंता आणि एक तीक्ष्ण धारही होती.

•••••••

ते भय, काळजी कमीकमी होत गेली ; आणि त्या नजरेतली धार अधिक स्पष्ट झाली. कारण आता जे घडू नये ते घडून गेलं होतं. आता त्याच्यासमोर जरी प्रियाचं शरीर उभं होतं, तरी याक्षणी त्यावर ताबा दुसऱ्याच कुणाचा होता. आणि या गोष्टीचा स्पष्ट पुरावा म्हणजे तिचे थिजलेले, भावहीन, निर्जीव डोळे. आणि ओठांवरचं अत्यंत विकृत हास्य.
प्रिया ( अर्थात, प्रियाच्या शरीरावर ताबा मिळवणारी ती ) आणि श्री मूकपणे एकमेकांकडे बघत होते. जणू त्यांच्यात निशब्द द्वंद्व सुरू होते. सोनाली आणि राजाभाऊंच्याही मनात कुशंकेने प्रवेश केला होता. ते फक्त बावरल्या नजरांनी एकदा वेडगळ चेहरा केलेल्या प्रियाकडे, एकदा तिच्याकडे काहीशा रागाने पाहणाऱ्या श्री कडे बघत होते. ती शांतता त्यांना क्षणाक्षणाला अस्वस्थ करत होती. ती शांतता, निशब्दता भंगली ती श्रीच्या खणखणीत, काहीशा कठीण आवाजाने -

" तुम्ही कोण आहात, हे मला ठाऊक आहे ; पण तुम्हाला हवंय तरी काय ? आणि तुम्ही बिचाऱ्या, निष्पाप प्रियाला का त्रास देत आहात ? "

उत्तरादाखल तिचे ओठ विलग झाले. मात्र...

" खीक्... खीखीखी."

त्यातून फक्त खरखरीत, घाणेरड्या आवाजातील विकट, भेसूर हास्य बाहेर पडले.

क्रमशः
© प्रथमेश काटे

Group content visibility: 
Use group defaults

मस्त
थोडा मोठा हवा होता भाग
पु भा प्र

कथा उत्तम सुरु आहे, पण कृपया भाग मोठे टाकावेत आणि लवकर लवकर टाका, खुप वेळ मध्ये गेल्याने लिन्क जाते.