गजर

Submitted by पॅडी on 19 March, 2024 - 01:11

बीप-बीप..! बीप-बीप..!! बीप-बीप...!!!

गजर झाला अन त्यांची झोप चाळवली. नेहमीच्या सवयीने तिला जवळ ओढण्यासाठी, दुलईमधून हात बाहेर काढत, त्याने पलंग चाचपडला. तोपर्यंत डोळ्यांमधली झोप बरीच कमी झाली होती.

ती हाताला आली नाही.

अचानक; त्याला रात्रीचं कडाक्याचं भांडण आठवलं. मग साग्रसंगीत आदळआपट. थयथयाट. आरोप प्रत्यारोप. शेवटी , एकाच पलंगावर छत्तीसचा आकडा करून, एकमेकांपासून शक्य तितक्या अंतरावर झोपणे वगैरे त्याला सर्व आठवलं. सुस्पष्ट.

हात दुलईत खेचून तो ढिम्म पडून राहिला.

>>> गजर बंद करावा का ? मरू देत. त्यासाठी उठून कोप-यातल्या टेबलापर्यंत जावे लागेल. ती सवय आपलीच. सहजासहजी, अंथूरणातून गजर बंद करता आला, तर पुन्हा ताणून द्यायची भीती म्हणून आगाऊची खबरदारी- घडयाळ लांब ठेवायची. उठलो की सिगारेटची तलफ लागणार. सिगारेट फुकून झाल्यावर; बळजबरीने का होईनात, चहा ठेवायचा, हिला उठवायचं. महाराणी कधी पहिल्या हाकेला “ओ” द्यायच्या नाहीत. जागे असूनही झोपेचं सोंग घेऊन पडून राहायच्या. मग पुन्हा हाका मारणं आलं. उठून बसल्यानंतर, “बेड टी” घेताना , चेह-यावर सारे जग जिंकल्याचा सिकंदरी आनंद.

छे! आज माघार नको. काहीही झालं तरी आज आपण उठायचं नाही.

<<< उठायचं नव्हतं. तर गजर कशाला लावायचा? तेही सुटीच्या दिवशी. सगळ्या मेल्या वाईट खोडी देवाने माझ्याच नशिबात टाकल्यात. जाऊ देत. उठेल आपण होऊन. बघू तरी किती बायकोचा कळवळा येतोय ते.

हक्काची सुटी फक्त ह्यालाच. आपल्याला का नको? बारा महिने अठरा काळ खपतोय या घरात, पण आहे कुणाला कौतूक? आज आपणही सुटी घ्यायची. नाहीच उठायचं.

तलफ लागली; की सिगारेट ढोसायला जाईल. चहा ठेवेल. बळजबरीने उठवेल सुध्दा. तोपर्यंत वाट पाहिली तर फार काही बिघडायचं नाही.

पण; समजा आपण नाहीच उठलो, तर, आप्पलपोट्यासारखा तो एकट्यानेच चहा -ब्रेड तर नाही ना हादडणार? तसा एवढा निर्ढावलेला नाहीये बायकोबाबत . मागे एकदा केला होता त्याने तसा प्रताप. चूक आपलीच होती. तेव्हा जरा जास्तच ताणून धरलं होतं आपण. त्या बिचा-याचा काही दोष नव्हाता. सगळी चूक आपलीच. कबुल केली नाही ती गोष्ट वेगळी.

>>> हे..हे म्हणजे फारच झालं यार...माणसाच्या अडेलतट्टूपणाला काही सीमा..?

ठीकाय; लावला मी गजर. उठायचं मलाच होतं. कबूल. पण समजा..आता नाही उठावंसं वाटत तर कुठं बिघडलं? उठून केला गजर बंद, तर काय नाक कापलं जाणाराय का हिचं? पण नाही. अहंकार- नुसता अहंकार भरलाय आत-बाहेर...

आपण ढील देत गेलो त्याची ही फळं. सुरुवातीपासूनच धाकात ठेवली असती , चांगली जरब बसवली असती , तर आज पश्चाताप करायची पाळी नसती आली आपल्यावर.

नको तितके आपणच हुरळून गेलेलो. उतावीळ झालेलो. तिच्या आहारी जातोय हे पाहून, “ बायकोच्या मिठीत शीर..मुठीत नको-” असा अनाहुत सल्ला दिला होता मित्राने. काही बोध घ्यायच्या ऐवजी त्यालाच झापला. उभा-आडवा.

त्या दिवसात कुठली जादू केली होती तिने कोण जाणे. कसली मोहिनी घातली होती देवास ठाऊक. तळहातावरील फोडाप्रमाणे म्हणतात की काय तसे जपा-बिपायचो तिला. एकसारखं जानू, शोना, बबडी अन काय काय बोलायचो लाडे-लाडे. ते नेमकं काय होतं? शारीरिक आकर्षण फक्त? त्यालाच तर आपण प्रेमब्रीम समजायचो नाही? ते तर अजूनही समजतो. मानतो. मग ज्या माणसावर तुम्ही मनाबिनापासून प्रेम आहे म्हणता, त्याचा असा मनस्वी तिटकारा कसा काय येऊ शकतो तुम्हाला? छे! डोकं भणाणून गेलंय नुसतं. काही म्हणता काही कळत नाहीये. कशाचीच संगती लागत नाहीये.

वरून हा साला गजर!

<<< सगळं कळतंय हं मला. जागाच आहे तो. झोपेचं नुसतं नाटक. हे आजचं थोडंच आहे. त्याला वाटतं झोपेचं सोंग घेऊन निवांत पडलं की सगळे प्रश्न मिटतात. मी तर म्हणते, ज्याला डोळ्यावर कातडं पांघरून जगायचेय, त्याने संसाराच्या भानगडीत पडावेच कशाला? संन्यास घ्यावा अन खुशाल हिमालयाचा रस्ता सोपा करावा.

जाऊ देत, म्हणा-बोलायला गेलो, की ‘काही असो का नसो, तुला डायलॉग बाकी छान मारता येतात-‘ असा टोमणा मारणार.

आधी असं काही समर्पक, तत्त्वज्ञानाकडं झुकणारं वगैरे तोंडून बाहेर पडलं, तर मारे कौतुक करायचा. म्हणायचा-“ तू लिहीतबिहीत का नाहीस? पुढेमागे छान नाव काढशील साहित्यिक म्हणून. आपल्याला बुआ नाही जमत असं काव्यात्मक वगैरे.” तासनतास बोलत रहायचा. अथक. अखंड.अन तेव्हा त्याचे डोळे असे काही लकाकायचे, की वेडंपिसं व्हायचं तेवढं बाकी रहायचं. वाटायचं ह्या बोलघेवड्या राघूला पदराला बांधून ठेवायला हवं. घट्ट. नाहीतर ह्याने फक्त डोळ्यात डोळे घालायची खोटी, कुठलीही बया आपण होऊन गळ्यात पडायची!

त्याचा तो निरागस चेहरा. निर्व्याज हसू अन अंगावरून मोरपीस फिरवल्यागत वाटत रहावं, तसं विलक्षण लाघवी बोलणं, कुठं हरवलं ते सगळं? काळाच्या ओघात केव्हा निसटून गेलं ते वैभव आपल्या मुठीतून?

>>> नकोच त्या विगताच्या आठवणी. का म्हणून झाकल्या मुठी उघडण्याच्या प्रयत्नात जीवाला त्रास करून घेतोय आपण?
अगदी तळहातावर प्राण काढून ठेवला तरी परिस्थिती बदलण्यातली नाहीये. किंबहुना; परिस्थिती बदलू नये ह्याचीच खबरदारी घेतो आपण. स्वत:च्या वागणूकीमधून, हेकेखोरपणामधून. तिने हेका सोडायचा नाही, अन आपण माघार घ्यायची नाही,असा अलिखित करारच झालाय जणू आम्हां दोघात.

वैवाहिक जीवनाच्या ओबडखाबड वाटेवर; अजस्त्र, अजागळ धुडासारखे सुस्तावत पडलेले हे रटाळ दिवस पुढे ढकलायला जी अचाट ताकद अन अफाट नशा लागते ती, संधी मिळेल तेव्हा बोचकारण्या-ओरबाडण्यात, परस्परांचे लचके तोडण्यात भरपूर मिळते. म्हणूनच की काय, कितीही खेळलो तरी कमी होण्याऐवजी आमच्या दोघामधल्या या खेळाची गोडी दिसामासे वाढतेच आहे.

बिघडलेला सूर पुन्हा सांधण्यासाठी तंबो-याच्या तारा फार घट्ट आवळून चालत नाहीत, तशा त्या फार सैलावूनही पाहिजे तो परिणाम साधता येत नाही, हे न कळण्याइतके दुधखुळे आपण नकीच नव्हतो. आजही नाही आहोत. मग कधीकाळी परस्पर विश्वास, सामंजस्य नि प्रेमाने घातलेली सुखी संसाराची घडी विस्कटायला सुरुवात झाली, तो घातकी क्षण नेमक्यावेळी कसा काय नाही ओळखता आला आपल्याला?

खरचटलेल्या बोटावर एकदा ठेच लागावी, अन खबरदारी म्हणून जखम नीट बांधून झाल्यावर , बरी होण्याऐवजी आतल्या आंत चिघळत जावी, असंच काहीसं आयुष्याचं झालं असलं पाहिजे. मलमपट्टी करून जखमेचा पुरता बंदोबस्त केल्याच्या आंधळ्या उन्मादात. गाफील. निर्धास्त. अख्खं आयुष्य गृहीत धरून. आपलं अन तिचंही.

<<< माझीच मेलीची चूक झाली. प्रत्येकवेळी तो त्याला हवं तसं आपल्याला गृहीत धरत गेला,अन माझ्या वेंधळीच्या लक्षातच आले नाही. अधूनमधून; सखये, लाडके, प्राणप्रिये अशी मधाळ बोटं तो चाटवत जायचा, अन कळसूत्री बाहुलीप्रमाणे मी त्याच्या इशा-यावर नाचत रहायचे. “ मी तुझा दास आहे. मी तुझा गुलाम आहे.” असा शब्दच्छल करीत त्याने हुकुमत गाजवली. अन त्या लाडिक साखरपेरणीला फसून, त्यांची दासी होण्यातच आपण धन्यता मानली.

चूक माझीच. शंभर टक्के माझीच!

एका सुनियोजित कट-कारस्थानाचा बळी ठरलेल्या माणसाने करायला हवं, पुढं तेच केलं मी. नियतीला कदाचित हेच मंजूर असावं. छट! जिथे आपल्याच माणसाची नियत फिरली; तिथं नियतीला दोष देणं, नशीबाच्या नावाने कडकडा बोटं मोडणं; म्हणजे स्वत:ची आणखी दिशाभूल करून घेण्यासारखं आहे.

बोटावर मोजता येतील एवढे पर्याय पुढ्यात ठेवले गेले. तेव्हा; चार-चौघासारखा जास्तीत जास्त योग्य, सयुक्तिक वाटणारा पर्याय आपण निवडला. पुढे; त्या एका संभाव्य शक्यतेला कुंडली, राशी, मानपान, देणीघेणी, नक्षत्र, तिथी, वार, मुहूर्त आदी व्यवहार्य पातळ्यांवर नीट तपासून झाल्यावरच ‘शुभमंगल सावधान’ झाले. त्यामुळे आधी भावनिकदृष्ट्या एकमेकांत गुंतलो-बिंतलो होतो,म्हणून निर्णय चुकला वगैरे काही म्हणता येणार नाही.

हे असे गुंतत जाणे तर ;तो इंजिनिअर मुलगा बघून गेला तेव्हाही नव्हते. कुठल्याशा मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर होता म्हणे.

काळा-सावळा, ठेंगणा, काहीसा स्थूल . पाहताच त्याचे टपोरे डोळे चटकन मनात भरले! मात्र; लग्न करेन तर ह्याच्याशीच,वगैरे मनात आले नव्हते. तो आवडला इतकंच.

नाही आवडले ते फक्त त्याचे फताडे बूट! शी: गावंढळ वाटायचे अगदी. मनात म्हटलं: आपल्याला कुठं त्याच्या बुटाशी लग्न करायचेय? त्याने कसले शूज घालायचे ते मागाहून ठरवता येईल. आधी लग्न तर जुळू देत. हा विचार मनात येताच, छानपैकी लाजले ही होते मी. अजून आठवतंय.

शेवटच्याक्षणी; देण्या-घेण्यावरून फिसकटले. पाठोपाठ इंजिनिअरसाहेबांबरोबर; मनात रुतलेले त्यांचे फताडे बूटही कुठल्या कुठे पळाले.

>>> कबूल; स्वत:पासून पळून जाता येत नाही , पण मग स्वत:भोवती घिरट्या घालणं तरी कुठं थांबवता येतं माणसाला? आयुष्य संपून जातं. काळ्याचे पांढरे होतात. परंतु शेवटपर्यंत मनामधल्या कल्पनेत हवे तसे रंग भरून होत नाहीत. रंगसंगती जुळून येत नाही. जुळवून घेताही येत नाही.

सतत टोचणी. सल. उणीवांची. जाणिवांची. नेणिवांची.

पुन्हा प्रयत्न करायचे. आधीच बिघडून ठेवलेल्या मिश्रणात; भोवतालचे फसवे, चटक, चवचाल रंग मिसळायचे. पोटतिडकीने ब्रशचे उभे-आडवे फटकारे मारायचे. आणि अद्वितीय, अप्रतीमतेच्या हव्यासापोटी, आधीचं चित्र आणखीनच बटबटीत, बेढब, कुरूप, विद्रूप करून टाकायचं.

जाणते-अजाणतेपणी; संसाराचेही अगदी तसेच करतो आपण. ह्याला कारणीभूत रंगांची सरमिसळ नसते. हा सगळा दृष्टी-दोषाचा परिणाम. आपण होऊन ओढून घेतलेला. अहंकारासारखा जाणीवपूर्वक जोपासलेला. वयोमानापरत्वे वेडावाकडा वाढविलेला.

खेळण्याच्या दुकानातील शोकेसमधली एकाहून एक सरस, आकर्षक खेळणी पाहताना, नेमके कुठले निवडावे हे न उमजून , कडेवरच्या हट्टी मुलाने दिशाहीन अंगुलीनिर्देश करून, नुसताच थयथयाट करावा, तशी ही अवस्था.

काय शोधतोय माहीत नाही...काय हवंय याचा नेमका अंदाज नाही...जे काही हवंय; ते नेमकं अस्तित्वात तरी आहे काय , याबद्दल नीट सांगता येत नाही. म्हणून मग जे जवळ आहे, त्याच्यामधल्या दृश्य गुणांकडे पाठ फिरवून, अदृश्य दोषांकडे बोट दाखवत जीवाला खायचं. मनस्ताप करून घ्यायचा,असा हा एकूणच प्रवास.

अंधाराकडून अहंकाराकडे...अज्ञानाकडून अज्ञाताकडे...

समजा; हिच्याआधी सांगून आलेली मुलगी पाहताचक्षणी पसंत पडली असती, किंवा इतरांच्या आग्रहासमोर आपण मान झुकवली असती तर, यापेक्षा वेगळी परिस्थिती असती , हे छातीठोकपणे आपण सांगू शकू काय?

सगळ्याच जर-तर च्या गोष्टी!

हिला बघण्याआधी अन पसंत केल्यानंतर, बरेच दिवस हे- ‘जर-तर’चे तुणतुणे वाजवत होतोच की आपण.
मोठ्या घराची पोर. लाडाकोडात वाढलेली. चार मुलांच्या पाठीवर झालेलं शेंडेफळ. वरून; चुलत्या-काक्यानी गजबजलेल्या घरात मुलगी अशी ही एकच. आज सारं घर ‘ ताई ताई’ म्हणून तिच्याभोवती पिंगा घालतेय. उदया; लग्नानंतर तिने आपल्या घरात धांगड- धिंगा नाही घातला म्हणजे मिळवली!

एखादया राकट, रांगड्या विचित्र-विक्षिप्त मुलाच्या हातात नाजूक, गुबगुबीत, इम्पोर्टेड बाहुली यावी; अन ती मळेल, तुटेल, फुटेल या आंतरिक भीतीपोटी; तिला हळूवार आंजारत-गोंजारत त्याने ती प्राणापलीकडे जपावी, तसे लग्नानंतरचे दिवस. कोमल. हळवे. हळूवार. हवेहवेसे.

जणू ब्रम्हानंदी टाळी लागली होती!

<<< लहान असताना, ‘ एका हाताने टाळी वाजत नाही’ असं कुणी म्हटलं रे म्हटलं की मी पटदिशी स्वत:च्या पायावर, डोक्यावर टपली मारून ‘ फट’ आवाज काढून म्हणायची,’ वाजली की नाही एका हाताने टाळी?’ किंवा कुणाच्या बोलण्यात ‘ घरोघरी मातीच्या चूली’ वगैरे संदर्भ आला की, गॅसच्या शेगडीकडे बोट दाखवून डोळे मिचकावत म्हणायची, ‘ आमच्या घरी मात्र स्टेनलेस स्टील च्या चूली.’

हसायचे सगळे. तोंडभरून कौतुक करायचे. बाबा म्हणायचे- ज्या कुणाच्या गळ्यात पडेल; तो कितीही आढेखोर असला, तरी सुतासारखा सरळ होईल हिच्या हजरजबाबीपणासमोर.’ ‘ मला नाही पडायचं कुणाच्या गळ्यातबिळ्यात ' मी लटकीच फुरंगटून बसायची. ‘ पहा पहा किती गुलाबी-गुलाबी झालंय एक लाजळूचं झाड.’ सारे चिडवायचे. अगदी भंडावून सोडायचे.

बालपणीच्या नितळ, निरागस, निर्मळ शब्दांना, अर्थाचे इतके वेगवेगळे; क्रूर आणि कठोर पदरही असू शकतात, हे आता कळतेय. मोठे झाल्यावर.

का मोठे व्हावेसे वाटते माणसांना? कोणत्या हव्यासापोटी?

अन लौकिकार्थाने दुरून मोठी भासणारी , दिसणारी माणसे, जवळ जाताच अचानक खुजी कशी काय वाटू लागतात? बालपण हरवून बसल्याची नियतीने दिलेली कठोर शिक्षा तर नसेल ही?

छे! कशाचंच काही कळत नाही. नुसते प्रश्न. उत्तर सापडतच नाही. लहानपणी कसं प्रत्येक प्रश्नाचं बिनचूक उत्तर तयार असे. प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय. लग्नाला होकार भरेपर्यंत मला अगदी तसेच वाटायचे.

उंचापुरा. शिडशिडीत. देखणा. छानच वाटला मुलगा. मुख्य म्हणजे बूट-बीट घालून नव्हता आला. कोल्हापुरी चप्पल. साधी तरी आकर्षक. चहा-पोहे देताना वाटलं; आपल्याकडे बघून हसेल-बिसेल. कसलं काय. ढिम्म बसून होती स्वारी. ऐटीत. पायावर पाय ठेवून.

आत आल्यावर सर्वांचा एकच प्रश्न; कसा काय वाटला मुलगा? आवडला ना तुला? काय बोलणार? गप्प राहिले. मला लाख पसंत असेल. त्याला नको का मी आवडायला? वरून, कुंडली-बिंडली, देणी-घेणी, हजार भानगडी. ‘ नीट बघितलेच नाही मी त्याला.’ दिली थाप ठोकून. तोपर्यंत लगबगीने आत येऊन काका म्हणाले- आपली ही बया मुलाला पसंत पडली बरं का...

पुन्हा एकच गलका. सगळ्यांचा उत्साह ऊतू आलेला. सुचना..समजवण्या...असं रहायचं..तसं वागायचं...जणु काही आत्ताच सासरी निघाले होते मी.

तशी; ऐकायला गंमत वाटत होती. मुलगा खूप हुशार आहे...धडपड्या आहे...कर्तबगार आहे...गडगंज श्रीमंती नाही घरची पण काही कमी पडू नाही द्यायचा तुला. जीव लावेल...मायाळू दिसतोय हो...असंच काहीबाही.

मनात म्हटलं: इथे आयत्या पिठावर रेघोट्या मारणारा, बापजाद्यांच्या इस्टेटीच्या फुशारक्या सांगणारा बुळा-बुजगावणा हवाय कुणाला! नसू देत श्रीमंत-ब्रिमंत. स्वत:त धमक असली, मनगटात जोर असला, निखळ निकोप कर्तृत्व असलं म्हणजे खूप झालं. ती खरी श्रीमंती. आळणी, मिळमिळीत ऐशोआरामापेक्षा , संघर्ष , धडपडीमधून फुललेलं सहजीवन, लाख पटीने चांगलं.

फक्त एकच जबर जोखीम, धोका संभवत होता: अथक परिश्रम, अविरत संघर्ष , प्रयत्नांची पराकाष्टा , त्यातून होणारी घुसमट, ताणताणाव, क्वचित पडझड, फिनिक्सप्रमाणे पुन्हा उभे राहण्याची जिद्द ; अशा विविध पातळ्यावर सदोदित युध्दरत राहणारी, आयुष्याच्या भट्टीतून तावूनसुलाखून निघालेली अशी माणसं विलक्षण हळवी, संवेदनशील असली , तरी मुलखाची हट्टी, दुराग्रही एककल्ली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘ तू त्याला नीट पाहिलं नाही म्हणालीस ना,’ कुणीतरी शंका काढली. ‘ थांब, आत्ता गाठभेट घालून देतो तुम्हा दोघांची.’
सगळं कसं मनासारखं जुळून येत होतं. जुळवून आणलं जात होतं.

मला बैठकीत आलेलं पाहून, सावरून बसत तो प्रसन्न हसला. काही क्षण शांत, स्तब्ध, नि:शब्द.

केव्हांनाच शब्द फुटले. सहज विचारावं तशी जुजबी चौकशी... नांव..शिक्षण..छंद..आवडीनिवडी...पुढे शिकण्याची इच्छा ...वगैरे.

नेहमीचंच तरी नेहमीपेक्षा वेगळं..वेगळ्या वळणाचं...वेगळ्या धाटणीचं...लयबध्द...ओघवतं... हळूवार... तलम... मखमली- असंच काहीसं.

नंतर स्वत:विषयी..अधिक जोरकस..अधिकाधिक आग्रही..अखंडीत...अविरत..अमर्याद..अनावर..अनाहत...

तो काय बोलतोय कळत नव्हतं. त्याला नेमके काय सांगायचेय हे समजून घ्यायची घाई नव्हती. त्यासाठी सारं आयुष्य पडलंय. त्याच्या आपल्याकडून काय काय अपेक्षा आहेत, ते जाणून घ्यायलाही मन उत्सुक नव्हतं. फक्त एकच अनिवार इच्छा होती: त्याने थांबूच नये. नुसतं बोलत रहावं. असंच. मनापासून. भरभरून.

ती शब्दा-शब्दामधून छुमछुमणारी गती, ती ओघवती लय, तो मंतरलेला ताल, ते तलम स्वराघात, ते सोनसळी आरोहावरोह..त्याच्या चित्ताकर्षक देहबोलीमधून अखंड स्त्रवणारी श्रावणाची ही धुंधफुंद सर रोमरोमांत झिरपत जावी, देहामनात भिनत राहावी, अन युगानुयुगे आपण ह्या मेघमल्हाराच्या उत्सवात आकंठ डुंबावं, नखशिखांत भिजावं...बस्स!

सर ओसरून गेल्यावर भानावर आले. वाटलं; आधी समजायचो तसा धोकाबिका नाही व्हायचा. अन जर झालाच, तर त्याला बदलवू आपण. आपल्या प्रेमळ हातानी पुन्हा घडवू त्याला. अगदी आपल्याला हवंय तसं.

...त्याला हवं तसं बदलवू, घडवू शकले नाहीच. उलट त्याच्या नादाने आपणच बिघडलो की काय अशी शंका यायला लागलीय हल्ली!

“ अरे, हा गजर कुणाचा..? कुणी बंद का करत नाहीये..? भलेहो, सगळी कॉलनी जागी झालीय . फक्त तुम्ही सोडून.”
“ झोपू दया हो, बिचा-याना. गजर असेल सेकंड शिफ्टसाठी, मात्र पहिलीच जरा जास्त ताणली गेली असेल म्हणताना, आता झालेयत ढाराढूर पंढरपूर!”

अंगावरची वेगवेगळी पांघरुणं फेकून; दोघेही एकाचवेळी धडपडून उठले अन घाईघाईने टेबलावरच्या अलार्म क्लॉककडे झेपावले.

‘ अरेच्चा! तीनलाच बंद पडलेय हे घडयाळ. मग हा गजर...’ त्याने शंका काढली.
‘ समोरच्यांचा असावा. दोन दिवसांआधीच हनिमूनवरून परतलेयत म्हणे,’ ती गोड लाजली.
‘ खरंच चुकलं...’ तो विलक्षण हळहळला.
‘ क..काय चुकलं..’ ती अंगभर शहारली. तिच्या शब्दांमधला थरार त्याच्यापर्यंत पोचलाच नाही. किंवा, पोचला असला, तरी त्याने तसे दर्शवले नाही.
‘ अरे; निदान आपण तरी फायदा उठवायचा त्या गजराचा-' त्याने सहेतुक डोळे मिचकावले.
‘ चावट कुठले..!’ ती फणका-याने बोलली. ‘ कपाटात सेल आहे तो टाका घड्याळात. तोपर्यंत छानपैकी कॉफी बनवते मी .’
‘ जशी आज्ञा; राणीसरकार..’ म्हणत, कमरेत वाकून, त्याने अस्सल मावळ्याच्या आविर्भावात मानाचा मुजरा केला .
*****

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy
स्वगत बराच वेळ चालले. मधे टिंब अथवा रेघेसारखथ, सेपरेटर नसल्याने. कोणता उतारा , कोणाचा ते कळायला जरा अवघड गेले.
शेवट गोड झाला हे बरे झाले.

शेवट सुखांत झाला हे छान.
आमच्या सोसायटीत असे अलार्म इतका वेळ वाजले तर लोक व्हॉटसप वर भाल्याने भोसकून उठवतील.

मस्त आहे कथा Happy

अनु, व्हाट्सअप्प वर भाल्याने भोसकणे Lol
अशी इमोजी आलीच पाहीजे.

छान कथा!
>> व्हॉटसप वर भाल्याने भोसकून उठवतील. >> Lol अनु, एकटीच हसत बसलेय! कसे सुचते गं तुला?

किल्ली, झकासराव, स्वाती२ आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभार...!!

तूर्तास - व्हॉटसप वर भाल्याने भोसकून उठवणारा इमोजी नेमका कसा दिसेल ह्या स्वप्नरंजनात मी ही शेखचिल्ली झालोय... Happy Happy

" हे राम .... "
अनु जी, इमोजी बघून नीरज चोप्रा प्रत्येक सोसायटीत ' जागते रहो-२ ' असा पुकारा करतोय असे एक भलतेच करुणरम्य चित्र डोळ्यांसमोर उभे आहे..... Happy Happy Happy

( बाय द वे; माझ्या कथेपेक्षा तुमचा इमोजीच जास्त भाव खाऊन गेला...त्यामुळे आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन...!!!! इथे टाळ्यांच्या कडकडाटाचा इमोजी imagine करावा... पूर्णविराम. )

>>> राधानिशा - मन:पूर्वक आभार आपले...

नाही हो, कथा मस्तच आहे.मूळ कथेचं महात्म्य आहे की गजराबद्दल इतकी चर्चा व्हावी.Did not mean to steal your thunder.

मला हम दिल दे चुके सनम मध्ये पहाटे 4.30 ला अजय देवगण आणि ऐश्वर्या गजर चालू ठेवून 4 मिनिट भांडत असतात(अगर शादी तुम्हारे लिये जिस्म का रिशता है तो ये लो') तेव्हाही हाच प्रश्न पडला होता.तो गजर 4 मिनिट चालू ठेवू देणारे लोक आमच्या तरी घरात नाहीत.10 सेकंद बंद झाला नाही तर मारामारी ची वेळ येते.

शेवट सुखांत झाला हे छान. >> +१
आमच्या सोसायटीत असे अलार्म इतका वेळ वाजले तर लोक व्हॉटसप वर भाल्याने भोसकून उठवतील. >> Lol