गोष्ट छोटी, दोन आज्यांची!- वूमेन्स हिस्टरी मंथ विशेष

Submitted by छन्दिफन्दि on 12 March, 2023 - 03:18

मार्च वूमेन्स हिस्टरी मंथ (महिलांचा ऐतिहासिक महिना ) म्हणून ओळखला जातो आणि नुकताच महिला दिनही होऊन गेलाय त्या निमित्ताने हा लेख!
आज महिला जवळ जवळ प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत तरी एक अदृश्य तावदान अजूनही वर झेपावणार्या महिलांना रोकू पाहतय, असं आपण त्यांच्याच मुलाखतीत, बातम्यांमध्ये बघत असतो. लढाई अजून चालू आहे आणि जेव्हा खरंच स्त्री पुरुष समान वागणूक खऱ्या अर्थाने येईल तेव्हा “जागतिक महिला दिन” साजरा करण्याचं प्रयोजन आणि कौतुक दोन्ही राहणार नाही.
मागे काही महिन्यांपूर्वी एका सखीने कंमेंट लिहिली होती, रोख होता, जुन्या काळच्या चूल आणि मूल करणाऱ्या स्त्रिया. “त्यांना काय नुसती चूल आणि मूल, दुसरं विश्व नव्हतं .. हे आणि बरच काही ह्याच लाईन वर “ इतरही काही महिलांनी तिची री ओढली. एकंदर सूर, आजकाल बायका अर्थार्जन करतायत, त्यांना त्यांचं आभाळ गवंसतय पण आधीच्या घर सांभाळणाऱ्या, चूल मूल करणाऱ्या बायकांना गंध नव्हता कशाचा ना काही कर्तृत्व होत, असाच होता.
आणि ते माझ्या जिव्हारी लागलं. मी त्यांच्या पहिल्या मताशी १००% सहमत आहे पण म्हणून जुन्या बायकांना कमी लेखता काम नये.
मोठी, एकत्र कुटुंब, पै-पाव्हणे, सणवार, दुखणी-खुपणी, शेजारी- पाजारी, आला-गेला हे सगळं लीलया सांभाळायला व्यवहारचातुर्य, व्यवस्थापन कौशल्य, दूर दृष्टी, diplomacy किंवा धोरणीपणा, कष्टाळूपणा, जिद्द, चिकाटी, खंबीरपणा, निस्वार्थीपणा हे आणिक काय काय लागत असेल याचा अंदाजच आपण बंधू शकतो.
यावर्षी मनात आलें, कि यंदा जागतिक महिला दिनी ह्या वरकरणी चूल आणि मूळ सांभाळणाऱ्या, नऊवारी नेसणाऱ्या आपल्या आज्या, पणज्या यांना आठवूया, त्यांच्या आठवणींना उजाळा देऊया.
ही मी आधी लिहिलेली माझ्या दोन आज्यांची गोष्ट, कदचित तुम्हाला आवडेल आणि वाचताना नक्कीच तुमची एखादी आजी, चुलती किंवा खमकी आत्या हमखास आठवेल.

***
एक आजी , आईची आई . शिक्षण जेमतेम दुसरी तिसरी. तिच्या उमेदीच्या काळात तिने खूप कष्ट केले. त्यावेळी बहुतेक एकत्र कुटुंबात सगळ्या स्त्रियांना करावे लागत. ती माझ्या आठवणीत असल्या पासून दमा वगैरे असल्यामुळे असेल जास्त बाहेर जायची नाही. पण बसल्या जागी कुठे काय चाललय तिला पक्क ठाऊक असायचं. कारण छान नऊवारी साडी नेसणारी ती अगदी पोलीस फाईल मध्ये दाखवतात त्या पद्धतीने दोन-चार लोकांशी एकाच गोष्टीविषयी गप्पा मारून त्यांच्या नकळत तिला हवी ती माहिती बरोबर काढून घ्यायची. इतकी चाणाक्ष !
तर तिच्या छोटेखानी घराला दोन पायऱ्या आणि लगेच वरती जायला जिना होता. प्रवेश दाराच्या दोन्ही बाजुना सरकारी (बहुदा ) कचेरी होत्या, त्यात दोन चार लोक कामाला होते. एकदा दुपारी आम्ही गप्पा मारत बसलो होतो. तर बाजूच्या ऑफिसमधले दोघे घाबरे घुबरे होऊन पळतच आले. "वहिनी साप! वाहिनी साप!"
झालं वाहिनी उठल्या. सापाची मला तर इतकी भीती वाटते माझी तर घाबरगुंडीच उडाली. पण आजी म्हणजे काय? ती त्यांच्याबरोबर तडक बाहेर निघाली. मग न राहवून आम्ही पण दबकत थोड पुढे सरकलो . बाहेरच्या जिन्याच्या खाली एक साप मुटकुळं करून बसला होता. "वाहिनी बघा ! काय करायचं? " लोकं म्हणेपर्यंत तिने एक दांडू हातात घेतला आणि एका झटक्यात सापाला मारून टाकले . ( सर्प मित्रानो हा काळ ३०-३५ वर्षांपूर्वीचा त्यावेळी सर्प मित्र हि संज्ञा आमच्या ऐकिवात नव्हती) आम्ही सगळे अवाक होऊन बघतच बसलो. तिने हसत हसत तो साप कुठे लांब नेऊन टाकला (असावा) . त्या दिवसापासून ती माझ्या साठी SHERO च झाली.
***
दुसरी आजी , बाबांची आई. नऊवारी साडी नेसणारी. ती मात्र त्या वेळच्या मॅट्रिक पर्यंत शिकलेली ( पण काही घरगुती अडचणीमुळे परीक्षा न देऊ शकलेली). अत्यंत धोरणी आणि खमकी . घर, शेत (जे घरापासून बरच लांब होत, बसने अर्धा-पाऊण तास लागे ) सगळं एकहाती सांभाळायची.
आमचं घर म्हणजे कौलारु, जुन्या काळचा वाडा. साधारण अर्ध्या एक एकरचा. घर रस्त्यापासून साधारण शंभर एक फूट आत, दोन पायऱ्या चढल्या कि ओटी . आणि मग घराचा मुख्य दरवाजा जो माजघरात उघडायचा, तो इतका जड आणि बळकट, जणू बुलंद दरवाजाच. घराच्या दोन्ही बाजूंना पन्नास साठ फूट रिकामी जागा मग तारेचं कुंपण . वाड्याच्या दोन्ही बाजूना एकेक घर. ती घरे पण सधारणतः अशीच . घरामागे (वाड्याची) बाग, टोकाला कॉंक्रिट सिमेंटचा कोट आणि त्या पलीकडे समुद्राच्या दिशेने जाणारा रस्ता ( वाळूच सूर व्हायची). घरात कोणी काही बोलले, ओरडले तरी कुठे ऐकू जायची शक्यता नाममात्र.
गाव तस बऱ्यापैकी लहान पण गावाबाहेर हळूहळू कारखाने येऊ लागले.GIDC वाढू लागली.
गावात माणसे कमी होऊ लागलेली. शेजारचे एक घर तर रिकामेच असे.
गावाला मध्ये हा काही काळ थोडा विचित्र होता. GiDC मध्ये , गावालगतच्या आजूबाजूच्या गावांमध्ये दरोडे पडू लागले होते. साधी सुधी चोरी मारी नाही तर शोले मध्ये वगैरे दाखवलेत त्या प्रकारचे . दरोडेखोरांची टोळी यायची वीस एक जणांची. हातात कुर्हाडी वगैरे घेऊन यायचे. पूर्ण घराला वेढा द्यायचे. घर पूर्ण साफ करून जायचे. विरोध केला तर कुर्हाडी डोक्यात घालायला मागे पुढे बघणार नाही, अशी गत. कोणी कानातून सोन्याचे डूल काढायला उशीर लावला म्हणून तिचा कानच कापला अशा कहाण्या लोकं चघळत बसायचे. इतकी दहशत पसरली होती.
पण आमची आजी त्या परिस्थितीतही खंबीरपणे तिकडे एकटी रहात होती. तिचा एकच नियम, साधारण चार वाजता मागचा विहिरीकडचा, तुळशीच्या अंगांकडंचा (बाजूचा) दोन्ही दरवाजे बंद करायचे. ते उघडत एकदम सकाळी उजाडलं कि. दिवेलागणीच्या वेळी घराचा मुख्य दरवाजा बंद होई. आणि तो ती फक्त सकाळी उघडे. मध्ये कोणीही आलं, कितीही जवळच तरी त्यांना दार उघडत नसे. अगदी "गडाचे दरवाजे सकाळ पर्यंत उघडणार नाहीत " थाटात ती त्यांना परतून लावे. एकदा नियम म्हणजे नियम .
आता शहरात एवढ्या गर्दीत दोन तीन खोल्यांच्या घरात सुद्धा जेव्हा लोकं एकटं राहायला घाबरतात तिकडे, एवढ्या मोठ्या घरात, फोन, मोबाइल यासारखी साधने नसताना, बोंब ठोकली तर कोणाला ऐकू जाणार नाही अशी परिस्थिती असताना, दरोडेखोरीची टांगती तलवार डोक्यावर असताना ती कुठल्या हिमतीने त्यावेळी राहिली असेल?? कदाचित तीचा तो गणपती बाप्पाच तिला हे बळ देत असावा. तिच्या हिमतीला, शिस्तीला, धीराला दंडवत !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच! GIDC म्हणजे गुजरात का?
आमच्या नात्यात एक आजी होत्या. त्यांना यच्चयावत सगळेजण 'मामी' म्हणून ओळखायचे. त्यांचा मुलगा-सूनबाई दोघेही डॉक्टर. दवाखाना-हॉस्पिटल स्वतःचं. आजूबाजूच्या खेडेगावातले पेशंट्स त्यांच्याकडे येत. मामी जेव्हा उमेदीत होत्या, तो काळ माझ्या आठवणीच्या आधीचा. मी पाहिलं तेव्हापासून त्या नेहमी घरात एका कॉटवर पडून असायच्या. पण बुद्धी अत्यंत तल्लख. घराच्या, दवाखान्याच्या व्यवस्थेवर पूर्ण लक्ष. घर आणि दवाखाना एकमेकांना जोडूनच होते. ते आमचे फॅमिली डॉक्टर असल्यामुळे त्यांच्याकडे गेलो की सामान्यतः घरी डोकावून मामींना भेटून जायची पद्धत होती. त्याही आवर्जून सगळ्यांची सविस्तर चौकशी करायच्या. सगळं लक्षात ठेवायच्या. एक प्रसंग माझ्या लक्षात राहिला आहे. मी कॉलेजला होते. खूप वर्षांनी एकदा त्यांना भेटायला गेले होते. त्यांनी मला ओळखलं, एवढंच नाही, तर म्हणाल्या, तुझं आता पुढचं वर्ष शेवटचं ना कॉलेजचं? मी चाट पडले Lol

अरेरे बिचारा साप. वाइट वाटले. कदाचित विषारी नसेलही.

छान लेख. मला वाटले अमेरिकेतील विमेन्स लिब च्या प्रणेत्या स्त्रियांबद्दल असेल लेख. तुम्ही अमेरिकेतील छान छान व नवी माहिती लिहिता त्यामुळे असे वाटले. त्यांच्यावरही लिहा.

मस्त लिहिलं आहे छंदीफंदी.
आजींचं कौतुक वाटलं.
सर्पमित्र बहुतेक माझ्या लहानपणी पण नव्हतं.सोसायटीत सापडलेले साप विषारी बिनविषारी टेस्ट न करता मारले आणि जाळले जायचे.लहान मुलं पण बिनदिक्कत कुठेही खेळत असायची, कुठेही हात घालायची, कुठेही लपायची.

GIDC म्हणजे गुजरात का? हो
वावे छन किस्सा आहे.
अश्विनीमामी, धन्यवाद. पूर्वी मी बघतलेल त्याप्रमाणे उगाच दिसला म्हणून सापाला मारत नसत. पण जर तो घरात घुसला तर मग त्याला सोडायचे नाही.
आमच्या गावाला समुद्र जवळ असल्यामुळे असेल पण खुपदा विषारी सापअसायचे, मण्यार वगैरे , त्यांना घरात घुसले तर मारण्यात येई.
एकदा एका छोट्या मुलाच्या अंथरुणात मण्यार सापडलेला, आमच्या माजघरात TV ची वायर का हलतये म्हणून बघितलं तर काळा साप.

इकडच्या आज्यांची गोष्ट सांगायची तर आमच्या शेजारी एक आजी राहते, ९३ वर्षांची. तिची देखभाल करायला, म्हणजे खर तर सोबत म्हणून तिची साठी ओलांडलेली मुलगी राहते. ही आजी सकाळ-संध्याकाळ रोज मुलीबरोबर चालत एक मोठी चक्कर मारते. तिच्या घराचे सगळं बागकाम ती करते, अंगणातला कचरा काढायचा , तण काढायचे , कचऱ्याचे डबे , (जे तिच्या हाईट येव्हढे मोठे असतील साधारण ) ते हलविणे हि सगळी काम ती एकटी करते. एकदम inspiring आहे.

.

छान लेख.
माझ्या लहानपणी तर साप दिसला की लगेच आजूबाजूचे लोकं मारायचेच.
त्या काळी आम्ही नवीन बांधलेल्या घरी राहायला गेलो तेव्हा तिथे तर खूपदाच साप निघायचे.

छान लेख.

माझ्या दोन्ही आज्या आठवल्या एक कोकणातली, एक बडोद्याची (आजोळ).

मी मराठी विसरत चालले आहे. आजोळ, हे फक्त आईचे माहेर असते की वडीलांच्या आईवडीलांच्या ठिकाणालाही 'आजोळ'च म्हणतात?
सॉरी पण अर्थ जालावर सापडत नाहीये.

मल वाटतं फक्त आईचे माहेर.
कारण वडीलांचे आईवडील तर घरातच असतात ना.

Sad Sad Sad