बोगनवेल: अधुरी एक कहाणी

Submitted by ऋतुराज. on 7 March, 2024 - 23:01

बोगनवेल: अधुरी एक कहाणी

एखाद्या गोष्टीचा अनुभव आयुष्यात पहिल्यांदा घेत असल्यास त्याचे खूपच नावीन्य असते. त्यातल्या त्यात, जर ती गोष्ट जगात आपल्या बाबतीत प्रथम घडत असल्यास त्या नाविन्याबरोबर ती एक औत्सुक्याचा आणि अभिमानाचा विषय देखील बनते. परंतु अशा घटनेची जर कोणी काहीच दखल देखील घेतली नसेल तर? अशीच एक रोचक गोष्ट आहे जीन बॅरेट यांची.

जीन बॅरेट (Jeanne Baret) यांचा जन्म फ्रान्समधील बर्गंडी भागातील ला कॉमेले इथे २७ जुलै १७४० साली झाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अगदीच हालाखीची होती. त्यांचे वडील एक मजूर म्हणून काम करत. तशातही त्यांचे बेताचे शिक्षण झाले होते. जीन बॅरेट यांना शिकण्याची फार आवड होती. विशेषतः वनस्पतींची ओळख, त्यांचे गुणधर्म याविषयी त्यांना अधिक आवड होती. मिळेल ते काम करून ते त्यांचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असत.

Joseph-Philibert-COMMERSON.jpg
फिलीबर्ट कॉमर्सन

त्या काळात फिलीबर्ट कॉमर्सन (Philibert Commerson) हे फ्रान्समधील एक अतिशय नावाजलेले जैवशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. वर्गीकरणशास्त्रज्ञ कार्ल लिनिअस या विख्यात शास्त्रज्ञाशी ते सतत संपर्कात असत. कॉमर्सन यांच्याकडे बॅरेट या घरकामासाठी जात असत. त्याच्या घरातील सर्व कामे, अगदी पडेल ती, त्या अगदी सफाईदारपणे करत असत. कालांतराने कॉमर्सन यांची पत्नी बाळंतपणात दगावली. आता बॅरेट त्यांच्याच घरात राहू लागल्या व त्यांच्या घरकामात मदत करू लागल्या. याच काळात त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. त्यांच्यातील जवळीक आता अधिक वाढल्याने त्या दोघांनी राहते घर सोडून पॅरिसमध्ये जाऊन एकत्र राहायचे ठरवले. इथे देखील बॅरेट त्यांच्या मोलकरणीचेच काम करत होत्या.

Antonie Bougainville.jpg
लुई अँटोनी बोगनविले

१७६५ मध्ये कॉमर्सन यांना लुई अँटोनी बोगनविले (Louis Antoine de Bougainville) या फ्रान्सच्या प्रसिद्ध नौसेनापतींकडून सागरी जगप्रदक्षिणेच्या मोहिमेसाठी निमंत्रण आले. यावेळी कॉमर्सन यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी सुरवातीला नकार दिला. परंतु अशी जगप्रदक्षिणेची संधी व बोगनविले यांच्याबरोबरची धाडसी मोहीम कॉमर्सन याना हुकवायची नव्हती. परंतु प्रकृती अस्वास्थ्य व बॅरेट बरोबरची ताटातूट या दोन गोष्टी त्यांना या संधी पासून परावृत्त करत होत्या. अखेर सोबत कुणीतरी सहाय्यक म्हणून घेता येत असेल, तर मी येण्यासाठी तयार आहे असे कॉमर्सन यांनी कळविले. बॅरेट त्या काळात त्यांची परिचारिका, घरकाम व त्यांचा सर्व कागदपत्र, संग्रह सांभाळणे अशी सर्वच कामे करत होत्या. कॉमर्सन सारख्या निष्णात जैवशास्त्रज्ञ बोगनविले यांना त्यांच्या जहाजावर हवाच होता. त्यामुळे, कॉमर्सन यांना सहाय्यक घेण्यासाठी परवानगी देण्यात आली. परंतु आता एक वेगळाच पेच निर्माण झाला होता. त्या काळात फ्रेंच जहाजावर महिलांना परवानगी नव्हती. जीन यांनी पुरुष वेषांतर करून जहाजावर राहायचे असे ठरले. पुरुषी वेषांतर करून त्यांनी जहाजावर प्रवेश मिळवला. जहाजात चढताना तपासणी चुकविण्यासाठी अगदी जहाज निघतेवेळी त्या कॉमर्सन यांच्याबरोबर घाईघाईत चढल्या. तसेच एक त्रयस्थ म्हणून त्या कॉमर्सन यांच्याबरोबर सहाय्यक म्हणून राहू लागल्या. कॉमर्सन यांच्याबरोबर त्यांची अनेक साधने, उपकरणे, संदर्भ ग्रंथ असल्यामुळे जहाजावरील एक मोठी खोली त्यांना व त्यांच्या "सहाय्यकाला" देण्यात आली. यामुळे बॅरेट यांना बऱ्यापैकी मोकळीक मिळाली व गुप्तता राखण्यास मदत झाली. तसेच कॉमर्सन यांनी स्वतःला व त्यांच्या सहाय्य्कला कप्तानाचे खासगी प्रसाधनगृह वापरण्याची परवानगी मिळवली. यामुळे बॅरेट यांना जहाजावरील गजबजलेल्या सार्वजनिक पुरुष प्रसाधनगृहाचा वापर टाळता आला. अश्या प्रकारे संपूर्ण जहाजावर सर्व पुरुषांमध्ये बॅरेट वेषांतर करून राहू लागल्या. आधीच प्रकृती अस्वास्थ्य त्यात समुद्रावरील हवामानामुळे व पायाच्या अल्सरमुळे कॉमर्सन खूप आजारी पडले. या काळात बॅरेट या त्यांची शुश्रूषा व इतर कामे अगदी काळजीपूर्वक करत असत.

bougainville map.jpeg
सागरी जगप्रदक्षिणेचा नकाशा

मोहीम चालू असताना अनेक बेटांवर, किनारी प्रदेशाशातील बंदरावर जहाजाचे थांबे असत. त्या वेळी जहाजावरील बरीच मंडळी खाली उतरून कामे उरकून घेत. या मुक्कामात खाण्यापिण्याचे सामान खरेदी, जहाजाची डागडुजी व इतर काही किरकोळ कामे उरकली जात. कॉमर्सन व बॅरेट आजूबाजूच्या परिसरातील शंख, शिंपले, दगड, माती, वनस्पती यांचे नमुने व माहिती गोळा करत. एकदा रिओ दे जेनेरो येथे जहाज थांबले असता सर्व माणसे खाली उतरली तेव्हा बॅरेट व कॉमर्सन यांनी जवळच्या जंगलात वनस्पती गोळा करण्यासाठी गेले असता तेथील स्थानिक लोकांनी जहाजावरील लोकांवर हल्ला केला. यात त्यांच्या जहाजावरील पुजारी (धर्मगुरू) याची हत्या करण्यात आली. या धुमश्चक्रीतही दोघांनी तेथील स्थानिक फुलांचे, वेलींचे नमुने गोळा केले.
प्रवासात प्रत्येक ठिकाणच्या मोहिमेत बॅरेट, कॉमर्सन यांना मदत करत. कॉमर्सन यांच्या आजारपणामुळे आता तर ते पूर्णपणे बॅरेट वर अवलंबून राहायला लागले. आता बॅरेट यांना कॉमर्सन यांची सुश्रुषा तर करावीच लागे पण त्याच बरोबर मोहिमेत त्यांच्याबरोबर जाणे, वनस्पती, शंख, दगड, माती इत्यादींचे नमुने गोळा करणे, त्यांचे वर्गीकरण करणे, संदर्भ ग्रंथात पाहून त्यांच्या विस्तृत नोंदी वहीत लिहून ठेवणे यासारखी बरीच कामे करावी लागत. याच काळात बॅरेट पुरुष नसून स्त्री आहे अशी शंका जहाजावरील बऱ्याच लोकांना येऊ लागली होती. दरम्यान १७६८ मध्ये मोहिमेने ताहिती येथील बेटावर तळ ठोकला होता. त्यावेळी बॅरेट व कॉमर्सन वनस्पतींचे नमुने गोळा करण्यासाठी उतरले असता काही ताहिती आदिवासी लोकांनी तिला स्त्री म्हणून ओळखले व त्यांचा पाठलाग करू लागले. तिच्यावर अतिप्रसंग करण्याच्या हेतूने पुढे सरसावलेले लोक पाहून व प्रसंगाचे गांभीर्य ओळखून लगेचच त्यांनी तिथून पळ काढला व जहाजावर परत आले. या प्रसंगानंतर बोगनविले यांनी बॅरेट यांची चांगलीच खबरबात घेतली. आता तिची स्त्री म्हणून ओळख पटली. या सर्व प्रसंगामुळे बोगनविले यांचा कॉमर्सनप्रति असंलेल्या विश्वासाला तडा गेला.

पॅसिफिक महासागरातून मोहीम पार करत असताना जहाजावर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे, बोगनविले यांनी मॉरिशसच्या बेटांवर दीर्घ तळ ठोकला. याच बेटावर फ्रेंच वसाहती असल्यामुळे त्यांना ते सोयीचे गेले. कॉमर्सन यांचा पिअरे पॉव्रे नावाचा वनस्पतीशास्त्रज्ञ मित्र याच ठिकाणचा गव्हर्नर होता. त्यामुळे कॉमर्सन व बॅरेट यांनी तेथेच मुक्काम वाढविण्याचे ठरविले. बॅरेट यांची एक स्त्री म्हणून ओळख पटल्यावर आता एका महिलेला अनधिकृतपणे जहाजावर नेणे टाळण्यासाठी बोगनविले यांना देखील हा पर्याय योग्य वाटला व ते जहाज पुढे घेऊन गेले.

यानंतर बॅरेट यांनी नियमितपणे कॉमर्सन यांची सुश्रुषा व इतर कामे करणे चालूच ठेवले. येथे राहून मादागास्कर व ब्रॉबोर्न बेटावरील वनस्पतींचा अभ्यास, संकलन चालू ठेवले. याच काळात कॉमर्सन खूप आजारी पडले व त्यातच अखेर त्यांचा मृत्यू झाला. यानंतर अचानक एकाकी पडलेल्या बॅरेट यांनी पोर्ट लुईस या मॉरिशसच्या राजधानीत एक हॉटेल चालवायला घेतले. यानंतर काही काळाने बॅरेट यांनी तेथील एका फ्रेंच सैन्यातील माणसाशी लग्न केले व त्याच्या उद्योगधंद्यात लक्ष घालायला सुरवात केली. कालांतराने १७७५ मध्ये त्या पुन्हा फ्रांस मध्ये आल्या. कॉमर्सनच्या मृत्युपत्रातील नोंदीनुसार त्यांना आर्थिक मोबदला मिळाला. पुढे उतारवयात त्यांनी त्यांच्या मूळ गावी जाऊन त्यांचे उर्वरित आयुष्य व्यतीत केले. १८०७ साली त्यांचा मृत्यू झाला. अश्याप्रकारे एक महिला म्हणून सागरी जगप्रदक्षिणा पूर्ण करूनदेखील त्याची कुठेही नोंद घेतली नाही.

बोगनवेल

purple-bougainvillea-cascading-over-white-wall.jpg

रिओ दे जेनेरो येथे उतरल्यावर तेथील स्थानिक फुलांच्या वेलींच्या नमुन्यात एक गुलाबी रंगाच्या फुलांची वेल होती. त्याचे नमुने देखील बॅरेट यांनी गोळा केले होते. तीच हि बोगनवेल. त्या वेलीला बोगनवेल हे नाव लुईस अँटोनी बोगनविले यांच्या गौरवाप्रीत्यर्थ दिले गेले.
मूळ दक्षिण अमेरिका हे उगमस्थान असलेली काटेरी बोगनवेल ही आता जगभर पसरली आहे. बागेत लावण्यासाठी अनेक संकरित जाती निर्माण केल्या आहेत. आपल्याकडे रस्त्यांच्या दुभाजकांवर, मोठ्या कुंपणावर बरेचदा बोगनवेल आढळते. बोगनवेलीला एकदा लावल्यावर विशेष देखभाल लागत नाही. गुलाबी, पांढरी, पिवळ्या व अनेक रंगांच्या छटात त्या नियमित बहरत राहतात. याच गुणधर्मामुळे बोन्साय प्रकारात बोगनवेल बरेचदा वापरली जाते.
Dividers.jpg
.
bougainvillea 1.jpg

खरे तर बोगनवेलीच्या रंगीत दिसतात त्या फुलांच्या पाकळ्या नसून त्यांना शास्त्रीय भाषेत (Bract) "छद" असे म्हणतात. त्या छदाला लागूनच इवलीशी पांढरी फुले असतात. या रंगीत ब्रॅक्ट अगदी पातळ कागदासारख्या असतात यामुळेच बोगनवेलीला आपण कागदी फुले म्हणतो. मूळ रिओ दे जेनेरो येथील ब्राझिलियन भाषेत सुद्धा त्यांचे नाव flor-de-papel - कागदी फुले असेच आहे.

mix B.jpg

जीन बॅरेट यांचे आयुष्य खडतर होतेच पण त्याविषयी अधिक माहिती सापडत नाही. अनेक वेगवेगळ्या संदर्भातून संदिग्ध अशी माहिती उपलब्ध आहे. जवळजवळ सात ते आठ वर्षे कॉमर्सन बरोबर एकत्र राहून त्यांनी जवळजवळ हजारो वनस्पतींचे नमुने जमवणे, त्यांचे वर्गीकरण, नोंदी, जतन अगदी मन लावून केले. कॉमर्सन यांनी गोळा केलेल्या वनस्पतींना त्यांचे मित्र आणि ओळखीच्या व्यक्तींची नावे दिली. कॉमर्सन यांच्या गौरवाप्रीत्यर्थ जवळजवळ ७० वनस्पतींचे व इतर सजीवांचे नामकरण झाले तर वनस्पतिशास्त्रात एवढे मोलाचे कार्य करूनदेखील फक्त एकाच वनस्पतीला बॅरेट यांचे नाव त्यांच्या गौरवाप्रीत्यर्थ देण्यात आले.

Solanum-baretiae.pngSolanum baretiae - जीन बॅरेट यांच्या गौरवाप्रीत्यर्थ देण्यात आलेले नाव

बराच काळ बॅरेट यांच्याबद्दल काहीच माहिती उपलब्ध होऊ शकली नाही एवढंच काय पण आजतागायत त्यांचे एखादे चित्र, रेखाचित्र देखील सापडत नाही.
jeanne baret photo.jpg
जीन बॅरेट

परंतु २०१० मध्ये ग्ल्यायनीस रिडले यांच्या "The Discovery of Jeanne Baret" या पुस्तकामुळे त्या पुन्हा प्रकाशझोतात आल्या. अलीकडेच २०२० मध्ये डॅनील क्लॉड यांच्या "In Search of The Woman Who Sailed the World" पुस्तकातून त्यांची अधिक माहिती मिळते.

The Discovery of Jeanne Baret.jpg
The Discovery of Jeanne Baret
.
In Search of The Woman Who Sailed the World.jpg
In Search of The Woman Who Sailed the World

वनस्पतींच्या वर्गीकरणासाठी एवढे महत्वाचे कार्य केल्याबद्दल या विषयात तर त्यांच्या वाट्याला काहीच आले नाही. परंतु २०१८ मध्ये त्यांच्या या कार्याचा सन्मान प्लूटो ग्रहावरील डोंगररांगांना "Baret Montes" असे त्यांचे नाव देऊन करण्यात आला.

२७ जुलै २०२० ला गुगलने त्यांच्या सन्मानार्थ एक डूडल देखील ठेवले होते.
https://doodles.google/doodle/jeanne-barets-280th-birthday/

सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम माहितीपूर्ण आणि रंजक !

त्या वेलीला बोगनवेल हे नाव लुईस अँटोनी बोगनविले यांच्या गौरवाप्रीत्यर्थ

>>> छान !

आवडले लिखाण !
आज महिला दिनाचे निमित्त साधलेत हे ही आवडले.

मस्त ओळख. तुमचे इतरही लेख चाळले, आवडलं लिखाण.

आज महिला दिनाचे निमित्त साधलेत हे ही आवडले >> +१

धन्यवाद Happy
कुमार १, दत्तात्रय साळुंखे, हर्पेन, पुरंदरे शशांक, मेघना, हरचंद पालव, srd, किल्ली

खूपच रोचक आणि दुर्मिळ माहिती...मस्त लेख !

ही फुले सातासमुद्रापलीकडून व्हिसा वर येऊन इथे ग्रीनकार्ड मिळल्यासारखी छान सेटल झाली आहेत.. खूप प्रसन्न आणि दिलासादायक वाटतात ही बोगणवीला ची झाडे..

ऋतुराज तुमचा हा लेख वाचला आणि आजचा दिवस सार्थकी लागल्यासारखे वाटले. आता जेव्हा जेव्हा बोगणवीला पाहीन तेव्हा जीन बरेट नक्की आठवेल!

समयोचित, माहितीसंपृक्त !

ही रंगीबेरंगी flor-de-papel फार आवडतात, त्यामागची कहाणी आवडली. फुलांना रंग-रूप-बांधा-जीवटता आहे, सुगंध नाही, श्रेय नाही. काहीसे Jeanne Baret च्या जीवनासारखेच Happy

खूप उत्कंठावर्धक माहिती इथे दिल्याबद्दल आणि ज्ञानात भर घातल्याबद्दल आभार. मायबोलीवर नित्याच्या असलेल्या हमरी तुमरी टाईप धाग्यांतून हा सुंदर लेख बोगनवेली सारखाच लक्ष वेधून घेणारा आणि आकर्षक वाटला.

छान ओळख आणि महिला दिनाचं औचित्य साधलंत तेही आवडलं.
बऱ्याच दिवसांनी तुमचा लेख आला असं वाटतंय. लिहीत जा अजून.

मनीमोहर, स्वान्तसुखाय, अनिंद्य, अज्ञानी, स्वाती२, अमितव, वावे, Sparkle...
आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा !

माहितीपूर्ण लेख. जीन बॅरेट विषयी अजिबात माहीत नव्हतं. आता बोगनवेल बघितली की आठवण होईल.
मी कायम शोधत असते बोगनवेल,मला अतिशय आवडते कारण माझ्या आईचं आवडतं झाड आहे हे.
चर्चगेट ते नरिमन पॉइंट खूप बोगनवेली दिसतात Happy
आता कायम लक्षात राहील ऋतुराज.
लेखातले बोगनवेलीचे फोटो सुरेख आहेत.

फार छान माहिती मिळाली, बोगनवेली बद्दल आणि जीन बॅरेट बद्दल. वेल म्हणतात पण वेली सारखी दिसत नाही बोगनवेल अस वाटायचं, का ते आत्ता कळलं

सामो, धनुडी, भरत, मी बिल्वा, जाई, स्वाती आंबोळे, शर्वरी.....धन्यवाद.

@ स्वाती आंबोळे,
माझे फोटो नाहीत
सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार

फार सुंदर तरीही माहितीपूर्ण लेख लिहला आहे. आणि महिला दिनाच औचित्य साधून प्रकाशित केल्याबद्दल अजूनच छान वाटल.

Pages

Back to top