भाग ५ - https://www.maayboli.com/node/84723
८ जूनच्या पहाटे पावणेदोन वाजता, आपली चार विश्वासू माणसं बरोबर घेऊन कर्नल व्हाईट हाऊसमध्ये शिरले होते. यात त्यांचं बेमालूम वेषांतर आणि बग्गीतल्या बॅगेत सापडलेलं व्हिजिटिंग कार्ड यांचा मोठा वाटा होता. ध्येयासाठी त्यांनी आपल्या भरदार दाढीचासुद्धा त्याग केला होता! त्यानंतर जे घडलं, त्यात फारसं कौशल्य नव्हतं. एखादा बावळट नवशिका भुरटा चोरदेखील ते सहज करू शकला असता. शिकागोहून आणलेल्या भूलीच्या मिश्रणाने राष्ट्राध्यक्षांना बेशुद्ध केलं खरं, पण त्यांच्या पत्नीचं काय करायचं? तिला कसलीच इजा पोहोचवायची कर्नलची इच्छा नव्हती. स्त्रीदाक्षिण्य मुरलं होतं ना अंगात! पण "राष्ट्राध्यक्षांना एकट्याने नेऊ नका, मीही बरोबर येते. काहीही सहन करायची तयारी आहे माझी." म्हटल्यावर ते म्हणाले, "ठीक. पण अजिबात आवाज करायचा नाही." मग सरकारी बग्गीत बसवून दोघांना शांतपणे तिथून पळवून नेण्यात आलं. विश्वास बसणार नाही, पण पोलीस आणि गुप्तहेरांना कोड्यात टाकणारं अपहरण इतकं सहज घडलं होतं!
दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्टर बायरन्स ऑडमिंटन बेटावर गेले असते तर काय दिसलं असतं त्यांना? दलदलीच्या भागात कॅम्पहाऊसजवळ मेरी जेन नावाच्या एका जुन्यापान्या गचाळ होडीवर शांतपणे बसलेले राष्ट्राध्यक्ष आणि पत्नी! त्यांच्याभोवती पहारा होता. अदबीने आणि आदराने त्यांच्याकडे लक्ष पुरवलं जात होतं. अपहरणाची बातमीसुद्धा न पोहोचलेल्या त्या सुनसान ठिकाणी दोन्ही अतिमहत्त्वाच्या व्यक्ती सुटकेची वाट पाहत होत्या.
अपहरणकर्त्या टोळीचा एक सभासद वॉशिंग्टनमध्ये ठेवण्यात आला होता. रुपर्ट! नक्की काय चाललं आहे हे एवढ्यात त्याच्या लक्षात आलं असलं, तरी तो काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. वडिलांशी इमान आणि त्यांची भीती, दोन्हीकडून त्याचं तोंड बंद होतं. वर्तमानपत्रांनी छापलेले ते जाहीरनामे कर्नल स्वतः लिहून, वेगवेगळ्या हस्ताक्षरात पत्ते लिहिलेल्या सीलबंद लिफाफ्यातून रूपर्टला पाठवत होते. त्यांचं काय करायचं तेही त्यात लिहिलेलं असे. रुपर्ट आज्ञाधारकपणे दूरदूर प्रवास करून सांगितलेल्या शहरांत जात होता, आणि तिथून पत्रं टपालाने पाठवत होता.कर्नलच्या या निष्पाप दिसणाऱ्या पंधरा वर्षं वयाच्या प्रामाणिक साथीदाराचा कोणाला संशय येणं शक्य नव्हतं.
परकीय आक्रमणाचे इतके धोके भेडसावत असताना, आपल्याच देशाचा एक नागरिक असं कृत्य करेल, हे कोणाच्या ध्यानीमनीही नव्हतं. कर्नलनी बरोब्बर मर्मावर घाव घातला होता, आणि तोही अगदी शांतपणे, स्वतः अज्ञात राहून. कैद्यांच्या सुटकेसाठी कोणी धावून येण्याची शक्यता इतकी कमी होती, की जणु ते अमेरिकेत नसून बोर्निओसारख्या कुठल्यातरी दूरच्या ठिकाणी असावेत. कोण जाणे, अमेरिकेच्या किनाऱ्यालगत ही एकच नाही, अशा हजारो छुप्या जागा असतील, आणि तिथे असे अगणित छुपे धंदे चालत असतील.
८ जुलैची सकाळ उजाडली. वेळ, सात वाजून पन्नास मिनिटे. पोटोमॅक नदीचा वॉशिंग्टनलगतचा किनारा शेकडो होड्या-जहाजांनी भरून गेला. देशाच्या कानाकोपऱ्यातून वाफेवर चालणाऱ्या बोटींपासून युद्धनौकांपर्यंत सर्व प्रकारची जहाजं येऊन तिथे नांगर टाकून उभी होती. सर्वांचे झेंडे अर्ध्यावर उतरवलेले होते. जमलेल्यांपैकी अर्धे डोळे किनाऱ्यालगतच्या टेकड्या न्याहाळत होते, तर अर्धे नदीवर नजर ठेवून होते. टेकड्या माणसांनी फुलल्या होत्या. सर्वांच्या मनात आशा निराशेचा खेळ चालला होता.
नव्याकोऱ्या "वॉशिंग्टन" जहाजावर बडे अधिकारी दुर्बिणी घेऊन उभे होते. अचानक उंचावर उभे असलेल्या राज्य सचिवांना "ते" दिसलं. आलं..आलं..वाटेत कुठे आलिशान जहाजं, कुठे टिनपाट होड्या.. सर्वांना पार करत एक लांबलचक जहाज संथ गतीने आलं. राज्य सचिवांच्या मनात आलं, "किती प्रचंड हे जहाज! या छोट्या होड्या चिरडून टाकायची ताकद आहे त्याच्यात. तरी त्या होड्या स्वच्छंद तरंगताहेत, आणि हे जहाज मात्र अपराधी भावनेनं हळू हळू पुढे सरकतं आहे." ते त्या जहाजाकडे लक्षपूर्वक पाहू लागले.
पोलिसांनी शिट्ट्या वाजवल्या, आणि त्या जहाजावरच्या खलाशाला ताबडतोब थांबायचा आदेश दिला. तितक्यात जहाजावरुन धुराचा लोळ उठला, आणि पेटत्या पलित्याचा पहिला इशारा झाला. हा आवाज जमिनीच्या पोटातून तर आला नाही ना, असं वाटेपर्यंत तो निरभ्र आकाशात घुमला, आणि पाठोपाठ दुसरा पेटता पलिता आला. आता खात्री पटून जनतेची कुजबुज वाढली. उत्साहाच्या आरोळ्या सुरु झाल्या. "पहा..खरं आहे..आले..आले..त्या जहाजावर आहेत.." आणखी दोन पलिते आले. रोरावणारी एकच गर्जना नदीच्या पात्रापासून किनाऱ्यापर्यंत पसरली. हा जनतेचा प्रक्षोभ? की अत्यानंद? पण त्यानंतर एकदम शांतता पसरली. गचाळ दिसणाऱ्या त्या जहाजावरून संपूर्ण काळे कपडे घातलेली एक विचित्र आकृती वॉशिंग्टन जहाजाच्या दिशेने चालली होती. हे काय? दोन्ही कैदी कुठाहेत? कधीचा हा एकच खलाशी दिसतो आहे, हे लक्षात येताच जमलेल्या शेकडो होड्यांनी क्षणार्धात त्या उद्दाम जहाजाला वेढा देऊन त्याची परतीची वाट अडवून धरली.
शीळ घातल्यासारखा एक जोरदार आवाज झाला. त्याबरोबर जहाजावरचा स्वर्ण गरुडाचा लाल काळा झेंडा उघडून दिमाखाने फडकू लागला.
"थांबा. पुढे येऊ नका. राष्ट्राध्यक्षांच्या जीवाची भीती वाटत असेल, तर तिथेच थांबा." जहाजावरुन घोषणा झाली.
सरकारचं दुसरं जहाज "मिस्ट्री" पुढे झालं. त्या गचाळ जहाजाने गोळीबार सुरु केला असता, तर "मिस्ट्री" चा पार धुव्वा उडाला असता. ते नतद्रष्ट जहाज आता पूर्णपणे थांबलं. वॉशिंग्टन जहाजावरचे अधिकारी खाली वाकून त्याच्याकडे पाहू लागले. आता काही हालचाल दिसू लागली. राष्ट्राध्यक्ष हळूहळू आपल्या पत्नीसहित जहाजाबाहेर आले.दोघेही चिंताग्रस्त असूनही त्यांचे चेहेरे धीरोदात्त दिसत होते. त्यांना पाहताच वॉशिंग्टन जहाजावरच्या अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे जोरजोरात ओरडून आपला आनंद व्यक्त केला. त्याबरोबर पाण्यातून, किनाऱ्यावरून चारी बाजूंनी उत्साहाच्या गर्जना सुरु झाल्या. झेंडे हवेत भिरकावले गेले. बंदुकांनी सलामी दिली. सर्वत्र आनंदाचा कल्लोळ झाला. काळ्या कपड्यांतल्या दोन बंदूकधारी खलाशांच्या पहाऱ्यात अतिमहत्त्वाच्या दोन्ही व्यक्ती जहाजावर सर्वांना दिसतील अशा ठिकाणी खुर्च्यांवर येऊन बसल्या. ते सुखरूप आहेत, आणि त्यांच्या सुटकेचा क्षण अगदी जवळ आला आहे, हे सर्वांना समजलं. वॉशिंग्टन जहाजावरचे सरकारी अधिकारी आपल्या अध्यक्षांना अभिवादन करू लागले. युद्धावर जाऊन आलेले कणखर माजी सैनिकदेखील भावनावश झाले.
अचानक शांतता पसरली. मेरी जेन वरून आणखी एक व्यक्ती बाहेर आली, आणि दोन्ही कैद्यांपाशी जाऊन तिने त्यांना नम्र अभिवादन केलं. मग तिने वॉशिंग्टन जहाजावरच्या अधिकाऱ्यांनादेखील अभिवादन केलं. आपली रेशमी टोपी उंचावून ती व्यक्ती राज्यसचिवांच्या समोर उभी राहिली. राज्यसचिव आणि कर्नल ऑडमिंटन यांनी एकमेकांना अभिवादन केलं. दोघांमधलं साम्य पाहून सर्वांना आश्चर्य तर वाटलंच, आणि अपहरणाचा बेत कसा बेमालूम पार पडला, तेही ताबडतोब लक्षात आलं. तसाच गोरा वर्ण, त्याच भुवया, आणि तसेच कल्ले. अरेरे! पण या खलनायकाला टक्कल होतं!! हे पाहताच राज्यसचिवांनी अनवधानाने आपल्या विपुल केसांवरून हलकासा हात फिरवत एक सुस्कारा सोडला.
कर्नल शांतपणे बोलू लागले, "देशप्रतिनिधी आणि उपस्थित सज्जनहो, कराराची माझी बाजू मी पूर्ण केली आहे. आता तुम्ही तुमची बाजू पूर्ण करायला हवी. मी वॉशिंग्टन जहाजावर येऊन खंडणीची रक्कम तपासणार आहे. त्यानंतर तुम्ही ती रक्कम दोरखंड लावून माझ्या जहाजावर खाली सोडलीत, की राष्ट्राध्यक्षांची सुटका करण्यात येईल. चला, माझ्याजवळ वेळ फार थोडा आहे."
या नाट्यपूर्ण घटना घडत असताना संपूर्ण जमावाचे डोळे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींवर खिळले होते. त्यामुळे मागे मेरी जेन वर खलाशी गडबडीने काहीतरी करत होते, हे कोणाच्याही लक्षात आलं नाही.
दोन्ही कैदी, रोखलेल्या बंदुकांसमोर जितक्या शांतपणे बसता येईल, तितक्या शांतपणे बसले होते. काही क्षणांत कर्नलनी खंडणी तपासली, आणि त्यांचं समाधान झालं. मग दोरखंड लावून सोन्याची नाणी भरलेल्या ऐशी पेट्या त्या चोरट्या जहाजावर सोडण्यात आल्या. मेरी जेनवर परत येता येता कर्नलनी हाताने इशारा केला.
रोखलेल्या बंदुका एकसाथ पाण्यात फेकून पहाऱ्यावरचे खलाशी सरळ रांगेत उभे राहून मानवंदना देऊ लागले. कर्नल पुढे झाले आणि अदबीने त्यांनी राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीसमोर हात धरला. ती बिचारी घाबरून थरथर कापू लागली, पण कर्नलच्या कृतीतलं स्त्रीदाक्षिण्य जाणवून तिने तो हात धरला. कर्नलनी आदरपूर्वक तिला वॉशिंग्टन जहाजाच्या दिशेने नेलं. मगाशी या खलाशांनी भराभर काम उरकून दोन्ही जहाजांच्या मध्ये एक वाट तयार केली होती, त्यावरून पलिकडच्या खलाशांनी तिला आधार देत वॉशिंग्टन जहाजावर घेतलं. तिला अश्रू अनावर झाले. त्यानंतर खुद्द राष्ट्राध्यक्ष आले, त्यावेळी नौदलातर्फे एकवीस बंदुकांच्या फैरींची सलामी झडली. चहूकडून शिट्टया वाजू लागल्या, झेंडे आणि हातरुमाल फडकू लागले,बंदुकांच्या आवाजाने संपूर्ण किनारा दुमदुमला. असे एकनिष्ठ नागरिक पाहून कोणत्या राष्ट्रप्रमुखाला समाधान वाटणार नाही?
मेरी जेनवर पोहोचल्यानंतर राष्ट्राध्यक्षांनी वळून पुन्हा एक नजर आपल्या इतक्या दिवसांच्या तुरुंगावर टाकली. पण हे काय? कोषातून अळीऐवजी फुलपाखरू बाहेर येत होतं. कुठे गेली ती जुनी मेरी जेन? ते धुरांडं? ते कळकट शिडांचं जहाज? एक मोठं आवरण खाली पाडलं गेलं, ते गचाळ रंग नाहीसे झाले, आणि आतून एक अप्रतिम सुंदर अद्ययावत जहाज दिसू लागलं. एखाद्या राजालादेखील त्याचा मोह पडला असता, इतकं देखणं. हा आश्चर्याचा कळस होता. नौदल अधिकाऱ्यांनी आता कुठे हेरेशॉफ कंपनीचं ते जहाज ओळखलं.
आता कर्नल एकटेच जहाजावर उभे होते. त्यांच्या डोक्यावर आता ती रेशमी टोपी नव्हती. डाव्या हाताने त्यांनी जहाजाचं चाक धरलं होतं. ते म्हणाले, "अध्यक्ष महोदय, मी तुम्हांला सुरक्षितपणे राष्ट्राला सुपूर्द केलं आहे. परिस्थितीनुसार जितकी शक्य होती, तितकी मी तुमची काळजी घेतली. प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही दोघांनी जी सहनशीलता दाखवली, त्याबद्दल मला तुमचा आदर वाटल्यावाचून राहत नाही. पण तुम्ही फक्त बळीचा बकरा होता. राष्ट्राची सुरक्षा व्यवस्था, आणि ज्यांची सुरक्षा करायची ती अतिमहत्त्वाची माणसं...फार काळजीपूर्वक सांभाळायला हवीत.
लोकहो! तुम्ही मला आजच्या काळातला सर्वात मोठा खलनायक समजत असाल. पण एक दिवस असा येईल, की तुम्ही माझे आभार मानाल. आज तुम्ही मला शिव्या देत असाल, उद्या आशीर्वाद द्याल. कारण मी तुम्हांला एक चांगला धडा शिकवला आहे. त्यासाठी तुम्ही पुष्कळ किंमत मोजलीत, पण अकलेला मोल नसतं. निघतो मी आता!"
परतीचा मार्ग मोकळा नव्हता, पण "बिजली" भर्रकन वळली. हो, हातोड्याच्या एका तडाख्याने मेरी जेन ची "बिजली" झाली होती. दोरखंड तुटले. पाण्यावर फेस उसळला. खट्याळ मांजर अवखळपणे खेळते, तशी बिजली भराभर इकडे तिकडे फिरली, एका कडेला लवंडली. कर्नलचे पाय बुडतील इतकं पाणी आत आलं. बिजलीला कोण थांबवणार? कोण पकडणार? बंदूकधारी सैनिक क्षणभर आश्चर्याने थक्क झाले, मग भानावर येऊन त्यांनी बंदुका सरसावल्या. पण राष्ट्राध्यक्षांनी हात उंचावून त्यांना थोपवलं.
संपूर्ण देशाला आव्हान देऊन तो खलनायक सहीसलामत निसटला होता. बिजली प्रचंड वेगाने चालली होती. दर्यावर्दी जगतात इतका वेग आजवर कोणीच पाहिला नव्हता. श्वास रोखून सर्वजण नुसते पाहत उभे राहिले. "जा! पकडा त्याला..पाठलाग करा.." जमावामधून घोषणा होऊ लागल्या.
पण बिजलीला पकडणं एखादा तोफगोळा पकडण्याइतकं अशक्य होतं. डोळ्याचं पातं लवतं न लवतं इतक्यात बिजलीचा खालचा अर्धा भाग दिसेनासा झाला. जमलेले नागरिक कट्टर देशप्रेमी असले, तरी साहस आणि वेग यांना दाद देण्याचा अमेरिकन स्वभाव त्यावर क्षणभर मात करून गेला. अवघ्या नऊ मिनिटांत बिजलीचा फक्त एक ठिपका दिसू लागल्यावर कौतुकाचे उद्गार निघाल्याशिवाय राहिले नाहीत. तेवढ्यात तो ठिपका नदीच्या एका वळणावरून पार झाला..इतक्या मिठास वाणीने भाषण ठोकणारा तो गूढ खलनायक आपल्या टोपीत यशाचा शिरपेच खोवून अदृश्य झाला होता.
कुठे गेला असेल तो?
(भाषांतर) क्रमश:
भाग ७ - https://www.maayboli.com/node/84756
थरार छान रंगवला आहे
थरार छान रंगवला आहे
वाह!कमाल!
वाह!कमाल!
जर शक्य असेल तर गूगल / विविध
जर शक्य असेल तर गूगल / विविध ॲप्स इत्यादींच्या मदतीने प्रत्येक भागात रेखाचित्रांचा समावेश शक्य झाला तर अधिक रोमहर्षक होईल. (सूचवणी आहे फक्त)
वेगवान
वेगवान
काश तेव्हा बिटकॉईन असती तर
काश तेव्हा बिटकॉईन असती तर ७वा भाग लवकर आला असता. एवढं सर्व सोने सुरक्षितरित्या कुठे कुठे ठेवण्यात कर्नलचा भरपूर वेळ जाणार म्हणजे वाचकांना थांबणे भाग झाले
अज्ञानी, किल्ली, झकासराव -
अज्ञानी, किल्ली, झकासराव - आभारी आहे.
अज्ञानी - रेखाचित्रांची सुचवणी आवडली आहे. पण या बाबतीत मी घोर अज्ञानी आहे. हे तंत्र शिकून घेईपर्यंत कर्नल फरार होतील! त्यामुळे सध्यातरी कृपया बिनचित्रांचं लेखन चालवून घ्यावं ही विनंती. तूर्तास कर्नलपुढे बिटकॉईनपेक्षाही जास्त निकडीची समस्या असल्याचं कळल्यामुळे पुढील भाग ताबडतोब लिहिला आहे.
धन्यवाद
धन्यवाद
चित्रं जमतील तशी इकडे प्रतिसादात द्यायचा प्रयास करेन वेळ मिळेल तसा.
फोटोशॉप शिकल्याचा थोडा उपयोग तरी होईल.
व्वा... मस्तच झालाय हा भाग!
व्वा... मस्तच झालाय हा भाग!
अज्ञानी - वा, हे छान झालं.
अज्ञानी - वा, हे छान झालं. धन्यवाद. रेखाचित्रांच्या प्रतीक्षेत!
आबा. - आभारी आहे.