सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
गतवर्षीच्या महाराष्ट्रदिनी ‘मराठी: वाचन घडते कसे?’ (https://www.maayboli.com/node/83383) या धाग्याद्वारे मराठी वाचकांसाठी उपक्रम राबवला होता. आज त्याच संकल्पनेवर आधारित शीर्षकात दर्शवलेला विषय घेतो आहे. आपल्यातील अनेक लेखक विविध सार्वजनिक माध्यमांमधून मराठी लेखन करीत आहेत. अशा सर्व लेखकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे हे आवाहन. यासाठी ‘लेखक म्हणजे कोण’, याची आपली व्याख्या अतिशय सोपी आहे ती अशी :
“ ज्या व्यक्तीने आतापर्यंत किमान एक लेखन (गद्य/पद्य) कुठल्याही सार्वजनिक माध्यमात केलेले आहे अशी कोणतीही व्यक्ती”.
या उपक्रमाद्वारे इच्छुक लेखक आपले मनोगत इथे व्यक्त करतील. ते कशा प्रकारे व्यक्त करायचे याची पूर्ण मुभा लेखकांना आहेच. तरीसुद्धा उपक्रमात एक सुसूत्रता असावी म्हणून काही मार्गदर्शक प्रश्न खाली देत आहे. ते योग्य वाटल्यास त्या प्रश्नांचा जरूर आधार घ्यावा. आजच्या दिनाचे औचित्य लक्षात घेऊन फक्त मराठी भाषेतील लेखनासंबंधीच लिहावे.
प्रश्न
१. तुम्ही किती वर्षापासून लेखन करत आहात ? सार्वजनिक लेखन प्रथम केले त्याला काय कारण घडले किंवा तेव्हाची एखादी विशेष आठवण.
२. कोणत्या तांत्रिक माध्यमातून लेखन करता ? : छापील/ इलेक्ट्रॉनिक/ दोन्ही
३. कोणत्या समाजमाध्यमांमध्ये लेखन करता? : वृत्तपत्रे/ नियतकालिके/ स्वतःचा ब्लॉग / संस्थळे, इत्यादी
४. कशा स्वरूपाचे लेखन करता ? यामध्ये विविध साहित्यप्रकार आणि वृत्तपत्रलेखनादिचा समावेश होतो.
५. लेखन का करावेसे वाटते ? त्यामागे कोणत्या प्रेरणा किंवा आदर्श आहेत का ?
६. बराच काळ लेखन केले असल्यास वाचकांशी झालेल्या संवादाचे अनुभव.
निव्वळ लेखन या कलेमध्ये लेखक त्याच्या वाचकांसाठी व्यक्ती म्हणून अदृश्य असतो; तो त्याच्या शब्दांमार्फतच वाचकांपुढे येतो. सध्याच्या युगात ‘निव्वळ लेखन’ या कलेपुढे दृकश्राव्य माध्यमातून होणाऱ्या सादरीकरणाचे मोठे आव्हान उभे ठाकलेले आहे. अशा परिस्थितीत निव्वळ लेखन ही कला भविष्यात किती काळ स्वीकारली जाईल, यासंबंधी तुमचे विचार जरूर लिहा.
वरील मनोगताची सुरुवात माझ्यापासून करत नाही. ते मी चर्चा समारोपाच्या वेळेस लिहीन. आपल्या सवडीनुसार आपण इथल्या प्रतिसाद आणि चर्चेमध्ये सहभागी व्हावे हे आग्रहाचे आमंत्रण !
टीप : जे लेखक प्रतिसादात वरील प्रश्नांचा वापर करणार असतील त्यांनी फक्त प्रश्न क्रमांक लिहून थेट उत्तर लिहावे ही विनंती. संपूर्ण प्रश्न उतरवून घेण्याची गरज नाही.
अग्रिम धन्यवाद !
*************************************************************************************************************************
>>>‘लेखक म्हणजे कोण’, याची
>>>‘लेखक म्हणजे कोण’, याची आपली व्याख्या अतिशय सोपी आहे ती अशी :
“ ज्या व्यक्तीने आतापर्यंत किमान एक लेखन (गद्य/पद्य) कुठल्याही सार्वजनिक माध्यमात केलेले आहे अशी कोणतीही व्यक्ती”.<<<
इतकी सैल व्याख्या केलीच आहे डॉ. कुमार सरांनी तर मागे एकदा व्हॉट्सअॅप गृपवर लिहिलेलं डकवते. रुढार्थाने मी काही कवयित्री नाही तरीही...
माझ्या संदर्भात कविता दोन प्रकारे माझ्याजवळ येते. एक पूर्णताच उस्फुर्त! ज्यात मनात एक प्रकारचा कॅनव्हास तयार होत जातो. वेगवेगळ्या भावना, मूडस तयार होत जातात. कधी याला बाह्य वातावरण निमित्त असतं, तर कधी अंतर्मनातच काही घडत असतं. मग ते कधी वादळी वारं असेल, कधी ठप्प पडलेली हवा असेल, तरी आसपासचा कोलाहल असेल, कधी शांतता असेल, कधी मनातली अस्वस्थता, कधी मनातली निरव शांतता, कधी मनातली उलघाल, कधी मनातले अपार समाधान, ...! हा एका अर्थाने कवितेचा कॅनव्हासच! हळूहळू या मानसिक अवस्थेला जास्त नेणीव रूप येतं. भावनांचा गुंता सुटून, एक रेषीय भावना स्थिरावत जाते.
पुढची पायरी शब्द सुचण्याची. मग ते सुचतानाच, खूप नेमकेपणाने स्वीकारले जातात. ही प्रक्रिया नेणीवेवरच होते; पण कधी कधी नंतर एखाद दुसरा शब्द जाणीवपूर्वक येथून बदलावा वाटतो.
बरं, हे शब्द मनातून वर येत असतानाच नेमका फेर, नेमकी लय, नेमकी जागा घेऊन येतात. फारच क्वचित त्यांच्या जागा नंतर हलवल्या जातात. मग मनातच या शब्दांच्या मालिकेला जरा घोळवलं जातं. तेही जाणीवपूर्वक नाही; तर एक चाळा असावा तसे; म्हणजे कधी कधी आपण अकारण पाय हलवत राहतो, झोपाळ्यावर बसल्या बसल्या नकळत हलके झोका घेतो, कधी नकळत कपाटामधलं नेमकं एकच पुस्तक उचलतो किंवा साग्रसंगीत वाढलेल्या जेवणाच्या पानांमधला, नकळत एखादा पदार्थ, पहिला निवाला म्हणून उचलतो; तसे काहीसे! काहीच निश्चित कारणमीमांसा नसते. आवड वगैरेही नसते. फक्त त्या त्या क्षणांची देन!
तर तसे हे शब्द आणि त्यांची रचना. ती उगाच पुढे मागे होत राहते. आणि मग एक क्षण असा येतो आपल्याला आपल्याच मनात चाललेले हे सर्व जाणवते, लक्षात येते. आणि मग तेव्हा घाईने ते सगळे अक्षरात उतरवून ठेवण्याची निकड होते. मग हाती असेल तो कागद, असेल ती लेखणी आणि असेल त्या माहौलमधे ते जसं आलं तसं बोटातून उतरेल उतरवू देणं इतकच आपलं काम! कधी अशी वेळ येते असते की ती वास्तवात प्रत्यक्ष उतरवणे शक्यच नसतं. मग ते मनातल्या एखादा तावदानावरती, डोळ्यांना अक्षर दिसतील असं उतरवणे भाग पडतं. ते एकदाच उतरवलं, डोळ्यांना दिसलं की झालं. सृजनाची प्रक्रिया पूर्ण!
या सगळ्यात मी असते ती ही अक्षरं उतरवण्या पुरतीच. बाकी सगळे खेळ अंतर्मनात खोल कुठेतरी चालू असतात. ना त्यावर माझा अंमल, ना माझे काही नियंत्रण, ना माझी निवड. पूर्णतः आपापत: घडत असणारी ही प्रक्रिया.
अर्थात ही क्रिया घडत असते तेव्हा, माझेच अंतर्मन काही खेळत असतं. अन हे सगळ्या खेळांचे शब्द, अनुभव, भावना, वृत्ती, विचार, क्षमता हे सगळं मीच कधी न कधी कमावलेलं असतं. अगदी प्रयत्नपूर्वक, कष्टाने स्वतःला भरपूर तावून सुलाखून. म्हणून ती कविता पूर्णत: माझीच असते. पण नियंत्रण, निवड; ते मात्र माझं नसतं. ती त्या त्या क्षणाची देन असते. ही जी कविता होते ती पूर्णतः स्वतंत्र सृजन! त्यात जे जे असतं, ते ते सगळेच्या सगळे माझं असतं. भले निवड, नियंत्रण त्या त्या क्षणाचे असेल, पण ते क्षणही माझे स्वतःचे असतात. त्यामुळे ही कविता मला जास्त खरी किंवा माझी वाटते.
दुसरी कविता, कधीतरी दत्त म्हणून समोर उभे ठाकते. निसर्गातली एखादी निर्मिती, एखादी घटना, एखादी सुंदर कलात्मक वस्तू, एखादा कलात्मक फोटो, एखादं चित्र, एखादी समोर घडणारी हृद्य घटना,... अगदी काहीही जे तुम्ही स्वतः आधी अनुभवलेलं नव्हतं. त्यावर अंतर्मनात आजवर काहीही उलघाल झाली नव्हती. काहीही मंथन झालेलं नव्हतं. ते बघितल्या क्षणी तुमच्या मनात काही वादळ उठतात. अचानक त्या दृृृष्य, घटना, चित्र, निसर्गातल्या घटना एकदम थेट मनात घुसतात. आणि मग अत्यंत चपळाईनं मन त्यातून काही शब्द अलगद हाताच्या बोटांमध्ये सोडतात. कधी त्याला लपटून आपला जुना अनुभव, विचारही वर येतो. पण हे खूप चटकन, थोडे वरवरचं असतं. अशा कविता कमअस्सल असतात असं नाही. पण वेगळ्या असतात. त्यात समोरचा निसर्ग, फोटो, चित्र, वगैरे ची टक्केवारी जास्त असते आणि माझ्या अंतर्मनाची टक्केवारी कमी असते.
दोन्ही कविता म्हटल्या तर उस्फुर्तच असतात. पण पहिली मंद आचेवर आटत असलेल्या बासुंदी सारखी. तर दुसरी मिल्कमेडमध्ये भसकन दूध ओतून काहीशी पटकन तयार झालेली बासुंदी.
असते बासुंदीच. पण पहिली रवाळ, खमंग, दाट, मधूनच साईची स्निग्धता जाणवणारी अशी बासुंदी! तर दुसरी निघोट, घट्ट, जड अशी बासुंदी!
( स्वत: ला कवी म्हणवून घेतेच आहे तर कवितेला बासुंदी का नको )
जे कविते बाबत तेच बहुतांश ललित लेखना बद्दल. वैचारिक लिखाण मात्र पूर्णत: वेगळं.
सगळ्यांचा अनुभव किती वेगवेगळा
सगळ्यांचा अनुभव किती वेगवेगळा आवडलं वाचताना. पराग, डॉ. कुमार, शर्मिला, रेव्हुजी, शर्वरी, एसआरडी छान वाटलं वाचताना. हपा इन्टंट काव्यही आवडलं
दसा,धन्यवाद.
दसा,धन्यवाद.
उगीच काहीतरी लिहीलेय. तुम्हाला आवडले याचे मनापासून समाधान.
सर्व मनोगते सुंदरच !
सर्व मनोगते सुंदरच !
१. अगदी जिव्हाळ्याचा विषय असेल किंवा उत्कटतेने वाटत असेल तेव्हाच लिहीते.
>>>> +1. असेच लेखन ‘आतून’ येते. ("कोऱ्या कागदाची हाक आल्याशिवाय लिहायला बसू नये" इति रवींद्र पिंगे)
२. असते बासुंदीच. पण पहिली रवाळ, खमंग, दाट, मधूनच साईची स्निग्धता जाणवणारी अशी बासुंदी! तर दुसरी..
>>>>> बासुंदी एकदम मधुरच मधुर !
अवल तुमचं मनोगत खूप आवडलं.
अवल तुमचं मनोगत खूप आवडलं.
हरचंद पालव, काव्य छान जमलय..
हरचंद पालव, काव्य छान जमलय..
श्राव्य-दृष्य मज मोहु लागली
एकतानता त्रिभंग झाली
शब्दसंपदा - कोण? कोठली? >>>
एका दृष्टीने Srd ह्यांचा
एका दृष्टीने Srd ह्यांचा मुद्दा पटला.
सामान्य माणसं ही आजकाल लिहू लागली आहेत आणि तंत्र ज्ञानाच्या उपलब्धिमुळे त्यांना वाचाकांपर्यंत पोहोचणे सोपं झालंय त्यामुळे कदाचित हौशी, नवोदित लेखकांचे प्रमाण वाढतंय..
मला वाटतं त्यात काही गैर नाहीये..
लिहिणाऱ्याला त्याच्या/ तीह्या परीने आनंद मिळतो आणि वाचकाना जे हवं ते त्यांना मिळत.. विन विन सीच्युएशन आहे.
हा पण त्या मध्ये तयार होणार साहित्य उत्तम प्रकारच असेल असे नाही..
कधी एखादे सुमार साहित्यही डोक्यावर घेतले जाऊ शकते.
रघु आचार्य म्हणतात त्या प्रमाणे उत्तम साहित्य तयार करायला खूप तयारी, समज आणि कौशल्य लागत. कधी कधी ते समाजायलाही विशिष्ट आकलनशक्ती, समज लागते..
पण ते झालं प्रथितयश / उत्तम लेखकां बाबत..
आता त्यांना लेखक/ लेखिका म्हणावं की नाही हा ज्याचा त्याचा / जिचा तिचा प्रश्न आहे, अस मला वाटत..
आता त्यांना लेखक/ लेखिका
आता त्यांना लेखक/ लेखिका म्हणावं की नाही हा ज्याचा त्याचा / जिचा तिचा प्रश्न
>>> +१
मी साधा सोपा विचार केला. हा उपक्रम म्हणजे माबोचा एक छोटा उत्सवच असतो. ज्याप्रमाणे सामाजिक उत्सवांमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांनी एकत्र जमावे हा उद्देश असतो आणि त्याप्रमाणेच त्याची रचनाही केलेली असते, तोच उद्देश.
एरवी प्रत्येक जण आपापल्या कोषात असतो. या धाग्याच्या निमित्ताने इथले लिहिणारे जास्तीत जास्त लोक एकत्र यावेत असे वाटले. म्हणून कुठलीही साहित्यिक फुटपट्टी वगैरे न लावता ‘आपण सगळेच लेखक आहोत’ असा साधा सोपा अर्थ सर्वांसमोर ठेवला. लेखकाची व्याख्या ही काहीशा गमतीशीर दृष्टिकोनातून दिली असली तरी नवोदितांनाही उमलू द्यावे असा विचार त्यामागे आहे.
या संदर्भात आपणा सर्वांचे विचार वाचून समाधान वाटले. धन्यवाद !
छान उपक्रम आहे. वेगवेगळे
छान उपक्रम आहे. वेगवेगळे अनुभव वाचायला मिळाले. रघु आचार्य यांचा प्रतिसादही आवडला. कुमार सरांचा वरचा प्रतिसाद वाचुन मीही इथे लिहायचे धाडस करतोय.
माबोकरांना आश्चर्य वाटेल पण पूर्वी मी या लेखकाच्या सैलसर व्याख्येत मोडत होतो आणि पूर्वी माझी मराठी भाषाही आताच्या तुलनेत चांगली होती असे मला जाणवत रहाते.
पण मी स्वतःला लेखक / कवी वगैरे समजत नाही आणि हे केवळ मॉडेस्टी म्हणुन म्हणत नाहीय.
सुरवात शाळेत निबंध स्पर्धेत भाग घेण्यापासून झाली, त्यात बहुतेक दुसरा नंबर मिळाला. मग अनेक निबंध, हस्तलिखित वार्षिकांकात टिपिकल विषयांवर एक दोन लेख आणि बऱ्याच कथा लिहिल्या.
आठवीत असताना त्यांचा गुणाकार झाला या नाटकातील मूळ कल्पना घेऊन वेड्यांच्या बाजार नावाचे नाटक लिहुन ते एका सरांना दाखवले आणि स्नेहसंमेलनात ते नाटक सादर केले (त्यात मी ही छोटी भूमिका केली.) नाटक विशेष नव्हते पण त्या वयात कसलेही विनोद खपून जात म्हणुन पडले नाही एवढेच. कॉलेज मध्ये डोक्याला ताप देऊन देऊन काही कविता लिहिल्या. आणि कोणी कसे कुणाला सांगितले माहीत नाही, कोणी पाठवल्या माहीत नाही, पण नागपूर आकाशवाणी वरून पत्र आले की तुमच्या दोन कविता आकाशवाणीवर प्रसारीत करण्यासाठी निवडल्या आहेत. घरी हे कळल्यावर आश्चर्यच वाटले. कोणत्या कविता म्हंटल्यावर दाखवल्या तर "काय काहीही चाललंय या आकाशवाणीवाल्यांचं" टाइप भाव चेहऱ्यावर स्पष्ट होते पण तोंड देखले कौतुक झाले. (इतर लेखनाला घरून योग्य दाद व चांगलेच प्रोत्साहन मिळत असे.) आकाशवाणी
कडुन त्याचे पन्नास की शंभर रुपये मानधन मिळाले.
नंतर मोठी रहस्यकथा लिहायचे मनावर घेतले, कल्पनाही चांगल्या सुचल्या होत्या . काही पाने लिहिली पण पुढे ती इच्छा काही तडीस नेली नाही.
ऑर्कुटवर कधी छोटे लेख आणि काही छोट्या रहस्य कथा लिहिल्या. डोक्यात घोळणाऱ्या मूळ रहस्यकथेतील कल्पना त्यात उतरवल्या होत्या. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. २००८ नंतर जीवन एवढे पालटले आणि पालटत गेले की आता मी एक वेगळीच व्यक्ती आहे असे मला वाटते. नंतर काहीच लिखाण केले नाही.
मानव मनोगत आवडले. तुमचे
मानव मनोगत आवडले. तुमचे उत्स्फूर्त कधी तिरकस, चटपटीत प्रतिसाद वाचायला ही मजा येते. असं वाटतं कसं सुचतं यांना.
आपल्या घरच्या वहीत कविता,
आपल्या घरच्या वहीत कविता, स्फुटं, गोष्टी लिहिल्या तर त्या वहीतच राहतात.
मानव , उत्तम !
मानव , उत्तम !
तुमच्यातील बाल-नाटककार आणि रहस्यकथाकार ही रूपे वाचून आनंद झाला.
आता नव्या जोमाने पुन्हा लिहिते व्हा !
अवल मनोगत आवडले...
अवल मनोगत आवडले...
मानव मनोगत आवडले....
माझीही एक लावणी कामगार सभा या कार्यक्रमात प्रथम गायली गेली....
कुणाला दुखवण्याचा उद्देश नाही...
या निमित्ताने विंदा आठवले
शब्दात भाव नाही
ना जोड अनुभुतीची
रचना सुरेख झाली
उपयोग काय त्याचा
आता प्रत्येक अनुभव हा स्वानुभव असायलाच हवा असे नाही तो परकाया प्रवेश ही असू शकतो. हा परकाया प्रवेश म्हणजे एखाद्या चतुरस्र नट जसा लिलया कुठलेही पात्र रंगवतो आणि हे करताना स्वत्व विसरतो. आपण याला भुमिका जगणं म्हणतो.
अगदी तितक्या सहजतेने लेखकाचा परकाया प्रवेश होतो. त्या क्षणी तुम्ही तुमचे नसता. तुमच्या मनात त्या व्यक्तींच्या, निसर्गाच्या भाव भावना जागतात. तुम्ही एवढं तद्रूप, तल्लीन होता त्या भावात अगदी समाधी लागल्या सारखे. आजूबाजूला काय होतंय यांचा विसर पडतो.
स्वानुभव लिहितानाही हीच तंद्री लागते. ब-याचदा आपली करुण अनुभुती अप्रतिम चितारली जाते. आपण त्याला वेदना चांगली बोलते म्हणतो. यात एक महत्वाचा मुद्दा हा येतो की तुमची अनुभुती वैयक्तिक असली तरी सार्वत्रिक असावी. याला आपण व्यक्ती पासून समष्टी पर्यंत म्हणतो. जेव्हा असं होतं नाही तेव्हा ते कुठे तरी वैयक्तिक रडगाणे होते.
सुक्ष्म निरीक्षण, चिंतन, मनन, वाचन या गोष्टी लिखाण उत्तम व्हायला आवश्यक आहेत. मनाची एकाग्रताही तेवढीच महत्त्वाची आहे.
पाडगावकर म्हणत कवितेच्या एक दोन ओळी मनात ठाण मांडतात... संपूर्ण कविता एका बैठकीत घडेलच असे नाही....
सुरेश भटांच्या बाबतीत हृदयनाथ मंगेशकर म्हणतात एका चित्रपट गीत लेखनासाठी सुरेश भटांना हॉटेल मध्ये रुम बुक केली...हॉटेलचे बील महिनाभरात त्याकाळी १०००० झाले तरी गाणं तयार नाही आणि शेवटी प्रोडूसरला परवडेना म्हणून भट हॉटेल खाली करून टॅक्सीत बसले अन् त्यांना गीत सुचले...एका कागदाच्या चिठो-यावर लिहिले.
त्यामुळे कधी लिखाण उस्फुर्त धो धो पावसाच्या सरी सारखं सारखं तर कधी थांबून, थांबून . दोन्हींची लय जमली की झालं.
ना. धो. महानोर हे प्रतिभावान कवी तर होतेच पण ते लिखाण स्वानुभवातून जास्त झाले आहे म्हणून अप्रतिम झाले असे मला वाटते.
लेखक कुठलाही असो मला वाटतं तो प्रांजळ मनाचा असतो, हळवा, हळूवार पण तटस्थ असतो म्हणून तो आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीच स्वच्छ प्रतिबिंब लिखाणात उमटवू शकतो.
कुठल्याही कलेला लोकाश्रय
कुठल्याही कलेला लोकाश्रय मिळाला तर ती अधिक बहरते. तसेच लिखाणाचे आहे. यातून नवनवीन लिखाण घडते.
तरी कुठे तरी वाटत राहतं लोक काय म्हणतील या पेक्षा तुझी लेखन क्षमता ही समाज मनाचा आरसा आहे तर तू चाल पुढं तुला रं गड्या भिती कशाची.
तू फक्त लिखाण उत्तम होईल याची काळजी घे. लोकाश्रय बायप्रोडक्ट आहे.
मानव, दत्तात्रय मनोगत आवडले.
मानव, दत्तात्रय मनोगत आवडले.
>>>> तर तू चाल पुढं तुला रं गड्या भिती कशाची.>>> +७८६
इंटरनेटवरच्या लेखकांनी न्यूनगंड ठेऊ नये असं वाटतं.
मानव मनोगत आवडले.
मानव मनोगत आवडले.
दसा, परकाया प्रवेशाबद्दलचे तुमचे वेगळे मत वाचले. तुमच्या मताचा संपूर्ण आदर करतो.
उत्तम लेखक हा प्रिंट मीडीयातच असायला हवा असे काहीही नाही. डिजिटल मीडीयात सुद्धा असू शकतो. डिजिटल मीडीयात त्याला लगेचच पावती मिळते. मात्र प्रिंट मीडीयात लेखकाला ज्या काही टप्प्यातून जावे लागते त्यात संपादन हा एक आहे. फायदे तोटे दोन्हीकडेही आहेत.
पूर्वी डिजिटल मीडीया नसताना संपादकाची चाळणी अंतिम असे. त्यामुळे कथा पाठवताना दहा वेळा ती तपासून पाठवावी लागे. त्यानंतरही त्यात बदल सुचवणे, ते स्विकारणे असे टप्पे असत.
डिजिटल मीडीयात थोडंसं सुचलं कि भाग १ प्रकाशित करण्याची सोय आहे. त्यानंतर वेळ मिळेल तसे सुचेल तसे कथा आकार घेत जाते. मी पण हौस म्हणून अशीच एक कथा अर्धवट ठेवली आहे. यात वाचकांशी कमिटमेण्ट ऐवजी एकमेकांना समजून घेणे जास्त आहे. असो.
कुमार सरांनी उपक्रमामागचा हेतू हा हौशी लेखकांना लिहिते करणे हा आहे असे प्रतिसादात स्पष्ट केलेले आहे. मी नेहमी लेख वाचल्यानंतर आधी प्रतिसाद देतो मग इतर प्रतिसाद वाचतो जेणे करून माझे मत प्रभावित होऊ नये. मागे ऑर्कुटवर एका कवीमहाशयांनी प्रत्येकाला कवी बनवण्यासाठी उपक्रम चालवले होते. एखाद्याने आपल्या रचनेला कविता म्हटले तर ती कविता अशी व्याख्या त्यांनी केली होती. त्यांनी ऑर्कुटवरच कविता मागवून शंभर कवितांचे पुस्तक प्रकाशित केले. प्रत्येकाला किमान पंचवीस पुस्तके घेण्याचे कंपल्शन केलेले असल्याने सहभागी कवींकडूनच अडीच हजार पेक्षा जास्त पुस्तकांची मागणी आली. आज त्यातले किती कवी नावारूपाला आले आहेत हे अलाहिदा.
त्याच प्लॅटफॉर्मवर मंदार चोळकर या कवीने आपले वेगळेपण जोपासले होते. आज तो नामवंत गीतकार आहे. सक्सेस स्टोरी हा वेगळा भाग आहे आणि लिखाण कसे घडते याची स्टोरी हा वेगळा. लिखाण कसे घडते, कसे घडावे हे वाचल्यानंतर पहिल्यांदा प्र के function at() { [native code] }रेंची आठवण झाली. मी असा झालो ,कर्हेचं पाणी यात त्यांनी लेखकाने काय केलं पाहीजे हे छान सांगितलेल् असल्याने ते प्रतिसादात येऊन गेले.
मायबोलीने वैभव जोशीसारखा गझलकार दिला आहे. अनेक जण इथून बाहेरच्या जगात प्रस्थापित झालेले आहेत. काही लेखक, कवी मायबोलीवर आहेत हे सुद्धा माहिती नसते. कारण मायबोली आयडीमुळे काहीच समजत नाही. कुणीतरी उल्लेख केल्यावर मगच समजते. मायबोली वर पूर्वी अनेक उत्तम चर्चा व्हायच्या. उपक्रम, मायबोली आणि अन्य काही संकेतस्थळांनी अनेकांच्या ज्ञानात भर टाकली.
फेसबुक वर सुद्धा असे एक साहित्यिक सर्कल आहे. तिथेही उत्तम चर्चा झडतात. अशा चर्चेच्या प्रतिक्षेत आहे.
दसा,
दसा,
काव्यमय मनोगत आवडले.
एक महत्वाचा मुद्दा हा येतो की तुमची अनुभुती वैयक्तिक असली तरी सार्वत्रिक असावी >>> +११११ चांगला मुद्दा !
र आ,
अशा चर्चेच्या प्रतिक्षेत आहे. >>>> +११ नक्कीच.
रघू तुमच्या मताचाही आदर करतो.
रघू तुमच्या मताचाही आदर करतो. परकाया प्रवेश सूक्ष्म निरीक्षण, चिंतन, मनन यातूनच घडतो. गडकरी तळीराम लिहिण्यासाठी स्वतः: दारु प्यायले नाहीत. वस्तुतः ते दारु पीत नसत. पण बुधवारातल्या एका गल्लीत दारुच्या दुकानासमोर तासनतास ऊभे राहून निरिक्षण करत. विश्वास पाटील पानिपतावर जाऊन आलेत. ऐतिहासिक लिखाण करताना फक्त त्या व्यक्तीरेखा नाही तर तो कालखंड ही हे लोक जगलेत. व्यंकटेश माडगूळकरांनी "बनगरवाडी" लिहिली तेव्हा त्यांनी चितारलेली माणसं, पशूपक्षी, परीसर प्रत्यक्ष अनुभवत होते. गो.नी.दांडेकर प्रचंड भ्रमंती करत.
दसा
दसा
तळीरामाची व्यक्तीरेखा उभी करणे वेगळे आहे असे मला वाटते. लेखकाला अनेक व्यक्तिरेखा उभ्या कराव्या लागतात. त्या निरीक्षणाच्या जोरावर हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद. ते निरीक्षण कोणाचे आहे ? त्याच्या जाणिवातून व्यक्तिरेखा उभी राहते. त्या व्यक्तिरेखेच्या जाणिवेतून नव्हे. पुरूषाला प्रसूतीकळांचे निरीक्षण मांडणे शक्य आहे. त्या कळांच्या वेदना, जाणिवा मांडणे शक्य नाही असे मला वाटते.
भोगलेला अनुभव हा जातिवंत असतो
भोगलेला अनुभव हा जातिवंत असतो.
त्यावर आधारलेले लेखन वाचकाला अगदी भिडते.
कुमार सर, छान उपक्रम !!
कुमार सर, छान उपक्रम !! बऱ्याच जणांची मनोगते वाचायला मिळाली . सगळ्यांनी छान लिहिले आहे .
>>>>>>तर "काय काहीही चाललंय
>>>>>>तर "काय काहीही चाललंय या आकाशवाणीवाल्यांचं" टाइप भाव चेहऱ्यावर स्पष्ट होते
हाहाहा मला मानव तुमचे प्रतिसाद भयंकर आवडतात. खूप हसायला मिळते.
मानवदादा,
मानवदादा,
मुलींनी आपलं बरं- वाईट मत बोलून दाखवायचं नाही. शक्यतो गप्प बसायचं. फार तर आईजवळ कुचकुचायचं आणि आई पण 'सहन केलं पाहिजे मुलीनं' हेच सांगायची.
उदा. मीच एकदा सातवीआठवीत सगळे घरचे टिव्ही बघत असलेले असताना. शाहरूखचं गाणं लागलं तर जोरात 'मला आवडतो शाहरूख' म्हटलं तर 'असं बोलू नये, शिवाय लग्न झालेय त्याचं, मुलं आहेत त्याला' म्हटल्या एक आजी.... त्या वयात हे किती नैसर्गिक आहे.
पहिला पिरिअड आल्यावर तर घरी मुलगी कुणाचा तरी मुडदा पाडून आली आहे आणि आता तिने किमान अजून वर तक्रार तरी करायला नको, एवढा अपराधी भाव द्यायचे.
मुलींनी बाबांसमोर -मोठ्या भावांसमोर छायागीत बघायचं नाही. सिनेमातील गाणी म्हणायची नाहीत. भजनं चालतील. गाणी एकांतात चालतील.
जे काय करायचं ते नवऱ्याच्या घरी करा हे सतत कानावर यायचे. लग्नाआधी नोकरी आणि आर्थिक स्वातंत्र्य वगैरे किस झाड की पत्ती.
नाकीडोळी धड असलेल्या पोरींचा बार पहिल्या 'बाजारात' उडवायला हवा, चांगले स्थळ मिळते.
अरे ,रंगरूपाने बरी आहेस. गप्प बसायला शिक जरा, उंबरे कमी झिजवावे लागतील. ही भाषा नॉर्मल होती.
माझ्या पिढीत अल्ट्रासाऊंड आणि स्त्री भ्रूणहत्या सुरू झाल्या. बऱ्याच घरी ज्या मुली पहिल्या होत्या त्या फक्त पहिल्या होत्या म्हणून होत्या. ज्या पहिल्या नव्हत्या त्यांना याची वेळ पडल्यास/ गप्प बसवण्यास आसपासच्या घरातील उदाहरणासहित जाणीवही करून दिली जायची.
मुलींनी कितीही भूक लागली तरी सांगायचे नाही. भावाआधी जेवायला बसायचं नाही. त्याला वाकून- व्यवस्थित वाढून- त्याचं ताटपाट उचलून ठेवायचं मग बसायचं. माझ्या मैत्रिणीला 'तुम्ही दोघंही बसा आणि आपापलं वाढून घ्या' म्हणाले तर तिची आमच्यापेक्षा दोनतीन वर्षांनीच मोठी असलेली बहिण म्हणाली 'असकसं चालतं, पुरुष आहे नं तो'. आमच्याकडे चालतं म्हटलं की तुच्छ कटाक्ष मिळायचा. तो 'पुरुष' चारवेळा नापास झालेला, मुलींची छेड काढत फिरणारा होता.
आमच्याकडे मी गणपतीची पूजा आरती करायचे. मला माहितीच नव्हते की हे नॉर्मल नाही. हे मी मैत्रिणीला बोलून दाखवलं 'तुमच्याकडे तर काहीही चालतं' म्हणून तुच्छ कटाक्ष.
एका मैत्रिणीचे बाबा तिला माझ्यासोबत खेळू द्यायचे नाहीत कारण मुलींनी तेल लावून वेण्या घालून टिकली लावायला पाहिजे. आमच्याकडे याचा आग्रह नव्हता, शिवाय मी स्पष्टवक्ती होते. मगतर मी खात्रीने वाह्यातच असले पाहिजे आणि त्यांची मुलगी बिघडेल. मला हे कळल्यावर फार अपमान वाटला आणि आमचं जमत असूनही मी तिच्या घरी कधीही गेले नाही. हे अगदी आठवीनववीतलं.
आजोळी गेल्यावर शेजारीपाजारी चुकून मला माझ्या मावशीची मुलगी समजायचे, पण मी तोंड उघडायच्या आत दुसऱ्या कोणीतरी स्पष्टिकरण दिले की मी माझ्या मावशीची मुलगी नाही, तिचं नशीब जोरात आहे तिला दोन्ही मुलं, माझ्या आईचं नशीब नेहमीच थोडं हे 'असंच'. ओळखीच्यात हे वरचं आणि त्यात ती पडली गरीब गाय आणि ही मुलगी उद्धट. तरी बरं एकच आहे.
टिकली लावायला आवडत नाही म्हटलं तर शेजारीपाजारी कुणीही रॅन्डम काका 'काय उर्मट आहे, आपल्या संस्कृतीची कदर नाही'.
वरचं सगळं माझ्यासमोर झालेलं आहे.
(No subject)
हॉरिबल आहे हे सगळं…
हॉरिबल आहे हे सगळं…
अस्मिता, हे इतकं नाही पण
अस्मिता, हे इतकं नाही पण सत्तर टक्के पाहिलं अनुभवलं आहे, लहानपणी.
माझा काका तर अजूनही म्हणतो, बाबांना, की तू गेल्यावर तुला पाणी पाजणारं कुणी नाही (मुलगा नाही म्हणून ) आई,बाबा doesnt care at all, त्यामुळे घरी आम्हांला प्रत्यक्ष कुणी म्हटलं नाही.
सासरीही हेच आहे. ते तर नांदेड जवळ असणारे खूप छोटं खेडंगाव. रिकामटेकड्या पुरुषांना हातात पाणी सुद्धा द्यावे लागते आणि रोज घरी पंगत वाढावी लागते. साडी,सुना असतील तर त्यांना compulsory. घरच्या लेकींना साडी चं बंधन नाही. बाकी सून असाल तर शिक्षण वगैरे सगळं बाहेर सोडून आत यायचं. नवऱ्याशी बोलायचं नाही. जाऊदे मोठी list आहे. Lockdown मध्ये अनुभवलं सगळं हे.
माझं कौतुक झालेलं मुलगा झाला तेव्हा. ह्या कौतुकाचा राग आला. रमा झाली तेव्हा सासरे तोंड पाडून बसले होते.
.
नवरा मात्र हिरा होता माझा. त्याने ह्या गोष्टी जमेल तेवढ्या सांभाळून घेतल्या.
बाप रे हे तर भयंकर वातावरण
बाप रे हे तर भयंकर वातावरण होते म्हणायचे !
अस्मिता, किल्ली! बापरे मी तर
अस्मिता, किल्ली! बापरे मी तर विचारंच नाही करु शकणार.
माझी एक मैत्रीण मला म्हणायची, मला तुझी आई, तुमचे नातेवाईक खूप आवडतात धनू .असे आमचे नाहीत एवढ्या मोकळ्या स्वभावाचे. सगळे गावातले लोकं नुसती मागे खेचणारी आहेत. ( ती विदर्भातली होती) हे लोकं NRC तर राहायला होते त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांना असूया वाटायची.
अस्मिता, किल्ली - फारच चीड
अस्मिता, किल्ली - फारच चीड आणणारं होतं तुमच्या आजुबाजूचं वातावरण! मी समजत होतो आता ते दिवस गेले. असे दिवस माझ्या आईच्या काळातले असायचे.
वरचं सगळं माझ्यासमोर झालेलं
वरचं सगळं माझ्यासमोर झालेलं आहे.
Submitted by अस्मिता. on 2 March, 2024>> वाचून अस्वस्थ वाटलं.. ८० -९० ( बहुदा) क्या दशकात पण मुलींना महाराष्ट्रात हे अस वागवलं जात असेल
किंवा किल्ली २०२० मध्ये पण ही परिस्थिती असावी..
Pages