अपहरण - भाग ५

Submitted by स्मिताके on 28 February, 2024 - 07:07

भाग ४ - https://www.maayboli.com/node/84706

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे एकच गडबड उडाली. जहाजाच्या मूळच्या सुरेख पांढऱ्याशुभ्र रंगावर कळकट करडा रंग चढवण्यात आला. तोही कसा, कोणी नवशिक्या रंगाऱ्याने धब्बे घालून कसातरी फासल्यासारखा. किती गचाळ दिसू लागलं ते जहाज! त्यावर लटकवलेल्या छोट्या बोटी काळ्या-हिरव्या रंगवल्या गेल्या. त्यांचा अवतार एखाद्या कोळशाच्या खाणीतून आल्यासारखा झाला. सर्व उरलेले रंग एकत्र कालवून ते जहाजावरच्या लाँचला फासण्यात आले.. त्या रंगाचं वर्णन करणं केवळ अशक्य! पोकळ लाकडाचं एक खोटं धुरांडं बनवून ते जहाजावर बसवण्यात आलं. त्याला काळा रंग फासून त्यावर एक लालभडक पट्टा ओढण्यात आला. जहाजाने वेग घेतला, की खाली भटारखान्यात काहीतरी जाळून सतत धूर करत राहण्याची आज्ञा आचाऱ्याला देण्यात आली. संपूर्ण डेक कॅनव्हासने झाकून त्यावर कळकट पिवळा रंग फासण्यात आला. पितळी भाग रोज घासून साफ करणं थांबवण्यात आलं. पण या सर्वांवर कळस म्हणजे जहाजाच्या कडांवरून चढवलेलं आवरण. काही स्क्रूंच्या आधाराने ते अशा खुबीने बसवण्यात आलं, की ते सहजपणे काढून जहाज मूळच्या सुंदर रूपात परत आणता यावं.

"कॅप्टन, आता आपलं जहाज तयार झालं. आता तुमच्या खलाशांना सांगा, मी सगळ्यांचा पगार दुप्पट केला आहे. मात्र दुप्पट अळीमिळी गुपचिळी. जहाज सोडून कोणीही कुठेही जायचं नाही, कोणाशीही कसलाही संपर्क साधायचा नाही. माझे दोन विश्वासू नोकर जे लागेल ते सगळं आणून देतील. यापुढे जहाजाचा वेग ताशी आठ नॉट्स राहील. त्याच्यावर ते जाऊ शकतच नाही असं समजा. मी पुन्हा आदेश दिल्याशिवाय वेग वाढलेला मला चालणार नाही. चला, आता चार्ल्सटनला जायचं आहे. ताबडतोब जहाज सोडायला सांगा."

इथे काहीतरी निराळंच पाणी मुरतं आहे, हे रूपर्टच्या लक्षात आलं. ही नेहमीची स्वैर सफर नसणार, हे नक्की. इतकं देखणं जहाज विद्रुप करून टाकलेलं पाहून त्याला चीड आली होती. पण वडिलांना काही विचारण्याची त्याची हिंमत नव्हती. तो मनात धुमसत राहिला. खलाशांच्याही लक्षात आलं होतं, की हे काहीतरी निराळं आहे. पण ते बेफिकीर होते, गालातल्या गालात हसत होते. दुप्पट पगार, कुशल आचाऱ्याच्या हातचं आयतं जेवण, अमर्याद इंधन, जहाजावर कोणी हल्ला करेल अशी शक्यता नाही. मग काय? कर्नलनी सांगितलं असतं, तर चाचेगिरीसुद्धा केली असती त्यांनी. ते थंडपणे कर्नलचे आणि कॅप्टनचे आदेश पाळत होते, आणि इमानेइतबारे वेळच्यावेळी जेवणाच्या रांगेत उभे राहत होते.

वेग इतका कमी असला, तरी कर्नलच्या बेटावरून चार्ल्सटनला जायला असा कितीसा वेळ लागणार? कापसाच्या व्यापारामुळे त्या बेटांवरून ये जा करणाऱ्या स्टीमर बोटी आजूबाजूला दिसत होत्या.
"अहॉय कर्नल!! हे डबडं कुठून आणलंत?" कर्नलना ओळखणारे दर्यावर्दी थट्टा करून मोठमोठ्याने खिदळू लागले.
"न्यू यॉर्कमधून. कधीची स्टीम यॉट शोधत होतो. ही स्वस्तात मस्त मिळाली. जुनी आहे, जरा डागडुजी करायला हवी. पण अजून वेळ झाला नाही मला."
यावर हसण्याच्या फैरी झडल्या.त्यांच्यापैकी एकाने हळूच एकीकडे इतरांना डोळा मारत कर्नलना आव्हान दिलं, "शर्यत लावूया, कर्नल?" तो कर्नलना चांगला ओळखून होता. शर्यतीला ते नाही म्हणूच शकत नाहीत, हे त्याला ठाऊक होतं.
"हो तर! चला!!" कर्नलचे डोळे लकाकले. खाली वाकून ते ओरडले, "कॅप्टन ख्रिश्चन! जाळ वाढवायला सांगा. जास्त वाफ हवी. जोरात जायचंय. लवकर!"
खोट्या धुरांड्यातून धुराचे मोठमोठे लोळ उठले. कर्नलनी वेग वाढवला. अजून जास्त.. अजून जास्त.. दहा नॉट्स!! बस्स, इतकाच? हाडाच्या खलाशासारखी त्यांनी जोरजोरात शिवीगाळ सुरु केली. शर्यत लावणारी दुसरी स्टीमर विजयाच्या घोषणा देऊन हास्यकल्लोळ करत कधीच त्यांच्यापुढे निघून गेली. कर्नल दुःखीकष्टी दिसू लागले. दोन तासांनंतर कशीबशी धूर ओकत कर्नलची जुनीपानी स्टीमर एकदाची चार्ल्सटनला पोहोचली. तिथे धक्क्यावर कर्नलचे बरेच मित्र गोळा झाले होते. एकच गलका उडाला होता. कर्नलनी सर्वांसाठी दारू मागवली.
"जरा थांबा. थोडी डागडुजी करतो, घासूनपुसून नव्यासारखी करतो. मग बघा, माझी मेरी जेन जगातल्या कुठल्याही बोटीला मागे टाकते की नाही.तुम्ही म्हणाल त्या वेगाने नाही गेली तर नाव बदलून टाकेन मी!!"
हो, आता तिच्यावर "मेरी जेन" असं नाव रंगवलं होतं. त्या आठवड्यात या नाटकाचे आणखी काही यशस्वी प्रयोग झाले. मेरी जेन रोज सकाळी चार्ल्सटनला येत होती, आणि रात्री बेटावर परत जात होती. आठवड्याभरात ही जुनीपुराणी टिनपाट मेरी जेन चार्ल्सटन शहरात सर्वांना ठाऊक झाली. तिला आणि कर्नलना टोमणे मारून सर्वांनी भरपूर खिदळून घेतलं. मग काही दिवसांनी शहरात कोणीतरी पळून जाऊन लग्न केल्याची घटना घडली, आणि पाठोपाठ एक खून. मग लोकांचं लक्ष तिकडे वळलं. मेरी जेन आणि कर्नलची लोकप्रियता ओसरली, आणि हळूहळू ते विस्मरणात गेले. इतके, की आता कदाचित त्यांना कोणी ओळखलंही नसतं.

दोन जून. मेरी जेनने आपलं कळकट दिसणारं ध्यान पोटोमॅक नदीच्या मुखाकडे वळवलं.

पोटॉमॅक नदी चेसापीक खाडीला जाऊन मिळते. वळणं घेत जाणारा वॉशिंग्टन शहरापासून खाडीपर्यंतचा तिचा प्रवाह सुमारे नव्वद ते शंभर मैल लांबीचा आहे. ती जिथे खाडीला मिळते, तिथलं तिचं प्रत्येक मुख रुपर्टला आणि दोन्ही विश्वासू नोकरांना चांगलं ठाऊक होतं. ५ जूनच्या संध्याकाळी त्यापैकी सर्वात सुनसान दिसणाऱ्या मुखाशी मेरी जेनचा नांगर पडला.

तिच्या नेहमीच्या वेगाच्या हिशोबाने ती वॉशिंग्टनपासून अडीच तासांच्या अंतरावर होती. रात्रीचे नऊ वाजले. अंधार पडल्याबरोबर मेरी जेन वॉशिंग्टनकडे निघाली. ताशी छत्तीस नॉट्सचा वेग नोंदला गेला. सावधपणे किनाऱ्यालगत राहून हळूहळू ती एका धक्क्याला लागली. आपले दोन नोकर आणि दोन खलाशी बरोबर घेऊन कर्नल वॉशिंग्टन शहरात टेहळणी करायला गेले. क्लोरोफॉर्म आणि एक गुप्त औषध मिसळून बनवलेलं एक जालीम मिश्रण नेहमीप्रमाणे त्यांच्याजवळ होतं. औषधाचं नाव सांगणं धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने गुप्त राखण्यात येत आहे. हुंगताक्षणी माणूस बेशुद्ध होईल, असं हे मिश्रण शिकागोच्या एका केमिस्टने बनवलं होतं. पूर्वी कधीतरी कोणत्यातरी कट्टर पंथाची दीक्षा या केमिस्टला मिळालेली होती. त्यातून ही कला त्याने हस्तगत केली असावी.

नुकताच कर्नलनी देशभर प्रवास केला होता, हे वाचकांच्या लक्षात असेल. त्यात वॉशिंग्टन भेटीच्या वेळी एक परिचित गृहस्थ एखाद्या स्वभावतज्ज्ञासारखं त्यांचं बारीक निरीक्षण करून म्हणाले होते, "कर्नल, ते अमके सेनेटर ठाऊक आहेत ना तुम्हाला? ही दाढी काढलीत, आणि डोक्यावर टोपी घातलीत, तर थेट त्यांच्यासारखे दिसाल तुम्ही. आहे की नाही गंमत?" त्या परिचिताचे ते सहज उद्गार कर्नलच्या मनात घर करून राहिले होते, आणि त्यांना सुखावून गेले होते. त्यांनी त्या सेनेटरची मिळतील तितकी छायाचित्रं गोळा करून, नीट अभ्यासली होती. सेनेटच्या सभागृहात जाऊन त्यांचं आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचं प्रत्यक्ष निरीक्षण केलं होतं.

आणि हेच सेनेटर, गेल्या काही महिन्यांत सत्तापालट होऊन राज्यसचिव झाले होते!!

कर्नलच्या डोक्यात एक किडा वळवळू लागला. थोडी कल्पनाशक्ती लढवून या सारखेपणाचा फायदा उठवला तर? राज्यसचिव गर्भश्रीमंत असल्याचं सर्वांनाच ठाऊक होतं. त्यांचं अपहरण केलं तर? चांगलंच घबाड हाताला लागेल. पण हा बेत कसा मिळमिळीत, साध्या चोरचिलटांनी रचल्यासारखा फुसका वाटतो. मी काही असा चिंधीचोर नाही. मी यापेक्षा जबरदस्त मोठा धक्का देऊ शकतो. आपल्या खापरपणजोबांना ब्रिटनमध्ये चाचेगिरीबद्दल फाशी देण्यात आलं होतं, हा इतिहास कर्नलना ठाऊक नसला, तरी त्यांच्या नसानसातून तेच रक्त खेळत होतं. त्यांच्या तरल बुद्धीत कधी ठिणगी पडली, आणि बेत कधी शिजला, हे सांगणं कठीण आहे. त्या थरारक कल्पनेने कर्नल स्वतःच प्रथम चकित झाले, आणि हळूहळू झपाटले गेले. ठरलं!! चक्क अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं अपहरण करायचं, चांगली दणदणीत खंडणी मागायची, आणि राज्यसचिवांना निदान काही काळासाठी तरी यात बेमालूम गोवून टाकायचं. सहज शक्य आहे. लबाड लुच्चे राजकारणी.. घडू दे अद्दल! आता त्यांचे सर्व विचार त्या एकाच दिशेने फिरू लागले. त्यांनी अनेक महिने गुप्तपणे पूर्वतयारी केली. इतकी, की अगदी एका क्षणात तयार होऊन ते राज्यसचिव म्हणून वावरू शकले असते.

आता राहिले राष्ट्राध्यक्ष. त्यांची साधी राहणी, व्रतस्थासारखं रोज रात्री अकराच्या ठोक्याला झोपणं वगैरे सगळ्या जनतेला ठाऊक होतं. व्हाईट हाऊसमधलं विलासी वातावरण संपलं होतं. आता तिथे साधे सुरक्षा रक्षकसुद्धा नव्हते. एकदा का आपण आत प्रवेश मिळवला, की आपला बेत फत्ते झालाच हे कर्नलना ठाऊक होतं. कारण बेत होता नामी, आणि वेषांतराचा एक्का हुकुमी! पुढच्या तीन सलग रात्री कर्नलनी बग्गी पळवण्याचा प्रयत्न केला. रात्री ११ ते १२ या वेळात ते त्या रस्त्यावर पाळत ठेवून राहिले. तबेल्याकडे जायची वाट पक्की घोटून ठेवली.

त्यांच्या सुदैवाने ८ जूनच्या काळोख्या रात्री त्यांना यश आलं, हे आपण जाणताच!

(भाषांतर) क्रमश:
भाग ६ - https://www.maayboli.com/node/84739

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

punekarp, Diggi12 , आबा. , झकासराव, किल्ली , अज्ञानी
तुम्ही सर्वजण प्रत्येक भाग वाचून, आवर्जून प्रतिसाद देऊन माझा उत्साह वाढवता आहात, त्याबद्दल खूप आभारी आहे.
अज्ञानी - सहावा भाग नुकताच सोडवून आणला आहे!