मराठी : लेखन घडते कसे?

Submitted by कुमार१ on 26 February, 2024 - 22:20

सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

गतवर्षीच्या महाराष्ट्रदिनी ‘मराठी: वाचन घडते कसे?’ (https://www.maayboli.com/node/83383) या धाग्याद्वारे मराठी वाचकांसाठी उपक्रम राबवला होता. आज त्याच संकल्पनेवर आधारित शीर्षकात दर्शवलेला विषय घेतो आहे. आपल्यातील अनेक लेखक विविध सार्वजनिक माध्यमांमधून मराठी लेखन करीत आहेत. अशा सर्व लेखकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे हे आवाहन. यासाठी ‘लेखक म्हणजे कोण’, याची आपली व्याख्या अतिशय सोपी आहे ती अशी :

ज्या व्यक्तीने आतापर्यंत किमान एक लेखन (गद्य/पद्य) कुठल्याही सार्वजनिक माध्यमात केलेले आहे अशी कोणतीही व्यक्ती”.

या उपक्रमाद्वारे इच्छुक लेखक आपले मनोगत इथे व्यक्त करतील. ते कशा प्रकारे व्यक्त करायचे याची पूर्ण मुभा लेखकांना आहेच. तरीसुद्धा उपक्रमात एक सुसूत्रता असावी म्हणून काही मार्गदर्शक प्रश्न खाली देत आहे. ते योग्य वाटल्यास त्या प्रश्नांचा जरूर आधार घ्यावा. आजच्या दिनाचे औचित्य लक्षात घेऊन फक्त मराठी भाषेतील लेखनासंबंधीच लिहावे.

प्रश्न

१. तुम्ही किती वर्षापासून लेखन करत आहात ? सार्वजनिक लेखन प्रथम केले त्याला काय कारण घडले किंवा तेव्हाची एखादी विशेष आठवण.

२. कोणत्या तांत्रिक माध्यमातून लेखन करता ? : छापील/ इलेक्ट्रॉनिक/ दोन्ही

३. कोणत्या समाजमाध्यमांमध्ये लेखन करता? : वृत्तपत्रे/ नियतकालिके/ स्वतःचा ब्लॉग / संस्थळे, इत्यादी

४. कशा स्वरूपाचे लेखन करता ? यामध्ये विविध साहित्यप्रकार आणि वृत्तपत्रलेखनादिचा समावेश होतो.

५. लेखन का करावेसे वाटते ? त्यामागे कोणत्या प्रेरणा किंवा आदर्श आहेत का ?

६. बराच काळ लेखन केले असल्यास वाचकांशी झालेल्या संवादाचे अनुभव.

निव्वळ लेखन या कलेमध्ये लेखक त्याच्या वाचकांसाठी व्यक्ती म्हणून अदृश्य असतो; तो त्याच्या शब्दांमार्फतच वाचकांपुढे येतो. सध्याच्या युगात ‘निव्वळ लेखन’ या कलेपुढे दृकश्राव्य माध्यमातून होणाऱ्या सादरीकरणाचे मोठे आव्हान उभे ठाकलेले आहे. अशा परिस्थितीत निव्वळ लेखन ही कला भविष्यात किती काळ स्वीकारली जाईल, यासंबंधी तुमचे विचार जरूर लिहा.

वरील मनोगताची सुरुवात माझ्यापासून करत नाही. ते मी चर्चा समारोपाच्या वेळेस लिहीन. आपल्या सवडीनुसार आपण इथल्या प्रतिसाद आणि चर्चेमध्ये सहभागी व्हावे हे आग्रहाचे आमंत्रण !

टीप : जे लेखक प्रतिसादात वरील प्रश्नांचा वापर करणार असतील त्यांनी फक्त प्रश्न क्रमांक लिहून थेट उत्तर लिहावे ही विनंती. संपूर्ण प्रश्न उतरवून घेण्याची गरज नाही.

अग्रिम धन्यवाद !
*************************************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वाचे अनुभव वाचायला छान वाटत आहे. काही रीलेत सुद्धा होत आहे.

धनुडी,
अश्या ग्रीटिंग फोटो आणि त्यातील वाक्यांचा धागा काढ नवा.. वरचे वाक्य आवडले आहे..

किल्ली, पराग, शर्मिला, srd, कुमार१, रेव्यू, अस्मिता सगळ्यांचे वाचन प्रवास वाचले. आवडले.
मायबोली वर जवळ जवळ सगळेच लिहितात त्यामुळे सर्वसमावेशक असा हा उत्तम उपक्रम आहे. ह्या निमित्ताने एक reflection किंवा सिंहावलोकन किंवा आढावा घ्यायला उद्युक्त केले आहे.

कुमार १ आणि रेव्यु यांच्या मनोगत काही नोंदी विशेष आवडल्या..

स्वतःच्या मन:चक्षूपुढे एक तराजू ठेवलेला आहे. त्याच्या एका पारड्यात निरीक्षण, वाचन, चिंतन आणि मनन ही ४ गाठोडी तर दुसऱ्या पारड्यात फक्त लेखन आहे. या दोन पारड्यांपैकी पहिले पारडे जितके जड राहील तितके ते लेखकाच्या हिताचे असेल. >>> खूप महत्वाचं

लिहिताना असीम आंतरिक आनंद होतो.>>>

कुमार१ , पराग ह्यांना लेखनाचा वारसा (?) मिळालाय...
एका घरात चार लेखक.. आई लेखिका . . Interesting..

आवडतायत एकेकाचे अनुभव/ लेखनाचा प्रवास वाचायला..

कुमार सरांच्या इतक्या लूज बॉलवर सिक्स हाणायचा तर त्याऐवजी सरांनी बॉल चक्क सोडून दिला आहे, याचे राहून राहून आश्चर्य वाटत आहे. पूर्वीची मायबोली राहिली नाही आता.
(स्पष्टिकरणासाठी संपादित)

रेव्यु यांचे अनुभवी मनोगत तर धनुडी यांचे सुंदर चित्रमय मनोगत खूप आवडले !

अस्मिता त्यांचे मनोगत स्वतंत्रपणे लिहायला उद्युक्त झाल्या याचा खूप आनंद वाटतो ! तेही मनोगत मनस्वी उत्तम झालेले आहे.

चर्चेत सहभागी झालेल्या इतर सर्व लेखकांना धन्यवाद !! त्यांनीही आपापले मनोगत सवडीनुसार लिहावे, वाट बघतोय !

या विषयावर लेखकांनीच लिहायला हवे. वाचक किंवा हौशी लेखकांनी लिहीणे कितपत योग्य राहील याची कल्पना नाही. पण आता विषय छेडलाच आहे तर ..
लेखकाची व्याख्या खूपच सैलसर झाली आहे.
समाजमाध्यमात लेखक होणे आणि लेखक असणे यात फरक आहे असे वाटते.

पूर्वी लेखक, कवी लोक आपसात चर्चा करत. नव्यांना मार्गदर्शन करत. आचार्य function at() { [native code] }रेंच्या मनोगतात नव्याने लेखक होणार्‍यांसाठी मार्मिक असे मार्गदर्शन दिसते.

लिखाणासाठी प्रतिभेच्या भरार्‍या महत्वाच्या आहेत. फिक्शनल लिखाणात सर्वात महत्वाचे म्हणजे सुचणे / स्फुरणे. संगीतकाराला चाल सुचते, चित्रकाराच्या डोक्यात चित्र आकार घेते, तसेच कवी लेखकाच्या जाणिवेत एखादी कल्पना धडका देऊ लागते. त्या क्षणी तिला येऊ देणे, तिचे स्वागत करणे आणि मग त्याच्या नोंदी करणे महत्वाचे. नाहीतर अशा अनेक धडका विरून जातात मग धडका देणेच बंद होते. हे स्फुरणे अनेक बाबींवर अवलंबून असते. अनुभव, निरीक्षणं, भावभावना, अभ्यास,माहिती , कलाकृती, चित्रपट... कधी कधी इतरांचे लिखाण. इतरांच्या प्रतिभेच्या स्पर्शाने प्रेरणा मिळणे हे नेहमीच उसनवारी - उधारी असत नाही. पण नेहमीच असे होऊ लागलेले बरे नाही.

लेखकाकडे उत्तम निरीक्षणशक्ती हवी. प्रतिभा तर हवीच.
पण त्याच्या लिखाणात जे जे विषय येणार आहेत त्याचा अभ्यास हवा, तपशील देता यायला हवेत. पुण्यात बसून नाशिकच वर्णने कल्पनेने देणे इतके सोपे लिखाण नसते.
रणजित देसाई , शिवाजी सावंत हे लेखक आपण लिहीणार असलेल्या कादंबर्‍या ज्या प्रदेशात घडल्या त्या प्रदेशांना भेटी देत. पर्यटनाने त्या परीसराचा भूगोल मेंदूत छापला जातो. याचा लिखाणात खूप फायदा होतो.

याशिवाय मानवी भावभावना, मनोव्यापार यासाठी लेखकाला वेगवेगळ्या लोकांच्यात मिसळता यायला हवे. त्यांची बोली, उच्चारण, लकबी याचे उत्तम ज्ञान असायला हवे. या गोष्टी गुगलवर सायकॉलॉजीचे उतारे वाचून समजत नाहीत.

वेगवेगळ्या लोकांच्या विचारधारांशी तटस्थपणे डील करता आले पाहीजे. प्रत्येक प्रदेशाची एक मानसिकता असते ती माहिती असायला हवी, तिच्याशी समरस होता यायला हवे. सर्वात महत्वाचे म्हणजे लेखकाने आपल्या अनुभूतीला प्रमाण मानून त्या जाणिवांप्रमाणे लिखाण केले पाहीजे. ते जास्त भावते. एखाद्या पुरूषाने स्त्री नायिका उभी करून कितीही खटाटोप केला तरी त्या जाणिवा त्याच्या लिखाणात उतरत नाहीत. आजूबाजूच्या नात्यातल्या, ओळखीतल्या, वाचनातल्या स्त्रिया ठाऊक आहेत म्हणून आपण नायिकेच्या भूमिकेतून लिहू हा आत्मविश्वास फाजील होता असे काही काळाने लेखकाला वाटू लागणे म्हणजे तो हळू हळू प्रगल्भ होत चालल्याची लक्षणे. यावर वादंग माजेल. मात्र आपल्याला परकायाप्रवेश ही सिद्धी प्राप्त आहे असे लेखकाला वाटू लागते आणि त्या आत्मविश्वासातून तो कोणत्याही सामाजिक घटकाच्या जाणिवेतून लिहू लागतो जे अर्थातच सूज्ञ वाचकाला भावत नाही.

आवरतं घेतो.
एका इंग्रजी कादंबरीत विमानाचे काम कसे चालते हे सांगण्यासाठी सहा ते सात पाने खर्ची पाडली आहेत. पण ते सांगताना कुठेही कंटाळा येऊ दिलेला नाही. अक्षरशः एखादा बोल्ट ढिला झाला तर काय होईल याचे एव्हढे तपशील दिलेले आहेत कि बस्स. पण पुढच्या थरारक घटनांसाठी ते आवश्यक होते हे लगेचच कळते. लेखकाने हा अभ्यास गुगल नसतानाच्या काळात केलेला होता. ही मेहनत घ्यावीच लागते.

लिखाणाची त्रिसूत्री, चतुर्सूत्री याबद्दल जास्त माहिती नाही. पण लिखाणाचा पहिला पाया म्हणजे जाणून घेणे. जेव्हढे जाणून घ्याल तेव्हढा लिखाणाचा आवाका विस्तारतो. वजन उचलण्याच्या स्पर्धेत असे म्हणतात कि दीडशे किलो वजन उचलण्यासाठी शरीराला पाचशे किलो वजन उचलण्यासाठी सक्षम करावे लागते. पुणे मुंबई सायकल स्पर्धा जिंकण्यासाठी रोज दोनदा पुणे मुंबई एव्हढे अंतर सायकलवर कापावे लागते.

याशिवाय महत्वाचे म्हणजे दीर्घ लिखाण करताना किंवा लिखाण सिद्धीस जाण्यासाठी आवश्यक माहिती जमवत असताना संयम राखणे महत्वाचे. लिखाणासाठी मांड टाकून बसणे, लिखाणात वेळ देताना अधून मधून शरीराला उर्जा देत राहणेही महत्वाचे.

लेखक जसजसा मुरांब्यासारखा मुरत जातो तस तसा यातल्या कशावर लिहावे याचे त्याला ज्ञान येत जाते. काय सोडून द्यावे याची उत्तम जाण असलेला लेखक हा उत्तम लेखक अशी सैल व्याख्या मला करायला आवडेल.

डॅन ब्राऊन लिखाण करताना दर दोन तासांनी चक्क व्यायाम करायचा.त्यामुळे थकवा जातो, मन पुन्हा एकाग्र होते आणि शरीराला व्याधी जडत नाहीत असे त्याचे म्हणणे.
समाजमाध्यमात एकमेकांना छान छान म्हणावे लागते. तसे म्हटले नाही तर प्रतिसाद मिळणे बंद होतात. त्यामुळे या अनुभवावर आधारीत लेखक होण्याची व्याख्या खरंच लूज बॉल वाटली.
क्षमा असावी दुखावले गेले कुणी तर.

लेखकाची व्याख्या खूपच सैलसर झाली आहे.
>>>
सहमत आहे आणि ती मुद्दामच तशी ठेवली आहे. इथे असणारे बहुसंख्य लोक हे हौशी लेखक आहेत. या उपक्रमाच्या निमित्ताने जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे हा त्या व्याख्येमागचा उद्देश आहे .
बाकी तुमचे सविस्तर विश्लेषण आवडले, धन्यवाद !

बाकी तुमचे सविस्तर विश्लेषण आवडले, धन्यवाद ! >>> धन्यवाद सर. प्रतिसादाच्या मानाने आवरतं घेतलं तरी मोठाच झाला प्रतिसाद.

इंटरेस्टिंग!
आज अस्मिताचा लेख आधी वाचला आणि मग हे पाहिलं.

मी सुद्धा लिहीन याबद्दल. प्रश्नांची उत्तरं म्हणून लिहिण्यापेक्षा त्या गाइडलाइननुसार वेगळा लेखच लिहीन बहुतेक. (मी...मी करण्याचं खुलं आमंत्रण आहेच, त्यामुळे तो ही प्रश्न नाही. Proud Light 1 )
फक्त एकच आहे, गेली १० वर्षं माझं छापिल माध्यमांतलं लेखनकाम आणि संपादनकाम हे इतकं एकमेकांत मिसळलेलं आहे की ते सुटं करून लिहिण्याचं चॅलेन्ज आहे.

थोडक्यात माझे लेखन माझ्या समाधानासाठी आणि एक कायम सर्वांना उपलब्ध असलेले लेखन...
(Submitted by Srd on 28 February, 2024 - 15:43)

>>
यावरुन आठवलेल्या अमेरिकेचे आद्यकवी वॉल्ट व्हिटमन यांच्या कवितेतील दोन ओळी उद्धृत करतो :

The song is to the singer, and comes back most to him,
The teaching is to the teacher, and comes back most to him

मुळात आपण स्वतःसाठीच लिहीत असतो; आपण जे लिहितो त्याचे परिणाम आपल्यावर होतातच !

(वरील कवितेच्या ओळींचा अन्य काही भावार्थ असू शकतो. असल्यास कोणी सांगावे).

५. लेखन का करावेसे वाटते ?

या एकाच प्रश्नाचे उत्तर पुढे देत आहे. उत्तर स्वतःपुरतेच आहे. स्वतःला लेखक वगैरे मानत नाही. पण तरीही लहानपणापासूनच काहीतरी लिहायची उर्मी दाटून येते. पूर्वी थोडे काही छापून आले होते. नशीब बलवत्तर. पण मोठमोठ्या लेखकांचे लेखन वाचले की वाटत असे, की आपण काही लिहायची गरज नाही. हे वाटणे फारच प्रबळ झाले. मग मध्ये १० वर्षे तरी फारसं काही लिहिले नाही. लिहिले तर कोठेही पोस्ट करायची, इतरांना वाचायला द्यायची धाकधूक अजुनही वाटते. आता लिहिणे हा व्यक्त होण्याचा अविभाज्य भाग बनला आहे. स्वतःलाच नक्की काय वाटते हे नेमके कळण्यासाठी लिहिते.
पूर्वी लिहीलेले एक मुक्तक उत्तरादाखल इथे देते आहे.

लिहीले पाहिजे काहीतरी.
काहीनं काही.
कुणी वाचेल ही कदाचित
किंवा कुणी नाही वाचणार एक अक्षरही.
लिहीले पाहिजे पण, तरीही.
थरथरणारं मन कागदावर सांडलं पाहिजे.
साठलेलं, साचलेलं शाईतुन झिरपलं पाहिजे.
चित्रकाराने कुंचल्याचे फटकारे द्यावेत त्या सहजतेने,
लेकीच्या मऊसूत केसांची वेणी घालावी त्या आत्मियतेने,
कशिदाकारी करणाऱ्या हाताच्या कुशलतेने,
झरझर वाहणाऱ्या झऱ्याच्या गतीने,
मातीत रुजणाऱ्या बीजाच्या विश्वासाने,
अचपळ मनाच्या अस्थिरतेने,
लिहीले पाहिजे काही.

ते विरत नाही हात पुढे केला की.
डोळ्यांपुढे धुक्यासारखे दाटून राहते.
कधी बंद पापण्यांमागे दिसते.
ते सरत नाही कितीही लिहिले तरी.
पाऱ्यासारखे चमकदार काहीतरी.
माझ्यासाठी, माझ्यापुरतं, माझं असं नेकीने,
असले नसलं बळ सावरुन, जमवून,
संततधार पावसासारखं मोकळ्या रानात बरसले पाहिजे.
बीज बनून पुन्हा पुन्हा मातीमध्ये रूजलं पाहिजे.
पोपटी हिरव्या कोंबासारखं मातीतून ऊगवलं पाहिजे.
सृजनाचा रंग लेवुन एक तरी हिरवं पान अंगावर फुटलं पाहिजे.
काहीतरी काहीन् काही लिहिले पाहिजे.

वाचतोय
आवडतंय प्रत्येकाची प्रोसेस समजून घ्यायला

सृजनाचा रंग लेवुन एक तरी हिरवं पान अंगावर फुटलं पाहिजे.
काहीतरी काहीन् काही लिहिले पाहिजे.
(Submitted by -शर्वरी- on 1 March, 2024 - 11:37)

>>>>
अप्रतिम ! आवडलेच ..

शर्वरी मुक्तक अप्रतिम आहे..
आणि सगळी मनोगतं पण आवडली. लले तुझ्या मनोगताची वाट बघते.
कुमार सर , सामो, ऋ धन्यवाद माझं मनोगत आणि ग्रिटींग आवडल्या बद्दल.

हा लेख आला म्हणून चार ओळी ठरवायची संधी मिळाली. रघुआचार्य म्हणतात तसे आम्ही लेखक नाहीच. आमच्या चार ओळी कोणत्या वृत्तपत्रास पाठवल्या तर छापणार नाहीत. पण महत्त्वाच्या नोंदी म्हणून प्रत्येक पांढऱ्यावरच्या काळ्याला ( आम्ही चार वर्षे शाळेत काळ्यावर पांढरे करण्यात घालवली आहेत) मोजावे लागते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे कर्मचारी आपला फावला वेळ दैनंदिनी लिहिण्यात घालवत. त्या नोंदींचा कंपनी बोर्डाला खूप उपयोग होत असे.
राजवाडे यांनी जो मराठ्यांचा इतिहास लिहिला ती बाडे म्हणजे वाईच्या एका माणसाने त्यांना दिलेल्या जमाखर्चाच्या नोंदी होत्या. प्रत्येक पानावर दिनांक होता आणि पदार्थ महाग का झाले याची थोडक्यात टिप्पणी होती. जे दरबाराचे लेखनिक करू शकणार नाहीत ते प्रामाणिक लेखन होते. कुणाला खुश करण्यासाठी वा मनोरंजनासाठी नव्हते.

>>>वाचतोय
आवडतंय प्रत्येकाची प्रोसेस समजून घ्यायला>>> +१
छान लिहिताहेत सगळे

. अनेकांना लिहिते केलेत.
>>> मग बघताय काय, सामील व्हा !
तुमच्यासारख्यांची वाट पाहतोच आहे Happy
..
इथे लिहिणारा प्रत्येक जण लेखक आहे असे मी मानतो. तो नवोदित असो किंवा मुरलेला, अशा प्रत्येकाचे मनोगत सर्वांसमोर यावे असे मनापासून वाटते.

आत्ताच माझ्या असं लक्षात आलं की या लेखाचं शीर्षक 'मराठी लेखन घडते कसे' हे 'मराठी पाऊल पडते पुढे' या गाण्याच्या चालीत अगदी फिट्टं बसतंय. इथले कवी त्यात पुढची भर घालतील अशी आशा आहे.

'मराठी लेखन घडते कसे' हे 'मराठी पाऊल पडते पुढे' या गाण्याच्या चालीत अगदी फिट्टं बसतंय.
>>>
हा योगायोग नसून ते मूळ गाण्यावरून प्रेरणा घेऊनच लिहिले आहे.
असा प्रतिसाद मागच्या वर्षी सादर केलेल्या "मराठी : वाचन घडते कसे ?" याही धागाशीर्षकाला मिळाला होता Happy

सखोल चिंतन नुरे, वाचनी येई ना फारसे
मराठी लेखन घडते कसे?

सरस्वती अप्रसन्न झाली
उलटपावली परत निघाली
तेव्हा प्रतिभा खोल आटली
राहतील मग हाती केवळ
धगधगते कोळसे
मराठी लेखन घडते कसे?

श्राव्य-दृष्य मज मोहु लागली
एकतानता त्रिभंग झाली
शब्दसंपदा - कोण? कोठली?
भाषा परि संमिश्र उद्याची
तोंडातुनि फसफसे
मराठी लेखन घडते कसे?

(या नकारात्मक काव्याबद्दल क्षमस्व. स्वतःवरचा राग समजा.)

भाषा परि संमिश्र उद्याची
तोंडातुनि फसफसे
मराठी लेखन घडते कसे?

>>>>
एकदम झकास !! वास्तव लिहिलेत.
नुकताच हा लेख वाचला : https://www.aksharnama.com/client/article_detail/7130

मूडनुसार शिथिलता/शैथिल्य असते किंवा मूडनुसार वेगाने कल्पना सुचतात. जेव्हा सुचतात तेव्हा लिहीते. मात्र अगदी जिव्हाळ्याचा विषय असेल किंवा उत्कटतेने वाटत असेल तेव्हाच लिहीते. बाकी खोदून खोदून वाचत बसते.

रघू छान प्रतिसाद
हपा शीघ्र कवी झालात...
आवडले.
कुमार सर विशेष आभार.

Pages

Back to top