खरडण्यामागचे खरडणे कदाचित...

Submitted by अस्मिता. on 29 February, 2024 - 11:44

धन्यवाद कुमार सर. तुमच्यामुळे लिहिले गेले आहे.‌ Happy
https://www.maayboli.com/node/84711
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा -२०२४
----------------

शाळेत असल्यापासून लिहायचे. जवळजवळ प्रत्येक निबंध स्पर्धेत पहिला नंबर यायचा. चित्रकला, संस्कृत, हिंदी, वक्तृत्व, गणित, रामायण, अभिवाचन, विज्ञान, रांगोळी, कलाकृती बनवणं सगळ्याच स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे, बहुतेकवेळा नंबरही यायचा आणि सगळ्यातच रूची होती. पण लेखनात जास्त मुक्त वाटायचं. एक्स्ट्रोव्हर्ट मुलगी होते मी शाळा कॉलेजमध्ये.

एकदा आंतरशालेय निबंध स्पर्धेत भाग घेतला होता, तेव्हा पपांनी मार्गदर्शन केले होते. त्यांच्यामुळे मी एक्स्प्रेसिव्ह आहे, नाहीतर नांदेडसारख्या लहान शहरात नव्वदीच्या दशकात मुलींची तोंड दाबण्याला 'वळण लावणं' समजायचे. पर्यायाने मला आजूबाजूला उद्धट समजण्यात यायचं.‌

नरहर कुरुंदकर माझ्या आजोबांचे स्नेही व घरी नियमित येणंजाणं असणारे होते. माझ्या जन्माआधीच ते गेले पण माझे आजोबा आणि वडील फार वेगळे आहेत. आमच्या घरी फार चांगल्या माणसांचं येणंजाणं होतं आणि श्रीमंत नाही पण तिथल्या इतरांपेक्षा चांगल्या- उच्च वैचारिक वातावरणात मला रहायला मिळाले आहे. वाड्यातल्या भिंतीतली कपाटं पुस्तकांनी भरलेली असायची आणि विषयांचे बंधन नव्हते. ज्योतिषापासून पॅपिलॉनपर्यंत, प्लूटोच्या माहिती पासून 'साद देती हिमशिखरे'पर्यंत, आईच्या दासबोध ते रूचीरापर्यंत सगळं मी आठवीनववीपर्यंत वाचून झालं होतं.

आईचं मराठी भाषेवर फार प्रेम आणि शब्दसंग्रह अफाट. फारच शांत, अतिशय अदबशीर, माणसं जोडणारी आणि संयमी होती. तिची शांतवणारी एनर्जी उतरते माझ्या आध्यात्मिक लेखनात. 'स्प्लिट पर्सनॅलिटी' सारखे अनेक कप्पे आहेत मेंदूत, योग्य त्या कप्प्यातून काढून त्या-त्या वेळी ते वापरता येणं आणि तरीही या सगळ्यापासून सुद्धा कुठंतरी अलिप्त रहाता येणं ही निसर्गाची कृपा. 'Like a Samurai with a sword in his one hand and meditating with the other' ह्या वचनाचा आदर्श घेतला आहे.

माणसं जोडणं सुद्धा तिचंच. वरवर साध्या दिसणाऱ्या गोष्टींवर प्रचंड मार्मिक भाष्य करायची. सगळ्याच मराठी कविता तिला पाठ असायच्या. आम्ही त्यावर गप्पाही मारायचो.

माझ्यात लहानपणापासून एक विचित्र -अफाट एनर्जी आहे, तिला वाट करून दिली नाही तर ती मलाच जाळून टाकेल हे लक्षात आल्याने आईने मला बऱ्याच गोष्टींमधे गुंतवून टाकले होते. एकदा 'जळो तुझा पिंजरा मेला, त्याचे नाव नको मला राहीन मी घरट्याविना चिमणी गेली उडून राना' ह्या कवितेतल्या ओळींवर गप्पा मारताना 'तू अशीच आहेस, तू अगदी त्या चिमणीसारखी आहेस. तू पिंजऱ्यात राहूच शकत नाहीस आणि म्हणून मला तुझी सारखी काळजी वाटते' म्हणाली होती. असं चालत नाही नं पोरीच्या "जातीला"...... 'त्या' पिंजऱ्याला धडका द्यायच्यात लिहूनलिहून. 'लेकीच्या माहेरा माय सासरी नांदते' हेही तिनंच एकदा बोलतबोलत समजावलं होतं. लग्न होईपर्यंत समजलं नव्हतं.

खरंतर ज्या गोष्टींचा अभिमान वाटायला हवा, त्या गोष्टींची लाज वाटायला पाहिजे असे आजुबाजूचे सामाजिक संस्कार व मानसिकता असल्याने व्यक्ती म्हणून मला अजूनही या दोन्ही कवितांच्या अभिव्यक्तींचा 'सुवर्णमध्य' साधता आलेला नाही.

आजोळ डोक्यावर पदर/ धारदार पितृसत्ताक व 'एक गाव बारा भानगडी' टाईप खेडं आणि घरात शंभर चतुर माणसं. तिथे सरळ बोलतच नाही कुणी. मग आपण अजूनच हजरजबाबी व्हावं लागतं. गंमत म्हणून मामाच्या किराणा आणि शेतीच्या अवजाराच्या दुकानातही बसलेली आहे मी. जगातील सगळ्यात बोअर दुकान असते ते. हे असं विचित्र कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे मी कुणाशीही 'फ्रिक्वेंसी मॅच' करून लिहू शकते.‌

'पर्यावरणाचा ऱ्हास' हा एकदा निबंधाचा विषय होता. वाड्यातल्या एका ताईने शेवटी लिहायला दोन ओळी सुचवल्या, ज्या मला अजूनही आठवतात.

हिरवे शिवार सारे पिवळे पडून गेले
आकाश पेलणारे पक्षी उडून गेले

या ओळी मला इतक्या आवडल्या की मी त्यांना बऱ्याच ठिकाणी लिहिले व बक्षीस मिळविले.‌ कुणाला ही कविता माहिती असेल तर सांगा.‌

इलेक्ट्रॉनिक आणि तेही फक्त मायबोली, मैत्रीण आणि ब्लॉग. ब्लॉगसाठी म्हणून आवर्जून लिहिले नाही, माबोसाठीच लिहिते. मग एकत्र रहावं म्हणून ब्लॉगवर टाकते.

सगळ्याच प्रकारचं लेखन करते. जे कुणीही केले नाही ते मला माबोवर करायचे होते. त्यामुळे मी शंकराचार्यांपासून गोविंदापर्यंत कुणालाच सोडलं नाही. इथं पैसे मिळत नाहीत/द्यावेही लागत नाहीत आणि नोबेल किंवा पुलित्झरही मिळत नाहीत. मग कशाला अडकवायचे स्वतःला. कधीकधी वाटतं मी कविताच कशी केली नाही अजून. ही धमकी असेल/ नसेल ते काळच ठरवेल. लेखनामुळे नाही तर माणसं जोडण्याच्या हातोटीमुळे माझे लेखन काही लोकांना आवडते. लोक तुम्ही काय लिहिले हे तितकं लक्षात ठेवत नसतात, तुम्ही त्यांच्याशी कसं वागलात हीच 'last seen memory' असते. मी इतरांच्या फक्त चांगल्या स्मृतींमधे रहायचा प्रयत्न करते.

माझ्या मैत्रिणीने मला प्रोत्साहन दिले होते. तेव्हा मला वाटायचं जो उठतोय तो लिहितोय. लेखक जास्त वाचक कमी झाले आहेत, त्यात मी कुठं लिहू. पण तिने मला म्हटलं 'ते लिहितात, तू काळजात सुरा खुपसतेस' म्हणून तू लिही. माणसं आणि भावभावनांचे कंगोरे बघून प्रेरणा मिळते. आध्यात्मिक लेखनामागे निसर्ग, जवळची तेजस्वी माणसं व माझी जिज्ञासा प्रेरणा आहेत. इतरांना माझा दृष्टिकोन समजवायला लिहावं वाटतं.

मी कुठल्याही लेखनप्रकाराला कमी समजत नाही पण
चित्रपटावरचं लेखन माझं सुपरफिशियल व्हर्जन आहे, कारण ते फक्त निरीक्षणाधारीत आहे. वैचारिक लेखन मात्र दृष्टिकोनाने आविष्कृत आहे. मी किती खोल विचार करू शकते, हे मला लिहायला लागल्यावर कळलं. आधी वाटायचं सगळेच करतात. मला माझ्या खोल विचारांतून सहज बाहेर पडता येते पण वाचकांचा गुंता होतो. त्यांना चक्रव्यूहात अडकून स्वतः लीलया बाहेर येऊन त्यांची फजिती बघायला मला मजा येते.

लेखनाला विषयाबद्दलची आस्था लागते, त्यामुळे ते कुणाला पोचलं की खूप आनंद होतो. कौतुकापेक्षा 'पोचलेले' प्रतिसाद भावतात. मायबोलीवरील लेखनासाठी लेखक नसलं तरी चालतं पण प्रतिसादांना उत्तरं देण्यासाठी वकील व्हावं लागतं. आजोळच्या आनुवंशिकतेमुळे ते मी मध्यरात्री सुद्धा करू शकते. लिहिताना मला माझे विचार अर्जुनाला माश्याचा डोळा दिसला तितके स्पष्ट दिसतात. त्यामुळे कुणाला पटवत बसवण्याची असोशीच वाटत नाही.

माझे इथले सगळे अनुभव अगदी अपवादात्मकरित्या चांगले आहेत. मला माबोकरांचं फक्त प्रोत्साहन, कौतुक आणि आपलेपणाच वाट्याला आला आहे. माझ्याही नकळतपणे आणि फक्त ऑथेंटिक राहून मी इथली अदृष्य सोशल लॅडरही भराभर चढली आहे. इतकं सहज-सरळ होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.

अगदी पहिल्या लेखापासून... जेव्हा मी नवखी होते तेव्हापासून प्रतिक्रियांची संख्या सुद्धा भरपूर. बरेचदा वाटतं मी एवढं प्रेम 'डिझर्व' करत नाही. माझ्यापेक्षा चांगले लेखन कौशल्य, दांडगा अभ्यास व आपापल्या क्षेत्रात यशस्वी असलेली लोक इथे आहेत आणि माझं 'तीसमारखां' सारखं झालं आहे.
तीसमारखां keeps me grounded .

त्यामुळे मी प्रत्येक नवीन लेख/ प्रतिसाद कुठल्याही विषयाचं किंवा आधीच्या लेखाच्या कौतुकाचं/टिकेचं बॅगेज न ठेवता अगदी पहिलं लेखन असल्यासारखं लिहीत असते. मोबदला मिळत असो/नसो स्वलेखनाच्या प्रेमात अडकणं कल्पकतेसाठी (आणि अहंकारासाठी सुद्धा) अतिशय घातक ट्रेंड आहे. काहीही चिरकाल टिकणारे नाही, जे एकदोन क्षण मिळतात त्यात उत्तम करायची धडपड आहे . त्यामुळे त्याच्यात सुद्धा अडकायचे नाही आणि मला कायम नवीन विषयही खुणावत असतात. मला स्वतःला माझ्याच लेखावर चर्चा करायचा सुद्धा पाच दिवसांत कंटाळा येतो आणि मी 'नमस्कार' करून धूम ठोकते, 'कोपिंग मेकॅनिजम' नॉर्मल नाही. चांगल्या/ वाईट कुठल्याच भावनांमधे रमता येत नाही.

मी स्वतःला लेखिका समजत नाही कारण कुठेतरी 'पुस्तके लिहिणारी हीच लेखिका' असं समीकरण आहे पण मला निसर्गाने व्यक्त व्हायची ताकद दिली आहे आणि त्यातून मलाही आनंद मिळतो म्हणून हे जे चाललं आहे ते चाललं आहे. आताही कुमार सरांच्या धाग्यावर हेच लेखन असेच्या असेच डकवले तर मी वाचकांना कमी 'नार्सिस्टिक' वाटेल आणि स्वतंत्रपणे लिहिले तर जास्त, हे लक्षात आलं होतं पण who cares ..!

धन्यवाद Happy
-तुमचीच अस्मिता.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.
कवितेच्या ओळीही छान आहेत - आधी ऐकल्या नव्हत्या.

>>> लोक तुम्ही काय लिहिले हे तितकं लक्षात ठेवत नसतात, तुम्ही त्यांच्याशी कसं वागलात हीच 'last seen memory' असते.
मला नाही तसं वाटत. किंबहुना छान वागल्यामुळे लेखनावर छान अभिप्राय मिळाले तर मला ते काहीसं अपमानास्पदच वाटेल.
पण ज्याचा त्याचा दृष्टीकोन आणि अनुभव.

एक सुचवू का? लेखात इमोजीज देऊ नयेत असं मला वाटतं. उत्स्फूर्त मनोगत असलं तरीही. तुला त्याची आवश्यकताही नाही, शब्द परिणामकारकरीत्त्या वापरता येतात तुला. Happy

किंबहुना छान वागल्यामुळे लेखनावर छान अभिप्राय मिळाले तर मला ते काहीसं अपमानास्पदच वाटेल.
>>>>हो, मलाही तसेच वाटायचे म्हणून मी त्याचा 'पर्फेक्ट इक्विलिब्रियम' शोधायचा प्रयत्न करतेय. छान ऐवजी ऑथेंटिक समज प्लीज. मला वाटतं ते 'I am being myself- you're being yourself and we are still pleasent to each other हे 'विन- विन' मला शोधता येईल. Happy

काढले इमोजीज. Happy

मनोगत उत्तम रीतीने व्यक्त केलेले आहेस. मलाही वाटते की तू चित्रपट्विषयक लेखनाचा ज्याला तू सुपरफिशिअल म्हटले आहेस, नाद सोडावा आणि अन्य लेखनावरती भर द्यावास. अर्थात माझे वैयक्तिक मत आहे. लिहीत रहा.

लिखाणावरचे लिखाण सुद्धा तितकेच छान झाले आहे. भरपूर वाचन आणि भाषेवरील प्रभुत्व तुझ्या लेखनात दिसते. मला खरे तर असे उच्च लिखाण बाऊन्सर जात असल्याने मी ते कमी वाचतो ते वेगळे.

पर्यायाने मला आजूबाजूला उद्धट समजण्यात यायचं. >>> यावर अजून सविस्तर वाचायला आवडेल. अश्या मुली नेहमीच आवडत आल्या आहेत Happy

>>>>बरेचदा वाटतं मी एवढं प्रेम 'डिझर्व' करत नाही.
हे तू अगदी लाईटली म्हणालेली आहेस हे मला कळतय पण मी या विषयावरची एक इंग्रजी कविता वाचलेली. मला आठवतच नाहीये. ती शोधते
----------
Love (III) - BY GEORGE HERBERT
https://www.poetryfoundation.org/poems/44367/love-iii

Love bade me welcome. Yet my soul drew back
Guilty of dust and sin.
But quick-eyed Love, observing me grow slack
From my first entrance in,
Drew nearer to me, sweetly questioning,
If I lacked any thing.
.
.
.
.
My dear, then I will serve.
You must sit down, says Love, and taste my meat:
So I did sit and eat.

>>> छान ऐवजी ऑथेंटिक समज प्लीज. मला वाटतं ते 'I am being myself- you're being yourself and we are still pleasent to each other हे 'विन- विन' मला शोधता येईल.

होय. Happy

लोक तुम्ही काय लिहिले हे तितकं लक्षात ठेवत नसतात, तुम्ही त्यांच्याशी कसं वागलात हीच 'last seen memory' असते. >>>> मलाही नाही वाटत असं. निदान इथे तरी. वाद घाल घाल घालणार्‍यांना एकमेकांच्या चांगल्या लेखनावर प्रतिक्रिया देताना पाहिलं आहे. तसच कायम गोग्गोड असणार्‍यांना फार चांगल्या नसणार्‍या लेखनाचा अनुल्लेख करतानाही बघितलं आहे. Happy

मनोगत छान लिहिलं आहे. मी तुझं चित्रपट विषयक सोडून बाकी काही फार वाचल्याचं आठवत नाही. वाचलं असेल पण लक्षात राहिलं नाही कदाचित. आता वाचतो. Happy

>>लोक तुम्ही काय लिहिले हे तितकं लक्षात ठेवत नसतात, तुम्ही त्यांच्याशी कसं वागलात हीच 'last seen memory' असते>>
हे अगदीच खरं नाही. थोडंफार खरं असू शकेल. पण असं होऊ नये याचा पूर्ण प्रयत्न करतो. शक्यतो भूतकाळाचं ओझं... ते मनात असतंच, नाकारा कशाला! ... पण ते ओझं तात्पुरतं पुसुन वर्तमानकाळात राहुन त्याक्षणी काय वाटतं ते लिहितो. प्रतिक्रिया लेखाला लिहितो. पण हल्लीचे अनेक लेखक त्या स्वतःला लावुन घेतात. एकदा कोणी इम्म्च्युअर आहे हे समजलं की मात्र फोमो येत नाही तोवर तरी त्याच्या लेखांवर शक्यतो जात नाही. अर्थात वाचतो सगळं... त्याअर्थाने लास्ट सीन मेमरी भाग खरा आहे. पण ते तसं करणे माझ्या सॅनिटीला आवश्यक असतं.

सुदैवाने असे फार कमी लोक आहेत. पण आहेत. Proud आता स्मायली दिली... स्मायली दिली की स्वातीच्या वाक्याचा कॉन्वर्स खरा आहे का अशी कायम शंका येणारे! Lol
कशाला अडकवायचं स्वतःला भाग छान आहे. काहीही न लिहिता/ क्वचित अगदी उत्तम जरी लिहिलं... (असं क्वचित उत्तम फार विरळे असतात) विरुद्ध . अन-फिल्टर्ड मध्ये दुसरं कधीही उत्तम.
शेवटचा नार्सिसिस्ट पॅरा पण आवडला. मला लेख वाचताना 'मी पण' वाटलाच लेखात पण हु केअर्स! पर्फेक्ट! लिहित रहा.

अन् फिल्टर्ड लिहायचं स्वप्न आहे पण तेवढी बॅन्डविड्थ तर नसतेच आणि व्यवसाय नसल्याने ती तगमग एकदमच व्यर्थ वाटते किंवा चक्क मूर्खपणा वाटतो. मी तासनतास घालवून मूर्खासारखंही लिहिले आहे पुष्कळदा, आता कुठं ते सांगत नाही. हेही लेखन पाच दिवसांनी त्याच खणात जाईल कदाचित. सहसा पर्सनल लिहीत नाही आणि लिहिले की हमखास पस्तावते आणि वरचं पर्सनल आहे. काय माहीत नार्सिसिस्टच असायचे आणि वहावतच जायचे. लेखन एकदम स्लिपरी स्लोप आहे.

गोग्गोड बोलणार नाही आता पराग Lol
'सत्यं ब्रुयात- प्रियं ब्रुयात' होतं का बघत होते.

खरं आहे. पर्सनल बाबतीत आपण जे-झी नाही. काहीही शेअर करताना किती कुठे नकोच... हेच आधी डोक्यात येते. माबोकर अ‍ॅज अ ग्रूप पण जेन -झी नाही.

वा ! अगदी सुंदर मनोगत !

मायबोलीवरील लेखनासाठी लेखक नसलं तरी चालतं पण प्रतिसादांना उत्तरं देण्यासाठी वकील व्हावं लागतं.
Happy +११११११११....... !!!!

नरहर कुरुंदकर माझ्या आजोबांचे स्नेही व घरी नियमित येणंजाणं असणारे होते. >>> इंटरेस्टिंग आहे हे. कुठे तरी हा प्रभाव जाणवतो इथे व्यक्त होतांना.

तेव्हा मला वाटायचं जो उठतोय तो लिहितोय. लेखक जास्त वाचक कमी झाले आहेत, त्यात मी कुठं लिहू >> इथे अगदी अगदी असं झालं.

लेखनाला विषयाबद्दलची आस्था लागते, >> पुन्हा एकदा !!

माझ्यापेक्षा चांगले लेखन कौशल्य, दांडगा अभ्यास व आपापल्या क्षेत्रात यशस्वी असलेली लोक इथे आहेत आणि माझं 'तीसमारखां' सारखं झालं आहे. >>> हे खूपच भावलं.

सगळंच कॉपी पेस्ट करावं लागेल.
आचार्य अत्रें च्या मनोगतात लेखकांनी काय केलं पाहीजे याचे मार्मिक विवेचन आहे. खांडेकरांनी लेखकाची निरीक्षणशक्ती, त्याचे आकलन इत्यादींवर उतारेच्या उतारे दिलेले आहेत. ते करत असतानाच सुखाचा शोध कसा घ्यावा हे ही सांगितलेले आहे.

या मनोगतातून स्वतःचा शोध कसा घ्यावा हे छान उलगडले आहे.
तुझा इथला वावर एका मोठ्या घरातली सर्वांची लाडकी बहीण/ वहिनी / काकी / मामी/मावशी असते तसा आहे. ती सर्वांना सांभाळून घेते, सर्वांचे स्वभाव ओळखून असते त्याच वेळी स्वतःचा हट्टही चालवते. Lol
तिला खेड्यात माऊली म्हटले जाते. आले गेलेले सुद्धा तिच्याजवळच घरातल्या कर्त्या पुरूषाकडे रदबदलीसाठी अर्ज करत असतात. असा वावर असलेली व्यक्ती कुठेही गेली तरी यशस्वी होणार यात शंकाच नाही. मायबोली कशी अपवाद असेल ?
अशा व्यक्तींनी जर लिहिते झाले तर मग त्यातून बहीणाबाई, शांता शेळके , इंदिरा संतांसारख्या कवयित्री / लेखिका उदयाला येतात.
काही दिवसांनी न जाणो मायबोलीकर अभिमानाने सांगतील.
आम्ही पण लेखिका अस्मिता बरोबर मायबोलीवर होतो. आता मोठी झालीय पण त्या वेळी आमची सख्खी मैत्रीण होती.

आवडलेलं आहे अस्मे. अशी बरीच कारणं आहेत ज्यामुळे मी मायबोलीच्या प्रेमात आहे. तू त्यातलं एक आहेस.+१११
आणि तू मला खास soft corner देतेस तेही आवडतं, कुण्या प्रेमाच्या बहिणीने लाड केल्यासारखं!

मला आता दोनच स्माइली दिसल्या आणि मग वाटले की स्वातीला त्या दोन इमोजी सुद्धा जास्त वाटल्या का काय Happy पण नंतर लक्षात आले की ही ऑलरेडी इमोजी-सेन्सॉर्ड व्हर्जन आहे.

आवडले मनोगत. तुझे लेखन जनरली आवडतेच. सध्या इतकेच. तुझ्या माबो जीवनगौरवाचे भाषण करायला अजून बराच वेळ आहे.

किंबहुना छान वागल्यामुळे लेखनावर छान अभिप्राय मिळाले तर मला ते काहीसं अपमानास्पदच वाटेल. >>> टोटली. अगदी अपमानास्पद नाही पण त्या प्रतिक्रिया लेखाच्या मेरिट वर नसतील तर त्या जेन्युईन वाटत नाहीत.

मलाही वाटते की तू चित्रपट्विषयक लेखनाचा ज्याला तू सुपरफिशिअल म्हटले आहेस, नाद सोडावा आणि अन्य लेखनावरती भर द्यावास >> खामोष! Happy

फारच छान लिहिलंय.

नरहर कुरुंदकर माझ्या आजोबांचे स्नेही व घरी नियमित येणंजाणं असणारे होते. >>> खोटं वाटेल पण कालच त्यांचे आणि त्यांच्यावरचे लेख असलेले एक पुस्तक वाचत होतो. नांदेड बद्दलचे उल्लेख होते आणि किल्ली आणि तुझी आठवण आलेली. कुरुंदकरांबद्दलच्या बाबा-आजोबांकडनं ऐकलेल्या आठवणी वाचायला आवडतील.

खरेतर र आ म्हणताहेत तसे सगळंच कॉपी पेस्ट करावं लागेल. पण 'Like a Samurai with a sword in his one hand and meditating with the other' हे खूपच आवडले आहे.

तुझे वैचारिक लिखाण वाचायला आवडेल.

आवडलं.

कुणाला पटवत बसण्याची असोशी न वाटणे, आधीच्या लेखनाचं बॅगेज न ठेवता लिहिणे, स्वत:च्याच लेखावर चर्चा करण्याचा पाच दिवसांत कंटाळा येणे - हे तर फारच आवडलं, पटलं.

परागने लिहिलंय तसं - चित्रपटविषयक सोडलं तर तुझं इतर लेखन विशेष वाचलेलं नाही.

आणि फा म्हणतो तसं - तुझं चित्रपटविषयक लेखन सुरू ठेव. ते सुपरफिशियल नाही!

मलाही माझे आत्मचरित्र "रखडण्यामागचे रखडणे सदोदित" अशा शीर्षखाखाली देण्याचा मोह होतोय.

अस्मिता, तुम्ही मायबोलीवर जे लिहीले आहे ते जवळपास सगळंच आवडले आहे. चित्रपटविषयक लेखन तर खास आहे. कितीवेळा तरी त्यासाठी काही पडेल चित्रपट (जसे की मुझसे दोस्ती करोगे) परत पाहिले आहेत.
हे मनोगत सुद्धा आवडलेच.
माबोवर प्रतिसादांना उत्तर देण्यासाठी वकील व्हावे लागते. +११

उत्तम मनोगत.
आवडलं.
शब्दातून व्यक्त होता येणे ही फार मोठी दैवी देणगीच आहे.
अन्यथा संवेदनशील व्यक्तीची किती घुसमट होईल.

अस्मिता...खूप सुंदर, मनातले लिहीले आहेस.
विशेषतः तुझ्या आई बद्दल.. किती सुरेख भावना आहेत तुझ्या!

मला तुझ्या आई सारखं व्हायला आवडेल..म्हणजे माझी मुलगी तू जसं तुझ्या आईवर करतेस तसं, माझ्यावर प्रेम करेल, माझा उल्लेख करेल पुढे कधीतरी...!!

Happy लिहीत रहा गं. सिनेमावरही लिही. खूप सुंदर लिहीतेस तू सिनेमावर. शेवटी आनंद वाटणं महत्वाचं.....!
आणि अशीच राहा.. पारदर्शक, हुशार, रेसिप्रोकल...... !!

छान लिहिलं आहेस अस्मिता. खोटा नम्रपणा असण्यापेक्षा असा अन्अपोलोजेटिक मी-पणा चांगलाच Happy
कुरुंदकरांबद्दलच्या, तुझ्या आजोबांनी सांगितलेल्या काही आठवणी असतील तर वाचायला आवडतील. अत्यंत सुस्पष्ट, वाचणाऱ्याच्या मेंदूतला केरकचरा काढून त्याचीही विचारप्रक्रिया स्वच्छ करणारं लेखन कुरुंदकर सोडून दुसरं कुणाचं मी वाचलेलं नाही.

छान लिहिले आहे . मायबोलीवर धागाकरत्याचे नाव बघून लेख वाचला जातो अशांपैकी तुम्ही एक आहात . तुमचे अजून वेगवेगळ्या विषयांवरील लेख वाचायला आवडतील.

तू लिहितोस ते आवडतेच. अपवाद आध्यात्मिक लिखाणाचा कारण मला त्यात गती नाही. म्हणालीस खरे कि तू एक्सट्रोव्हर्ट आहेस पण विश्वास ठेवायला कठीण जातेय मला. तुझे लिखाण मला 'आपला आपणाशी संवादु' कॅटेगरीतील वाटते. तुझ्या वैचारिक श्रीमंत घराबद्दल वाचून आनंद वाटला.

चित्रपट लिखाण सोडू नकोस मात्र.... किती निखळ आनंद त्यातून इतरांना देतेस तू. एका डिप्रेसिंग काळात मी मायबोलीवर येणे सोडले होते. एक दिवस अचानक तुझा 'मुझसे दोस्ती करोगे' वरचा लेख वाचला आणि खळखळून हसले. त्यानंतर गोष्टीही हळू हळू नॉर्मल होत गेल्या.

तेव्हा अस्मिताबाई मनात येईल त्या विषयावर लिहित रहा.

छान लिहिलं आहे. मनात जे आहे ते सर्व शब्दात व्यक्त करता येणं ही फार मोठी देणगी आहे. मला हेवा वाटतो.

अस्मिता तुमचे लेखन आवडते. विशेषतः मायबोली गणेशोत्सव मधल्या रघूची कथा आठवली की अजूनही हसायला येते...

तुझे लेखन तर जबरदस्तच असते. जसे ती कॄष्णाची कथा. फार आवडलेली. पण प्रतिसादही मस्त असतात. स्पेशली टिकात्मक जेव्हा तू ठासून तुझा स्टँड मांडतेस Happy असं क्लिअर थिंकिंग जमायला हवे.
>>>>>खामोष! Happy
ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यपर गदा है मिलार्ड Happy

Pages

Back to top