खरडण्यामागचे खरडणे कदाचित...

Submitted by अस्मिता. on 29 February, 2024 - 11:44

धन्यवाद कुमार सर. तुमच्यामुळे लिहिले गेले आहे.‌ Happy
https://www.maayboli.com/node/84711
मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा -२०२४
----------------

शाळेत असल्यापासून लिहायचे. जवळजवळ प्रत्येक निबंध स्पर्धेत पहिला नंबर यायचा. चित्रकला, संस्कृत, हिंदी, वक्तृत्व, गणित, रामायण, अभिवाचन, विज्ञान, रांगोळी, कलाकृती बनवणं सगळ्याच स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे, बहुतेकवेळा नंबरही यायचा आणि सगळ्यातच रूची होती. पण लेखनात जास्त मुक्त वाटायचं. एक्स्ट्रोव्हर्ट मुलगी होते मी शाळा कॉलेजमध्ये.

एकदा आंतरशालेय निबंध स्पर्धेत भाग घेतला होता, तेव्हा पपांनी मार्गदर्शन केले होते. त्यांच्यामुळे मी एक्स्प्रेसिव्ह आहे, नाहीतर नांदेडसारख्या लहान शहरात नव्वदीच्या दशकात मुलींची तोंड दाबण्याला 'वळण लावणं' समजायचे. पर्यायाने मला आजूबाजूला उद्धट समजण्यात यायचं.‌

नरहर कुरुंदकर माझ्या आजोबांचे स्नेही व घरी नियमित येणंजाणं असणारे होते. माझ्या जन्माआधीच ते गेले पण माझे आजोबा आणि वडील फार वेगळे आहेत. आमच्या घरी फार चांगल्या माणसांचं येणंजाणं होतं आणि श्रीमंत नाही पण तिथल्या इतरांपेक्षा चांगल्या- उच्च वैचारिक वातावरणात मला रहायला मिळाले आहे. वाड्यातल्या भिंतीतली कपाटं पुस्तकांनी भरलेली असायची आणि विषयांचे बंधन नव्हते. ज्योतिषापासून पॅपिलॉनपर्यंत, प्लूटोच्या माहिती पासून 'साद देती हिमशिखरे'पर्यंत, आईच्या दासबोध ते रूचीरापर्यंत सगळं मी आठवीनववीपर्यंत वाचून झालं होतं.

आईचं मराठी भाषेवर फार प्रेम आणि शब्दसंग्रह अफाट. फारच शांत, अतिशय अदबशीर, माणसं जोडणारी आणि संयमी होती. तिची शांतवणारी एनर्जी उतरते माझ्या आध्यात्मिक लेखनात. 'स्प्लिट पर्सनॅलिटी' सारखे अनेक कप्पे आहेत मेंदूत, योग्य त्या कप्प्यातून काढून त्या-त्या वेळी ते वापरता येणं आणि तरीही या सगळ्यापासून सुद्धा कुठंतरी अलिप्त रहाता येणं ही निसर्गाची कृपा. 'Like a Samurai with a sword in his one hand and meditating with the other' ह्या वचनाचा आदर्श घेतला आहे.

माणसं जोडणं सुद्धा तिचंच. वरवर साध्या दिसणाऱ्या गोष्टींवर प्रचंड मार्मिक भाष्य करायची. सगळ्याच मराठी कविता तिला पाठ असायच्या. आम्ही त्यावर गप्पाही मारायचो.

माझ्यात लहानपणापासून एक विचित्र -अफाट एनर्जी आहे, तिला वाट करून दिली नाही तर ती मलाच जाळून टाकेल हे लक्षात आल्याने आईने मला बऱ्याच गोष्टींमधे गुंतवून टाकले होते. एकदा 'जळो तुझा पिंजरा मेला, त्याचे नाव नको मला राहीन मी घरट्याविना चिमणी गेली उडून राना' ह्या कवितेतल्या ओळींवर गप्पा मारताना 'तू अशीच आहेस, तू अगदी त्या चिमणीसारखी आहेस. तू पिंजऱ्यात राहूच शकत नाहीस आणि म्हणून मला तुझी सारखी काळजी वाटते' म्हणाली होती. असं चालत नाही नं पोरीच्या "जातीला"...... 'त्या' पिंजऱ्याला धडका द्यायच्यात लिहूनलिहून. 'लेकीच्या माहेरा माय सासरी नांदते' हेही तिनंच एकदा बोलतबोलत समजावलं होतं. लग्न होईपर्यंत समजलं नव्हतं.

खरंतर ज्या गोष्टींचा अभिमान वाटायला हवा, त्या गोष्टींची लाज वाटायला पाहिजे असे आजुबाजूचे सामाजिक संस्कार व मानसिकता असल्याने व्यक्ती म्हणून मला अजूनही या दोन्ही कवितांच्या अभिव्यक्तींचा 'सुवर्णमध्य' साधता आलेला नाही.

आजोळ डोक्यावर पदर/ धारदार पितृसत्ताक व 'एक गाव बारा भानगडी' टाईप खेडं आणि घरात शंभर चतुर माणसं. तिथे सरळ बोलतच नाही कुणी. मग आपण अजूनच हजरजबाबी व्हावं लागतं. गंमत म्हणून मामाच्या किराणा आणि शेतीच्या अवजाराच्या दुकानातही बसलेली आहे मी. जगातील सगळ्यात बोअर दुकान असते ते. हे असं विचित्र कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे मी कुणाशीही 'फ्रिक्वेंसी मॅच' करून लिहू शकते.‌

'पर्यावरणाचा ऱ्हास' हा एकदा निबंधाचा विषय होता. वाड्यातल्या एका ताईने शेवटी लिहायला दोन ओळी सुचवल्या, ज्या मला अजूनही आठवतात.

हिरवे शिवार सारे पिवळे पडून गेले
आकाश पेलणारे पक्षी उडून गेले

या ओळी मला इतक्या आवडल्या की मी त्यांना बऱ्याच ठिकाणी लिहिले व बक्षीस मिळविले.‌ कुणाला ही कविता माहिती असेल तर सांगा.‌

इलेक्ट्रॉनिक आणि तेही फक्त मायबोली, मैत्रीण आणि ब्लॉग. ब्लॉगसाठी म्हणून आवर्जून लिहिले नाही, माबोसाठीच लिहिते. मग एकत्र रहावं म्हणून ब्लॉगवर टाकते.

सगळ्याच प्रकारचं लेखन करते. जे कुणीही केले नाही ते मला माबोवर करायचे होते. त्यामुळे मी शंकराचार्यांपासून गोविंदापर्यंत कुणालाच सोडलं नाही. इथं पैसे मिळत नाहीत/द्यावेही लागत नाहीत आणि नोबेल किंवा पुलित्झरही मिळत नाहीत. मग कशाला अडकवायचे स्वतःला. कधीकधी वाटतं मी कविताच कशी केली नाही अजून. ही धमकी असेल/ नसेल ते काळच ठरवेल. लेखनामुळे नाही तर माणसं जोडण्याच्या हातोटीमुळे माझे लेखन काही लोकांना आवडते. लोक तुम्ही काय लिहिले हे तितकं लक्षात ठेवत नसतात, तुम्ही त्यांच्याशी कसं वागलात हीच 'last seen memory' असते. मी इतरांच्या फक्त चांगल्या स्मृतींमधे रहायचा प्रयत्न करते.

माझ्या मैत्रिणीने मला प्रोत्साहन दिले होते. तेव्हा मला वाटायचं जो उठतोय तो लिहितोय. लेखक जास्त वाचक कमी झाले आहेत, त्यात मी कुठं लिहू. पण तिने मला म्हटलं 'ते लिहितात, तू काळजात सुरा खुपसतेस' म्हणून तू लिही. माणसं आणि भावभावनांचे कंगोरे बघून प्रेरणा मिळते. आध्यात्मिक लेखनामागे निसर्ग, जवळची तेजस्वी माणसं व माझी जिज्ञासा प्रेरणा आहेत. इतरांना माझा दृष्टिकोन समजवायला लिहावं वाटतं.

मी कुठल्याही लेखनप्रकाराला कमी समजत नाही पण
चित्रपटावरचं लेखन माझं सुपरफिशियल व्हर्जन आहे, कारण ते फक्त निरीक्षणाधारीत आहे. वैचारिक लेखन मात्र दृष्टिकोनाने आविष्कृत आहे. मी किती खोल विचार करू शकते, हे मला लिहायला लागल्यावर कळलं. आधी वाटायचं सगळेच करतात. मला माझ्या खोल विचारांतून सहज बाहेर पडता येते पण वाचकांचा गुंता होतो. त्यांना चक्रव्यूहात अडकून स्वतः लीलया बाहेर येऊन त्यांची फजिती बघायला मला मजा येते.

लेखनाला विषयाबद्दलची आस्था लागते, त्यामुळे ते कुणाला पोचलं की खूप आनंद होतो. कौतुकापेक्षा 'पोचलेले' प्रतिसाद भावतात. मायबोलीवरील लेखनासाठी लेखक नसलं तरी चालतं पण प्रतिसादांना उत्तरं देण्यासाठी वकील व्हावं लागतं. आजोळच्या आनुवंशिकतेमुळे ते मी मध्यरात्री सुद्धा करू शकते. लिहिताना मला माझे विचार अर्जुनाला माश्याचा डोळा दिसला तितके स्पष्ट दिसतात. त्यामुळे कुणाला पटवत बसवण्याची असोशीच वाटत नाही.

माझे इथले सगळे अनुभव अगदी अपवादात्मकरित्या चांगले आहेत. मला माबोकरांचं फक्त प्रोत्साहन, कौतुक आणि आपलेपणाच वाट्याला आला आहे. माझ्याही नकळतपणे आणि फक्त ऑथेंटिक राहून मी इथली अदृष्य सोशल लॅडरही भराभर चढली आहे. इतकं सहज-सरळ होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.

अगदी पहिल्या लेखापासून... जेव्हा मी नवखी होते तेव्हापासून प्रतिक्रियांची संख्या सुद्धा भरपूर. बरेचदा वाटतं मी एवढं प्रेम 'डिझर्व' करत नाही. माझ्यापेक्षा चांगले लेखन कौशल्य, दांडगा अभ्यास व आपापल्या क्षेत्रात यशस्वी असलेली लोक इथे आहेत आणि माझं 'तीसमारखां' सारखं झालं आहे.
तीसमारखां keeps me grounded .

त्यामुळे मी प्रत्येक नवीन लेख/ प्रतिसाद कुठल्याही विषयाचं किंवा आधीच्या लेखाच्या कौतुकाचं/टिकेचं बॅगेज न ठेवता अगदी पहिलं लेखन असल्यासारखं लिहीत असते. मोबदला मिळत असो/नसो स्वलेखनाच्या प्रेमात अडकणं कल्पकतेसाठी (आणि अहंकारासाठी सुद्धा) अतिशय घातक ट्रेंड आहे. काहीही चिरकाल टिकणारे नाही, जे एकदोन क्षण मिळतात त्यात उत्तम करायची धडपड आहे . त्यामुळे त्याच्यात सुद्धा अडकायचे नाही आणि मला कायम नवीन विषयही खुणावत असतात. मला स्वतःला माझ्याच लेखावर चर्चा करायचा सुद्धा पाच दिवसांत कंटाळा येतो आणि मी 'नमस्कार' करून धूम ठोकते, 'कोपिंग मेकॅनिजम' नॉर्मल नाही. चांगल्या/ वाईट कुठल्याच भावनांमधे रमता येत नाही.

मी स्वतःला लेखिका समजत नाही कारण कुठेतरी 'पुस्तके लिहिणारी हीच लेखिका' असं समीकरण आहे पण मला निसर्गाने व्यक्त व्हायची ताकद दिली आहे आणि त्यातून मलाही आनंद मिळतो म्हणून हे जे चाललं आहे ते चाललं आहे. आताही कुमार सरांच्या धाग्यावर हेच लेखन असेच्या असेच डकवले तर मी वाचकांना कमी 'नार्सिस्टिक' वाटेल आणि स्वतंत्रपणे लिहिले तर जास्त, हे लक्षात आलं होतं पण who cares ..!

धन्यवाद Happy
-तुमचीच अस्मिता.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनोगत आवडलं. तुमचं अध्यात्मिक सोडून इतर लिखाण वाचलं आहे.
मी हे याआधीही लिहिलं आहे. की तुमच्या लिखाणात (इथे नवा धागा काढून लिहिणे, एवढेच नाही, तर प्रतिसादातही) क्लॅरिटी - स्वतःला जे वाटतंय ते नेमकं शब्दांत उतरवता येणं आणि कॉन्फिडन्स (हे तेव्हा लिहिलं नसावं - आपल्याला जे वाटतं ते हातचं न राखून, आडपडदा न ठेवता , नेमकं म्हणायचा आत्मविश्वास ) येताना मी पाहिला आहे.
माझ्या विपुत तुम्ही लिहिलेला ऑक्टोबर २०२० चा एक परिच्छेद आहे. तो मला अजूनही क्रिप्टिक, अस्पष्ट वाटतो. आता तोच मुद्दा तुम्ही चांगला खणखणीत पणे मांडू शकाल.
मला जे स्पष्टपणे मांडता आलं नाही वा मांडू धजलो नाही, ते तुम्ही काही तासांतच तिथे खणखणीत शब्दांत लिहिलेलं वाचायला मिळावं असं तीनचार वेळा तरी झालं आहे.

मनोगत आवडलं. वरच्या जवळपास सगळ्याच प्रतिक्रियांना मम म्हणावेसे वाटते. मनस्वी मुशाफिरी अशीच चालू राहू दे अशी शुभेच्छा!

'मी-मी' सहन केल्याबद्दल धन्यवाद. यातील बऱ्याच गोष्टी आता गतजन्मातल्या वाटायला लागल्या आहेत. ते माणसं नाहीत, तो वाडा नाही, भारतात जाणं होत नाही आणि मीही ती नाहीच. नॉस्टॅल्जिया मला झेपत नाही. वास्तव इतकं वेगळं आहे की जुन्या स्वतःशीच 'रिलेट' होता येत नाही.

'तीसमारखां'चा लोभ असू द्या, म्हणजे मी चुका करायला मोकळी. Happy

सिनेमावरच्या लेखनात काहीच कष्ट नाहीत, नुसती मजा आहे. त्यामुळे ते सुपरफिशियल वाटतं. आत्मपॅम्फ्लेटचा संंदर्भ -शाळा नाही, शिक्षक नाही, गृहपाठ नाही. फक्त गॅदरिंग आणि वर मधल्या सुट्टीत पेरू खायचा. हे बेकायदेशीर वाटत रहातं Lol

ऋ, माहिती आहे मला. तुझं 'गोलमालास्त्र' माझ्यावर कधीही पडत नाही आणि तू मला नेहमी 'जा सिमरन जा' केलेलं आहेस. ते मला आवडलेले आहे. Happy

आचार्य, तेवढी माझी पात्रता नाही. माझ्या आयुष्यातल्या सगळ्या शक्यता धुसर होत जात आहेत, तेवढी मोठी स्वप्नं सुद्धा बघत नाही मी. पण 'मुंगेरीलाल' टाईप तेवढ्या पुरतं छान वाटलं. Happy

आंबटगोड, भावना पोचल्या. ती सर्वच बाबतीत पुढे पडो.
तिची आणि तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होओत. तुमचं नातं ecstatic होवो. लोक तिच्यामुळे तुला ओळखायला लागोत. शुभेच्छा. Happy

वावे आणि हर्पेन ,
सगळ्या घरगुती आठवणी आहेत. आत्याचं लग्न त्यांनीच जमवलं, स्थळही त्यांनीच आणलं. पुरणपोळी खावी वाटली की 'मीने, करशील का गं पुरणपोळी' म्हणतच घरात यायचे. त्यांच्यामुळे बरीच घरं पुढे पडली. शाळा वाचनालये वगैरे त्यांनी काढली. त्या मिटिंगमधे आजोबा बरोबरीने भाग घ्यायचे, आमच्या माडीवर व्हायच्या बऱ्याचशा मिटिंग्स. त्यांनी मिळून मुलींची वेगळी शाळा काढली. मी त्याच शाळेत होते. दुर्दैवाने मला मात्र सहवास लाभला नाही, लवकर गेले ते.

आत्या नेहमीच भरभरून बोलते त्यांच्याबद्दल. पुण्यामुंबईशी तुलना होऊ शकत नाही पण त्यांच्यामुळे नांदेड सांस्कृतिक गोष्टींत पुढे पडले. आम्हाला थोडातरी वारसा मिळाला, नंतर काही वर्षांत पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' झाले.

भरत, कुठेतरी आपल्या आयुष्याच्या पाऊलखुणा आहेत हे बघून बरं वाटलं. अदृष्य व्हायची वेळ आली होती. घरीदारी सगळीकडे माझी प्रतिमा कणखर, धीराची, स्पष्टवक्ती , दुसऱ्यांना आधार देणारी/ बाजू घेणारी वगैरे आहे. त्यामुळे स्पेसच राहिली नव्हती, शेवटी माणूसपणाच्या मर्यादा आहेतच. व्यक्त होणं फार आवश्यक होतं. लेखनकौशल्य शिकायला वेळ नव्हता, जे दरवाजे उघडले तिथून जावं लागलं. पर्याय नसला की स्पेस शोधण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता. हे खरंतर सगळ्यांना मिळायला हवं पण लोक (इथेही) फारच अवघड करून टाकतात.

सर्व प्रतिक्रिया नीट वाचल्या आहेत. कृतज्ञ. /\

>>> माझ्या विपुत तुम्ही लिहिलेला ऑक्टोबर २०२० चा एक परिच्छेद आहे. तो मला अजूनही क्रिप्टिक, अस्पष्ट वाटतो.
आता आम्ही हे शोधत फिरायचं होय! Proud

अस्मिता,

हेही लिखाण आवडलं.

अश्विनीने लिहिल्याप्रमाणे लेखकाचे नाव बघून जे लेख वाचले जातात त्यात तुम्ही आहातच.

तुमचं बरंचसं लिखाण माझ्या डोक्यावरून जातं. तरीही नेटाने वाचत असतो. कधी ना कधी झेपेल, कळेल अशी आशा आहे….

<<छान वागल्यामुळे लेखनावर छान अभिप्राय मिळाले तर मला ते काहीसं अपमानास्पदच वाटेल.>>
मी वागतो छान, पण मी पण लिहीत असताना फक्त माझ्या डोक्यात काय विचार येतात ते लिहितो.
आजकाल छान किंवा अपमास्पद कसलेहि प्रतिसाद आले तरी मला त्याचे काही नाही! मायबोली माझ्या एकंदर जीवनात, आजकाल, अगदी फारच कमी महत्वाची आहे.
त्यापेक्षा मायबोलीकरांना प्रत्यक्ष भेटून जास्त बरे वाटते.

आमची आजी (आईची आई) फार गोष्टीवेल्हाळ. रात्री तिची कामं संपली कि आजूबाजूच्या वीसेक घरातल्या बाया, म्हातारे कोतारे, मुलं तिला गोष्टी सांगायचा आग्रह करायचे. तसा अस्मितेच्या प्रत्येक धाग्याला वेढा पडतो. आजी माऊली होती, इथे अस्मिता.
आई डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. अशा वर्णनात माणसं डोळ्यासमोर वावरायला लागतात. मग प्रतिसाद द्यावा कि नको असं होतं. पर्सनल स्पेस आहे. पण अशी आई मिळणे जे जडणघडणीत किती महत्वाचं !!
नरहर कुरूंदकरांबद्दल कधी तरी स्वतंत्र लिखाण येईलच म्हणून मुद्दामून आग्रह करत नाही.
आवडेल वाचायला.

वा, मस्तच. आवडलं मनोगत.
तुझं चित्रपटांवरचं लेखन तर आवडतच. बरोबरीने वैचारिक लिखाणही आवडतं (अध्यात्माची कास असलेलं फार कळत नाही पण लिहितेच ते वाचावं जरूर वाटतं) अन एक सच्चेपणा, ठामपणा अन तरीही समोरच्याला न दुखावता लिहितेस हे कौतुकाचं!
तुझ्या आईबद्दल, तुझ्यावर झालेल्या साहित्य संस्कारांबद्दल अप्रुप अन आदर वाटला.
जियो, लिहित रहा, सगळे प्रकार Happy

प्रतिसाद द्यायचा टाळत होते मुद्दाम, कारण लिहिलंयस ते इतकं आत पोहोचलंय की वेगळा प्रतिसाद नकोच वाटला लिहायला!
मी तुझं आध्यात्मिक आणि हलकंफुलकं असं सगळंच वाचते. मूळ पिंड, जडणघडण लपत नाही अगं..
जास्त काही लिहीत नाही. सगळंच लिहून सांगायला हवं असं कुठेय?!

सुंदर मांडले आहे मनोगत.
<मनात जे आहे ते सर्व शब्दात व्यक्त करता येणं ही फार मोठी देणगी आहे.>> सहमत, तुम्ही फार छान व्यक्त होता, नेमक्यां शब्दात.
प्रतिसादही वाचनीय आहेत.

अस्मिता, आत्तापर्यंत तुझ्या लेखनावर प्रतिक्रिया दिली नाही पण ते नेहमीच आवडतं.
मला तुझं काही वाचलं की आरसा बघितल्यासारखा वाटतो. मला लिखाणाची देणगी नाही आणि वाटतं की, मला जे म्हणायचं होतं ते इतक्या अचूकपणे तू कसं मांडलं. आणि मग काही लिहायला शब्दच उरत नाहीत.
हा लेखही मुद्दाम इतके दिवस वाचला नाही कारण आरसा नको होता.
मीही अशीच, लहानपणापासून अजूनही उद्धट समजली गेलेली पण घरादाराला समजून घेऊन आधार देऊन रुळावर ठेवणारी.
स्पेस नाही मिळत पण तुझ्यासारखं लिहून मोकळंपण नाही होता येत. यावर्षीतर हे गुदमरणे खूपच अनुभवते आहे. जेव्हा कोणी समजून घ्यायची अत्यंत आवश्यकता होती तेव्हा 'तू कसं काय समजून घेत नाहीस' म्हणून अनेक उलटले.
त्यामुळे तुझे सगळे लेख वाचले की, माझ्या मनाला शांतता मिळते. अनेक विचार नीट एकत्र येतात, closure मिळते, सैरभर कमी होते. आणि मजा म्हणजे लेखाच्या विषयाशी थेट संबंध असेलच असेही नाही.
सगळ्या विषयांवर लिहीत राहा, चित्रपटासह. कधीकधी इथल्या चित्रपट चर्चा आणि पाळीव प्राणी हाच दिवसातील हसू यायचा वेळ होता.

चिऊताई,
यावर्षीतर हे गुदमरणे खूपच अनुभवते आहे.
>>>
अंतराग्निला विवेक नसतो. त्याला सकारात्मक वाट निर्माण करून दिली नाही तर तो आपल्यालाच जाळतो. इथं 'वाडा' नावाचा 'नॉन जजमेंटल' गप्पांचा धागा आहे, तिथे सगळे एकमेकांना सांभाळून घेतात. तो काढण्यामागे 'सेफ स्पेस' हाच एकमेव हेतू होता. तुला आवडलं तर तिथे येत जा. मन रमेल कदाचित. Happy

उर्वरित प्रतिसादासाठी भापो.
प्रज्ञा, वृषाली आणि माझेमन..... तुम्हालाही भापो.‌

सगळ्या माबोकर मैत्रिणींना ---
व्यक्त व्हा. आणि हे गाणं Happy
घाबरू नका भजन किंवा स्तोत्र नाहीये. Lol

छान मांडल आहे.
आपले लेख नेहमीच आवडतात.
लिहित्या राहा...

मीही अशीच, लहानपणापासून अजूनही उद्धट समजली गेलेली पण घरादाराला समजून घेऊन आधार देऊन रुळावर ठेवणारी.>> मी पण Sad
अनेकांच्या सुप्त भावनांना वाट करुन दिलीस ..

खूप छान लिहिलेस अस्मिता Happy तुझी भाषा, विनोद बुद्धी, प्रेझेंटेशन पद्धत सर्व खूप आवडते. लिखाणात १ प्रांजळपणा असतो. मी-मी पणा नाही. लिहत रहा, आणि आमच्या सारख्या Happy चाहत्यांसाठी लेखन मणी गुंफत रहा Happy

उद्धट मैत्रिणींनो,
We are not rude , we are just hard to manipulate. Happy

------------
कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म भा गौ दि म्हणून साजरा केला जातो पण लेख असा 'जमून' आला आहे की कुसुमाग्रज राहिले तिकडेच नार्सिसिस्टांचे आराध्य श्री ट्रंप महाराजच आठवावेत. Proud

-असाच लोभ ठेवा. धन्यवाद सर्वांना. Happy

अस्मिता, तुझे प्रतिसाद पाहुन तु उद्धट असशील असे वाटत नाही. कोणाला फाडफाड उलट उत्तरे देत असशील असे वाटत नाही.

We are not rude , we are just hard to manipulate.>>> खूप आवडल्यामुळे हे वाक्य ढापलं तर चालेल काय? मीपण जरा स्टेटस ठेवीन.. अगदीच परफेक्ट वेळी मिळालंय.

We are not rude , we are just hard to manipulate.>>> खूप आवडल्यामुळे हे वाक्य ढापलं तर चालेल काय? मीपण जरा स्टेटस ठेवीन.. अगदीच परफेक्ट वेळी मिळालंय.

Pages