भाग ३ - https://www.maayboli.com/node/84694
कर्नल ऑडमिंटन.
एक उंच, धिप्पाड, भारदस्त व्यक्तिमत्व. अगागागा काय त्यांची दाढी.. लांब, भरघोस.. असायचीच! रेझरचं पातं कधी पाहिलेलंच नव्हतं ना तिने !कर्नलचं वय असेल पंचेचाळीस. ते विधुर होते, आणि त्यांना पंधरा वर्षांचा एक मुलगा होता.
आता कान इकडे करा. हे नुसते नामधारी कर्नल होते. मॅलार्ड बदकं मारताना घेतलेला बंदुकीच्या पावडरचा वास आणि चार्ल्सटन शहरात रस्त्यावरून शांतपणे मिरवणुकीने जाताना पाहिलेली सैनिकांची रेजिमेंट हेच काय ते त्यांचे युद्धविषयक अनुभव! त्यांचं मूळचं ब्रिटिश घराणं साऊथ कॅरोलायना राज्याच्या किनाऱ्यालगत एका बेटावर स्थायिक होऊन तिथे सी आयलंड कॉटन जातीचा, उत्तम प्रतीचा कापूस पिकवत होतं. कापूस इतका तलम, की रेशमी वस्त्रांत बेमालूम भेसळ करण्यासाठी त्याला बेकायदेशीररीत्या मोठी मागणी येऊ लागली. तो गुप्तपणे कुठेतरी पाठवून छुप्या रीतीने विकला जाऊ लागला.
तर आपले कर्नल.. असेनात का नामधारी..आपण कर्नलच म्हणू त्यांना... आठवतं तिथपासून ते बेटावरच्या चोरट्या गुप्त वातावरणात वाढले होते. बेटाबाहेरचं जग त्यांना ठाऊकच नव्हतं म्हणा ना. १८६१ साली त्यांचे वडील वारले, आणि सर्व जबाबदारी कर्नलच्या हातात आली. जमीन, गुलाम, आणि परंपरागत व्यवसाय, सगळं आता त्यांच्या मालकीचं झालं. त्यापैकी दोनशे एकर जमीन कापसाच्या लागवडीखाली होती, आणि उरलेला थोडासा भाग दलदलीचा होता.
मालमत्ता हातात आल्यावर कर्नलनी आपला व्यवसाय वाढवला. त्याबरोबरच, त्यांच्या दोन आवडत्या छंदांनी दिवसरात्र त्यांना पछाडून टाकलं. त्यांच्या वडिलांप्रमाणेच त्यांचा पहिला छंद होता, श्रीमंत होणे! चार्ल्सटनमधल्या सर्वात श्रीमंत माणसाइतकं नव्हे, तर त्या शहरातल्या सर्व श्रीमंतांची एकत्रित मालमत्ता भरेल, इतकं श्रीमंत. पण एकेकाळी भरपूर नफा मिळवून देणाऱ्या कापसाची किंमत आता ओसरत चालली होती. कर्नलचं समाधान होत नव्हतं.
कर्नलचा दुसरा प्रिय छंद होता, शिडाच्या वेगवान होड्या. वयाच्या अठराव्या वर्षी वडिलांनी त्यांना एक शिडाची होडी दिली होती, आणि मन मानेल तिकडे जायची परवानगी! फक्त मुख्य किनाऱ्यालगत जायचं नाही, इतकंच बंधन होतं. त्याप्रमाणे कर्नल आपल्या कृष्णवर्णी गुलामांसहित मुख्य किनारपट्टी सोडून इतरत्र मुक्त संचार करत असत. आसपासच्या शंभर मैलांच्या परिसरातल्या प्रत्येक खाडी नाल्यात त्यांची होडी जाऊन आली होती. त्या भागातले ते सर्वोत्कृष्ठ खलाशी होते, पण ते कोणालाच ठाऊक नव्हतं, कारण ते कोणाच्याच नजरेला पडले नव्हते. युद्धकाळात ते जणू आपल्या बेटावर स्थानबद्ध झाले होते. युद्धकाळात होड्यांना किनाऱ्यालगत येण्यास असलेली बंदी शिताफीने मोडून, ब्रिटनला परत जाणाऱ्या ब्रिटिश जहाजांवर चपळाईने आपला कापूस चढवण्याइतकं कौशल्य कर्नलकडे नक्कीच होतं. पकडलं गेल्यास होडी उडवली गेली असती, पण या धोक्याच्या कामात कर्नल कधीच पकडले गेले नाहीत. उलट अशा अनुभवांतून त्यांचं धैर्य आणि आत्मविश्वास वाढीला लागला.
कर्नलच्या बेटावरच्या दलदलीला टेकून एक खाडी होती. अगदी दोन मोठी जहाजं नांगरून ठेवता येतील, इतकी प्रशस्त. तिथे कर्नलनी एक कॅम्पहाऊस बांधलं होतं. बाहेर खुल्या समुद्रावरून यातलं काहीच दिसत नसे. वारा अनुकूल असला, भरती असली, तर छोट्या छोट्या फाट्यांमधून जाऊन त्या खाडीत शिरता येई. आणि कॅम्पहाऊस म्हणाल, तर खाडीतून, दलदलीतून शिरून, अस्ताव्यस्त वाढलेल्या जंगलातून वाट काढूनच तिथे जावं लागायचं. ही वाट फार थोड्या लोकांना ठाऊक होती.
तर असे हे कर्नल. त्यांच्या नव्याकोऱ्या स्कूनर होडीला एकदा दुसऱ्या एका होडीने मागे टाकलं. ही आहे तरी कोणती होडी ते पाहावं, म्हणून कर्नल पाठलाग करत मुख्य बंदरापर्यंत गेले. हेरेशॉफ मॉडेलची होडी होती ती. आपल्या अत्यंत वेगवान स्कूनरला तिने हरवलेलं पाहून कर्नलना फार दुःख झालं. त्यांना आपल्या स्कूनरचा अभिमान होता. बाल्टिमोरपासून थेट सेंट जॉन नदीपर्यंत त्यांना वेगाने घेऊन जाणाऱ्या त्यांच्या स्कूनरला आजपर्यंत कोणत्याही होडीने हरवलं नव्हतं.
या धक्क्याने कर्नलची अवस्था भ्रमिष्टासारखी झाली. आयुष्यात प्रथमच, जवळजवळ महिनाभर ते बेट सोडून बंदरावरच्या चार्ल्सटन हॉटेलमध्ये राहिले. विमनस्क स्थितीत सतत येरझारे घालताना पाहून तिथल्या लोकांनी त्यांना "चक्रम" म्हणायला सुरुवात केली. शेवटी महिन्याभराने एकदाचे ते या अवस्थेतून बाहेर आले, आणि त्यांनी मनाशी ठरवलं, "माझ्याजवळचे सगळे पैसे संपले तरी हरकत नाही, मी जगातली सर्वात वेगवान होडी बांधणार. मग मला कधीच कोणी हरवू शकणार नाही." यानंतर बरंच काही घडलं. थोडक्यात सांगायचं तर कर्नलनी तो दलदलीचा प्रदेश, कॅम्पहाऊस आणि दोन जहाजांचा धक्का वगळता उरलेली सर्व मालमत्ता विकून टाकली, आणि त्यातून मिळालेले दीड लाख डॉलर्स घेऊन ते होडीसहित बेटावरून निघून गेले. तसे ते नेहमीच होडीवरून सफरी करत असल्याने, त्यांची गैरहजेरी कोणालाच जाणवली नाही.
कुठे गेले होते कर्नल? चला त्यांच्या मागोमाग जाऊन पाहू.
प्रथम ते वॉशिंग्टन शहरात गेले. सोबत त्यांचा मुलगा आणि दोन नोकर होते. काही आठवडे तिथे राहून शहर पाहिल्यानंतर त्यांनी होडी तिथेच सोडली, आणि रेल्वेने ते न्यू यॉर्कला गेले. धडाडीच्या कल्पना घेऊन न्यू यॉर्कमध्ये पाय ठेवणाऱ्यांची एक तर आदराने पूजा होते, किंवा पार दुर्दशा होते. कर्नलनी आपल्या मुलासहित एका साध्याशा खोलीत बस्तान मांडलं. तिथे त्यांना भेटला हॅन्स ख्रिश्चन. सध्या बेकार असलेल्या या स्वीडिश खलाशाशी कर्नलची लगेच चांगली ओळख झाली, आणि आठवड्याभरात महिन्याला सव्वाशे डॉलर्स पगारावर त्यांनी त्याला नोकरीवर ठेवलंदेखील. त्यांची अट होती, कुठेही काही बोलायचं नाही, फक्त कर्नलची आज्ञा पाळायची.
एक नोव्हेंबर. दर्यावर्दी जगतात एक बातमी झळकली..
"सुप्रसिद्ध हेरेशॉफ कंपनी, ताशी ३५ नॉट्सच्या प्रचंड वेगाने जाऊ शकणारं दीडशे फूट लांबीचं एक पोलादी जहाज बांधत आहे. ते शक्य तितकं वेगवान करण्यासाठी कंपनीला पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. ताशी ३५ नॉट्सच्या पुढे प्रत्येक अर्ध्या नॉटच्या क्षमतेसाठी ५०० डॉलर्स देण्याचा करार असल्याची अफवा ऐकिवात आहे. यासाठी नव्या प्रकारची, पूर्वी कधीच वापरली न गेलेली इंजिनं वापरण्यात येणार आहेत. ठरल्या क्षमतेचं जहाज बांधून कार्यरत झाल्यानंतर ते आम जनतेला दिसेल, त्याअगोदर तशी परवानगी नाही. हे जहाज जगात एकमेवाद्वितीय ठरेल यात शंका नाही. या जहाजाचा मालक कोण, हे गुप्त राखण्यात आलं आहे. कदाचित स्वीडिश सरकारसाठी टॉर्पेडो वाहून नेणारं जहाज म्हणून हे बांधलं जात असावं, असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे. "
तो संपूर्ण हिवाळा कर्नलनी आपल्या मुलासोबत प्रवासात घालवला. अगदी पार मे महिन्यापर्यंत. त्यांचा मुलगा पाण्यातल्याप्रमाणे जमिनीवरच्या प्रवासातही तरबेज झाला. हॅन्स ख्रिश्चनप्रमाणेच त्या दोन गोष्टी तो आनंदाने करू लागला.. गुप्तता पाळणे, आणि वडिलांची आज्ञा पाळणे. अगदी आपल्या वयापेक्षा जास्त समजुतीने तो हे करत असे. प्रवासात एकट्याने स्वतःची नीट काळजी घ्यायलाही तो शिकला.
त्या जहाजाविषयी हिवाळ्यात फारसं काही छापून आलं नव्हतं. मे महिन्यात मात्र त्याच्या कौतुकाने रकानेच्या रकाने भरून निघाले.
"काल या अद्भुत पण निनावी जहाजाने प्रथम चाचणीमध्ये अनुकूल हवामानात ताशी साडेपस्तीस नॉट्सच्या वेगाने १२५ मिनिटं प्रवास करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकलं. हेरेशॉफ कंपनीच्या इतिहासातली ही पहिलीच इतकी यशस्वी चाचणी आहे. त्यांच्या नव्या इंजिनांच्या यशाची ही पावती होय. काही किरकोळ बदल करून झाल्यानंतर जगातलं हे सर्वात वेगवान जहाज स्वीडनला रवाना होईल, असं समजलं आहे. जहाजावर काम करणाऱ्या स्वीडिश चमूने पूर्णपणे मौन बाळगलं आहे." वगैरे वगैरे..
मग एके दिवशी ते जादुई जहाज न्यूपोर्ट बंदरातून निघालं आणि नाहीसं झालं. ते सरळ युरोपला गेलं असेल का? प्रत्येक वर्तमानपत्र वेगवेगळा अंदाज वर्तवू लागलं. जहाजाची नवलाई नऊ दिवस टिकली, आणि मग विरली. मानवी कारागिरीचा तो उत्कृष्ठ नमुना असा नावपत्त्याशिवाय, कोणत्याही देशाच्या परवान्याशिवाय नाहीसा झाला. तो बांधणाऱ्या कंपनीलाही कसलीच कल्पना नव्हती. अर्थात, कर्नल ऑडमिंटन हेच या वेगवान चमत्काराचे मालक.. हे वाचकांना निराळं सांगायला नको. उन्मादाच्या भरात आपली सगळी संपत्ती या जहाजावर उधळून ते कफल्लक झाले होते. त्यांच्या हातात फक्त काही हजार डॉलर्स उरले होते. त्यातून उण्यापुऱ्या तीन महिन्यांचा खर्च जेमतेम भागला असता. सगळ्या दुनियेला जहाज दाखवेपर्यंत कर्नलनी त्याला हातसुद्धा लावला नव्हता. आता ते, त्यांचा मुलगा रुपर्ट आणि दोन नोकर असे चौघेजण, इतकी वर्षं साथ देणाऱ्या जुन्यापुराण्या स्कूनरमधून भर समुद्रात नव्या जहाजाजवळ गेले. कर्नलनी जहाजावर पाय ठेवला तेव्हा त्यांचे डोळे भरून आले होते. कॅप्टन ख्रिश्चननी मान तुकवली, आणि "मालक जहाजावर नाहीत." असा संकेत देणारं निळ्या रंगाचं निशाण खाली उतरवलं.जहाजावरच्या चमूने प्रथमच
आपला मालक पाहिला. आजूबाजूला एकही होडी नव्हती. कर्नल भारावून गेले होते. खालच्या मजल्यावर जाऊन त्यांनी व्हिस्कीचा एक पेग घेतला. त्यांना काही सुचेनासं झालं होतं. ही नशा व्हिस्कीची? नव्हे, मालकीची! जहाजाच्या सर्व बाजूंनी उडणारे पाण्याचे फवारे जहाजापेक्षा वेगाने त्याच्यापुढे झेप घेत होते. दोन्ही बाजूंच्या लखलखत्या पोलादी कडांवरून पाणी नळीने सोडल्यासारखं जोशात वाहत होतं. घर्षणाने पोलाद तापलं आहे का, ते पाहायला कर्नलनी खाली वाकून कडांना हात लावला. शेजारी कॅप्टन ख्रिश्चन अदबीने उभे होते.
"आपण किती वेगाने चाललो आहोत, कॅप्टन?" कर्नलच्या आवाजात प्रथमच कंप जाणवत होता.
"इथल्या या खडकाळ भागात फक्त बत्तीस नॉट्स, सर. पण आपण अडतीस नॉट्सने सहज जाऊ शकतो, सर. आणि मला वाटतं, अगदी जोर लावला तर चाळीससुद्धा." हे उत्तर ऐकून कर्नलना काय वाटलं असेल ते तुम्हांआम्हाला नाही समजायचं, ते फक्त नॅन्सी हँक्सच्या मालकाला समजेल. नॅन्सी हँक्स म्हणजे, शर्यतींच्या जगातली सर्वात वेगवान घोडी. अब्राहम लिंकनच्या मातोश्रींचं नाव ठेवलं होतं तिला.
"सरकारी बोटींपैकी सर्वात वेगवान जहाज किती वेगाने जात असेल, कॅप्टन?" कर्नलनी शांतपणे विचारपूर्वक विचारलं.
"सव्वीस नॉट्स, सर." लगेच उत्तर आलं. "तशी फक्त दोन टोर्पेडोधारी जहाजं सरकारकडे आहेत, सर. पण ती सतत दुरुस्तीला गेलेली असतात. बाकी युद्धनौका वगैरे म्हणाल, तर सरासरी वीस नॉट्ससुद्धा वेग नसेल त्यांचा.
कोणतंही प्रवासी जहाज सहज मागे टाकेल त्यांना." सरकारविषयी तुच्छताच डोकावत होती या उत्तरात. खाजगी किंवा व्यावसायिक जहाजं एवढ्या मोठ्या सरकारला मागे टाकतात, म्हणजे कोण वरचढ ठरलं, सांगा.
"समजा, आपण या जहाजाचं रुपडं बदलून टाकलं, तर? म्हणजे त्याच्या कडांवरून निराळं आवरण घातलं, तर? वेग तितकाच राहील म्हणता?"
"हो सर, तितक्याच वेगाने जाईल हे जहाज. हां.. पण मूळ सांगाड्याला मात्र हात लावता कामा नये." कॅप्टनना आश्चर्य वाटलेलं दिसत होतं.
"द्या माझ्याकडे." कर्नलनी चक्र हातात घेतलं, आणि वेगदर्शकावर अर्धा वेग, पावपट वेग अशा खुणा केल्या. विजेवर चालणाऱ्या त्या अद्ययावत जहाजाची शिडं खाली करता येत असत, समोरचं दृश्य कुठल्याही अडथळ्याविना पाहता येत असे, आणि धुराचा माग
सोडण्याचा तर प्रश्नच नव्हता. जहाज चालवणं तर इतकं सोपं, की जणु एखादी सुबक शिडाची होडीच. आता वेग कमी ठेवण्याचा कर्नलचा आदेश ऐकून खलाशी चक्रावले. फक्त पहाऱ्याची गस्त घालणाऱ्या नौकांना चुकवण्यापुरता वेग वाढवायला परवानगी होती.
मध्यरात्र झाली. जहाज कर्नलच्या खाडीवरच्या त्या दलदलीच्या प्रदेशात नेऊन नांगरण्यात आलं. पाहायला कोणी चिटपाखरू नव्हतं, आणि ते लपवायला खाडी आणि दलदल पुरेशी होती.
(भाषांतर) क्रमश:
भाग ५ - https://www.maayboli.com/node/84723
मस्त
मस्त
भारीच!!
भारीच!!
किल्ली , आबा.
किल्ली , आबा.
प्रतिसादाबद्द्ल आभारी आहे.
वाचते आहे.
वाचते आहे.