काही दिवसांपूर्वी नेदरलँडचे माजी पंतप्रधान ड्राइस व्हेन एग्त आणि त्यांच्या पत्नी यांनी त्यांच्या देशात कायद्याने मंजूर असलेले स्वेच्छामरण वयाच्या 93 व्या वर्षी स्वीकारले. अधूनमधून अशा बातम्या वाचनात येतात. आजच्या घडीला जगभरात सुमारे डझनभर देशांमध्ये या प्रकारच्या मरणाला कायदेशीर मान्यता आहे. त्यापैकी नेदरलँडस, बेल्जियम, कॅनडा आणि स्वित्झर्लंड ही आघाडीची मंडळी आहेत. असा कायदा अन्यत्रही असावा या उद्देशाने विविध देशांमध्ये या विषयावर चर्चा आणि विचारमंथन होत असते.
नुकताच या विषयावरील “आता वेळ झाली” हा मराठी चित्रपट प्रदर्शित झालाय. त्या निमित्ताने त्यातील प्रमुख भूमिका करणाऱ्या दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी या ज्येष्ठ कलाकारांची मुलाखत प्रसारित झालेली आहे ( https://www.youtube.com/watch?v=04aBOaRY3P8&t=1010s). मुलाखत चांगली असून त्यामध्ये दोघांनीही काही चांगले मुद्दे मांडलेत. स्वेच्छामरण (voluntary euthanasia) हा विषय समाजाने निषिद्ध न मानता त्यावर खुलेपणाने चर्चा करावी असा त्यांच्या चर्चेचा सूर आहे.
या विषयाला वैद्यकीय, कायदेशीर, सामाजिक, नैतिक आणि भावनिक असे अनेक पैलू आहेत. त्या दृष्टिने या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे. या लेखात विषयाची फक्त वैद्यकीय बाजू मांडत आहे.
(मरणासन्न अवस्थेत असलेल्या रुग्णांच्या बाबतीत त्यांची स्वतची ‘त्या वेळेस’ परवानगी हा प्रश्न उपस्थित होत नाही. अशा प्रकरणांमध्ये (अन्य परवानगीने) त्या रुग्णांचे जीवरक्षक उपचार थांबवून त्यांचा मृत्यू जवळ आणणे याला Non-voluntary euthanasia असे म्हणतात. त्या प्रकारची कायदेशीर सशर्त परवानगी बऱ्याच देशांमध्ये आहे. हा प्रकार लेखात घेतलेला नाही कारण त्यावर पूर्वी अनेकदा चर्चा झालेल्या आहेत).
ज्या देशांमध्ये स्वेच्छामरणाला कायदेशीर मान्यता आहे तिथे त्यासाठी संबंधित व्यक्तीच्या निवडीचे काही वैद्यकीय निकष ठरवलेले आहेत ते असे :
1. संबंधित व्यक्तीचे वय किमान 18 वर्षे पूर्ण पाहिजे
2. ती व्यक्ती स्वतःच्या तब्येतीविषयी निर्णय घेण्यास सक्षम असावी
3. त्या व्यक्तीला कुठल्यातरी प्रकारचा बरा न होणारा वेदनामय दुर्धर आजार झालेला असावा.
संबंधित प्रत्येक देशातील कायद्यांमध्ये वरील निकषांमध्ये थोडेफार फरक/शिथिलता असू शकतात. परंतु त्याच्या खोलात आपण शिरणार नाही. असे मरण आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वैद्यकीय पद्धतींचा औषधांसह तपशील मांडणे हा या लेखाचा उद्देश आहे.
महत्त्वाची टीप : जे वाचक या विषयाबाबत अत्यंत संवेदनशील आहेत किंवा ज्यांना ही संकल्पनाही नकोशी वाटते, त्यांनी पुढील लेख वाचण्यापूर्वी पूर्ण विचार करावा. अन्यथा इथूनच माघार घेणे उत्तम.
..
..
..
..
स्वेच्छामरणाची कार्यवाही करण्याच्या दोन पद्धती आहेत :
1. वैद्यकीय सल्ल्यानुसार केलेली आत्महत्या (physician-assisted suicide),
आणि
2. डॉक्टरांनी औषधी इंजेक्शन देऊन घडवलेला मृत्यू (euthanasia).
मूलतः या दोन्ही पद्धतीत आधुनिक वैद्यकातील औषधांच्या मोठ्या डोसचा वापर केला जातो (ती ‘औषधे’च आहेत, विषारी पदार्थ नव्हेत). या औषधांमुळे संबंधित व्यक्तीला मृत्यू लवकरात लवकर आणि वेदनारहित यावा अशी अपेक्षा असते. परंतु वास्तवात वेगवेगळे अनुभव येऊ शकतात. काही रुग्णांना या प्रक्रियेदरम्यान बराच त्रास होऊ शकतो. या सगळ्याची कल्पना रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना दिली जाते आणि त्यानंतरच त्यांची मरणपद्धतीच्या प्रकारासह परवानगी घेतली जाते.
आता दोन्ही पद्धती विस्ताराने पाहू.
• वैद्यकीय सल्ल्यानुसार केलेली आत्महत्या
यासाठी ज्या औषधांचे पर्याय उपलब्ध आहेत त्यांची आता माहिती घेऊ. औषधांच्या गटाचे नाव (व कंसात त्याचे एखादे उदाहरण) आणि त्याचे गुणधर्म अशा पद्धतीने माहिती देतो.
1. Sedatives (Chloral Hydrate) : मेंदूला गुंगी आणून झोप आणणारे हे औषध आहे.
2. Barbiturates (Pentobarbital) : ही औषधे मेंदूचा संवेदना स्वीकारणारा भाग बधीर करतात आणि त्यानंतर गुंगी आणि झोप आणतात.
3. Benzodiazepines (diazepam) : ही मन शांत करून गुंगी आणतात.
4. Opioids (morphine) : ही वेदनाशामक, गुंगी आणणारी आणि श्वसनक्रिया मंद करणारी असतात.
5. Cardiotoxic Agents (digoxin) : मुळात हृदय दुर्बलतेसाठी दिले जाणारे हे औषध अतिरिक्त डोसमध्ये हृदयाचे आकुंचन थांबवते आणि हृदयक्रिया बंद करू शकते.
वरील औषधांपैकी कोणती वापरायची त्यामध्ये देशागणिक काही फरक आहेत. फक्त एकाच औषधाऐवजी खालील प्रकारच्या संयुक्त प्रणाली देखील वापरल्या जातात :
१. ‘DDMA’ (diazepam, digoxin, morphine and amitriptyline) किंवा
२. ‘DDMP’ (diazepam, digoxin, morphine and propranolol).
वरील १ मधील amitriptyline हे नैराश्यविरोधी औषध आहे
आणि
२ मधील propranolol हे beta blocker या प्रकारचे औषध असून एरवी उच्चरक्तदाब आणि हृदयविकारांसाठी उपचार म्हणून वापरले जाते. तसेच घबराट (panic) कमी करणे हा त्याचा गुणधर्म आहे.
रुग्णांचे प्रत्यक्ष अनुभव
वरील प्रकारची औषधे घेतल्यानंतर मृत्यू लवकरात लवकर आणि अन्य कुठल्याही शारीरिक कटकटी व त्रास निर्माण न होता यावा अशी अपेक्षा असते. परंतु वास्तवात तसे होतेच असे नाही. या बाबतीत बरीच व्यक्तीभिन्नता आढळते. मुळात असे औषध खूप मोठ्या डोसमध्ये तोंडाने घ्यायचे असल्याने ते घेणे हे सुद्धा एक आव्हान असते. उदाहरण द्यायचे झाल्यास barbiturate या औषधाच्या १०० गोळ्या चूर्ण स्वरूपात करून त्या एखाद्या गोड द्रवात मिसळून लवकरात लवकर पिऊन टाकायच्या असतात. असले हे अघोरी मिश्रण पिताना जबरदस्त मळमळ आणि उलटीची भावना होतेच. त्यामुळे अनेकांना असा प्रकार केल्यानंतर अन्ननलिकेतील जळजळ, मळमळ व आतडी पिळवटून टाकणारी उलटी असे त्रास होतात. असा त्रास फारच झाल्यास शरीरात जलन्यूनता होते आणि या सगळ्याचा त्या औषधाच्या शोषणावर परिणाम होतो. कित्येकदा या औषधाच्या प्रभावाखाली बेशुद्ध अवस्थेत जात असलेला रुग्ण पुन्हा एकदा शुद्धीवर येऊ शकतो. म्हणून असे औषध देण्यापूर्वी उलटी-प्रतिबंधक औषधही द्यावे लागते.
ज्यांच्या बाबतीत उलट्या वगैरे न होता या मिश्रणाचे शोषण व्यवस्थित होते त्यांचा मृत्यू होण्यास लागणारा सरासरी वेळ एक ते दोन तास असतो. परंतु काहींच्या बाबतीत ही वेळ जवळजवळ साडेचार दिवसांपर्यंत लांबलेली आहे ! ही सर्व प्रक्रिया रुग्णाच्या घरी त्याच्या नातेवाईकांच्या उपस्थितीतच होत असते. जर तो मृत्यू बऱ्याच त्रासदायक पद्धतीने झाल्यास उपस्थितांनाही मनोवेदना होतात.
त्यामुळे या प्रकारच्या मृत्यूप्रक्रियेपूर्वी अजून एक खबरदारी डॉक्टरांना घ्यावी लागते. जर का तोंडाने गोळ्या घेऊन मृत्यू होण्यास खूपच वेळ होऊ लागला आणि रुग्णाची तडफड होऊ लागली तर अशा वेळेस डॉक्टरांनी मध्यस्थी करून इंजेक्शनच्या मदतीने मृत्यू लवकर आणावा लागतो. या प्रक्रियाबदलाची लेखी परवानगी रुग्णाने तोंडी औषध घेण्यापूर्वीच देणे महत्त्वाचे ठरते.
तोंडाने स्वतः मृत्यूचे औषध घेण्याच्या पद्धतीच्या मर्यादा आणि त्यातले संभाव्य त्रास/वेदना वरील विवेचनातून लक्षात येतील. ज्या इच्छुकांच्या बाबतीत असे त्रास होतात त्यांच्या नातेवाईकांना खालील प्रश्न नक्की पडतात :
१. “अरेरे ! हाच का तो शांतपणे आणि सन्मानाने मिळणारा मृत्यू?”
२. “याचसाठी त्या कुटुंबाने केला होता का सारा कायदेशीर खटाटोप?”
• औषधी इंजेक्शन देऊन घडवलेला मृत्यू
या प्रकारात वरती उल्लेख केलेल्या सर्व औषधी इंजेक्शनसचा समावेश आहेच. त्या व्यतिरिक्त अन्य काही औषधे वापरली जातात :
• भूल द्यायची (बेशुद्ध करणारी) औषधे (Propofol)
• स्नायू गलितगात्र करणारी औषधे (Pancuronium)
• हृदयक्रिया बंद पाडणारी औषधे (Potassium chloride)
या पद्धतीतही निरनिराळी औषधांची मिश्रणे - अर्थातच इंजेक्शनच्या स्वरूपात- वापरली जातात. सर्वसाधारण पद्धत अशी असते :
१. सर्वप्रथम चिंतामुक्तीचे औषध दिले जाते
२. त्यानंतर बेशुद्ध करणारे औषध देतात.
३. यानंतर शरीरातील हालचालींशी संबंधित सर्व स्नायू गलितगात्र (paralyze) करणारे औषध देतात. त्यामुळे श्वसनाचे स्नायू सुद्धा दुर्बल होतात. तसेच मोठ्या स्नायूंचे झटके येत नाहीत. असे झटके येताना न दिसणे हे नातेवाईकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.
४. गरजेनुसार हृदयक्रिया बंद पाडणारे औषधही दिले जाते.
इंजेक्शनद्वारा आणलेला मृत्यू हा तोंडी गोळ्या घेण्याच्या पद्धतीपेक्षा अर्थातच सुलभ आहे. तरीसुद्धा या संदर्भात काही वादग्रस्त मुद्दे उपस्थित केलेले आहेत. इंजेक्शनद्वारा द्यायच्या औषधांचे डोस म्हणावे तितके प्रमाणित नाहीत. त्यामध्ये डॉक्टरांच्या अनुभवानुसार काही फरक होऊ शकतात. जर का या पद्धतीने इंजेक्शन देताना त्या व्यक्तीची बेशुद्धी पुरेशी नसेल तर तिला श्वास कोंडल्यावर किंवा पाण्यात बुडल्यावर जशा वेदना होतात त्या प्रकारचा त्रास होऊ शकतो. म्हणजेच या पद्धतीने होणारा सर्वांचाच मृत्यू अगदी शांतपणे होईल असे नाही.
• धोरणातील त्रुटी आणि विचाराधीन मुद्दे
सामाजिक पातळीवर पाहता स्वेच्छामरण हा अतिशय संवेदनाशील आणि वादग्रस्त विषय आहे. सामान्यजनांच्या मनात यासंबंधी एक बाळबोध असा गैरसमज आढळतो तो म्हणजे, संबंधित व्यक्तीला एक ‘घातक’ इंजेक्शन दिल्यावर पाच दहा मिनिटात सारे काही शांत शांत होते आणि मृत्यू येतो. परंतु वास्तव काय आहे ते आपण वर पाहिले.
या संदर्भात आतापर्यंतच्या वैद्यकीय अनुभवावरून खालील मुद्दे लक्षात आलेले असून त्यावर भविष्यात गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे :
१. मृत्यू येण्यासाठी जी औषधे वापरली जातात त्यांच्या डोसबाबत एकवाक्यता नाही. तसेच प्रत्येक देशागणिक औषधांच्या मिश्रणामध्येही (cocktails) फरक आहे.
२. ज्या प्रकरणांमध्ये डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शनद्वारा मृत्यू घडवलेले आहेत त्या सर्व प्रकरणांच्या अधिकृत नोंदी उपलब्ध नाहीत. ज्याप्रमाणे नेहमीच्या वैद्यकीय संशोधनाची विविध विज्ञानपत्रिकांमधून जाहीरपणे चर्चा होते, तसे काही या घटनांच्या संदर्भात होत नाही. परिणामी अशा मरणघटनांचा अभ्यासाला आवश्यक असलेला विदा फारसा उपलब्ध नाही.
३. यासंदर्भातील वैद्यकीय धोरणांचे नियमन करणारी सरकारी समिती/यंत्रणा देखील सक्षम नाही. त्यामुळे निरनिराळ्या वैद्यकीय संघटनांच्या मतानुसार संबंधित औषधांची निवड आणि डोस ठरवले जातात.
४. या मरण प्रक्रियेदरम्यान जर रुग्णाला अत्यंतिक त्रास होऊ लागला किंवा त्याची तडफड दिसू लागली तर डॉक्टरांनी मध्येच (जीवरक्षक) हस्तक्षेप करायचा की नाही यासंबंधी सुद्धा मार्गदर्शक तत्वे असण्याची आवश्यकता आहे.
५. मानवी शरीराच्या परिपूर्ण अभ्यासामध्ये मरणोत्तर शवविच्छेदन हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. स्वेच्छामरण स्वीकारलेल्या व्यक्तींची या प्रकारे मरणोत्तर तपासणी करण्यासंबंधी निश्चित अशी नियमावली आखली गेली पाहिजे. अशा प्रकारच्या अभ्यासातून भविष्यातील या प्रकारचे मृत्यू अधिक सुखावह करता येतील.
समारोप
या लेखाच्या प्रास्ताविकात म्हटल्यानुसार या विषयाला अनेक महत्त्वाच्या बाजू आहेत. त्यापैकी वैद्यकीय पैलू या लेखातून सादर केले. विषयाच्या कायदेशीर बाजूबाबत कायदा अभ्यासकांनी स्वतंत्रपणे सविस्तर विवेचन केल्यास ते उपयुक्त ठरेल. या व्यतिरिक्त या संवेदनशील विषयाच्या सामाजिक, नैतिक आणि भावनिक बाजूंसंबंधी मते व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य लोकशाहीतील प्रत्येक नागरिकाला आहे.
*****************************************************************************************************************
संदर्भ :
१. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC9270985/
२. https://en.wikipedia.org/wiki/Assisted_suicide
३. विविध वैद्यकीय पाठ्यपुस्तके
चांगली माहिती डॉ कुमार.
चांगली माहिती डॉ कुमार.
संबंधित व्यक्तीला एक ‘घातक’
नेहमीप्रमाणे अतिशय सुरेख आणि वेगळी माहिती,बरेच गैरसमज दूर झाले,
संबंधित व्यक्तीला एक ‘घातक’ इंजेक्शन दिल्यावर पाच दहा मिनिटात सारे काही शांत >>>>मला तर हेच वाटायचं,
अजून एक बाळबोध प्रश्न.... मग क्लिरोफॉर्म किंवा भुलीच injection सरसकट का नाही वापरत,म्हणजे बऱ्याचदा तर बातम्या येत असतात भुलीची मात्रा जास्त झाल्याने मृत्यू झाला म्हणून विचारते
ही डॉक्युमेंटरी बघावी असे
खंबीर मनाच्या लोकांनी The Suicide Plan ही डॉक्युमेंटरी बघावी असे सुचवेन.
माझे Advance healthcare directive पुढीलप्रमाणे आहे, ते शब्दशः इथे देत आहे. कुणाला वापर करायचा असेल तर करू शकता. (योग्य तो बदल करून अथवा न करता).
Dear Medical Advocate,
If you’re reading this because I can’t make my own medical decisions, please understand I don’t wish to prolong my living or dying, even if I seem relatively happy and content. As a human being who currently has the moral and intellectual capacity to make my own decisions, I want you to know that I care about the emotional, financial, and practical burdens that dementia and similar illnesses place on those who love me. Once I am demented, I may become oblivious to such concerns. So please let my wishes as stated below guide you.
• I wish to remove all barriers to a natural, peaceful, and timely death.
• Please ask my medical team to provide Comfort Care only.
• Try to qualify me for hospice.
• I do not wish any attempt at resuscitation. Ask my doctor to sign a do-not-resuscitate order and order me a do-not-resuscitate bracelet from the Medic Alert Foundation.
• Ask my medical team to allow natural death. Do not authorize any medical procedure that might prolong or delay my death.
• Do not transport me to a hospital. I prefer to die in the place that has become my home.
• Do not intubate me or give me intravenous fluids. I do not want treatments that may prolong or increase my suffering.
• Do not treat my infections with antibiotics, give me painkillers instead.
• Ask my doctor to deactivate all medical devices, such as defibrillators, that may delay death and cause pain.
• Ask my doctor to deactivate any medical device that might delay death, even those, such as pacemakers, that may improve my comfort.
• If I’m eating, let me eat what I want, and don’t put me on “thickened liquids”, even if this increases my risk of pneumonia.
• Do not force or coax me to eat.
• Do not authorize a feeding tube for me, even on a trial basis. If one is inserted, please ask for its immediate removal.
• Ask to stop, and do not give permission to start, dialysis.
• Do not agree to tests whose results would be meaningless, given my desire to avoid treatments that might be burdensome, agitating, painful, or prolonging of my life or death.
• Do not give me a flu or other vaccine that might delay my death, unless required to protect others.
• Do keep me out of physical pain, with opioids if necessary.
• Ask my doctor to fill out the medical orders known as POLST (Physician Orders for Life-Sustaining Treatment) or MOLST (Medical Orders for Life-Sustaining Treatment) to confirm the wishes I’ve expressed here.
• If I must be institutionalized, please do your best to find a place with access to nature, music or art workshops, if I can still enjoy them.
स्वेच्छामरणाचे २ सोपे उपाय (आंतरजालावर शोधल्यास किंवा अगदी जवळच्या डॉक्टरकडून कदाचित अजूनही कळतील असे) मलातरी स्वतःला माहीत आहेत, पण मी ते सांगणार नाही कारण त्याचा दुरुपयोग होऊ शकतो.
धन्यवाद !
धन्यवाद !
.....
अजून एक बाळबोध प्रश्न....
>>>
Propofol हे भूलीचे इंजेक्शन देतातच. तरीसुद्धा प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत मृत्यू वेगाने आणि शांतपणे येतोच असे नाही.
मूळ संदर्भातील हे वाक्य मार्मिक आहे :
Evidence from jurisdictions where ‘assisted dying’ is practiced, however, reveals that hastening patient death is not so simple.
उपाय (आंतरजालावर शोधल्यास
उपाय (आंतरजालावर शोधल्यास किंवा अगदी जवळच्या डॉक्टरकडून कदाचित अजूनही कळतील असे)
>>> +१
उपाय अनेक असू शकतील. अधिकृत उपायांच्या बाबतीत, ज्या देशांमध्ये वरील प्रमाणे मान्यता आहे तिथे संबंधित वैद्यकीय संघटनांच्या काही शिफारसी आहेत. संबंधित डॉक्टरांना त्यानुसार करावे लागते.
या विषयावर वैद्यक विश्वात सुद्धा खोलात जाऊन जाहीर चर्चा होताना दिसत नाहीत.
छान माहिती. आणखी जाणून
छान माहिती. आणखी जाणून घ्यायला आवडेल.
'मेडिकल असिस्टंस इन डाईंग' कायदा २०१६ पासून कॅनडात लागू आहे.
२०२२ मध्ये १३,०००+ लोकांनी आणि आजवर ४५,०००+ लोकांनी या कायद्याचा वापर करुन स्वेच्छामरणाचा निर्णय अम्मलात आणला आहे. काय/ किती/ कसं औषध अॅडमिनिस्टर करावं याचा पुरेसा डेटा उपलब्ध झाला असेल आणि त्यावरुन कमीत कमी त्रासात ते शक्य करत असतील असं वाटतं. (मी फार वाचलेलं नाही)
मी वाचलंय त्याप्रमाणे पहिलं औषध (पहिलं... कारण तीन चार प्रकारची औषधं देऊन हे अॅडमिनिस्टर करतात असं वाचलं आहे) दिल्यापासून ९० परसेंटाईल मध्ये साधारण ७ मिनिटांत मृत्यू आलेला आहे.
मेंटल इलनेस हीच कंडिशन असेल तर आजही त्यांना या कायद्याचा वापर करता येत नाही. आणि त्यावर पुरेशा तरतुदी/ अभ्यास झालेला नसल्याने २०२७ पर्यंत त्यांच्या साठी काही करणे पुढे ढकलले आहे, या बाबत हल्ली खूप चर्चा इथल्या बातम्यांत ऐकू येतात.
या विषयावर वैद्यक विश्वात
या विषयावर वैद्यक विश्वात सुद्धा खोलात जाऊन जाहीर चर्चा होताना दिसत नाहीत. >>
हे साहजिक आहे. यात डॉक्टरचे लायसन्स आणि शिवाय Ethical dilemma असे प्रश्न उद्भवतात.
अवांतरः डॉ. अतुल गवांदे यांचे Being Mortal हे अतिशय उत्तम पुस्तक आहे, त्याची सर्वांना शिफारस करेन.
डॉक्टर तुमचे लेख वैद्यकीय
डॉक्टर तुमचे लेख वैद्यकीय असले तरी नेहमीच सामान्य वाचकाला समजतील अशा प्रकारे लिहिलेले असतात . फार संवेदनशील विषय ताकदीने पेलता आणि हाताळता आपण.
एक प्रश्न,
लेखात हृदय क्रिया बंद पाडणारे 'औषध' असा उल्लेख आला आहे. याला 'औषध' असे का म्हटले आहे? जे हृदयक्रिया बंद करते ते मिश्रण/द्रव्य 'औषध'म्हणून कशावर वापरले जाते? (स्वेच्छा मरण/ असिस्टिड मरणाचा पर्याय सोडून)
चर्चेत सहभागी होऊन पूरक
चर्चेत सहभागी होऊन पूरक माहिती देणाऱ्या सर्वांना धन्यवाद !
जशी मी दिलीप प्रभावळकर यांची मुलाखत बघितली तसे मला या विषयावर लिहावेसे वाटू लागले. पण तरीसुद्धा कुठेतरी बिचकतच होतो. मग इथल्याच दोन वेगळ्या वयोगटातील वाचकांचा सल्ला घेतला आणि त्यांनी उत्तेजन दिले. तरीसुद्धा जनसामान्यांची एकंदरीत मानसिक स्थिती लक्षात घेता मी लेखाच्या योग्य टप्प्यावर ती महत्त्वाची टीप दिलेली आहे.
मिश्रण/द्रव्य 'औषध'म्हणून
मिश्रण/द्रव्य 'औषध'म्हणून कशावर वापरले जाते
>>> चांगला प्रश्न आहे.
एक लक्षात घ्यावे. या प्रकारच्या मरणासाठी वापरली जाणारी सर्व रसायने वैद्यकीय कायद्याच्या दृष्टिकोनातून ‘मेडिसिन्स’ याच सदरात मोडतात (म्हणूनच बहुदा कायद्याला सायनाईडसारखे विष देऊन मारणे मान्य नसावे).
आता मुद्दा असा आहे, की एरवी Digoxin हे औषध हृदयदुर्बलतेवरचा उपचार म्हणून दिले जाते - अर्थातच मर्यादित आणि योग्य त्या डोसमध्ये. आता त्याच “औषधाचा” डोस आपण जेव्हा काही पट करतो तेव्हा ते जीवरक्षक औषध राहत नसून हृदयक्रिया बंद “पाडणारे” औषध ठरते.
..
potassium chloride >>>> अनेक आजारांमध्ये रक्तातील पोटॅशियम कमी होतो तेव्हा हे थेंब थेंब स्वरूपात ( infusion) औषध म्हणून दिले जाते. परंतु हेच सिरींजमध्ये भरपूर मोठ्या डोसमध्ये भरून एकदम टोचले असता ते थेट हृदय बंद पाडते.
थोडक्यात, डोस आणि हेतू सापेक्षतेमुळे त्या औषधाचा दर्जा बदलला !
वेगळ्या, महत्वाच्या आणि
वेगळ्या, महत्वाच्या आणि संवेदनाशील विषयावरील लेख आहे. चांगली माहिती. प्रतिक्रियादेखील मॅच्युअर्ड आहेत.
औषधाचा” डोस आपण जेव्हा काही
औषधाचा” डोस आपण जेव्हा काही पट करतो तेव्हा ते जीवरक्षक औषध राहत नसून हृदयक्रिया बंद “पाडणारे” औषध ठरते.)))
ओह.. म्हणजे योग्य प्रमाणात घेतल्यास ते हृदयक्रिया सुरळीत ठेवेल....
धन्यवाद डॉक्टर !
अन्न तारी, अन्न मारी !
अन्न तारी, अन्न मारी !
औषध तारी, औषध मारी !!
डॉक्टर तुमचे लेख वैद्यकीय
डॉक्टर तुमचे लेख वैद्यकीय असले तरी नेहमीच सामान्य वाचकाला समजतील अशा प्रकारे लिहिलेले असतात . फार संवेदनशील विषय ताकदीने पेलता आणि हाताळता आपण+११११
छान माहिती
महत्त्वाचा लेख आणि
महत्त्वाचा विषय आणि नेहमीप्रमाणे सर्वांना कळेल अश्या सोप्या भाषेतला आणि माहितीपूर्ण लेख.
चित्रपटासारखे वा माहितीपटासारखे मध्यम वापरून याविषयी अधिक माहिती सर्वांगाने देता येईल असे वाटते.
मी माझ्या डॉक्टर मित्रांना नेहमी आपले लेख कसे सोपे आणि माहितीपूर्ण असतात ते सांगत असतो आणि पाठवत असतो
नेहमीप्रमाणे चांगला ,
नेहमीप्रमाणे चांगला , माहितीपूर्ण लेख.
औषधे देऊन आणलेल्या मृत्यूनंतरही इतक्या अडचणी आणि complexities असतात, हे वाचून किंचित निराश वाटले.
पण अमितव यांचा प्रतिसाद वाचून बरं वाटलं.
विद्या बाळ यांचं मृत्यूशय्येवरचं कथन आठवलं.
प्रकाश घाटपांडे त्या लेखाची लिंक इथे देतील अशी अपेक्षा .
आस्थेने प्रतिसाद दिलेल्या
आस्थेने प्रतिसाद दिलेल्या सर्वांना धन्यवाद !
चित्रपटासारखे वा माहितीपटासारखे माध्यम
>>>
बरोबर. लेखात उल्लेख केलेला मराठी चित्रपट कालच प्रदर्शित झालेला आहे. कोणी पाहिला तर त्याबद्दल जरूर लिहा.
संबंधित मुलाखतीत दिलीप प्रभावळकरांनी जो मुद्दा मांडला तो महत्त्वाचा वाटला :
“जर घटनेनुसार एखाद्या गुन्हेगाराचा मृत्युदंड रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रप्रमुखाला असतो, तर मग इच्छेनुसार मरण्याचा कुणाचाही अधिकार घटनेत समाविष्ट का केला जाऊ नये ?”
हा विचार त्या चित्रपटात संयतपणे मांडलेला आहे.
छान माहिती.
छान माहिती.
नोकरीची सुरुवात न्याय
नोकरीची सुरुवात न्याय साहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत झाली. तेव्हाची नेमणूक Chemical Analysis wing ला होती. आत्महत्येच्या प्रकरणी Viscera Extract घेऊन पहिली टेस्ट TLC करायचो त्यात diazepam, barbiturates मिळायचे मग अजून काही टेस्ट कन्फर्मेशन साठी करायचो.
आठवणी जागवल्या.
आपल्याकडं यासाठी सुप्रीम कोर्टाने २०१८ ला परवानगी दिली त्यात लाइफ सपोर्ट सिस्टीम हटवणं आहे.
ही एक रोचक लिंक...डेथ मशीनमध्ये बसा आणि धडधाकट असताना अनुभवा मृत्यू जिवंतपणी... ज्याला खरं मरण हवं तेही वेदने शिवाय तर तेही आहे...
https://www.google.com/amp/s/lokmat.news18.com/amp/technology/death-mach...
छान माहितीपूर्ण लेख....
Death with dignity असायलाच हवा....
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
..
डेथ मशीनमध्ये बसा आणि धडधाकट असताना अनुभवा मृत्यू >>>> भारी आहे !
नेहमी प्रमाणे छान माहिती.
नेहमी प्रमाणे छान माहिती.
या प्रकारात शांतपणे मरण येते असे मलाही वाटलेले. पण ते तसे नाही हे समजले.
अर्थात ज्याला आधीच आयुष्य नकोसे झाले असेल त्याला तुलनेत या त्रासाचे काही वाटत नसेल.
जसे की मला लहानपणी जेव्हा अपेंडीक्सचा त्रास सुरू झाला तेव्हा कधीतरी ऑपरेशन करावे लागेल याची फार भीती वाटायची. एकदा मात्र इतके दुखायला लागले की एमर्जन्सीमध्ये रात्रीच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. मला वेदना असह्य होत असल्याने मीच म्हणालो की करून टाका एकदाचे ऑपरेशन. क्षणात ऑपरेशन या प्रकारची भीती गेली. त्यामुळे हेच जर कोणाला अश्या वेदना आणि त्रासापासून सुटकाच नसेल तर त्याला पूर्ण हक्क आहे संपवून टाका एकदाचे माझे आयुष्य असे म्हणायचा..
नेहमी प्रमाणे छान माहिती.
Duplicate
चर्चा चांगली होते आहे म्हणून
चर्चा चांगली होते आहे म्हणून यालाच एक समांतर विषय मांडतो. अमेरिकेतील बऱ्याच राज्यांमध्ये मृत्युदंडाची शिक्षा देखील लेखात उल्लेख केलेल्या रसायनांच्या मिश्रणाच्या इंजेक्शनद्वारा दिली जाते. त्या संदर्भात त्या गुन्हेगारांच्या मृत्यूनंतर त्यांचे शवविच्छेदन करून बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे. त्यातून बऱ्याच जणांच्या बाबतीत असे दिसून आले :
१. जे बेशुद्धीचे इंजेक्शन दिले होते त्याचा डोस कमी पडला होता. त्याच्या जोडीला स्नायू गलितगात्र करण्याचे इंजेक्शन दिल्यामुळे ती व्यक्ती काही प्रमाणात जागरूक (aware) होती का हे डॉक्टरांना समजू शकत नाही.
२. अशा काही औषधी इंजेक्शनचा दुष्परिणाम म्हणजे त्या व्यक्तीच्या फुफ्फुसात प्रचंड पाणी साठते. मृत्यूनंतर अशा फुफ्फुसांचे वजन नेहमीच्या वजनाच्या कित्येक पट असलेले आढळले. याचा अर्थ असा, की मरता मरता त्या व्यक्तीला बुडून मरत असल्यासारख्या वेदना झाल्या असणार.
अशा गोष्टी उघड झाल्यानंतर काही तज्ञांनी इंजेक्शन पद्धतीलाही विरोध दर्शवलेला आहे. स्वेच्छामरण असो की मृत्युदंडाची शिक्षा, मूलभूत कायद्यानुसार मरण हे शांततामय असणे अपेक्षित आहे.
नेहमी प्रमाणेच सुंदर
नेहमी प्रमाणेच सुंदर माहितीपूर्ण लेख! खूप खूप धन्यवाद!
नवीन Submitted by उपाशी बोका on 23 February, 2024 - 23:13 >> सविस्तर मसुद्यासाठी धन्यवाद!
आपल्या माणसाच्या लाईफ सपोर्ट बाबत अगदी डॉक्टरी सल्ल्याने निर्णय घेतानाही फार तगमग होते. देवा, माझ्यावर सही करायची वेळ आणू नकोस, तूच सुटका कर यातून असे अक्षरशः विनवत रहायचे. डायरेक्टिवमुळे निदान पुढील पिढीला तरी थोडा रिलीफ मिळेल.
.माझ्या आवडीचा विषय.अतिशय
.माझ्या आवडीचा विषय.अतिशय उत्तम लेख. कालच आता वेळ झाली च्या प्रिमियर शोला गेलो होतो. जगायची ही सक्ती आहे या पुस्तकाचा परिचय यापूर्वी मी मायबोलीवर दिला आहे.
>>>
>>>
नेहमीप्रमाणे चांगला , माहितीपूर्ण लेख.
औषधे देऊन आणलेल्या मृत्यूनंतरही इतक्या अडचणी आणि complexities असतात, हे वाचून किंचित निराश वाटले.
<<<
अनुमोदन.
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
..
'आता वेळ झाली' च्या प्रिमियर शोला गेलो होतो
>>> त्यावर जरूर लिहा !
पुस्तकाचा परिचय पाहतो.
अवांतरः डॉ. अतुल गवांदे यांचे
अवांतरः डॉ. अतुल गवांदे यांचे Being Mortal हे अतिशय उत्तम पुस्तक आहे, त्याची सर्वांना शिफारस करेन.>>>>उबो हे अवांतर नाहीये. समांतर आहे. आनुषंगिक आहे. उत्तम पुस्तक आहे. मेहता पब्लिशिंग हाउस ने त्याचा मराठी अनुवाद केला आहे.
आता वेळ झाली हा चित्रपट
आता वेळ झाली हा चित्रपट वास्तव कथेवर आधारित आहे. मायबोलीवर उरले जगणे, मरणासाठी !... ही ती ओरिजिनल कथा आहे.
मुंबईतील लवाटे दांपत्यावर आधारलेली हा सिनेमा आहे.
माहितीबद्दल धन्यवाद !
माहितीबद्दल धन्यवाद !
कथा चांगली असणार.
Pages