तरुण मुलांना हे सगळं रिलेट होणं कठीण आहे पण आमच्या लहानपणी आम्ही काय खेळत होतो, शून्य साहित्यातून ही आम्ही खेळाचा आनंद कसा घेत होतो त्याची ही गोष्ट. तुमचे ही असे काही स्पेशल खेळ आणि आठवणी असतील तर ते ही इथे लिहा.
आमचे अनोखे खेळ
लहान मुलांचे हल्लीचे खेळ आणि त्यांची मनोरंजनाची अनेक साधनं बघितली की नकळतच मला आमच्या लहानपणीचे खेळ आठवतात. हल्लीचे भारी भारी आणि संख्येत प्रचंड खेळ पाहून मनातल्या मनात तुलना ही केली जातेच. अर्थात हेवा वगैरे नाही वाटत कारण आमच्या वेळी आम्ही जे खेळ खेळत होतो ते सगळे तेव्हा आम्हाला ही आवडत होतेच. तसेच आमचं लहान गाव, दोन्ही बाजूला अंगण, आजूबाजूला झाडी , तेव्हाचे शांत , निवांत , गाड्यांची रहदारी नसलेले रस्ते ह्या मुळे खेळाच्या साधनांची उणीव आहे हे जाणवलं ही नाही.
धावाधावी, लंगडी , कांदेफोडी लपाछपी, चोर पोलीस, साखळी, दगड की माती, खांब खांब खांबोली, तळ्यात मळ्यात, शिवाजी म्हणतो अश्या खेळांना काही ही साहित्य लागत नसे. कधी छानसा फरशीचा तुकडा मिळाला तर आट्यापाट्या किंवा नारळाची करवंटी घेऊन डबा ऐसपैस खेळायला खुप मजा यायची. आमचे बहुतांश खेळ हे असेच काहीतरी घरातलच किमान साहित्य किंवा नो साहित्य लागणारे असेच असत. त्यामुळे लगोरी ही आम्ही फार खेळत नव्हतो कारण त्यासाठी चेंडू लागत असे.
शिकेकाईच्या शेंगा हलकेच उखळात कुटून घेऊन आई त्यातील बिया आधी मोकळ्या करून घेऊन त्या निवडत असे. मगच त्या शेंगा कुटून घेऊन त्यात लिंबाची साल , गवला कचरी वगैरे मिसळून सुगंधित शिकेकाई घरच्या घरीच तयार होई. तर त्या शिकेकाईच्या वेगळ्या काढलेल्या गुळगुळीत , छोट्या छोट्या काळ्या बिया घेऊन आम्ही “ एकी का बेकी” नावाचा खेळ खेळत असू. प्रत्येकाकडे काही बिया असत आणि समोरच्या भिडूने एकी का बेकी हे आधीच गेस करून सांगायचं. मग दोन दोन बियांच्या जोड्या लावायच्या आणि शेवटी एक बी उरते की नाही ह्यावर एकी का बेकी आणि कोण जिंकला हे ठरत असे. तसं बघायला गेलं तर काय होतं त्या खेळात पण आम्ही तासनतास तो खेळ आवडीने खेळत होतो.
सायकलचा निकामी झालेला टायर जर कधी मिळालाच तर तो न पाडता फिरवायचा खेळ ही खुप रंगत असे. पावसाळ्यात अंगणातल्या चिखलात “ तार रोपी “ हा छत्रीची तार चिखलात रोवत रोवत पुढे जाण्याचा खेळ तर पावसाची सर आली तरी बंद पडत नसे. तार चिखलात उभी न राहता पडली की आऊट अस साधं समीकरण होतं. पाऊस फारच मुसळधार असेल तर घरातल्या घरात सागरगोटे खेळायला ही मजा येई. जनरली सागरगोटे आम्ही मुली मुलीच खेळायचो . मुलांचा सहभाग वरच्यावर आमचे सागरगोटे झेलणे किंवा सागरगोटे पळवणे इत्यादींनी आम्हाला चिडवण्याचाच असे फक्त. . दुपारच्या वेळी जेव्हा अंगणात खेळायला मनाई असायची तेव्हा “ नाव गाव फळ फुल” हा डाव खुप रंगत असे. एखाद्या विशिष्ट अक्षरावरून सुरू होणारी मुला मुलींची, फळाची, फुलाची , गावाची, सिनेमाची वैगरे नाव पटापट लिहून जास्तीत जास्त स्कोअर होईल तो जिंकला असा तो खेळ होता.
आता तुम्हाला खोटं वाटेल पण बांगड्यांच्या काचेचे तुकडे गोळा करणे आणि रस्त्यावर पडलेली सिग्रेटची रिकामी पाकिट गोळा करणे हे दोन्ही फारच पॉप्युलर होतं तेव्हा. नंतर मैत्रिणींशी ह्या गोष्टी एक्सचेंज ही केल्या जात. वर्ख वाल्या बांगडीच्या मोठ्या तुकड्याला जास्त भाव मिळत असे. मला आठवतंय सिग्रेटच्या पाकीटात पिवळा हत्ती हा आमच्या जगात सर्वात स्वस्त ब्रँड होता आणि एक कॅपस्टन म्हणून खुप मौल्यवान ब्रँड होता. पंधरा वीस पिवळ्या हत्तींना एक कॅपस्टनच पाकीट मिळे. मात्र सिगरेटच नाव ही घेतलेलं घरात वडिलांना चालत नसे आणि बांगडीची काच हाताला लागेल म्हणून आई काचा गोळा करायला परवानगी देत नसे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी चोरी छुपेच आम्हाला जमवाव्या लागत असत.
आमच्या घरी वडिलांना वाचनाचं वेड होत आणि ते आम्हाला ही वाचनासाठी प्रोत्साहन देत असत. गावातल्या सार्वजनिक वाचनालयाचे आम्ही सगळेच जण सभासद होतो. त्यामुळे आमच्या घरी एकावेळी चार पाच पुस्तके तरी असत. मराठी वाचनाची गोडी त्यामुळेच लागली मला. आम्हा सर्वच भावंडांच वाचन खुप होतं. अगदी श्रीमान योगी सारखी मोठी मोठी पुस्तकं ही आम्ही लहानपणीच वाचली आहेत. नंतर नंतर इंग्लिश पुस्तकं जास्त करून फिक्शन खुप वाचली. खेदाची गोष्ट म्हणजे अलीकडच्या काळात मात्र माझं वाचन खूपच कमी झालंय.
पावसाळ्यात मेंदीचा पाला तोडून स्वतः हाताने वाटून ती लावण्याचा कार्यक्रम एखाद्या शनिवारी मुद्दाम ठरवला जायचा. सणासुदीला त्या त्या सणा प्रमाणे फुल गोळा करून हार तोरणं करणे, पत्री गोळा करणे, दिवाळीत ठिपक्यांचा कागद , कंदील स्वतः करणे, संक्रांतीला पतंग आणि होळीला पळसाच्या फुलांपासून रंग करणे, उन्हाळी कामात आणि दिवाळी फराळ करायला आईला वर वरची मदत करणे, असा सिझनल विरंगुळा मिळत असे. वडील कधीतरी चार सहा महिन्याने एकदा आमच्या गावात असलेल्या टुरिंग टॉकीज मध्ये म्हणजे वरून आकाश दिसणाऱ्या थिएटर मध्ये सिनेमाला नेत असत, ते थ्रील पुढे महिना दोन महिने सहज पुरत असे. तसेच आपण न पाहिलेल्या तीन तासाच्या सिनेमाची स्टोरी मैत्रिणीकडून ऐकणे ह्यात पाच सहा दिवस सहज जात असत.
माझ्या वडिलांच्या एकंदर विचारांवरून आणि त्यांच्या मुल्यांवरून मला आता नवल वाटत पण मे महिन्याची सुट्टी सुरू झाली की ते पत्त्यांचा एक कॅट आम्हाला आणून देत असत. जून मध्ये शाळा सुरू होई पर्यंत आम्हाला पत्ते खेळण्याची परवानगी होती. एकदा शाळा झाली सुरू की पुढल्या वर्षीच्या उन्हाळी सुट्टी पर्यंत पत्ते बंद. आम्ही सुट्टीत अक्षरशः पत्ते कुटत होतो. जसे भिडू असतील तसे लॅडीस, झब्बू, सात आठ, मेंढी कोट, मार्क डाव, चॅलेंज असे अनेक डाव रंगत. कधी कधी माझे आई वडील ही खेळायला येत असत आमच्या बरोबर. त्या आठवणी अजून ही मनाला आनंद देतात. कोणीच नसेल खेळायला तर पेशंस किंवा पत्त्यांचा बंगला बांधणे हे ही आवडत असे. पत्ते खेळताना चोरून दुसऱ्याचे पत्ते बघणे, खाणाखुणा करणे , आरडा ओरडा ह्याला ही ऊत येई. त्याची परिणीती भांडणे, पत्ते फेकणे, ते हरवणे होत ह्यात असे. एखादा पत्ता हरवला तर दुसरा कॅट मिळणं शक्यच नव्हतं. त्यावर उपाय म्हणून जोकरला त्या हरवलेल्या पानाच चित्र काढून वेळ भागवली जाई आणि खेळ पुन्हा सुरू होई.
लहानपणी आम्हाला फार कमी साहित्य आणि साधनं उपलब्ध होती पण त्यातून ही आम्ही स्वतःची करमणूक स्वतः निर्माण केल्याने लहानपण मजेतच गेलं. आम्हाला ही विकतचे रेडिमेड खेळ मिळाले असते तर कदाचित जास्त मजा आली ही असती. असो. आता मात्र जागतिकीकरण, स्त्रियांच्या नोकरीमुळे वाढलेलं उत्पन्न, लहान कुटुंब , वस्तूंची सहज उपलब्धता, बदललेली जीवनशैली आणि विचारसरणी ह्या सगळ्यामुळे काळ एकशे ऐंशी अंशात बदलला आहे. अशी शून्यातून करमणूक निर्माण करण्याची गरज अजिबात उरलेली नाही. तरी ही मुलांना अश्या गोष्टी करायला अधून मधुन प्रेरित केलं तर हे खेळ टिकून ही राहतील आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदाची अनुभूती मुलांना ही घेता येईल.
हेमा वेलणकर
सगळ्यात शेवटी बहुदा डोक्यावर
सगळ्यात शेवटी बहुदा डोक्यावर टिपरी ठेवायची आणि ती चौकोनात टाकताना तिची पापी घेऊन टाकायची :P>>> अगदी आठवलंच.
हो ममो स्टॅच्यू तर फारच खेळायचो. प्लॅंचेट काही सर्रास,राजरोसपणे करता येण्यासारखा नव्हता, माझा मुळात अशा गोष्टींवर विश्वासच नव्हता , त्यामुळे मी फक्त एकदाच हा प्रकार करून बघितला आहे. पण तू म्हणतेस तसं गूढ ,थ्रिलींग वाटायचं. ( मी कायम म्हणत राहायचे की चार जणांपैकी कोणीतरी मुद्दाम सोंगटी हलवतं- मला मैत्रिणी घ्यायच्या नाहीत प्लॅंचेट करताना)
त्यांची मजा मी घालवत असीन अशी बडबड करुन
एक 'अनुभवी' मैत्रीण एकदा
एक 'अनुभवी' मैत्रीण एकदा 'आवाहन' करताना "तुम्ही आला असाल तर 'येस'वर जा, नसाल तर 'नो'वर जा' म्हणाली होती आणि मला जे अतोनात हसू यायला लागलं की पुढे कितीतरी दिवस आम्ही प्लॅन्चेट करू शकलो नाही! Lol
न आलेला आत्मा 'नो'वर कसा जाईल?! >> स्वाती हसून हसून मेले.
मलाही आत्ता आठवल्यावर नव्याने
मलाही आत्ता आठवल्यावर नव्याने तितकंच हसू आलं!
प्लॅंचेट चा किस्सा भन्नाट आहे
प्लॅंचेट चा किस्सा जबरी आहे स्वाती
न आलेला आत्मा 'नो'वर कसा जाईल?! >>
आत्म्या च वर्किंग फ्रॉम होम
आत्म्या च वर्किंग फ्रॉम होम असेल लोल
मस्त आठवणी ममो.यातले पत्ते
मस्त आठवणी ममो.यातले पत्ते खेळ, मेंढीकोट,नाटेठोम(हो तसंम्हणायचं असतं ),304 आठवतात.आणि नाव गाव फळ फुल अजून पण खेळतो.विष अमृत खेळायचो.म्हणजे राज्य असलेल्या ने आऊट केलेल्या ला विष मिळालं म्हणजे हात लावला की खाली बसायचं मग धावत येऊन इतरांनी अमृत देऊन परत उभं करायचं.नदी या पहाड खेळायचो.म्हणजे कोणतीही मोठी पायरी किंवा प्लॅटफॉर्म बघून त्यावर राज्य असलेल्याने सांगितलं तसं वर किंवा खाली असायचं आणि तो आउट करणार.तसंच 4 पोल्स पण खेळायचो.म्हणजे 4 जण 4 खांबाला आणि राज्य आलेला खांब घ्यायला बघणार.यात खांब नसले तर कोपरे पण चालायचे.छिप्पी/ठिकरी पण खेळायचो. तो दगड तुकडा घेऊन आखलेल्या घरातून लंगडी घालत पुढे, मग त्यात लेव्हल होत्या.1 घर सोडून, डोळे मिटून,4 घर पुढे दगड वगैरे.
हळूहळू असे विंटेज खेळ एआय ने परत येतील, 3 बाजूला 3 खांब ग्राफिक आणि 3 रोबो प्लेयर्स वगैरे लुडो आणि जंगली रमी आले तसे.
अरे हो, ते 'आला नसाल तर नो वर या' आठवलं कोणालाही यात लॉजिकल लोचे वाटायचे नाहीत.
आमच्या छोट्या इमारतीला ८
आमच्या छोट्या इमारतीला ८ पायऱ्यांचा जिना होता हळूहळू आम्ही ५ व्या ६ व्या असे करत करत ८व्या पायरीवरून म्हणजे अख्या जिन्यावरून खाली उडी मारायला जमवले होते...>>>>
बापरे हे मी पण जमव्ले होते.. आता विचार करुन काटा येतो
मस्त लेख ग हेमा.. आताची पोरे मोबाइलवर गेम खेळतात
चौकोनात टाकताना तिची पापी
चौकोनात टाकताना तिची पापी घेऊन टाकायची
> आणि वाकायचं नाही ती फेक्ताना ताठ उभे राहून फेकायची >>>>> हो हो हे लिहायचं राहिलंच
खूप सुंदर आठवणी.
खूप सुंदर आठवणी.
पावसाळ्यात मेंदीचा पाला तोडून स्वतः हाताने वाटून ती लावण्याचा कार्यक्रम एखाद्या शनिवारी मुद्दाम ठरवला जायचा. >> ह्या प्रकरणात एकदा आम्ही कपडे धुण्याच्या दगडावर मेंदी वाटली. अन दुसऱ्या दिवशी त्याच दगडावर आंधळे काकांनी (ते खरंच आंधळे होते. त्यांच्यावरचा लेख टाकीन इथे कधीतरी ) कपडे धुतले.
पुढे घरच्या सगळ्यांनी आमची (शाब्दिक ) धुलाई केली.
तुम्ही आला असाल तर 'येस'वर जा
तुम्ही आला असाल तर 'येस'वर जा, नसाल तर 'नो'वर जा" म्हणाली होती ! >> Lol
<न आलेला आत्मा 'नो'वर कसा
<न आलेला आत्मा 'नो'वर कसा जाईल?>
आत्म्याने व्हॉट्सअप केला असेल
आत्म्याने व्हॉट्सअप केला असेल 'ऑन लिव्ह टुडे '
मस्त लेख आणि आठवणी . लपाछपी
मस्त लेख आणि आठवणी . लपाछपी खेळताना एकमिकांचे कपडे चेंज करून हात / पाय दिसेल असे लपायचो आणि ज्याच्यावर राज्य आहे तो फसला कि परत त्याच्यावरच राज्य. एखाद्याला टार्गेट करून जाम पिडायचो.
एक 'इंग्लंड लंडन अमेरिका' हा खेळ खेळायचो . ज्याच्यावर राज्य त्याच्या मागे एखादी वस्तू ठेवायची दगड वेग्रे आणि तो' इंग्लंड लंडन अमेरिका' असे म्हणून वळेपर्यंत धावत जाऊन स्टॅचू व्हायचे. मजा यायची खूप पण हे असे का बोलायचो माहित नाही
दुपारच्या वेळी एकदम लहान असताना
'कुणीतरी यावे , टिचकी मारून जावे....
हसू नये बोलू नये , गुपचूप बसावे.... ' हे खेळायचो. एकाचे डोळे हाताने झाकायचे आणि कुणीतरी टिचकी मारून जायचे , नंतर कुणी टिचकी मारली ते ओळखून दाखवायचे.
संत्र लींबू पैशापैशाला
शाळेतल्या मुली आल्या खेळायला
चिंचा खाऊन खोकला झाला
खो खो खो....
यात काय लॉजिक आहे. संत्र लींबू पैशापैशाला असताना मुली चिंचा का खातात हा प्रश्न लहानपणी पडलाच नाही.
टीचकी मारून जावे, आईच पत्र
टीचकी मारून जावे, आईच पत्र हरवलं,शिवाजी म्हणतो, भारत भारत भारत, सागरगोटे हे बैठे खेळ खेळायचो.लगोरी, दगड का माती, दहिभात द्या, तुझा रंग कोणता, चिप्पर पाणी, कांदा पाणी का काहीतरी नावाचा एक खेळ असे खूप खेळ खेळायचो. आता आठवलं कि वाटतय दिवसभर घराबाहेर च असायचो आपण.
प्लँचेट बद्दल खूप मजेशीर आठवण आहे एकदा सगळी भावंड मे च्या सुट्टीत जमलेली, मोठी कुणी घरात नाहीत बघून एका जागी प्लॅंचेट चा घाट एका ताईने घातला. कशावरून आत्मा खरं बोलेल असं कुणी म्हणाल म्हणून गांधीजींना बोलावयाच ठरलं, कि ते सत्य आणि अहिंसा ही आपलीच तत्व पाळतील हा हेतू असावा. थोडं प्लांचेट पुढ गेल्यावर घरातलं कुणी आल्याची चाहूल लागल्या मुळे सगळं मुसळ केरात गेलं. घरच्यांना कळायचं ते कळलं च. खूप ओरडा खाल्ला. पण ताई च मात्र तेव्हाही तेच टूमण सुरु होत. कि आत्मा गांधीनचा होता. तो खरं पण बोलला असता आणि त्याने आम्हाला काही केल पण नसतं. कारण त्यांचीच तत्व होती ना सत्य आणि अहिंसा
>>>>>>> त्याने आम्हाला काही
>>>>>>> त्याने आम्हाला काही केल पण नसतं. कारण त्यांचीच तत्व होती ना सत्य आणि अहिंसा Lol
हे भारी आहे
काचा पाणी, आबादुबी, अपिंगो
काचा पाणी, आबादुबी, अपिंगो बैठिनगो हे पण खेळायचो आबा दुबी आणि अपिंगो बैठिगो खेळतांना बरोबर चे भाऊ, वाड्यातली मुलं रपा रप मारून घ्यायची. इतर वेळी मुलीना डायरेक्ट मारामारी करता यायची नाही ना मग असा वचपा काढायची. नावं सांगू का म्हणाली कि खेळातून बाद व्हायची भीती असायची त्यामुळे नावं ही सांगता यायचं नाही त्यांच्या घरी जाऊन. नावं सांगणे हा कसला भारी प्रकार होता. पर्मनंट धमकी सगळ्यांची, थांब घरी जाऊन नावाचं सांगते तुझं, किंवा सांगणारे नावं तुझं बस मग. हे डायलॉग दिवसातून असंख्य वेळा मारायचो आणि ऐकायचो पण ते प्रत्यक्षात फारस कधी कृतीत येत नसे. आपले राडे आपले आपणच solve करायचो.
पतंग खूप आवडायचं उडवायला पण
पतंग खूप आवडायचं उडवायला पण मिळायचा नाही. दोन मिनिट हातात दिल्यासारखं करून मोठी भावंड, मांजा सोडायला उभ करायची. टायर पळवयाच्या रेस करायचो, फार मजा यायची
Bloody merry नावाचं प्लॅनचेट
Bloody merry नावाचं प्लॅनचेट type च काहीतरी आलं होत मध्यात, त्यावरून लेक लहान असताना त्याचा करायचा प्लॅन उधळून लावला आणि त्याला ओरडले. आत्म्याशी खेळण्यावरून मी आणि त्याने आपल्याला लहानपणी ओरडे खाऊन घराण्याची ओरडा खायची परंपरा कायम राखली
आरश्यात 3 वेळा नाव घेऊन मीठ
आरश्यात 3 वेळा नाव घेऊन मीठ खांद्यावरून मागे टाकलं की ती येते म्हणे.बहुतेक एखाद्या मुलाची आई रागात मीठ सांडलं म्हणून फटके मारायला आली असेल त्याने अफवा पसरवली असेल
@मी अनु,नाही अग आमच्या लेकाच
@मी अनु,नाही अग आमच्या लेकाच version वेगळं होत जरा. रात्री १२नंतर पूर्ण काळे कपडे घालायचे, एक मेणबत्ती घ्यायची आणि फुल साईझ आरश्याच्या समोर उभ राहून bloody merry ला आवतन द्यायचं म्हणे म्हणजे ती येऊन समोरच्या mirror मध्ये तुमचं भूत का भविष्य काहीतरी दाखवणार होती.लेकाच्या रूम च्या कपाटाला बाहेर पूर्ण आरसा होता. त्यामुळे त्याचा प्लॅन होता हे करायचा
म्हणजे चांगला मोठा आरसाच हवा
म्हणजे चांगला मोठा आरसाच हवा(मला ते पिक्चर मध्ये जितेंद्र नाग मरतो आणि त्याच्या डोळ्यात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सारखे 6 खुन्यांचे चेहरे नागिणीला दाखवून जातो ते आठवलं.)
बरं झालं बिल्वा तो घाट,
बरं झालं बिल्वा तो घाट, मोडीत काढलात. ओशोंच्याही एका पुस्तकात हे ध्यान वाचलेले होते की मेणबत्ती लावुन आरशात आपला चेहरा पहात रहायचे काही दिवसांनी आपलेच पूर्वजन्मीचे चेहरे दिसू लागतात.
दिसणारच ना, भास होणारच.
हो ना एक तर तो इतका लहान होता
हो ना एक तर तो इतका लहान होता तिसरी चौथीत असेल. असल्या पोराना असलं ज्ञान कोण वाटत हे विचार करून टेन्शन आलं आधी. मग आठवलं लहानपणी आपण पण याच वयात प्लॅनचेट चे साथीदार होतो. म्हणून मग त्याला सांगितलं कि असलं नसतं काही. पण ते काही त्याला पटेना, म्हणाला अमकी तमकी friend आहे माझी तिने केलंय. मग ओरडले त्याला, तरी पटेना मग आयडिया केली म्हणल बघ तू केलंस bloody merry आणि मेरी ला आपलं घर, तुझी रूम, कपाट, पडदे, furniture यापैकी काहीही आवडल आणि मेरी ने इथंच मुक्काम ठोकला तर तुला रूम share करावी लागेल. ही मात्रा मात्र लागू पडली आणि प्रयोग कॅन्सल झाला
आ़ई ग्गं !!! मजाच आहे.
>>>>>>>>मेरी ने इथंच मुक्काम ठोकला तर तुला रूम share करावी लागेल. ही मात्रा मात्र लागू पडली आणि प्रयोग कॅन्सल झाला
आ़ई ग्गं !!! मजाच आहे.
ज्योती त्राटक ही फेमस विद्या
ज्योती त्राटक ही फेमस विद्या आहे.मूळ हेतू एकाग्रता वाढवणे हा असेल.
https://www.indiatvnews.com/health/tratak-kriya-for-concentration-swami-....
>>>>>>>>>>मेरी ने इथंच
>>>>>>>>>>मेरी ने इथंच मुक्काम ठोकला तर तुला रूम share करावी लागेल. ही मात्रा मात्र लागू पडली आणि प्रयोग कॅन्सल झाला>>
मस्त लेख नेहमीप्रमाणे ममो!
मस्त लेख नेहमीप्रमाणे ममो! कालपासून प्रतिसादही वाचतेय.
ज्याला आट्यापाट्या म्हणतात त्यालाच बहुतेक आम्ही 'झेंडोल' म्हणायचो. याचं अजून एक व्हेरिएशन 'चार पाट्यांचा झेंडोल' असं होतं.
आमच्याकडे बाबांच्या मोटरसायकलचे तीनचार टायर्स पडलेले होते ते खूप फिरवायचो. बाकी वरचे सगळे विषामृत, डोंगर का पाणी, सागरगोटे (आम्ही हे खडे घेऊन खेळायचो) आणि पत्ते, हेही सगळं भरपूर खेळलोय.
पावसाळ्यात आपोआप उगवणारं एक 'घुंगूरकाठी' नावाचं रोप (?) होतं. कमरेइतकं उंच असेल. त्याला घुंगरांसारखी फळं (?) यायची वरती. त्यातली एखादी काठी तोडून आणायचो आणि खेळायचो.
गुंजा तर लहानपणी किती असोशीने जमवल्या त्याला सुमार नाही. आत्ता गेल्या वर्षी गावाला गेल्यावर अचानक एका झुडपात दोन तीन गुंजा मिळाल्या त्या जपून ठेवल्या आहेत.
चाफ्याच्या फुलांच्या अंगठ्या करायचो. टाकळा नावाचं एक मोठं झाड असतं. त्याला काळ्या लांब शेंगा येतात. आत चिकट गर असतो. हिरीरीने त्या गोळा करायचो. स्पर्धा करायचो. शेवटी या सगळ्या शेंगा जायच्या म्हशींच्या पोटात! पारिंग्याच्या (?) बिया लादीवर घासून गरम करून दुसऱ्यांना चटका देणं हाही एक खेळ होता!
भिंग घेऊन दुपारी कहारी उन्हात
भिंग घेऊन दुपारी कहारी उन्हात कागद जाळायचा खेळ खेळायचो. एखाद्या कुणाकडेच भिंग असायचं मग ते आळी पाळीने घेऊन कोण लवकर आग लावू शकतंय असा खेळ असायचा
>>>>>>>>>पारिंग्याच्या (?)
>>>>>>>>>पारिंग्याच्या (?) बिया लादीवर घासून गरम करून दुसऱ्यांना चटका देणं हाही एक खेळ होता! Lol
अच्छा पारिंगा का? आम्ही चटक्याची बी च म्हणायचो.
>>>>>>भिंग घेऊन दुपारी कहारी उन्हात कागद जाळायचा खेळ खेळायचो.
होय.
आता आठवत नाही पण दोरा लावुन प्लास्टिकच्या कपाला का काहीतरी आम्ही दूर जाउन टेलिफोन टेलिफोन खेळत असू.
आरशाने कोणाकोणाच्या घरात कवडसे पाडणे.
हा काड्या पेटीचा फोन आम्ही पण
हा काड्या पेटीचा फोन आम्ही पण करायचो. आणि ऐकू यायचं बाबा त्या दोऱ्यातून . काड्यापेटीला भोकं पाडून फुलपुडीचा दोरा ओवायचा आणि काडी किंवा बटण मस्ट तो बांधायला.
Pages