द्वेष : एक भय गूढकथा, भाग ६

Submitted by प्रथमेश काटे on 17 February, 2024 - 11:44

द्वेष : एक भय गूढकथा
भाग ६

ती झरझर पावलं टाकत चालली होती. अंग गोठवून टाकणारी कडाक्याची थंडी पडलेली ; पण त्याची तिला फिकीर नव्हती. आजूबाजूला भयाण काळोख पसरला होता ; पण तिला त्याचंही बिलकूल भय वाटत नव्हतं. मुळात तिचं आजूबाजूला, इकडे तिकडे लक्षच नव्हतं. लक्ष होतं वर दिसणाऱ्या त्या खिडकीच्या चौकटीकडे. खिडकीत अजूनही उभ्या असलेल्या त्या काळ्या आकृतीकडे. ती आकृती जोरजोरात हातवारे करून तिला बोलावत होती. प्रिया अधीर झाली होती. ती आकृती - म्हणजे तिच्या पपांना ती थोड्याच वेळात भेटणार होती. त्यांना डोळे भरून पाहणार होती. त्यांच्या उबदार कुशीत शिरणार होती. ते तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतील. तिच्या कपाळाचं दीर्घ अवघ्राण करतील. प्रियाचं मन सुखस्वप्नात दंग झालं होतं.

•••••••

श्री धावतच सोनालीच्या खोलीत आला. त्याच्या मागोमाग सोनाली अन् राजाभाऊही होतेच.

" अरे खरंच नाहीये रे बाबा ती रूममध्ये‌." म्हणत सोनाली लाईट ऑन करण्यासाठी बटणांच्या पॅनेलकडे हात नेऊ लागली. तोच तिला थांबवत कुजबूजत्या आवाजात श्री म्हणाला.

" थांब लाईट नको ऑन करू."

" अरे काय..." सोनाली जरा गोंधळली.

" शू... हळू." ओठावर बोट ठेवून तिला गप्प राहण्याची खूण करत श्री खिडकीजवळ भिंतीला टेकून उभा राहिला. सोनाली आणि राजाभाऊ फक्त शांत उभे राहून तो काय करतो ते पाहू लागले. अगदी सावकाश पुढे होऊन श्रीने उघड्या खिडकीतून समोर पाहिलं. आणि ती काळी मानवी आकृती त्याच्या नजरेस पडली. ती आकृती उजव्या बाजूला किंचित मान झुकवून खाली पाहत होती, आणि हाताने इशारा करून कुणाला तरी बोलावत होती. ती आकृती मानवी दिसत होती खरी ; पण त्यात काहीतरी वेगळं वाटत होतं. तो आकार, त्याचे ते हातवारे, आणि एकूणच हालचाली यांमध्ये काहीतरी विसंगती, विचित्रपणा होता खास. शब्दांत न पकडता येणारा ; पण जाणवणारा. तो प्रकार पाहून सोनाली किंवा राजाभाऊंची काय प्रतिक्रिया झाली असती कुणास ठाऊक. श्रीच्या चेहऱ्यावरची रेषाही ढळली नाही. मात्र त्याचं शरीर सावधतेने ताठ झालं होतं. आणि आता तो वळणार होता तोच समोरच्या त्या आकृतीचे हातवारे एकदम थांबले. झुकवलेली मान हळूच वर आली, आणि त्याने एकदम समोर पाहिलं. श्री 'त्या'च्या नजरेस पडला. आणि एकदम तो आकार किंचित ताठरला. त्याच्या शरीराच्या आजूबाजूला करड्या रंगाचे धूराचे लोट जमू लागले. आणि एकदम त्या काळ्या चेहऱ्यावर, डोळ्यांच्या जागी सूक्ष्मशा लालसर, धुमसण्याऱ्या ठिणग्या चमकू लागल्या. श्रीही त्याच्याकडे एकटक रोखून बघत होता. हळूहळू तो आकार धुरकट, अस्पष्ट होऊ लागला. तसा श्री चटकन मागे वळाला, आणि दाराकडे धावला. सोनाली अन् राजाभाऊंना आता सुचनेची गरज नव्हती.

त्याचवेळी प्रिया तिच्या घराच्या बंद दरवाजा समोर उभी होती. तिच्या हृदयात किंचित धडधड होऊ लागली होती. आता उशीर करायला नको. तिने कडी काढून दरवाजा लोटला. आतला काळाकुट्ट अंधार हळूहळू तिच्या समोर विस्तारत गेला. काल रात्री सारखीच आताही तिच्या मनात भीती दाटू लागली.
" पण आता घाबरायची काय गरज. हे शेवटी माझंच घर आहे. इथे माझे पपा आहेत‌. ते मला बोलावत आहेत." स्वतःला समजावत तिने आतमध्ये प्रवेश केला. तोच अचानक तिचं शरीर थरथरलं. क्षणभरात ती पूर्ववत झाली. संथगतीने तिनं तीन चार पावलं पुढं टाकली. जरावेळ थांबून हळूच तिने हॉलवरून नजर फिरवली. अंधारातच. तशीच ती सरळ, बिलकूल न अडखळता किचन मध्ये गेली. तिच्या चालण्याची पद्धत बदलली होती. सहजगत्या ओट्याखालची ट्रॉली पुढे ओढून त्यातून तिने एक धारदार पात्याचा सुरा बाहेर काढला. एकवार तो सुरा निरखून, मग तरातरा चालत किचनमधून बाहेर पडली. आणि वर जाणाऱ्या जिन्याकडे निघाली. भरभर तीन चार पायऱ्या चढली होती तोच मुख्य दरवाजातून कुणीतरी आत येत असल्याची चाहूल लागली. मागोमाग हाक आली.

"‌ प्रिया थांब..." तो श्रीचा आवाज होता. धावत तिच्या जवळ येऊन त्याने‌ पॅसेज मधला लाईट ऑन केला.

" प्रिया." तिच्या खांद्यावर हात ठेवत श्री म्हणाला. प्रिया मागे वळली. तिच्या चेहऱ्यावर मघाचाच बालिश‌ आनंद दिसत होता. जिन्यापाशी सोनाली आणि राजाभाऊ चिंतीत चेहऱ्याने उभे होते. खालच्या पायरीवर उभा असलेला श्री तिच्याचकडे पाहत होता.

" प्रिया इथे काय करतेस ? "

" अरे मला कोण दिसलं ठाऊक आहे ? पपा. माझे पपा. ते मला बोलावत होते. माझी कान पकडून माफी मागत होते रे. " एक्साईट होऊन प्रिया सांगत होती. शेवटी तिच्या शब्दांत हळवेपणा डोकावला होता. श्रीने तिचं बोलणं ऐकून घेतलं. आणि शांतपणे समजावणीच्या सुरात म्हणाला -

" प्रिया ते सगळं खरं नाहीये. तू चल माझ्या सोबत. मी समजावतो तुला."

" अरे काहीतरीच काय बोलतो आहेस. खरं नाही म्हणजे काय ? पपा आहेत ते माझे. ते मला फसवतील का ? हे बघ ते वरती माझी वाट पाहत आहेत मला त्यांना भेटूदे."

" माझं ऐक प्रिया. तुला इथे धोका आहे. मी तुला इथे थांबून देऊ शकत. चल माझ्यासोबत..." असं म्हणून श्री तिचा हात घट्ट पकडून मागे वळाला.

" तुला एकदा सांगितलेलं समजलं नाही का ? " श्री जागीच थबकला. किती उर्मट, जरबेचा स्वर. प्रियाच्या तोंडून ? समोर उभ्या असलेल्या भाऊ आणि सोनालीचे आश्चर्याने - अन् कदाचित भीतीने विस्फारलेले डोळे प्रियावर खिळलेले. तो हळूवारपणे मागे वळाला. तो दगडासारखा कठीण चेहरा प्रियाचा असणं शक्यच नाही. ती त्याच्यावर रोखलेली थंड, तीक्ष्ण, जहरी नजर - तिच्यात अगदी मागे, खोलवर, संतापाची सूक्ष्म ठिणगी लवलवत होती. - प्रियाची कशी असू शकेल ? मात्र हे मानसिक द्वंद्व केवळ राजाभाऊ, सोनालीच्या मनात होतं‌. श्रीच्या नाही. त्याला ' सारं ' समजत होतं.

" सोड माझा हात." हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत त्याच थंड, उर्मट सुरात ती म्हणाली.

" नाही. तुला माझ्यासोबत यावं लागेल." तिचा हात अजून घट्ट पकडून तिच्या डोळ्यांत डोळे घालून बघत शांत ; पण कठीण स्वरात श्री म्हणाला.

" तू माझ्यावर बळजबरी करू शकत नाहीस. गुलाम नाहीये मी तुझी." प्रिया त्वेषाने उद्गारली " जा तुझ्या घरी. आणि तुझे ते मंत्रतंत्र, विधी वैगेरे करीत बस. माझ्या गोष्टींमध्ये नाक खुपसायचं नाही." जसजसा तिचा संताप वाढत होता, तसा तिचा चेहरा अजूनच पालटत होता. कपाळावरची शीर ताणली गेली होती. भुवया आक्रसलेल्या. वटारलेल्या डोळ्यांत लाली उतरली होती. नाक फेंदारलेलं. ओठ थरथरत होते. तिचा तो चमत्कारिक, भयाण अवतार पाहून राजाभाऊ मनातून चरकले. सोनालीच्या काळजात धडकी भरली. सकाळी सुद्धा तिने प्रियाचे रागाने‌ मोठे झालेले डोळे पाहिले होते. दात दातावर रोवलेले बघितले होते ; पण एखाद्या रोबोटला असे एक्सप्रेशन्स द्यायला सांगितल्यावर तो जसा दिसेल तसे ते वाटत होते. तिच्या त्या हावभावांत, हालचालीत कृत्रिमता होती ; पण आता... आता तसं मुळीच वाटत नव्हतं. प्रियाने जोर लावून श्रीचा हात झटकला. तशी मात्र मनातली खळबळ बाजूला सारत, कसाबसा धीर गोळा करून सोनाली पुढे सरसावली.

" प्रिया..." तिचा दंड पकडत मोठ्या आवाजात सोनाली म्हणाली - " भानावर ये.‌ अगं कशी वागते आहेस, कशी बोलते आहेस हे समजतंय तरी का तुला. श्री तुझ्या भल्यासाठी सांगतो आहे ना. भानावर ये."

तिच्या ओरडण्याचा तिला अपेक्षित परिणाम झाला नाहीच, उलट प्रियाने अगदी सहजपणे‌ एक हिसका देत आपला हात सोडवला. आणि सोनालीला जोरात खाली ढकलले. राजाभाऊंनी झटकन पुढे होऊन तिला सावरलं. त्यांच्या मजबूत, आधाराच्या स्पर्शाने बावरून गेलेल्या सोनालीला एकदम बरं वाटलं. तिनं राजाभाऊंकडे पाहत हलकसं स्मित हास्य केलं. राजाभाऊंनीही स्माईल करत तिला प्रतिसाद दिला.

इकडे क्षणभरच स्थिर उभी असलेली प्रिया पुन्हा वळून पायरी चढू लागली ; पण श्रीने आपल्या बळकट हातात तिचा दंड घट्ट पकडला होता.

" सोड. सोड मला." प्रिया रागाने गुरगुरत होती. मिनीटभर त्यांची झटापट सुरू होती. पण पुन्हा प्रियाने कसाबसा‌ आपला हात सोडवला, आणि एकदम ती इंचाइंचाने हवेत तरंगू लागली. वरवर जाऊ लागली. तिच्या ओठांवर कुत्सित हास्य होतं. त्या अनपेक्षित गोष्टीने श्रीही जरा चमकला. पण लगेच स्वतःला सावरून त्याने आपल्या जॅकेटच्या खिशातून छोटीशी पुडी काढली. त्यातलं द्रव्य हातात घेतलं. आणि डोळे मिटून तो काहीतरी पुटपुटू लागला. एकीकडे प्रिया मान वर करून जोरजोरात हसत होती. अजूनच वेगाने तरंगत वर वर जात होती. भाऊ अन् सोनाली चिंतातुर, असहाय नजरेने समोर सुरू असलेला प्रकार बघत होते.
एकदम श्रीने डोळे उघडून वर प्रिया कडे पाहिलं.

" जय श्रीराम." खणखणीत आवाजात रामनाम उच्चारत श्रीने हातातील द्रव्य प्रियावर फुंकरलं. तशी एकदम आधार सुटल्यासारखी वेगाने प्रिया खाली आली मात्र सावध असलेल्या श्रीने तिला सावरलं. पुन्हा ती सुटण्यासाठी तडफडू लागली ; पण आता तिची शक्ती खूपच क्षीण झाल्यासारखी वाटत होती.

" सोनाली. राजाभाऊ प्रियाला धरा एक मिनिट." तो मागे मान वळवून म्हणाला. त्या दोघांनाही क्षणभर शंकाच वाटत होती ; पण शेवटी पुढे होऊन प्रियाला धरलं. श्रीने खिशातून एक केशरी, पिवळ्या रंगाचा मोठा धागा काढून प्रियाचे हात बांधले. मग तिला घेऊन ते बाहेर पडली. बाहेर पाऊल टाकताक्षणी प्रियाचा शरीराला एक झटका बसला. आणि बेशुद्धावस्थेतून शुद्ध आल्यासारखी ती आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली

क्रमश:
© प्रथमेश काटे

Group content visibility: 
Use group defaults

छान सुरुय
थोफे मोठे भाग टाकता काय?
उत्सुकता ताणली जातेय फार. Happy