अपहरण - भाग १

Submitted by स्मिताके on 14 February, 2024 - 08:16

८ जून १८९३. सकाळी दहा वाजताची वेळ. न्यू यॉर्क, शिकागो, फिलाडेल्फिया, सॅन फ्रान्सिस्को, बॉस्टन..सर्व मोठ्या शहरांतल्या स्थानिक वृत्तपत्रांच्या इमारतींबाहेर प्रचंड गर्दी जमली होती. पूर्वी जेम्स गारफील्ड या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येनंतर अशी गर्दी झाली होती म्हणतात. रात्रीपर्यंत तर इतकी खळबळ माजली, की लिंकन यांच्या हत्येच्या दिवसाची आठवण यावी.

असं काय घडलं होतं म्हणता? न्यू यॉर्क ट्रिब्यूनने ठळक मोठ्या लालभडक अक्षरांत फलक लावला होता.
"अनपेक्षित दुर्घटना. भयंकर गूढ परिस्थिती. व्हाईट हाऊसमधून राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी गायब. दोन नोकर गुदमरल्या अवस्थेत सापडले.
दोन्ही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा मागमूस नाही. या घटनेमागच्या भयानक शक्यता लक्षात घेता देश हादरला आहे."

वृत्तपत्रांचा खप अनेकपटींनी वाढला, पण यापेक्षा जास्त बातमी कोणाकडेच नव्हती. सगळीकडचे व्यापार, व्यवहार थांबले. शेअरबाजार अर्ध्या तासात वीस टक्क्यांनी कोसळला. देशावर अवकळा पसरली. हा बनाव विरोधी पक्षाने रचला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. पण काही तासांतच ही सनसनाटी बातमी खरी असल्याचं निश्चित झालं.

न्यू यॉर्क सनने संध्याकाळच्या आवृत्तीत ही दुर्दैवी बातमी छापली :
"राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी दोघेही खरोखरीच नाहीसे झाले आहेत. दोन्ही नोकरांची जबानी घेऊन, भयंकर कारस्थानात सामील असल्याच्या संशयावरून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे व्हिजिटिंग कार्ड व्हाईट हाउसच्या प्रवेशद्वाराजवळ सापडले. एखादं काळंकुट्ट राजकीय कारस्थान उघडकीस येणार? "

दुसरा दिवस उजडला. परिस्थिती जैसे थे. सर्व प्रकारच्या अफवांचं पेव फुटलं. सुन्न झालेलं मंत्रिमंडळ जगभरातल्या राष्ट्रप्रमुखांचे सांत्वनपर संदेश स्वीकारू लागलं. बातमीसाठी टपून बसलेल्या वृत्तपत्रांना हे संदेश जसेच्या तसे देण्यात येऊ लागले. इतर कोणत्याही प्रकारची बातमी छापली जाऊ नये, असा आदेश उपाध्यक्षांनी दिला, आणि वृत्तपत्रं तो कसोशीने पाळू लागली. संपूर्ण देशावर रहस्याचं सावट पसरलं. गुप्तहेरखातं हतबल ठरलेलं पाहून जणू प्रत्यक्ष नैराश्य त्यांना पाहून खदखदा हसू लागलं.
सगळीकडे एकच चर्चा. "काय? काही कळलं का?" "छे. काही नाही."

मॅसॅच्युसेट्सचे गव्हर्नर म्हणाले, "यात काय आश्चर्य! दरवर्षी हजारो मारेकरी घुसताहेत देशात. प्रत्यक्ष राष्ट्राध्यक्षसुद्धा सुरक्षित नव्हते म्हणायचे! देवा, वाचव बाबा आमच्या देशाला."

काही दिवसांनी वृत्तपत्रांनी या रहस्यमय अपहरणाबद्दलची सविस्तर बातमी छापली.

व्हाईट हाऊसच्या मुख्य दरवाजाजवळच्या रात्रीच्या पहारेकऱ्याची जबानी:
"माझं नाव जॉर्ज हेनरी. वय चौतीस. माझा जन्म या देशात झाला. माझा बाप गुलाम होता. रात्री सुमारे दीडच्या सुमाराला मुख्य दरवाजावर दोन थापा मारल्याच्या आवाजाने मला जाग आली. म्हणजे मी तसा काही झोपलो नव्हतो.. जरासा पेंगत असेन. कोण आहे, असं मी विचारल्यावर बाहेरून आवाज आला की राज्यसचिवांचं अतिशय महत्त्वाचं काम आहे, ते अध्यक्षांना भेटायला आलेत. अध्यक्ष झोपलेत असं मी सांगितलं, पण ताबडतोब भेटलं पाहिजे असं ते म्हणाले. आवाज ओळखीचा होता, म्हणून मी दार उघडलं. राज्यसचिव आत आले. त्यांनी त्यांचा नेहमीचा राखाडी रंगाचा ओव्हरकोट आणि टोपी घातली होती. आपलं व्हिजिटिंग कार्ड माझ्या हातात देऊन, ते अध्यक्षांना नेऊन दे, असं ते म्हणाले. दार उघडंच होतं, त्यामुळे माझ्या लक्षात आलं, की त्यावेळी पाऊस पडत होता. पोर्चखाली त्यांची बग्गी उभी होती, पण गाडीवान दिसला नाही. मी झुकून त्यांना अभिवादन केलं, आणि वळून आत जायला निघालो. तेव्हढ्यात कसलासा विचित्र वास आला. यापुढचं काही मला आठवत नाही."

जॉर्ज हेनरी प्रामाणिकपणे आणि हुशारीने जबानी देत होता. उलटतपासणीत त्याने सांगतलं, की तो आवाज राज्यसचिवांचाच होता, पण ते जरा सर्दी झाल्यासारखे बोलत होते. ती बग्गीही राज्यसचिवांचीच होती, कारण दोन्ही घोडे त्याच्या ओळखीचे होते. एक काळा, एक करडा. त्यावेळी बाहेर दुसऱ्या कोणाचाही आवाज ऐकू आला नव्हता.
मग त्याला क्लोरोफॉर्म दाखवण्यात आलं. तो वास त्याने ओळखला. पण त्या रात्री त्या वासात दुसराही एक आंबटसर वास मिसळलेला होता, असं तो म्हणाला. पुन्हा पुन्हा प्रश्न विचारल्यावर हीच जबानी त्याने दरवेळी दिली, आणि त्यात कसलाही फरक किंवा गोंधळ जाणवला नाही. एकंदर परिस्थिती राज्यसचिवांकडे संशयाचं बोट दाखवत होती.

पुढचा साक्षीदार: दुसऱ्या मजल्यावरचा रात्रीचा पहारेकरी. हा अतिशय घाबरलेला, थोडासा गोंधळलेला दिसत होता. पण त्याची जबानी साधी सरळ होती:
"सर, माझं नाव फ्रॅंक स्टीव्हन. जन्मापासून मी आपला काळ्या वर्णाचाच आहे. मी बारा वर्षांचा असताना माझा जन्म ओहायो राज्यात झाला. (या ठिकाणी साक्षीदाराच्या तोंडावर बर्फाच्या पाण्याचे हबके मारण्यात आले. मग तो भानावर आला.) म्हणजे, मी बारा वर्षांचा असताना ओहायो राज्यात गेलो. माझा जन्म मिसिसिपी राज्यात झाला होता. मला वाटतं, आज माझं वय बेचाळीस असेल. त्या रात्री दीड वाजता, किंवा कदाचित अडीच वाजले असतील, मला पावलांचा आवाज आला. कोणीतरी जिन्यावरून वर येत होतं. मी अर्ध्या जिन्यात जाऊन पाहिलं, तर आपले राज्यसचिव. त्यांची टोपी ओळखली मी. आता इतक्या मध्यरात्री ते आत कसे काय आले, ते एका देवालाच ठाऊक. त्यांनी मला अध्यक्षांची खोली दाखवायला सांगितलं. तसे ते दरडावूनच बोलत होते, पण मला वाटलं, एवढे मोठे राज्यसचिव आहेत, दरडावले तर काय नवल.
मग मी त्यांना अध्यक्षांच्या खोलीजवळ घेऊन गेलो. आता दार वाजवणार, इतक्यात सचिवांनी मला थांबायला सांगितलं. आधी एक सिगार ओढणार का? म्हणाले. मी तर थक्कच झालो. याआधी कधी त्यांनी मला सिगार बिगार दिला नव्हता. त्यावेळी सगळीकडे एक विचित्र वास येत होता. औषधांच्या दुकानात येतो ना, तसला. इतकंच आठवतं मला, सर."

फ्रॅंक स्टीव्हनच्या उलटतपासणीतून काही वेगळं हाती लागलं नाही. पण त्याला आणखी काही तपशील आठवले. त्याच्याशी बोलता बोलता राज्यसचिव तोंडावर रुमाल धरून खोकत होते. त्यांनी ओव्हरकोट कानावरून ओढून घेतला होता, आणि त्यांचा एक हात सतत ओव्हरकोटात दडलेला होता. त्यांची टोपी डोक्यावरच होती, या गोष्टीचं फ्रँक स्टीव्हनला आश्चर्य वाटलं होतं, कारण ते नेहमी आत आल्याबरोबर टोपी काढत असत. पहिल्या साक्षीदाराप्रमाणेच यानेही क्लोरोफॉर्मचा वास ओळखला, आणि त्यात दुसराही एक वास होता, हेही सांगितलं. आपण शुद्धीवर आलो तेव्हा आपले हातपाय बांधलेले होते आणि श्वास गुदमरलेला होता याबद्दल त्याने आश्चर्य व्यक्त केलं. दोन्ही साक्षीदारांनी एकमेकांच्या अपरोक्ष दिलेली जबानी तंतोतंत जुळत होती. म्हणजे त्यात तथ्य होतं नक्कीच. राज्यसचिव संशयाच्या भोवऱ्यात सापडले. सकाळी दहा वाजताच्या सुमारास त्यांच्यावर गुप्त पहारा बसवण्यात आला. अजून अटकेची काही हालचाल नव्हती.

यानंतरचा महत्त्वाचा साक्षीदार म्हणजे राष्ट्राध्यक्षांचा स्वीय सहाय्यक. त्याने शपथेवर सांगितलं, की त्या रात्री डोकेदुखीमुळे राष्ट्राध्यक्ष लवकर झोपले होते. मला विश्रांती हवी आहे, जराही आवाज गडबड होऊ देऊ नकोस, असा त्यांचा आदेश होता.

इथे एक गोष्ट नमूद केली पाहिजे. राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी, दोघेही जेफरसनच्या साधेपणाच्या विचारसरणीने भारावलेले होते. व्हाईट हाऊसमध्ये येण्याअगोदर ते आपल्या घरात जसे राहत, तसेच अजूनही राहत होते. त्यांनी आपले खाजगी सुरक्षा अधिकारी काढून टाकले होते. इतक्या मोठ्या मानाच्या पदावर असूनही ते अगदी अनौपचारिक साधेपणाने राहत, झोपत, इतकंच काय,खाशा पाहुण्यांना पाहुणचारही साधाच मिळे. त्यांच्या शयनगृहाकडे जाणाऱ्या दारांना क्वचितच कधी कुलुपं घातलेली दिसत. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी त्या दोन पहारेकऱ्यांच्या हातात सोपवलेली होती.

त्यांची मुलं आणि मुलांच्या दाया आजूबाजूच्या खोल्यांतून झोपत. त्या रात्री यापैकी कोणीही कसलाच आवाज ऐकला नव्हता. थोडक्यात, मध्यरात्रीनंतर व्हाईट हाऊसमध्ये कोण शिरलं, ते तुरुंगात डांबलेल्या त्या दोन पहारेकऱ्यांशिवाय कोणालाच ठाऊक नव्हतं. दरम्यान, साध्या वेषातले रक्षक व्हाईट हाऊसमध्ये सर्वत्र पेरण्यात आले. ते प्रत्येकावर आपली सराईत करडी नजर ठेवू लागले.

(भाषांतर) क्रमश:

भाग २ : https://www.maayboli.com/node/84681

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मी चिन्मयी, किल्ली, king_of_net, झकासराव, अश्विनी ११, आबा
प्रतिसादाबद्द्ल आभारी आहे.