पश्चिमेचे शब्दकुंचले

Submitted by कुमार१ on 22 January, 2024 - 07:21

प्रसिद्ध साहित्यिक महेश एलकुंचवार (मए) यांनी सन २००४ मध्ये दैनिक लोकमतच्या रविवार पुरवणीसाठी ‘पश्चिमप्रभा’ या नावाने स्तंभलेखन केलेले होते. यामध्ये त्यांनी विविध पाश्चात्य पुस्तकांचा वाचकांना परिचय करून दिला होता. या पुस्तकांमध्ये नाटक, कविता, कादंबरी, आणि पत्रव्यवहारादी साहित्यप्रकारांचा समावेश होता. त्या लेखनाचे संकलन करून मौज प्रकाशनाने ‘‘पश्चिमप्रभा’ हे पुस्तक प्रकाशित केलेले आहे. त्याची तिसरी आवृत्ती मी वाचली. या पुस्तकातील काही वैशिष्ट्यपूर्ण आणि मला भावलेल्या गोष्टी सांगण्यासाठी हा लेख.

मए स्वतः नामवंत नाटककार असल्यामुळे त्यांनी या लेखांसाठी मुख्यतः नाटके निवडलेली आहेत.
त्या खालोखाल क्रमांक लागतो तो कवितासंग्रहांचा. पुस्तकात एकूण ३१ लेख आहेत. त्यापैकी काही मोजक्या लेखांचा परिचय करून देतो. पुस्तकातील लेखांची विभागणी साहित्यप्रकारानुसार नाही. किंबहुना क्रमवार पाहता त्या सर्व प्रकारांची मिसळण झालेली आहे. इथे परिचय करून देताना मात्र मी साहित्यप्रकाराच्या विभागानुसार करून देतो. प्रत्येक विभागात लेखाचे नाव आणि त्याच्या कंसात मूळ लेखकाचे नाव देत आहे.

नाटक आणि नाट्यशास्त्र
या प्रकारातील खालील पाच लेख उल्लेखनीय वाटले :
१. टोवर्ड्स अ पुअर थिएटर (ग्रोटोवस्की) : या पुस्तकात लेखकाने नाटक म्हणजे काय, या मूलभूत प्रश्नाला हात घातलाय. पारंपरिक नाटक म्हटले की त्याची एक विशिष्ट प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात ठसलेली असते. परंतु नाटकाच्या डामडौलापैकी काय काय नसले तरी नाटक होऊ शकते, असा प्रश्न ते उपस्थित करतात आणि मग त्याचे उत्तर देऊन टाकतात. पात्रांचे पोशाख, नेपथ्य, संगीत, नृत्य व प्रकाशयोजना या सर्व अवांतर गोष्टी आहेत. दिग्दर्शक नसला तरी चालू शकतो आणि लिखित संहिता नसली तरीसुद्धा नाटक होऊ शकते, असा शेवटचा बॉम्ब ते निवेदनात टाकतात !

सारांश : जीव ओतून अभिनय करणारा एक नट आणि त्याला पाहणारा एक प्रेक्षक या किमान गोष्टींनी नाटक सिद्ध होते, हा त्यांचा निष्कर्ष. नाटकाने टीव्ही आणि चित्रपट यांच्या श्रीमंतीशी बरोबरी करण्याच्या फंदात पडू नये; त्याऐवजी नाटकाची बलस्थाने जाणून ती प्रेक्षकांसमोर आणावीत हा त्यांचा मुख्य मुद्दा. म्हणून नाटक हे पुअर थिएटर.
(पूर्वी मी ‘एक शून्य तीन’ आणि अन्य एक नाटक रंगभूमीवर प्रत्यक्ष पाहिले होते. त्यात प्रोजेक्टर व स्क्रीनचा बऱ्यापैकी वापर झालेला होता. नाटक ही ‘जिवंत’ कला सादर करताना त्यात या दृकश्राव्य माध्यमांचा वापर करावा का, असा प्रश्न माझ्याही मनात तेव्हा आला होता. प्रस्तुत लेखाने त्याची आठवण झाली).

२. खुला अवकाश (पीटर ब्रूक) : मूळ लेखकाच्या ‘The Empty Space’ या पुस्तकाचा हा परिचय. यात त्यांनी कुठल्याही खुल्या अवकाशाला रंगमंच म्हटलेले आहे आणि रंगभूमीचे चार प्रकार सांगितले आहेत. त्यांची नावे वैशिष्ट्यपूर्ण आहेत :
(१) अ डेडली थिएटर (वाईट रंगभूमी)
(२) अ होली थिएटर
(३) अ रफ थिएटर, आणि
(४) अॅन इमिडिएट थिएटर.

त्यातल्या पहिल्या तिघांचा परिचय या लेखात आलेला आहे त्याबद्दल थोडक्यात सांगतो.
डेडली थिएटर : जगभरच्याच ढासळू लागलेल्या (व्यावसायिक) रंगभूमीला त्यांनी हे नाव दिले आहे. ती उदबोधन करीत नाही, कलात्मक अनुभव देत नाही आणि धड करमणूकही करत नाही असे त्यांचे मत.
होली थिएटर : याचा अर्थ अदृश्य असणाऱ्या सर्व गोष्टींना दृश्यात्मकता देणारी कला. ज्या गोष्टींची आपल्याला जाणीवच नसते त्यांची जाणीव रूपबंध, नाद आणि लय यांच्या साह्याने करून देणे अशी ही संकल्पना.
रफ थिएटर : ही लोकप्रिय रंगभूमी असून ग्रामीण ओबडधोबडपणा, दांडगेपणा आणि थोडाफार व्रात्यपणा ही तिची अंगभूत लक्षणे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, तमाशा !

वरील २ व ३ मधील फरक सांगताना लेखक म्हणतात, की ‘होली’मध्ये प्रार्थना असते आणि ढेकर दिलेला चालणार नाही; परंतु ‘रफ’मध्ये ढेकरच देण्यात येतो, तिथे प्रार्थनेचे काम नसते.

३. तिघी (चेकॉव्ह) : यांच्या ‘थ्री सिस्टर्स’ नाटकाचा हा परिचय. ते लघुकथाकार म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांनी १६ नाटकेही लिहिलेली आहेत. त्यांची नाटके तरल आशयाची आणि तितकीच घनता असलेली असतात. मराठी रंगभूमीवर इतक्या पाश्चात्य कलाकृतींचे अनुवाद झाले परंतु गेल्या दीडशे वर्षात आपल्या रंगभूमीने चेकॉव्ह-नाटकांना हात लावण्याचे धैर्य दाखवलेले नाही हे मए लक्षात आणून देतात. हे नाटक वरवर दिसायला कौटुंबिक आहे परंतु त्यातून व्यक्तींच्या कमालीच्या तरल व जटील मनोवस्था दाखवल्यात. हे नाटक म्हणजे रसातळाला जाणारी एक मूल्यव्यवस्था आणि त्या वेळेचा काळ यांचे अलिप्त चित्रण आहे. चेकॉव्ह यांच्या व्यक्तीचित्रांमधून निव्वळ माणसे नाही तर त्यांचे आत्मे वावरताना दिसतात अशी टिपणी मएनी केलेली आहे.

४. भुते (Ghosts – हेनरीक इब्सेन) : मराठी रंगभूमीवरच्या पाश्चात्त्य प्रभावाची चर्चा करताना इब्सेन हे नाव महत्त्वाचे असते. हे नाटक वरवर सुखी दिसणाऱ्या वैवाहिक संबंधांमधला पोकळपणा दाखवते. त्याची रचना रहस्यमय प्रकारे केलेली आहे. किंबहुना हे नाटक विवाहसंस्थेवरचा हल्ला म्हणूनच त्यांनी लिहिले असे अभ्यासकांचे मत आहे. आपले नाट्यलेखन कोणत्या जातीचे आहे हे सांगण्यासाठी खुद्द इब्सेन यांनीच एक मजेदार किस्सा लिहून ठेवलेला आहे. त्यांनी घरात एक विंचू पाळलेला होता व त्याच्या काचेच्या घरात ते नेहमी एक सफरचंद ठेवत. विंचवाच्या नांगीत विष झाले की तो त्या सफरचंदावर नांगी मारून येई व आपल्या विषाचा निचरा करी. आपले नाट्यलेखन ह्याच जातीचे आहे असे त्यांनी स्वतः म्हटलेले आहे !

५. एंडगेम (सॅम्युअल बेकेट) : या नाटककाराचे नाव उच्चारताच त्यांनी पुरस्कार केलेली ‘अर्थहीन रंगभूमी’ नजरेत भरते. परंपरेचे अनेक प्रचलित संकेत मोडूनतोडून त्यांनी नाट्यरचना केल्या. ‘वेटिंग फॉर गोदो’ या त्यांच्या नाटकामुळे ते अजरामर झालेत. लघुत्तम नाटके लिहिण्यात तर त्यांचा हातखंडा ! मी यापूर्वी त्यांच्या ‘कम अँड गो” या तीन मिनिटांच्या, तर ‘द ब्रेथ’ या 35 सेकंदांच्या नाटकाचा परिचय अन्यत्र करून दिलेला आहे (https://www.maayboli.com/node/79719). त्यांच्या नाटकातील अर्थाची रहस्ये उलगडायची म्हणजे, अंधाऱ्या खोलीत नसलेले काळे मांजर शोधण्याचा खटाटोप अशी मार्मिक टिपणी मएनी केलेली आहे.

या नाटकात एक अंध मनुष्य, त्याचे रांजणात दडवून ठेवलेले आईबाप आणि एक मदतनीस अशी पात्रे आहेत. परंतु ती निरनिराळी पात्रे नसून मनाच्या तळाशी दडपून टाकलेल्या आठवणी, अपराधभावना आणि वांझबुद्धी यांची प्रतिके असावीत असे दिसते. मृत्यूघटकेला व्यक्तिमत्त्वाचे विघटन होऊ लागते आणि त्या क्षणाचे नाट्यरूप म्हणजे हे नाटक.

कादंबरी

पुस्तकातील कादंबरींवरील लेखांत सॉमरसेट मॉम यांची “ऑफ ह्यूमन बाँडेज” ही विशेष उल्लेखनीय. सुमारे साडेसहाशे पानांची ही बृहदकादंबरी. या प्रकरणाला ‘अनुबंध’ असे सुयोग्य नाव दिले आहे. तिच्याबद्दल मए काय म्हणतात ते सांगण्यापूर्वी माझा या कादंबरीशी असलेला अनुबंध सांगतो.
1980 च्या दशकात मी ही कादंबरी संपूर्ण वाचली होती. ती आत्मचरित्रात्मक आहे या पलीकडे त्यातले माझ्या आता काहीही लक्षात राहिलेले नाही. अपवाद मात्र फक्त एका ओळीचा. या पुस्तकाच्या प्रस्तावनेच्या तळटीपेतले वाक्य असे होते :

For your own satisfaction and mine please read this preface.

ते मनावर अगदी कोरले गेले. किंबहुना हे वाक्य मनात ठसल्यानंतरच मला पुस्तकाच्या प्रस्तावना वाचायची सवय लागली. अशा प्रकारच्या कादंबरीला जर्मन भाषेत एक आगगाडीसारखा लांब असा शब्द आहे : Bildungsroman.
OfHumanBondage.jpg

विसाव्या शतकातील शंभर श्रेष्ठ पाश्चात्य कादंबऱ्यांमध्ये Modern Libraryने तिला ६६व्या क्रमांकावर ठेवले आहे. कादंबरीचा सारांश एका वाक्यात असा सांगता येईल : एखाद्याने एखाद्या क्षुद्र व स्वार्थी व्यक्तीवर जिवापाड प्रेम केले तर त्याच्या वाट्याला जे दुःखभोग येतात त्याची ही दीर्घ कहाणी. आता मए यांची तिच्यावरील टिप्पणी पाहू.

कादंबरीचे साधारण तीन खंड पाडता येतील. त्यातला मधला खंड म्हणजे तिचा आत्मा असून त्यात कादंबरीचा नायक आणि आणि त्याची प्रेयसी यांची धगधगती प्रेमकथा आहे. त्याचे वर्णन अत्यंत उत्कट, निःसंदिग्ध आणि वाचकाला पिळवटून टाकणारे केलेले असून त्यामुळेच ही कादंबरी अभिजाततेच्या जवळपास पोचते. पहिला आणि शेवटचा खंड वाचकांसाठी अनावश्यक वाटतो कारण त्यातले व्यक्तिगत तपशील हे फारच वर्णनात्मक आहेत.

कादंबरीचा नायक अपंग असून तो वैद्यकीय शाखेचा विद्यार्थी आहे तर त्याची प्रेयसी हॉटेलमधील वेटर आहे. तो वेड्यासारखा तिच्या प्रेमात पडतो. परंतु तिच्या बाजूने मात्र त्याची फसवणूक आणि लुबाडणूकच केली जाते. अखेरीस हे प्रेम असफल होते. तो त्याच्या मार्गाने जातो आणि तिचा अध:पतित मार्ग वेश्याबाजारात जाऊन ठेपतो. १९१५मध्ये ही कादंबरी लिहिली गेली. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी खुद्द मॉमनाच ती अतिदीर्घ झाल्याचे जाणवले आणि त्यांनी तिची दीडशे पानांची संक्षिप्त परंतु अधिक चटपटीत अशी आवृत्ती लिहिलेली आहे.

कवितासंग्रह
यातल्या दोन लेखांची दखल घेतो.
१. गवताची पाती (Leaves of grass - वॉल्ट व्हिटमन) : लेखकाने यांना अमेरिकेचे आद्यकवी म्हटलेले आहे. त्यांच्या कवितांमधून मानवतेबद्दलची अपार करूणा व विश्ववात्सल्य याची प्रचिती येते. मएंच्या म्हणण्यानुसार एखादी नवी संस्कृती उदयाला येऊन उमलत असतानाच त्या संस्कृतीचे महाकवी जन्माला येतात; याउलट संस्कृती परिपक्व झाल्यावर कवींचा ऱ्हास सुरू झालेला असतो ! जेव्हा अमेरिका एक राष्ट्र म्हणून ऐसपैस पसरू लागली होती त्या प्रसरणशीलतेची पडछाया व्हिटमन यांच्या कवितांमध्ये दिसते. त्यांच्या कवितांमध्ये अमेरिकेची स्वप्ने, प्रेरणा आणि महत्त्वकांक्षेचा परिपाक दिसतो. त्यांच्या कवितेतील आध्यात्मिकतेमुळे ते निव्वळ अमेरिकी न राहता विश्वकवी होतात अशा टिपणी लेखात आहे.

२. वनफूल (the poetry of Robert Frost) : फ्रॉस्ट यांच्या कवितांचा हा संपादित काव्यसंग्रह. या कवीवर अमेरिकेने तर उदंड प्रेम केलेच परंतु त्यांच्या ‘स्टॉपिंग बाय वुड्स’ आणि ‘ द रोड नॉट टेकन’ या जगप्रसिद्ध कवितांमुळे भारतीयांना सुद्धा ते ‘आपले’ कवी वाटतात. त्यांच्या कवितांतून फसवा साधेपणा, निसर्गाशी एकतानता साधणारी लय आणि उदास पण खंबीर शहाणपण दिसून येते. त्यांच्या जमान्यात त्यांच्यावर ‘ग्रामीण कवी’ हा शिक्का बसलेला होता. परंतु त्यांची जीवनदृष्टी पूर्णपणे वेगळी असून ती बहुसंस्कृतिक असल्याचे प्रतिपादन मए करतात. त्यांच्या कवितांच्या काही सुट्या ओळी सुद्धा अवतरणे म्हणून प्रसिद्ध झाल्यात ( उदा. Good fences make good neighbours). त्यांच्या सर्वच कवितांतून विषयाची खोल समज दिसून येते. त्यांच्या टीकाकारांनी त्यांना तेव्हा जुनाट ठरवून टाकलेले होते. परंतु ते परंपरावादी नाहीत असे आग्रही प्रतिपादन मएनी केलेले आहे.

पत्रव्यवहार संग्रह
या सदरात एक लेख आहे :
दुःखाचे व्यासपीठ (The letters of Van Gogh) : अर्थपूर्ण पत्रव्यवहार हा सुद्धा एक प्रस्थापित साहित्यप्रकार आहे. पाश्चात्य जीवनात आणि साहित्यव्यवहारात अशा प्रकारच्या पत्रव्यवहाराचे फार मोल आहे. प्रसिद्ध चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉफ यांनी आपल्या थिओ नावाच्या धाकट्या भावाला लिहीलेल्या पत्रांचा हा संग्रह. या पत्रांमधून त्यांचा निखळ खरेपणा, शालीनता आणि मार्दव दिसून येते. त्यांच्या पत्रांमधून दुःखाची परिसीमा दिसते पण त्याचबरोबर वाचणाऱ्याच्या मनाला धैर्य देणारे अलौकिक मनही दिसते. अशा प्रकारच्या पत्रांतून संबंधिताचे अंतर्मन वाचकांसमोर उघडत असते.
. . .

निवडक पाश्चात्य साहित्याचा व्यासंगपूर्ण परिचय करून देणारे असे हे पुस्तक. यातील मूळ लेखकांच्या पुस्तकांपैकी मी फक्त “ऑफ ह्यूमन बाँडेज” ही कादंबरी आणि फ्रॉस्ट यांच्या काही कविता वाचलेल्या होत्या. त्यामुळे अनुबंध हा लेख सर्वात आधी झपाटल्यासारखा वाचला. पुस्तकातील सर्वात आवडलेला लेख ग्रोटोवस्की यांच्यावरचा. यामध्ये त्यांनी ‘नाटक’ म्हणजे काय, या मूलभूत मुद्द्यावरच सुरेख चिंतन केलेले आहे.

या वाचनानिमित्ताने अन्य काही महत्त्वाच्या लेखकांच्या दर्जेदार साहित्यकृतींचा वाचनानंद मिळाला. नाटकांसंबंधीच्या दोन लेखांवर मी विजय तेंडुलकर यांचेही परिचयात्मक लेख आधी वाचलेले होते. त्यामुळे मनात नकळतपणे या दोन नाट्यमहर्षींची तुलना झाली. मला तेंडुलकरांची लेखनशैली खेळकर आणि वाचकाच्या अधिक जवळ जाणारी वाटली. अर्थात मए यांच्या या लेखनातून त्यांचा नाट्यशास्त्राचा सखोल अभ्यास आणि विद्वत्ता जाणवते. काही लेखांतील भाषा तत्त्वचिंतनात्मक पातळीवर गेल्याने काहीशी जड झालेली आहे. पण एकंदरीत पुस्तक रसपूर्ण आणि वाचनीय आहे. पुस्तकातले काही शब्द माझ्या वाचनात प्रथमच आले. ‘अकिंचन, शबलित, जुगुप्साकिंवदंती’ ही त्यातली काही उदाहरणे. त्यांचा शब्दकोशातून शोध घेण्याच्या निमित्ताने व्यक्तिगत भाषा समृद्ध झाली.

पुस्तकातील बहुतेक सगळ्या लिखाणात पाश्चात्य साहित्यिकांचा उल्लेख आदरार्थी बहुवचनीच केलेला आहे. एरवी अशा प्रकारच्या मराठी लेखनात ही गोष्ट अभावाने आढळते. म्हणून त्याची विशेष नोंद.

नाट्यलेखनामध्ये अधूनमधून पाश्चात्यांच्या आणि आपल्या रंगभूमीची बारकाईने तुलना केलेली आढळते. तेव्हा कधी कधी आपल्या रंगभूमीला दिलेल्या शालजोड्या मार्मिक आहेत. उदाहरणार्थ, ‘त्यांच्या’ नाटकांमधून व्यक्त होणारा सामाजिक आशय सूचकपणे येतो; या उलट आपल्याकडे ‘सामाजिक’ नाटक म्हटल्यावर त्यातला सामाजिक आशय डोक्यात अगदी हातोड्याने ठोकून ठोकून बसवलेला असतो !

माझ्या यंदाच्या पुस्तकवाचनाची सुरुवात या सकस पुस्तकाने झाल्याने आनंद आणि समाधानाची भावना आहे.
*********************************************************************
पश्चिमप्रभा
महेश एलकुंचवार
मौज प्रकाशन
(चित्रसौजन्य : विकी)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतोय....
घाशीराम, महानिर्वाण अशी नाटकं मला विसरणं कठीण....
मला घाशीराम चा फाॅर्म ज्यात बरंच मिश्रण आहे जसं किर्तन,लावणी,ताल वाद्य आवडतं. सेट नाहीत....
महानिर्वाणही खूप आवडतं.
अजून आवडती नाटकं आहेत पण यांचा नंबर कायम वरचा.
वा-यावरची वरातही खूप आवडतं.

परिचय आवडला. नाटकं आणि चित्रं ( मॉडर्न आर्ट हं)पाहून समजून घेण्याची गोष्ट असते. ती कितीही समजावले तरी समजत नाही. नाटकं तर लेखक, पात्रे आणि प्रेक्षकांच्या मनात भिनावे लागते. बाकी दशावतार, बालनाट्ये वगैरे हे एक करमणूक आणि मनोरंजन असते . त्यात लपलेला आशय असा नसतो.कथेचे मनोरंजक सादरीकरण.ते मला समजते आवडते.
पाश्चात्य नाटके ही कादंबरीचे संक्षिप्त नाट्य प्रवर्तन म्हणता येईल. प्रत्यक्ष कृतीमागचा आशय समोर आणणे. काही वेळा ते शक्य होत असावे. गॉडफादर कादंबरीतून लेखनातून जो आशय लेखक ओततो तेवढा सिनेमात जाणवत नाही. तरीही संक्षिप्तपणा बाजी मारतो. ( पाल्हाळ झालं पण मांडण्याचा प्रयत्न केला.)

प्रतिसादकांचे आभार !
..
१. घाशीराम चा फाॅर्म ज्यात बरंच मिश्रण आहे >>>
खरंय, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.

परंतु या नाटकाच्या प्रयोगानंतर तेंडुलकरांनी नाटकातील संगीत या प्रकाराचा इतका धसका घेतला की त्यांच्या पुढील नाटकांमध्ये ते कधी संगीताच्या वाटेला गेले नाहीत असं ‘तें’ अजूनही अ-जून ! (https://www.maayboli.com/node/77952) या पुस्तकातील एका लेखात म्हटले आहे.

२. कथेचे मनोरंजक सादरीकरण.
>>>
खरंय,, सामान्य प्रेक्षकांसाठी हेच महत्त्वाचे असते.
..
कृतीमागचा आशय समोर आणणे. काही वेळा ते शक्य होत असावे.
>>> बरोबर. नाटकाच्या कथानकानुसार ते ठरेल.
तसंच काही गोष्टी सूचित असाव्यात की थेट असाव्यात यावर बरेच प्रवाद आहेत.

परिचय आवडला.
>>> ‘अर्थहीन रंगभूमी>>> हे नीट कळलं नाही.

अर्थहीन रंगभूमी
>>>
ही कल्पना फ्रान्समधल्या ‘अब्सर्ड थिएटर’वरून आलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर, मानवी जीवन असंगत, अर्थशून्य, हेतूशून्य, वगैरे आहे.. एकूणच सगळे भयाण, विषणण ... इ.

पान २६ वर लिहीलेत.
शबलित >> हा कोशात नाही.
फक्त ' शबल' कोशात दिला असून त्याचा अर्थ गोंधळात टाकणारे,गढूळ
असा आहे.
(.. या विधीनाट्यांची शक्तीही क्षीण व शबलित होत गेली).
..
जुगुप्सा
= निंदा; निर्भर्त्सना; दोष देणे
(".. त्याबद्दल त्याच्या मनात एक सूक्ष्म जुगुप्सा आहे.")

>>> ‘द ब्रेथ’ या 35 सेकंदांच्या नाटकाचा परिचय >>>
पाहिले U ट्युब वर. अर्थहीन रंगभूमी का म्हणतात ते कळले

Of human bondage (१९२४) चित्रपट पाहिला :
https://www.youtube.com/watch?v=XQPfpHvR-wk&t=4s

सॉमरसेट मॉम यांच्या “ऑफ ह्यूमन बाँडेज” या साडेसहाशे पानांच्या बृहदकादंबरीवर आधारित. तिचा आवाका खूप मोठा असून तो एक तास 20 मिनिटाच्या चित्रपटात बसवणे तसे अवघडच होते. तरी पण त्या कालानुरूप एकंदरीत ठीक वाटला.
Bette Davis या गाजलेल्या अभिनेत्रींनी त्यात नायकाच्या प्रेयसीची भूमिका केली आहे.