मी , आधीच चिठ्ठी सापडत नव्हती म्हणून अस्वस्थ होतोच त्यात, इन्स्पेक्टर म्हणाले होते, आरोपी सापडलाय. एवढ्या लवकर यांना आरोपी कसा सापडला ? माझ्या मनात असं आलं म्हणून गैरसमज करून घेऊ नका. एवढं सगळं तुम्हाला सांगितल्यावर ,माझा या घटनेशी काहीच संबंध नव्हता हे पटलं असेलच .निदान तुम्ही तरी नक्कीच विश्वास ठेवाल.......मग मला अचानक वाटलं, पोलिसांनी हा गुगली तर टाकला नव्हता. पण मी ती शक्यता झटकून टाकली ,कारण माझा अजून तरी पोलिसांवर थोडा विश्वास होता. बघता बघता,गाडी पो. स्टेशनच्या आवारात शिरली. मी घाईघाईने इन्स्पेक्टर साहेबांच्या केबिनमधे शिरलो. ते वाट पाहातच होते. त्यांनी बसण्याची खूण केली. काही वेळ त्यांनी असाच घालवला. माझं टेन्शन वाढत होतं. मग ते म्हणाले," मला वाटलं,त्यापेक्षा जास्तच हुषार निघालात हो तुम्ही. कोणा कोणाला भेटला होतात तुम्ही ? "
" पण तुम्ही म्हणाला होतात,आरोपी सापडलाय म्हणून? मग आता चौकशी कशासाठी ? ". त्यावर ते भडकून म्हणाले," आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही आम्हाला प्रश्न विचारायचे नाहीत, समजलं ? बोला कोणाकोणाला भेटला होतात तुम्ही ? की तुम्हालाच आधी ठरल्याप्रमाणे माणसं भेटायला आली होती ? ". ......"मी फक्त रमणिकलालला भेटलो होतो. (यांची ट्रीटमेंट अशीच असेल तर मी खोटं का बोलू नये. त्यामुळे अजूनही मी खोटं सांगत होतो. )". ....".अस्सं ? मग ही चिठ्ठी परवा तुमच्या खिशातून पडली,तिचं काय ? आमच्या परबांचं लक्ष गेलं म्हणून बरं. काय? बोला,बोला लवकर. "असं म्हणून त्यांनी चिठ्ठी माझ्या हातात न देता दाखवली. माझा चेहरा पांढराफटक पडला होता. "ही चिठ्ठी लिहिणारी बाई कोण आहे? ?". ते जोरात ओरडले. मी काही बोलत नाही असं पाहून ते म्हणाले," अशी हप्त्या हप्त्यानी इन्फर्मेशन देतोस काय रे ? आं? घ्या . परब याला आत घ्या. असं म्हंटल्यावर परबांनी माझी कॉलर धरुन मला उभं केलं. आणि ढकलत ढकलत मला कोठडीकडे घेऊन गेले. कोठडीचा दरवाजा एका हवालदाराने उघडला. आणि मला आत ढकललं. आतमधे भयानक चेहऱ्याचे तिघेजण आधीपासूनच होते. त्यांना पाहून माझी चांगलीच गाळण उडाली. मग मात्र मी ओरडलो," अहो साहेब मला बाहेर काढा हो, मी सगळं सांगतो पहिल्या पासून. " ...... त्यावर ते ओरडले,"अरे राहा की आजची रात्र तुझ्या भाईबंदांबरोबर . ". मग मात्र मी दोन तीन वेळा ओरडून विनवण्या केल्या तेव्हा कुठे बाहेर काढून त्यांच्यासमोर आणलं. मग मला बसून न देता ते म्हणाले,". बोला, पटापट. " मग मी त्याना होतं नव्हतं ते सगळं सांगून टाकलं. आता ते जास्तच गंभीर होत म्हणाले," मि. प्रदीप,तुम्ही परत गावी जायचं. त्या स्त्रीला धमकी देणारे ते तिघे कोण आहेत ते शोधायचं. मला वाटतं ज्याने तुम्हाला दम दिला,तोच नार्कोटिकचा सप्लायर असला पाहिजे, किंवा ही मोठी टोळी असावी. " ......मग घाबरुन मी म्हणालो," माझ्या एकट्याच्याने हे काम कसं होणार ? आणि माझ्या जिवाला धोका निर्माण झाला तर ? ". मग थोडावेळ विचार करून ते म्हणाले," आता तुम्ही आमचा माणूस म्हणून काम करायचं. तुमच्या बरोबर दोन साध्या कपड्यातले कॉन्स्टेबलही देऊ. आता तुम्ही त्यांना सामील असलात तरी कळेल, टोळीचाही पत्ता लागेल आणि तुमचं निरपराधित्वही सिद्ध होईल. काय वाटतं तुम्हाला ? ". मला भलताच ताण आला. मी पटकन म्हणालो, " छे हो, मला नाही जमणार हे. नोकरी सांभाळून मी हे नाही करु शकत. " ....... मग मात्र ते म्हणाले," बसा आत त्या तिघांबरोबर, तपास पुरा होईपर्यंत. आणि तुमच्या कंपनी डायरेक्टरला हे सगळं आम्ही लेखी कळवतो. मग बघा,ते तुम्हाला कामावर ठेवतात का ? विचार करून बोला. " .......माझं डोकं गरगरायला लागलं. एखाद्या चक्रव्यूहात अडकल्या सारखी माझी स्थिती झाली. म्हणजे ही नुसती आत्महत्या नाही. तर गुरुजींच्या आत्महत्येला बरेच लोक जबाबदार आहेत.त्या सगळ्यांनाच जाळ्यात पकडायचं, असं इन्स्पेक्टर साहेबांनी ठरवलं होतं. हे लोक आत्महत्येपर्यंत का मर्यादित राहातं नाहीत ? पण तसं त्यांना विचारलं नाही. मी काहीच बोलत नाही असं पाहून इन्स्पेक्टर म्हणाले," मग काय ठरवलंत? "
मी म्हणालो," सांगतो विचार करून. " त्यावर ते म्हणाले," तुम्हाला काय गंमत वाटली ? मला आत्ता निर्णय पाहिजे,नाहीतर घरी जाता येणार नाही. " अशा रितीने त्यांनी माझ्या वर टेन्शन ठेवलं. मग मात्र मी पटकन होकार दिला. त्याबरोबर त्यांनी दोन कॉन्स्टेबलना बोलावलं आणि म्हणाले," देखणे आणि पवार तुम्ही दोघांनी यांच्याशी चर्चा करून पुढचा प्रोग्राम आखा. मला एक आठवड्याच्या आत कारवाई दिसली पाहिजे. यांना कसं भेटायचं ते तुम्ही ठरवा. I want results,that too, very early. "
मग माझ्याकडे वळून म्हणाले, " उद्या प्रेत ताब्यात मिळेल. अंत्यसंस्कार वगैरे काय आहेत ते करून घ्या आणि सांगितलेल्या कामाला लागा लागा. आणखी एक, जर तुम्हाला मृताचे अंत्यसंस्कार करायचे नसतील,तर पोलिसांच्या उपस्थितीत शासन ते काम ,ते बेवारशी आहेत असं समजून करील. नाहीतरी गुरुजींचं आणि तुमचं तसं काहीच नातं नाही. बघा, ते तुमचं स्वातंत्र्य आहे.".
.........मला राग आला. गुरुजी आणि बेवारशी ??? गुरुजींना सांभाळणारे कोणी नाही म्हणून तर मी त्यांना घेऊन आलो होतो. मी लगेचच उत्तर दिलं. " त्यांचे अंत्यसंस्कार मी करीन ". "...... पाहा,तुमची मर्जी ." असं असलं तरीही मी विचार करण्याचं ठरवलं. दोन्ही कॉन्स्टेबलना उद्या येऊन भेटतो असं सांगून मी निघालो. मी लवकरच घरी पोहोचलो. सगळं सांगितल्यावर दिशा म्हणाली," अहो पण तुमचं काम सोडून, तुम्ही हे सगळं करणार कसं ? आणि अंत्यसंस्कार जर ते करीत असतील तर करु द्या ना. उगाचच मुलं हे सगळं पाहून घाबरतील. खरंतर,मी आत्ता पर्यंत बोलले नाही,पण गुरुजींना आणायलाच नको होतं. पण तुमच्यापुढे बोलणार कोण ? " त्यासरशी मी रागावून बोललो, " मला वाटलंच तुझ्या मनात असं काही असेल. मी ठरवलंय तसंच होईल. मुलांना दोन तीन दिवस प्रकाश मामाकडे पाठव, आणि मी काही बाकी दिवस करणार नाही आहे त्यांचे. " ....... त्यावर ती म्हणाली," म्हणजे त्यांचे दिवस तुम्ही अर्धवटच करणार. असं कोणीही करीत नाही. उगाच पापात पडायचं. " मी मात्र तो विषय तिथेच थांबवला. दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलो. बॉसने बोलावलं. नवीन प्रोजेक्टची रुपरेषा मी आणि माझ्या दोन सहकाऱ्यांबरोबर चर्चा करून ठरवली. माझं लक्ष जेमतेमच होतं. गुरुजींबद्दलचा विषय बॉसकडे कसा काढावा, म्हणून मी चुळबूळ करीत बसलो होतो. बाकी दोघांनी," अरे चल, चर्चा संपल्ये" म्हणून इशाऱ्याने सांगितलं. तरी मी जाईना. मग मात्र ते दोघे गेले. बॉसने खाली घातलेली मान वर करीत प्रश्नार्थक मुद्रेने मला विचारले," येस, मि. प्रदीप एनिथिंग रॉंग ? लगता है तुम्हे कुछ शक है. " मी पुढे कसं बोलायचं हा विचार करीत असतानाच तो म्हणाला,"बहोत दिनसे मैं देख रहा हूं, तुम्हे कुछ टेन्शन है. यू कॅन शेअर विथ मी. "
मग मी थोडक्यात त्याला गुरुजींना घरी आणल्यापासून ते आजतागायतची सगळी कथा सांगितली. त्यावर तो म्हणाला," मैं इसमे ज्यादा कुछ कर नहीं सकता. वैसे पुलिस डिपार्टमेंटमे मेरी थोडी बहुत पहचान है. चाहो तो डिप्टी कमिशनर वर्मासे बात करता हूं और देखेंगे क्या हो सकता है. तुम पुलिस को कोऑपरेट करो. लेकीन,अपने काममे थोडीभी रुकावट नहीं आनी चाहिए. पुलिससे थोडा बचकेही रहना." मग मी त्याला विचार करुन सांगतो असं, म्हणून दोन दिवसांची रजा मागितली. त्यावर तो म्हणाला," वैसे रजा तो नहीं दे सकता, क्यूँ की कामकी डेडलाईन्सभी तो देखनी है. लेकीन तुम जब चाहें ऑफिसमे आ सकते हो और जा सकते हो. लेकीन प्लानके मुताबिक काम होना चाहिए. " मी थोडासा खट्टू होऊनच बाहेर आलो.
तेवढ्यात माझा मोबाईल फुरफुरला. तो घेतल्यावर पलिकडून देखणे म्हणाले," साहेब पो.स्टेशनला या वाट बघतोय. "आता मला जाणं भाग होतं. येणारा शुक्रवार होता. पो. स्टेशनला गेल्यावर मी प्रथम वाघसाहेबांना भेटलो. आणि दिशाचं बोलणं मला आस्ते आस्ते पटल्याने मी त्यांना अंत्यसंस्कार तुम्हीच करा असं सांगितलं. त्यावर ते म्हणाले," बॉडी आता दुपारी तीन वाजता ताब्यात मिळेल. तुम्ही फ्युनरल साठी हजर राहू शकता " असं ते म्हणाले. मी अर्थातच होकार दिला. देखणे आणि पवारना भेटलो व शनिवारी सुटी असल्याने सकाळी आठच्या गाडीने आम्ही गावी जायचं ठरवलं. खरंतर मला हे अवघड वाटत होतं. कारण माझ्या मनाप्रमाणे मला तपास करता आला नसता........
मी संध्याकाळी पाच वाजता पो. स्टेशनला पोहोचलो. तर पोलिसांची टीम आधीच दादरचौपाटी जवळील स्मशानात नुकतेच गेल्याचे कळले. मी तसाच तिकडे गेलो. बॉडी वईजभट्टईत टाकण्याच्या दृष्टीने तयार करीत होते. जाताना मी एक हार घेतला होता. तिथे वाघसाहेबांना भेटल्यावर ते म्हणाले," आम्ही अर्धातास वाट पाहिली. काय असतं ना, माणसं भावनातिरेकाने बरंच काही बोलतात,पण प्रत्यक्षात ते हजर राहतात नाहीत. म्हणून तर आम्ही निघालो. आम्हाला काही भटजी आणि त्यांच्या विधींशी काहीही सोयरसुतक नाही. ते पाहा, गुरुजींना समोरच्या चौथऱ्यावर ठेवलंय. शेवटचं दर्शन घ्या. आणखीन काय ?" मी पुढे झालो. गुरुजींचा देह मला अधिकच आवळ झाल्यासारखा वाटला. आता त्यांची जीभ आणि डोळे बाहेर नव्ह्ते. मला अचानक दया आली, रडू फुटलं. मी त्यांना हार घातला. आणि काही वेळ रडून घेतलं. मागे वाघ साहेब उभे होते . माझ्या पाठीवर हात फिरवत ते म्हणाले," मि. प्रदीप काळजी करू नका. गुरुजींना ज्यांनी ज्यांनी आत्महत्या करायला लावली त्यांना त्यांना आपण शोधून काढून शिक्षेप्रत पोहोचवूच, आवरा स्वतःला. त्यांच्या मुलाचाही शोध घेऊ. " मी डोळे पुसत बाजूला झालो. संध्याकाळची वेळ होती. समुद्रावर कसलाही आवाज नव्हता. तोही अतिशय मंदपणे तरंग उडवीत होता. जणूकाही तोही गंभीर झाला होता. तासाभरातच आम्ही निघालो. जाताना वाघसाहेबांनी घरी सोडू का असं विचारलं,पण मीच नकार दिला. मी जड अंत:करणाने घरी निघालो.......
दुसऱ्या दिवशी शनिवार होता. गावी जाण्यासाठी बस स्टॅण्डला उभा होतो. लवकरच देखणे आणि पवार आले. ते चांगलेच ताकदवान होते. बसमधे चढलो. जास्ती काही न बोलता प्रवास सुरू झाला. का कोण जाणे पण मला एकप्रकारचा ताण जाणवत होता. मी एकटा असतो तर मी माझ्या पद्धतीने तपास केला असता. तरीही मी त्यांच्याशी मैत्री करण्याचं ठरवलं आणि इतर गप्पा मारायला सुरुवात केली. ते उत्तरं देत होते,पण जरा जपूनच. काही वेळ असाच घालवला मग मात्र देखणे खुलले व मोकळेपणाने बोलायला लागले. त्यांचा पोलिस खात्यातला अनुभव जबरदस्त होता. त्यांचे एकेक अनुभव ऐकून मी थक्क होत होतो. या लोकांचं लाईफ वेगळंच असतं. आणि पोलिस लोक अतिशय झोकून देऊन काम करतात. असं माझं मत होऊ लागलं. जेवणाच्या वेळेवर जेवण झालं. मग गाव दृष्टिपथात येऊ लागलं. आम्ही उतरलो. तेव्हा मी देखणेंना म्हंटलं," दुसरं कोणतंही लॉज नाही. त्यामुळे मी आधी उतरलो होतो, तिथेच जावं लागेल. " माझं लॉज स्टॅंड पासून दहा पंधरा मिनिटांच्या अंतरावर होतं. काउंटरवर असलेल्या मुलाने मला ओळखलं आणि हसून मला परत मागचीच रुम हवी का विचारलं. त्यावर मी माझ्या बरोबर दोन सहकारी आहेत त्यांची पण सोय अशा रुम्स पाहिल्या. आमची जेवणं झालीच होती. थोडी विश्रांती घेऊन, साडेतीनच्या सुमारास आम्ही मला चिठ्ठी लिहीणाऱ्या स्त्रीच्या घराशी पोहोचलो. दरवाज्याला कुलूप होतं. म्हणून आम्ही शेजारी चौकशी केल्यावर कळलं की समोरच मालक राहातं होते त्यांना विचारावं. त्यांची कडी वाजवल्यावर त्रासिक मुद्रा असलेल्या एका वयस्क गृहस्थाने दार उघडले. मी पुढे होऊन समोरच्या बाईंबद्दल विचारल्यावर ते म्हणाले," तुम्हाला ही माहिती मी का देऊ ? कोण आहात तुम्ही ? " आणि ते , दार लावू लागले. मग मात्र देखणेंनी त्यांचं आयडी दाखवून दमात घेत घरात प्रवेश मिळवला.
आत शिरताच त्या माणसाचं बकोट धरुन देखणेंनी दम दिला. " हे बघ, आम्हाला जी माहिती पाहिजे ती तुला द्यावीच लागेल, नाहीतर तुला आता बसावं लागेल, एका खुनाच्या आरोपाखाली.समजलं ? " मग घाबरुन तो म्हणाला," पण मी कोणाचाच खून केला नाही. " त्याबरोबर देखणेंनी खिशातल्या बेड्या काढून त्याला दाखवल्या. ," चल, तुला आतच नेतो आता.... " त्याबरोबर तो म्हणाला," सांगेन मी तुम्हाला हवी असलेली माहिती. पण मला त्या बाईंबद्दल काय माहित असणार ? माझा संबंध फार आला नाही. " मग मी म्हणालो," कुठे आहेत त्या सध्या ? त्यांचा गावचा पत्ता पण द्या. " त्यावर ते म्हणाले," दोन दिवसांपूर्वी रात्री धाच्या सुमारास शंकरभैया आणि त्याची माणसं आली आणि तिला घेऊन गेली. मी लपून पाहीलं. ". त्यावर देखणेंनी जरबने विचारलं ," शंकरभैयाचा पत्ता दे. ......". " तो कुठे राहतो माहित नाही. पण गावात त्याचा वाडा हाय.शंकर पाटलाचा वाडा म्हणतात. ".
" धोत्रे गुरुजींबद्दल तुला काय माहिती आहे ?"
" मला कायबी म्हाइती नाय. ". मग त्याने त्या बाईचं नाव आणि पत्ता दिला. मग त्याला आम्ही आलो होतो, हे कोणालाच सांगायचं नाही, असा दम देऊन निघालो.
(क्रमशः)
अरूण कोर्डे
©®
निवेदन
निवेदन
******
तब्बेतीचा इश्यू असल्याने भाग पाठवण्यात फार उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. ट्रीटमेंट चालू आहे.उशीर झाल्यास कृपया सहकार्य करावे ही नम्र विनंती.
आपला नम्र
मिरिंडा
आपला
काळजी घ्या मिरिंडा जी
काळजी घ्या मिरिंडा जी
. लवकर बरे व्हा
शुभेच्छा
तब्बेतीची काळजी घ्या.
तब्बेतीची काळजी घ्या.
हा भाग दोन रहस्यमय भागांतला दुवा झाला आहे.
काळजी घ्या.
काळजी घ्या.
तब्बेत सांभाळून जसे जमेल तसे लिखाण करा.
६ भाग वाचले, छान लेख मालिका
६ भाग वाचले, छान लेख मालिका सुरु आहे. पुढील भागाची वाट बघतो
त्याब्यातेची काळजी घ्या, कुठलीही घाई करू नका, वेळ मिळेल तसे निवांत लिहा
हा भागही मस्त!
हा भागही मस्त!
तब्येतीची काळजी घ्या. लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा! तब्येत ठीक झाली की सावकाशीने लिहा.
छान लेख मालिका सुरु आहे.
छान लेख मालिका सुरु आहे. पुढील भागाची वाट बघत आहे. काळजी घ्या, कुठलीही घाई करू नका, वेळ मिळेल तसे निवांत लिहा <<< <+ १