बिकट वाट वहिवाट नसावी, धोपटमार्गा सोडू नको
संसारामधे ऐस आपुला,उगाच भटकत फिरू नका
या दोन ओळीत डंकी सामावलेला आहे.
राजकुमार हिरानी म्हटलं कि काय काय बघायला मिळणार याची चित्रं आधीच डोळ्यापुढे उभी राहतात.
साधे साधे संवाद, इंटेलिजिन्ट ह्युमर आणि त्यात लपेटलेलं चमत्कारिक तत्त्वज्ञान, त्या चमत्कारिक तत्त्वज्ञानाला हसता हसता मुख्य पात्रांच्या बाबत घडणारी संकट मालिका त्यातून घडणारे विनोद आणि त्यातून दिसत राहणारी समस्या. त्या समस्येवर प्रसंगातून होणारे भाष्य , उत्तम संगीत आणि एक प्रकारचा मांडणीतला फ्रेशनेस.
पण त्याच वेळी लगे रहो मुन्नाभाई मध्ये अगर ये सुन रहा है, देख रहा है , ये सब सुनी सुनाई बाते कही तो इसके दिमाग मे जाती होगी ना ? असे भाबडे संवाद असतात. मुन्नाभाई आला तेव्हां ते खपून गेलं. थ्री इडीयट्स मधेही आमीर खान "चारो तरफ ग्यान बट रहा है, कही भी जाओ" असे तत्त्वज्ञान सांगतो. यातला आदर्श आशावाद व्यावहारिक नसतो. व्यावहारिक मनाला ते पटत नाही. पण कलाकार म्हणून व्यवहाराच्या दोन पावले पुढे जात आहे त्या व्यवस्थेवर हसत हसत दोष ठेवणे हे कसब राजू हिरानी ला साधले होते.
पी के मधे धर्म आणि पाखंड हा विषय विनोदाच्या माध्यमातून मांडला खरा. पण त्या आधी ओएमजी येऊन गेला असल्याने तो अपील झाला नाही. त्यातली एलियनची फोडणी ब्रिलियंट होती. एलियनच्या माध्यमातून व्यवस्था किती हास्यास्पद आहे हे सांगणे ब्रिलीयंट आहे. पण पीकेचा क्लायमॅक्स पूर्णपणे गंडलेला आहे. अशक्य भाबडेपणा आणि फिल्मी शेवट आहे. थ्री इडीयट्स मधे हाच फिल्मीपणा सुसह्य आहे. थोडक्यात हा खेळातल्या कौशल्याचा भाग आहे.
डंकी पाहताना पीकेची वॉर्निंग होतीच.
कुठे तरी राजकुमार हिरानी कडचे नावीन्य सुरूवातीच्या चित्रपटाच संपलेले आहे हे जाणवते. पण तोच तोच पणा येऊन चित्रपट कंटाळवाणा होत नाही. सुरूवातीपासून फील गुड अनुभव देत राहतो. हिरानीची सपोर्टिंग पात्रं हा त्याच्या सिनेमाचा युएसपी असतो. एक समस्या घेऊन तिला विविध फोडण्या देण्यासाठी ही पात्रं चांगली वापरतो.
बोम्मन इराणीचा इंग्लीशचा क्लास धमाल आहे. आय वॉन्ट टू गो टू लावाटोरी हे चाल लावून शिकवणे आणि तीन महीन्यात किती गाणी शिकवणार हा विकी कौशलचा त्याला येणारा नेहमीचा प्रश्न. व्हिसा अधिकार्यापुढे इंग्लीश बोलण्यासाठी बनवलेला बिनतोड इंग्लीशचा गाळलेल्या जागा भराचा फॉरमॅट आणि प्रत्यक्षात झालेल्या मुलाखती हा कळस आहे.
डंकी मार्गाने इंग्लंडला पोहोचल्यावर आपण इंग्लंडलाच पोहोचलो ना याची खात्री करून घेण्यासाठी एक पात्र जमिनीवर हात आपटून विच कंट्री असं एका इंग्रज जोडप्याला विचारते त्यातून होणारे विनोद मजेशीर. ती इंग्रज बाई फॉरिनर्स मुळे न्युसन्स वाढलाय अशी कमेंट करते तेव्हां ती आपल्याला फॉरिनर समजली एव्हढेच कळल्याने त्याला झालेला आनंद , "माझी आई नेहमी म्हणायची कि मी फॉरिनर सारखा दिसतो" या संवादाचं टायमिंग धमाल आहे. फॉरिनर हा शब्द याच अर्थाने आजही वापरला जातो.
सुरूवातीच्या विनोदातून सुद्धा पंजाबातून इंग्लडला जाण्याची सर्वांची तीव्र इच्छा हा भाग ठळक करण्यात हिरानीला यश आलेले आहे. ज्यांची मुलं विदेशात जातात ते घरावर विमान बसवतात हे खूप चांगले हायलाईट केले आहे.
पंजाब हरियाणा भागात दहा बारा वर्षे सतत येऊन जाऊन असल्याने या राज्यातली श्रीमंती पाहिलेली होती. पण दुसरे चित्र कधीच दिसले नाही. ते दिसले ते कामगारांसोबत काम करताना. भूमिहीन शेतकर्यांची अवस्था, दारूचे व्यसन हे पहायला मिळाले. परदेशी जाऊन गरीबी संपते हे ऐकायला मिळाले होते. पंजाबच्या बाहेर शीखांचे एक गोड चित्र आपल्यापर्यंत पोहोचते. तसे ते अजिबात नाही. शीखांमधेही जातीयवाद आहे. श्रीमंत गरीब भेद आहे. वेगवेगळे लंगर आहेत.
तरीही ते एक प्रगत राज्य होते. एके काळी प्रत्येकाच्या शेतात कुठला न कुठला कुटीरोद्योग असायचा. शेतात ट्रॅक्टर, रोडरोलर बनायचे. ते स्वस्त मिळत. ते आणायला महाराष्ट्रातले शेतकरी जायचे. उत्तर प्रदेशातली जुगाड रिक्षा पंजाबात बनायला लागली. ढाबे पंजाब्यांचेच. एका ढाबेवाल्याने रेखाला घेऊन एक चित्रपट बनवला होता. सेक्टर २२ मधे त्याचा पहिलवान धाबा होता. रेखाला घेऊन सिनेमा बनवायचा एव्हढेच ध्येय होते. त्या वेळी शेतात उद्योग काढणे ही स्पर्धा होती. शेतमालाला चांगला भाव मिळाल्याने आलेल्या पैशातून हेल्दी काँपिटिशन होती. नंतर या राज्याला काय झाले कळलेच नाही.
अंमली पदार्थांच्या आहारी राज्य गेले. दलेर मेहंदी परदेशात जाऊन स्टार गायक झाला म्हणून अनेक जण परदेशी जाऊ लागले. त्या वेळी एक मोठे स्कॅम उघडकीस आले होते. शेती, घरदार विकून परदेशी गेलेले लोक मढ आयलँड मधे डांबून ठेवले जायचे. यातल्या काहींच्या हत्या झाल्या. तर दलेर मेहंदी सारख्या अनेकांच्या टीम मधे सदस्य म्हणून बेकायदेशीर मार्गाने काही जण परदेशात जात. टॅक्सी चालवणे हा पंजाब्यांचा मुख्य व्यवसाय बनला.
तरीही याशिवाय डंकी मार्ग असतो आणि त्या मार्गाने गेलेल्यांचं भयावह चित्र हे या चित्रपटामुळे समजले. त्याबद्दल हिरानीचे अभिनंदन !
वेगळ्या विषयावरचे चित्रपट स्विकारण्याची आपली अजून तयारी नाही झालेली. ज्यांना असे चित्रपट झेपतात ते क्लास आणि ज्यांना झेपत नाहीत ते मास असे ढोबळमानाने वर्गीकरण केले जाते. सालार,केजीएफ, पठाण,जवान हे मासचे चित्रपट. त्यामुळे दोन्हीची तुलना यशाच्या स्केलवर करता येत नाही.
हिरानी थोडा बॅलन्स साधायला जातो. अनेक भाबडे प्रसंग चपखलपणे घुसवतो जे मासेस साठी असतात.
डंकी मधे असे प्रसंग फसले आहेत . कारण काहीसे नवे तत्वज्ञान चटपटीतपणे पेरलेले असते त्यामुळे अशा काही प्रसंगांना प्रेक्षक चालायचंच म्हणून सोडून देतो. इथे अशा तत्वज्ञानात नावीन्य नाही. त्यामुळे काहींना चित्रपट निराशाजनक वाटू शकतो. थेटरमधून बाहेर पडल्यावर काही चुका जाणवायला लागतात. पण तीन तासात अडीच तास तरी चित्रपट सुसह्य आहे. प्रसन्न आहे.
संगीत निराशाजनक आहे. गाणी लौकिकाला साजेशी नाहीत. संगीतकार कोण आहे हे बघण्याचे सुद्धा कष्ट घेऊ नयेत अशी कामगिरी आहे. बॅकग्राऊंड स्कोर थ्री इडीयटचाच आहे. सुरूवातीला विमान थांबवणे आणि तापसी पन्नूचे हॉस्पिटलमधून पळून येणे हे एकसारखे आहे.
लालटू नावाचे काल्पनिक गाव उभे करताना उभारलेले सेट्स कृत्रिम वाटतात. लालरू नावाचे मोहालीत गाव आह. पंजाबात दिसणारी हिरवीगार शेतं एकाच गाण्यात दिसतात. दिलवाले आणि परदेस मधे त्याचा चांगला उपयोग केलेला आहे.
शाहरूख खप्पड झाल्याने वयस्क्र वाटतो. जस जसे वय होत चाललेय तस तसा त्याचा अभिनय पिकलेल्या आंब्यासारखा प्रगल्भ होत चालला आहे हे दिसते. त्याचा ह्युमर हा त्याचा युएसपी. पण हिरानीच्या चित्रपटातल्या विनोदासाठी शाहरूखचा संयत वावर पुरेसा वाटत नाही. तो यात उपरा वाटला आहे. ओ तेरी म्हणत आमीर जेव्हढा ख़ळखळून हसतो, टिंगल टवाळी करताना डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसतो/ हसवतो ती एनर्जी शाहरूख कडे पहिल्यापासून नाही. खळखळून हसवता हसवता धक्का देणे ही हिरानीची शैली इथे विकीच्या पात्रातून दिसते. थ्री इडीयट्स मधला आय क्विट हा सीन जितका बहुचर्चित झाला, आय क्विट वर जेव्हढी चर्चा झाली तेव्हढा धक्का यात बसत नाही. लाल रंगाच्या शर्ट मधे शाहरूख खान मस्त दिसतो. लेडीकिलर लुक आहे. तो तितका गोरा आहे कि मेक अप हे माहिती नाही.
तापसी पन्नू ने ठीक ठाक अभिनय केला आहे. तिची आणि शाखाची केमिस्ट्री जमलेली नाही. तापसी, क्रिती, अनुष्का, वाणी कपूर या हिरविणी वाटत नाहीत. क्रिती कंपनी सेक्रेटरी वाटते तर तापसी सीईओ किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअर ( ती तशी होतीच). पण नेहमीच करीना, कॅटरीना , दीपिका या अप्सरांना तरी किती बघायचे ? म्हणून या ठीक. बोम्मन इराणीचे पात्र वरवरचे आले आहे. आधीच्या चित्रपटासारखे ते अविभाज्य भाग नाही. विकी कौशलचे पात्रही असेच. पण प्रभावी झालेय.
क्लायमॅक्स ला हिरानी पुन्हा चित्रपटावर पकड मिळवतो. पण शेवट करताना इथे करू कि तिथे करू, या विचारात थोडे सेन्टी सीन्स जास्तीचे झाले आहेत. पीक वर चित्रपट संपत नाही.
शाहरूखने हा चित्रपट स्विकारून कुठलीही चूक केलेली नाही, पण राजू हिरानीने शाहरूखला घेऊन चूक तर नाही ना केली असे वाटत राहते. शाहरूखच्या पात्रात आमीर खानला इमॅजिन केले कि मग उलगडा होतो. शाहरूखची शक्तीस्थाने लक्षात घेऊन चित्रपट लिहीला गेला असता तर अधिक आनंद देणारा ठरला असता.
तरी ही डंकी पहायला हरकत नाही. जितके रिव्ह्यूज नकारात्मक आहेत तितका डंकी वाईट नाही. हिरानीचा बेस्ट तर नक्कीच नाही पण मनोरंजन करण्यात कुठेच कमी पडत नाही. वन टाईम वॉच नक्कीच. ओटीटी वर पहायला काहीच हरकत नाही.
छान परिचय..
छान परिचय..
अतिशय समतोल मांडणी..
मला तरी असं कुठेच वाटलं नाही
मला तरी असं कुठेच वाटलं नाही की हा रोल आमिरला डोळ्यासमोर ठेवून लिहीलाय. शाहरुख चार्मिंग आहे, इंटेंस आहे आणि या रोल मध्ये परफेक्ट आहे. आमिर आताशा तेवढा चार्मिंग वाटतं नाही. शिवाय तो उगाच intellectual आव आणत राहतो.
डंकी टिपिकल हिरानी पिक्चर असता तर विसा ऑफिस मध्ये आणि जज्जच्या समोर शाहरुखने भावनिक अपील केल्यावर समोरची माणसं गहिवरून जातात, ऑफिसातले बाकी कर्मचारी कौतुकाने बघत राहतात, टाळ्या वाजवतात आणि ऑफिसर्स प्रेमाने शाहरुखचं म्हणणं मान्य करतात असले सीन्स असते आणि मग डंकी घडलाच नसता.
बाकी सहकलाकार खरंच छान आहेत. तापसी ओके. विकी कौशल छोट्याश्याच रोल मध्ये भाव खाऊन गेलाय. त्याचा अभिनय अप्रतिम. बोमन नेहमीप्रमाणेच मस्त वाटला.
बाकी छळवणुकीचे सीन्स जास्त नाहीत ते खरंच बरंय. लंडन मध्ये जाऊन लोकं लगेच श्रीमंत होतात वगैरे फालतू काहीतरी दाखवलेलं नाही हे आवडलं. पिक्चर टोटल मध्ये छान करमणूक करतो. एंगेजिंग आहे. पाहताना मजा आली.
गाण्यांमध्ये चल वे वतना, बंदा
गाण्यांमध्ये चल वे वतना, बंदा आणि मैं तेरा रस्ता देखुंगा ही गाणी आवडली. रोमँटिक गाण्यांमध्ये शाहरुखचे कुर्ते तेवढे चांगले आहेत.
जज्जच्या समोर शाहरुखने भावनिक
जज्जच्या समोर शाहरुखने भावनिक अपील केल्यावर >>> कोर्ट रूम सीन अपील झाला नाही असे म्हणण्याचे कारण इराणच्या पहाडी वाळवंटी भागात थंड डोक्याचा, प्रसंगावधान राखणारा फौजी परदेशात आपले प्रसंगावधान गमावून देशप्रेमावर लेक्चर देतो हे पटले नाही. इतकेच. बाकी मतमतांतराचे स्वागत आहे. प्रत्येकाला आवडेल/ न आवडेल त्याचा आदर आहे.
उत्तम संतुलित रिव्ह्यू !
उत्तम संतुलित रिव्ह्यू !
मी काल हॉस्पिटल मध्ये admit असल्याने आणि आताही घरी आडवा च असल्याने हा विकेंड माझा चित्रपट न बघताच जातोय वाटते.
पण म्हणून आवर्जून या चित्रपटाचे पब्लिक रिव्ह्यू वाचत, ऐकत, बघत आहे...
त्या सर्वांचा सारांश असा -
शाहरूख आणि हिरानीच्या चाहत्यांना हा चित्रपट अर्थातच आवडत आहे.
शाहरूखच्या टीकाकारांना यात ठोस टीका करावी असे सापडत नाहीये हे चित्रपटाचे यश आहे.
जे चित्रपट प्रेमी या दोन्ही गटात येत नाही त्यांना हा चित्रपट आनंद देत आहे.
सो कॉल्ड, क्लास आणि मास नुसार वर्गीकरण करायचे झाल्यास,
चित्रपट क्लासला समाधानी करता आहेत तर मासचे मनोरंजन करत आहे..
अजून काय पाहिजे आयुष्यात
रिव्ह्यू वाचून चित्रपट बघायची उत्सुकता वाढली..
शाहरूख, लाल शर्ट आणि लेडी किलर लूक या साठी दशलक्ष बदाम बदाम बदाम.. जियो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रघू आचार्य,
रघू आचार्य,![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
रिव्ह्यू आवडला. नेहमीप्रमाणेच. तुमचे लिखाण/ टिप्पण्या यांकडे लक्ष असतं. वाचत असतो. तुम्ही चांगलं लिहिता. आणि हे तुम्हाला माहितीच असेल म्हणजे
तुमच्याकडे सांगण्यासारखा आशय आहे, असतो. मजकूर वाचताना ते कळतंच की ह्यापाठीमागे 'बरंच बघितलेली, वाचलेली, सरावलेली' नजर आहे. शिवाय वाक्यं ज्या पद्धतीने रचता त्यातले बारकावे, त्यासाठी व्यय झालेला वेळ, ऊर्जा, मेहनत, पेशन्स, गुंतवणूक हे ही काही लपत नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अर्थात, तुम्ही हा सगळा उपद्व्याप वैयक्तिक आनंदासाठी करत असणार, पण त्यातून एक चांगली गोष्ट अशी होते की वाचणाऱ्यालाही स्वतःची समजूत वाढल्यासारखं वाटतं..!
त्यामुळे तुमचे लेख पुस्तकरूपात आले तर चांगलं होईल, असं वाटतं. तुमचं लिखाण 'छापील पानं' डिझर्व करतं. तुम्ही मनावर घ्यायला पाहिजे त्यादृष्टीने.
_/\_
उत्तम परिक्षण व तसेच पंजाब
उत्तम परिक्षण व तसेच पंजाब पार्श्वभूमीची बद्दल लिहिले आहे.
मस्त लिहिलंय.आता हा ओटीटी वर
मस्त लिहिलंय.आता हा ओटीटी वर आल्यावर बघेन.बजेट फायटर साठी राखून ठेवलंय थिएटर चं
डंकी टिपिकल हिरानी पिक्चर
डंकी टिपिकल हिरानी पिक्चर असता तर विसा ऑफिस मध्ये आणि जज्जच्या समोर शाहरुखने भावनिक अपील केल्यावर समोरची माणसं गहिवरून जातात, ऑफिसातले बाकी कर्मचारी कौतुकाने बघत राहतात, टाळ्या वाजवतात आणि ऑफिसर्स प्रेमाने शाहरुखचं म्हणणं मान्य करतात >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ही कमेण्ट मजेशीर वाटली होती. मस्त निरी़क्षण आहे हे.
संप्रति , लाजवाताय गड्या तुम्ही.![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
तुमची दृष्टी सुंदर आहे असे म्हणीन. कौतुकासाठी आभार पण त्यासाठी पात्र नाही हे नमूद करतो. खालचा प्रतिसाद हलक्यात घ्यालच.
पुस्तक न लिहीण्याची अनेक कारणे आहेत. प्रमुख खालीलप्रमाणे
१. पुस्तक लिहीताना ते स्वतःचे स्वत्;ला वाचावे लागेल. स्वतःच स्वतःला शिक्षा कुणी करतं का ?
२. तुम्ही पुस्तक लिहा असे अनेक जणांना सल्ले दिलेले आहेत. असा सल्ला देऊन लपून गंमत पण बघितली आहे. त्यामुळे चोराच्या मनात चांदणे या न्यायाने गुरूची विद्या गुरूला तर नाही ना दिली ही शंका येणे नैसर्गिक नाही का ?
३. ते एक जण आहेत त्या शहरातले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पुस्तक लिहीणे हा रिकामटेकड्यांचा छंद आहे. त्यांचा फोटो इथे अपडेट करण्याचा मानस आहे. नवीन आरसा आणला कि लगेचच करीन,
४. पूर्वी पुस्तक वाचणे किंवा लिहीणे हे बुद्धीवंतांचे क्षेत्र होते. जर माझे पुस्तक बाजारात आले तर हाहा:कार उडून पुढे नव्या आणि दमदार लेखकांकडे सुद्धा संशयाने पाहिले जाईल. यामुळे साहित्यक्षेत्राची हानी होण्याची शक्यता दाट आहे.
अन्य कारणेही आहेत. पण ही प्रमुख असल्याने शेअर केली आहेत.
कंटाळा हे अन्य काही कारणापैकी एक आहे. लिखाणाचा तर आहेच, पण त्यासाठी इनपुट्स घ्यावे लागतात ना ?
हरपा कि हपा ? मै तो हपा ही
..
राजकुमार हिरांनीच्या
राजकुमार हिरांनीच्या चित्रपटवरील मते योग्य आहेत, पण त्यांचे चित्रपट मनोरंजक असतात आणि त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला रिपीट value आहे पण मला डुनकी थोडा कंटाळवाणा वाटला आणि अजिबात रिपीट value नाही असे माझे वयक्तिक मत आहे
क्रिती कंपनी सेक्रेटरी वाटते
क्रिती कंपनी सेक्रेटरी वाटते
>> Hahahahaha !!!
(चांगल्या भविष्याच्या शोधात
(चांगल्या भविष्याच्या शोधात दुसऱ्या देशांत
स्थलांतरित/शरणार्थी होण्यासाठी धडपडणाऱ्यांच्या लाटा येत्या दशकांत वाढतच राहणारेत. त्या पूर्णपणे थांबवणं अवघड आहे. 'वर्ल्ड इज फ्लॅट', 'जग हे आता एक खेडं आहे' वगैरे चकचकीत घोषणांचा डंका वाजवून झालेला आहे. त्याचा आऊटपुट समोर आहे. आणि ही प्रोसेस रिव्हर्स करणं कोणत्याही देशाच्या हातात राहिलं नाही. कायदेशीर मार्गांचा ॲक्सेस नसला की लोक
डंकी मार्गांनी, मानवी तस्करीच्या माध्यमांतून जीव धोक्यात घालतात. मरतात. मागे आयलान कुर्दी ह्या तीन वर्षांच्या मुलाचं शव समुद्र किनाऱ्याला लागलेलं. तेवढ्यापुरता गदारोळ झाला. शमला.)
'डंकी'नं ह्या इश्यूला हात घालून आपल्याकडचा उजेड अजून लख्ख केला, हे बरं आहे. मला आवडला चित्रपट. खराब मनस्थितीत होतो, तर एस्केपसाठी थिएटरच्या अंधारात जाऊन बसलो. तीन तास सगळ्याचा विसर पडला. एखादा चांगला सिनेमा आपल्याला बुडवून टाकू शकतो, जगण्याला बांधून टाकू शकतो, ह्याचा आणखी एकदा प्रत्यय आला. शाहरुख मॅच्युअर होत चाललाय, जबाबदारीनं, संयतपणे खेळतोय. स्टेटमेंट करतोय. वाढलेल्या पोलराईझेशनच्या काळात वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा एक ऑप्शन असतो. पण त्याला शिताफीनं वळसा घालत एखादं योग्य स्टेटमेंट करायचं म्हटलं तर किती कसरत करावी लागू शकते, हे दिसतं. असो.
बाकी आचार्य,
तुम्ही पुस्तक न लिहिण्याची कारणं दिलीत, ती मी त्याच क्रमाने फेटाळतो.
१. डोळे झाकून लिहा. लिहून प्रकाशित झाल्यावर तुमचा रोल संपुष्टात येईल. वाचकांचा चालू होईल.
२. पास. नॉट ॲप्लिकेबल.
३. 'त्या' शहरातल्या 'त्या बऱ्याच जणांस' विचारावें की त्यांनी तरी आजवरच्या व्यस्ततेतून अशा कोणत्या परमआनंदाची प्राप्ती करून घेतली आहे किंवा कसें?
४. साहित्यक्षेत्र 'हाहा:कार-प्रूफ' झालेलंय. आणि ह्या क्षेत्राचा एकूण विस्तार बघता परिस्थिती कधीच नियंत्रणाबाहेर जाणार नाही. चिंता नसावी.
बाकी मतमतांतराचे स्वागत आहे.
बाकी मतमतांतराचे स्वागत आहे. प्रत्येकाला आवडेल/ न आवडेल त्याचा आदर आहे. >>> मनापासून थँक्यू आचार्य!
शाहरुख मॅच्युअर होत चाललाय,
शाहरुख मॅच्युअर होत चाललाय, जबाबदारीनं, संयतपणे खेळतोय. स्टेटमेंट करतोय. वाढलेल्या पोलराईझेशनच्या काळात वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा एक ऑप्शन असतो. पण त्याला शिताफीनं वळसा घालत एखादं योग्य स्टेटमेंट करायचं म्हटलं तर किती कसरत करावी लागू शकते, हे दिसतं.
Submitted by संप्रति१ on 25 December, 2023 - 00:37
असे स्टेटमेंट करणे फक्त अभिनेत्याच्या हातात / कंट्रोल मध्ये असते? कि यावर निर्माता / दिग्दर्शक / लेखक / पटकथा लेखक / संवाद लेखक यांचा कंट्रोल असतो?
जर अभिनेता स्वतःच पटकथा / संवाद लेखक असेल तरच कदाचित असू शकेल नाही का?
त्यामुळे या हुशारीचे / कसरतीचे श्रेय शाखा ऐवजी इतरांचे असू द्यावे. वैयक्तिक अभिनयाचे श्रेय १०० टक्के ज्याचे त्याला असू दे.
चांगल्या भविष्याच्या शोधात
चांगल्या भविष्याच्या शोधात दुसऱ्या देशांत
स्थलांतरित/शरणार्थी होण्यासाठी धडपडणाऱ्यांच्या लाटा येत्या दशकांत वाढतच राहणारेत. त्या पूर्णपणे थांबवणं अवघड आहे. 'वर्ल्ड इज फ्लॅट', 'जग हे आता एक खेडं आहे' वगैरे चकचकीत घोषणांचा डंका वाजवून झालेला आहे. त्याचा आऊटपुट समोर आहे. आणि ही प्रोसेस रिव्हर्स करणं कोणत्याही देशाच्या हातात राहिलं नाही. कायदेशीर मार्गांचा ॲक्सेस नसला की लोक
डंकी मार्गांनी, मानवी तस्करीच्या माध्यमांतून जीव धोक्यात घालतात. मरतात. मागे आयलान कुर्दी ह्या तीन वर्षांच्या मुलाचं शव समुद्र किनाऱ्याला लागलेलं. तेवढ्यापुरता गदारोळ झाला. शमला.)
'डंकी'नं ह्या इश्यूला हात घालून आपल्याकडचा उजेड अजून लख्ख केला, हे बरं आहे. >>> +१
वर्ल्ड इज फ्लॅट', 'जग हे आता
वर्ल्ड इज फ्लॅट', 'जग हे आता एक खेडं आहे' वगैरे चकचकीत घोषणांचा डंका वाजवून झालेला आहे. त्याचा आऊटपुट समोर आहे. आणि ही प्रोसेस रिव्हर्स करणं कोणत्याही देशाच्या हातात राहिलं नाही.
>>> हा आऊटपुट माझ्या समजुतीप्रमाणे अत्यंत सकारात्मक आहे.
चिकवा वरून कॉपी-पेस्टः
चिकवा वरून कॉपी-पेस्टः
आचार्य, तुमचा रिव्ह्यू वाचला. खूप संतुलित लिहिलाय. रिव्ह्यू आवडला. काही गोष्टींचा पुनरावलोकन सुद्धा केलं. तुम्ही मांडलेली पंजाब/हरियाणा मधली सत्य परिस्थिती माहित नव्हती. त्या अँगलमधूनही पुन्हा विचार केला आणि काही बाजू पटल्या. I can objectively see the side of illegal immigrants but cannot agree with it.
इल्लिगल इमिग्रंट्समुळे समाजव्यवस्थेवर येणारा ताण, त्यातून उद्भवणारा संघर्ष, आणि मुळातच कायदे/नियम धाब्यावर बसवण्याची वृत्ती हे माझ्या समजूतीच्या परिघाबाहेर आहे. अमेरिकेत बेकायदेशीरपणे आलेल्या इंडियन/पाकिस्तानी लोकांच्या बाबतीत तर ‘गरिब लोक, पोट भरायला आले आहेत‘ अशी सुद्धा परिस्थिती सरसकट नाहीये. त्या बेकायदेशीरपणे येण्यासाठी सुद्धा बराच खर्च केला जातो. असो. ह्या विषयाला बरेच कंगोरे आहेत आणि माझा त्याविषयी खूप अभ्यास किंवा आकलन नाही. त्यामुळे मी फक्त माझ्या मर्यादित अनुभवावरून माझं मत मांडू शकतो. माझ्या समजूतीच्या परिघाबाहेर एक अनलिमिटेड जग आहे ह्याची मला जाणीव आहे.
ह्या विषयाला बरेच कंगोरे आहेत
ह्या विषयाला बरेच कंगोरे आहेत आणि माझा त्याविषयी खूप अभ्यास किंवा आकलन नाही. त्यामुळे मी फक्त माझ्या मर्यादित अनुभवावरून माझं मत मांडू शकतो. माझ्या समजूतीच्या परिघाबाहेर एक अनलिमिटेड जग आहे ह्याची मला जाणीव आहे. >>> लाखमोलाचे बोललात. ही भूमिका दुर्मिळ होत चालली आहे. अशी भूमिका असणारे आपल्या आजूबाजूला असणे हेच श्रीमंत असणे असते. मग सहमतीशी असहमती आणि असहमतीशी सहमती अगदी उमदेपणाने होते. मतभेद मांडायला उत्साह येतो. तुमचे मायबोलीवर असणे ही सुरेख मैफल आहे.
धन्यवाद आचार्य! “ सहमतीशी
धन्यवाद आचार्य! “ सहमतीशी असहमती आणि असहमतीशी सहमती अगदी उमदेपणाने होते. मतभेद मांडायला उत्साह येतो.” - तोच तर चर्चेचा gist असतो.
मस्त लिहिले आहे. पठाण आणि
मस्त लिहिले आहे. पठाण आणि जवान नंतर उत्सुकताच राहीली नव्हती, हे वाचून निर्माण झाली आहे. तुम्ही फार सहज लिहिता, भाषाप्रभुत्व, विनोदबुद्धी, चपखल निरीक्षण .... ये हात मुझे दे दे आचार्य
! .
आलं का लंडन??? हा विनोद (नॉन डंकी) लोकांनी लंडनच्याच विमानात लँडिग झाल्यावर केलेला बघितलाय. त्यात माझी आई(ती फार मिष्किल होती) मला म्हणे लंडनच्या विमानात बसल्यावर लंडनच येणार नं , पॅरीस थोडीच येणार
चपखल निरीक्षणं आहेत. खास करून----
हिरानी थोडा बॅलन्स साधायला जातो. अनेक भाबडे प्रसंग चपखलपणे घुसवतो जे मासेस साठी असतात.
डंकी मधे असे प्रसंग फसले आहेत . कारण काहीसे नवे तत्वज्ञान चटपटीतपणे पेरलेले असते त्यामुळे अशा काही प्रसंगांना प्रेक्षक चालायचंच म्हणून सोडून देतो
शेवटीशेवटी ते पूर्ण गाव गोळा करतात त्या पॅटर्नचा कंटाळा यायला लागला होता. जसं पिके मधले मिडिया कव्हरेज, मुन्नाभाई मधले रेडिओ कव्हरेज आणि इतक्या सगळ्यांची emotional involvement व त्याला पुन्हा मूळ कथानकाशी समांतर करणं कृत्रिम वाटत रहातं.
पुस्तक न लिहीण्याची अनेक कारणे>>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
संप्रति यांचा प्रतिसाद आवडला. 'हाहा:कार-प्रूफ' >>> गुड वन.
खुप छान परिक्षण. शाहरुख मला
खुप छान परिक्षण. शाहरुख मला फारसा आवडत नाही, त्याचा अभिनय बर्याचदा रुचत नाही, लाउड वाटतो.
चित्रपट ओटीटीवर आल्यावर नक्किच पाहीन.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
डंकी पहावा की नाही हे माझं अजून ठरत नाहीय.
बोम्मन इराणीचे पात्र वरचेवर आले आहे >>> इथे वरवरचे हवं ना?
(वरचेचर - याचा अर्थ वेगळा आहे)
हो.बोंमन ला फारच कमी वेळात
हो.बोंमन ला फारच कमी वेळात आणि कमी क्षमतेच्या रोलमध्ये निपटले आहे.
मला देखील डंकी अजून तरी
मला देखील डंकी अजून तरी पहावसा वाटलेला नाही ,
ओटिटी वर हा मूव्ही आल्या नंतर महत्प्रयासाने पाहण्याचा प्रयत्न करीन .
इथे वरवरचे हवं ना? >>. हो.
इथे वरवरचे हवं ना? >>. हो. माफ करा चुकून झाले. लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे.
सर्वांचे धन्यवाद.
चांगले लिहिले आहे परीक्षण.
चांगले लिहिले आहे परीक्षण. अगदी तपशिलात जाऊन मुद्दे लिहिलेत. तुमचा पंजाबातील वास्तव्याचा अनुभव बराच कमी आलेला दिसतोय चित्रपट पाहताना (विशेषतः पहिला अर्धा भाग).
>> हिरानीची सपोर्टिंग पात्रं हा त्याच्या सिनेमाचा युएसपी असतो. एक समस्या घेऊन तिला विविध फोडण्या देण्यासाठी ही पात्रं चांगली वापरतो.
खूप छान निरीक्षण. नोंद करून ठेवण्यासारखे. आवडले.
>> पंजाबच्या बाहेर शीखांचे एक गोड चित्र आपल्यापर्यंत पोहोचते. तसे ते अजिबात नाही.
अगदी पटले. हे थोडे जनरलाईज केले तर इतर अनेक प्रांत/समुदाय/व्यक्ती यांच्याबाबतही लागू पडते
>> ते स्वस्त मिळत. ते आणायला महाराष्ट्रातले शेतकरी जायचे.
एस्कोर्ट नावाच्या कंपनीचे ट्रॅक्टर स्वस्तात मिळतात म्हणून महाराष्ट्रातील अनेक गावांतील लोकांनी आणले होते ते आठवले
>> एका ढाबेवाल्याने रेखाला घेऊन एक चित्रपट बनवला होता.
हे माहित नव्हते. इंटरेस्टींग आहे. याबाबत अधिक (कोणता चित्रपट वगैरे) सांगा शक्य असेल तर
>> शेती, घरदार विकून परदेशी गेलेले लोक मढ आयलँड मधे डांबून ठेवले जायचे. यातल्या काहींच्या हत्या झाल्या.
बापरे! हे सुद्धा माहित नव्हते
>> गाणी लौकिकाला साजेशी नाहीत. संगीतकार कोण आहे हे बघण्याचे सुद्धा कष्ट घेऊ नयेत
माझे तर इकडे लक्षच नव्हते गेले. संगीताचे अस्तित्व जाणवत नाही. हे सुद्धा एक प्रकारे स्कीलच आहे म्हणायचे संगीतकाराचे![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
>> शाहरूखचा संयत वावर पुरेसा वाटत नाही. तो यात उपरा वाटला आहे.
सहमत. पण मला हे विशेष वाटते. कारण मी जितके वाचले आहे त्यानुसार शाखा स्वत: एडिटिंगला उपस्थित असतो. आपले महत्व कमी होऊ नये याबाबत तो फार दक्ष असतो असे वाचण्यात आले आहे. इथे मात्र शाखा खरंच उपरा/माईल्ड वाटला आहे.
>> आय क्विट वर जेव्हढी चर्चा झाली तेव्हढा धक्का यात बसत नाही.
कौशलच्या आत्महत्येचा प्रसंग कॉन्फ्लीक्ट establish करण्यासाठी वापरून त्यावर पुढचा संपूर्ण चित्रपट तोलता आला असता. तेवढी क्षमता त्या प्रसंगात होती.
>> क्लायमॅक्स ला हिरानी पुन्हा चित्रपटावर पकड मिळवतो.
हिरानी फार कमी ठिकाणी स्वत: हजर आहे चित्रपटभर. बहुतेक दिग्दर्शन असिस्टंट कडेच गेलेले वाटते![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पांचट चित्रपट.. त्यापेक्षा
पांचट चित्रपट.. त्यापेक्षा सालारबेस्ट…
इथे एक जनरल कन्फेशन द्यायचं
इथे एक जनरल कन्फेशन द्यायचं आहे.
भंगार/पांचट/ टुकार/फालतू/ बकवास/बंडल/बोअरिंग/बालिश/थर्ड क्लास.
किंवा
वा वा छान छान/ खूप मस्त/ लय भारी/ अप्रतिम/बेस्ट/आवडलं/ ग्रेट/सहीच/खतरनाक/ हॅट्स ऑफ.
सोशल मिडियावर इतरत्र नवा नवा सक्रिय झालेलो तेव्हा अशा प्रकारे स्वतःला वाटत सुटलेलो. घाईघाईनं स्वतःला रिलीज करून टाकणारे माझेच ते जुने प्रतिसाद बघतो तेव्हा, तेव्हाचा तो मी कुणीतरी अनोळखी मनुष्य वाटायला लागतो. गंमतही वाटते. आणि एक्स्प्रेशनचं थोडंसं ट्रेनिंग मला तेव्हा मिळालं असतं, तर कदाचित आज थोडा कमी गिल्ट वाटला असता, असंही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अर्थात, काय माहित, हे मूडवरपण असेल, मनाचा काही भरोसा नाही, कदाचित इथे आत्ता हे टाईपलंय ते पुढे कधीतरी गैरलागू वाटायला लागू शकतं.
पण तरीही कौतुक किंवा शेरेबाजी, ह्या दोन्ही केसेसमध्ये किमान एक दोन कारणंही देण्याचा प्रयत्न करता आलं तर त्यातल्या त्यात जरा बरं, असं स्वतःपुरतं एक ठरवलंय. कसं कसं जमतंय ते, बघावं म्हणतो.
सांप्रति, छान प्रतिसाद.
सांप्रति, छान प्रतिसाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रोखठोक मतं मांडण्यापर्यंत झालेला प्रवास आवडला. लिहीत रहा.
अ तुलजी, आवडला प्रतिसाद.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तुमच्या धाग्यावर प्रतिसाद दिला म्हणून कंपल्शन नाही हो प्रतिसाद द्यायचे.
तुम्ही पण रोखठोकच आहात. त्यामुळे तसे नसणार ही खात्री आहे. फक्त असे सांगण्याची संधी घेतली. ज्यांच्याशी संबंध येतो त्यांच्यावर ओझे नको.
Pages