धोपटमार्गा सोडू नको - डंकी रिव्ह्यू

Submitted by रघू आचार्य on 24 December, 2023 - 00:01

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपटमार्गा सोडू नको
संसारामधे ऐस आपुला,उगाच भटकत फिरू नका

या दोन ओळीत डंकी सामावलेला आहे.
राजकुमार हिरानी म्हटलं कि काय काय बघायला मिळणार याची चित्रं आधीच डोळ्यापुढे उभी राहतात.

साधे साधे संवाद, इंटेलिजिन्ट ह्युमर आणि त्यात लपेटलेलं चमत्कारिक तत्त्वज्ञान, त्या चमत्कारिक तत्त्वज्ञानाला हसता हसता मुख्य पात्रांच्या बाबत घडणारी संकट मालिका त्यातून घडणारे विनोद आणि त्यातून दिसत राहणारी समस्या. त्या समस्येवर प्रसंगातून होणारे भाष्य , उत्तम संगीत आणि एक प्रकारचा मांडणीतला फ्रेशनेस.

पण त्याच वेळी लगे रहो मुन्नाभाई मध्ये अगर ये सुन रहा है, देख रहा है , ये सब सुनी सुनाई बाते कही तो इसके दिमाग मे जाती होगी ना ? असे भाबडे संवाद असतात. मुन्नाभाई आला तेव्हां ते खपून गेलं. थ्री इडीयट्स मधेही आमीर खान "चारो तरफ ग्यान बट रहा है, कही भी जाओ" असे तत्त्वज्ञान सांगतो. यातला आदर्श आशावाद व्यावहारिक नसतो. व्यावहारिक मनाला ते पटत नाही. पण कलाकार म्हणून व्यवहाराच्या दोन पावले पुढे जात आहे त्या व्यवस्थेवर हसत हसत दोष ठेवणे हे कसब राजू हिरानी ला साधले होते.

पी के मधे धर्म आणि पाखंड हा विषय विनोदाच्या माध्यमातून मांडला खरा. पण त्या आधी ओएमजी येऊन गेला असल्याने तो अपील झाला नाही. त्यातली एलियनची फोडणी ब्रिलियंट होती. एलियनच्या माध्यमातून व्यवस्था किती हास्यास्पद आहे हे सांगणे ब्रिलीयंट आहे. पण पीकेचा क्लायमॅक्स पूर्णपणे गंडलेला आहे. अशक्य भाबडेपणा आणि फिल्मी शेवट आहे. थ्री इडीयट्स मधे हाच फिल्मीपणा सुसह्य आहे. थोडक्यात हा खेळातल्या कौशल्याचा भाग आहे.

डंकी पाहताना पीकेची वॉर्निंग होतीच.
कुठे तरी राजकुमार हिरानी कडचे नावीन्य सुरूवातीच्या चित्रपटाच संपलेले आहे हे जाणवते. पण तोच तोच पणा येऊन चित्रपट कंटाळवाणा होत नाही. सुरूवातीपासून फील गुड अनुभव देत राहतो. हिरानीची सपोर्टिंग पात्रं हा त्याच्या सिनेमाचा युएसपी असतो. एक समस्या घेऊन तिला विविध फोडण्या देण्यासाठी ही पात्रं चांगली वापरतो.

बोम्मन इराणीचा इंग्लीशचा क्लास धमाल आहे. आय वॉन्ट टू गो टू लावाटोरी हे चाल लावून शिकवणे आणि तीन महीन्यात किती गाणी शिकवणार हा विकी कौशलचा त्याला येणारा नेहमीचा प्रश्न. व्हिसा अधिकार्‍यापुढे इंग्लीश बोलण्यासाठी बनवलेला बिनतोड इंग्लीशचा गाळलेल्या जागा भराचा फॉरमॅट आणि प्रत्यक्षात झालेल्या मुलाखती हा कळस आहे.

डंकी मार्गाने इंग्लंडला पोहोचल्यावर आपण इंग्लंडलाच पोहोचलो ना याची खात्री करून घेण्यासाठी एक पात्र जमिनीवर हात आपटून विच कंट्री असं एका इंग्रज जोडप्याला विचारते त्यातून होणारे विनोद मजेशीर. ती इंग्रज बाई फॉरिनर्स मुळे न्युसन्स वाढलाय अशी कमेंट करते तेव्हां ती आपल्याला फॉरिनर समजली एव्हढेच कळल्याने त्याला झालेला आनंद , "माझी आई नेहमी म्हणायची कि मी फॉरिनर सारखा दिसतो" या संवादाचं टायमिंग धमाल आहे. फॉरिनर हा शब्द याच अर्थाने आजही वापरला जातो.

सुरूवातीच्या विनोदातून सुद्धा पंजाबातून इंग्लडला जाण्याची सर्वांची तीव्र इच्छा हा भाग ठळक करण्यात हिरानीला यश आलेले आहे. ज्यांची मुलं विदेशात जातात ते घरावर विमान बसवतात हे खूप चांगले हायलाईट केले आहे.

पंजाब हरियाणा भागात दहा बारा वर्षे सतत येऊन जाऊन असल्याने या राज्यातली श्रीमंती पाहिलेली होती. पण दुसरे चित्र कधीच दिसले नाही. ते दिसले ते कामगारांसोबत काम करताना. भूमिहीन शेतकर्‍यांची अवस्था, दारूचे व्यसन हे पहायला मिळाले. परदेशी जाऊन गरीबी संपते हे ऐकायला मिळाले होते. पंजाबच्या बाहेर शीखांचे एक गोड चित्र आपल्यापर्यंत पोहोचते. तसे ते अजिबात नाही. शीखांमधेही जातीयवाद आहे. श्रीमंत गरीब भेद आहे. वेगवेगळे लंगर आहेत.

तरीही ते एक प्रगत राज्य होते. एके काळी प्रत्येकाच्या शेतात कुठला न कुठला कुटीरोद्योग असायचा. शेतात ट्रॅक्टर, रोडरोलर बनायचे. ते स्वस्त मिळत. ते आणायला महाराष्ट्रातले शेतकरी जायचे. उत्तर प्रदेशातली जुगाड रिक्षा पंजाबात बनायला लागली. ढाबे पंजाब्यांचेच. एका ढाबेवाल्याने रेखाला घेऊन एक चित्रपट बनवला होता. सेक्टर २२ मधे त्याचा पहिलवान धाबा होता. रेखाला घेऊन सिनेमा बनवायचा एव्हढेच ध्येय होते. त्या वेळी शेतात उद्योग काढणे ही स्पर्धा होती. शेतमालाला चांगला भाव मिळाल्याने आलेल्या पैशातून हेल्दी काँपिटिशन होती. नंतर या राज्याला काय झाले कळलेच नाही.

अंमली पदार्थांच्या आहारी राज्य गेले. दलेर मेहंदी परदेशात जाऊन स्टार गायक झाला म्हणून अनेक जण परदेशी जाऊ लागले. त्या वेळी एक मोठे स्कॅम उघडकीस आले होते. शेती, घरदार विकून परदेशी गेलेले लोक मढ आयलँड मधे डांबून ठेवले जायचे. यातल्या काहींच्या हत्या झाल्या. तर दलेर मेहंदी सारख्या अनेकांच्या टीम मधे सदस्य म्हणून बेकायदेशीर मार्गाने काही जण परदेशात जात. टॅक्सी चालवणे हा पंजाब्यांचा मुख्य व्यवसाय बनला.

तरीही याशिवाय डंकी मार्ग असतो आणि त्या मार्गाने गेलेल्यांचं भयावह चित्र हे या चित्रपटामुळे समजले. त्याबद्दल हिरानीचे अभिनंदन !
वेगळ्या विषयावरचे चित्रपट स्विकारण्याची आपली अजून तयारी नाही झालेली. ज्यांना असे चित्रपट झेपतात ते क्लास आणि ज्यांना झेपत नाहीत ते मास असे ढोबळमानाने वर्गीकरण केले जाते. सालार,केजीएफ, पठाण,जवान हे मासचे चित्रपट. त्यामुळे दोन्हीची तुलना यशाच्या स्केलवर करता येत नाही.

हिरानी थोडा बॅलन्स साधायला जातो. अनेक भाबडे प्रसंग चपखलपणे घुसवतो जे मासेस साठी असतात.
डंकी मधे असे प्रसंग फसले आहेत . कारण काहीसे नवे तत्वज्ञान चटपटीतपणे पेरलेले असते त्यामुळे अशा काही प्रसंगांना प्रेक्षक चालायचंच म्हणून सोडून देतो. इथे अशा तत्वज्ञानात नावीन्य नाही. त्यामुळे काहींना चित्रपट निराशाजनक वाटू शकतो. थेटरमधून बाहेर पडल्यावर काही चुका जाणवायला लागतात. पण तीन तासात अडीच तास तरी चित्रपट सुसह्य आहे. प्रसन्न आहे.

संगीत निराशाजनक आहे. गाणी लौकिकाला साजेशी नाहीत. संगीतकार कोण आहे हे बघण्याचे सुद्धा कष्ट घेऊ नयेत अशी कामगिरी आहे. बॅकग्राऊंड स्कोर थ्री इडीयटचाच आहे. सुरूवातीला विमान थांबवणे आणि तापसी पन्नूचे हॉस्पिटलमधून पळून येणे हे एकसारखे आहे.

लालटू नावाचे काल्पनिक गाव उभे करताना उभारलेले सेट्स कृत्रिम वाटतात. लालरू नावाचे मोहालीत गाव आह. पंजाबात दिसणारी हिरवीगार शेतं एकाच गाण्यात दिसतात. दिलवाले आणि परदेस मधे त्याचा चांगला उपयोग केलेला आहे.

शाहरूख खप्पड झाल्याने वयस्क्र वाटतो. जस जसे वय होत चाललेय तस तसा त्याचा अभिनय पिकलेल्या आंब्यासारखा प्रगल्भ होत चालला आहे हे दिसते. त्याचा ह्युमर हा त्याचा युएसपी. पण हिरानीच्या चित्रपटातल्या विनोदासाठी शाहरूखचा संयत वावर पुरेसा वाटत नाही. तो यात उपरा वाटला आहे. ओ तेरी म्हणत आमीर जेव्हढा ख़ळखळून हसतो, टिंगल टवाळी करताना डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसतो/ हसवतो ती एनर्जी शाहरूख कडे पहिल्यापासून नाही. खळखळून हसवता हसवता धक्का देणे ही हिरानीची शैली इथे विकीच्या पात्रातून दिसते. थ्री इडीयट्स मधला आय क्विट हा सीन जितका बहुचर्चित झाला, आय क्विट वर जेव्हढी चर्चा झाली तेव्हढा धक्का यात बसत नाही. लाल रंगाच्या शर्ट मधे शाहरूख खान मस्त दिसतो. लेडीकिलर लुक आहे. तो तितका गोरा आहे कि मेक अप हे माहिती नाही.

तापसी पन्नू ने ठीक ठाक अभिनय केला आहे. तिची आणि शाखाची केमिस्ट्री जमलेली नाही. तापसी, क्रिती, अनुष्का, वाणी कपूर या हिरविणी वाटत नाहीत. क्रिती कंपनी सेक्रेटरी वाटते तर तापसी सीईओ किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअर ( ती तशी होतीच). पण नेहमीच करीना, कॅटरीना , दीपिका या अप्सरांना तरी किती बघायचे ? म्हणून या ठीक. बोम्मन इराणीचे पात्र वरवरचे आले आहे. आधीच्या चित्रपटासारखे ते अविभाज्य भाग नाही. विकी कौशलचे पात्रही असेच. पण प्रभावी झालेय.

क्लायमॅक्स ला हिरानी पुन्हा चित्रपटावर पकड मिळवतो. पण शेवट करताना इथे करू कि तिथे करू, या विचारात थोडे सेन्टी सीन्स जास्तीचे झाले आहेत. पीक वर चित्रपट संपत नाही.

शाहरूखने हा चित्रपट स्विकारून कुठलीही चूक केलेली नाही, पण राजू हिरानीने शाहरूखला घेऊन चूक तर नाही ना केली असे वाटत राहते. शाहरूखच्या पात्रात आमीर खानला इमॅजिन केले कि मग उलगडा होतो. शाहरूखची शक्तीस्थाने लक्षात घेऊन चित्रपट लिहीला गेला असता तर अधिक आनंद देणारा ठरला असता.

तरी ही डंकी पहायला हरकत नाही. जितके रिव्ह्यूज नकारात्मक आहेत तितका डंकी वाईट नाही. हिरानीचा बेस्ट तर नक्कीच नाही पण मनोरंजन करण्यात कुठेच कमी पडत नाही. वन टाईम वॉच नक्कीच. ओटीटी वर पहायला काहीच हरकत नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही हो, कम्पलशन वाला प्रतिसाद इतका मोठा आणि इतक्या उशिरा दिला नसता Lol मी बघितला होता हा चित्रपट व परिक्षणं वाचायची होतीच, पण आधी परीक्षण वाचले तर माझे लिखाण बायस्ड होईल म्हणून तुमचे आणि ऋन्मेऽऽष यांचे धागे उशिरा वाचले इतकेच.

तुमच्या धाग्यावर प्रतिसाद दिला म्हणून कंपल्शन नाही हो प्रतिसाद द्यायचे.
>>> बरं झाले सांगितले... भरपूर लोक तुम्हाला घाबरून असे करत असावेत...

Pages