काशी क्षेत्री गंगा लहरी निरूपण… एक स्वर्गीय अनुभूती.

Submitted by मनीमोहोर on 6 December, 2023 - 04:32
धनश्री लेले,  जगन्नाथ पंडित

काशी क्षेत्री गंगा लहरी निरूपण… एक स्वर्गीय अनुभूती.

दोन तीन महिन्यांपूर्वी “ काशीला येणारेस का ? “ हे विचारणारा मैत्रिणीचा फोन आला आणि मी क्षणाचा ही विलंब न करता “हो” म्हटलं. काशी आणि पंढरपूर ही आमच्या आजीची दोन श्रद्धास्थानं होती. नुसत नाव उच्चारलं कोणी तरी नकळत हात जोडले जात तिचे. लहानपणी आम्हाला ती खुप गोष्टी सांगत असे काशी आणि गंगेच्या. “ काशीस जावे, नित्य वदावे “ हे ती रोज फक्त म्हणतच राहिली पण काशीविश्र्वेवर दर्शन काही तिच्या नशिबात नव्हतं. आजीच्या आठवणीना बरोबर घेऊन आपण तरी दर्शन करू या हा सुप्त हेतू ही मनात होताच.

परंतु नंतर मला समजले की ही काशी, गया, प्रयाग अशी नॉर्मल सहल नव्हती तर झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या छोट्या बोटीने गंगेच्या पात्रात जाऊन तिथे धनश्रीताई लेले जगन्नाथ पंडित यांच्या "गंगा लहरी" ह्या पंधराव्या शतकात लिहिलेल्या काव्यावर तीन दिवस निरूपण करणार होत्या. धनश्रीताईंचं नाव मी ऐकलं असलं तरी त्यांची व्याख्यानं काही मी ऐकलेली नव्हती आणि गंगा लहरी बद्दल तर मी पूर्णपणे अनभिज्ञच होते.

.IMG-20231130-WA0011.jpg

जगन्नाथ पंडित हे दिल्लीपती शहाजहानच्या पदरी असलेले प्रतिभा संपन्न संस्कृत कवी आपल्या आयुष्याच्या सरत्या काळी श्री क्षेत्र काशी येथे आले. गंगेचा महिमा वर्णन करणारे आणि आपल्या पाप क्षाळणाची / मुक्तीची गंगेकडे याचना करणारे गंगा लहरी हे बावन्न श्लोकांचे काव्य त्यांनी गंगेच्या घाटावर बसूनच रचिले. अशी ही आख्यायिका आहे की घाटाच्या बावन्नाव्या पायरीवर बसून ते एकेक श्लोक रचत गेले . प्रत्येक श्लोकागणिक गंगा ही एकेक पायरी वर चढत आली आणि संपुर्णाला गंगेने कविराजाना आपल्या पात्रात सामावून घेतले आणि मुक्ती दिली.

गंगेचा महिमा वर्णन करणे आणि आपल्या पाप क्षाळणाची तिच्याकडे याचना करणे एवढेच खरे तर गंगा लहरीचे मर्म आहे. श्लोकांमध्ये ही फार सुसूत्रता आहे असं नाहीये. परंतु हया संस्कृत श्लोकांमधील अलंकार, वृत्त, त्यातील पौराणिक संदर्भ, एखाद्या श्लोकाचं आपल्या संत साहित्याशी असणारं साधर्म्य, त्याचा भावार्थ वगैरे सर्व सौंदर्य स्थळे साक्षात शारदेचा वरदहस्त लाभलेल्या धनश्रीताईंनी आपल्या मधुर आणि मृदू वाणीने अशी काही उलगडून दाखवली की आम्ही अगदी मंत्रमुग्ध होऊन गेलो. गंगेच्या पात्रात, नदीवरून येणाऱ्या गार वाऱ्याच्या मंद झुळुकांचा आनंद घेत धनश्रीताईंचे निरूपण ऐकणे हा आम्हा सर्वांसाठीच अगदी स्वर्गीय आणि अविस्मरणीय अनुभव होता.

हे निरूपण ऐकताना कंटाळा तर आला नाहीच उलट पुढच्या श्लोकात काय असेल ही उत्सुकता वाढतच राहिली. आणि शेवटी भरून पावल्याची आणि रीतेपणाची अश्या दोन्ही भावना मनात एकाच वेळी दाटून आल्या. हे स्तोत्र जसं जसं पुढे सरकत गेलं तशी तशी गंगेकडे बघण्याची माझी दृष्टीच बदलून गेली.

त्या काळात आणखी विशाल असलेलं गंगेचं पात्र, काठावर असलेली घनदाट वृक्षराजी, तिचं अमृताहून मधुर असलेलं पाणी, मंद लहरी, शीतल वारा ,नदीपात्रात फुललेली गुलाबी कमळं, हलक्या वाऱ्यामुळे पाण्यावर तरंगणारे कमळातील लाल परागकण, अंगाला कस्तुरी लेपन करून नदीवर स्नानाला आलेल्या राजस्त्रिया हे सगळ मी कल्पनेतच अनुभवलं आणि मन पिसासारखं हलकं होऊन गेलं. घाटावर मला कविराज जगन्नाथ हे स्तोत्र रचताना ही दिसले. सामान्य जनांना मोक्षाच्या आशेने मृत्यू गंगेच्या तीरावर यावा असं वाटतं परंतु मोक्ष कर्माने मिळतो अशी शिकवण देणारे, पूर्ण आयुष्य गंगेकाठी घालवलेले परंतु आपल्या शेवटच्या दिवसात गंगा ओलांडून पैलतीरावर जाणारे संत कबीर ही गंगेच्या घाटावर बसून कल्पनेतच बघितले.

ह्या व्याख्यानांच्या वेळा सांभाळून काशी दर्शन ही सुरू होतचं. सगळ्याच हिंदूंचं आराध्य दैवत असलेल्या काशी विश्वनाथ दर्शनासाठी आम्ही पहाटे तीन ते चार ची आरती ऑनलाईन बुक केली होती . देवळाचं प्रांगण खुप छान, स्वच्छ आणि प्रशस्त आहे. पहाटेची शांत वेळ , आकाशात पौर्णिमेच्या आसपासचा पूर्ण चंद्र, थंड हवा, कानावर येणारे पहिल्या आरतीचे सुर असं छान वातावरण विश्वेश्वराच्या दर्शनाची ओढ वाढवतच होतं.

IMG-20231128-WA0007.jpg

गर्दी खरं तर फार नव्हती. परंतु देवळाचा गाभारा छोटा असल्याने आणि एकंदरच लाईन लावण्याची आपल्याला आवड नसल्याने गाभाऱ्यात जाण्यासाठी खूप लोटा लोटी होत होती. बरोबरच्या मैत्रिणी गर्दीत दर्शनासाठी भिडल्या होत्या. गर्दीमुळे दर्शनाच्या रांगेतून बाहेर पडणं ही मला शक्य नव्हतं आणि पुढे ही जाणं शक्य नव्हतच . मी रांगेतून थोडी बाजूला होऊन अंग चोरून एका कोपऱ्यात कशीबशी उभी होते.

तेवढ्यात तिथला सुरक्षा रक्षक दिसला. त्याला म्हटल, “हे बॅरिकेड जरा बाजूला घ्या मी बाहेर येते.” हे ऐकून तो ही चक्रावला. म्हणाला , " तुमच्या पेक्षा वयस्कर बायका घेतायत दर्शन , तुम्ही का तश्याच जाताय ?" मी " लोटा लोटीची भीती वाटते " असं म्हटल्यावर "काशी विश्वेश्वर असताना कसली आलीय भीती ? जा बिंधास " म्हणाला, तरी ही गर्दीत भिडण्याचं डेअरिंग मला होतचं नव्हतं. मी पण निराश, हताश झाले होते एवढं दोन फुटांवर असून ही दर्शन नाही म्हणून. पण नंतर काय त्याच्या मनात आलं माहीत नाही , त्याच्या रुपात विश्वेश्वरच जणू धावून आला. त्याने लाईन सिंगल केली. लोटा लोटी त्यामुळे थोडी कमी झाली. मला म्हणाला “आता जा “. मग गेले आणि दर्शन झालं. शंकराची पिंडी जमिनीपासून थोडी खाली आहे. चारी बाजूंनी सहा आठ इंचाचा कठडा आहे. पिंडी काळी भोर असून तशी आकाराने लहान आहे. विशेष म्हणजे पिंडीला हात लावून सर्वांना दर्शन घेता येते. दर्शन घेऊन बाहेर ओवरीवर येऊन बसले तेव्हा मात्र एकदम शांत आणि निवांत वाटल.

बनारस शहर अस्वछता, गर्दी ह्यासाठीच प्रसिद्ध आहे. पण मला बनारस खुप आवडलं. म्हंजे तिथला ट्रॅफिक, तिथली बेशिस्त, तिथल्या बोळकंडी सारख्या गलल्या, गर्दी, फार स्वच्छ नसणारी गंगा नदी आणि तिच्यावरचे प्रसिद्ध घाट, गोड बोलणारी लोकं, त्यांची थोडी वेगळी हिंदी भाषा, तिथल एकंदर कल्चर, बनारसी पान, रबडी, चाट, चाय, मिठाई, साड्या , सगळचं आवडलं आहे. स्थान महात्म्य म्हणातत तसं काही तरी वेगळं आहे त्या गावात नक्की ... उगाच नाही एवढी लोकं जातं तिथे. असो.

20231202_080641.jpg

आता मी घरी आले आहे पण मनावर अजून ही बनारस आणि गंगा लहरीच गारूड कायम आहे. गंगा लहरी च्या रसास्वादाची तृप्ती अजून झाली नाहीये. उलट " आणखी हवं " अशी ओढ वाटते आहे. यू ट्यूब वर असेल तर ऐकीन ही पुन्हा पण त्याला ती सर येणार नाही हे नक्की.. ही स्वर्गीय अनुभूती आम्हा सामान्य जनांना देणाऱ्या धनश्रीताईंप्रती कृतज्ञता व्यक्त करते. त्यांचे आभार न मानता त्यांच्या ऋणात राहणेच मला जास्त आवडेल.

हेमा वेलणकर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ममो, छान लिहिलंय. धनश्री लेल्यांच्या क्लिप्स बघितल्या आहेत.
काशीला विश्वेश्वरापेक्षा गंगा आणि ते घाट बघायची मलाही जाम उत्सुक्ता आहे. इतकी वर्णने वाचली पाहिली आहेत की विचारू नका.

@मामी
@मनीमोहोर

खरंच खूप भाग्यवान आहे मी. पुनर्जन्म असेल तर मला तेच पितृत्व मिळावं....

पंडित राज जगन्नाथ हे ह्यावरच आधारित आहे नाटक. त्यांचं चरित्र तसं खूपच नाट्यमय आणि थ्रीलिंग आहे त्यामुळे नाटक चाललं असेल चांगलं. जय गौरी शंकर आणि हे अशी दोन नाटकं आमच्या आईने ही लागोपाठ पाहिली होती हे ही आठवतय.
मामी, विजया गोडबोले यांचा व्हिडिओ मी ही पाहिला, धन्यवाद इथे लिंक दिलीस म्हणून.
WallE धन्यवाद.
अमितव, धन्यवाद. बनारस भुरळ पडल्यासारखंच आहे. तेंव्हा नक्की जा .

छान लिहिले आहे ममो. वाचून जावेसे वाटते आहे . ८१ वयाच्या वडिलांना घेऊन जायची खूप इच्छा आहे . पण त्यांच्या शारीरिक मर्यादा मुळे ठरवले नाहीये. तिकडचे कोणी भरवशाचे गुरुजी / ट्रॅव्हल एजंट माहीत आहेत का ?

भाग्यवान आहात ममो.काशी विश्वेश्वर दर्शन घडले.तेही गंगालहरी अनुभवासह.
मी गर्दी, रेटारेटी असलेल्या देवस्थानांना घाबरते.इतक्या घाईत देव मनाला भेटणार नाही, अगदी 2 सेकंद दिसला तर काय प्रार्थना करावी हेच आपल्याला सुचणार नाही असं वाटतं.पण हे अनुभव भक्तीने घेणाऱ्या, आनंद घेणाऱ्या भाविकांप्रती आदर आणि श्रद्धा आहे.

वाह ममो! छान वाटलं तुमचा अनुभव वाचून! धनश्री लेले यांचे गंगालहरी वरचे निरूपण युट्यूबवर ऐकले आहे. प्रत्यक्षात गंगेच्या पात्रात बसले असताना ते ऐकणे हा अनुभव फार छान असणार. याचे नियोजन करणाऱ्या टिमचे कौतुक वाटले!

अश्विनी, अनु, जिज्ञासा, अहिल्या नेऊरगावकर धन्यवाद.

अश्विनी माझ्या ओळखीचे नाहीयेत कोणी गुरुजी. हलली गुरुजी करतात की सगळ ऑनलाईनच केलं आहे हे पण माहित नाही.
आम्ही ऑनलाईन प्रत्येकी पाच शे भरून ऑनलाईन बुकींग केलं होत त्यांच्या साईट वरून. आम्ही गेलो तेव्हा फारच लिमिटेड लोकं होती त्यामुळे लोटा लोटी होईल अस अजिबात वाटलं नव्हत. पण मुख्य दरवाजातून आत जाताना प्रत्येक जण फारच इम्पेशंट होत होता आणि पुढे पूढे जायला बघत होता. असो पण ती आपली वृत्तीच आहे, माझ्या सारखे लाईन लावू म्हणणारे थोडेच आहेत.

सर्वच प्रसिद्ध देवळात जिथे गर्भागृहात जाता येतं तिथे हेच घडतं. शेगाव हा एकच अपवाद आहे अस वाटत.

Pages