काशी क्षेत्री गंगा लहरी निरूपण… एक स्वर्गीय अनुभूती.

Submitted by मनीमोहोर on 6 December, 2023 - 04:32
धनश्री लेले,  जगन्नाथ पंडित

काशी क्षेत्री गंगा लहरी निरूपण… एक स्वर्गीय अनुभूती.

दोन तीन महिन्यांपूर्वी “ काशीला येणारेस का ? “ हे विचारणारा मैत्रिणीचा फोन आला आणि मी क्षणाचा ही विलंब न करता “हो” म्हटलं. काशी आणि पंढरपूर ही आमच्या आजीची दोन श्रद्धास्थानं होती. नुसत नाव उच्चारलं कोणी तरी नकळत हात जोडले जात तिचे. लहानपणी आम्हाला ती खुप गोष्टी सांगत असे काशी आणि गंगेच्या. “ काशीस जावे, नित्य वदावे “ हे ती रोज फक्त म्हणतच राहिली पण काशीविश्र्वेवर दर्शन काही तिच्या नशिबात नव्हतं. आजीच्या आठवणीना बरोबर घेऊन आपण तरी दर्शन करू या हा सुप्त हेतू ही मनात होताच.

परंतु नंतर मला समजले की ही काशी, गया, प्रयाग अशी नॉर्मल सहल नव्हती तर झेंडूच्या फुलांनी सजवलेल्या छोट्या बोटीने गंगेच्या पात्रात जाऊन तिथे धनश्रीताई लेले जगन्नाथ पंडित यांच्या "गंगा लहरी" ह्या पंधराव्या शतकात लिहिलेल्या काव्यावर तीन दिवस निरूपण करणार होत्या. धनश्रीताईंचं नाव मी ऐकलं असलं तरी त्यांची व्याख्यानं काही मी ऐकलेली नव्हती आणि गंगा लहरी बद्दल तर मी पूर्णपणे अनभिज्ञच होते.

.IMG-20231130-WA0011.jpg

जगन्नाथ पंडित हे दिल्लीपती शहाजहानच्या पदरी असलेले प्रतिभा संपन्न संस्कृत कवी आपल्या आयुष्याच्या सरत्या काळी श्री क्षेत्र काशी येथे आले. गंगेचा महिमा वर्णन करणारे आणि आपल्या पाप क्षाळणाची / मुक्तीची गंगेकडे याचना करणारे गंगा लहरी हे बावन्न श्लोकांचे काव्य त्यांनी गंगेच्या घाटावर बसूनच रचिले. अशी ही आख्यायिका आहे की घाटाच्या बावन्नाव्या पायरीवर बसून ते एकेक श्लोक रचत गेले . प्रत्येक श्लोकागणिक गंगा ही एकेक पायरी वर चढत आली आणि संपुर्णाला गंगेने कविराजाना आपल्या पात्रात सामावून घेतले आणि मुक्ती दिली.

गंगेचा महिमा वर्णन करणे आणि आपल्या पाप क्षाळणाची तिच्याकडे याचना करणे एवढेच खरे तर गंगा लहरीचे मर्म आहे. श्लोकांमध्ये ही फार सुसूत्रता आहे असं नाहीये. परंतु हया संस्कृत श्लोकांमधील अलंकार, वृत्त, त्यातील पौराणिक संदर्भ, एखाद्या श्लोकाचं आपल्या संत साहित्याशी असणारं साधर्म्य, त्याचा भावार्थ वगैरे सर्व सौंदर्य स्थळे साक्षात शारदेचा वरदहस्त लाभलेल्या धनश्रीताईंनी आपल्या मधुर आणि मृदू वाणीने अशी काही उलगडून दाखवली की आम्ही अगदी मंत्रमुग्ध होऊन गेलो. गंगेच्या पात्रात, नदीवरून येणाऱ्या गार वाऱ्याच्या मंद झुळुकांचा आनंद घेत धनश्रीताईंचे निरूपण ऐकणे हा आम्हा सर्वांसाठीच अगदी स्वर्गीय आणि अविस्मरणीय अनुभव होता.

हे निरूपण ऐकताना कंटाळा तर आला नाहीच उलट पुढच्या श्लोकात काय असेल ही उत्सुकता वाढतच राहिली. आणि शेवटी भरून पावल्याची आणि रीतेपणाची अश्या दोन्ही भावना मनात एकाच वेळी दाटून आल्या. हे स्तोत्र जसं जसं पुढे सरकत गेलं तशी तशी गंगेकडे बघण्याची माझी दृष्टीच बदलून गेली.

त्या काळात आणखी विशाल असलेलं गंगेचं पात्र, काठावर असलेली घनदाट वृक्षराजी, तिचं अमृताहून मधुर असलेलं पाणी, मंद लहरी, शीतल वारा ,नदीपात्रात फुललेली गुलाबी कमळं, हलक्या वाऱ्यामुळे पाण्यावर तरंगणारे कमळातील लाल परागकण, अंगाला कस्तुरी लेपन करून नदीवर स्नानाला आलेल्या राजस्त्रिया हे सगळ मी कल्पनेतच अनुभवलं आणि मन पिसासारखं हलकं होऊन गेलं. घाटावर मला कविराज जगन्नाथ हे स्तोत्र रचताना ही दिसले. सामान्य जनांना मोक्षाच्या आशेने मृत्यू गंगेच्या तीरावर यावा असं वाटतं परंतु मोक्ष कर्माने मिळतो अशी शिकवण देणारे, पूर्ण आयुष्य गंगेकाठी घालवलेले परंतु आपल्या शेवटच्या दिवसात गंगा ओलांडून पैलतीरावर जाणारे संत कबीर ही गंगेच्या घाटावर बसून कल्पनेतच बघितले.

ह्या व्याख्यानांच्या वेळा सांभाळून काशी दर्शन ही सुरू होतचं. सगळ्याच हिंदूंचं आराध्य दैवत असलेल्या काशी विश्वनाथ दर्शनासाठी आम्ही पहाटे तीन ते चार ची आरती ऑनलाईन बुक केली होती . देवळाचं प्रांगण खुप छान, स्वच्छ आणि प्रशस्त आहे. पहाटेची शांत वेळ , आकाशात पौर्णिमेच्या आसपासचा पूर्ण चंद्र, थंड हवा, कानावर येणारे पहिल्या आरतीचे सुर असं छान वातावरण विश्वेश्वराच्या दर्शनाची ओढ वाढवतच होतं.

IMG-20231128-WA0007.jpg

गर्दी खरं तर फार नव्हती. परंतु देवळाचा गाभारा छोटा असल्याने आणि एकंदरच लाईन लावण्याची आपल्याला आवड नसल्याने गाभाऱ्यात जाण्यासाठी खूप लोटा लोटी होत होती. बरोबरच्या मैत्रिणी गर्दीत दर्शनासाठी भिडल्या होत्या. गर्दीमुळे दर्शनाच्या रांगेतून बाहेर पडणं ही मला शक्य नव्हतं आणि पुढे ही जाणं शक्य नव्हतच . मी रांगेतून थोडी बाजूला होऊन अंग चोरून एका कोपऱ्यात कशीबशी उभी होते.

तेवढ्यात तिथला सुरक्षा रक्षक दिसला. त्याला म्हटल, “हे बॅरिकेड जरा बाजूला घ्या मी बाहेर येते.” हे ऐकून तो ही चक्रावला. म्हणाला , " तुमच्या पेक्षा वयस्कर बायका घेतायत दर्शन , तुम्ही का तश्याच जाताय ?" मी " लोटा लोटीची भीती वाटते " असं म्हटल्यावर "काशी विश्वेश्वर असताना कसली आलीय भीती ? जा बिंधास " म्हणाला, तरी ही गर्दीत भिडण्याचं डेअरिंग मला होतचं नव्हतं. मी पण निराश, हताश झाले होते एवढं दोन फुटांवर असून ही दर्शन नाही म्हणून. पण नंतर काय त्याच्या मनात आलं माहीत नाही , त्याच्या रुपात विश्वेश्वरच जणू धावून आला. त्याने लाईन सिंगल केली. लोटा लोटी त्यामुळे थोडी कमी झाली. मला म्हणाला “आता जा “. मग गेले आणि दर्शन झालं. शंकराची पिंडी जमिनीपासून थोडी खाली आहे. चारी बाजूंनी सहा आठ इंचाचा कठडा आहे. पिंडी काळी भोर असून तशी आकाराने लहान आहे. विशेष म्हणजे पिंडीला हात लावून सर्वांना दर्शन घेता येते. दर्शन घेऊन बाहेर ओवरीवर येऊन बसले तेव्हा मात्र एकदम शांत आणि निवांत वाटल.

बनारस शहर अस्वछता, गर्दी ह्यासाठीच प्रसिद्ध आहे. पण मला बनारस खुप आवडलं. म्हंजे तिथला ट्रॅफिक, तिथली बेशिस्त, तिथल्या बोळकंडी सारख्या गलल्या, गर्दी, फार स्वच्छ नसणारी गंगा नदी आणि तिच्यावरचे प्रसिद्ध घाट, गोड बोलणारी लोकं, त्यांची थोडी वेगळी हिंदी भाषा, तिथल एकंदर कल्चर, बनारसी पान, रबडी, चाट, चाय, मिठाई, साड्या , सगळचं आवडलं आहे. स्थान महात्म्य म्हणातत तसं काही तरी वेगळं आहे त्या गावात नक्की ... उगाच नाही एवढी लोकं जातं तिथे. असो.

20231202_080641.jpg

आता मी घरी आले आहे पण मनावर अजून ही बनारस आणि गंगा लहरीच गारूड कायम आहे. गंगा लहरी च्या रसास्वादाची तृप्ती अजून झाली नाहीये. उलट " आणखी हवं " अशी ओढ वाटते आहे. यू ट्यूब वर असेल तर ऐकीन ही पुन्हा पण त्याला ती सर येणार नाही हे नक्की.. ही स्वर्गीय अनुभूती आम्हा सामान्य जनांना देणाऱ्या धनश्रीताईंप्रती कृतज्ञता व्यक्त करते. त्यांचे आभार न मानता त्यांच्या ऋणात राहणेच मला जास्त आवडेल.

हेमा वेलणकर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आजच वाराणसीहून परत आलीये,तुम्ही घेतलेला अनुभव प्रत्यक्ष घेतला आहे, लेख खूप आवडला!तुम्ही फार फार छान लिहिता!

ज्येष्ठागौरी , भावना गोवेकर, आणि अनया धन्यवाद...
@ज्येष्ठागौरी तुम्ही ही ह्याच कार्यक्रमात होतात का ? तसं असेल तर दोन माबोकर चार दिवस एकत्र होते पण ओळख पटली नाही. Happy

खूप भाग्यवान आहात. नेहमीप्रमाणे भावनापूर्ण आणि ओघवते लिखाण. तुमच्या लेखनातून एक प्रतिमा निर्माण झालेली आहे आणि नेहमीच आत्मियता वाटत आलेली आहे.

मस्त लेख आणि अनुभव ममोजी, छान लिहिलंय नेहेमीप्रमाणे. ही आरती एकदा बघायची आहे. गंगालहरी कधी काळी शाळेत असताना पाठ केलं होतं, टिमवीच्या षष्ठी परीक्षेला होत हे काव्य. फार सुंदर आहे. अर्थ किचकट होता फारच. थोड रिफ्रेश केलं तर नीट चालीत नक्कीच म्हणता येईल. हे शिखरिणी वृत्तात आहे. ह्या वृत्तात जी सुभाषिते आहेत, त्याला एकदम वेगळी शांत चाल असते, आता इथे कशी देऊ ?
IMG20231206212117_0.jpg
हे ते टिमवी चे पुस्तक Happy अधिकची खूण म्हणजे तिथे संधी सोडवून म्हणायचं आहे.

सुरेख लेख!!

शिखरिणी वृत्त म्हणजे शिवमहिम्न स्तोत्र. तसे त्यात इतर वृत्तांतलेपण श्लोक येतात, पण जास्त श्लोक शिखरिणीमध्ये आहेत. मी वरचे म्हणून बघितले. मस्तच!

लेख वाचून खूप शांत वाटलं हेमाताई..

काशीदर्शन करायचं तर श्रद्धा हवी. भाविकपणा हवा. (काशीचे काही विडिओ पाहिल्यावर झालेलं मत.) @ममो लेखन आवडलं. @लंपन यांनी दिलेला संदर्भ आणि फोटो अगदी योग्य.

छान लेख...
मी ८२ वर्षाच्या वडीलांना घेऊन गेलो....
दोघांनी गंगेत डुबकी मारली .
देव नावाचे महाराष्ट्रीयन ब्राम्हण होते त्यांच्या वाड्यात मुक्काम केला. ते काशीचे मेअर होते कधीकाळी.
वडिलांना काशी, प्रयाग, गया यात्रा घडवली.
गावी आल्यावर गंगापूजन केले. गावजेवन घातले. त्यांना खूप छान वाटलं.

खूप सुंदर अनुभव... तुम्ही लिहिला सुद्धा छान..!

दत्तात्रेयजी तुमचा अनुभव वाचून श्रावण बाळाची कथा आठवली. छान अनुभव .!

माझे आजोबाही नेहमी 'काशीस जावे नित्य वदावे' म्हणत असत. आणि आंघोळ करताना 'गंगेच यमुने च एव'. तुमचा लेख वाचून नेमके तेच आठवले.

आत्तापर्यंत काशीचे वर्णन ऐकताना चिंचोळ्या गल्ल्या, मोकाट सुटलेले वळू वगैरे वर्णने ऐकून फारशी चांगली प्रतिमा नव्हती मनात. पण तुम्ही केलेले वर्णन आवडले.
गंगेचे दर्शन घेण्यासाठी मला ऋषिकेश किंवा गंगोत्रीला जायला जास्त आवडेल. बघू कधी योग येतो.

मस्त. मी वाराणशी व अलाहाबाद ची गंगा, संगम बघितला आहे. अमेझिंग गंगा आरती सुपर. बनारस फूड ग्रेट.

सामो, वावे, मामी लंपन , प्रज्ञा, छंदि फंदी, अंजू, मनमोहन, Srd, दत्तात्रय साळुंके, WHITEHAT, रुपाली, mazeman, अमा धन्यवाद .

भावनापूर्ण आणि ओघवते लिखाण. तुमच्या लेखनातून एक प्रतिमा निर्माण झालेली आहे आणि नेहमीच आत्मियता वाटत आलेली आहे. >> सामो काय लिहू ? धन्यवाद.
लंपन कमाल आहे, अजून ते स्तोत्र जपून ठेवलं आहे ह्याच खुप कौतुक वाटतंय. होय शिखरीणी वृत्तच आहे .
शिखरिणी वृत्त म्हणजे शिवमहिम्न स्तोत्र. तसे त्यात इतर वृत्तांतलेपण श्लोक येतात, पण जास्त श्लोक शिखरिणीमध्ये आहेत. मी वरचे म्हणून बघितले. मस्तच! लेख वाचून खूप शांत वाटलं हेमाताई.. >> प्रज्ञा धन्यवाद ह्या माहिती बद्दल.
Srd, देवदर्शनाच्या हेतूने जात असाल तर श्रध्दा हवी अश्या गर्दीच्या ठिकाणी तरी... आपण शिस्तीत थोडे कमी पडतो . नीट रांग केली तर सर्वांना चांगलं दर्शन घेता येईल पण ते अपल्या रक्तातच नाहीये. असो. विश्वनाथ मंदिराच्या मागे गंगेवर येण्यासाठी एक मार्ग बनवला आहे त्यालाच कॉरिडॉर म्हणतात. तो स्वच्छ ही आहे. तसेच पैलतीरावर एक ही घाट नाहीये पण नमो घाट हा नवा घाट बांधत आहेत.
द सा, श्रावण बाळ च आठवला मला ही ... वडिलांना किती कृतकृत्य वाटलं असेल तुम्ही एवढ्या वयात ही स्वतः: त्यांना घेऊन गेलात आणि मावंदं ही घातलं म्हणून.
Mazeman, बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणची गंगा वेगळी आहे. काशी ची खळाळणारी नाहीये. मंद उतार असल्याने प्रवाह शांत आहे.
अमा, मला ही फूड खुप आवडलं. बनारसी पान तर सुपर्ब होतं. आकाराने लहान पण तोंडात अक्षरशः विरघळणारं. ठाण्याला मी पान विशेष खात नाही , मगई असेल तरच खाते कधी तरी. आकाराने प्रचंड विडे आवडत नाहीत.

फारच सुंदर मनभावन लिहिलं आहे. काशीला जाण्याची इच्छा आहे. पाहुयात. गंगा मैय्या याच वर्षी ऋषिकेश आणि हरिद्वार, देवप्रयाग मध्ये पाहिली. आणि नंतर तिच्याविषयी अतीव अनामिक ओढ निर्माण झाली आहे. तुमच्या लेखनामुळे ती अधिक वाढली. लेले मॅडम च्या ओघवत्या वाणीबद्दल काय बोलावे. फार सुंदर रसग्रहण आणि निरूपण करतात त्या. बाकी बनारस चे वर्णन पण आवडले.

@ लंपन, धन्यवाद टिमवि क्या आठवणी आणि पुस्तकाचे पान दिल्याबद्दल

छान लिहिलंय.
धनश्री लेल्यांचं विश्वरूपदर्शनावरचं निरूपण फार आवडलं होतं.

शिखरिणीबद्दल वाचून एकदम नॉस्टॅल्जिक वाटलं! Happy
शंकराचार्यांच्या सौंदर्यलहरीदेखील याच वृत्तात आहेत ना?

>>>>द सा, श्रावण बाळ च आठवला मला ही ... वडिलांना किती कृतकृत्य वाटलं असेल तुम्ही एवढ्या वयात ही स्वतः: त्यांना घेऊन गेलात आणि मावंदं ही घातलं म्हणून>>>> माझ्या वडिलांचा मला दिर्घकाळ आनंददायी, प्रेरणादायी सहवास लाभला. ते १०२ वर्ष हिंडतं फिरतं, निरोगी आयुष्य जगले. जन्मतः माळ घातलेली. वारकरी , शुध्द शाकाहारी भोजन, अध्यात्माची आवड, चिंतनशील सरळमार्गी स्वभाव, नियमितपणा, प्रसन्नवृती, मदतीला तत्पर , गावात रहाणं, हे गमक असावं दिर्घायुष्याचं.

@ मनीमोहोर

अनुभवकथन सुंदर आहे. आत्मीयतेने शेयर केलेले. गंगापात्रातला माहौल उभा केलात.

@ लंपन

तुमच्या कृपेने ‘गंगालहरी’ प्रथमच वाचनात आले, रससंपृक्त. चालीत गाता आले. अनेक आभार.

@ दसा,

वडिलांचा दिर्घकाळ आनंददायी, प्रेरणादायी सहवास लाभला. …. भाग्यवंत आहात.

माझ्या वडिलांचा मला दिर्घकाळ आनंददायी, प्रेरणादायी सहवास लाभला. ते १०२ वर्ष हिंडतं फिरतं, निरोगी आयुष्य जगले. जन्मतः माळ घातलेली. वारकरी , शुध्द शाकाहारी भोजन, अध्यात्माची आवड, चिंतनशील सरळमार्गी स्वभाव, नियमितपणा, प्रसन्नवृती, मदतीला तत्पर , गावात रहाणं, हे गमक असावं दिर्घायुष्याचं.

>>> खरंच भाग्यवान आहात. तुम्ही केलेल्या वर्णनावरूनच लक्षात येतंय किती निर्मळ जीवन असेल वडिलांचं.

स्वाती, ऋतुराज, अनिंद्य द. सा धन्यवाद.

ऋतुराज , माझं ही असच झालंय. गंगेबद्दल अनामिक ओढ वाटतेय, मी मनाने अजून तिकडेच आहे.

स्वाती, सौंदर्य लहरी माझ्या बहिणीच फार म्हणजे फार आवडतं आहे. तिचा थोडा फार अभ्यास ही आहे सौंदर्यलहरीचा. कधी तरी मला ही सांगते उलगडून त्यातली सौंदर्य स्थळे. नवरात्रात नऊ दिवस ती रोज ते स्तोत्र म्हणते ही. सौंदर्य लहरी हा शब्द वाचल्यावर हे सगळ लिहिल्या शिवाय रहावलच नाही. असो.

माझ्या वडिलांचा मला दिर्घकाळ आनंददायी, प्रेरणादायी सहवास लाभला. ते १०२ वर्ष हिंडतं फिरतं, निरोगी आयुष्य जगले. जन्मतः माळ घातलेली. वारकरी , शुध्द शाकाहारी भोजन, अध्यात्माची आवड, चिंतनशील सरळमार्गी स्वभाव, नियमितपणा, प्रसन्नवृती, मदतीला तत्पर , गावात रहाणं, हे गमक असावं दिर्घायुष्याचं. >> द. सा भाग्यवान आहात...

।। गंगा लहरी स्तोत्रम्।।पण्डितराज जगन्नाथेन विरचिता गंगा लहरी-Panditraj Jagannath Ganga Lehri Stotra : https://www.youtube.com/watch?v=yY13vYa5_cM

इथे डॉ विजया गोडबोले यांनी गायलेले गंगालहरी स्त्रोत्र ऐकायला मिळेल.

रच्याकने, पंडितराज जगन्नाथ नावाचं एक संगीत नाटक होतं ना? ते याच पंडितांवर आधारीत आहे का?

सुंदर लेख आणि अनुभव
मला नदीच्या काठी बसायला खूप आवडत. बनारस हि आवडत्या शहरांपैकी एक. तुमचा अनुभव शेयर केल्याबद्दल धन्यवाद.

खरंच भाग्यवान आहात. तुम्ही केलेल्या वर्णनावरूनच लक्षात येतंय किती निर्मळ जीवन असेल वडिलांचं. >>> अगदी अगदी.

Pages