(अंधारातच टीव्हीवरच्या बातम्या ऐकू येतात.
“Ladies and Gentlemen, today we are exposing the Urban Naxals behind the so-called student protests. These anti-national elements will have you believe that they are fighting for students’ rights. But actually these tukde-tukde gang members are funded by the Chinese, are in cahoots with Pakistan and their sole aim is to destroy the sovereignty and integrity of our beloved India.”
बातम्या सुरु असतानाच प्रकाश. आर्णा सोफ्यावर बसून टीव्ही बघत आहे. आई कामात. वडील आतून येतात.)
वडील:- बंद कर तो टीव्ही.
आर्णा:- (उपहासानं) या ना बाबा, बसा. तुमच्या मुलाचंच कौतुक चाललंय.
आई:- (चिडून) आर्णा!
आर्णा:- तुमचंच आवडतं चॅनेल आहे बाबा.
(आई रिमोट घेऊन टीव्ही बंद करते.)
आर्णा:- काय झालं बाबा? ऐकवत नाही? पूर्वी इथेच लोकांवरची चिखलफेक किती आवडीनं बघायचात तुम्ही. देशद्रोही, अर्बन नक्सल, दहशतवादी हे शब्दं या चॅनेलसाठी आणि तुमच्याहीसाठी काही नवीन नाहीत.
आई:- का उगाच वाद घालतेस? इथे कमी ताप आहे का ह्यांना.
आर्णा:- पूर्वी काय कमी टेन्शन होतं? म्हणूनच बीपी सुरु झालं ना. स्वतःचा एक फोटो कधी कुठे पेपरात यावा म्हणून किती प्रयत्न करावे लागायचे बाबांना. आणि इथे दादाचे फोटो, नाव अगदी रोजच्या रोज पेपर, टीव्ही सगळीकडे. बाबांना मुलाचा उत्कर्ष सहन होत नाही असं दिसतंय.
आई:- टोमणे मारायची गरज नाही असे.
आर्णा:- आई तुला कळलंय? अजूनही फक्त दुःखच होतंय बाबांना. पश्चाताप नाही. आपण इतरांवर सोडलेला कुत्रा आज आपल्यालाच चावला याचं दुःख. पण मुळात कुत्रा सोडून चूक केल्याचा पश्चाताप नाही.
आई:- काय घेशील बाई शांत बसायला?
आर्णा:- मला कशाला काय देताय. द्या म्हणा पैसे या त्यांच्या चॅनेलवाल्यांना. पैसे घेऊन नेमकं कुठे लक्ष द्यायचं आणि कुठे दुर्लक्ष करायचं चांगलं ठाऊक आहे त्यांना.
वडील:- मी निघतो. स्वतःच्याच घरात स्वतःचा इतका अपमान सहन करण्याइतके तरी वाईट दिवस येतील वाटलं नव्हतं.
आर्णा:- तुम्ही कशाला जाताय कुठे? मीच जाते. अभ्यास आहे मला भरपूर. थोडा ब्रेक म्हणून काय तो टीव्ही लावला होता तर तो पण बंद केलात.
(आर्णा आत जाते. शांतता.)
वडील:- काय चुकलं गं आपलं?
आई:- अहो, असं का म्हणता?
वडील:- ही पोरगी अशी वागते, अशी उलट उत्तरं देते. आणि पोरगा? आपण किती मेहनत घेतली पोरांवर. उन्हाळ्यात संस्कार वर्गांना पाठवलं. संध्याकाळी शाखेत पाठवलं. आणि शाळेचा तर प्रश्नच नाही. काय म्हणून याला दिल्लीला कॉलेजला पाठवलं आणि काय करायला लागला पोरगा.
आई:- अहो, पण खोटे आहेत ते विडिओ. आर्णा सांगत होती कसे मुद्दाम बदनामी करण्यासाठी त्यांचे एडिटेड विडिओ पसरवलेत मीडियानं. पोलिसांना लाठीहल्ला करायला आणि मुलांची धरपकड करायला कारण पाहिजे होतं फक्त. अश्या देशविरोधी घोषणा देईल का अथर्व?
वडील:- पण त्याचा तो मित्र समीर? तो समीर “शेख” आहे म्हणत आहेत टीव्हीवर.
आई:- तुमचा आपल्या पोरावर विश्वास आहे ना, मग पुरे झालं.
वडील:- अशानं चालत नाही. सगळ्यांनी संबंध तोडले. कोणीच आपलं राहिलं नाही. तसंही विधानसभेनंतर तर गर्दी कमीच झाली होती घरची. कार्यकर्ते पण टाळायचे. आता तर १० दिवस झाले एक कुत्रं आलं नाही घरी. त्यात हे राजकीय शत्रू मुद्दाम प्रकरण तापवत आहेत.
आई:- फार काळ चालणार नाही हे. या पेपरवाल्यांना नवीन विषय सापडतील आणि विसरतील हे प्रकरण लवकरच.
वडील:- तुझा काही संपर्क अथर्वशी?
आई:- मोर्चाच्या आधल्या दिवशी समीर सोबत जो गेला तो गेलाच. नंतर एक फोन नाही त्याचा. मी करते तर लागत नाही. बंदच केलाय कदाचित त्यानं. पाळत ठेवून आहेत त्यांच्या संघटनेवर, सर्व हालचालींवर.
वडील:- मी तर म्हणतो करून टाकावं सरेंडर. हे भूमिगत राहणं, पोलिसांपासून पळणं काही बरं नाही. पोलिसांचा काय नेम? सरळ एन्काऊंटर वगैरे केला तर?
आई:- अहो काहीतरीच काय बोलताय? मला तर आधीच धडधड होतंय छातीत.
वडील:- आर्णाशी असेल ना संपर्कात? त्याला सांगायला हवं हे.
आई:- मी विचारलं तिला. पण तिलाही काही बातमी नाही म्हणतेय.
वडील:- ती पण काही सांगायची नाही आपल्याला.
(दाराची घंटी वाजते.)
आई:- (दाराकडे चालत जात) किती दिवसांनी घंटीचा आवाज ऐकू येतोय असं वाटतंय.
(आई दार उघडते. दारात इन्स्पेक्टर. हाती काही फाईल्स.)
इन्स्पेक्टर:- दादासाहेब आहेत का? मी इन्स्पेक्टर जाधव.
आई:- हो हो, या ना आत.
इन्स्पेक्टर:- (आत येऊन) नमस्कार दादासाहेब! मी गजानन जाधव. मागच्याच महिन्यात बदलून आलो इथे अजनी स्टेशनला.
वडील:- अच्छा, तुम्ही आहात तर. या या बसा. कळलं होतं तुम्ही अजनीला आल्याचं. भेटायचं होतंच तुम्हाला. (आईला खुणावतात.)
आई:- हो. मी खायला आणते.
(आई स्वयंपाकघरात जाते.)
इन्स्पेक्टर:- नाही नाही. नको वाहिनी. घाईत आलोय आता.
वडील:- बसा बसा. तुमच्या आधी ते जयस्वाल साहेब होते. फार चांगले संबंध होते आमच्याशी. आठवड्यातून एकदा तरी यायचेच इकडे कार्यालयात.
(इन्स्पेक्टर उठून खोलीत फिरून घराचा अंदाज घेतात.)
इन्स्पेक्टर:- प्रशस्त घर आहे छान. किचन इथे आत आहे वाटतं. आणि मागे काय मग?
वडील:- मागे बेडरूम आहे. बाजूला एक पोरांसाठी बांधली स्टडी रूम म्हणून. आणि समोर कार्यालय काढलं जनसंपर्कासाठी.
(इन्स्पेक्टर टेबलवर ठेवलेली फाईल उघडतात. कागद चाळतात.)
इन्स्पेक्टर:- तुमची ही स्टडी रूम आणि ते ऑफिस दोन्ही ब्लू-प्रिंट मध्ये दिसून नाही राहिले.
वडील:- (गोंधळून) हो. उशिरा बांधलेत ते. पोरं मोठी झालीत. जागेची गरज वाढली.
इन्स्पेक्टर:- कसं साहेब. इल्लिगल झालं ना ते.
वडील:- अहो कसलं काय. कॉलनीत सगळ्यांनीच बांधल्या खोल्या, मजले.
इन्स्पेक्टर:- मग ब्लू-प्रिंट अप्रूव्ह करून घायचं. आणि हे समोरचं शेड पण खूप बाहेर आलं प्लॉटच्या.
वडील:- ते कार्यकर्त्यांना बसायची जागा म्हणून. आता निवडणुकीत सगळे थकले कार्यकर्ते. नाहीतर एरवी खूप गर्दी असते इकडे. त्या शेडमुळे पार्किंगची पण सोय होते.
इन्स्पेक्टर:- असं कसं चालणार साहेब. इथे कमर्शियल ऍक्टिव्हिटी नाही चालत.
वडील:- अहो कसलं कमर्शियल? कसली खरेदी नाही की विक्री नाही.
इन्स्पेक्टर:- अहो. रेसिडेन्शिअल एरिया हा. नियमबाह्य आहे ते. अतिक्रमण. आता पाडावं लागेल.
वडील:- (चिडून) काहीतरीच काय बोलताय? अतिक्रमण?
(वडिलांचा आवाज ऐकून आई आणि आर्णा बाहेर येतात.)
इन्स्पेक्टर:- आवाज कमी साहेब. आम्ही आमचं काम करून राहिलो. अतिक्रमण थांबवणं कामच आहे आमचं.
वडील:- तुम्हाला पैसे हवेत ना? सगळ तोंडानं मागा. धमक्या देऊन हफ्ते वसूल करणारे गुंडंच झालेत पोलीस म्हणजे.
इन्स्पेक्टर:- अहो साहेब, जीभ आवरा आपली. खूप ऐकून घेतलं मी. वरून ऑर्डर्स आहे बुलडोझर चालवायच्या. तुम्हाला पूर्वसूचना द्यायला म्हणून आलो.
आई:- काय?
इन्स्पेक्टर:- अहो. आमच्या हातची केस नाही ही. माओवाद्यांशी संबंध आहेत तुमच्या पोराचे. NIA चे लोकं तपास करून राहिले. UAPA लावला आहे समीर शेख आणि तुमच्या अथर्ववर. आणि त्यांना आसरा दिल्याचा आरोप तुमच्यावर आहे.
(आई डोळ्याला पदर लावून रडायला लागते.)
वडील:- त्यांचं काय चाललंय याची कल्पना नव्हती आम्हाला. आणि तो समीर मुस्लिम आहे हे ही तेव्हा माहिती नव्हतं. चांगला मराठीत बोलत होता तो.
इन्स्पेक्टर:- काय साहेब! नाव-गाव माहित नसताना घरी ठेवता लोकांना तुम्ही. आता तुमच्यावर पण नक्षल समर्थक असल्याची केस लावणार होते ते NIA चे लोक. ते बरं झालं मी म्हंटलं त्यांना तुम्ही त्यातले नाही म्हणून. नाही तर तुम्हाला पण अटक करणार होते ते. जाऊ द्या, सोडा आता. मी होतो म्हणून आधी सांगायला आलो. बुलडोझर पोहोचतंच असेल ५-१० मिनिटांत.
(इन्स्पेक्टर फाइल्स घेऊन बाहेर निघून जातात. आई रडत खाली बसते. वडील हतबल, स्तब्ध. शांतता.)
आर्णा:- असे का शांत बसलात? फोन करा तुमच्या त्या तात्या साहेबांना. बंद करा म्हणा हा वेडेपणा सगळा.
वडील:- तात्या साहेब स्वतःचा नंबर देत नाहीत कोणाला.
आर्णा:- मग त्यांच्या पीएला करा. (टेबलावरचा मोबाइल उचलून हाती देत) करा लवकर फोन, हे थांबवायचं आहे आपल्याला.
वडील:- (गोंधळून) हो हो.
(वडील भेदरलेल्या परिस्थितीत फोन लावण्याचा प्रयत्न करतात.)
आर्णा:- तू अशी रडत बसू नकोस, आई. जा काय महत्वाचं सामान असेल त्या ऑफिस मध्ये तर घेऊन ये इथेच बुलडोझर येईपर्यंत. ते वेळ देणार नाहीत नंतर. मी स्टडी रूम मधली पुस्तकं आणि कागदपत्रं बाहेर काढते.
(आई कार्यालयाच्या दिशेनं बाहेर जाते. आर्णा आत जाता जाता वडिलांकडे बघते.)
आर्णा:- काय? लागतोय की नाही?
वडील:- उचलत नाही आहे तो.
आर्णा:- मग त्या तुमच्या नवीन आमदाराला फोन लावा, गणपतरावाला.
वडील:- तो काहीच करणार नाही. माझ्या विरोधात मुद्दाम अफवा पसरवतोय तो.
आर्णा:- (पारा चढवत) अहो. मग दुसरी माणसं शोधा. तुमच्या बाळ्याला बोलवा. आता नगरसेवक झाला ना तो. आणि बाकीचे चेले तुमचे? राजू वगैरे? त्यांना अडवा म्हणा बुलडोझर.
वडील:- गेल्या महिन्याभरात कोणीच इकडे फिरकलं नाही. अश्या वेळी तर येणं शक्यच नाही.
आर्णा:- काय कामाचं तुमचं राजकारण मग? २५ वर्षं काय झक मारत बसलात? एक माणूस बोलवता येत नाही गरज पडली तर. अत्यंत निरुपयोगी आहात तुम्ही.
(बाहेर बुलडोझरचा आवाज. लोकांचा गलबला ऐकू यायला लागलाय. गर्दी जमा झाली असावी.)
आर्णा:- आले वाटतं बुलडोझर घेऊन. लोकंही जमलेले दिसतात तमाशा बघायला. मीच बघते त्या पोलिसाला. तुम्ही बसा असे इथेच हातावर हात ठेवून.
(आर्णा तावातावात बाहेर जाते. वडील दुःखी, निराश, स्तब्ध. बाहेर आरडाओरड:- - “तोडा! पाडा!”, “चालवा बुलडोझर”, “हिप हिप हुर्रे”, “जय श्री राम”, “भारत माता की जय”...)
(अंधार. अंधारात बुलडोझर घर तोडत असल्याचा आवाज किमान ५-१० सेकंद. समाप्त.)
बुलडोझर एकांकिकेची संपूर्ण संहिता:
- बुलडोझर (एकांकिका - प्रवेश १)
- बुलडोझर (एकांकिका - प्रवेश २)
- बुलडोझर (एकांकिका - प्रवेश ३)
- बुलडोझर (एकांकिका - प्रवेश ४ - अंतिम)
© प्रणव साकुळकर, २०२३.
प्रकाशनाचे, अभिवाचनाचे आणि प्रयोगाचे सर्व हक्क लेखकाकडे. परवानगीसाठी लेखकाशी संपर्क साधावा.
Contact: pranav.sakulkar@gmail.com
एकांकिकेचे चारही भाग वाचले
एकांकिकेचे चारही भाग वाचले.रिलेट झाले.यातली बहुतेक पात्रं आजूबाजूला, नातेवाईकांत दिसतात.खूप विचार प्रवर्तक आहे.व्हॉट्सअप ग्रुप, बाकी सर्व वातावरणही आजूबाजूला दिसतं.
याचे चांगले प्रयोग होऊन चांगली यशस्वी होवो आणि एक संदेश समाजाला जावो.(अलरेडी प्रयोग झाले असतील तर मला माहित नाही, फार बातम्या वाचत नाही.)
एकांकिकेचे चारही भाग वाचले.
एकांकिकेचे चारही भाग वाचले. असं लिहिणारं कोणी या पिढीत आहे, हे पाहून बरं वाटलं.
प्रणव, उत्तम जमले आहेत चारही
प्रणव, उत्तम जमले आहेत चारही भाग, फक्त जरा शुद्धलेखन तपासून बघाल का?
काही शब्द 'येरझारा घालणे'(योग्य: येरझाऱ्या घालणे) वगैरे आठवले.
@mi_anu, प्रयोग अजून झाले
@mi_anu, प्रयोग अजून झाले नाहीत. नुकतीच लिहून झालीय. मी गेली बरीच वर्षं बाहेर आहे त्यामुळे महाराष्ट्रातील संस्थांशी फारसे संपर्क नाहीत. संपर्काचे प्रयत्न सुरु आहेत. पण असा विषय सादर करायला कोण लोक धजावतील हा प्रश्न आहे. बघूया. शुद्धलेखन लहानपणापासून कच्चं आहे. जाणकारांना दाखवावं लागेल. धन्यवाद!
@भरत, धन्यवाद! मला वाटतं असे विचार करणारे तरी बरेच असतील. किंबहुना असावेत अशी इच्छा आहे. सध्याच्या परिस्थितीत व्यक्त होणं काय ते कठीण झालंय.
खूप छान लिहिली आहे..
खूप छान लिहिली आहे.. शुभेच्छा
छान लिहीली आहे. चारही भाग
छान लिहीली आहे. चारही भाग वाचले.
मस्त जमली आहे. सध्याचा ज्वलंत
मस्त जमली आहे. सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे
चारही भाग वाचले. जरा बाळबोध
चारही भाग वाचले. जरा बाळबोध वाटली पण आवडली एकांकिका.
धन्यवाद, किल्ली, फारएण्ड, धनि
धन्यवाद, किल्ली, फारएण्ड, धनि, हर्पेन!